डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'तुमच्याबद्दलचा आदर, गोरक्षकरांचा दृढ निर्धार व भारताचा सन्मान राखायचा म्हणून आम्ही गोरक्षकरांचे म्हणणे मान्य करायचे ठरवले आहे...' मी उठलो आणि याझाकीला मिठी मारली. का कुणास ठाऊक उत्स्फूर्तपणे रडू लागलो. याझाकी आणि ओहता दोघांनाही भरून आले होते. माझ्या जपानी प्रवासातला टप्पा सर्वार्थाने सार्थ झाला होता. तो क्षण म्हणजे माझ्या जीवनातील जपाननाट्याच्या पहिल्या अंकाची प्रतीकात्मक समाप्ती होती.

काही महिन्यांनी उत्सवाची सांगता झाली. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे संयोजन करणाऱ्या जपानी संस्थांनी टोकियोतील पंचतारांकित हॉटेलात माझा प्रचंड निरोपसमारंभ आयोजित केला. विदेशी लोकांनी माझ्यासाठी केलेला तो सगळ्यांत शानदार कार्यक्रम होता. पण कार्यक्रमाला राजदूतांना मुद्दाम बोलावण्यात आले नव्हते. कारण कार्यक्रमाची शान त्यांनी पाहिली असती तर, तसा कार्यक्रम आयोजकांना त्यांच्यासाठीही आयोजित करावा लागला असता. पण कार्यक्रम फक्त पैशाच्या जोरावर होत नाही. लोकांच्या भावना त्यांना जेव्हा प्रेमाने एकत्र आणतात, तेव्हा वातावरणातले चैतन्य पैशाने येऊ शकत नाही. माझ्या दृष्टीने तो कार्यक्रम फारच मोलाचा होता. माझ्या वास्तव्यात मी माझ्या वागणुकीने व कामाने या लोकांची मने जिंकली होती, याची ती पोच होती. अनेक भाषणे झाली आणि मग मीही थोडा भावविवश होऊन बोललो. भाषणाच्या शेवटी 'मात्सुरीनो साइगोनो ही' (उत्सवाचा शेवटचा दिवस) ही मी जपानी भाषेत लिहिलेली माझी कविता वाचून दाखवली. मी आणि तेथे जमलेले सगळे जपानी- सगळ्यांच्याच डोळ्यांतून पाणी वाहू लागले.

या कवितेत एकंदरीतच जपानमधला भारत महोत्सव माझ्या दृष्टीने काय होता, याचे एक सहजसुंदर चित्र मी उभे केले. या महोत्सवाचे काम मी एक सरकारी नोकर म्हणून केले नाही; तर दोन देशांना जवळ आणण्याची कामगिरी करण्याची संधी मिळालेला माणूस म्हणून केले. माझ्या जपानी वास्तव्यात मला मिळालेल्या प्रचंड प्रेमाला दाद द्यायची संधी म्हणून मी हे काम केले. काम करताना कधी त्रासलो नाही. स्वतःची सगळी शक्ती पणाला लावून मी काम केले. ते प्रेमाने केले म्हणून मी ते काम चांगले केले. त्या कवितेचा हा मराठी अनुवाद.

"उत्सवाचा अखेरचा दिवस 
अत्सुगीपासून योनागुनीपर्यंत. 
अवाशिरीपासून कुमामोतोपर्यंत एक 
महोत्सव
उत्सवाचा शेवटचा दिवस. 
केलुचरण आणि बिरजूचे नृत्य 
अगम्य अतींद्रिय असा उत्सव सर्वगामी 
उत्सवाचा अखेरचा दिवस. 
झाकिरच्या तबल्याचा नाद 
भीमसेनच्या मयूरपंखी आवाजाचे 
इंद्रधनुष्य
शिवाय सादो बेटांच्या सूर्योदयात 
स्नान करणारी मिथिलेची भित्तीचित्रे 
संपूर्ण जपान झाला आहे एक भव्य 
कॅनव्हास
त्यावर भारत महोत्सवाचा एकमेव रंग
उत्सवाचा अखेरचा दिवस 
सप्पोरोत राजवस्त्रांचा महोत्सव 
इकेबुकुरोत रवींद्रनाथांचा उत्सव 
सेंदाइमध्ये पारंपरिक नृत्योत्सव 
जपानचा नकाशा एक नवा अर्थ घेऊन 
उभा आहे
महोत्सवाचा शेवटचा दिवस. 
सेतागायाच्या भूमीत उगवले 
आदिवासींच्या हातातील गूढ शिल्प 
कलागृहातील भिंतींनाही ओळखू येतात 
कलाकाराच्या मायाळू सावल्या 
कोमावातील लोककलांचे दर्शन 
माचिदातील आधुनिक कलांचा 
विलोभनीय पिसारा
निप्पोनच्या प्रत्येक साकुरात विलसते 
आहे 
बुद्धाचे मंदस्मित
महोत्सवाचा शेवटचा क्षण. 
बासरी आणि शाकुहाची 
जपानी बिवा आणि भारतीय सितार 
एका नव्या महापर्वाचा प्रारंभ 
पुन्हा त्या नव्या उत्सवात दर्शन 
होईपर्यंत
महोत्सवाचा हा शेवटचा दिवस..."

त्या कवितेने सगळे भारावून गेले. शब्द केवढे प्रभावी असतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. जपानी, मराठी, भारतीय या शब्दांचे अलग अलग अर्थ विलग पावले आणि माणूस म्हणून आम्ही एकमेकांना प्रेमालिंगन दिले. जपानमधल्या वास्तव्याचे तसेच भारतीय महोत्सवाच्या कामाचे माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून सार्थक झाले होते. विदेशातील माझ्या पहिल्या वास्तव्याला मी पूर्ण न्याय दिला होता. आणखी आठ-पंधरा दिवसांत मला भारतात परतणे आवश्यक होते. मी समाधानाने परतत होतो.

पण एक छोटीशी बाब माझ्या मनाला दुसण्या देत होती. गोरक्षकरांच्या आणि योमिउरी शिंबुनमधल्या विवादाची सोडवणूक झाली नव्हती. ती झाली असती तर मी पूर्णपणे आनंदाने स्वदेशी परतलो असतो. हा महत्त्वाचा पेच आपण मागे सोडून जाणार हे माझ्या मनाला थोडेफार सलत होते. पण आयुष्यात प्रत्येक कोडे नेहमी ठरलेल्या वेळात सुटतेच असे नाही. 'आपण आपले काम केले, आता पुढच्या अधिकाऱ्यांनी राहिलेले काम करावे, नाही का?' असे मी स्वतःला समजावले.

दुसऱ्या दिवशी मी कार्यालयातील कामाची आवराआवर करायला गेलो. अनावश्यक कागद फाडून टाकले. आवश्यक कागदांची वेगवेगळी फोल्डर्स बनवली, उत्सवाच्या कामाचा तपशीलवार अहवाल बनवला. दुपारचे जेवण कार्यालयातच करून खुर्चीवर पुन्हा बसलो. अचानक एक अजब थकावट शरीरावर तशीच मनावर पसरली. अडीच-तीन वर्षांच्या कामाची ती थकावट होती. मी डोळे मिटले. असे वाटले की आता लवकर भारतात परतायला हवे. येथील या वेळेपुरते सगळे संपले. आता इथे फार काळ यांबण्यात अर्थ नाही.

ट्रिंग ट्रिंग. फोन वाजला. फोन उचलण्याची इच्छाच नव्हती. 

हँलो' मी थोड्याश्या अनिच्छेनेच बोललो.

'मोशी मोशी (हॅलो) मी योमिडरी शिंबुनचा याझाकी बोलतोय. तुम्हाला ताबडतोब भेटण्याची आमची इच्छा आहे.’

खरं तर निरोप समारंभानंतर कुणालाही भेटण्याची मला गरज, उत्सुकता, इच्छा नव्हती. भारत महोत्सवाच्या कामाची मी माझ्या मनात सांगता करून टाकली होती.

‘कशाबद्दल बोलायचंय बरं?' मी विचारलं. माझ्या नजरेसमोर तासन्तास चालूनही कोणत्याही दिशेनं न जाणाऱ्या योमिडरी शिंबुन व गोरक्षकर यांच्यातल्या वाटाघाटी होत्या. मला पुन्हा त्यात पडायचं नव्हतं.

‘अहो त्या आपल्या विवादाबद्दल... कालच्या निरोप समारंभानंतर मी ओहतासान (विभागप्रमुख) व व्यवस्थापनात पुन्हा चर्चा केली…’

‘मला माहीत आहे. पण आता चर्चा पुरे झाल्या. यांतून काही निष्पन्न होत नाही. मला पुन्हा-पुन्हा त्याच गोष्टींचा काथ्याकूट कातून थकवा आला आहे. भेटून फारसा फायदा होणार नसेल तर अशी भेट व्यर्थ आहे...' मी स्पष्ट व निर्वाणीचे बोललो.

‘नाही नाही, तसे नाही... मुरेसान फक्त दहा मिनिटे द्या. तुम्हांला पश्चात्ताप होणार नाही.' याझाकीसान म्हणाला.

‘ठीक आहे तर. आता अर्ध्या तासात या. त्यानंतर मला बाहेर जायचंय. मी बोललो. मला आता सगळे आटोपते घ्यायचे होते.

‘आम्ही पंधरा मिनिटांतच येतो..' पंधरा मिनिटांत श्री.याझाकी व त्याचे बॉस श्री.ओहता आले. औपचारिक ‘कसे काय' झाल्यानंतर मी सरळ मुद्याला हात घातला.

“बोला काय प्रस्ताव आहे तुमचा...?" काल रात्रीच्या निरोप समारंभानंतर आमची व्यवस्थापनाबरोबर पुन्हा चर्चा झाली. या उत्सवात तुम्ही घेतलेला रस व दाखवलेला उत्साह आम्ही अनुभवला आहे. विशेषतः काल रात्रीचे तुमचे भाषण ऐकून आम्ही सगळे खूपच भारावून गेलो...' तो स्पष्टीकरण देत होता.

‘कामाचं काय ते बोला' मी मध्येच म्हणालो. जपान्यांचे नमनालाच घडाभर तेल नेहमीचेच असायचे म्हणून मी बोललो.

तेच सांगतोय. रात्रीच्या तुमच्या भाषणानं सगळा भारत महोत्सव किती व्यवस्थित पार पडला हे आमच्या लक्षात आलं. त्याबरोबरच हेही लक्षात आलं की आमचा-तुमचा नुकसान भरपाईचा विवाद मात्र संपलेला नाही. हे एका अर्थानं उत्सवाला लागलेलं गालबोट आहे...'

'पुढं...?" मी उतावळेपणानं विचारलं.

'तुमच्याबद्दलचा आदर, गोरक्षकरांचा हृढ़ निर्धार व भारताचा सन्मान राखायचा म्हणून आम्ही गोरक्षकरांचे म्हणणे मान्य करायचे ठरवले आहे…’

‘काय सांगताय काय? मी हर्षभरीत होऊन उदगारलो.

"होय. आम्ही गोरक्षकरांनी सुचवलेली नुकसानभरपाई देऊ. आम्हाला शेवटचा प्रलंबित मुद्दा तुमच्या विषय सूचीतून हटवायचा आहे.
मी उठलो आणि याझाकीला मिठी मारली. का कुणास ठाऊक, उत्स्फूर्तपणे रडू लागलो. याझाकी आणि ओहता दोघांनाही भरून आले होते. माझ्या जपानी प्रवासातला टप्पा सर्वार्थाने सार्थ झाला होता. तो क्षण म्हणजे माझ्या जीवनातील जपाननाट्याच्या पहिल्या अंकाची प्रतीकात्मक समाप्ती होती. 

(क्रमशः)

Tags: गोहत्या गोरक्षक जपान Travel Yazaki Japan Cow Slaughter Cow weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके