डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कागद दोन ठिकाणी फाटला असूनही, त्याचे दोन हातांनी फाडून तीन तुकडे कुणालाच करता आले नाहीत! सगळे फक्त हात चोळत व कागद चुरगळत राहिले! आता मात्र मुले सावध झाली. त्यांची उत्सुकता वाढली. त्यांचं कुतूहल चाळवलं. या साध्या-सोप्या वाटणाऱ्या गोष्टीमागे काहीतरी वैज्ञानिक कारण असणार, याची त्यांना एव्हाना खात्री पटली.

काल वर्गात गेलो तर मला धक्काच बसला. मी शाळेत आहे की कुठल्या प्रेसमधे तेच मला क्षणभर कळेना. वर्गात मुले कमी आणि कागदच जास्ती. प्रत्येक मुलाच्या बाजूला कागदाचे असंख्य तुकडे. नुकताच हस्तव्यवसायाचा तास संपला होता आणि उरलेल्या कागदावर मुलांचे प्रयोग सुरू होते. कागदसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आणि विविध रंगांचे होते.

कागदाच्या प्रयोगशाळेत रमलेली मुले पाहिल्यावर आता इतर विषय कागदाशीच जोडून घ्यावेत असं ठरवलं. वर्गातल्या सर्व शास्त्रज्ञांना त्यांच्या आजूबाजूचं प्रयोगसाहित्य नीट जमवायला सांगितलं. मुलांना विचारलं, "तुम्हांला कागदाच्या घड्या घालायला आवडतील की कागद फाडायला आवडेल?"

मुले अतिशय आनंदाने ओरडली, "कागद फाडायला आवडेल!"

‘‘चला तर मग, कागद टराटरा फाडण्याचा एक प्रयोग करू या. पाहू या, सांगितल्याप्रमाणे कुणाला कागद फाडायला जमतोय ते? कागद फाडणं तेवढं सोपं नाही बरं!’’

आवडीचे काम मिळणार असल्याने मुले सरसावून बसली. प्रत्येक मुलाने कागदाचा एकेक तुकडा हातात घेतला. कुणाच्या हातात पतंगी कागदाचा तर कुणाच्या हातात वर्तमानपत्राचा, वहीचा किंवा जाड टीपकागदाचा तुकडा. आता या कागदाच्या 3/4 उंचीपर्यंत आकृतीत दाखविल्याप्रमाणे उभं कापून तरी घ्या किंवा तो हाताने तसा फाडला तरी चालेल.

कागद अलगद फाडल्यावर सिमरन म्हणाली "तुम्हीच तर म्हणाला होतात, 'कागद फाडणं सोपं नाही!' पण आम्ही तर लगेचच फाडला की!" सिमरनने असं म्हणताच वर्गातल्या सर्व मुलांनी एकच कालवा करायला सुरुवात केली. त्यांना शांत करत म्हणालो, ‘‘खरा प्रयोग आता सुरू होणार आहे.’’

‘‘आता कागद दोन हातांत आडवा धरून, तो वरच्या बाजूला दोन्ही दिशांनी सावकाश किंवा चटकन खेचायचा आहे. म्हणजे तो असा फाडायचा आहे की, त्याचे तीन तुकडे व्हायला हवेत आणि त्याचा मधला तुकडा खाली पडला पाहिजे. काय, आहे का सोपं?’’

"सोपं सोपं - एकदम सोपं", असं ओरडत मुलांनी तो कागद दोन्ही दिशांनी खसकन ओढला. पण कागदाचे तीन तुकडे झालेच नाहीत. मुलांनी भराभरा आणखी कागदाचे तुकडे घेतले. कागद बदलून पाहिले. कागद वेगवेगळ्या अंतरांवर उभा कापून मग त्याचे तीन तुकडे होतात का पाहिलं? सिमरनने कागदाचा छोटा तुकडा न घेता वर्तमानपत्राचा मोठा कागद घेतला. रोहनने पातळ पतंगी कागद घेऊन तो हलकेच फाडण्याचा प्रयत्न केला. चारुताने चांगला जाड कागद घेतला. विविध प्रकारे मुलांनी पुन्हा पुन्हा प्रयोग केला, पण उत्तर तेच!

कागद दोन ठिकाणी फाटला असूनही, त्याचे दोन हातांनी फाडून तीन तुकडे कुणालाच करता आले नाहीत! सगळे फक्त हात चोळत व कागद चुरगळत राहिले!

आता मात्र मुले सावध झाली. त्यांची उत्सुकता वाढली. त्यांचं कुतूहल चाळवलं. या साध्या-सोप्या वाटणाऱ्या गोष्टीमागे काहीतरी वैज्ञानिक कारण असणार, याची त्यांना एव्हाना खात्री पटली.

अगदी सोपी वाटणारी ही गोष्ट, ही अशी एकदम कठीण का झाली? या साध्या कागदाच्या चिटोऱ्याचे तीन तुकडे का करता येत नाहीत? उत्तर तर शोधून काढलंच पाहिजे. फाडून फेकलेले सगळे कागद आम्ही जमवले. त्याचं नीट निरीक्षण केलं. कागद फाडताना आपण नेमकं काय करतो ते पाहिलं. म्हणजे मी काय करतो? आणि समोरचापण काय करतो, ते पाहिलं. कागदाचा प्रकार बदलला तर काय फरक पडतो, याचाही शोध घेतला. कागद फाडताना दोन्ही हातांचा जोर सारखाच असतो का? याचाही अंदाज घेतला आणि कागद फाटायला नेमकी सुरुवात केव्हा व कशी होते, हे बारकाईने पाहिलं.

कागदाचे तीन तुकडे होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यकच आहेत, याची एक यादी तयार झाली :

• ज्या दोन ठिकाणी कागद फाडला आहे किंवा कापला आहे, ते दोन काप अगदी एकसारखेच हवेत.

• कागदाचे तीन तुकडे पडण्यासाठी कागद सारख्याच जाडीचा हवा.

• कागद फाडण्यासाठी दोन बाजूंनी लावलेला जोर हा सारखाच व एका वेगानेच लावायला हवा.

• या सर्व गोष्टी एकाच वेळी होणे आवश्यक आहे. पण या सर्व गोष्टी एकाच वेळी होत नाहीत म्हणून कागदाचे तीन तुकडे होत नाहीत.

मग आता पुन्हा प्रश्न आला की कागदाचे दोनच तुकडे का होतात?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, 'कागद नेमका कसा फाटतो' या संदर्भातली निरीक्षणे आमच्या मदतीला आली. कुठल्याही पदार्थाप्रमाणे कागद सर्वांत कमकुवत किंवा कमजोर जागी सर्वांत आधी फाटतो. आता आपल्या वरील उदाहरणात काप घेतलेली जागा ही त्या कागदावरची सर्वांत कमकुवत जागा आहे. आपण कागद ओढू लागलो की, दोन कापांपैकी जो जास्त कमजोर आहे त्या ठिकाणी प्रथम फाटायला सुरुवात होते. त्यामुळे तो आणखी कमजोर होतो व चटकन फाटतो. यामुळेच तर कागदाचे दोनच तुकडे होतात आणि कागदाचे कितीही प्रकार बदलले तरी उत्तर हेच येणार!

मुले खूश झाली! म्हणाली, “ही एकदम सही आयडिया आहे! आज घरी गेल्यावर आई-बाबांना कोड्यात टाकू आणि त्यांना चकित करू!!’’

Tags: विज्ञानाद्वारे शिक्षण छोट्यांचे पान ‘बालसाधना’ education through science page for kids 'balsadhana' weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके