डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भारतीयांच्या जीवनात इतर देशांच्या तुलनेने आंबा अधिकच महत्त्वाचा. याचं कारण आंबा हा मूळचा ‘भारतीय’ आहे. पोपई मूळची दक्षिण व मध्य अमेरिकेतील, सफरचंद मूळचं मध्य पूर्वेतील, चिंच आफ्रिकेतील, पेरूसुद्धा मध्य अमेरिकेतील. आंबा मात्र अस्सल भारतीय. जगभर पसरलेला आंबा मुळात भारतातून आलेला आहे ही भावनाच केवढी सुखावह. आपल्या ओळखीचं माणूस विदेशात भेटतं तेव्हा तर मन अधिकच भरून येतं. उच्चायुक्त कार्यालयाच्या अंगणातला आंबा पाहतो तेव्हा नकळत मी हे ऋणानुबंध जगत असतो.

मालदीवच्या आमच्या उच्चायुक्त कार्यालयाच्या कुंपणात एक आंब्याचं झाड आहे. त्याचा  पिसारा प्रचंड फुलवून तो आजूबाजूच्या इमारतींवर,  रस्त्यांवर जिथं जिथं जागा मिळेल तिथं पसरलेला आहे.  मला अशी जुनी भव्य झाडं फार आवडतात. ते कदाचित आपले पूर्वज असावेत;  आजही आमची  काळजी वाटून आमच्यावरती आपल्या छायेचं कृपाछत्र धरत असावेत असं वाटतं. मी अशा अनेक  झाडांच्या बुंध्यांना कवेत येतील तितके घेऊन मिठी मारली आहे. त्यांचं चुंबनही घेतलं आहे. ती झाडं  इतकी वत्सल,  इतकी प्रेमळ वाटतात की,  त्यांना पाहताच आजूबाजूच्या राजकारणातला,  समाजकारणातला आणि एकंदरीतच दुनियादारीतला दुष्टपणा मी विसरून जातो. देहभान विसरून मी  त्यांची वत्सलता पीत राहतो. अनुभवतो. आमच्या कार्यालयाच्या पटांगणातलं हे झाड खरंच केवढं  सुंदर आहे!

आमच्या बंगलीवजा कार्यालयाच्या सर्वांगावर या झाडाच्या फांद्या पसरल्यात. कुंपण  ओलांडून ते समोरच्या ट्रेडर्स हॉटेलच्या चकचकत्या काचांना स्पर्श करू पाहतंय. जिथं जिथं शक्य  असेल त्या त्या मोकळ्या सांदीतून त्याने आपली सावली पांथस्थांनाही देऊ केली आहे. या झाडांमुळे  मला माझ्या कार्यालयात दैवी अस्तित्व जाणवतं. माले शहरात अशी झाडं वीसतीस वर्षांपूर्वी जागोजागी  होती. जागेच्या टंचाईमुळे पैशासाठी वखवखलेल्या या शहराने अशी बहुतेक सगळी झाडं एकेक करून  कापून टाकली. या अडीच चौरस कि. मी. च्या बेटाबर आता जवळजवळ दीडेक लाख लोक राहतात. जिथं दोन मजल्यापलीकडं जायला परवानगी नव्हती. तिथं आता दहादहा मजल्यांच्या इमारती सर्रास  आल्या आहेत. शहरातील इमारतींनी इतकी जागा खाल्लीय की झाडांना ताठ मानेनं जगता येणं शक्य  नाही. आता तर त्या उरल्यासुरल्या झाडांचाही कोंडारा मी पाहतोय. पाय ठेवायला जागा नाही.  फांद्यांच्या विस्ताराला जागा नाही. खरं तर पाना-फुलांना,  फळांना जागा नाही. पण आमच्या अंगणातल्या या आंब्याच्या झाडाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. त्यावर जवळजवळ  वर्षभर आंबा असतो. कधी या बाजूला कधी त्या बाजूला घोसच्या घोस लगडलेले असतात.

जेव्हा  कधी थोड्या काळासाठी आंबा दिसत नाही तेव्हा मोहोर असतो. माझा घरातला साहाय्यक छोटू या  झाडाच्या कैऱ्या तोडून वर्षभर मला आंब्याचं लोणचं खायला घालत असतो. या झाडाच्या अंगा- खांद्यावर मी अजून खेळलो नाही,  पण या झाडाचाच एक भाग माझ्या रक्तामांसात आहे. या परक्या देशातल्या या झाडाशी माझं एक खोल नातं तयार झालंय. या नात्याला नाव नसेलही,  पण त्यात ऐहिक आणि आध्यात्मिक दोन्हींचा संगम आहे.  मी डोळ्यांनी हे झाड पाहतो तेव्हा हर्षभरित होतो. माझ्या खोलीत बसूनही त्याच्या पानांची सळसळ  माझ्याशी सतत संवाद साधत असते. माझ्या कानांनी ही सळसळ आत्मसात केली आहे. माझ्या  जिव्हेवर हिच्या कैरीची चव समुद्रातल्या शिडांच्या नौकेसारखी तरळत असते. डोळे बंद करूनही या  झाडाच्या खोडांचा विशिष्ट स्पर्श मी ओळखू शकतो. खूप दूरवर जाऊनही मनाचा स्थायीभाव झालेल्या  प्रियेसारखं ते खोलवर रुजून आहे. मालदीव सोडताना नेमकं या झाडाचं काय करायचं हा प्रश्न मला सतावणार आहे.

मागे सोडलेल्या प्रत्येक व्यक्तीची आपल्याला सवय होते. खरं तर शहरं,  मित्र,  नातेवाईक सगळ्यांच्या निरोपांचा भूतकाळ होतो. पण तरीही प्रत्येक विरहाची वेदना-डंख वेगवेगळ्या  तीव्रतेची खोलीची असते आणि त्या प्रक्रियेतून जाणं हीच त्या नात्याची किंमत असते.  या झाडाच्या वर्षभर आंबे देण्याच्या औदार्याविषयी मी काही स्थानिकांना विचारले. बहुतेक  कुणालाच या विषयाची माहिती नव्हती आणि फारसा रसही नव्हता. (आंब्यात ‘रस’ नसावा- केवढी ‘अरसिकता’?)  एका बुजुर्ग मालदिवी माणसाने सांगितलं,  मालदीवमधलं हवामान व तापमान वर्षभर  एकसारखं असते. हवामान थोडंसं उष्ण आणि तापमान 23 ते 31 सें. ग्रे. इतकं असते. हे तापमान  आंब्याच्या झाडाला अत्यंत अनुकूल आहे. थोडक्यात संधी मिळताच तापमानातील सातत्याचा लाभ  उठवून आंबा फुलत राहतो,  फळत राहतो. परोपकाराय फलन्ति वृक्षा:. लोकांना कौतुक असो नसो,  तो  आपला फुलतोय.  आमच्या अंगणात या आंब्याच्या फांद्या सर्वत्र पसरलेल्या  असल्यामुळे स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि गणतंत्रदिनाला होणाऱ्या  ध्वजवंदनात अडचण येते. एका उंचीपलीकडे आमचा ध्वज जाऊ  शकत नाही. पण सर्वांच्याच डोईवर सावलीचं छत्र धरणाऱ्या या आंब्याविषयी कुणाचीच कसलीच तक्रार नसते. या आंब्याचा फायदा  घेणारेही अनेक आहेत.

उच्चायुक्त कार्यालयातील कर्मचारीवर्ग,  रस्त्यावरून येणारे-जाणारे,  शिवाय ज्यांच्या छतावर तो पसरलाय ती  सगळी माणसं अधूनमधून छतावर,  फांद्यांवर दिसतात. झाडांच्या  आणि माणसांच्यामधलं असं जिवंत नातं या शहराला एक अमोल  अनौपचारिकता देतं. एखादा आंबा खाली पडतो आणि रस्त्यावरून  जाणारे लोक तो उचलतात. आजूबाजूचे लोक कौतुकानं बघतात.  समोरच्या ट्रेडर्स हॉटेलातील पंचतारांकित पाहुण्यांना हॉटेलच्या  काचांधून हे हृद्य दृश्य पाहायला मिळतं.  याच दरम्यान मी सदाबहार झाडांचा आणखी एक संदर्भ वाचला.  तामिळनाडूतील नमक्कळ जिल्ह्यात पी. आल्लीमुथू नावाचा शेतकरी आहे. आंब्याचा मौसम संपला की त्याचं उत्पन्नही संपायचं. आपल्या  बापजाद्यांपासून हे असंच चाललंय हे पाहून त्याच्या मनात विचार  आला,  ‘वर्षभर आंबे देणारी झाडं का असू नयेत?’  वर्षानुवर्षं आंबे संपल्यानंतर घरात येणारी विपन्नावस्था त्याच्या कल्पनाशक्तीला  आव्हान देत होती. ‘आंब्याचा मौसम संपल्यानंतर बाजारात आंबे  आले तरच घर चांगलं चालू शकेल’  या विचारानं तो एवढा अस्वस्थ  झाला की,  त्याने वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली.

त्याला  आधी वाटलं की आपण अशा वेळी जिथं आंबे उपलब्ध असतील  तिथून ते मागवायला हवेत,  पण त्याचं अर्थशास्त्र जमण्यासारखं नव्हतं.  त्यातून त्यानं एक मार्ग काढला,  आंब्याच्या प्रत्यारोपणाचा. त्याने  आपल्या शेतातील आंब्याच्या झाडांवर वेगवेगळ्या जातीतील  झाडांचं प्रत्यारोपण केलं. या कलमांमुळे फक्त झाडांचाच नव्हे तर  आल्लीमुथूच्या जीवनाचा कायापालट झाला. ‘शेतकऱ्यांना हे गणित  समजणं आवश्यक आहे. बाजारात जेव्हा एखाद्या वस्तूचा पुरवठा  कमी असतो तेव्हा आपण माल पुरवला तर आपण मागू त्या किंमतीला  माल विकला जातो.’  आल्लीमुथूने एकेका झाडावर वेगवेगळ्या वीस  वीस जातींच्या आंब्यांचं कलम केलं आहे. आणि सदाबहार आंब्यांचा  मळा फुलवला आहे. केव्हाही जा,  त्याच्या शेतातील झाडांचा  एकीकडे मोहोर तर दुसरीकडे आंबा असा उत्सव सुरू असतो.  आल्लीमुथू आता आपलं हे तंत्रज्ञान इतरांनाही शिकवतो आहे.  झाडांचं व माणसांचं एक खोल नातं आहे. जंगलातल्या माणसांना  प्राण्यांच्या शिकारीपेक्षा जंगलातली फळं खाणंच जास्त सोपं जात  असणार. ‘माणूस’  ही जाणीव यायच्या आधीपासून माणसं झाडांवर  अवलंबून होती. त्यांना या पृथ्वीची फुफ्फुसं म्हटलं जातं,  इतके आपण  आजही त्यांच्यावर अवलूंन आहोत. पण ज्या झाडांनी या जगाचं  संगोपन लाखो वर्षं केलं,  त्यांचं संगोपन मात्र करण्याचं माणूस  टाळतोय. जसं प्राणिमात्रांचं,  समुद्रातील जैव वैविधतेचं,  तसंच झाडांचं झालंय. या प्राण्यांना अभय हवं तसंच झाडांनाही हवंय.  आमच्या अंगणातलं हे जे आंब्याचं झाड आहे,  ते इथं आणखी दहापंधरा वर्षांनी उभं असेल याची खात्री मी देऊ शकत नाही.  

काही वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील एका जंगलात एक प्रचंड झाड  पाहिलं. त्या झाडाच्या बुंध्याचा विस्तार,  फांद्यांचा आकार,  पर्णसंभार  सगळंच थक्क करून सोडणारं होतं. कमीत कमी सात-आठशे वर्षांपूर्वीचं ते झाड आता पर्यटनस्थळ झालं आहे. त्याच्या  विस्ताराइतकीच त्याची जमिनीतील मुळंही फक्त खोलवरच नव्हे तर  दूरवर पसरलेली आहेत. त्यानं कितीतरी उन्हाळे,  पावसाळे,  दुष्काळ,  वादळवारे पाहिले असतील,  या कल्पनेनंच माझ्या अंगावर रोमांच उभे  राहिले. एक खोल अशी आदर आणि प्रेमाची भावना घेऊन तिथून मी  परतलो होतो. गाडीत बसण्याआधी पुन्हा थांबून मी त्या जंगलातील  दूरवरच्या झाडाकडे पाहिलं. स्वत:च्याच दूरवरच्या भूतकाळाला  आपण स्पर्श करतो आहोत असं वाटलं.  खरं तर अशा अनेक झाडांनी आम्हा सर्वांचं जीवन समृद्ध केलं  आहे. माझ्या आठवणीतल्या अनेक झाडांची पुसट तरीही देखणी  छायाचित्रं माझ्या मनावर मुद्रित आहेत. गावातल्या घरासमोरचा  पिंपळ ही तर माझी ‘जान’  होती. प्रचंड विस्ताराचा तो पिंपळ तोडला  गेला तेव्हा माझाच कोणता तरी अवयव माझ्या देहापासून वेगळा झाला. त्या पिंपळाची जागा त्यानंतरच्या आयुष्यात तशीच मोकळी  राहिली. याउलट गावच्या विठ्ठल मंदिरासमोर नवीन पिंपळ लावला  गेला आणि आज तो दिमाखात उभा आहे. त्याच्या पारावर बसलो तर मन उन्नत होतं. समोरच्या विठ्ठलाचं अधिकच कौतुक वाटतं. त्याला  तर चोवीस तास या पिंपळाचं दर्शन होत असणार. विठ्ठलाच्या या  भाग्याचा मला हेवा वाटतो.

आळंदीतील ज्ञानेश्वरांच्या समाधीसमोर  असाच पिंपळपार आहे. प्रवेशद्वारातून आत जाताच तो उजवीकडं  आहे. रुक्मिणीनं याच पिंपळाला फेऱ्या घातल्या असं म्हणतात.  त्याला ‘सुवर्णपिंपळ’  म्हणतात. झाडाला सोन्याची संज्ञा देण्याचं हे  एकमेव उदाहरण असेल. ज्ञानेश्वरांच्या समाधिस्थळाला लागून दुर्मिळ अशा ‘अजान’  वृक्षाचे झाड आहे. या झाडाचं पान निसर्गत: हातात  किंवा अंगावर पडलं तर तो प्रसाद मानला जातो. प्रत्यक्ष  समाधिस्थानातील दर्शनापेक्षा या झाडाबरोबरचा संवाद मला अधिक  आवडतो.  अशा अनेक झाडांचं आणि माझं जिवाभावाचं नातं होतं. गावात  नदीच्या काठावर पाण्यात झुकून उभं असलेलं जांभळाचं  झाड. जेव्हा  जेव्हा पु. शि. रेग्यांची ‘त्रिधा राधा’ ही माझी लाडकी कविता वाचतो  तेव्हा तेव्हा ते झाड मला आठवतं. ‘जलवाहिनी निश्चल कृष्ण बन  जळात झुकते राधा,’  या ओळी पु. शिं. ना ते झाड किंवा तत्सम दृश्य  पाहूनच सुचल्या असणार असं मला वाटतं. आम्ही दिवसभर त्या  झाडावर बसून जांभळं खात असू. मधूनच फांदीवरून नदीत सूर  मारायचा. त्या भागात सुसरी असायच्या. असं ऐकल्यानं मनात एक  भीती राहायची आणि आम्ही लगबगीने किनाऱ्याकडे पोहायचो. गावातल्या तळ्याच्या आजूबाजूला अनेक झाडं. तळ्याकडे जाताना  नारळीची रांग. तळ्याच्या एका बाजूला काठावर चिंचेची झाडं. त्या  झाडांवर चढणं कठीण,  कारण बुंधा प्रचंड मोठा. पण कसंतरी करून  आम्ही चढायचोच. एकमेकांची दहीहंडी करायची आणि मग वरती  गेलेल्यानं खालच्यांना हात द्यायचा असं ते तंत्र होतं.

त्या चिंचांपासून  चटणी,  आंबटगोड लॉलीपॉप अशी उत्पादनं आमची वानरसेना  बनवायची आणि फस्त करायची. एकदा कुणीतरी चिंचा पाडण्यासाठी  फेकलेला दगड सरळ येऊन माझ्या कपाळावर पडला. माझ्या  चेहऱ्यावर पसरलेलं ते रक्त मी आण्णा डॉक्टरांच्या दवाखान्यातल्या  आरशात पाहिलं. ती खोक कपाळावर आजही आहे. चव्हाणच्या  विहिरीजवळ लिंबोणीची झाडं होती. सरकारच्या विहिरीवर तर एक झाड असं झुकलेलं होतं की त्याच्या फांदीवरून पाण्यात उडी मारण्यात  मज्जा वाटायची. तिथं पक्ष्यांची छान घरटीही होती. कोल्हापुरातील  शाळेत बंपरचं झाड होतं. ती बंपरची फळं आम्ही पहाटे उठून चोरत असू. एक-दोनदा पकडले जाऊन प्राचार्यांचा मारही पडला. झाडांचा  हा सिलसिला सतत चालू राहिला. जपानमध्ये दूतावासाच्या समोरच्या  साकुराच्या झाडांशी असलेलं नातं एखाद्या चांगल्या कवितेसारखं वारंवार स्मरतं. मॉस्कोत आमच्या गृहसंकुलासमोरच्या चिनार  वृक्षांच्या जीवनक्रमात आम्हांला आमच्या संपूर्ण जीवनक्रमाचं दर्शन  व्हायचं. छोट्याशा उन्हाळ्यात दिमाखानं फुलणारे चिनार शरद आणि त्यानंतरच्या शिशिर ऋतूंत आधी ‘एकेक पान गळावया’  लागून  त्यानंतर कसे निष्पर्ण होतात हे पाहणं अचंबित करून टाकायचं.  त्यानंतर त्यांच्या फांद्यांवर,  शुष्क डहाळ्यांवर बर्फ साचायचा. आणि  डिसेंबर-जानेवारीत त्या झाडांचं ध्यानस्थ शुभ्र शिल्प बनून जायचं.  त्यांच्या वसंत ते ग्रीष्म या अल्पकाळातील हिरव्यागार सौंदर्यावर जीव  ओवाळून टाकावा की शिशिरातल्या अप्रतिम पण जीवघेण्या  वैराग्यावर तनमन झोकून द्यावं असा संभ्र पडायचा.

मॉरिशसच्या  आमच्या छोट्याशा प्रांगणात ‘बर्ड ऑफ पॅराडाइज’ ही फुलझाडं  होती. ते फुलले की नंदनवनातले पक्षीच वाटायचे. त्यांच्या केशरी  चोचीमुळं फुलदाणीत ती फुलं ठेवली तर त्यांचे पक्षी होऊन कोणत्याही  क्षणी ते उडू लागतील असं वाटायचं. सीरिया लक्षात राहिला तो  तिथल्या झाडांच्या अभावामुळं. वाळवंटात झाडं अधिकच  आठवतात. अस्वस्थ करतात,  पण याच सीरियाला लागून असलेल्या लेबनॉनमध्ये राजधानी बैरूतपासून तास दीड तासाच्या अंतरावर  बऱ्यापैकी वैराण अशा प्रदेशात अचानक सेडादच्या वृक्षांचं दर्शन  होतं. ही सगळी झाडं प्रचंड तर आहेतच,  पण ती कित्येक  शतकांपूर्वीची आहेत. पण त्या वैराण पार्श्वभूीवर ती कुणीतरी  रातारोत लावली असतील इतकी अविश्वसनीय वाटतात.  जगभरच्या झाडांबरोबरचं असं घट्ट नातं मला आनंदानं जगायची  ऊर्मी देतं. पण त्यातही आंब्यांच्या झाडांबरोबरचं नातं जीवनाशी  अधिकच समरस झालेलं. आमच्या गावच्या आणि आजोळच्या  आंब्यांच्या झाडांवर आणि एकंदरीतच आंबा परिवाराच्या आणि  माझ्या संबंधांवर मी एक छोटी पुस्तिकाच लिहू शकेन.

आजोळच्या  शेतातील प्रत्येक झाडाला बांधावरचा,  ओढ्याकाठचा,  मोटेच्या  पाटावरचा,  विहिरीवरचा अशी नावं होती. शिवाय या झाडांपासून  मिळणाऱ्या आंब्यांचं रूप, आकारमान,  चव,  रस व केसर यांचं परस्पर  प्रमाण सगळंच वेगवेगळं. आंबा पाहिला किंवा चाखून पाहिला तरी तो  कोणता हे ओळखता यायचं. आंबे पाडाला येण्याची प्रतीक्षा,  मग ते  काढण्याचा अत्यंत देखणा सोहळा,  चगाळ्यात पिकायला घालून  माडीवर ते पसरून ठेवणं,  पिकल्यानंतर सगळ्यांनी बसून चवीनं  खाण्याचा महोत्सव, तेही चोखून चोखून! (चाकूने छानदार फोडी  केल्या की खाण्यातलं सौंदर्य तर संपलंच पण आंब्याचं आणि आपलं  नातंही संपलं.)  उत्तर भारतातली मजा वेगळीच. इथं आंबा थोडा उशिरा येतो  बाजारात. पण मग लंगडा, दशहरी,  चौसा,  मलिहाबादी अशा  वेगवेगळ्या आंब्यांच्या लाटाच येतात.

दिल्लीत दरवर्षी आम्र महोत्सव  असतो. त्या महोत्सवात आंब्याचे शेकडो प्रकार प्रदर्शित केले जातात.  सुगंधाची अशी जत्रा जगात इतरत्र क्वचितच भरत असेल. त्या  महोत्सवातून एक फेरफटका मारला तरी निसर्ग केवढा कल्याणकारी,  केवढा विस्मयकारक आहे  हे कळतं.  हापूस हा आंब्यांचा ‘महाराजा’  आहेच. पण जगभर इतर अनेक  आंबेही नाव कमावून आहेत. आशियातील फिलिपीन्स आणि अमेरिका खंडातील मेक्सिकोचे आंबे प्रसिध्द आहेत. पण सुगंध आणि  चव दोहोंतही हापूस तो हापूसच.

फळांच्या अनेक जाती-प्रजाती असल्या तरी माणसाच्या  जीवनाशी इतकं समरसून गेलेलं दुसरं फळ आणि फळझाड नसावं.  तोरण,  लग्नसमारंभ,  पूजा,  सजावट सगळीकडे  ‘आंबा’  उपस्थित  असतो. भारतीयांच्या जीवनात इतर देशांच्या तुलनेनं आंबा अधिकच  महत्त्वाचा. याचं कारण आंबा हा मूळचा ‘भारतीय’  आहे. पोपई  मूळची दक्षिण व मध्य अमेरिकेतील,  सफरचंद मूळचं मध्य पूर्वेतील,  चिंच आफ्रिकेतील,  पेरूसुद्धा मध्य अमेरिकेतील,  आंबा मात्र अस्सल  भारतीय. जगभर पसरलेला आंबा मुळात भारतातून आलेला आहे  ही  भावनाच केवढी सुखावह. आपल्या ओळखीचं माणूस विदेशात भेटतं  तेव्हा तर मन अधिकच भरून येतं. उच्चायुक्त कार्यालयाच्या  अंगणातला आंबा पाहतो तेव्हा नकळत मी हे ऋणानुबंध जगत  असतो. आमच्या नात्याचं हे जाळं किती युगायुगांचं आणि किती थेट  समकालीन आहे हे भावतं. तेव्हा मनात एक गोड हुरहूर पैदा होते.  कार्यालयात प्रवेशताना मी क्षणभर थांबतो. त्याचं दर्शन घेतो. तोही  गोड हसून प्रतिसाद देतो. सगळे घरी गेले तरी तो तिथं अजून उभा आहे  आणि कायमचा उभा असेल ही भावना केवढी आश्वस्त करणारी  असते!

संधिकालापासून रात्री उशिरापर्यंत जेव्हा कधी काम संपवून मी  बाहेर पडतो तेव्हा हा जन्मजन्मांतरीचा मित्र उभाच असतो. एकाच  वेळी कालिदास आणि ज्ञानेश्वर दोघांचंही स्मरण होतं. ‘रम्याणि वीक्ष्य  मधुरांश्च निशम्य शब्दान्‌’  या जन्मांतरीच्या सौहार्दाचं वर्णन करणाऱ्या  कालिदासाच्या शाकुंतलातील ओळी तर दुसरीकडे ‘देवाचिये व्दारी  उभा क्षणभरी तेणे मुक्ति चारी साधियेल्या’ या ज्ञानेश्वरांच्या हरीपाठातील ओळी जगतो आहोत या भावनेला सुखद व समृद्ध  करणारा क्षण!

(गेली 25 वर्षे भारतीय विदेश सेवेत कार्यरत असलेले ज्ञानेश्वर मुळे सध्या ‘मालदीव’मध्ये भारताचे उच्चायुक्त आहेत. त्यांचे ‘नोकरशाईचे रंग’ हे सदर पाच वर्षांपूर्वी ‘साधना’तून प्रसिद्ध होत होते, नंतर त्याचे पुस्तकही साधना प्रकाशनाच्या वतीने प्रसिध्द झाले आहे. त्यांचे ‘कथानिबंध’ हे सदर पुढील वर्षभर महिन्यातून दोन वेळा प्रसिध्द होईल.)

Tags: दक्षिण आफ्रिका माले शहर आंबा ज्ञानेश्वर मुळे Dakshin afika Malegaon Aamba Dnyaneshwar mule weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके