डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मौनात पाखरांचे वनगीत शोधताना

मी काय सांगतो हे साधनाला कसं कळावं? दिल्लीत ती कार्यालयात अधिकारी असते तेव्हा ज्यांचं काम असतं अशाच लोकांना ती भेटते. कामाशिवाय फालतू बडबड करणाऱ्यांना ती थांबवते आणि गरज वाटली तर त्यांना पळवून लावते. अगदी जवळचे काही नातेवाईक व मित्र सोडल्यास तिला आपला असा ‘गाव’ किंवा ‘समाज’ नाही. पण माझ्या गावाची माझ्यावर मालकी आहे ही संकल्पना तिला कशी समजावून सांगावी? शिवाय, मी गेली चाळीस वर्षे बाहेर असलो तरी मी या गावाला पक्का बांधला गेलो आहे. एक गाव जेव्हा एखाद्याचा पाठलाग सतत करतं; मागोवा ठेवतं तेव्हा त्या व्यक्तीच्या आणि गावाच्या नातेसंबंधांचं वर्णन कसं करावं? आमचा सततचा संवाद उपस्थितीतला आणि अनुपस्थितीतला- आमचं जीवनसत्त्व आहे हे इंग्रजीत किंवा हिंदीत मी कसं समजावू शकेन. 

साधनाने मला विचारले, ‘हे लोक काही न बोलता इतका वेळ का बसलेत?’ मी विचारले, ‘कोण लोक?’. ‘हेच, बाहेर सोप्यात बसलेले लोक. मी पाहात्येय, काही लोक तासतासभर बसलेत तेही न बोलता. आणि तूही त्यांच्यामध्ये बसलेला असतोस शांतपणे.’ माझ्या लक्षात आलं थोडंसं. ती आमच्या घरात मला भेटायला आलेल्या गावकऱ्यांविषयी बोलत होती. मी म्हणालो, ‘गप्प कुठे बसलोत आम्ही? अधूनमधून बोलतोच आहोत’. ‘अधूनमधून म्हणजे?’ तिने विचारलं, ‘जेव्हा कुणी नवीन माणूस येतो तेव्हा कधी आला? कसं काय? असे प्रश्न होतात, त्याची उत्तरं झाली की सगळं शांत. तू वर्तमानपत्र वाचतोस किंवा पुस्तक. कधी कधी फोनवर बोलतोस आणि गावकरी मात्र बसलेले असतात. काही लोक बसून थकले की हळूच उठतात. कुणी ‘जातो’ एवढंच म्हणतो. पण काही लोक तर न बोलताच निघून जातात, आणि काही नवीन येतात ते पुन्हा न बोलता बसून राहतात. हा प्रकार काय आहे?’ 

मला ती काय म्हणते आहे ते लक्षात आलं. ती शहरातून अशा प्रकारे खेड्यातल्या घराचा अनुभव पहिल्यांदाच घेत होती. शहरात न कळवता, वेळ न घेता येणारं फारसं कुणी नसतं. नातेवाईकसुद्धा फोन न करता येण्याची शक्यता अजिबात नसते. आलेला मित्र असो वा नातेवाईक, तो एक ‘वेळापत्रक’ घेऊन येत असतो. म्हणजे तो येतो तेव्हा, तो कशासाठी (उदा. भोजनासाठी, मुलीच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी, नातवाच्या नामकरणाला बोलावण्यासाठी किंवा मुलाच्या नोकरीबाबत चर्चा करण्यासाठी वगैरे) येणार, किती काळ थांबणार (उदा. नोकरीची चर्चा अर्धा तास, निमंत्रण पाच ते वीस मिनिटे, जेवण दोन-अडीच तास) व साधारणत: काय चर्चा करणार, याची चौकट घेऊन येतो. थोडक्यात तो येतो तेव्हा किती मिनिटांसाठी ते ठरवून येतो. यात कारण नसताना एक अजब व्यावहारिकता येते. ती अपरिहार्यही असते. कारण त्या येण्या-जाण्यात स्वत:च्या वेळापत्रकाचं प्रतिबिंब असतं. शहरातल्या माणसांना सतत कुठंतरी जावं किंवा कुठून तरी यावं लागतं. बाईसाहेब कुठं गेल्यात? किट्टी पार्टीला. मुलगी? भरतनाट्यम्‌ शिकतेय. साहेब? क्लबला गेलेत. कुणीतरी कुणासाठीतरी भोजनाचं आयोजन केलंय. तिथं ओनजीसीचे सीएमडी भेटतील, त्यांच्याशी पुढच्या नियुक्तीसंबंधी चर्चा करायची. कारण ते ‘नैसर्गिक वायू’ मंत्र्यांना ओळखतात. थोडक्यात शहरात प्रयोजन असते, नियोजन असते, संयोजन आयोजन असते. गावात ‘योजक: तत्र दुर्लभ:’ असे नियोजनशून्य जीवन असते. शहरात आणि गाव नावाच्या संकल्पनेत हाच मुख्य फरक आहे. 

साधनाला नेमकं कसं समजावून सांगावं की, माझी आणि माझ्या गावकऱ्यांची रीतच अशी आहे. त्या वेळी तिथं मला भेटायला येणाऱ्यांचा आणि माझा एक अनोखा संवाद सुरू असतो. तिथं कुणाकडेच वेळापत्रक नसतं. ती माणसं पक्ष्यासारखी येतात, काही काळ थांबतात, तो काही काळ म्हणजे किती तो ते आपल्या सवडीनं ठरवतात आणि मग निरोप घेतला न घेतला असं करून उडून जातात. पक्षी जाताना कधी गुडबाय, सी यू अगेन वगैरे थोडंच बोलतात? ते चाललेत हे कळतं आणि वास्तवात भेटतील न भेटतील,  पण पुन्हा येतील तेव्हा असंच निरागस गोजिरवाणं भेटतील असं आश्वासन त्यांच्या जाण्यातसुद्धा असतं. 

मी साधनाला सांगितलं, ‘आमचं गप्प गप्प बसणंही बोलणंच असतं. मी पुस्तक वाचत असलो आणि ते तिथं काही न करता दात टोकरत, आपसात बोलत किंवा क्वचित पेंगतही बसलेले असले तरी आमचा संवाद सुरू असतो. तुला हा प्रकार कळणं शक्य नाही. कारण या भेटीला येणाऱ्या कुणालाच कोणतीच चौकट नाही. कोणतेही प्रयोजन नाही. ते फक्त भेटीला आलेत. बोलण्याचं बंधन घेऊन नाही. ज्या क्षणी आमची दृष्टभेट होते, आम्ही एकमेकांना मिठी मारतो, फक्त नमस्कार करतो किंवा एकमेकांच्या पाया पडतो तो क्षण कृतार्थ असतो. केवळ त्या क्षणासाठी ते तिथं असतात, आणि मीही हजारो मैलांचं अंतर कापून वारंवार गावाच्या दिशेनं धावतो.’ ‘पण ते भेट झाली की जाऊ शकतात. बसून का राहतात?’ 

‘बसून राहतात, कारण उठण्याचं बंधन नाही. दुसरं, इतर कुठंही ते त्या क्षणी गेले तरी बसूनच राहणार असतात. पण मला वाटतं ते बसतात त्याचं कारण याहून वेगळं असावं. माझ्या दोन भेटींमधलं अंतर काही महिन्यांचं असतं. ते बसतात तेव्हा ते अंतर भरून काढतात. मलाही ते आवडतं. एखादी गोष्ट अचानक मनात आली तर विचारता येते, पण हे अंतर भरून काढणं, या कालावधीत मी कसा बदललो, किती बदललो, माझ्या जीवनात आणखी काय झालं या सगळ्या माहितीच्या अभावाचं अंतर ते बसल्या बसल्या ओलांडतात. त्यांची मूक भाषा मला कळते आणि माझी त्यांना.’ 

मी काय सांगतो हे साधनाला कसं कळावं? दिल्लीत ती कार्यालयात अधिकारी असते तेव्हा ज्यांचं काम असतं अशाच लोकांना ती भेटते. कामाशिवाय फालतू बडबड करणाऱ्यांना ती थांबवते आणि गरज वाटली तर त्यांना पळवून लावते. अगदी  जवळचे काही नातेवाईक व मित्र सोडल्यास तिला आपला असा ‘गाव’ किंवा ‘समाज’ नाही. पण माझ्या गावाची माझ्यावर मालकी आहे ही संकल्पना तिला कशी समजावून सांगावी? शिवाय, मी गेली चाळीस वर्षे बाहेर असलो तरी मी या गावाला पक्का बांधला गेलो आहे. एक गाव जेव्हा एखाद्याचा पाठलाग सतत करतं; मागोवा ठेवतं तेव्हा त्या व्यक्तीच्या आणि गावाच्या नातेसंबंधांचं वर्णन कसं करावं? आमचा सततचा संवाद उपस्थितीतला आणि अनुपस्थितीतला- आमचं जीवनसत्त्व आहे हे इंग्रजीत किंवा हिंदीत मी कसं समजावू शकेन. ‘Our continuous engagement- face to face and in absentia – os our vital life line’ असं मी सांगावं का? 

विशेष म्हणजे आमच्या घरानं कमीतकमी दोन-तीन पिढ्या तरी आजूबाजूच्या समाजाला चर्चांमंच उपलब्ध करून दिला आहे. तिथं माणसांचं मोहोळ मी सतत बघत आलो आहे. आमचा पिढीजात व्यवसाय शिंपीकामाचा. आजोबा, वडील, काका, चुलत भाऊ सर्वांना मी शिवणयंत्रावर पाहिले आहे. शिंप्याचे घर आपोआप एक सामाजिक केंद्र बनते. माझे आजोबा, काका, वडील उच्चशिक्षित नसले तरी उदारमतवादी होते. त्यामुळे आमच्या सोप्यातल्या मोकळ्या जागेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायच्या. त्यात निवडणुकांपासून नेहरूंपर्यंत व अस्पृश्यतेपासून सिनेसृष्टीपर्यंत सगळे विषय यायचे. जोपर्यंत दुकान उघडे (त्या काळात घरं किंवा दुकानं फक्त रात्रीच बंद व्हायची) तोपर्यंत तो खुला ‘मंच’ सुरूच असे. या दरम्यान काही लोक तिथेच आडवे होत असत. काही लोक फक्त ‘गप्प’ बसण्यासाठीच नियमितपणे येत असत. माझ्या बालपणात आमचे दुकान म्हणजे समाजमनाचे पुस्तक होते. मी बहुसंख्य गावकऱ्यांना ओळखतो आणि तेही मला ओळखतात याचं कारण तो ‘मंच’ निर्मित अनुबंध आम्ही टिकवून ठेवला आहे. 

दरम्यान खूप बदल झालेत. गाव बदलतोय झपाट्याने. एका बाजूला राजकारणाचे आक्रमण तर दुसरीकडे जातीच्या आधारावरील ध्रुवीकरण, तिसरीकडे भोगवाद आणि चंगळवादाचे खुलेआम प्रदर्शन यांच्या प्रभावाने पारंपरिक सामाजिक व सांस्कृतिक साचा पूर्णपणे मोडकळीला आला आहे. आमच्या विशाल एकत्रित कुटुंबातून अनेक छोटे घटक निर्माण झाले. आम्ही मुलं वेगवेगळ्या दिशांनी पांगलो. मागे राहिलेल्यांनी आपापले संसार थाटले. या घाईगर्दीत ते जुने दुकान (जिथले ताटुक कुठल्या तरी बाजूने फाटलेले असे) गायब झाले आणि तिथले ‘अर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’सुद्धा. 

आताचे आमचे घर रस्त्यापासून थोडे आत आहे. तिथं फक्त आई एकटी राहते. तिच्या वयाच्या तिच्या काही मैत्रिणींची आणि तिची दररोज गाठभेटही होते आणि त्यांचा छोटा मेळा भरतो. पण मी गेलो की पुन्हा एकदा तो खुला मंच भरतो. बाकावर, कॉटवर खाली फरशीवर असे जागा सापडेल तसे लोक बसतात. काहीजण बाहेर खिडकीजवळच उभे राहतात. कधी कधी मी सकाळी उठायच्या आधीच ते येऊन बसतात. मी उठेपर्यंत वाट बघतात. अधूनमधून बातचीतही होते. काहींना कुतूहल असते. ‘मायावती प्रधानमंत्री होणार का? मालदीव कधी बुडणार आहे? आपल्या देशात हुकूमशाही किंवा लष्करी राजवट का येत नाही?’ वगैरे. अनेकांचा समज असतो की, माझे दिल्लीत खूप वजन आहे. ते सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांपासून पेट्रोल पंपाच्या परवान्यापर्यंत अनेक कामांसाठी माझी मदत मागतात. पण येणारे बहुसंख्य लोक फक्त भेटण्यासाठी येतात. ‘भेटीलागी जीवा’ ही आस हेच साधन आणि साध्य. त्यांचं तिथं बसणं म्हणजे एक नि:शब्द कॅनवास असतो. त्यावर कधी शब्दांचे ठिपके, वाक्यांचे कुंचले आणि संवादाचे रंग पसरतात पण कॅनवासवरची मोकळी जागा अव्याप्त अवकाश- हेच तिथले खरे चित्र असते. तिथे आवाजापेक्षा ध्वनिशून्यतेला उजवे स्थान असते. माणसाला सतत बोलण्याची, नाचण्याची, प्रदर्शनाची, बातम्यांची, धावण्याची किंवा प्रयोजनाची आवश्यकता नाही असा त्या अवकाशाचा अर्थ असतो. 

पंचेंद्रियांना सुखावणारं मनाला चेतवणारं बुद्धी आणि अहंकार यांच्यासाठी सातत्यानं काहीतरी उत्तेजक रसद पुरवणं आवश्यक आहे असं वाटणाऱ्या आजच्या जगात तो मोकळा अवकाश मला ‘थोडके म्हणजे खूप’ याची जाणीव करून देतो. त्या मोकळ्या अवकाशातून दिसणाऱ्या छटा, आयाम, रंग या सर्वांना खूप खोल अर्थ प्राप्त होतो. अगदी जपानी लोकांच्या बैठकीच्या खोलीसारखा. तिथं कमीत कमी सामान असतं. भिंतीवरती फोटो, कलाकृती, चित्र, टीव्ही यांची जागेसाठी मारामारी नसते. चषक, ताजमहाल, कुतुबमिनार यांच्या प्रतिकृती, प्रशस्तिपत्रके यांच्या गर्दीत गुदमरलेली कपाटे नसतात. भिंती मोकळ्या, बसायला खुर्च्याऐवजी चटया आणि कोणत्याही लक्षवेधी भडक वस्तूंचा अभाव. फक्त या अवकाशाचा अर्थ अधिक गडद करण्यासाठी हलकासा उंचवटा असणारा एक कोपरा व तिथं शाईनं चितारलेलं त्या त्या ऋतूचं दर्शन घडवणारं चित्र. चित्रासोबत काही कवितेच्या ओळी किंवा एखादी हायकू. 

या समृद्ध कोपऱ्याला ते ‘तोकोनोमा’ म्हणतात आणि घरी आलेल्या अतिथीला तोकोनोमाजवळची जागा बसायला देतात. तिथं काहीही न सांगता खूप सांगण्यातील अर्थगर्भ सूचकता आहे. अबोली हाच बोलीचा आविष्कार आहे. कमीतकमी आणि संयत संवादातला आनंद आहे. त्यातही हातात साकेच्या कपूकला (छोटा प्याला) किंवा बिनकानाचा चहाचा कप आला तर परमानंद. पंचेंद्रियांना हळुवार स्पर्श करणारा, बेधडक चेतवून टाकणारा नव्हे.  शांतता किंवा ‘लो व्हॅल्यू लाइफस्टाईल’ हा एकेकाळी भारतीय जीवनाचा कणा होता. ध्यान, मौन, चिंतन, योग, निर्वाण, निवृत्ती, आतला आवाज, वानप्रस्थ, संन्यास, स्थितप्रज्ञ या सगळ्या संज्ञा शांतीचे अर्थपूर्ण आयाम दर्शवतात. मनुष्यसंस्कृतीत वाणीचा प्रवेश होण्याआधी फक्त शांतीचा ध्वनी होता. शांती म्हणजे प्रकृती किंवा निसर्ग आणि आवाज म्हणजे संस्कृती. आता आवाजाची संस्कृती  कलकलाट करते आहे. आजच्या वृत्तपत्रात चीनमधील 17 वर्षांच्या युवकाने ‘आयफोन’ खरीदण्यासाठी आपला एक मूत्रपिंड विकल्याची खबर आहे. खुल्या अवकाशाची आणि नि:शब्दतेतील सौंदर्याची सरेआम कत्तल यांचा प्रारंभ झाला आहे. 

मला रात्र आवडते, कारण रात्रीचे स्वरूप अजूनही निसर्गाच्या म्हणजेच शांततेच्या जवळ आहे. दिवसाचा सगळा आवाज जर रात्रीही ऐकू येऊ लागला (आणि तो आता ऐकू येऊ लागलाय) तर जीवनाचे उरलेसुरले संतुलन नष्ट होईल. रात्रीला स्वत:चा ‘आवाज’ असतो, पण तो संपूर्ण नैसर्गिक असतो. दिवसाचा आवाज संस्कृतीला वाहिलेला असतो. मी दक्षिणेच्या ‘सायलेंट व्हॅली’त दोन रात्री घालवल्या, तेव्हा रात्रीचे व्यक्तिमत्त्व अनुभवले. रातकिड्यांचा आवाज, निर्झरांची खळखळ, झाडांच्या अंगाशी धसमुसळेपणा करणारा वारा, मध्येच त्यांची शीळ, पावसाच्या पानांवर पडणाऱ्या टपटपीतील वेगवेगळ्या छटा, खिडकीतून आत येणाऱ्या हवेत विरघळलेला जंगलांचा गंध... आणि या सगळ्यांना कवेत सामावून घेणारी ‘शांत’ दरी. अशा ठिकाणी लागणाऱ्या झोपेलाही एक गूढरम्य रंग असतो. 

माणसाच्या आजपर्यंतच्या विकासातील तिसऱ्या आणि महत्त्वाच्या वळणावर आपण आहोत. पहिल्या टप्प्यात तो निसर्गाचा भाग म्हणून अस्तित्वात होता. दुसऱ्या टप्प्यात तो निसर्गापासून वेगळा झाला, पण शेती करत करत तो निसर्गाशी सहअस्तित्व राखून होता. तिसऱ्या टप्प्यात क्रमाक्रमाने वैज्ञानिक क्रांती, औद्योगिक क्रांती, माहिती-तंत्रज्ञान क्रांती (याशिवाय हरित क्रांतीपासून धवल क्रांती वगैरे) या सर्व क्रांत्यांनी माणसाला निसर्गावरती मर्यादित का होईना अधिपत्य दिले. आता ‘निसर्गा’चा मृत्यू झालेला आहे आणि तो जर झालेला नसेल तर त्याचे जगणे-मरणे माणसावर अवलंबून आहे. क्रांत्या स्वभावानेच अधिक कार्यप्रवण असतात. त्या मानवी संस्कृतीच्या प्रतीक आहेत, निसर्गाच्या किंवा शांततेच्या नव्हेत. आज जगातील 90 टक्के झाडंझुडपं माणसं सक्रिय असणाऱ्या क्षेत्रात आहेत. हजारो वनस्पतींच्या प्राणी, पक्षी आणि जलचरांच्या जाती दर वर्षी नष्ट होताहेत. माणसाने स्वत:कडे आणि उरल्यासुरल्या निसर्गाकडे थोडं अंतर्मुख होऊन पाहिलं तर या विनाशाचं चित्र त्याला स्पष्ट दिसेल. अर्थात्‌ अंतर्मुख व्हायचं तर थोडं शांतही व्हावं लागेल. पण शांतता येणार कुठून? 

व्हाय धिस कोलावरी डी? हा गोंधळ कशासाठी म्हणून विचारणाऱ्या गाण्यालासुद्धा पहिल्या काही आठवड्यांत तीन कोटी लोकांनी ऐकले म्हणे! आपली डोकी आता ढगात आहेत असा निष्कर्ष ‘टाइम’ या साप्ताहिकाने 12 मार्चच्या अंकात काढला आहे. कारण दररोज सर्वसाधारण ‘अमेरिकन’ व्यक्ती बारा तास माहिती शोषून घेण्यात घालवते, साधारण एक लाख शब्द आणि 34 गिगाबाईट्‌स दूरची माहिती त्यांचा मेंदू खातो. आपणही याच संस्कृतीच्या मागे लागलो आहोत. ‘टाइम’च्या या अंकातील तीन निष्कर्ष मनोज्ञ आहेत. पहिला- माणूस वाढत्या गतीनं स्मरणाचं आणि माहिती जपण्याचं काम सर्व इंजिन्‌स आणि स्मार्ट फोनवर सोपवतो. दुसरा- जेव्हा आपल्याला माहिती अशा प्रकारे कुठंतरी (स्मार्ट फोन वगैरेंवर) उपलब्ध आहे याची खात्री असते तेव्हा ती चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवू शकत नाही. तिसरा- माहिती हवी तेव्हा मिळेल अशी खात्री असते तेव्हा त्या माहितीपेक्षा ती कुठे ठेवलीय (डिस्क, मेरी चिप) एवढे लक्षात ठेवण्याकडे कल असतो. माणसाला आता स्वत:ला ‘चार्ज्‌ड’ ठेवण्याऐवजी स्मार्टफोन चार्जड ठेवणं महत्त्वाचं वाटतंय. माणसाचं मन सुपरमाइंड होण्याच्या प्रक्रियेत आहे. निसर्गापासून संपूर्णपणे वेगळे होत असल्याची ही तुतारी आहे. 

अनादी कालापासून लोक मन:शांतीसाठी हिमालयात जातात. पण ते देवाच्या शोधात नव्हे, दिव्याच्या शोधात. बुद्ध अनेक वर्षे चिंतनात दूरवर गेला. तिथं त्याला जीवनाची दृष्टी मिळाली. माणसं समुद्रकिनाऱ्यावर तासन्‌तास बसतात, गिरि-बंदरात विश्रांतीसाठी जातात, वाळवंटातील वाळूत तंबू टाकून चांदण्याखाली रात्र घालवतात. सगळ्यांचा उद्देश एकच असतो मौनाची पाखरं शोधणं. काही काळासाठी ‘निष्क्रिय’, ‘निष्काम’ होणं. स्वत: आणि निसर्ग यांच्या संबंधांचं जाळं तपासणं. ब्रह्म अनुभवणं. मौनातील पाखरांचं वनगीत शोधणं. 

हा अवकाश श्वासोच्छ्‌वासाइतकाच माणसाला आवश्यक आहे. मालदीवमधली पर्यटन रिसॉर्टस्‌ स्वत:ची जाहिरात करताना ‘काहीही न करण्याची कला विकसित करण्याची संधी’ देऊ करतात (त्यासाठी एका रात्रीचे हजार-बाराशे डॉलर्स घेतात), पण एकही पैसा खर्च न करता मला गावात ही कला साध्य झाली आहे. आमच्यात शब्दांच्या अडथळ्यांशिवाय संवाद सुरू असतो. सगळे गावकरी आपापल्या घरी जातात तेव्हा, मी आणि आई दोघेच असताना या संवादाचा परमानंद अनुभवतो. ती भाजी निवडत असते, मी पुस्तक वाचत असतो किंवा तात्यांच्या हस्तलिखितांकडे नव्याने बघत असतो. बोलण्याचा, सांगण्याचा अट्टाहास नसतो. मधूनच ती ‘पोरास्नी जरा हिकडं यिवून जायला सांग की रे’, ‘पोरगा आता कुठल्या वर्साला हाय?’, ‘तिकडं लई दिवस झालं, आता दिल्लीकडं जवळ ये’ असं एखादं वाक्य स्वत:शीच बोलत असल्यासारखं बोलते. मीही ‘हां’, ‘ना’ असं काहीतरी बोलतो किंवा तिच्याकडे पाहून फक्त मंद स्मित करतो. आमच्या दोघांधली नाळ कधीच तुटणार नाही याची ती ग्वाही असते. गंमत म्हणजे साधनालाही या शांततेतील सौंदर्य आणि नि:शब्दतेतील शब्दार्थ हळूहळू कळू लागलेत! 

Tags: शांततेतील संवाद जीवनानुभव संस्कृती आवाज निसर्ग प्रकृती शांती जीवनशैली अल्पस्वल्प जपानी संकल्पना तोकोनामा मौनराग संवाद चर्चामंच ग्रामीण जीवनशैली मौनातील संवाद आयुष्याचे धडे ज्ञानेश्वर मुळे. उच्चायुक्त मौनात पाखरांचे वनगीत शोधताना कथानिबंध ५ low volume lifestyle Japanese concept Tokonama Silent Communication Communication Villagers Village life communication in silence Dnyaneshwar Mulay Mounat Pakhranche Vangeet Shodhatana Life experience Kathanibandh5 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके