डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

“सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत सामान्य माणसाला भारतीयांविषयी आकस नाही हे कळावं म्हणून मी तुला न्यायला आलो. दुसरं म्हणजे तुला विमानतळावर आगमनानंतर कसलाही त्रास झाला असता व मला ते नंतर कळलं असतं, तर फार वाईट वाटलं असतं!" त्याच्या त्या प्रेमळ वक्तव्यानं मी भारावून गेलो.

समोरचा रस्ता दूरपर्यंत सरळ सरळ जात त्यानंतर येणाऱ्या डोंगराच्या पायथ्यातील झाडीत जाऊन नाहीसा होताना दिसत होता. 'डाव्या बाजूला दिसणारी रावळपिंडी' ही पूर्वीची राजधानी. कैदे आझम (महान नेता) बॅ.जीना या भागातून जात असताना डोंगराच्या पायथ्याची ही जागा त्यांना फार आवडली. त्यांची हीच ‘आवड' पुढे ते नसतानाही त्यांचा 'आदेश' मानून 1964 नंतर राजधानीची जागा झाली. राजधानी तयार व्हायला 1972-73 उजाडले. अर्शद सांगत होता. महामार्गावरून गाडी धावत होती. हा भव्य महामार्ग इस्लामाबाद व रावळपिंडी तसेच विमानतळ यांना जोडतो. महामार्गाच्या दोन्ही बाजूला कृत्रिम उंचवटा तयार केलेला असून त्यावर सुरेख झाड़ी आहे. डाव्या बाजूला अधूनमधून झाडीपलीकडची रावळपिंडी दिसत होती. 20-25 मिनिटांत आम्ही इस्लामाबादची सरहद्द ओलांडून आत आलो. गाडी उजवीकडे वळली.

डाव्या बाजूला इमारतींची रांग होती. उजवीकडे पुन्हा झाडी. शहर आहे असे वाटतच नव्हते. पण तेच होते इस्लामाबाद. पाकिस्तानची राजधानी. डाव्या बाजूच्या इमारतीत आय.एस.आय.ची इमारतही होती. भारताविरुद्धच्या सर्व कारवायांचे केंद्रस्थान. “यांचेही पंख मुशर्रफने कापले आहेत” असं अर्शद म्हणाला तेव्हा विश्वास ठेवायचा की नाही, हे मला ठरवता येईना.

थोड्याच वेळात गाडी 'हॉलिडे इन’ या आमच्या हॉटेलात आली. समोर मशीनगन घेऊन गार्ड उभा. आत जाताना मेटल डिटेक्टर बरोबरच संपूर्ण शरीराची तपासणी. अर्थात हे सगळ्यांसाठीच. स्वागत कक्षात सगळ्या कागपत्रांची पूर्तता करून माझ्या हातात खोलीची किल्ली ठेवण्यात आली.

अर्शद मला खोलीपर्यंत सोडायला आला. मी त्याला मजेत म्हटले, “अर्शद, तू मला विमानतळावर घ्यायला आला नसतास तरी मी समजू शकलो असतो. मग तू आलास या पाठीमागचा हेतू काय? थोडक्यात विमानतळावर यायची तसदी तू का घेतलीस?” “खरं सांगू, आपल्या दोन देशांतील संबंधात तणाव नसता तर मी मुळीच आलो नसतो; किंवा यायचं किंवा नाही याचा विचारही केला असता, पण सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत सामान्य माणसाला भारतीयांविषयी आकस नाही हे कळावं म्हणून मी तुला न्यायला आलो. दुसरं म्हणजे तुला विमानतळावर आगमनानंतर कसलाही त्रास झाला असता व मला ते नंतर कळलं असतं, तर फार वाईट वाटलं असतं!”

त्याच्या त्या प्रेमळ वक्तव्यानं मी भारावून गेलो. एरवी आपण पाकिस्तानविषयी जे जे वाचतो ते सगळं खोटं नसेलही; पण पूर्ण सत्यही नसेल, असं वाटलं मला. अर्शद निघून गेला तरी मी विचार करत राहिलो की भारत-पाक या दोन देशांचा भूतकाळ आपल्यासमोर आहे. काळाकुट्ट रक्तरंजित; एकमेकांविषयीच्या गैरसमजुतींनी भरलेला. त्यात युद्धांची पार्श्वभूमी, आण्विक शस्त्रांची क्षमता दोघांकडे. आजही एकाच भूभागातून निघालेल्या या दोन देशांचे दूरचे भविष्य तर सोडाच पण नजिकचे भविष्यही काय आहे सांगणे कठीण. मनात विषाद दाटला.

कार्यशाळेत सार्क देशांचे पस्तीस एक प्रतिनिधी. त्यात भारताचे चार, मला धरून. तीन सरकारी अधिकारी. एक जयपूरमधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपिंग इकॉनॉमीज या संस्थेचा प्रतिनिधी, सगळे माझ्या आधी आलेले, भारत-पाक संबंधांच्या पार्श्वभूमीवर भारतीय प्रतिनिधी येतील की नाही याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल होते. आल्याचे पाहून सगळ्यांनीच निःश्वास सोडला. 'गरिबीचे मूल्यमापन व निर्मूलन’ हा आमच्या कार्यशाळेचा विषय. संयुक्त राष्ट्रसंघाने दारिद्र्यरेषेखालील जनतेची संख्या आता आहे त्या पातळीत अर्ध्यावरती आणायची असे नव्या सहस्रकाच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट ठरवले आहे. त्या संदर्भात दक्षिण आशियातील राष्ट्रांचा आतापर्यंतचा गरिबी हाताळण्याचा प्रयत्न, पद्धती, यशापयश या सर्वावर चर्चा होऊन पुढील मार्ग निश्चित करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत पाकिस्तानच्या विविध खासगी, सरकारी व निमसरकारी संस्थांचे पंधरा प्रतिनिधी होते. बहुतेक सगळ्या पुरुषांचा पेहेराव पाश्चिमात्य. एक-दोघांनी पठाणी ड्रेस घातलेला. स्त्रियांमध्ये सर्व सलवार कमीज घातलेल्या. फक्त एका महिलेने साडी घातली होती. मधल्या सुट्टीत मी तिला 'तुम्ही साडी नेहमी नेसता का? असं विचारलं तर ती म्हणाली, “या कार्यशाळेपुरती मी साडी नेसून आले आहे एरवी मी सलवार कमीजच घालते. पण कराचीत अनेक स्त्रिया साडी वापरतात.”

पाकिस्तानातील स्त्रियांचे स्थान हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. कार्यशाळेत भाग घेणाऱ्या सगळ्या पाकिस्तानी स्त्रिया स्पष्टपणे बोलणाऱ्या व स्वतंत्र विचाराच्या वाटल्या; पण हे निश्चित की या सगळ्या महिला समाजातील वरच्या घटकांतील होत्या.

यातील खदीजा खान नावाच्या महिलेशी ‘पाकिस्तानातील स्त्रियांचे स्थान’ या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. खदीजा खान 'पाकिस्तान गरिबी निर्मूलन निधी' नावाच्या संस्थेत जनरल मॅनेजरच्या पदावर काम करते. भारत व श्रीलंकेच्या तुलनेत पाकिस्तानातील स्त्रीचे समाजातील स्थान फारच दुय्यम दर्जाचे आहे. हे ती खळखळ न करता मान्य करते. एवढेच नव्हे तर माझ्या विनंतीवरून तिने मला पाकिस्तान महिला चौकशी आयोगा च्या 1997च्या महत्त्वपूर्ण अहवालाची प्रत आणून दिली. या अहवालात पहिल् वाक्य असे आहे... 'आमच्या समाजातील स्त्रीच्या अधिकारांचा विषय चर्चेसाठी असो, वा संशोधनासाठी; नेहमीच तो अतिशय वेदनादायी विषय ठरलेला आहे.

हा अहवाल वाचनीय आहे. आकडेवारीच नव्हे तर एकंदरीत आशय व मांडणी उद्बोधक आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमधील साक्षरता खूप कमी: प्राथमिक शाळेतील मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी; अपत्य जन्मावेळेस मरणाऱ्या मातांचे प्रमाण जगात जवळजवळ सर्वोच्च. जनसंख्या वाढीचे प्रमाण 2.9% आणि देशाच्या राजकारणात स्त्रियांना नगण्य प्रतिनिधित्व या काही ठळक गोष्टी. येथील अनेक अनिष्ट सामाजिक रूढींचे वर्णनही या अहवालात आहे. लग्नातील वधूच्या 'विक्रीस' वलवार प्रथा, भांडणात नुकसान भरपाई म्हणून होणाऱ्या मुलीच्या वापरास 'स्वरा' आणि चारित्र्याच्या संशयावरून स्त्रियांचा खून करण्याच्या प्रथेस 'करो कारी' असे नाव आहे.

पण या सगळ्या अहवालातून जे महत्त्वाचे चित्र उभे राहते ते असे की, स्त्रियांच्या उन्नतीला चळवळीविरुद्धचा संघर्ष सामाजिक तसाच शासकीय पातळीवरती तर करावा लागत आहेच; पण 'धार्मिक' प्रथा व ‘श्रद्धां’च्या विरुद्ध झगडा करणे हे स्त्री पुरुष समानतेसाठी झगडणाऱ्यांसमोरचे फार मोठे आव्हान आहे.

या अहवालातील एका परिशिष्टात कुटुंबनियोजनाच्या तसेच गर्भपातासंबंधीच्या स्त्रीच्या अधिकारांच्या संदर्भात खालील मुद्यांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली आहे.
1. पैगंबराच्या काळात कुटुंबनियोजनाची संकल्पना ज्ञात होती का? या विषयावर कुराणाची शिकवणूक काय आहे?
2. इस्लाम कुटुंबनियोजन पूर्णपणे नाकारतो काय? नसेल तर तो पूर्णपणे स्वीकारतो की काही ठरावीक अटींखाली इस्लामला कुटुंबनियोजन मान्य आहे?
3. सध्या कुटुंबनियोजनाचे समर्थन करण्यासारखी परिस्थिती आहे का?

हे सगळे प्रश्न वाचल्यानंतर व त्यानंतरची चर्चा वाचल्यानंतर हे स्पष्ट जाणवते की या विषयावर पाकिस्तानला बरेच काम करावे लागणार.

खदीजाला मी विचारले की, “मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबात मुलांची संख्या किती असते?” “कमीत कमी सहा” असं ती म्हणाली, तेव्हा मला धक्का बसला. मी नंतर अनेकांच्याकडे विचारणा केली, तेव्हा सगळ्यांनीच ते खरे असल्याचे सांगितले.
कार्यशाळा व्यवस्थित सुरू असतानाच मला व माझ्या तीन भारतीय मित्रांना सांगण्यात आले की, 'तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोंद करणे आवश्यक आहे.’ दक्षिण आशियातील इतर देशाच्या प्रतिनिधींना अशी सक्ती केली नव्हती. मनात म्हटले, 'चला! या निमित्ताने येथील पोलीस स्टेशन पाहता येईल.

आम्हाला एका व्हॅनमधून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. उतरण्यापूर्वी आमच्याबरोबर आलेल्या शिष्टाचार अधिकाऱ्याने 'तुमच्या कोटावरची नेमप्लेट व कॅमेरा काढून व्हॅनमध्येच ठेवा' अशी आदेशवजा विनंती केली. तो शिष्टाचार अधिकारी पी.आय.डी.इ.' या संस्थेचा होता व त्याची वागणूक एरवी इतकी चांगली, की त्यांची विनंती पाळणे हे आमच्या हिताचे आहे हे आमच्या लक्षात आले.

पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला असलेल्या कारकुनाच्या खोलीत आम्हाला नेण्यात आले. तिथे कारकुनाने आमचे पासपोर्ट तपासले. काही कागद भरायला लावले. फोटो नव्हते, ते काढून घ्यायला लावले. आमच्याशी वागताना त्याच्यात बेअदबी नव्हती. आमच्याशी आमच्या देशात एखादा कारकून जसा वागला असता तसाच तो वागला. त्याचे टेबल धुळीने माखलेले होते. टेबलावर फाईलींची प्रचंड चवड होती. कोपऱ्यात उभ्या असलेल्या दोन गंजलेल्या जुनाट तिजोऱ्या अर्धवट उघड्या होत्या व त्यातून जुनी कागदपत्रे बाहेर डोकावत होती. थोडक्यात अगदी परिचयाचे वातावरण. कोणत्याही त्रासाशिवाय आमची सुटका झाली. पोलीस स्टेशनच्या या भेटीमागे दोन-तीन प्रयोजनं होती. पहिले म्हणजे पाकिस्तान या देशात आम्ही भारतीय आलो आहोत याची नोंद करणं. दुसरी गोष्ट भारतीय असल्यामुळे पाकिस्तानात नियोजित काळ (सहा दिवस) राहण्याचा परवाना घेणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नियोजित काळ (सहा दिवस) संपल्यानंतर पाकिस्तान सोडण्यासाठीचा परवाना घेणे. शेवटच्या परवान्यासाठी पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला कायद्यानुसार येणं आवश्यक, पण शिष्टाचार अधिकाऱ्याच्या कर्तबगारीमुळे आम्हाला परत न येण्याची खास सवलत(?) मिळाली. पाकिस्तान-भारत संबंध व्यक्तिगत पातळीवर अनेकदा येऊन भिडलाच. माझ्या व्हिसावर 'इस्लामाबाद शहराची हद्द सोडता येणार नाही', तसेच 'कोणत्याही लष्करी भागात जाण्यास बंदी' असे स्पष्टपणे लिहिलेले होते. यामुळे मला इस्लामाबादचे जुळे शहर रावळपिंडीसुद्धा पाहता आले नाही. इस्लामाबादपासून फक्त तीस किलोमीटरवर प्राचीन विद्येचे केंद्र तक्षशीला आहे. माझी मनोमन इच्छा होती की ज्या प्राचीन विद्यापीठात जगभरचे लोक येऊन अध्ययन करत होते. त्या तक्षशिलेच्या अवशेषांना आपण भेट यावी. मी या विषयावर अर्शदशी चर्चा केली. तो म्हणाला, “पाकिस्तानी अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत, तुला तक्षशिलेला नेण्यासाठी मी परवानगी मिळवतो.” त्याच्या दुसऱ्याच दिवशी इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांना 48 तासांच्या अवधीत देश सोडून जाण्याचा आदेश पाकिस्तान सरकारने दिल्याची बातमी पहिल्या पानावर झळकली. अर्शदचा फोन आला. तो म्हणाला, “वातावरण मुळातच प्रतिकूल, त्यात या बातमीने अधिकच बिघडले आहे त्यामुळे तक्षशिलेचा नाद सोडून दिलेला बरा!” त्याचे म्हणणे नाकारण्याचा प्रश्नच नव्हता.

[क्रमशः]

Tags: संयुक्त राष्ट्र संघ भारत पाकिस्तान संबंध मुशर्रफ बॅरिस्टर जीना ज्ञानेश्वर मुळे पाकिस्तान डायरी United Nations India-Pakistan relation Barister Jina Dnyaneshwar Mule Pakistan Diary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके