डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बुद्धाचा पाठलाग आणि किंचित ‘दिव्य’ ज्ञान!

पांडुरंग कोंडिबा शिंदे ऊर्फ पां. को. शिंदे आम्हांला हे सगळे समजावून सांगू शकले नाहीत, पण त्यांचं जीवन बुद्धाच्या शिकवणीतल्या मधल्या स्थानातलं होतं. दररोज दहाबारा कि.मी. सायकल चालवून ते आमच्या शाळेपर्यंत येत. मनापासून शिकवून संध्याकाळी घरी परतत. सकृत्‌दर्शनी कडक वाटले तरी मनाने ते मृदू होते. गणितात मी कच्चा असल्याने मला त्यांची भीती वाटायची. आज परतून बघताना त्यांचं जीवन केवढं स्वच्छ, सात्त्विक, सोज्ज्वळ, साधंसोपं होतं ते आठवतं. त्यांचा प्रवास संपला तेव्हा त्यांनाही मुक्ती मिळाली असणार बुद्धासारखी. वाटतं की त्यांनी मला फक्त बुद्ध दाखवला आणि त्याचा शोध घ्यायचं काम मात्र माझ्यावरच सोपवलं.  

परवा नव्याने बुद्धाने मला हलवून टाकले. अर्पणा कौर या दिल्लीच्या आधुनिक चित्रकर्तीने मला तिच्या एका चित्राची प्रतिकृती भेट दिली. चित्र साधेसुधे आहे. त्यात एक झाड आहे. बोधिवृक्ष असावा. त्या वृक्षातून एक विद्युल्लता उसळते आहे. ती विद्युल्लत्ता पापण्यांची उघडझाप करून पाहिले तर तुफान वेगाने धावणाऱ्या अश्वासारखी दिसते. त्या वृक्षातून एक तारही निघालेली आहे. घरातल्या विजेसाठी वापरली जाते तशी तार. त्या तारेचे दुसरे टोक त्या झाडाखाली झोपलेल्या पोरसवदा संन्याशाच्या डोक्यापाशी येऊन ठेपले आहे. ती तार आणि विद्युल्लता समांतर आहेत. त्या संन्याशाच्या निळ्या वस्त्रांतून डोकावणाऱ्या शरीराला- डोके, हात, पाय सर्वांना सुवर्ण झळाळी आली आहे. संपूर्ण चित्रात एक बालसुलभ निरागसता आहे. 

दिल्लीतल्या घरात अगदी मध्यवर्ती जागेवर मी त्या चित्राची स्थापना केली आहे. मी काही देवभोळा नाही, पूजाअर्चा करत नाही; अध्यात्माची आवड असली तरी त्याचा देवाशी, धर्माशी संबंध नाही, जीवन जगण्याच्या संकल्पनेशी आहे असे मानतो. अंधश्रद्धेसारखा महारोग नाही असे मला वाटते. असे असूनही त्या चित्रावर माझी नजर जाते तेव्हा तिथे ती खिळून राहते. तो वृक्ष, ती विद्युल्लता, ती तार आणि तो तपस्वी मी पुन्हा पुन्हा पाहतो. झोपलेल्या तपस्व्याचा सुवर्णमय चेहरा. म्हटलं तर नि:स्तब्ध, नि:शब्द आणि म्हटलं तर ‘दिव्यत्वाने काठोकाठ भरलेला. काहीतरी वेगळं आणि मोहक असं ते चित्र आहे.

बुद्धाच्या तथाकथित ‘दिव्य’ ज्ञानाच्या क्षणाला तिथं चित्रबद्ध करण्यात आलं आहे. मला अनेकदा ‘दिव्य ज्ञान’ या शब्दानं थांबवून धरलं आहे, गोंधळात टाकलं आहे आणि विचार करायला प्रवृत्त केलं आहे. असं काही ‘दिव्य ज्ञान’ नसतं असं मला नेहमी वाटतं, पण बुद्धाच्या ‘दिव्य ज्ञाना’वर आक्षेप घेणं म्हणजे आगीशी खेळण्याचा प्रकार. माझं भांडण काही बुद्धाशी नाही. बुद्ध हा कुणालाही सहज आवडावा असा आहे. त्याचे वात्सल्याने ओतप्रोत भरलेले डोळे आणि मंदस्मित कुणालाही वेड लावतील. मला पडणारा प्रश्न असा की, हे दिव्यज्ञान, ही जागृती किंवा हा साक्षात्कार त्याला झाला म्हणजे नेमकं काय झालं आणि जगाला त्याचा उपयोग काय? गरिबी कमी झाली? म्हातारपण संपलं की आजारीपण थांबलं? आणि मृत्यूचं काय? 

हा प्रश्न मला आठवीत असतानाही पडला होता. आमचे पांडुरंग कोंडिबा शिंदे या नावाचे सर होते. ते गणिताचे शिक्षक. एरवी त्यांना मी फार घाबरत असे. उंचेपुरे, धारदार नाक, भव्य कपाळ आणि केसांचा सुरेख भांग. त्यांना पाहून आम्ही चळाचळा कापायचो. पण ते कधीकधी हिंदी व इतिहासही शिकवायचे. त्या वर्गांना मात्र मजा यायची. एकदा इतिहासात त्यांनी बुद्धावरचा धडा शिकवला. मला तो फारच आवडला. हा कुणी राजपुत्र. म्हातारपण, आजार आणि मृत्यू यांच्या केवळ दर्शनानं अस्वस्थ होतो; आपलं विलासी जीवन, सुंदर बायको व 
नवजात मुलगा या सर्वांना सोडतो व सत्याच्या शोधात निघतो. ही कल्पनाच मला विलक्षण वाटली. फक्त सिद्धार्थाने दिवसाढवळ्या सर्वांना सांगून निघायला हवं होतं असं वाटतं. बायकापोरांचा, आईवडिलांचा निरोप घेऊन गेला असता तर बरं झालं असतं. पण ते शक्य नव्हतं. कारण सिद्धार्थाला दु:ख कळू नये म्हणून कडेकोट तीनपदरी तटबंदी होती. चोवीस तास पहारा होता. फक्त चन्ना हा विश्वासू सारथी आणि कंटक या घोड्याच्या सहकार्यामुळे (घोड्याने टापांचा आवाज न करता दरवाजे ओलांडले) तो महाल सोडू शकला. शिंदे सरांनी बोधि वृक्षाखाली बुद्धाला ‘दिव्य ज्ञान’ झालं असं सांगितलं आणि धडा संपवला. 

मी मात्र अस्वस्थ झालो. पाठ्यपुस्तकातला धडाही दिव्य ज्ञानानंतर संपत होता. मी शिंदे सरांना प्रश्न विचारायचं धाडस कधीच केलं नसतं, त्यांचा राग म्हणजे भयंकर प्रकार होता. ते उत्तर चुकलं तर गळपट्टी पकडायचे आणि सरळ धडासकट भिंतीवर दाबायचे. आम्हांला वाटायचं ते भिंतीत चिणून मारतील की काय एखाद्याला. त्यांची नजर आणि आवाज दोन्हींत जणू प्रचंड सुया होत्या... सतत खुपसत जायचे.

पण तरीही इतिहासाच्या किंवा हिंदीच्या तासाला ते वेगळे वाटत. गणिताइतकंच तन्मय होऊन शिकवत, पण गणिताचा त्यांच्यावर इतका पगडा की त्याचं सगळं शिकवणं मला ‘वस्तुनिष्ठ’ वाटायचं. दिव्य ज्ञानानंतर धडाही संपत होता आणि सरांचा तासही. मला या सगळ्यात एक मोठी विसंगती जाणवत होती. मी शेवटी न राहवून विचारले, ‘सर, एक शंका आहे. विचारू का?’ ‘गणितात कच्चे असणाऱ्यांना शंका विचारण्याचा अधिकार नाही’ असं काहींसं ते म्हणतील अशी भीती होती मला. पण तसं काही बोलले नाहीत ते. (बुद्धाचा प्रभाव?) ‘विचार विचार’ असं प्रोत्साहन दिल्यानंतर मी थोडासा घाबरतच उठलो. ‘सर, तुम्ही म्हणाला, म्हातारपण, आजार व मरण यांना बघून सिद्धार्थाने घर सोडले. त्याला या सर्वांना उपाय काय, ते उत्तर हवे होते. ते उत्तर म्हणजेच सत्य. उपासतापास व चिंतन करून शेवटी त्याला ‘दिव्य ज्ञान’ झाले. पण याचा उपयोग काय? बुद्धानंतर अडीच हजार वर्षांनी या तीनही गोष्टी आहेतच. म्हणजे बुद्धाला नेमके उत्तर, उपाय, सत्याचा शोध यातले काय व कसे सापडेल? आणि ज्या दिव्य ज्ञानात याचे उत्तर नाही त्याला ‘दिव्य ज्ञान’ कसे म्हणायचे? 

माझा प्रश्न साधा होता, पण असा प्रश्न कुणी विचारेल असं सरांना वाटलं नव्हतं. ते काहीसं गोल गोल बोलले, ‘ते जे दिव्य ज्ञान मिळालं त्याच शिकवणुकीतून बौद्ध धर्माची स्थापना झाली. त्यामार्फत त्यांनी आपल्या ज्ञानाचा प्रचार, प्रसार केला. माझा प्रश्न सरांना कळाला की नाही कुणास ठाऊक, पण त्यांचं उत्तर मात्र मला समजलं नाही. माझा प्रश्न सरळ होता, ‘आजही आजार, म्हातारपण आणि मृत्यू सगळीकडे थैमान घालतो आहे मग त्या दिव्य ज्ञानाचे करायचे काय?’ पण सरांनी बुद्धाचा संदेश व बौद्ध धर्म या गोष्टींवर जोर दिला. कुणी सांगावं, माझा मानसिक गोंधळ हा सर्वस्वी माझा होता आणि बुद्ध आणि त्यांचं ‘दिव्य ज्ञान’ समजण्याइतकी माझी कुवत नव्हती. पण मला एक वेगळाच प्रश्नही सतावत होता. सरांना तरी ‘दिव्य ज्ञान’ हा प्रकार कळाला असेल का? की माझ्यासारखे तेही फक्त चाचपडत होते, पण तसा काही वैचारिक गोंधळ त्यांच्या मनात नसावा, निदान तो चेहऱ्यावर दिसत नव्हता.

शाळेच्या त्या वयात जेव्हा जेव्हा वसतिगृहातून सुटीवर गावी जात असे, तेव्हा वडिलांबरोबर मी अनेकदा आळंदीला जात असे. वडील माळकरी असल्याने वारीला ते पायी जायचेच, पण वेळ असेल तेव्हा आळंदी आणि देहूलाही जायचे. मला प्रवासाची आवड होतीच, पण त्यातही पंढरपूरपेक्षा आळंदी आवडायची. तिथं साखरेमहाराज आणि डॉ. बुचके यांच्याबरोबर तात्यांची तात्त्विक चर्चा चालायची. प्रामुख्याने ज्ञानेश्वरी हा चर्चेचा विषय असला तरी मुख्यत: आत्मा, ब्रह्म, भक्ती, कर्मयोग, कर्म वगैरे शब्द वारंवार ऐकायला मिळायचे. मला त्या चर्चा फार आवडत. गूढरम्य वाटत. मी मनात विचारांची संगती लावायचा प्रयत्न करायचो, पण त्याचा जीवनाशी संबंध लावता येत नसे. कारण माझा पाया कच्चा असावा.

आळंदीला तिसरे एक गृहस्थ होते. स्वामी आनंदाश्रम महाराज. गावाबाहेर आश्रम होता. तिथं ते एकटे राहायचे. तात्यांची व त्यांचीही मैत्री होती. त्यांची तात्यांची चर्चा चाले. पण ती चालू असताना किंवा झाल्यानंतर ते मलाही प्रश्न करत. मग थोडाफार आमचाही संवाद चाले. शाळा, अभ्यास, खेळ अशा विषयांवरही ते बोलत तेव्हा आमचा संवाद अधिक चांगला व्हायचा. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान विलसे आणि घोगऱ्या आवाजात ते राग व्यक्त करायचे तेव्हा प्रेमाने बोलताहेत असे वाटायचे. शिवाय संन्याशांना सर्वसामान्यांच्या जीवनाला कमी लेखण्याची गरज/सवय असते तसं काही नव्हतं. मला तर वाटायचं की माझ्याद्वारे ते स्वत: ज्या जीवनाला मुकले ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत असावेत. मी एकदा धाडस करून बुद्धाच्या दिव्य ज्ञानाविषयीची माझी शंका विचारली. ‘एकदम सोपं उत्तर’ ते टाळी वाजवून म्हणाले, ‘बुद्धाला जगण्याचा नवीन मार्ग मिळाला जो त्याला राजमहालात कधीच समजला नसता.’ 

त्या काळात कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखा असे जीवन जगण्याचे मार्ग माझ्यासमोर येत होते. कुणी अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखांविषयी बोलत होते. जीवन जगण्याच्या नवीन मार्गाविषयी बोलणं, विचार करणं ही गोष्ट मला अफलातून वाटली. ‘पण तो मार्ग कोणता?’ मी स्वामींना विचारलं, ‘खरं सांगू? सत्तर वर्षांच्या खडतर आयुष्यात तो मला कळलाय असं मी खात्रीनं म्हणू शकत नाही, पण कुणी सांगावं? तुला तो कळेल आणि तेव्हा तू तो मला सांगशील.’ असं ते म्हणाले आणि खळखळून हसले. त्यांचं ते लहान मुलासारखं हसणं मला फार आवडायचं. काहीतरी छान प्रसन्न आणि दिव्यत्वाची छटा असणारं. तिथं असताना मला संन्यस्त जीवनाचं जबरदस्त आकर्षण वाटायचं. सगळं फेकून देण्यातच ‘नवीन मार्ग’ लपलेला असतो का?

त्यानंतर मी शाळेत, कॉलेजात आणि नोकरीत रमलो. स्वामींशी बोलणं, भेटणं कमी झालं. तात्या गेले तसेच स्वामीही गेले. एका अर्थाने तो बंधही तुटला. पण बुद्धाने माझी पाठ सोडली नाही. तो कुठं केव्हा भेटेल याचा नेम नसे. शाळेत एक कविता होती, त्यात अश्वत्थाम्याला त्याची आई गरिबीमुळे पिठात पाणी घालून दूध म्हणून देते असा संदर्भ होता. कवितेचा निष्कर्ष मात्र अफलातून. ‘जखम  आईच्या काळजातली, युगे युगे ही तशीच वाहे’ बुद्ध, ख्रिस्त अन्‌ गांधी आले, गेले तरी ती तशीच आहे!’ माझ्या मनात पुन्हा प्रश्न उठला, ‘महाराज, मग त्या दिव्य ज्ञानाचे काय झाले?’ त्या ज्ञानात अपुरेपणा होता की त्या ज्ञानाच्या आकलनात आणि अंमलबजावणीत? 

माझे प्रश्न मला उत्तरापर्यंत पोहोचवत नव्हते. एक गोष्ट विचार करता करता लक्षात आली की बुद्धाविषयी काहीही वरवरचं वाचायला घेतलं की दिव्य ज्ञानानंतर धडा संपतो. माहिती संपते. खरं तर दिव्य ज्ञानानंतर दिव्य ज्ञान म्हणजे काय यावर लिहिलं गेलं पाहिजे. त्यामुळे दिव्य ज्ञानानंतर आपण पुस्तक बंद करतो आणि बुद्ध तिथंच थांबतो. त्या बोधिवृक्षाखाली तिथली त्यांची जी प्रतिमा आहे किंवा जी वारंवार आपल्याला दिसते त्या चित्रात त्याच्या संपूर्ण चेहऱ्याभोवती तेजोवलय असते. तेजोवलय आपल्याला दुसरा चकवा देते. आपल्या नकळत ते बुद्धाला दिव्यत्व आणि देवपण देते. यात सिद्धार्थ ते बुद्ध हा प्रवास हरवतो, उरतो फक्त देव आणि एकदा बुद्धाला देव मानले की बुद्ध संपले. त्यांची पूजा-अर्चा उदात्तीकरण यांनाच महत्त्व येते आणि त्यांचे खरे मोठेपण किंवा मनुष्यत्व संपुष्टात येते.

मला हे जाणवले आणि मग मी थोडा जाणीवपर्वक बुद्धाचा पाठलाग केला. ते तेजोवलय काढून टाकले आणि माणूस म्हणून बघू लागलो. माझा स्वत:चाच एक सुंदर प्रवास त्याक्षणी सुरू झाला. बुद्धाचा शोध आणि आत्मशोध.

 एक दिवस सकाळी उठताच मी साधनाला विचारलं, ‘काय वाटतं गं तुला बुद्धाच्या दिव्य ज्ञानाविषयी?

 एक तर नेमकं काय झालं? आणि दुसरं आपला त्याचा संबंध काय?

साधनानं माझ्याकडे आश्चर्यानं पाहिलं. सकाळी सकाळी माझी गाडी नेमकी कुठे भरकटली तिच्या लक्षात येईना. पण तिला माझ्या अशा प्रश्नांची सवय आहे. ‘काय वैराग्य वगैरे घ्यायचा विचार आहे की काय?’ मी म्हणालो, ‘व्हाय नॉट? पण आता नाही. फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की बुद्धाला दिव्य ज्ञान झालं नसतं तरी जगाला काही फरक पडला असता का? नेमका कोणता? शिवाय आपल्याला उपयोग काय त्याच्या ज्ञानाचा? आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू जसेच्या तसे आपल्यावर नजर रोखून आहेत. ‘बेसिकली बुद्धाचा आपल्याला संदेश काय असं तुला विचारायचंय. मला दोन गोष्टी समजतात. एक- दु:ख कुणालाही चुकलेले नाही आणि दुसरे प्रत्येकाला त्याचे म्हणून एक ‘दिव्य ज्ञान’ येतेच. कधी लवकर कधी उशिरा, पण काही जणांची बस मात्र कायमची चुकते, पण त्यामुळे त्यांचेही काही बिघडत नाही.’ मला ती काय म्हणते ते समजत होते, पण खरे तर समजतही नव्हते. प्रत्येकाच्या जीवनात कधीतरी ती उत्क्रांत दिव्य अवस्था येते का?

सिद्धार्थाचे बालपण म्हणजे एक फसवा खेळ होता. त्या खेळाचे मूळ असिता या ऋषीच्या भविष्यवाणीत होते. छोट्या सिद्धार्थाचे पाय जेव्हा त्याच्या केसात अडकले तेव्हा ते पाळण्याआधीचे पाय पाहून त्यांनी भविष्यवाणी केली, ‘हा एक तर चक्रवर्ती सम्राट किंवा महान ज्ञानी होईल’ शुद्धोदन राजा असला तरी तो टिपिकल भारतीय बाप होता. त्याला मुलाच्या करिअरची, ‘घराने की इज्जत’ची, चिंता भेडसावू लागली. आजही आईवडिलांना मुलाला डॉक्टर करायचंय आणि मुलगा मला ‘रॉक म्युझिक’ जॉईन करायचंय म्हणतो तेव्हा घरात महान क्रांतीचे वातावरण तयार होते. त्याला सगळ्या प्रकारची आमिषं दाखवली जातात. ‘आमचं तू जन्मल्यापासूनचं स्वप्न’ काय आहे हे सांगितलं जातं आणि शेवट तू घराण्याची अब्रू धुळीला मिळवणार असशील तर वाट्टेल ते कर, तुझा आमचा संबंध नाही.’ अशी चित्तथरारक धमकी दिली जाते. 

शुद्धोदनाने नेमके हेच केले. फक्त तो राजा असल्याने त्याने ते वेगळ्या पद्धतीने केले. राजमहालाभोवतीची तटबंदी वाढवली, तीन तीन वेगळे महाल (प्रत्येक ऋतूसाठी वेगळे) सिद्धार्थासाठी बनवून घेतले, क्षात्रतेज वाढवण्यासाठी शरीर मजबूत करण्यासाठी, सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली. सिद्धार्थाच्या मनात वैराग्य येऊ नये म्हणून धार्मिक अभ्यासांवर बंदी घातली. दु:खाचे सर्व दरवाजे बंद करून टाकले आणि सुखाची सगळी भांडारे मुक्त केली. त्याचे बाहेर जाणे जवळजवळ थांबवले आणि उत्सव-सण सोहळे अशा आनंदपर्वातसुद्धा सगळे चांगले चेहरेच दिसतील अशी व्यवस्था केली. 

मला वाटतं शुद्धोदनाने दु:खांपासून सिद्धार्थाला वेगळे ठेवले ही फार मोठी चूक केली. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला लहानपणापासून दु:खाचा सामना करावा लागतो. आजारपण, म्हातारपण आणि मृत्यू यांशिवायही अनेक दु:खकारक गोष्टी दररोज पाहिल्याने- जगल्यानेच ‘माणूस’ घडतो. सिद्धार्थाला दु:खापासून वंचित ठेवून शुद्धोदनाने त्याला जगण्यापासून वंचित केले, पण सिद्धार्थ संवेदनशील होता. एकदा त्याच्या चुलतभावाच्या- देवदत्ताच्या बाणाने घायाळ झालेला हंस सिद्धार्थाने औषधोपचार करून वाचवला. ‘हंस कुणाचा?’ हा वाद न्यायालयात गेला. ‘ज्याने वाचवला त्याचा- मारलेल्याचा नव्हे’ असा मनोरम निर्णय झाला. 

शुद्धोदनाचे डोळे मात्र सिद्धार्थाच्या क्षत्रिय करिअरवरच होते. 18 व्या वर्षी त्याने त्याचे लग्न सुंदर अशा यशोधरेशी करून दिले आणि त्या जोडप्याला राहुल नावाचा पुत्र झाला. कशाचीच काळजी नसलेल्या सिद्धार्थाच्या त्या सुंदर जगाला एक दिवस ध्यानीमनी नसताना साध्या गोष्टीने तडा गेला. सिद्धार्थाला चुकून जर्जर अशा वृद्धाचे दर्शन झाले. माणसाची ती अवस्था पाहून सिद्धार्थाच्या मनाचा आकांत झाला. त्यानंतर क्रमाने त्याने आजारी माणूस आणि प्रेतयात्रा पाहिली. सर्वसामान्याला दररोज भिडणारी वस्तुस्थिती सिद्धार्थाच्या डोळ्यात अंजन टाकणारी होती. अस्वस्थ झालेल्या सिद्धार्थाला भगव्या वस्रातील एक संन्यासीही दिसला. आपल्या अस्वस्थतेचं उत्तर राजप्रासादात मिळणं शक्य नाही हे त्याच्या लगेच लक्षात आलं. 

सिद्धार्थ खरं तर एक अफलातून विद्यार्थी होता. त्याला आपल्या शंकांचं निरसन प्रासादातच ऋषींना बोलावून धर्मग्रंथांवर चर्चा करवून घेता आले असते, पण त्याला माहिती नको होती, ज्ञान हवं होतं. फक्त स्पष्टीकरण नको होतं, उत्तरं हवी होती. सगळं वैभव असण्याच्या दु:खापेक्षा काहीही नसल्याच्या सुखाचा अनुभव त्याला हवा होता. त्या दिशेने तो कुणाचीही आणि कशाचीही तमा न करता धावत सुटला. तरुण बायको आणि छोटा मुलगा यांच्यात अडकलेलं आपलं मन मोठ्या मुष्किलीनं त्यानं काढून घेतलं.

हातात भिक्षापात्र घेऊन तो सर्वप्रथम बिंबिसाराच्या राजगृह शहराच्या रस्त्यावर उभा होता. तिथल्या लोकांनी त्याला ओळखलं. बिंबिसाराने आपलं सिंहासन त्याला देऊ केलं. ज्ञान झाल्यानंतर परत यायचं आश्वासन देऊन सिद्धार्थ तिथून निघाला. त्यानंतर त्याने ज्ञान प्राप्त करायच्या सर्व वाटा चोखाळल्या. काही काळ भटल्यानंतर त्याला एक गुरू भेटले. जे जे शिकता येईल ते शिकून त्या अभ्यासाचा पुन्हा पुन्हा सराव करून जेव्हा शिकण्यासारखे काही उरले नाही तेव्हा तो पुन्हा पुढे निघाला. मग तो दुसऱ्या गुरूंकडे गेला. तिथेही मन लावून एकाग्रचित्ताने ज्ञान संपादन केले. सगळ्या परीक्षा पास झाला. त्याला अधूनमधून पत्नी-पिता व पुत्र यांच्या आठवणी सतावायच्या. पण त्यात त्याला कधी अपराधी वाटलं नाही. कधी कधी यशोधरा त्याच्या मनात यायची. तिच्याविषयीचं आकर्षण त्याच्या मनातून कधीच गेलं नाही. 

पण तरीही तो या दोन्ही गुरूंपासून शिकला एवढंच नव्हे तर त्यांचे उत्तराधिकारी होण्याची ‘जॉब ऑफर’ही त्याला मिळाली. पण दोन्ही ऑफर्स त्याने नाकारल्या आणि ज्ञानप्राप्ती अपुरी राहिली असल्याच्या जाणिवेने त्याने पुन्हा भटकंती सुरू केली. या काळात देहाला क्लेश देणाऱ्या अनेक कठीण तपस्या त्याने पार पाडल्या. तो इतका कृश झाला की, एकदा तर स्नान करताना नदीतच कोसळला. त्या वेळी त्याच्या लक्षात आले की, क्लेश कोणताही असो, तो वाईटच. या काळात त्याची परमेश्वरावरची श्रद्धा पूर्णपणे ढळली. पूर्वी त्याला संपूर्ण विश्वाच्या अस्तित्वात परमेश्वराचे दर्शन होई, पण त्या विचारापासूनही तो मुक्त झाला होता. त्यानंतर एक दिवस त्याने निश्चय केला की, त्या सत्याच्या शोधात मी ध्यानमग्न होणार आणि मरेपर्यंत उठणार नाही. बोधिसत्त्वाच्या झाडाखाली तो 49 दिवस बसला आणि एक दिवस सिद्धार्थ मेला, सर्वार्थाने ‘दिव्य ज्ञान’ झालेला बुद्ध जन्मला. ‘दिव्य ज्ञान’ म्हणजे नेमके काय झाले याची अनेक वर्णने आहेत. या प्रक्रियेत माणसाच्या दु:खाच्या कार्यकारणसंबंधाने यथार्थ ज्ञान तर आलेच, पण ते टाळण्यासाठी उपायसुद्धा दिसले. स्वत:च्याच पूर्व जन्मांचे अवलोकन करता आले, कर्म आणि पुनर्जन्म यांचा उलगडा झाला आणि मुख्य म्हणजे चार महान सत्यांची जाणीव झाली.

या ज्ञानात आणि कुराणाच्या संदेशातील किंवा ख्रिश्चन धर्माच्या उपदेशातील फरक हा आहे की, बुद्धाचे ज्ञान ही परमेश्वरी कृपा नव्हती, ती स्वत:च्या शोधाची परिणती होती. प्रवासातील ध्येयसिद्धी होती. मुख्य म्हणजे ती त्याची सिद्धी असली तरी इतरांच्या चर्चेला, टीकेला आणि सुधारणेला खुली होती. खरं तर तो कोणत्याही प्रकारच्या दैवी शक्तीच्या आणि तथाकथित मुक्तीच्या विरोधात बंड करून उभा होता. जीवन जसे आहे तसे त्याला दिसले.

धार्मिक पुस्तकं बुद्धाच्या शिकवणीनं भरलेली आहेत. त्याच्या शिकवणुकीत चार महान सत्ये आहेत. माणसाच्या दु:खांची मुख्य कारणं अज्ञान, लोभ, प्रेमभावना आणि आत्मक्लेश ही असून त्यावर उपाय म्हणून आठपदरी रस्ता घ्यावा. त्यात योग्य दृष्टी, योग्य हेतू, योग्य वाणी, योग्य आचरण, योग्य जीवनशैली, योग्य प्रयत्न, सारासार विचार आणि एकाग्रता यांचा समावेश आहे. कर्माचा विचार बुद्धाने उडवून लावला. आत्म्याचे अजरामरत्व धुडकावले आणि माणूस आणि त्याचे मन केंद्र मानून बुद्धीने विचार मांडले.

सर्वार्थाने या विश्वातला बुद्ध हा पहिला क्रांतिकारी होता. तो पहिला विद्रोही होता. आजही त्याचे विचार सनातन्यांना धक्कादायक वाटतील असे आहेत. ब्राह्मण्याला उद्‌ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणारा आणि समानतेची घोषणा करणारा तो पहिला माणूस होता. जातीची उतरंड उद्‌ध्वस्त करू पाहणारा तो पहिला युगपुरुष होता. माणसात आणि दिव्यत्वात दलालांची गरज नाही असे म्हणून तो थांबला नाही. शूद्रच नव्हे तर अंगुलीसारख्या खुन्याला आणि अलावका या नरभक्षकालाही त्याने भिख्खूची दीक्षा देऊन सन्मानाने जगण्याचा नवीन मार्ग मोकळा केला. मी सांगतो तेच खरे असे न म्हणता प्रत्येकाला निर्वाणाचा मार्ग स्वत: धुंडाळण्याची मोकळीक दिली. आपले ज्ञान ‘दिव्य ज्ञान’ नसून माणसाच्या मनाचे काहीअंशी झालेले आकलन आहे अशी प्रांजळ कबुली दिली. असा प्रामाणिकपणा विचारवंतांकडे आणि धर्मगुरूंकडे क्वचितच असतो. 

बुद्धाच्या या विचारांवर स्वार होत मी अलीकडच्या काळात येत असतानाच बुद्ध एक माणूस म्हणून किती सहृदय, किती कोमल आणि त्याचवेळी केवढा दृढनिश्चयी आणि धीरोदात्त होता हे जाणवलं. सत्याच्या शोधात निघालेल्या बुद्धाला यशोधरेची आठवण सतत अस्वस्थ करायची. दिव्यज्ञान झाल्यानंतर माणूस कुटुंबापासून दूर होतो, पण बुद्ध कपिलवस्तूला परत आला. राहुल-यशोधरेसह इतर अनेकांना बरोबर घेऊन तो प्रवासाला निघाला. कडक तपस्या केल्यानंतर जेव्हा जागा व्हायचा तेव्हा त्याला कोणत्याही इंद्रियाची तहानभूक सहजासहजी जात नाही हे जाणवायचं. त्याचे त्याच्या गुरूंबरोबरचे संवाद संयमाची आणि इतरांचा आदर करण्याची वृत्ती दर्शवतात. ज्ञानप्राप्ती करताना त्याची निरागसता जात नाही. आपल्या उदक नावाच्या गुरूला तो एकदा विचारतो, ‘माझी सेवाभावी पत्नी माझ्या आत्म्याचा एक हिस्सा होऊ शकते का?’ ‘तुझ्या-माझ्यात फक्त तूच आहेस. तिथं इतरांना जागा नाही’ उदक म्हणाला, ‘याचा अर्थ तिची प्रतिमा हाच संदेश आहे. तुम्हीच म्हणता ना की आत्मा संदेश पाठवतो’ बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली, त्यानंतर तो कित्येक दिवस त्या झाडाकडे कृतज्ञतेनं बघत बसला.

नंतर जेव्हा तो निघाला तेव्हा आपलं  ज्ञान कुणालाही न सांगण्याचं त्यानं ठरवलं. ज्यांना कळलंय त्यांना सांगायची गरज नाही आणि ज्यांना कळणार नाही त्यांना कशाला सांगायचं, अशी द्विधा अवस्था झाली त्याची. पण त्याच्या अंतर्मनानं त्याला सांगितलं, ‘अरे बाबा, या दोन्हींच्या सीमारेषेवर अनेकजण आहेत. त्यांच्यासाठी तरी तुला जे समजलं ते समजावून सांग.’ बुद्ध तयार झाला पण आणखीनच गंमतीदार विचार त्याच्या मनात आला, ‘सगळ्यात आधी चला, आपण आपल्या गुरुजनांनाच समजावून सांगू.’ गुरूंना शिकण्याची व शिकवण्याची आवश्यकता आहे असं वाटणारा बुद्ध माझ्या माहितीतला पहिला विद्यार्थी आणि माणूस आहे. तो आपल्या गुरूंच्या शोधात निघालासुद्धा पण त्यांचा मृत्यू झाला होता.

आमचा आणि बुद्धाचा संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचं काम विसाव्या शतकातील सर्वांत उत्तुंग माणसाने केलं. आंबेडकरांचं जीवनही बुद्धाप्रमाणे सत्याच्या शोधात गेलं. मी त्यांना त्यांच्या जीवनकालातील सर्वांत प्रखर बुद्धिवंत मानतो. त्यांच्या पुस्तकांची नावंच त्यांच्यातील ‘सत्यशोधक’ दाखवतात. रिव्होल्युशन अँड काऊंटर रिव्होल्युशन इन एन्शंट इंडिया, बुद्धा ऑर कार्ल-मार्क्स?, रिडल्स इन हिंदु इझम, हू वेर द शूद्राज? पाकिस्तान ऑर 
पार्टिशन ऑफ इंडिया, द बुद्धा अँड हिज धम्मा. प्रत्येक शीर्षकात पिपासा जाणवते. जाणण्याची, शोधण्याची, शिकण्याची व शिकवण्याची. असा हा माणूस बुद्धाच्या प्रेमात का पडला असावा? अस्पृश्यांना मिळणाऱ्या वागणुकीतून समानतेचा ध्यास आंबेडकरांनी घेतला, हा ध्यास त्यांना मनुस्मृतीपासून दूर घेऊन गेला आणि ते थेट बुद्धाच्या अंगणात पोहोचले. जेव्हा मुख्य प्रवाहातील सामाजिक, राजकीय सुधारणांच्या चळवळीत दलित समाजाचा विचारच नव्हता हे जाणवलं तेव्हा तर त्यांनी ‘या धर्मात जन्मलो पण त्यात मरणार नाही’ अशी घोषणाच नाशिकमधल्या येवला परिषदेत 1935 साली केली.

त्यांना समानता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव यांच्यावर आधारलेला धर्म हवा होता, शोषण करणारा, दया दाखवणारा, विषमता मानणारा नव्हे. त्यांनी वर्णाश्रम, शास्त्रे, ब्राह्मण्य, जातिवाद या सर्वांचा खोलवर विचार केला. बुद्ध कळण्यासाठी ‘द बुद्धा अँड इज धम्मा’सारखे सुंदर पुस्तक नाही. एके ठिकाणी ते म्हणतात, ‘मन स्वच्छ करणं हेच बुद्धाच्या उपदेशाचं सार आहे’, ‘धर्म म्हणजे माणूस आणि ज्या जगात तो राहतो यांच्यातलं नातं.’ बुद्धाचा धर्म म्हणजे शोधाचा परिपाक आहे; या पृथ्वीवरील मनुष्यजीवनाचा अर्थ, आणि माणसाच्या स्वभावाच्या बुद्धाने केलेल्या शोधाचा आणि अभ्यासाचा परिपाक म्हणजे त्याचा धर्म. त्या धर्मात दु:खाची कारणं आणि त्यावरती उपाय सांगितले आहेत, म्हणून हा ‘सामाजिक’ धर्म आहे. दैवी वगैरे थोतांड नाही. साधं सरळ आणि तरीही हृदयाला भिडणारं ज्ञान. 

दिव्य ज्ञानाचा अर्थ ते साधंसुधं दररोजचं सत्य समजणं असा आहे. आपल्याला जग आहे तसं दिसत नाही, बुद्धाला ते दिसलं. त्याच्याआधी सगळं ज्ञान ही देवांची तरी किंवा उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती. ज्ञानाचं लोकशाहीकरण करणारा पहिला माणूस म्हणजे बुद्ध. जप, माळा, पूजा यांच्याऐवजी अतिरेक टाळा, अतिमोह टाळा आणि क्लेशदायक गोष्टीही टाळा आणि आनंदाने जगा असं हे साधं ‘दिव्य ज्ञान’.

आत्मा, परमात्मा, कर्म आणि पुनर्जन्म यांचा गोंधळ नाही व नको; सगळं माणसाच्या मनावर आणि मनात आहे तेच हे ‘दिव्य’ ज्ञान. बुद्धाचा मृत्यूही असाच समजायला सोपा आहे. त्याची ज्ञानप्रसाराची 45 वर्षे आणि वयाची 80 वर्षे केव्हाच झाली होती. तब्येत हळूहळू घसरत होती. एके दिवशी एका लोहाराच्या घरी डुकराचे मांस खाल्ले आणि ते बुद्धाला कदाचित बाधले. त्याची प्रकृती ढासळली. त्याने जंगलात स्वत:चे अंथरुण दोऱ्या वापरून बनवले. प्रत्येक दिशेला दोन सालवृक्ष असे आठ वृक्ष असलेली जागा त्याने निवडली होती. आपल्या नव्या प्रवासाची त्याला चाहूल लागली. त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, ‘त्या लोहाराच्या मांसामुळे मला मृत्यू आला नाही हे त्याला सांगा. शिवाय माझ्या जीवनातले शेवटचे भोजन त्याच्या हातचे होते त्यामुळेही ते अद्वितीय होते हेही त्याला सांगा.’ केवढा साधा पण केवढा भव्य विचार. मरण्यापूर्वी त्याचे शेवटचे शब्द, ‘बदल अटळ आहे, स्वत:च्या मुक्तीसाठी स्वत: एकचित्ताने प्रयत्न करा’. बुद्धाचं जीवन कोणत्याही टप्प्यात आपल्याला गोंधळात टाकत नाही. कुणीही ‘बुद्ध’ होऊ शकतो असं बुद्ध मानत असे.

पांडुरंग कोंडिबा शिंदे ऊर्फ पां.को.शिंदे आम्हांला हे सगळे समजावून सांगू शकले नाहीत, पण त्यांचं जीवन बुद्धाच्या शिकवणीतल्या मधल्या स्थानातलं होतं. दररोज दहाबारा कि.मी. सायकल चालवून ते आमच्या शाळेपर्यंत येत. मनापासून शिकवून संध्याकाळी घरी परतत. सकृत्‌दर्शनी कडक वाटले तरी मनाने ते मृदू होते. गणितात मी कच्चा असल्याने मला त्यांची भीती वाटायची. आज परतून बघताना त्यांचं जीवन केवढं स्वच्छ, सात्त्विक, सोज्ज्वळ, साधंसोपं होतं ते आठवतं. त्यांचा प्रवास संपला तेव्हा त्यांनाही मुक्ती मिळाली असणार बुद्धासारखी. वाटतं की त्यांनी मला फक्त बुद्ध दाखवला आणि त्याचा शोध घ्यायचं काम मात्र माझ्यावरच सोपवलं. 

आज सर नाहीत, पण अर्पणा कौरचं चित्र घरात लक्ष वेधून घेतं. त्या चित्रात ती तार आणि तारेच्या शेवटी चक्क एक प्लग आहे. बुद्धाचा शोध घेत घेत मीही त्या बोधिवृक्षाकडे स्तिमित होऊन पाहतोय. बुद्धाच्या निमित्ताने पिंपळाच्या झाडाचाही बोधिवृक्ष झाला. त्या वृक्षातून निघालेली विद्युल्लता मी अनुभवतो. तो प्लगही जणू माझ्या अस्तित्वाच्या सॉकेटमध्ये एकरूप झाला. एकाच वेळी विलक्षण तेज आणि खोल शांततेचा अनुभव! हेच तर दिव्य ज्ञान! 

Tags: आंबेडकरी तत्वज्ञान सत्याचा शोध दिशादर्शक आंबेडकर स्वशोध दिव्यज्ञानाचा शोध बुद्धाचा शोध तत्वज्ञान बुद्धज्ञान दिव्य ज्ञान प्राप्ती सन्याशी पांडुरंग कोडिंबा शिंदे शिक्षकाची आठवण बुद्ध बोधीवृक्ष पोस्टर अधुनिक कलाकार अर्पणा कौर बुद्धाचा पाठलाग आणि किंचित दिव्य ज्ञान ज्ञानेश्वर मुळे Human Sole Four Truths Self Discovery Finding Buddha Philosophy Buddhist Similarity Brotherhood freedom Books Dr. Ambedkar Divya Gyan Monk Sanyashi Pandurang Kondiba Shinde P. K. Shinde Memories Teacher Bodhivruksha modern Picture Artist Arpana Kaur Budhha Buddhacha pathlag Ani Kinchit Divya Dnyan Dnyaneshwar Mulay weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके