डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सर त्यांच्या घरगुती शर्टात आणि पांढऱ्या विजारीत बाहेर आले. आम्ही सरांची वेळ न घेताच आलो होतो. आम्हा दोघांकडे बघत ते म्हणाले. ‘आला का ग्यानबा पांडुरंगाला भेटायला? आणि विकासराव, कोल्हापूर काय म्हणतंय?’ आम्ही जुजबी हसलो. सरांनी मग दिवसभरातल्या गोष्टी सांगितल्या. ते वाचत असलेल्या कृष्णमूर्तींच्या पुस्तकाविषयी बोलले. कोल्हापूरच्या काही आठवणींची पुनरुक्ती केली. मुख्यमंत्री बाबासाहेब भोसल्यांविषयीचे काही किस्से सांगितले. आम्हीही त्यांना नेहमीप्रमाणे साथ देण्याचा प्रयत्न केला. पण आमचं मन त्यात फारसं नव्हतं. सरांनी स्वत: होऊन ‘तुमच्या मुलाखती केव्हा आहेत’ असं विचारलं असतं तर बरं झालं असतं. बाळासाहेब घेवारेंकडून ती बातमी आम्ही सरांकडे पोहोचवली होती. पण सरांनी तो विषयच काढला नाही. 

(गेली 25 वर्षे भारतीय विदेश सेवेत कार्यरत असलेले ज्ञानेश्वर मुळे सध्या ‘मालदीव’मध्ये भारताचे उच्चायुक्त आहेत. त्यांचे ‘नोकरशाईचे रंग’ हे सदर पाच वर्षांपूर्वी ‘साधना’तून प्रसिद्ध होत होते, नंतर त्याचे पुस्तकही साधना प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध झाले आहे. त्यांचे ‘कथानिबंध’ हे सदर पुढील वर्षभर महिन्यातून दोन वेळा प्रसिद्ध होईल.)

मी आणि विकास (काल्पनिक नाव) सोफ्याच्या अगदी किनाऱ्यावर बसलो होतो. मनावर असा दबाव होता की, पायाच्या टाचा उंचावून ठेवल्या होत्या आणि अकारण शरीर आणि मन दोन्ही अस्वस्थ झालं होतं. आम्ही त्या घरात पूर्वी अनेकदा गेलो होतो. एक-दोन वेळा मुक्कामही केला होता, पण आज एका खास कामानिमित्त आलो होतो. खरं तर आम्हांला आशीर्वाद मागायचे होते आणि ‘कृपाप्रसाद’ घ्यायचा होता. आमच्या नाडीचे ठोके वाढले होते. छाती धडधडत होती. काहीतरी मागायचं असतं तेव्हा संकोच, दडपण, भीती सगळ्यांचंच एक अजब रसायन मनात, शरीरात संचार करतं. एरवी बाजारात, दुकानात आपण वस्तू मागायला जातो तेव्हा असं दडपण येत नाही, कारण तिथे वस्तूंची किंमत आपण चुकती करत असतो. ती खरेदी-विक्री असते, एक व्यवहार असतो. पण माणूस जेव्हा फक्त मागायला जातो तेव्हा मामला गंभीर असतो. सगळं देणाऱ्यावर अवलंबून असतं.

ज्या व्यक्तीचे ‘आशीर्वाद’ मागायला आलो होतो, तिला मी बरीच वर्षं ओळखत होतो. अगदी पहिल्यांदा मी त्यांना कोल्हापूरला पाहिलं. आम्ही आठवी-नववीत असताना ते शाळेत आले होते. ते सातारच्या कुठल्याशा महाविद्यालयाचे प्राचार्य होते. रयत शिक्षण संस्थेत ते शिकवत होते. मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेले ते पहिले (आणि कदाचित शेवटचे) बॅरिस्टर. त्यावेळेस कोल्हापुरात बॅरिस्टर खर्डेकरांचं नाव ऐकलं होतं. त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेविषयी आणि अकाली मृत्यूविषयी ऐकून कुतूहल जागृत झालं होतं. गांधी आणि आंबेडकर ही आमची आदराची स्थानंही बॅरिस्टर होती. थोडक्यात ‘बॅरिस्टर’ या शब्दाभोवती एक ‘इंग्रजी विदेशी कर्तबगार’ असं वलय होतं. तेव्हा या भेटीला आलेल्या बॅरिस्टरांविषयी मला त्या वयातही एक औत्सुक्य आणि आदर होता. वर्ग सुरू असताना ते मध्येच आले होते आणि थोड्याशा परिचयानंतर ते बोलू लागले. त्यांची शरीरयष्टी सडपातळ आणि काठीसारखी ताठ. केस छानपैकी मागे घेतलेले. खोल बोलके डोळे. दाढी- मिशा साफ, गोरेपान.

ते काय बोलले हे आता आठवत नाही, पण त्यांचं बोलणं सरळसाधं होतं. त्यांनी कर्मवीर भाऊरावांचं नाव घेतलं. अभ्यास करा वगैरे सांगितलं. याशिवाय वसतिगृहातील संडास स्वच्छ ठेवा असंही ते म्हणाले. शिवाय आपापल्या ट्रंका, त्यांतल्या वस्तू, व्यवस्थित व जिथल्या तिथे असल्या पाहिजेत, गंजीफ्रॉक, शर्ट, पँट सगळं स्वच्छ असलं पाहिजे असा उपदेशही केला. वाचनाचं महत्त्व सांगितलं. मला त्या सगळ्या गोष्टी पटल्या, कारण मी थोडाफार गबाळा होतो. अधिक टापटिपीनं राहायला हवं असं वाटायचं, पण जमायचं नाही. वाचन मला आवडायचं पण त्यांनीही ते सांगितल्यानं मला छान वाटलं. संडास स्वच्छ ठेवा सांगणारे ते पहिले व शेवटचे वक्ते होते. त्या काळात बुट्‌ट्यांचे संडास होते आणि शाळेतील नियमाप्रमाणे आठवड्यातून एकदा ते प्रत्येकाला साफ करावे लागत. पण त्यांचा वास फार त्रासदायक होता. त्यामुळे संडास स्वच्छ ठेवा असं ते म्हणाले तेव्हा आम्ही सगळेच खो खो हसलो.

ते वक्ते आणि त्यांचं नाव माझ्या सदैव लक्षात राहिलं. विशेष म्हणजे मी अकरावीला असतानाच त्यांची शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. त्याच वर्षी अकरावीच्या परीक्षेत संस्कृतमधली शंकरशेठ शिष्यवृत्ती मला मिळाली. महाराष्ट्राचं सत्कारांचं वेड कोल्हापुरात प्रकर्षाने फोफावलं आहे. शिवाय कोल्हापूरच्या या नव्या कुलगुरूंना सार्वजनिक सभांची आणि भाषणांची अतिशय आवड. त्यांच्या हस्ते विविध संस्थांमार्फत माझे आठ-दहा तरी सत्कार झाले असतील. या सत्कारसमारंभामुळं आमची ओळख तोंड-ओळखीच्या पुढं गेली.

मी कोल्हापूरलाच शहाजी कॉलेजात प्रवेश घेतला. तिथंही काही कार्यक्रमानिमित्त ते आले. पुन्हा सत्कार, हारतुरे, स्वागत, आभार आणि त्यांची भाषणं. आता मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची बऱ्यापैकी ओळख झाली होती. ते साधे होते. कुलगुरूंच्या पदाची गुर्मी नव्हती. त्यांच्या आधी आप्पासाहेब पवार हे विद्यापीठाच्या स्थापनेपासून बरीच वर्षं कुलगुरू होते. आप्पासाहेबांनी विद्यापीठाची घडी बसवली. स्थापनेपासून तेच एकमेव कुलगुरू. त्यांचा सर्वत्र प्रचंड दबदबा. प्रशासनातील त्यांची कुशलता हा आदराचा विषय होता. जनतेतील त्यांचं मिसळणं मर्यादित होतं. नव्या कुलगुरूंची कार्यशैलीच वेगळी होती. ते सर्वांत आनंदाने मिसळत. बोलत. भाषण देत. ते खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे कुलगुरू होते. सर्वांनाच त्यांच्याविषयी जवळीक वाटत होती. अगदी मलाही.

या जवळिकीमुळे माझ्या मनात एक विचार आला. कुलगुरूंना आपल्या गावी न्यायचं. कॉलेजला कोल्हापुरात असलो तरी गावाशी माझा स्नेह टिकून होता. गावातल्या तीन-चार संस्थांच्या संस्थापनात माझ्या वडिलांचा सहभाग होता. वाचनालय, क्रीडा मंडळ, हायस्कूल आणि सहकारी सोसायटी. मलाही त्यामुळे सार्वजनिक कार्याची थोडीफार आवड निर्माण झाली. कॉलेज सांभाळून मी थोडंफार काम गावात करीत होतो. वेगवेगळ्या लोकांची व्याख्यानं मी गावात आयोजित करत असे. यांतली अनेक व्याख्यानं आमच्या घरासमोरच्या चौकातच होत. मला वाटलं आपण या नव्या कुलगुरूंना व्याख्यानासाठी गावी न्यावं. विचार मनात आला तरी कुलगुरूंना भेटायला जायचं या कल्पनेनं मन थोडं घाबरलं. मी अशोक भोईटे या मित्राची मदत घ्यायचं ठरवलं. अशोक भोईटे ही व्यक्ती नसून संस्था होती. (अजूनही आहे) तो ‘परिसर अभियांत्रिकी’ या नावाच्या महाराष्ट्र शासनाच्या कार्यालयात काम करत असे, कारकून म्हणून. पण कार्यालयात कधीही न जाण्यासाठी तो प्रसिद्ध होता. त्याच्याकडे पगारपत्रक बनवायचं आणि पगार द्यायचं काम होतं. महिन्याच्या शेवटच्या एक-दोन दिवसांत गरज वाटली तर चोवीस तास बसून पगारपत्रकं बनवायचा आणि मग ट्रेजरीतून आणलेला पगार वाटायचा. कधीकधी पगाराला उशीरही व्हायचा. पण कुणीही तक्रार करत नसे. याचं कारण लग्न, मृत्यू, अपघात, जन्म, आजारपण, वास्तुशांत, मुंज आणि इतर कोणत्याही चांगल्या किंवा वाईट अशा काळात जेव्हा जेव्हा ज्याला ज्याला गरज असे तिथं अशोक पोहोचत असे. कोल्हापुरात त्याला न ओळखणारं असं कुणीच नव्हतं.

अशोकला मी सांगितलं, ‘आपल्याला कुलगुरूंना आमच्या लाट या गावी न्यायचंय भाषणासाठी.’ तो म्हणाला, ‘तुझं कॉलेज संपलं की जेवण करून निघू या त्यांना भेटायला.’ चार वाजता विद्यापीठातील कुलगुरूंच्या चेंबरच्या दिशेने निघालो. विद्यापीठात पोहोचताच अशोकच्या मित्रांनी स्वागत केलं आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय कुलगुरूंच्या प्रशस्त कार्यालयात प्रवेश केला. अशोकचा त्यांचा परिचय होता, पण माझाही थोडाफार होता. आमचं स्वागत कुलगुरूंनी अत्यंत दिलखुलास हास्याने केलं. आम्ही आमचं काम सांगितलं. ते आनंदाने तयार झाले. त्यांनी सचिवांना बोलावलं, दैनंदिनी पाहायला सांगितली. तारीख ठरवली. झालं पाचच मिनिटात आमचं काम झाले. असे कुलगुरू किंवा वरिष्ठ पदावरील व्यक्ती आज पृथ्वीतलावर नसतील. कोणती संस्था? काय कार्यक्रम? आणखी कोण कोण असतील? पत्र लिहून विनंती पाठवा, आम्ही उत्तर पाठवतो; सेक्रेटरींना आठ दिवसांनी येऊन भेटा. या सर्वांपैकी काही म्हणजे काही नाही. केवळ दोन-चार वाक्यांत मी कार्यक्रमाचं स्वरूप सांगितलं. बस्स! त्यांनी लगेच होकार दिला. स्वत:च्या गाडीने येतो म्हणून सांगितलं.

आम्ही एक परिसंवाद आयोजित केला. आमच्याच गावातल्या तीन सज्जनांचा सत्कार आणि सरांचं भाषण. त्यांतील पहिले सज्जन गावातले पहिले एम.डी.- डॉ.पी.जे.बडबडे, दुसरे गावात पहिल्यांदा डॉक्टरेट मिळवणारे डॉ.शिवराम माळी आणि तिसरे धृपद गायनात पारंगत आणि कित्येक दशकं गावात राहूनच गायकी करणारे गणेश दांडेकर. सर आले. आमच्या घरी पाटावर बसून साधं जेवण आनंदाने जेवले आणि रात्री दहाला कार्यक्रम सुरू झाला. इतर सगळी भाषणं झाल्यानंतर सरांनी अकराला भाषण सुरू केलं आणि तब्बल दोन तास बोलून एक वाजता संपवलं. दोन-तीन हजार लोकांनी आमचा चौक भरला होता. थंडी खूप होती, तरीही पुरुष किंवा स्त्रिया यांतील कुणीही जागा सोडून हललं नाही. साधी भाषा, खणखणीत आवाज, विनोदांचं कारंजं, अनौपचारिक शैली, आविर्भाव खास त्यांचं असं. ते भाषण नव्हतं, ती मैफल होती. आम्ही सगळे गावकरी तृप्त झालो. त्या भाषणातील अनेक तपशील मला आजही आठवतात. कौलापूर या त्यांच्या गावातून कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांना आपल्या खांद्यावर उचलून कसं घेतलं आणि मग ते तरातरा कसे चालू लागले याचे वर्णन, विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा संप किती हळुवारपणे पण व्यवस्थित सोडवला याचं वर्णन, सुती पाटलांनी स्वत:च्या हातांनी विणून त्या दिवशी त्यांना घालायला दिलेल्या स्वेटरविषयी पुन्हा पुन्हा त्यांनी व्यक्त केलेली आत्मीयता, आमच्या गावातल्या सत्कारमूर्तींचा त्यांनी मनापासून केलेला शब्दगौरव. हा सामान्यातल्या सामान्यांसाठी आणि ‘सामान्यमान्य’ असा बॅरिस्टर आणि कुलगुरू होता. भाषण करताना आणि एरवीही दिसणारा त्यांचा महत्त्वाचा गुण म्हणजे बालकासारखी निरागसता आणि निर्झरासारखं खळाळून हसणं.

त्यानंतर आमचा संपर्क वाढला. मैत्री झाली असं म्हणणं धाडसाचं होईल, पण ते नातं मैत्रीसारखंच होतं. माणूस कोणताही आडपडदा न ठेवता, न दडवता, मोकळेपणानं बोलतो ती मैत्रीच असते. पुन्हा एकदा मी त्यांना गावी नेलं. यावेळी आम्ही ‘आम्ही कुठे जात आहोत?’ अशा शीर्षकाचा परिसंवाद ठेवला. कॉलेजविश्वात नामवंत असलेले कोल्हापूर व सभोवतालच्या परिसरातील विजय देसाई, विश्वास पाटील, विलास पाटील, भूषण गगरानी, मंगला पाटील-वाळकीकर अशी आमची फौजच होती. प्रत्येकाला एकेक विषय दिला होता. कुणी साहित्यावर, कुणी युवकांवर, कुणी शेतीवर तर कुणी चित्रपट सृष्टीवर. आमच्या गावच्या लाट सोसायटीच्या वतीने आम्ही तो सोहळा आयोजित केला होता. रात्री उशीरापर्यंत शाळेच्या पटांगणात चाललेला तो परिसंवाद खूप रंगला होता. गावकऱ्यांनी मनसोक्त त्याचा आनंद लुटला. आमची प्रत्येकाची भाषणं आणि त्यानंतर सरांच्या भाषणाचा राजमुकुट. त्यांच्या भाषणातून विनोद भरभरून वाहायचा. अनेक जुने-नवे किस्से असायचे. शिवाय एका विषयातून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे आणि तिसऱ्या विषयातून चौथ्या विषयात जाऊनही ते पहिल्या विषयाकडे परत येत. श्रोत्यांमध्ये कुणी काही वेगळं केलं, बोललं किंवा आवाज काढले की लगेच त्यांच्या चष्म्यातील मिष्किल डोळे त्याची नोंद घेत. मग त्यावरही ते काहीतरी टिप्पणी करत. सगळीकडे हशा पिके. संपूर्ण चेहरा नव्हे तर संपूर्ण शरीरच त्यांच्या भाषणात पूर्ण सहभागी असे. नाट्यमयता आणि गावरान शिव्यांची ‘सुसंस्कृत’ पखरणही त्यांच्या भाषणात वारंवार दिसे. कार्यक्रम संपल्यानंतर मात्र सगळे खूष होऊन जात. त्यांच्या भाषणात प्रबोधन आणि मनोरंजनाचा अभूतपूर्व संगम होता. सत्तर-ऐंशीच्या दशकात परिवर्तन चळवळीचा आजच्यासारखा विचका झालेला नव्हता. पण त्याचबरोबर युद्धरेषा अत्यंत आखीव-रेखीव होत्या. ब्राह्मण- ब्राह्मणेतर चळवळ अजून जिवंत होती, पण त्यामुळे अनेक भाषणांत कडवटपणा जाणवायचा. सरांच्या सर्वसमावेशक वृत्तीमुळे त्यांच्या भाषणात अशी कटुता कधीच जाणवायची नाही. त्यांच्या मित्रपरिवारात सर्व जातिपंथांचे लोक होते. त्यांच्या चालण्या-बोलण्यात सहिष्णुता भरून वाहात असे.

सरांची मी इतकी भाषणं ऐकली की सरांच्या सगळ्या लकबी मला पाठ झाल्या व आजही आठवतात. कोणते किस्से त्यांनी कितीदा कुठं कुठं सांगितले याची आम्ही मित्रमंडळी गंमतही करत असू. इतरांची भाषणं ऐकताना ते लक्षपूर्वक एका हातावर डोकं टेकून, कधी डोळ्यांच्या भुवया उचलून तर कधी डोळे मिटून ऐकत असत. कधी पूर्णपणे पुढे रेलून कुठंतरी खोल डोहात डोकावून पाहात आहोत असा त्यांचा आविर्भाव असे. कर्मवीरांनी त्यांना कसं उचललं आणि ते कसे झपाझप चालू लागले याचं वर्णन तर आम्हांला तोंडपाठ होतं.

माझा आणि विकासचा सरांशी चांगला संबंध आला तो अशा कार्यक्रमांमुळे. पण यात अचानक व्यत्यय आला. त्यांना कुलगुरू म्हणून अपेक्षित असलेली मुदतवाढ मिळाली नाही आणि प्राचार्य भणगेंची कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. सरांना नेमका कुणी दगा दिला यावरची चर्चा अनेकदा ऐकली. सर स्वत: काय काय झालं, याचं साग्रसंगीत वर्णन करत असत. खरं तर अशा गोष्टी घडत असतात, पण एका बाजूला मुदतवाढ मिळणार असं, पक्कं आश्वासन तर दुसरीकडे सरांचा संवेदनशील स्वभाव. सरांचा अपेक्षाभंग आम्हांला स्पष्ट दिसला. स्थापनेपासून कित्येक वर्षं कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी आप्पासाहेबांना मिळाली, पण सरांना फक्त एकच कार्यकाळ, हे समजण्यासारखं नव्हतं. सरांचा अपेक्षाभंग आम्हांला स्पष्ट दिसला. सरांचा कार्यकालही उत्तम पार पडला होता. आम्ही सरांच्या निरोपसमारंभाच्या भाषणमालिकेत हजेरी लावून आमचं दु:खही मनापासून दर्शवीत होतो, पण ताटातूट ठरली होती.

पण ती कायमची नव्हती. मी पदवीपरीक्षा संपवून पदव्युत्तर परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यानंतर वर्ष दीड वर्षांत अनपेक्षित बातमी वाचली. ‘सरांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून नेणूक’. सर मुंबईला आले याचा प्रचंड आनंद होताच, पण त्यातल्या त्यात इतर कुठे नियुक्ती व्हायच्या ऐवजी या आयोगात ते सदस्य म्हणून आले याचाही अतिशय आनंद झाला. मी मुंबईला यायचं मुख्य कारणच लोकसेवा आयोग होतं. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि त्याआधी चढायला तुलनेने सोपी अशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पायरी मनात ठेवूनच मुंबईत पाऊल ठेवलं होतं. मी अनेकदा महात्मा गांधी मार्गावरील बँक ऑफ इंडिया इमारतीतील लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात भेट दिली होती. त्या काळात सुरक्षेचा आजच्यासारखा बाऊ नव्हता. त्यामुळे इमारतीत सहज प्रवेश करता येत असे. तिथला छोटा नोटीस बोर्ड, सचिवांचे व अध्यक्षांचे चेंबर, सदस्यांची कार्यालयं हे सगळं पाहताना भांबावून जात होतो, पण त्या सगळ्या भांबावण्यात एक छान रोमान्स होता. आपले आयुष्य घडवण्यात त्या इमारतीचा वाटा असणार अशी भावना उराशी असे. त्या रस्त्यावरून जाताना बसमधून वाकून त्या इमारतीकडे पाहिलं नाही असं कधीच झालं नाही. कुणीतरी तिथं ओळखीचं असावं असं वाटायचं. तिथं स्वागतकक्षात हेमा सावंत होत्या. त्यांचा चेहरा सरकारी कार्यालयातील नेहमी दिसणाऱ्या स्वागत अधिकाऱ्यांच्या तुलनेनं खूप हसरा होता. मीही हसत हसत त्यांची ओळख वाढवली. नंतर तर आमच्या पदव्युत्तर संस्थेच्या एका माजी विद्यार्थिनीची ती वन्सं निघाली आणि ती ओळख अधिकच दृढ झाली. ‘डेप्युटी कलेक्टरच्या जागा केव्हा निघतील?’ हा एकच प्रश्न घेऊन मी तिथं जात असे. राज्यस्तरीय आयोगात डेप्युटी कलेक्टरची परीक्षा ही सगळ्यात उच्च दर्जाची परीक्षा होती, आणि मला फक्त त्या एकाच पदामध्ये रस होता. मी लिफ्टमधून आयोगाच्या कार्यालयात प्रवेश करताच हेमा सावंत दिसायच्या. मला पाहताच हसत हसत नकारार्थी मान हलवत त्या एवढंच म्हणायच्या, ‘अजून काही खबर नाही.’ मग मीही म्हणायचो, ‘हसत हसत नकारात्मक बातमी देण्याचं तुमचं कसब मीही शिकणार आहे... पण कधीतरी हसत हसत ‘हो’ तरी म्हणा.’ मग त्याही हसायच्या. त्या संवादापुरती आमची ‘हसरी मैत्री’ मर्यादित राहिली. चुकून मी दामोदर यादवच्या भावाकडे मुंबई महापालिकेत किंवा आमच्या गावचे वाहतूक अधिकारी कोळी यांच्याकडे गेलो की फुकटचा फोन मिळायचा. मग मी फोनमधूनही त्यांना तोच प्रश्न विचारायचो. उत्तर तेच ‘अजून कोणतीही खबर नाही.’ खरं तर ते उत्तरही ऐकून बरं वाटायचं. आपल्याला घेऊन जाणारी बस अजून आलेली नाही. वाट पाहायला लागली तरी चालेल, पण ती येणार याची खात्री हवी. आमच्या बसला खूपच उशीर झाला होता, पण ती येणार अशी जबरदस्त आशा होती.

एक दिवस मी हेमा सावंतांना फोन लावला. काहीही नव्या बातमीची अपेक्षा नसताना. केवळ पुन्हा एकदा चौकशी करायची म्हणून आणि धक्कादायक बातमी मिळाली. ‘आता कोणत्याही क्षणी उपजिल्हाधिकारी व इतर पदांसाठीच्या जागा व परीक्षा जाहीर होतील.’ हर्ष, उत्साह आणि अनामिक हुरहूर, आपण ज्या क्षणाची वाट पाहात होतो, तो जवळ आला या जाणिवेने झालेला आनंद व उत्साह व थोडी भीती ही स्पर्धापरीक्षा असते. त्यामुळे उत्तीर्ण होऊ न होऊ अशी शंका व भीती. पण प्रयत्न सोडण्याचा प्रश्नच नव्हता. हा रस्ता आम्ही स्वत:हून शोधत होतो, तो अचानक समोर आला होता. फक्त समोर त्या रस्त्याकडे जाणारा बंद दरवाजा होता एवढंच. बंद दरवाजा बुलंद, त्यामुळे आव्हान सोपंही आणि कठीणही. तिळा तिळा दार उघड!

वृत्तपत्रात जाहिराती आल्या. आम्ही लगेच अर्ज भरले. अर्जाबरोबर पोस्टल ऑर्डर पाठवायची होती तीही घेतली. उपजिल्हाधिकारी पदाबरोबर इतरही अनेक पदांसाठी परीक्षा होती. मी फक्त उपजिल्हाधिकारी पदासाठी, आणि निदान एक तरी दुसरा पर्याय असावा म्हणून उपजिल्हा पोलीस अधीक्षक. या पदासाठी दुसरी प्राथमिकता दिली. या दरम्यान मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी अभ्यास सुरू केला होता. अभ्यासाची दिशा थोडी बदलून या परीक्षांवर लक्ष केंद्रित केलं.

वेळेवर परीक्षा झाल्या आणि वेळेवर निकालही आला. मी अडथळा शर्यतीतील पहिला अडथळा ओलांडला होता. त्यावेळेस पूर्वपरीक्षा आणि मुख्य लेखी परीक्षा नव्हती. फक्त एकच दीर्घ उत्तरांची लेखी परीक्षा होती. ती झाली की फक्त मुलाखत आणि मुलाखतीनंतर...? नावासमोर उपजिल्हाधिकारी हे विशेषण. विचार केला तर विश्वास बसत नव्हता. जी माझी अवस्था तीच विकासची होती. तो आणि मी दोघे कोल्हापूरचे. तो एका वर्षाने लहान आणि कॉलेजमध्ये एका वर्षाने मागे. आमची मैत्री तेव्हापासूनची किंवा खरं तर त्या आधीची. त्याचा एक छोटा भाऊ माझ्या शाळेत काही इयत्ता मागे होता. वेगवेगळ्या गावचे असूनही आम्ही अनेकार्थांनी सहप्रवासी होतो. भाषणस्पर्धा, कथास्पर्धा वगैरेंमध्ये आम्ही भाग घेत असू. त्या काळात बक्षिसाचे पंधरावीस रुपयेसुद्धा खूप मोलाचे वाटायचे. मुख्यत: शिष्यवृत्तीवर शिकणाऱ्या आम्हा सर्वांना ते पूरक उत्पन्न महत्त्वाचं होतं. आम्ही दोघेही वेगवेगळ्या वसतिगृहांत राहात होतो. त्या काळात वसतिगृहात एक कॉट एक टेबल व खुर्ची या पलीकडे काही नसायचं. कॉटखालच्या ट्रंकेत आमचं विश्व असायचं.

लेखी परीक्षा आम्ही स्वबळावर दिली होतीच, आता मुलाखत किंवा तोंडी परीक्षा. आम्ही तयारी करतच होतो आणि यशाची बऱ्यापैकी खात्री होती. शिवाय तोंडी परीक्षा घेणाऱ्यांमध्ये आपल्या ओळखीचीही एक व्यक्ती असेल आणि ती आपल्याला मदतही करेल अशी आशा होती. त्या सरांशी आम्ही मुंबईतही संबंध जिवंत ठेवले होते. वेळ मिळेल तसं कधीतरी जाऊन त्यांना आम्ही भेटत असू. शिवाय मंत्रालयात काम करणारा आमचा मित्र बाळासाहेब तेव्हा सरांकडे राहायचा. तोही स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करतच होता.

सर तेव्हा दिनशॉ वाच्छा मार्गावरील ‘यशोधन’ या सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानात राहत होते. आधी चार नंबरच्या व नंतर अकरा नंबरच्या फ्लॅटमध्ये. चर्चगेटकडून सरळ मंत्रालयाच्या दिशेनं निघायचं. थोड्याच वेळात बीसीसीआयकडे उजवीकडे जाणारा रस्ता. वळून गेल्यानंतर डावीकडची प्रशस्त सरकारी इमारत. लिफ्टमधून दुसरा मजला. उतरताच उजवीकडे त्यांचा फ्लॅट. डावीकडे त्यांच्या घरी काम करणाऱ्या नोकराची छोटी खोली. बाळू हे त्याचं नाव.

आम्ही वेळीअवेळी सरांच्याकडे गेलो तरी ते आम्हांला उत्साहानं भेटत. सेवाआयोगाचे सदस्य झाल्यामुळे त्यांच्या वागण्याबोलण्यात कोणताही बदल झाला नव्हता. ते तसेच खळखळून हसत. मुंबईच्या दिनक्रमातले किस्से सांगत. तेव्हा सुमतीताई सातारला प्राचार्य होत्या. त्यांची खबर ते आपुलकीनं देत. सकाळी नियमित मरीन ड्राइववर फिरायला जात. त्यांच्या बाल्कनीतून थोडंसं झुकून डावीकडे पाहिलं की समुद्र दिसे. आम्हाला सरांकडे प्रशस्त व छान वाटे आणि आमचं आदरातिथ्यही चांगलं व्हायचं. एक-दोनदा सर टूरवर गेले असताना बाळासाहेबांच्या सौजन्याने आम्ही तिथं मुक्कामही केला होता.

आमची अशी बऱ्यापैकी जवळीक असली आणि आमच्या मनमोकळ्या गप्पा होत असल्या तरी आयोगाच्या परीक्षांबाबत मात्र आमची चर्चा अत्यंत जुजबी होत असे. आम्ही परीक्षेला बसतो आहोत हे आम्ही त्यांना सांगितलं होतं, पण तेवढंच. कोणतीही मदत मागितली नव्हती. याची दोन कारणं, अशी मदत मागण्याची हिंमत आमच्यात नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मदत केलेली आवडली असती, पण ते ती करतील अशी शंभर टक्के खात्री नव्हती. त्या काळात थोडा का होईना आदर्शवाद शिल्लक होता. शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्येही. सरांना आम्ही शिक्षक मानत होतो. आणि त्यांच्याविषयी आदर, प्रेमभाव होता तरीही अशा परीक्षांमध्ये त्यांची मदत मागणं आम्हांला कठीण गेलं असतं. आपल्याविषयी शिक्षकांचं मन सतत चांगलं असावं हा त्या पाठीमागचा हेतू असावा. शिवाय त्यावेळचे सगळे शिक्षक अशी विनंती योग्य मानतीलच याची खात्री अजिबात नव्हती. त्यामुळे आशीर्वाद मागण्यापलीकडे आम्ही काहीच केलं नव्हतं. पण असे आशीर्वाद आम्ही नेहमीच मागत आलो होतो आणि ते द्यायचेही. पण त्या आशीर्वादाला खास परीक्षेचा संदर्भ नव्हता.

लेखी परीक्षेचे निकाल लागले आणि आपण अर्धं मैदान जिंकल्याची जाणीव झाली. पण अर्धं ते अर्धंच. अजून एक परीक्षा, तीही महत्त्वाची शिल्लक होती. आमची तयारी रात्रंदिवस सुरू होती. लेखी परीक्षेत आणि मुलाखतीत एक महत्त्वाचा फरक असतो. लेखी परीक्षेत कागद-पेन आणि लिखित शब्द असतात. हवेत उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांपेक्षा ते तुलनेने अधिक शाश्वत असतात. मी इतकी व्यवस्थित व चांगली उत्तरं दिली असताना मला इतके कमी गुण का पडले असं विचारण्याची सोय असते. शिवाय प्रश्न सगळ्यांना एकच असतात. त्यामुळे वेगवेगळ्या उत्तरांची तुलना करता येते. मौखिक परीक्षेत दोन उमेदवारांना विचारले जाणारे प्रश्न वस्तुनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ असतात आणि प्रत्येक उत्तर हवेत गायब होणाऱ्या शब्दांचं असतं. इथे तुलनेला वाव नाही आणि नेमकं काय घडलं याचा ठोस इतिहास किंवा पुरावा नाही. थोडक्यात, दोन उमेदवारांच्या गुणवारीची तुलना अशक्य. यावर आमच्याकडे उपाय नव्हता. पण एक आशेची किनार होती. आयोगाचे आमच्या परिचयाचे एकमेव सदस्य. आमचे सर!

पण सरांना जाऊन भेटण्याची हिंमत होत नव्हती. काय करायचं याचा मी आणि विकासने भरपूर विचार केला. मुलाखतीसाठी मुंबई आणि पुणं ही दोन केंद्रं असली तरी आम्ही दोघांनी मुंबईच घेतलं होतं. सर आमच्या मुलाखतीला असण्याची दाट शक्यता होती. त्याचा झाला तर आम्हांला फायदाच झाला असता. मुलाखतीची तारीख जवळ येत होती आणि छातीची धडधड वाढत होती. या परीक्षांसाठी आम्ही आमचं गाव सोडून इथं आलो होतो. या परीक्षांचं ‘लक्ष्य’ ठेवून त्यापूर्वीची काही वर्षं पणाला लावली होती. समजा, सर मुलाखतीला असतील आणि केवळ आम्ही त्यांना भेटून एकदाही लेखी परीक्षा पास झाल्याचं सांगितलं नाही व त्यामुळे त्यांनी गैरसमज करून आम्हांला मुलाखतीत कमी गुण दिले तर? खरं तर ते तसं करणार नाहीत. त्यांचा स्वभाव तसा नाही, पण याची खात्री कोण देणार? शेवटी मी आणि विकासने निर्णय घेतला, सरांना भेटायचं. अमुक अमुक तारखेला अमुक वाजता आमची मुलाखत आहे हे सांगायचं आणि त्यांचे आशीर्वाद मागायचे. ‘मदत करा. मुलाखतीत आम्हांला चांगले मार्क द्या किंवा सांभाळून घ्या.’ वगैरे काहीही बोलायचं नाही. बाकी सर्व सरांवर सोडायचे. आम्हांला धाडस होत नव्हतं. शिवाय, आपण काहीतरी चुकीचं व संस्काराविरुद्ध करतो आहोत असं वाटत होतं. विद्यार्थी आणि गुरुजनांच्या नात्यात न बसणारी कृती करण्याचा आमचा मनोदय आम्हांलाच पटत नव्हता. पण स्वार्थ आणि अस्तित्वासाठीचा झगडा आम्हाला सरांकडे घेऊन गेला.

सर अजून यायचे होते आणि आम्ही त्यांच्या दिवाणखान्यातील सोफ्यावर त्यांची वाट पाहात बसलो होतो. अनेकदा ठरवूनही आणि उजळणी करूनही मन बेचैन होतं. या भेटीतून काही विपरीत तर निष्पन्न होणार नाही ना असंही वाटत होतं.

सर आले. आम्ही त्यांना पटकन नमस्कार केला. नेहमीप्रमाणे अत्यंत उत्साहात त्यांनी ‘अरे ज्ञानेश्वर आणि विकास! कसे आहात?’ असं स्वागत केलं आणि ‘आलोच’ असे हातवारे करत ते आत गेले. ते हातपाय धुऊन परत येईपर्यंत आम्ही अधिकच अस्वस्थ झालो. एकमेकांकडे पाहून आम्हांला आमचीच दया आली. आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि ‘आलेलं काम करून जायचं बाकीचं नंतर बघू’ असे समजावलं.

सर त्यांच्या घरगुती शर्टात आणि पांढऱ्या विजारीत बाहेर आले. आम्ही सरांची वेळ न घेताच आलो होतो. आम्हा दोघांकडे बघत ते म्हणाले. ‘आला का ग्यानबा पांडुरंगाला भेटायला? आणि विकासराव, कोल्हापूर काय म्हणतंय?’ आम्ही जुजबी हसलो. सरांनी मग दिवसभरातल्या गोष्टी सांगितल्या. ते वाचत असलेल्या कृष्णमूर्तींच्या पुस्तकाविषयी बोलले. कोल्हापूरच्या काही आठवणींची पुनरुक्ती केली. मुख्यमंत्री बाबासाहेब भोसल्यांविषयीचे काही किस्से सांगितले. आम्हीही त्यांना नेहमीप्रमाणे साथ देण्याचा प्रयत्न केला. पण आमचं मन त्यात फारसं नव्हतं. सरांनी स्वत: होऊन ‘तुमच्या मुलाखती केव्हा आहेत’ असं विचारलं असतं तर बरं झालं असतं. बाळासाहेब घेवारेंकडून ती बातमी आम्ही सरांकडे पोहोचवली होती. पण सरांनी तो विषयच काढला नाही. आम्ही दोघे आलो म्हणजे हेच काम असेल असा विचार करून ते तो विषय टाळत असावेत. मी आणि विकास एकमेकांकडे सूचक नजरेनं पाहत होतो. सरांचं प्रेमळ पण दीर्घ भाषण संपलं तरच हा विषय काढणं शक्य होतं. दरम्यान चहा व बिस्किटं आली. सरांना त्यानंतर कावसजी जहांगीर सभागृहात कुठल्या तरी न्यायाधीशांचं भाषण ऐकायला जायचं होतं. एकदाचे सर आपलं भाषण संपवताहेत असं लक्षात येताच मी धाडस केलं.

‘सर एक सांगायचं होतं...’ मी.

‘अस्सं? एक का, दोन सांग ना.!’ सरांनी डोळे बारीक केले. मान डाव्या हातावर टेकवली आणि सगळं लक्ष एकवटून माझ्याकडे पाहू लागले. त्यांच्या चाणाक्ष नजरेतून आम्ही काहीतरी ठरवून आलो आहोत हे सुटलं असण्याची शक्यता नव्हती. मी एक क्षणभर काय बोलावं याचा विचार केला. विकासकडे पाहिलं, शेवटी धाडस केलं. ‘सर आम्ही दोघांनीही लेखी परीक्षेचा अडथळा ओलांडला आहे. पुढच्या सोमवारी आमच्या मुलाखती आहेत. आयोगाच्या मुख्यालयात... आम्हांला तुमचे आशीर्वाद हवेत...’ मी बोलून टाकलं. यापेक्षा काहीही अधिक बोलणं शक्य नव्हतं.

‘हे फार छान झालं. शेतकऱ्यांची मुलं अशी पुढं येतात, पाहून बरं वाटतं. कर्मवीर अण्णांचं स्वप्न साकार करताहात तुम्ही. तुम्ही दोघे स्वकर्तृत्वानं पुढे आलात. तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल!’ असं ते म्हणाले आणि त्यानंतर एकदम विषय बदलला. साताऱ्यात त्यांच्या वाढदिनानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादाबद्दल त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्यांच्या आजवरच्या प्रवासावर निघणाऱ्या स्मरणिकेत आम्ही लेख लिहावा अशी सूचना केली. कर्मवीरांचा आणखी एक किस्सा सांगितला.

आम्हांला जे बोलायचं होतं ते मी बोललो होतो. सरांना जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं. आम्ही उठलो, वाकून नमस्कार केला आणि सरांचा निरोप घेतला. लोकलमधून परतताना मी आणि विकासने सरांच्या आणि आमच्या संवादाचं विश्लेषण केलं.

‘सरांनी आपलं म्हणणं ऐकलं. निदान आपण मुलाखतीला येणार आहोत याची त्यांनी नोंद घेतली असणार.’

 ‘पण सरांच्या बोलण्यात काही खास आपुलकी दिसली नाही. एरवी किती आपुलकीनं आणि उत्साहानं बोलतात.’

‘अरे पण, आपण त्यांना धर्मसंकटात टाकलं असतं. अशा वेळी आपल्याला आग्रह धरता येत नाही, मदत कराच म्हणून. पण त्यांचं आपल्याकडे लक्ष राहील.’

‘तुझा हा फालतू आशावाद आहे. ते काही आपल्याला आज ओळखत नाहीत. शिवाय आपली गुणवत्ता त्यांना माहीत आहे. थोडंसं अधिक मोकळं होता आलं असतं त्यांना. काही हिंटस्‌ देता आल्या असत्या. काही सूचना ‘डूज आणि डोन्टस्‌’ सांगता आल्या असत्या...’

‘अरे पण ते आता काही आपले जुने सर नाहीत. आयोगाचे सदस्य म्हणून त्यांच्यावर बंधनं असणार. आणि आपणही सदैव हाच आदर्शवाद समोर ठेवून वावरत आलो आहोत.’

‘आपलं म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार. फार काही हे पुढं जाईल असं वाटत नाही गड्या... शेवटी आपली मदार स्वत:वरच असलेली बरं.’

‘ते बरोबर आहे. आपण काही कच्चे खिलाडी नव्हेत, म्हणून तर इथपर्यंत आलोत. आता शेवटची पायरी. अभ्यास करू आणि मारू या दौड... हम होंगे कामयाब.’

‘एक मात्र आहे, मुलाखतीला सर असणार आणि मदत करोत ना करोत आपलं नुकसान करणार नाहीत.’

‘हीच ती चंदेरी किनार...’ आम्ही दोघेही हसलो.

सरांनी आम्हांला मदत करावी अशी इच्छा होती, पण त्याची खात्री नव्हती. म्हणून आम्ही दोघेही नाराज होतो. पण ते मुलाखतीला असणार आणि आपल्याला तारून नेणार, अशी अंधुक आशा होती...’ पुढचा सोमवार आला. आम्ही दोघेही आयोगाच्या इमारतीत घुसलो. माझा क्रम आला. विकासची मुलाखत वेगळ्या खोलीत होती. तो तिकडे गेला. ‘नंतर भेटू आणि बेस्ट ऑफ लक’ झालं.

माझी मुलाखत झाली. आयोगाचे अध्यक्ष के.जी.देशमुख मुलाखत समितीचे प्रमुख होते. आणखी तीनचार मंडळी. मी थोडासा निराश झालो. पण मुलाखत सुरू झाली आणि पंचवीस- तीस मिनिटांनी संपलीसुद्धा. मुलाखत ठीकठाक झाली, पण...?

मी बाहेरच्या खोलीत वाट बघत होतो. थोड्या वेळाने विकास आला. तोही तसा निर्विकारच बाहेर पडला. थोडासा अस्वस्थ होता.

‘ज्ञान्या, च्यायला मुलाखत बरी झाली. पण तू साला नेहमी भाग्यवान... मास्तर नव्हता की रं! आत गेलो, हिकडं तिकडं नजर टाकली. आणि साला आपलं नशीबच फुटकं. मास्तर नव्हताच! पण मुलाखत बरी झाली. तुझं काय? हुता नव्हं तिकडं?’ विकासनं विचारलं. आम्ही सरांना काही टोपण नावं दिली होती. त्यातलं मास्तर हे एक होतं. ‘नव्हते. मीही थोडा चकितच झालो, मास्तर माझ्या मुलाखतीलाही नव्हते.’

आम्हा दोघांनाही वाईट वाटलं. एक तर सर असतील अशी जबरदस्त आशा होती आम्हांला आणि ते असतील तर आपण कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ अशी खात्री होती. आमचा अपेक्षाभंग झाला. ते विसरतील किंवा त्यांना माहीत नसेल असं व्हायला नको म्हणून तर विकास आणि मी त्यांना भेटलो होतो. आम्ही मान्य करत नव्हतो, पण एका अर्थाने वशिला लावायला तर गेलो होतो आम्ही. पण सरांनी आम्हांला फारसं प्रोत्साहन दिलं नव्हतं. आम्हीही आमची विनंती सभ्य भाषेत व नम्रपणे नोंदवली होती.

आम्ही बाळासाहेबांकडून माहिती काढली. त्याने सांगितलेली माहिती ऐकून आम्हांला अधिकच धक्का बसला. सरांच्या मुलाखती त्या दिवशी मुंबईलाच आयोजित केल्या होत्या. पण सरांना आम्ही भेटलो त्याच्यानंतर मुंबईऐवजी त्या दिवशी त्यांनी पुण्याला मुलाखती स्वीकारल्या व एक दिवस आधीच ते रवाना झाले. थोडक्यात, जाणीवपूर्वक सर आमच्या मुलाखतीच्या दिवशी मुंबई सोडून पुण्याला गेले. मी आणि विकास ते ऐकून दु:खी झालो. सरांकडून आम्हांला अशी अपेक्षा नव्हती. अनेकांना आम्ही सरांच्या लाडक्या शिष्यांपैकी आहोत असं वाटायचं. आम्हांला तेच वाटत होतं, प्रत्यक्षात मात्र! इलाज नव्हता. आता फक्त मुलाखतीचे निकाल येतील त्या दिवसाची वाट पाहायची, जे होईल ते होईल.

प्रतीक्षेचा तोही काळ संपला. एक दिवस संध्याकाळी हेमा सावंतांकडून संदेश आला. ‘उद्या निकाल आहे. माझ्या माहितीप्रमाणे तू आणि विकास दोघेही उत्तीर्णांच्या यादीत आहात.’ मी विकासला कळवलं. दोघांनाही आनंद झाला, पण तो प्रत्यक्षात साजरा करण्याचं धाडस नव्हतं. आमच्या सरांच्या अनुभवानंतर अपेक्षा माफक ठेवणं गरजेचं होतं. जेव्हा स्वत:च्या डोळ्यानं निकाल बघू, नावाची खात्री करू त्यानंतर बघू कसा साजरा करायचा आनंद.

दुसऱ्या दिवशी आम्ही थोडे लवकरच बँक ऑफ इंडिया बिल्डिंगमध्ये पोहोचलो. लिफ्ट बंद होती. आम्ही जिन्यावरून धावत वरती गेलो. आयोगाचं कार्यालय अजून उघडायचं होतं. त्यानंतर तब्बल एक तास वाट पाहिली. दरवाजा उघडताच नोटीस बोर्डकडे धावलो. तिथे सायक्लोस्टाइल केलेला टंकलिखित ताजा कागद होता. त्यावरचं टंकनही अगदी ताजं होतं. परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी. एकूण पदे वीस. उत्तीर्ण उमेदवारांची यादी. आणि अहो आश्चर्य्‌, टॉपवर माझं नाव. काही क्रमाकांनंतर विकासचंही नाव. दोघे उत्तीर्ण. हुर्यो! तिथंच आम्ही एकमेकांना मिठी मारली. आमच्या श्रमांचं सार्थक झालं.

काही दिवसांनी निवडीची पत्रंही आम्हाला मिळाली. मग आम्ही पेढे घेऊन सरांकडे गेलो. आनंदाने आम्ही त्यांच्या पायावर डोकी ठेवली. मागच्या भेटीतील तणाव नव्हता. आम्हीही मुक्त होतो आणि सरही मुक्त. सरांविषयी आमच्या मनातला किंचित रागही आम्ही विसरलो होतो. सरांनी मुक्तकंठाने आमचं कौतुक केलं. ‘कोल्हापूरचे पठ्ठे आहात तुम्ही! शाब्बास! आता महाराष्ट्र जिंकलात अजून दिल्ली बाकी आहे.’ भरभरून आशीर्वादही दिले. आमचं आदरातिथ्यही उत्साहवर्धक केलं. जणू काही मागची भेट झालीच नाही असं समजून आम्ही भेटलो.

त्यानंतर कित्येकदा आमची त्यांची भेट झाली. पण मुलाखतीच्या दिवशी ते आम्हांला सोडून पुण्याला का गेले, याची कधीच चर्चा झाली नाही. कधीकधी ते कुतूहल मला अस्वस्थ करत असे, पण मीही ते दाबून टाकलं. काही गोष्टी कायमच्या गाडून टाकाव्या लागतात. ती गोष्ट कालांतराने स्मृतिकोषातूनही संपूर्णपणे डिलिट झाली.

पण मध्यंतरी केंद्रीय लोकसेवा आयोगात निवड झालेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांच्या अभिरूप मुलाखती घेताना तो प्रसंग आठवला. जवळजवळ एकोणतीस वर्षांनंतर मी पुन्हा एकदा स्वत:ला प्रश्न केला. सर त्या महत्त्वाच्या प्रसंगी आम्हांला सोडून पुण्याला का गेले असतील? मला मिळालेल्या उत्तराने माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. ‘पहिली गोष्ट गावचा, घरचा, जातीचा, मामांचा, काकांचा, ओळखीचा आणि म्हणून त्याला मदत केली पाहिजे हा लोकमान्य असला तरी चुकीचा समज आहे. शिवाय आपण सतत गुणवत्तेचे गोडवे गायचे आणि आपणच अशा पद्धतीने भेदभाव करायचा हे सरांना न रुचणारं होतं. दुसरं आणि तितकंच महत्त्वाचं कारण हे असणार की, आम्ही दोघेही गुणवत्तेच्या जोरावर उत्तीर्ण होऊ अशी त्यांना खात्री असावी. या पार्श्वभूीवर जर ते ‘मुलाखतकार’ म्हणून असते आणि आम्ही उत्तीर्ण झालो असतो तर त्यांच्यामुळे आमची निवड झाली असा आमचा समज झाला असता आणि संपूर्ण आयुष्य आम्हांला आमच्या निवडीसाठीचं त्यांचे ऋण मान्य करत वावरावं लागलं असतं. तिसरी गोष्ट, कुणी सांगावं मुलाखत घेणाऱ्या इतरांकडे एखादा शब्द टाकूनही ते पुण्याला गेले असतील. काळाच्या पोटात जाऊन सत्त्व शोधणं केवढं अवघड काम आहे, पण काही असो... सर आमच्या मुलाखत समितीत नव्हते हे फार छान झालं.

मला आठवतं. निकालानंतर परळ स्टेशनवर नंदा सावंत या आमच्या संस्थेतील सीनिअरची भेट झाली. तेव्हा मी तिला आयोगाच्या परीक्षेत पास झाल्याचं सांगितलं. ती थेट म्हणाली, ‘ज्ञानेश्वर, ते आयोगाचे सदस्य पाटील सर तुझ्या ओळखीचे होते ना, त्यांनीच केली असणार तुझी निवड!’ मी लगेच तिला तडकावलं, ‘त्यांनी मला फार पूर्वी आपला आवडता शिष्य मानलं होतं, पण आयोगाच्या परीक्षेत मी पहिला आलो तो मात्र माझ्या स्वत:च्या ताकदीवर. कोल्हापूरकरांची बुद्धी गुडघ्यात, असं तू म्हणतेस ना. वस्तुस्थिती त्याच्या अगदी विरुद्ध आहे.’

पाटील सर? यस्‌ तुम्ही आमच्या मुलाखतीला नव्हता ते बरं झालं. तुम्ही स्वत:हून पुण्याला गेला असाल तरी हरकत नाही? तुमची शिकवण आज लक्षात येतेय. तुमचं म्हणणं होतं की ‘यश मिळालं ते तुमचंच आणि अपयश मिळालं तर तेही तुमचंच.’ आम्हांला यश मिळालं ते छानच झालं, पण अपयश मिळतं तरी स्वत:लाच जबाबदार धरणं महत्त्वाचं होतं हे तुमच्यामुळे कळलं. पी.जी.पाटील सर. बॅरिस्टर पांडुरंग गणपती पाटील. कोणत्याही कार्यक्रमात ते हटकून एक वाक्य बोलायचेच, ‘अरे ज्ञानेश्वराला भेटायला पांडुरंग आलाय.’ आज सरांना जाऊन काही वर्षं झाली तरी मुलाखतीआधीची ती मुलाखत मला अधिकच प्रकर्षाने आठवते!

(गेली 25 वर्षे भारतीय विदेश सेवेत असलेले ज्ञानेश्वर मुळे, सध्या मालदीवमध्ये भारताचे उच्चायुक्त आहेत.)

Tags: पी.जी.पाटील डेप्युटी कलेक्टर केंद्रीय लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई विद्यापीठ परिसर अभियांत्रिकी शंकरशेठ शिष्यवृत्ती शिवाजी विद्यापीठ कर्मवीर भाऊराव पाटिल रयत शिक्षण संस्था मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले PG Patil Deputy Collector Central Public Service Commission Maharashtra Public Service Commission Mumbai University Parisar Engineering Shankarsheth Scholarship Shivaji University Karmaveer Bhaurao Patil Rayat Shikshan Sanstha Chief Minister Babasaheb Bhosale weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके