डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

(गेली 25 वर्षे भारतीय विदेश सेवेत कार्यरत असलेले ज्ञानेश्वर मुळे सध्या ‘मालदीव’मध्ये भारताचे उच्चायुक्त आहेत. त्यांचे ‘नोकरशाईचे रंग’ हे सदर पाच वर्षांपूर्वी ‘साधना’तून प्रसिद्ध होत होते, नंतर त्याचे पुस्तकही साधना प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे ‘कथाबंध’ हे सदर पुढील वर्षभर महिन्यातून दोन वेळा प्रसिद्ध होईल.)  

 

माझ्या संग्रहात राजीव गांधींच्याबरोबरचा एक दुर्मिळ फोटो आहे. दुर्मिळ कारण राजीव गांधी हयात नाहीत आणि तो फोटो अगदी योगायोगाने घेतला गेला होता. त्या फोटोशिवाय इतरही अनेक फोटोत मी राजीव गांधींबरोबर असणार, पण त्यातला एकही माझ्याकडे उपलब्ध नाही, आणि जेव्हा ते मिळवता आले असते तेव्हाही मी फारसा प्रयत्न केला नाही. आता ते फोटो मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी इच्छाही नाही आणि मला त्यांची तशी गरजही वाटत नाही. फोटोमध्ये काही वेळा इतिहास असतो, पण फोटोमुळे इतिहास घडण्याची शक्यता कमीच.

राजीव गांधींबरोबरचा तो दुर्मिळ फोटो मात्र माझ्या स्मृतीचाच नव्हे तर जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. आमच्याच कुटुंबातील नार्वेकरतार्इंनी त्या फोटोच्या अनेक लॅमिनेटेड प्रती नातेवाईकांच्यात वाटल्या. त्यामुळे भावाकडे, बहिणींकडे, गावाकडच्या आमच्या घरात, तार्इंच्या घरी सगळीकडे तो ‘लई फेमस’ झालाय. या दुर्मिळ फोटोचा इतिहास मोठा रंजक आहे.

आधी थोडं या फोटोबद्दल सांगतो. या फोटोत राजीव गांधींसह चार व्यक्ती आहेत. राजीव गांधी, त्यांच्या डाव्या बाजूला प्रख्यात बासरीवादक हरीप्रसाद चौरसिया, राजीव गांधींच्या उजवीकडे बंद गळ्यातील- भारदस्त दाढीतील एक प्रभावशील व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या उजवीकडे कोट-सूट परिधान केलेला मी. राजीव गांधींच्या चेहऱ्यावर मंद स्मित आहे. कोणताच तणाव त्यांच्या चेहऱ्यावर किंवा देहबोलीत दिसत नाही.

हा फोटो जेव्हा लोक बघतात तेव्हा त्यांना काही प्रश्न पडतात. केव्हा घेतलाय हा फोटो? किती साली? राजीव गांधींच्या डावीकडचे व उजवीकडचे हे लोक कोण? त्यातही त्यांचे कुतूहल उजवीकडच्या व्यक्तीविषयी जास्त असते, कारण चौरसियांना ओळखणे अनेकांना जमते, पण ती बंद गळ्यातील व्यक्ती कोण हे आजपर्यंत कुणीच ओळखू शकलेले नाही. जेव्हा जेव्हा लोक मला ही व्यक्ती कोण? म्हणून विचारतात तेव्हा मी उत्तरतो, ‘ही व्यक्ती तुम्ही ओळखलीत तर एक मिलियन डॉलर (पाच कोटी रुपये) मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मग लोक अंदाजाने सांगायचा प्रयत्न करतात. कुणी म्हणतात, ‘राजीव गांधी त्या वेळेला भारतीय महोत्सवानिमित्त जपानला आले होते, त्यांच्याबरोबर तत्कालीन सांस्कृतिक सचिव सी.वरद्‌राजन आले असणार हा त्यांचा फोटो.’ मी उत्तरतो, ‘वरदराजन यांचे केस अधिक शुभ्र होते, शिवाय त्यांचा वर्णही अधिक गोरा होता. तेव्हा ते हे नव्हेत. काही लोक अंदाजाच्या आधारे काही मंत्र्यांची नावे घेतात, काहीजण कलाकारांची नावे घेतात. पण सत्य एकच आहे. गेल्या तेवीस वर्षांत कुणीही त्या व्यक्तीचे नाव अचूक सांगितलेले नाही. सांगणार तरी कसे, कारण ती व्यक्ती कलाकार, राजकारणी, नर्तक एवढेच काय प्रसिद्ध सरकारी अधिकारीसुद्धा नाही. ती अप्रसिद्ध अधिकारीही नाही, खरं तर अधिकारीही नाही.

आहे ना कठीण ओळखायला? तेवीस वर्षांत कुणीही ज्या व्यक्तीला ओळखू शकले नाही त्या व्यक्तीला (केवळ छापील फोटोच्या आधारावर) माझे वाचक ओळखू शकतील हे अशक्य आहे. शिवाय या फोटोत मी थोडा संकोचूनच उभा आहे. उपऱ्यासारखा. कुणीतरी मारून- मुटकून उभा केल्यासारखा. पण माझ्या आणि राजीवजींच्या इतकेच आपण त्या फोटोच्या केंद्रस्थानी आहोत याची जाणीव त्या गृहस्थाला आहे. त्याच्या बंद गळ्याच्या कोटाला वरपासून खालपर्यंत कोणतीही घडी नाही, त्याचे केस सुव्यवस्थित आणि दाढीही छान, गुंतागुंत नसलेली!

या विषयावरचे कुतूहल फारसे चाळवण्यात अर्थ नाही. कारण जी व्यक्ती सार्वजनिक जीवनात नाही, जी राजकारणी, कलाकार, साहित्यिक, पत्रकार, विचारवंत, अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रशासक किंवा माणसाला प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या कोणत्याही क्षेत्रात नाही तिला ओळखणं कठीण आहे. शिवाय न पाहिलेल्या व्यक्तीविषयी तर्कही अवघड होऊन जातो, कारण तर्काला जागा नसते. त्या फोटोतील ते गृहस्थ अत्यंत आत्मविश्वासाने त्या फोटोत उभे आहेत ते कुणासारखे तरी दिसण्याची शक्यताही नाकारता येत नाही, पण त्यांना ओळखणे शक्य नाही. ते तसे फारसे कुणाच्याही परिचयाचे नाहीत. निदान महाराष्ट्रात तरी.

तोकयोमध्ये 16 एप्रिल 1988 रोजी तो फोटो घेतला गेला. 15 एप्रिलला तिथल्या भारतीय महोत्सवाचे उद्‌घाटन राजीव गांधींच्या हस्ते व जपानच्या नोबोरू ताकेशिता या प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रीय नाट्यगृहात केलुचरण महापात्रा यांचे ओडिसी नृत्य, चौरसियांचे बासरीवादन, मालविका सारुक्काचे भरत नाट्यम्‌ आणि डागर बंधूंचे धृपद गायन यांच्या अत्यंत धीरगंभीर पण प्रभावी कार्यक्रमाने संपूर्ण जपान भारतमय होऊन गेले. भरगच्च राष्ट्रीय नाट्यगृहात राजीव गांधींनी जेव्हा उद्‌घाटनाचे भाषण केले तेव्हा एरवी संयत असणाऱ्या जपान्यांनीही टाळ्यांच्या कडकडात आपला आनंद उत्स्फूर्तपणे व्यक्त केला. त्यानंतरच्या सहा महिन्यात जवळजवळ तीस-पस्तीस जपानी शहरात होणाऱ्या भारत महोत्सवाची ती अत्यंत उत्साही व यशस्वी नांदी होती. राजीव गांधींबरोबर सोनियाही होत्या. एकंदरीत कार्यक्रमाला सर्वांनीच दाद दिली. राजीव गांधी खूष होते. खूप वर्षांनी भारताने जपानला गंभीरपणे घेतले होते आणि जपाननेही भारताचे बाहू उंचावून स्वागत केले होते. मुळातच सौहार्दपूर्ण असलेले हे नाते या भेटीच्या निमित्ताने सुदृढ आणि आशयसंपन्न झाले, एवढेच नव्हे तर दोन देशांच्या संबंधात मैत्रीच्या एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. आज भारत-जपान मैत्री संपूर्णपणे समस्याविरहित आणि अत्यंत जवळची आहे, याचा पाया राजीव गांधींच्या 1985 आणि 1988 च्या दोन जपान भेटीत टाकला गेला. सुदैवाने त्या ऐतिहासिक भेटींच्या दरम्यान मी दूवातासातील माझ्या जीवनाला नुकताच प्रारंभ केला असला तरी माझ्या जपानी भाषेच्या कौशल्यामुळे मला त्या भेटीत पूर्णपणे सामील करून घेण्यात आले होते आणि भारतीय महोत्सवाची जबाबदारीही माझ्याकडे होती.

माझ्या हाताखाली काम करण्यासाठी मात्र नाममात्र कर्मचारी होते. (कारण मी स्वत:च कनिष्ठ अधिकारी होतो). श्रीधर नावाचे माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले माझे तमिळ पी.ए. आणि स्थनिक म्हणून मदतीला असलेली तेरूको (नुकतीच अमेरिकेत शिकून परत आलेली) जपानी मुलगी. तिला अनुभवही नव्हता आणि फारसे व्यवहारज्ञानही. मीही सरकारी सेवेत फक्त तीन-चार वर्षे घालवली होती, त्यामुळे टक्केटोणपे खाचखळगे माहीत नव्हते. याउलट श्रीधर पी.ए. असले तरी प्रशासन, विदेश सेवा, नियमावली वगैरेंचे त्यांचे ज्ञान खरोखरच अगाध होते. नोकरीत अनेकदा बुद्धिमत्तेपेक्षा व्यवहारज्ञानाची सरशी होते. श्रीधर हे त्याचे मूर्तिमंत प्रतिक होते. जेव्हा कधी ते आपल्या खुर्चीत असत तेव्हा ते अतिशय मग्न दिसत. त्यांना कामातून खरंच तोंड वर काढायलासुद्धा सवड नसे. मी त्यांचा बॉस असूनही ते नेमकं काय करतात, इतकं काय काम करतात हे मला कळत नसे. त्यांच्या टेबलाच्या आसपास कुणी फिरकलं तर ते फार कष्टानं मान वरती करत, ‘धीस रेचेड वर्क, नेव्हर गेटस्‌ ओव्हर?’ (हे सालं काम कधी संपतच नाही) असं म्हणून मग पुन्हा ते आपल्या कामाकडे वळत. अनेकदा ते आपल्या सोयीनं माझ्या खोलीत येत आणि भारत सरकारची सगळी धोरणं कशी चुकीची असतात, आणि त्यात त्यांच्यासारख्या सरळ माणसाचा किती छळ होतो हे वारंवार सांगत. त्यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर कधीकधी अपराधी भावनेनं मी त्यांना विचारत असे, ‘पण मिस्टर श्रीधर त्याच सरकारने तुम्हाला ही नोकरी, विदेशी भत्ता आणि सगळ्या सवलती दिल्यात नाही का? याबद्दल आपण कृतज्ञ असायला हवं.’ वाक्यानं त्यांचं बोलणं थांबायच्याऐवजी त्यांना नवा जोम चढायचा. ‘सर, तुम्ही तरुण आहात, अजून तुम्हाला इथं काय चाललंय काही कळत नाही. शिवाय तुम्ही डायरेक्ट रिक्रूट अधिकारी. तुमची सरकार चांगली काळजी घेतं. आमचं काही खरं नाही...’ त्यानंतर तो आपली सगळी दु:खं उगाळीत बसायचा.

या बुद्धिमान पी.ए.कडून काम करून घेणं फार मोठं आव्हान होतं माझ्यासमोर. खरं तर तेच माझ्याकडून काम करून घेत असं मला फार उशीरा कळलं. सकाळी कार्यालयात उशीरा येणं, जेवणासाठी दोन अडीच तास गायब होणं, परत संध्याकाळी घरी पत्नी एकटीच असल्यानं अनेक कामाचं ओझं असल्यानं घाईघाईनं (म्हणजे लवकर) परतणं. या त्यांच्या दिनक्रमात कामाचं स्थान दुय्यम होतं यात कोणतीही शंका नव्हती.

सकाळी मी कार्यालयात पोहोचलो की महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी किंवा पत्रव्यवहाराचं डिक्टेशन घेण्यासाठी त्यांची गरज असे. मी दूतावासापासून साताठ किलोमीटर अंतरावर रहात असे, पण त्यांचे घर मात्र दूतावासाच्या कुंपणात होते. इंटरकॉमवरती त्यांना घंटी देऊन मी अस्वस्थ झालो की, (साडेदहाच्या आसपास म्हणजे कार्यालय सुरू होऊन दीड तास झाल्यानंतर) त्यांच्या घरी फोन लावत असे. घरचा फोन श्रीधर यांनी कधी उचलला असे वाटत नाही. त्यांच्या पत्नी तो फोन उचलत. ‘हाऊ आर यू सर? मि.श्रीधर हॅज लेफ्ट ऑफिस सम टाइम बॅक’. पण ‘समटाई बॅक’ ऑफिसला गेलेले श्रीधर मला मात्र कधीच दिसायचे नाहीत. एकदाचे ते आलेत  हे कळाले की मी रागाने पुन्हा त्यांना इंटरकॉम करत असे. पण यावेळी मात्र तिकडे इंटरकॉम वाजतोय आणि इकडे श्रीधर माझ्या खोलीत स्वत: अवतीर्ण व्हायचे.

मी काही बोलायच्या आत तेच बोलायला सुरू करत. बोलण्यात चातुर्य आणि माधुर्य यांचा विलक्षण संगम. येताना त्यांच्या हातात नोटपॅड व पेन असे व आपण अत्यंत घाईत आहोत असा चेहऱ्यावर भाव. ‘गुडमॉर्मिंग सर... निप्पोन कल्चरल सेंटरच्या ससाकींचा अत्यंत फोन होता... ते चार कलाकार रात्रीच्या विमानाने येणार आहेत...’ त्यांचे बोलणे इतके गंभीर की त्यांना थांबवून हासडायचं कसं हेच मला कळत नसे. त्यांच्यावर रागावणे अशक्य असे. याचे आणखी एक कारण असायचे. ते आणि त्यांची पत्नी दोघांनाही वारंवार वेगवेगळे आजार व्हायचे. कधीकधी माझा राग पराकोटीला जाऊन मी चिडून काहीतरी बोलणार एवढ्यात ते प्रसंग ओळखून आपला गुडघा पकडत ‘सर गेले दोन आठवडे पायाच्या या दुसऱ्या बोटापासून गुडघ्यापर्यंत प्रचंड कळा मारताहेत...’ असं म्हणून मग ते मी कधीही न ऐकलेल्या अत्यंत अवघड अशा इंग्रजी रोगाचं नाव घेत... त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव इतक्या सहजपणे उगवत की की आपला विश्वास बसू नये. ‘मागचे दोन आठवडे मी ग्रस्त आहे. काही सुचत नाही. सकाळपासून मी पाय धरून बसलोय...’ आता त्याचे ते वर्णन, तो अभिनय इतका खराखुरा असतो की मला त्यांचा राग यायच्याऐवजी आपणच त्यांना काम सांगून गुन्हा करतो आहोत असं वाटून ‘डॉक्टरांना दाखवलंत का?’ असा सहानुभूतीपूर्वक उद्‌गार निघायचा. ‘नाही सर, कामातून वेळ कुठं मिळतो? त्या मात्सुमोतोंच्या पत्राला उत्तर द्यायचंय. त्या फुकुओकाच्या म्युझियमचे लोक अजून तारखा पक्के करीत नाहीत. हे फिल्मोत्सवाचे लोक चित्रपटांची यादी तयार करत नाहीत... पण सर गुडघा इतका दुखतोय.’ श्रीधरचे सहानुभूती- उत्पादनपर्व म्हणजे शासनातील तीसेक वर्षांच्या अनुभवातून तयार झालेले परिपूर्ण रसायन होते. आता काम सांगायच्याऐवजी ‘श्रीधर, जाऊन डॉक्टरांना दाखवून या आणि काळजी घ्या बरं...’ ‘खरंच जाऊ ना सर...? काम खूप तटलंय पण...’, ‘हो हो जा, जाच तुम्ही. लवकर जा.’ श्रीधर पडत्या फळाची आज्ञा समजून कारण नसताना थोडे लंगडतच बाहेर पडतात. मघाशी खोलीत येताना तर हा माणूस ठीक चालत हसतमुख आला होता. थोडक्यात, त्याने बसवलेल्या सापळ्यात मी बरोबर अडकतो आणि तो लंगडबहाद्‌दर काम सुरू करायच्या आतच ऑफिस सोडून पळून जातो. पळाला म्हणायचे कारण दूतावासातून बाहेर पडताना तो आपल्या घरी जाण्यासाठी वळतो तेव्हा त्याला माझ्यासमोरच्या खिडकीसमोरून जावे लागायचे. जाताना लंगडणारा श्रीधर बाहेर पडताच छानपैकी धावत होता. बायकोला भेटायला जाण्याची संधी दिली होती ना मी, तेही कार्यालयीन वेळेत. त्यानंतर पाचच मिनिटात श्रीधरांची गाडी माझ्या खिडकीसमोरून मुख्य रस्त्याला लावताना दिसली. श्री व सौ श्रीधर हसतखिदळत निघाले होते. ‘आपला बॉस किती बेवकूफ आहे, हे तर श्रीधर बायकोला सांगत नसतील ना? श्रीधर डॉक्टरांच्याकडे न जाता शहरातल्या ज्या कुठल्या डिपार्टमेंट स्टोअर किंवा मॉलमध्ये डिस्काऊंट सेल आहे तिकडे जात असणार.

असे हे श्रीधर कधी स्वत:चे किंवा कधी बायकोचे वेगवेगळे आजार दाखवून आपल्या बॉसचे शोषण करीत होते. त्यांच्या त्या रोगांची कधीही न ऐकलेली इंग्रजी नावं ऐकून मी इतका घाबरून जात असे, दोघांपैकी एकालाही काही झालं तर माझ्यावर क्रूरतेचा आरोप येईल असं वाटून मी गप्प बसायचो. त्यांच्यावर रागावण्याचा प्रश्नच नव्हता. कधी कधी ते काम करताना बघून माझं मन कृतज्ञतेनं भरून यायचं. त्यांची वेशभूषा सदैव ठरलेली. दररोज ते बंदगळ्याचा कोट घालून यायचे. त्यांच्याकडे पाहताना अनेकांना तोच राजदूत आहे असं वाटायचं. कधीही कोणतेही काम न करण्याचा त्यांचा स्वभाव, त्यात त्यांची प्रभावी वेशभूषा. माझ्याकडे येणाऱ्यांनाही तो माझा बॉस वाटायचा. मी बापुडा त्याचं काम करणारा अधिकारी कारकून!

असे हे श्रीधरपंत, राजीव गांधी येणार याची कुणकुण लागल्यापासून नाचायला लागले. कामही करताना दिसायला लागले. ‘सर, हा आपल्यासाठी केवढा अभिमानास्पद क्षण... की आपले प्रधानमंत्री भारत महोत्सवाच्या उद्‌घाटनासाठी जपानला येताहेत.’ मलाही बरं वाटलं. काही का असेना, हा माणूस काम करायला तयार झाला याचाच मला आनंद झाला होता.

राजीव गांधींची भेट अगदीच तोंडावर आली, तेव्हा माझ्या खोलीत मी एकटाच असताना काहीतरी महान रहस्य सांगत आहोत अशा आविर्भावात अगदी खालच्या आवाजात श्रीधर म्हणाले, ‘सर एक सांगतो, दूतावासातले बाकीचे लोक राजीव गांधींच्या भेटीच्या यशाचे श्रेय घेतील, पण ते तुम्हाला मिळायला हवे. आपल्या टीमला मिळायला हवे...’ मी नेहमीप्रमाणे ‘हो हो’ म्हणालो. ‘सर, डोंट टेक इट लाइटली...’ त्यांनी जवळजवळ सावधानतेचा इशारा दिला. मी थोडंसं त्रासूनच त्यांना विचारलं, ‘मि.श्रीधर व्हॉट डू यू मीन? हे सगळ्या दूतावासाचंच तर काम आहे’. लगेच श्रीधर म्हणाले, ‘पंतप्रधान येणार म्हटल्यावर हे सगळे लोक पुढे पुढे करणार... आपण काम करत आहोत... मर मर मरताहोत. क्रेडिट शूड कम टू अस’ ‘श्रीधर, तुम्ही काय म्हणता ते मला कळत नाही. हे सगळ्या दूतावासाचं काम आहे. ‘लेटस्‌ डू आवर वर्क’. श्रीधरपंतांना ‘काहीतरी’ सांगायचं होतं, पण मला ते कळत नव्हतं. कामाच्या धबाडग्यात ‘ते’ जाणून घ्यायचीही इच्छा नव्हती. माझ्या दृष्टीने ती भेट महत्त्वाची होती व त्यासाठी काम करणंही तितकंच महत्त्वाचं होतं.

राजीव गांधी यायच्या आदल्या दिवशी श्रीधरपंतांनी त्यांना काय हवे याचा खुलासा केला. ‘सर, आपल्या पंतप्रधानांबरोबर आपला फोटो हवाच. आपल्या, तुमच्या माझ्या कामाचं चीज झालं पाहिजे.’ श्रीधरपंतांना पंतप्रधानांबरोबर फोटो हवा होता तर!  त्यासाठी त्यांनी कामात एकाग्रता दाखवायला सुरुवात केली. स्वत:च्या व पत्नीच्या विकारांची नवी नावे सांगायचे थांबवले. अर्थात मी काही त्याच्या या छायाचित्र अभियानाच्या विरुद्धही नव्हतो आणि बाजूनेही नव्हतो. त्यांच्या जीवनाचे ते महत्त्वाचे उद्दिष्ट असेल तर त्याला माझा विरोध नव्हता. फक्त केवळ तेवढ्यासाठी खास प्रयत्न करणे मात्र मला मंजूर नव्हते. ‘ठीक, कसं जमतं ते बघू आपण. कार्यक्रम इतका भरगच्च आहे, नेमकी कुठं संधी मिळेल सांगता येत नाही’ मी म्हणालो. ‘तुमचा पाठिंबा हवा. बाकी मी करतो सर...’ श्रीधरने काहीतरी तपशीलवार नियोजन केलेले असावे, पण मला त्यात रस नव्हता. पण नेमकी कोणती खटपट या फोटोसाठी तो करणार...? मी पुन्हा कामाला लागलो.

पंतप्रधानांची भेट दूतावासाच्या दृष्टीने- अर्थाने कठीण काम असते. शिष्टाचार, सुरक्षा, वाहनव्यवस्था, निवास व भोजन, भेटींचे वेळापत्रक अशा अनेक आघाड्यांवर निवडक अधिकाऱ्यांना चक्क लढावं लागतं. मी श्रीधरला आणि त्यांच्या फोटो कारस्थानाला जवळजवळ विसरूनच गेलो. 15 ऑगस्ट 1988 चा भारत महोत्सवाच्या उद्‌घाटनाचा सोहळा अप्रतिम झाला. त्यानंतरच्या दोन देशांधल्या वाटाघाटीही उत्तमच ठरल्या. राजीव गांधींची ती तीन वर्षांतील दुसरी ऐतिहासिक भेट होती आणि कित्येक दशकं रेंगाळलेल्या दोन देशांच्या संबंधात एक नवी चेतना आली होती.

16 ऑगस्टच्या दिवशी उद्‌घाटनात भाग घेतलेल्या मुख्य कलाकारांची पंतप्रधानांबरोबर प्रत्येकी पाच मिनिटांची भेट ठरवली होती. केलुचरण महापात्रा, मालविका सारूकाई, मणिपुरी समूह, डागर बंधू आणि त्यानंतर हरिप्रसाद चौरसिया असा तो क्रम होता. त्यांना पंतप्रधानांकडे नेणं आणि तिथून बाहेर आणण्याचं काम माझ्याकडे होतं. हे काम करत असतानाच पंतप्रधानांच्या सचिवांच्या खोलीच्या आसपास घुटमळणारे श्रीधरपंत मला दिसले. कारण नसताना ते इथं कसे हा प्रश्न मला पडलाच, शिवाय तिथं त्यांचं असणं मला फारसं आवडलं नाही.

‘इथं काय करताय तुम्ही श्रीधरपंत?’

‘सर तुच्यासाठी एक चांगली बातमी. सर सगळेच तुच्या कामानं फार प्रभावीत झालेत. कालचा सोहळा किती सुरेख झाला...’

‘दॅटस्‌ ओके. पण इथं काय चाललंय तुचं?’

‘सर जॉर्जसाहेबांनी पंतप्रधानांबरोबर तुचा फोटो घ्यायला हरकत नाही असं म्हटलंय.’

‘मला नाही इंटरेस्ट फोटोत. मी पंतप्रधानांना माझ्यासाठी अजिबात विनंती करणार नाही.’ मला त्यांच्या हेतूविषयी संशय होता.

‘सर! प्लीज नाही म्हणू नका. फक्त हो म्हणा. बाकी सगळं मी बघतो.’ त्यांची अजीजी वाखाणण्यासारखी होती.

‘सांगितलं ना मला या फालतू गोष्टीत इंटरेस्ट नाही. तुम्ही तुचं काम करा.’

‘ओके सर, पण तुम्ही नाही म्हणू नका. मी तुम्हाला त्रास देणार नाही. प्रॉमिस.’ असं म्हणून श्रीधर पंतप्रधानांचे खाजगी सचिव श्री.जॉर्ज यांच्या खोलीत अदृश्य झाले. मला त्यांची श्री.जॉर्ज यांच्याबरोबरची जवळीक अजिबात बरी वाटली नाही.

शेवटची भेट संपली. प्रधानमंत्री चौरसियांना सोडायला दरवाजाबाहेर आले. मी तिथंच होतो. प्रधानमंत्र्यांनी चौरसियांना धन्यवाद दिले, नमस्कार केला आणि ते आपल्या खोलीकडे वळणार एवढ्यात जॉर्ज यांच्या खोलीतून आवाज आला, ‘सर, सर, या भेटीची आठवण म्हणून एक फोटो घ्यायचाय.’ तो श्रीधरपंतांचाच आवाज. प्रधानमंत्री चांगल्या मूडमध्ये होते. (मी मात्र रागाने आडबाजूला झालो होतो). ‘व्हाय नॉट, पण कॅमेरा कुठंय?’ प्रधानमंत्री हसत बोलले. श्रीधरपंत तत्काळ पुढे झेपावले. आपल्या बंदगळ्याच्या कोटातून त्यांनी कॅमेरा काढला आणि सरळ राजीव गांधींच्या जवळ (मला थोडे ढकलूनच) उभे राहिले. न्यू ओतानी हॉटेलच्या साठाव्या मजल्यावर, राजीव गांधींच्या ‘सूईट नं. 1’ समोरच्या कॉरीडॉरमध्ये, अरूंद जागेत राजीव गांधी चौरसिया, श्रीधर व मी उभे झालो. ‘फोटो कोण घेणार?’ असा प्रश्न. राजीव गांधींनी विचारताच श्रीधरपंतांनी समोर उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याला ‘इधर आइए, आप फोटो लेना’ असा आदेश दिला. तो बिचारा पुढे आला. त्याने श्रीधरकडून कॅमेरा घेतला. ‘स्माईल प्लीज’ म्हणून पंतप्रधानांसह आम्हा सर्वांना स्मित करायला सांगितले. आम्ही त्याच्या सूचनेनुसार मंद मंद हसलो. ‘क्लिक’ असा आवाज आला. ‘एक और लेता हूं.’ असं तो म्हणाला. तेवढ्यात श्रीधर त्याच्याकडे पळाले, कॅमेरा परत घेतला व म्हणाले, ‘वो आखरी शॉट था’. राजीव गांधींनी श्रीधरपंतांसकट सगळ्यांशी हस्तांदोलन केले व ते परत फिरले. ‘तो आखरी शॉट था’चा अर्थ त्या कॅमेऱ्यातून आणखी एकही फोटो घेणे शक्य नव्हते.

त्या प्रसंगानंतर मी श्री.जॉर्ज यांना विचारले, ‘तुम्ही या गृहस्थाला परवानगी कशी दिली?’ जॉर्ज म्हणाले, ‘आम्ही विमानातून उतरल्यापासून मि.श्रीधर माझ्यामागे लागलेत की एकतरी फोटो आम्हाला घेऊ द्याच. त्यासाठी ते सदैव तुचं नाव घेताहेत. तुम्ही किती कष्ट घेतलेत याचं वर्णन करताहेत. त्यांनी कितीतरी जणांच्या ओळखी सांगितल्या. मी कितीही नाही म्हणालो तरी पुन्हा पुन्हा येऊन मनधरणी करत. शेवटी मी कंटाळून होकार दिला, पण सांगितले की मी राजीवजींना सांगणार नाही. ते जेव्हा चौरसियांना सोडायला बाहेर येतील तेव्हा तुम्हीच त्यांना विनंती करा आणि ते ‘हो’ म्हणाले तर आमची हरकरत नाही.’

श्रीधरनी तिथेही पडत्या फळाची आज्ञा घेऊन सरळ डाव साधला होता. श्रीधरांचे कौशल्य वंदनीय होते. त्या फोटोतले ते कुणालाही न ओळखू येणारे प्रभावशाली व्यक्तित्व म्हणजे श्रीधर होय.  

0

आज जवळजवळ तेवीस वर्षांनी त्या सगळ्या गोष्टींकडे मी वेगळ्या प्रकारे पाहतो. छायाचित्रं माणसाला खूप आनंद देतात. म्हणून तर आपण ती जपून ठेवतो. स्मृतीत फोटोंचे स्थान मानाचे आहे. त्यातही मोठ्या माणसांबरोबरचे फोटो लोक मोठे करून दिवाणखान्यात व सार्वजनिक ठिकाणी लावतात. त्यात आपले ‘मोठे’पणही जगाच्या नजरेत येईल अशी रास्त अपेक्षा असते. ‘मोठे’पणावर प्रत्येकाचा समान हक्क आहे. मला त्यावेळी श्रीधरांचा राग आला असला तरी त्यांनी त्या ‘आखरी शॉट’ला फोटोचे रूप दिले आणि मला एक लॅमिनेटेड प्रत दिली तेव्हा मला मनोमन आनंद झाला. वारंवार मी राजीव गांधींकडे आणि स्वत:कडे निरखून पाहिले. आमच्या मधोमध थाटाने उभ्या असलेल्या श्रीधरपंतांकडे माझे फारसे लक्ष जात नाही, पण जेव्हा कधी कोणीही त्रयस्थ या फोटोकडे पाहतो तेव्हा त्याचा एकमेव प्रश्न असतो, ‘हे रूबाबदार गृहस्थ कोण?’ आणि मग मी त्यांनाच प्रतिप्रश्न करतो, ‘तुम्हीच सांगा. ओळखलंत तर वन मिलियन डॉलर’. आजपर्यंत कुणीही ओळखलं नाहीये. त्यानंतर मी त्या फोटोची जन्मकथा सांगतो तेव्हा मात्र सगळ्यांची हसून पुरेवाट होते. गेल्याच महिन्यात मालदीवमध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग येऊन गेले. का कुणास ठाऊक श्रीधरांनी त्या एका फोटोसाठी केलेली धावपळ आठवली. इथे मालदीवमध्ये मी खरे तर कुटुंबप्रमुख (राजदूत) आहे. मी रशिया, जपान, सिरीया या देशांत एक अधिकारी म्हणून काम करताना कुटुंबाप्रमुखाचे अधिकार माझ्याकडे नव्हते. त्यामुळे या सगळ्या देशात प्रधानमंत्र्यांनी भेट देऊनही मला कधीच छायाचित्र घ्यायची संधी मिळाली नाही. मालदीवमध्ये मी दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना एकत्रित करून पंतप्रधान सिंह व श्रीमती गुरुशरण कौर यांच्याबरोबरच्या सामूहिक फोटोची व्यवस्था केली, निदान प्रत्येकाकडे आपापल्या परिजनांना दाखवण्यासाठी एक कायमची आठवण.

गंमत म्हणजे सामूहिक फोटोची व्यवस्था करूनही आमच्या कार्यालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याची पत्नी आपल्या दोन मुलांना घेऊन पंतप्रधानांच्या सन्मानार्थ निवडक लोकांसाठी आयोजित केलेल्या मेजवानीत येऊन पोहोचली. तिला अत्यंत आदरपूर्वक आम्ही तिच्या मुलाबाळांसकट बाहेरचा रस्ता दाखवला.

पण माझं एक दुसरं मन असंही म्हणतं, समजा त्या मायेला तिच्या दोन पोरांसकट भर मेजवानीतही पंतप्रधानांबरोबर एक फोटो घ्यायची संधी दिली असती तर... असं काय जग कोसळणार होतं? तिच्यामुळे सुरक्षाव्यवस्था कोसळली असती असं म्हणणं चुकीचं आहे. तिच्यामुळे कार्यक्रमाला गालबोट लागले असते. वॉट नॉन्सेस! आणि असा फोटो पंतप्रधानांना आवडला नसता? कुणी सांगावं राजीव गांधींसारखे श्री.मनमोहनसिंग (सिंह असूनही) हसत हसत उठले असते, काटे-चमचे खाली ठेवले असते, आणि फोटोसाठी त्यांना जितके सुहास्य वदन शक्य आहे तितके तरी त्यांनी जरूर केले असते. शेवटी, त्यांच्याशेजारी बसलेल्या त्यांच्या पत्नी गुरुशरण कौरसुद्धा दोन मुलींच्या आई आहेतच. त्यांनीही फोटोला आनंदाने संमती दिली असती.

एरवी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या या मेजवान्या अत्यंत कंटाळवाण्या असतात. त्यांत दोन देशांच्या संबंधाच्या कौतुकाची भाषणं असतात. अत्यंत कुशल व भरपूर पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी केलेले जेवणाचे ‘कोर्सेस’ असतात. राष्ट्रप्रमुखांच्या भाषणानंतर प्याल्यात मद्य असो वा नसो, प्याले उंचावून ‘टोस्ट’ करावे लागते. भाषणं संपल्यानंतर प्याले पटकन हातातून खाली ठेऊन सभ्य अशा टाळ्या वाजवाव्या लागतात. तुम्ही राजदूत किंवा संयुक्त सचिव असलात तर तसल्या त्या ‘अतिगंभीर’ मेजवानीच्या प्रसंगीही ‘अमुक माणसाला भोजनाचे आमंत्रण गेले नाही’, ‘तमक्याला शेवटच्या टेबलवर बसावे लागले,’ ‘फलान्याला ‘हाय’ (मुख्य) टेबलावर बसवायला हवे होते’ अशा तक्रारींना तोंड द्यावे लागते. जी शे-दोनशे माणसं निमंत्रित असतात ती सगळी काहीतरी रहस्य बोलत असावीत अशा पद्धतीनं सतत खालच्या आवाजात बोलत असतात. अशा मेजवान्यांमध्ये गंमत किंवा विनोद यांना प्रवेश नसतो. सरकारी छायाचित्रकार कुणाच्याही नजरेला त्याचे ‘दुष्कृत्य’ पडू नये म्हणून अत्यंत सावधगिरीने दबून वाकून छायाचित्रे घेतात. सगळ्यांची अगदी वेटरपासून निमंत्रितांपर्यंत सगळ्यांची घडी इतकी पक्की असते, सगळं इतकं नेटकं आणि व्यवस्थित असतं की मला कधी कधी तिथून पळून मॅरेथॉन शर्यतीत भाग घ्यायला जावं असं वाटतं. कधीकधी माझं खट्याळ मन म्हणतं की, एखादा मदमस्त हत्ती अशा मेजवानीत घुसला तर... किती मजा येईल! पण तसं काही काही होत नाही. खरं तर अशा मेजवान्यांध्ये काहीच कधीच होत नसावं!

काही अर्थाने ही घडी बिघडवण्याचं काम श्रीधरसारखे, त्या मायेसारखे लोक करतात. त्यांना नावं ठेवणं केवढं सोपं आहे, पण त्यांच्यामुळेच या जगातलं माणूसपण टिकतं. आणि हो... त्यांनी काढलेले किंवा इतरांकडून काढून घेतलेले फोटो लाख मोलाचे होतात. अजरामर होतात. तो फोटा नसता तर मी श्रीधरला केव्हाच विसरलो असतो. आता जेव्हा जेव्हा तो फोटो पुढे येतो... तेव्हा तेव्हा काळाच्या पडद्यात लुप्त झालेली ती आठवण फुलांच्या ताज्या ताटव्यासारखी समोर येते... दरवळते.

Tags: डागर बंधू दूतावास जपानी भाषा भारत-जपान मैत्री मालविका सारुक्का केलुचरण महापात्रा जपान नोबोरू ताकेशिता तोकयो हरीप्रसाद चौरसिया राजीव गांधीं मालदीव सी.वरद्‌राजन Dagar Brothers Embassy Japanes Language India- Japan Relations Malvika Sarukkai Kelucharan Mohapatra Japan Prime Minister Noboru Takeshita Tokyo Hariprasad Chaurasia Rajiv Gandhi Maldives C. Varadrajan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके