डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लालभडक रंगात प्रत्येक चित्र रंगवणारा शाम. त्याची शिक्षकांकडून, पालकांकडून माहिती घेतली, तेव्हा कळले की हा फार संतापतो. एवढ्या तेवढ्यावरून हाताच्या मुठी आवळून दणादणा टेबलावर आपटतो. कधी आक्रमक होतो. फारसा कुणाशी बोलत नाही. कधी इतरांच्यात मिसळत नाही. कायम कुट्ट काळा रंगच वापरणारा मुरली.  माने किल्ला काढला कुळकुळीत काळा रंग वापरून. समुद्र बोट काढताना काय करावे याने? समुद्र निळसर पण बोट काळी, तिच्या खाली प्रतिबिंबही काळे. नारळाची झाडी असलेले निसर्गचित्र काढले. त्यात सारी झाडे, त्यांच्या सावल्या आणि नारळही काळे. एका चित्रात माणसांच्या आकृत्या काढल्या, त्याही गडद काळ्या. मुरलीला नैराश्य आले आहे, हे त्याच्या रंगाच्या निवडीतून कळत होते. प्रत्येकाचे स्वभाववैशिष्ट्य त्याच्या चित्रातून व्यक्त होत राहिले. निर्मितीच्या मूक पडसादामधून फक्त वेदनांचे गाणे उमटत राहिले होते. मनाच्या काळोखामध्ये छोटी बधिर चांदणी ठणकत राहिली होती.

त्याचे मन प्रचंड अस्थिर होते. घरानेच त्याला नाकारलेले होते. मग बाहेरच्या दुनियेत तरी कुठला आलाय थारा! सारे आयुष्य अस्तित्वहीन झालेले, विस्कटलेले. जगणे गुदमरलेले. सुरुवातीला शांत, गप्प वाटायचा तो; पण आतमध्ये ज्वालामुखी सतत धुमसत होता. सतत वाढणारी अक्राळविक्राळ घुसमट कधीतरी असह्य झाली. संतापाने तो बेभान झाला. आत कोंडून राहिलेली सारी हिंमत एकवटून काळीज फाडून बाहेर आली. आणि त्याचा कायम रागराग करणारी आई या हिंस्रतेचा बळी ठरली. वृत्तपत्रांत बातमी प्रसिद्ध झाली- ‘मूकबधिर मुलाने आईवर प्राणघातक हल्ला केला.’ वाचणारे सुन्न झाले आणि मग सकाळी चहाच्या कपाबरोबर उघडलेल्या वृत्तपत्रात वाचलेली धक्कादायक बातमी, नित्याच्या रहाटगाडग्यात विसरून गेले.

पुन्हा कधीतरी अशीच बातमी आली. अपंग मुलीला पलंगाच्या पायाला बांधून पालक दोन दिवस गावाला निघून गेले. शेजाऱ्यापाजाऱ्यांनी पोलिस चौकीत तक्रार नोंदवली. छळ सोसणाऱ्या मुलीची पोलिसांनी मुक्तता केली आणि तिला सेवाभावी संस्थेत दाखल केले.

वृत्तपत्रांत अशा बातम्या येत राहतात. चुकचुकत, खेद वाटून घेत, हळहळत आपण आपापल्या व्यापात गुंतून जातो; पण कुणाच्यातरी मनात परमेश्वर उभा राहतोच.

नापासांची शाळा सुरू करणाऱ्या भय्यासाहेब (पु.ग.) वैद्य सरांच्या मनात त्यांच्या आपटे प्रशालेमध्ये मूकबधिर मुलांना एकत्र आणून, त्यांना दहावी परीक्षेसाठी तयार करायचे, असे आले. कुणी सातवी, कुणी आठवीतून शाळा सोडलेली, कुणी फक्त पाचवीच पास.  या मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम नाही. इतर विद्यार्थ्यांना जो दहावीचा शिक्षणक्रम आहे तोच त्यांनाही; पण ऐकू येत नाही ही मोठी अडचण असल्याने त्यांची अभ्यासाची, आकलनाची गती कमी असते. हे विद्यार्थी दहावीच्या केवळ दोन किंवा तीन विषयांच्या परीक्षाच एका वर्षात देऊ शकतात. प्रश्न उभा राहतो तो तीन-चार वर्षे पुन्हा पुन्हा प्रवेश शुल्क भरण्याचा. पैसे कुठून आणायचे?आईवडिलांचे पोट रोजच्या कमाईवर असणाऱ्या पालकांची हीमुले. तरीही शिक्षकांची आणि मुलांची जिद्द अफाट, पण काहीही करून दहावी होण्याची इच्छा तीव्र. गेली दहा वर्षे या मूकबधिर विद्यालयाचा वृक्ष वाढतो आहे. विद्यार्थी दहावी होतात. त्यांना संगणकाचे प्रशिक्षणही मिळते. शिवणकाम,भरतकामाचे वर्ग घेतले जातात.

तिथल्या दोन शिक्षिका, अश्विनी जोशी आणि अश्विनी देशपांडे, एके दिवशी आमच्याकडे आल्या. प्रभा गोगावले या माडगूळकर प्रतिष्ठानमधल्या चित्रकार सहकारी त्यांना घेऊन आल्या होत्या. ‘आमची मुले काही करू इच्छितात. दहावी पूर्ण करायला त्यांना काही वर्षे लागतात. प्रत्येक परीक्षेत दोन विषय सुटतात; कारण त्यांच्यासाठी वेगळा अभ्यासक्रम नाही. इतर सर्वसाधारण मुलांचाच अभ्यासक्रम त्यांना पूर्ण करावा लागतो दहावीसाठी. ऐकू येत नसल्याने त्यांचे आकलन सावकाश होते. परीक्षा प्रवेश फी वर्षानुवर्षे भरणे त्यांच्या पालकांना जड जाते. मुले म्हणतात, आम्ही पैसे मिळवून फी भरू, पण शिकू. तुम्ही मदत कराल?’

आमचे प्रतिष्ठान ‘आत्मभान’ शिबिरे विद्यार्थ्यांसाठी घेते. शाळा सोडलेली मुले, निरीक्षणगृहातील मुले, गुन्हेगार मुले,वाड्यावस्त्यांमधली मुले, डोंगराळ-दुर्गम भागातली मुले यांच्यावर कलांच्या माध्यमातून उपचार केले जातात. शारीरिक उणीव असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची संधी या वेळी आमच्याकडे आपोआप चालून आली होती. विभा, प्रभा, वर्षा, टोळे सारेच तत्परतेने पुढे सरसावले.

आमचे काम सुरू झाले. लक्षात आले, की ज्यांना शाब्दिक संपर्क अवघड जातो, अशांना चित्रकला हे अभिव्यक्तीचे प्रभावी साधन ठरते आहे. आम्ही चित्रकलेवर लक्ष केंद्रित केले. मुले-मुली रंगरेषांतून आपल्या भावभावनांना मुक्तपणे वाट करून देऊ लागली. बोलण्यातली, भाषेतली लय,तिचा ताल, ठेका ऐकू न शकणारी मुले-मुली रेषांच्या लयीत, तालात, ठेक्यात मनसोक्त व्यक्त होऊ लागली. एकलकोंडी,खिन्न मुले मनावरला भार शुभ्र कागदांवर हलका करू लागली. हळूहळू डोळे आणि बोटेच त्यांचे कान झाले. ज्ञानग्रहण सुरू झाले. अगदी आवेगाने सुरू झाले. रेषांमधून, रंगांमधून, काहीवेळा कोऱ्या सोडलेल्या जागांमधून मुलेमुली आमच्याशी संवाद साधू लागली. सुरुवातीला उदास आणि सपाट वाटणारे वातावरण चांगलेच प्रसन्न झाले. जो तो आपल्या समोरच्या कागदावर उत्तम निर्मिती करण्यात मग्न दिसायला लागला. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली होती. नव्या वर्षाची शुभेच्छापत्रे तयार करून ती विकून फी साठी पैसे उभे करावेत, असे ठरले.

वेगवेगळ्या रंगांच्या हातकागदांवर विद्यार्थ्यांचे भावविश्व साकारू लागले. आकाशात पक्षी झेपावू लागले. लतावेलींना बहर आला. कौलारू घरावर कोवळी उन्हे रांगू लागली. आभाळात ढग भरून आले. धरणी चिंब झाली. गुलाब, जास्वंद उमलले. आदिवासी ढोलाच्या तालावर नाचू लागले. काळे करंद आभाळ चमचमणाऱ्या चांदण्यांनी भरून गेले. कधी मोर नाचला, तर कुठे कोंबड्याने बांग दिली. लाल, पिवळ्या,भगव्या, निळ्या, करड्या, तपकिरी, हिरव्या रंगाच्या कागदांवर त्यांचीही दुनिया साकारली.

लालभडक रंगात प्रत्येक चित्र रंगवणारा शाम. त्याची शिक्षकांकडून, पालकांकडून माहिती घेतली, तेव्हा कळले की हा फार संतापतो. एवढ्या तेवढ्यावरून हाताच्या मुठी आवळून दणादणा टेबलावर आपटतो. कधी आक्रमक होतो. फारसा कुणाशी बोलत नाही. कधी इतरांच्यात मिसळत नाही. कायम कुट्ट काळा रंगच वापरणारा मुरली.  माने किल्ला काढला कुळकुळीत काळा रंग वापरून. समुद्र बोट काढताना काय करावे याने? समुद्र निळसर पण बोट काळी, तिच्या खाली प्रतिबिंबही काळे. नारळाची झाडी असलेले निसर्गचित्र काढले. त्यात सारी झाडे, त्यांच्या सावल्या आणि नारळही काळे. एका चित्रात माणसांच्या आकृत्या काढल्या, त्याही गडद काळ्या. मुरलीला नैराश्य आले आहे, हे त्याच्या रंगाच्या निवडीतून कळत होते. प्रत्येकाचे स्वभाववैशिष्ट्य त्याच्या चित्रातून व्यक्त होत राहिले. निर्मितीच्या मूक पडसादामधून फक्त वेदनांचे गाणे उमटत राहिले होते. मनाच्या काळोखामध्ये छोटी बधिर चांदणी ठणकत राहिली होती.

पण कलेचे सामर्थ्य विलक्षण असते. ते दु:खानुभवाला साद घालते. मलूल, असह्य, उत्कट दु:खावर हळुवार फुंकर घालते. फुलण्याची बीजे रोवते.  मग हळूहळू आकाश मोठे होते. चांदणी मोठी होते. चमचमू लागते आणि आनंदाचे गाणे त्याहून मोठे होत जाते.

विद्यार्थ्यांचा आनंद दिवसेंदिवस सप्तरंगांत न्हाऊन निघू लागला. तयार झालेली शुभेच्छापत्रे विकली गेली. काही हजार रुपये उभे राहिले. स्वत:च्या निर्मितीमधून फीसाठी मिळवलेल्या त्या पैशांचे साऱ्यांनाच फार अप्रूप होते. पुढे काम होत जाईल, दिशा दिसत जाईल, वाट स्पष्ट होत जाईल.

दिव्यत्वाचा, पावित्र्याचा स्पर्श असलेली कामे जगन्नाथाच्या रथासारखी असतात. अनेकांचे हात त्याला लागत राहतात. रथ पुढे जात राहतो.

Tags: स्वावलंबन स्वयंपूर्ण मनाचे रंग मनाची स्थिती नैराश्य मानसिकता psuchology रंगांची निवड चित्रकला मूकबधीर विद्यार्थी दिव्यांग choice of colors Colors Painting Drawing Art Form Hearing Imaparied  Dnyanda Naik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके