डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

अमेरिकेचा अनुभव... अमेरिकेतील अनुभव... अमेरिकेसंबंधीचे अनुभव... अम्रिकानुभव!

1983 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी असलेल्या ज्ञानेश्वर मुळे यांनी 30 वर्षांच्या विदेश सेवेत कार्यरत असताना जपान, रशिया, सिरिया, मॉरिशस, मालदिव इत्यादी देशांतील भारतीय दूतावासात विविध पदांवरून काम केले आहे. मागील दीड वर्षांपासून ते अमेरिकेत भारताचे कॉन्सुल जनरल म्हणून कार्यरत आहेत. ‘माती, पंख आणि आकाश’ हे त्यांचे आत्मकथन विशेष गाजले आहे. त्यांनी ‘साधना’त लिहिलेली ‘नोकरशाईचे रंग’ ही लेखमाला वाचकप्रिय ठरली होती, ती लेखमाला नंतर पुस्तकरूपाने साधना प्रकाशनाकडूनच आली आहे... आता ज्ञानेश्वर मुळे महिन्यातून दोन वेळा ‘साधना’त लिहिणार आहेत अम्रिकानुभव...

- संपादक  

जगातल्या पहिल्या क्रमांकावरच्या देशात काम करण्याचा अनुभव. तिथल्या जनतेबरोबर, विशेषज्ञांबरोबर, भारतीयांबरोबर काम करताना, चर्चा करताना वेगवेगळे प्रयोग व प्रकल्प राबवताना आलेले अनुभव. आज श्रीकृष्णांनी विश्वरूपदर्शन घेतले असते तर ‘देशांना अमेरिकाऽस्मि’ आणि ‘नगराणां न्यूयॉर्कोऽस्मि’ असं कदाचित बोलले असते.

काय आहे अमेरिकेचे रहस्य? आणि का आहे न्यूयॉर्क हे जगातले आघाडीचे शहर? गेली दीडेक वर्ष या प्रश्नांचा शोध घेत या देशाच्या आणि न्यूयॉर्क शहराच्या धमन्यांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय. भारत आणि अमेरिका दोन्ही लोकशाहीप्रणाली स्वीकारलेले देश; तरीही आपण खूप वेगळे आहोत. अमेरिका रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहने चालवतो, आपण डाव्या बाजूने. अमेरिकेत लोक कॉफी पितात, आपल्याकडे चहाला ‘अमृततुल्य’ मानण्याची प्रथा आहे. अमेरिकन लोक बेसबॉलप्रेमी, तर आपण क्रिकेटप्रेमी. अमेरिकेत काम करताना जाणवलेली कार्यपद्धती, आपली आणि या लोकांची विचारपद्धती आणि एकंदरीतच एकमेकांना बांधून ठेवणारे धागे व अलग करणारी कुंपणे यांच्याकडे डोळसपणे पाहताना काय जाणवले; तोच अमेरिकानुभव साधनाच्या वाचकांसाठी खास अम्रिकानुभव!

हां, आणखी काही. माझे काही छंद मी या सेवेत जोपासलेत. जमेल तसे दोन देशांमधल्या, वेगवेगळ्या समूहांमधल्या जनतेमध्ये सौहार्द वाढवणे, माहितीची देवाण-घेवाण वाढवणे आणि नोकरीच्या चौकटीचा सतत नवनवीन प्रयोग करत विस्तार करणे. अमेरिकेतील वातावरण अशा प्रयोगांसाठी महानुकूल आहे, याचा मी पुरेपूर उपयोग करून घेतला. नवनिर्मितीने वेगवेगळे प्रयोगही कॉन्सुलेटच्या प्रांगणात आणि प्रांगणाबाहेर केले. हे अनुभवही मी सादर करतोय- म्हणूनच हा अम्रिकानुभव! साधनाच्या चोखंदळ वाचकांसाठी!!  

 ‘‘या चित्रात काही चुकल्यासारखं किंवा काही वेगळं, विचित्र असं जाणवतं का तुम्हाला?’’ माझ्यासोबत उभे असलेले श्री.पेरुमल आणि श्री.नेगी यांना मी विचारले.

‘‘नथिंग सर’’, थोडं मला न्याहाळून मग त्या चित्राकडे काळजीपूर्वक पाहून श्री.पेरुमल उत्तरले.

 ही गोष्ट आहे 23 एप्रिल 2013 ची. मी त्याच दिवशी न्यूयॉर्कच्या भारतीय कौन्सुलेटमध्ये कौन्सुल जनरल म्हणून रुजू झालो होतो. अमेरिकेत भारताचा राजदूतावास (एम्बसी) वॉशिंग्टनमध्ये असून वेगवेगळ्या भागांत पाच कौन्सुलेट्‌स आहेत. न्यूयॉर्कशिवाय शिकागो, अटलांटा, सॅन फ्रॅन्सिस्को आणि ह्युस्टन या शहरांत ही कार्यालये आहेत. या प्रत्येक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात साधारण सात ते दहा अमेरिकन राज्ये असतात. कौन्सुलेटचे मुख्य काम भारताच्या आर्थिक व कौन्सुलर (व्हिसा, पासपोर्ट इत्यादी सेवा) विषयांवरचे त्या-त्या भागातील संबंधांचे व्यवस्थापन व विस्तार हे असते. एका अर्थाने ती राजधानी वॉशिंग्टनमधल्या राजदूतावासाची शाखा असली, तरी अनेक बाबींवर ते दिल्लीतल्या विदेश मंत्रालयाशी थेट संपर्क साधून असतात. याबाबतचा तपशील पुन्हा येईलच.

तर, 23 एप्रिल 2013 ला सकाळी 11 वाजता मी सूत्रे हाती घेतली. त्यानंतर मी लगेच आमच्या ‘हेड ऑफ चान्सरी’ म्हणजे प्रशासनप्रमुखांना बोलावून कौन्सुलेटची पाहणी करायचा निर्णय घेतला. सर्वप्रथम कौन्सुलेटच्या पहिल्या माळ्यावरच्या प्रवेशाद्वाराजवळ आलो. ‘राजाला’ व शेतकऱ्याला आपल्या राज्याच्या आणि शेतीच्या सीमा माहीत असायला हव्यात, या उक्तीप्रमाणे कुठे काय कोण आहे याची तंतोतंत माहिती कार्यालयप्रमुख म्हणून करून घेणे आणि त्याचा कामकाजाच्या सुधारणेसाठी पुरेपूर उपयोग करून घेणे, हा या पाहणीचा उद्देश होता. मी ज्या-ज्या कार्यालयात किंवा मंत्रालयात काम करतो तिथे संपूर्ण कार्यालयाचा परिसर व काम करणाऱ्या लोकांची जास्तीत जास्त माहिती करून घेण्याचा माझा रिवाज आहे. जन्मजात कुतूहल आणि ‘अनोळखी प्रदेश’ जाणून घेण्याच्या स्वभावामुळे मी ही सवय लावून घेतली असावी.

प्रवेशद्वाराजवळ उजव्या बाजूला असणाऱ्या एका देखण्या चित्राने माझे लक्ष वेधून घेतले, जवळ जाऊन त्याचे निरीक्षण केले. एक गोष्ट खटकली, म्हणून मी आमच्या प्रशासनप्रमुखांना विचारले, ‘‘श्री.पेरुमल, या चित्रात काही विचित्र जाणवतं का तुम्हाला?’’ श्री.पेरुमलनी प्रश्नाचा रोख जाणून घेण्यासाठी माझ्याकडे पाहिले. तिथं त्याला धागा पकडता आला नाही, म्हणून त्यानं ते राजस्थानी चित्र निरखून पाहिलं. मग म्हणाला, ‘‘नथिंग सर.... नथिंग राँग सर...’’

 ‘‘कधीपासून हे चित्र इथं आहे? आणि तुम्ही सगळे येता- जाता बघत असालच?’’

‘‘हो सर. मी दोन वर्षे इथं आहे. दररोज बघतो आम्ही हे चित्र. खरं तर सगळेच बघतात.’’ श्री.पेरुमल म्हणाले. शेजारी श्री.नेगी आणि काही अंतरावरून आमचा सुरक्षा अधिकारी या दोघांनीही मान हलवली.

‘‘छान! मी म्हटले, आता हे बघा-’’ असं म्हणून मी त्या चित्राजवळ गेलो. दोन्ही हातांनी त्या चित्राची चौकट पकडून चित्र भिंतीवरून उतरवले. मग मी ते उलटे गेले आणि त्या तशा उलट्या केलेल्या अवस्थेत ते चित्र पुन्हा भिंतीवर स्थानापन्न केले. ते तिघेही ‘आपले साहेब कार्यालयाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केवळ पंधरा मिनिटांत ही काय उलथापालथ घडवून आणताहेत’ अशा चेहऱ्याने माझ्याकडे बघत होते. चित्र व्यवस्थित टांगले. दोन्ही बाजू ठीक केल्या. थोडं मागे सरकलो आणि माझ्याबरोबर पुढची तीन वर्षे प्रवास करू पाहणाऱ्या त्या अधिकाऱ्यांना विचारलं,

‘‘मी हे चित्र आता उलटं टांगलंय. आता तरी सांगा, या चित्रात काही खटकतंय का?’’

आता मी त्यांच्या चेहऱ्यात होणाऱ्या बदलांकडे पाहत होतो. तिघांचेही काहीसे गंभीर चेहरे हळूहळू बदलले. त्यांच्यावर हसू पसरले. मी पुन्हा म्हणालो, ‘‘बोला-’’

‘‘सर, आले लक्षात!’’ आमचे प्रशासनप्रमुख श्री.पेरूमल म्हणाले, ‘‘हे चित्र मुळातच उलट टांगलेले होते. आमच्या कधीच लक्षात आले नाही. खरं तर आम्ही या चित्राकडं कधी मन लावून नीट पाहिलंच नाही. येतो आणि जातो, पण बघत नाही.’’

‘‘चूक तुमची नसावी. आपल्या व्यवस्थेत अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याची किंवा आत्मपरीक्षण करण्याची तरतूद नाही. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या सगळ्यात खालच्या स्तरापासून कार्यालयप्रमुखापर्यंत सगळ्यांना प्रशिक्षण हवे. काय चाललंय याचं डोळस परीक्षण करण्याची सवय नसेल, तर चित्रच नव्हे तर सगळं कार्यालयच उलटं होण्याची शक्यता आहे.’’

‘‘हो सर,’’ ते अनावश्यक आर्जव आणून बोलले.

‘‘हो सर- नो सर, नाही; आजपासून आपण इथले सगळं चित्र बदलायचं. त्यामुळे बऱ्याच गोष्टी उलट्या कराव्या लागल्या तरी हरकत नाही. व्हा तयार!’’

‘‘हो सर!’’ प्रत्येक गोष्टीतली हवा काढून टाकण्याची नोकरशाहीची स्वत:ची अशी वेगळी व प्रभावी रीत आहे- हो सर!

 त्या पहिल्या दिवसाची ती अशी प्रतीकात्मक सुरुवात झाली. इथे सगळे उलटे आहे किंवा उलटे असण्याची शक्यता आहे, हा मला संदेश होता. पहिल्या दिवशी स्वागत कक्षाव्यतिरिक्त कौन्सुलेटचे इतर सहा माळे मी तपासले आणि अमेरिकेतल्या न्यूयॉर्क या सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या शहरातील भारताच्या कौन्सुलेटची अवस्था बघून थोडासा खिन्न झालो. खिन्न होण्याचे कारण सांगण्याआधी थोडं आमच्या कौन्सुलेटविषयी.

कौन्सुलेटची इमारत ऐतिहासिक अशा ‘अपर ईस्ट व्हिलेज’ या भागात आहे. शिवाय 1903 मध्ये बांधलेली ही इमारत न्यूयॉर्कमधली ‘लँडमार्क’ मानली जाते. इमारतीची मूळ मालकी विख्यात ॲस्टोर परिवाराकडे होती. ॲस्टोर परिवार अमेरिकेतील मागच्या दीडेक शतकातला श्रीमंत परिवार म्हणून ओळखला जायचा. ‘फॉर्च्युन 500’ वगैरेची संकल्पना या ॲस्टोर कुटुंबाच्या जवळ असणाऱ्या लोकांच्या वर्णनातून जन्माला आली- जे या कुटुंबाशी निकट संबंध ठेवून आहेत ते फॉर्च्युनेट (नशीबवान) म्हणून फॉर्च्युन 100/200 वगैरे.

भारत स्वतंत्र झाला, तेव्हा आपल्याला जगभर दूतावास आणि कौन्सुलेट सुरू करणे आवश्यक होते. नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून जगातल्या सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भारतासाठी शानदार इमारती व जागा खरेदी केल्या. म्हणूनच लंडन, टोकियो, पॅरिस, वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्क यांसारख्या शहरांमध्ये भारत मोक्याच्या व प्रतिष्ठित अशा जागा खरेदी करू शकला. दि. 26 जानेवारी, 1950 रोजी भारत प्रजासत्ताक झाला आणि 27 जाने. ,1950 रोजी म्हणजे दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्कमधल्या आमच्या कौन्सुलेटची खरेदी झाली.

सेंट्रल पार्कपासून केवळ दोन मिनिटांच्या अंतरावर असलेले हे कौन्सुलेट फिफ्थ ॲव्हेन्यू आणि मॅडिसन ॲव्हेन्यू यांच्यादरम्यान असून 64 व्या स्ट्रीटवर विराजमान आहे. जमिनीच्या खाली दोन (तळ) मजले, तर जमिनीवर पाच मजले आहेत. त्यावेळी अडीच लाख डॉलरला (दीड कोटी रुपये) घेतलेल्या या इमारतीची आजची किंमत साधारण दोनशे मिलियन डॉलर (1200 कोटी रुपये) होईल.

अशा या ऐतिहासिक आणि मौल्यवान वास्तूचा दर्शनी भाग ठीक वाटला, तरी आतून मात्र इमारतीची हेळसांड होत होती, हे निश्चित. इमारतीच्या तळमजल्यावर व्हिसा-पासपोर्ट  इत्यादींसाठी जनसंपर्क असणारा विभाग आहे. दुसऱ्या तळमजल्याचा कागदपत्रे, जुनी रेकॉर्डस व अनावश्यक वस्तू ठेवण्यासाठी वापर होत होता. पहिल्या मजल्यावर स्वागतकक्ष, खुली जागा, एक कागदपत्रांनी भरलेला छोटा हॉल, ग्रंथालय आणि काही प्रभाग आहेत. दुसऱ्या मजल्यावर कौन्सुल जनरल, डेप्युटी कौन्सुल जनरल यांची कार्यालये, खुली जागा आणि मोठे सभागृह आहे. तिसऱ्या मजल्यावर इतर अधिकाऱ्यांची कार्यालये, चौथ्या मजल्यावर कौन्सुल जनरलचे निवासस्थान आणि पाचव्या मजल्यावर वाहनचालक व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे निवास आहेत.

अत्यंत शानदार अशा या इमारतीत आम्ही कौन्सुल जनरल ते वाहनचालक अशा वेगवेगळ्या श्रेणींत साधारण पन्नासेक लोक आहोत. या पन्नासांत वीसेक लोक भारतातील  विदेश मंत्रालयाद्वारे नियुक्त झालेले व इतर तीसेक जण स्थानिक नियुक्तीवरचे कर्मचारी आहेत. स्थानिक कर्मचाऱ्यांमधले बहुतेक सगळे लोक भारतीय वंशाचे, पण अमेरिकेत स्थायिक झालेले किंवा वेगवेगळ्या कारणाने स्थायिक होऊ पाहणारे आहेत. अनेक जण अमेरिकन नागरिक आहेत, तर काही जण ‘ग्रीन कार्ड’धारक म्हणजे ज्यांना अमेरिकेत राहण्याची व काम करण्याची परवानगी आहे आणि जे अमेरिकेत नागरिक होण्याच्या मार्गावरचे लोक आहेत.

जगातल्या जवळजवळ सगळ्या देशांनी (विदेश मंत्रालयांनी) अशा प्रकारे स्थानिक लोकांना नोकरीवर ठेवण्याची प्रथा किंवा सोय अवलंबिलेली आहे. त्याची दोन प्रमुख कारणे म्हणजे- त्या-त्या देशातील नियम, कायदेकानू, संस्कृती व भाषा यांचा परिचय असणारे कर्मचारी असतील, तर काम करणे सोपे होते. उदाहरणार्थ- जपानसारख्या मित्र देशात स्थानिक भाषेचे ज्ञान नसेल, तर वाहनचालकाला वाहन चालवणे कठीण जाईल. अशा ठिकाणी स्थानिक जपानी वाहनचालक असणे दूतावासाच्या दृष्टीने उपयोगी ठरेल. कल्पना करा- फक्त मराठी किंवा हिंदीचे ज्ञान असणारा वाहनचालक मॉस्को किंवा टोकियोमध्ये राजदूतांची गाडी चालवत असेल, तर केवढी मजा येईल. किंवा कोणते गोंधळ उडतील आणि काय अपघात होतील!

पण स्थानिक कर्मचारी नियुक्त करण्याचा आणखी एक फायदा तितकाच महत्त्वाचा, म्हणजे सरकारची खर्चातील बचत. फक्त आपण जनताच नव्हे, तर सरकारसुद्धा अंथरूण बघूनच पाय पसरते. सर्वसाधारणपणे भारतातून लिपिक तीन वर्षांसाठी विदेशात पाठवायचा, तर त्याला येणाऱ्या खर्चाच्या एक-तृतीयांश किंवा एक-पंचमांश (स्थानसापेक्ष) खर्चात स्थानिक लिपिकाची भरती करता येते. भारतातून पाठवायच्या लिपिकाबरोबर त्याच्या परिवाराला नेण्या-आणण्याचा खर्च सरकारला करावा लागतो. शिवाय पगाराव्यतिरिक्त त्याला विदेश भत्ता, महागडी आरोग्यसेवा, संपूर्ण सुविधायुक्त (फर्निचर, गॅस, हीटिंग, कूलिंग) घर, या व अशा इतर गोष्टी द्याव्या लागतात. स्थानिक कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त अन्य सोई देण्याची गरज नसते, त्यामुळे सरकारचा खर्च वाचतो.

अशा या व्यवस्थेचे काही फायदे व काही तोटे असतात. भारतातून येणारे अधिकारी व कर्मचारी तीन वर्षांच्या अवधीसाठी येतात. तीन वर्षे झाली की, ते मुख्यालय दिल्लीला किंवा इतर देशांमध्ये बदली होऊन जातात. त्यांच्याबरोबर त्यांचे या देशाचे ज्ञान, आकलन व नात्यांचे जाळे निघून जाते. याउलट, स्थानिक लोक कमी पगारावर आणि फक्त निम्न श्रेणीवर (स्वागतकक्ष, लिपिक, सहायक, संदेशवाहक, वाहनचालक अशा पदावर) काम करत असले तरी ते दूतावासात घट्ट पाय रोवून बसलेले असतात. यातूनच दोन वर्ग तयार होतात, त्यांना ‘इंडिया बेस्ड’ आणि ‘लोकल’ असे संबोधले जाते. आणि काही वेळा या दोहोंचा ‘वर्गकलह’ रंजक वाटला, तरीही हानिकारक ठरतो.

भारतातून येणाऱ्यांना आपण थोडेसे ‘श्रेष्ठ’ आहोत, आपल्याकडे अधिकार आहेत याचा दंभ; तर स्थानिकांना ‘तुम्ही येता आणि जाता, आम्ही मात्र इथेच आहोत’ असा गर्व असतो. त्यामुळे कुरबुरी, गटबाजी, थोडेबहुत राजकारण, तक्रारी व तंटे निर्माण होतात. या सगळ्या गोष्टींचे यथार्थ भान ठेवून राजदूत किंवा कौन्सुल जनरलला ‘टीम इंडिया’ तयार करावी लागते. हे आव्हान अवघड नसले तरी खऱ्या अर्थाने काही नवे सकारात्मक किंवा मूलभूत काम करायचे ठरवले, तर अडथळ्याच्या शर्यतीसारखे ठरण्याची शक्यता असते.

कौन्सुलेटच्या दोन तळमजल्यांवर फार महत्त्वाचे काम चालते. पहिल्या तळल्यावर भारतीयांसाठी पासपोर्ट, अमेरिकन व इतर आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी व्हिसा, अमेरिकन नागरिकत्व स्वीकारलेल्या भारतीयांसाठी ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड आणि काही पिढ्यांपूर्वी भारत सोडून इतरत्र (मॉरिशस, फिजी, त्रिनिनाद अँड टोबॅगो, मलेशिया, गयाना, जमैका वगैरे) स्थानिक झालेल्यांसाठी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन (पीआयओ) कार्ड या सेवा दिल्या जातात. याशिवाय अटेस्टेशन, जन्म-मृत्यूचे दाखले, मृतदेह भारताला पाठविण्यासाठीची कागदपत्रे- अशा अनेक गोष्टी या विभागाद्वारे केल्या जातात. अमेरिकेसारख्या ठिकाणी भारतीयांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी पासपोर्ट, ओसीआय यांच्या सेवांचे प्रमाण प्रचंड आहे.

जनतेला दिल्या जाणाऱ्या या सगळ्या सेवांना कौन्सुलर (किंवा कॉन्सुलर) सेवा म्हटले जाते. सर्वसामान्य जनतेला दूतावास, उच्चायुक्त कार्यालये किंवा कॉन्सुलेट्‌स यांचा संबंध किंवा परिचय होतो तो या विभागाद्वारे. भारतीय असो वा विदेशी- त्यांचा या विभागाचा अनुभव महत्त्वाचा असतो. मी तीसेक वर्षांपूर्वी विदेश सेवेत आलो, तेव्हा कोल्हापुरातल्या जिल्हा सहकारी बँकेत माझा सत्कार झाला होता. तिथे बोलताना बॅकेचे तत्कालीन अध्यक्ष श्री.शामराव पाटील म्हणाले, ‘‘ज्ञानेश्वर, तुम्ही जपानला चाललात, पण लक्षात ठेवा- विदेशातील भारतीय दूतावास भारतीयांना चांगली  वागणूक देत नाहीत, हे सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करा.’’

या व अशा प्रकारच्या अनेक तक्रारी तेव्हापासून आजपर्यंत मी ऐकत आलो आहे. या बहुतेक तक्रारी कॉन्सुलर विभागाविषयी असतात. म्हणूनच विदेश सेवेत जनतेशी सर्वप्रथम संबंध येणाऱ्या या विभागाला ‘पब्लिक फेस ऑफ सर्व्हिस’ म्हणजे विदेश सेवेचा ‘सार्वजनिक किंवा जनतेला दिसणारा चेहरा’ असे म्हटले जाते. सामान्य जनतेला या विभागात वाईट अनुभव आला; तर तो भारतीय शासन, विदेश मंत्रालय व दूतावास या सर्वांविषयी कायमचे वाईट मत करून घेतो. याउलट, तिथला अनुभव चांगला असेल, तर माणूस तो अनुभवही लक्षात ठेवतो- कायमचा.

न्यूयॉर्कच्या आमच्या पहिल्या तळमजल्यावर हा कॉन्सुलर विभाग आहे. साधारण सात हजार चौरस फूट क्षेत्र असलेला हा विभाग दोन भागांत विभागलेला आहे. एका भागात जनतेचे अर्ज आणि कागदपत्रे देण्यासाठी आवश्यक काऊंटर आहेत. तिथे पारदर्शक काचेमागे गरजेप्रमाणे चार ते सहा कर्मचारी काम करतात. पासपोर्ट, व्हिसा, ओसीआय कार्ड इत्यादींसाठी वेगवेगळे काऊंटर आणि म्हणून रांगा आहेत. लोकांची कागदपत्रे देण्या- घेण्याची ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे.

या जागेशेजारी विशेष समस्या असणाऱ्या लोकांसाठी व वेळ घेऊन भेटीसाठी आलेल्या लोकांच्या मुलाखतीसाठी वेगळी अशी, थोडीशी प्रायव्हसी असणारी काऊंटरवजा खोली आहे. या खोलीत कधी कधी आवाज चढवून बोलणारे, कधी नकार मिळाल्याने चिडून भांडण करणारे, कधी कधी पोलिसांना बोलावून ज्यांना इमारतीच्या बाहेर काढावं लागतं असेही लोक येतात. नियमात न बसणारी कागदपत्रे, अपुरी असणारी, खोटी कागदपत्रे घेऊन येणारे, अमेरिकेत अवैधरीत्या राहणारे पण भारतीय सरकारने कागदपत्रे देऊन मदत करावी असे मानणारे- सगळ्या प्रकारचे लोक इथं येतात. शांत राहून जनतेचे समाधान करण्याचा प्रयत्न करणे, हे तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यासाठी जिकिरीचं काम असतं.

अनेकदा मदत करण्याची इच्छा असूनही मदत करणं अवघड जावं, असेही अनेक जण येतात. अशांना मार्गदर्शन करून त्यांचं समाधान करणं यासाठी कौशल्याबरोबर सहानुभूतीचीही गरज असते. कौन्सुलर विभागाच्या अर्ध्या भागात जनसंपर्काचे हे काम चालते. उरलेल्या अर्ध्या भागाला हा प्रभाग एका छोट्या दरवाजाने जोडला गेलेला आहे. या भिंतीपलीकडे कौन्सुलेटच्या कामाचा कणा मानले जाणारे व्हिसा, पासपोर्ट, ओसीआय व अन्य कागदपत्रांचे काम होत असते.

(क्रमश:)

Tags: भारत भारतीय कौन्सुलेट न्यूयॉर्क अमेरिका ज्ञानेश्वर मुळे उलट्या चित्राची गोष्ट अम्रिकानुभव India Indian Consulate New York America Dnyaneshwar Mulye Ulatya Chitrachi Gosht Amrikanubhav weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके