पीटर आणि त्याची मुलगी रियोना हे दर रविवारी मंचात यायचे, त्यामुळे त्यांच्याशी बऱ्यापैकी स्नेह जमला होता. पण त्याच्या मुलाशी कधी बोलण्याचा योग आला नव्हता. अर्थात, त्याला एक-दोनदा मी पीटरबरोबर पाहिले होते. दहा दिवसांपूर्वीच मी पीटरला त्याच्या कुटुंबीयांसोबत एका हॉटेलमधून जेवण घेऊन बाहेर पडताना पाहिले होते. त्याचा मुलगा व मुलगी यांच्यात थट्टा-मस्करी चालली होती. ते चौकोनी कुटुंब वार्तालाप करीत हॉटेलमधून जाताना किती आनंदी दिसत होते. तेव्हाच मी त्या थोरल्या मुलाला- गिल्सनला शेवटचे पाहिले होते. पीटरची काय अवस्था असेल?
पीटर हा समाज विकास मंडळाचा हाडाचा कार्यकर्ता. लायब्ररीतील कॉम्प्युटर चालत नाहीये? पीटरला सांगा. प्रिंटर चालत नाहीये? पीटरला फोन करून कळवा. लायब्ररीतील टीव्हीचे डिजिटल रिचार्ज संपले आहे, पीटरला इन्फॉर्म करा. एखाद्या कार्यक्रमासाठी बॅनर बनवायचा राहून गेलाय? काही हरकत नाही, पीटर आहेच की! आपल्या घरचेच काम असल्यासारखे पीटर मंडळात सतत कार्यशील असायचा. विवेकमंच सुरू झाला त्या दिवसापासून तो या उपक्रमात सहभागी होता. सतत क्रियाशील असल्यामुळे असेल, ‘विवेकमंचाने फक्त चर्चा न करता काही भरीव कार्य करावे’ असे त्याला व त्याची बहीण कॅथरिन या दोघांना वाटायचे आणि तसे ते दोघेही वेळोवेळी मंचात बोलून दाखवायचे.
पीटर त्याची शाळेत जाणारी मुलगी रियोना हिलाही मंचाच्या सभेला घेऊन येत असे. तो इंडियन नेव्हीमध्ये शस्त्रास्त्र विभागात टेक्निकल सुपरवायझर म्हणून नोकरीस होता. भारतीय नौदलात बहुतांशी तंत्रज्ञान हे रशियातून आयात केलेले असायचे. त्यामुळे मेंटेनन्सच्या कामासाठी विविध रशियन लोकांचे इथे मुंबईत येणे-जाणे सुरूच असायचे. शस्त्रास्त्र विभागात असल्याने पीटरचा अशा रशियन लोकांशी संबंध यायचा.
एकदा असेच एक रशियन नेव्हल ऑफिसर रोमन चॅन्डलस हे त्यांच्या नौदलाच्या कामानिमित्त आलेले होते. पीटरने त्यांना रविवारी विवेकमंचाच्या सभेत येण्याचे आमंत्रण दिले. त्यांनीही ते तत्काळ आनंदाने स्वीकारले. त्या रविवारी डिसोझासर हे त्यांच्या मुलाकडे हैदराबादला गेले होते, त्यामुळे ते सभेस अनुपस्थित होते. रशियन लोक आपल्या समाजविकास मंडळाच्या विवेकमंचाच्या बैठकीला येणार आहेत, म्हणून आम्ही मंडळाच्या बाहेर फलकावर तसे लिहून ठेवले होते. एरवी एखादा वक्ता येणार असेल तर बॅनर छापूनही लोक फिरकत नसत, पण आज कोणी तरी परदेशी पाहुणा येणार आहे, म्हणून त्या सभेसाठी बरीच गर्दी जमलेली होती. नेव्हल ऑफिसरसोबत त्याची रशियन-इंग्रजी दुभाषक सहायक तातियाना सोकोलो हीसुद्धा होती. अर्थात त्यांना काही भाषणासाठी अजेंडा दिला नव्हता; फक्त विवेकमंचाच्या कार्यकर्त्यांशी मुक्त चर्चा व सांस्कृतिक देवाण-घेवाण एवढाच हेतू या भेटीमागे ठेवण्यात आला होता.
पीटरने अगोदर कल्पना दिल्यामुळे आम्ही त्यांना विचारण्यासाठी काही प्रश्न तयार केले होते. रशियामध्ये कम्युनिस्ट राजवटीत बरीच वर्षे धर्म पाळण्यास बंदी होती. त्यामुळे त्यांच्या एक-दोन पिढ्या या धर्माविनाच वाढलेल्या आहेत. या रशियन लोकांचे धर्माविषयी काय मत आहे, हे ऐकून घेण्याची फार इच्छा होती. रोमन यांना फक्त रशियन भाषाच येत होती आणि तातियाना ही इंग्रजी व रशियन या दोन्ही भाषांत पारंगत होती. त्यामुळे आमच्या बाजूने भाषेची दरी मिटवण्यासाठी इंग्रजी-मराठी असे दुभाषाचे काम करणे भाग होते. आमच्या सभेस येणारा व अतिशय फर्डा इंग्रजी बोलणारा राहुल याने ही जबाबदारी अगदी योग्यरीत्या पार पाडली. एकंदरीत, आमच्यात विचारांची जी देवाण-घेवाण झाली, ती प्रश्नोत्तरे स्वरूपाचीच झाली.
प्रश्न - रशियात धर्माचरण कसे चालते?
उत्तर - रशियातील लोक स्टालिन/झारच्या राजवटी- मुळे 70 हून अधिक वर्षे धर्मापासून व प्रबोधनापासून वंचित राहिले, त्यामुळेच असेल कदाचित रशियाची सध्याची पिढी ही धर्माची चांगली शिकवण न मिळाल्याने चंगळवादी प्रवृत्तीच्या आहारी गेली आहे.
प्रश्न - तुम्ही लोक धर्म मानता का?
उत्तर - रशियात धर्म मानणारे बहुसंख्य आहेत. अर्थात जी नवी पिढी आहे, ती पूर्णपणे नास्तिक आहे. पण जे जुने लोक आहेत, त्यांना धर्माचे आकर्षण अजूनही आहे. रशियामधील लोकांचा धर्मावरील विश्वास हा तिथे झालेल्या अनेक रक्तरंजित क्रांतींमुळे आणि महायुद्धात झालेल्या विध्वंसामुळे वाढला.
प्रश्न - कम्युनिस्ट आणि डेमोक्रॅटिक या शासनप्रणालींत तुम्हाला काय फरक जाणवतो?
उत्तर - कम्युनिस्ट शासनप्रणाली समानता आणि बरोबरीची संधी जरी निर्माण करून देत असली, तरी रशियातील लोक एका मानसिक गुलामगिरीत जखडून पडले. कम्युनिस्ट राज्यप्रणालीमुळे शास्त्रज्ञ किंवा विज्ञान सोडता कोणत्याही क्षेत्राचा विकास झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. लोकशाही राज्यप्रणाली रशियन लोकांना जास्त भावते, कारण तुम्ही वैचारिक प्रगती करू शकता आणि तुम्हाला वैचारिक स्वातंत्र्य असते.
प्रश्न - भारतात इतके धर्म उगम पावले आहेत- एकीकडे इतकी धार्मिकता आहे पण दुसरीकडे जातीयवाद आहे. इथे सामाजिक विषमता खूप दिसते. याबाबत तुमचे मत काय?
उत्तर - भारतात जरी धार्मिक विविधता असली तरी भारतीय धर्म- जसे हिंदू, बौद्ध, जैन हे- आदर्श जीवनासाठी आवश्यक तत्त्वे शिकवतात. त्यामुळे मला वाटते की, भारतातील लोकांचे अप्-ब्रिंगिंग हे आध्यात्मिकतेकडे झुकणारे असते.
सभा खूपच छान आणि माहितीपूर्ण झाली. सर्व सामाजिक विषमतेचे मूळ धर्मच आहे, असे मानून कम्युनिस्टांनी धर्मावर बंदी घातली; पण वैचारिक स्वातंत्र्याचा त्यात बळी गेला व एक वेगळीच गुलामगिरी सुरू झाली. धर्माचा चुकीचा, नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी धर्मावर सरसकट बंदी घालणे, हे पण अविवेकीपणाचेच एक लक्षण होते!
त्यानंतरही असे बरेच छोटे-मोठे कार्यक्रम विवेकमंच आयोजित करत होता. आकस्मिक प्रसंगी वैद्यकीय प्रथमोपचार कसे करावेत, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.विनीत कुलकर्णी हे मंचात येऊन गेले होते. कधी ‘जपानमधील समाजजीवन’विषयी मार्गदर्शन करण्यासाठी तिथे 10 वर्षे सेवा केलेल्या परिसरातीलच सिस्टर लुर्ड्स येऊन गेल्या होत्या. कधी ‘निरामय वृद्धत्व व वृद्धांची काळजी कशी घ्यावी’ यावर गॅरंटोलॉजिस्ट व या विषयातील तज्ज्ञ सौ.अमृता लवेकर यांना माहिती देण्यासाठी बोलावले होते. कधी प्रशासकीय सेवेतील संधी व स्पर्धापरीक्षा याविषयी परिसरातील विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यासाठी अमित कळवळे यांना बोलावणे असे.
तरीही मंडळाच्या कार्यकारिणीत ‘विवेकमंचात केवळ चर्चा होत असते, त्यातून काहीही निष्पन्न होत नाही’ अशी टीका आम्हाला सतत ऐकायला लागायची. आपण काही तरी ठोस करायला हवे, यावर विवेकमंचात विचारमंथन सुरू झाले. असे काही, जे दृश्य स्वरूपात लोकांना दिसेल. धर्मासंबंधी विविध विवेकी व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करून जनजागृती करणे हे तर काम होतेच आणि त्यात मोलाची जबाबदारी ॲड.अनुप डिसोझा हे परिसरातील विविध मासिकांत चिकित्सात्मक लिखाण करून बजावत होते. पण यापलीकडेही मंचाने ठोस असे भरीव कार्य करावे, असे मंचातील सदस्यांना वाटू लागले.
अशातच परिसरात एक घटना घडली. पारगाव हे उत्तर वसईतील दक्षिणेकडील शेवटचे, टोकाचे गाव. येथील एक वृद्ध मास्तर- खंड्या मास्तर यांनी मृत्यूनंतर आपले देहदान केले व हा मुद्दा आमच्या एका रविवारच्या सभेत चर्चिला गेला. देहदान आणि अवयवदान हा तेव्हा तसा दुर्लक्षितच विषय होता. समाजात याविषयी तेवढी जनजागृती नव्हती. लिव्हर, किडनी, हार्ट, त्वचा, डोळे या विविध अवयवांचे प्रत्यारोपण करता येईल इतके वैद्यकीय शास्त्र प्रगत झालेले आहे. एका बाजूला, मृत्यूनंतर आपण हे आपले अवयव वाया घालवत असतो. दुसऱ्या बाजूला, काही आजाराने हे अवयव निकामी झालेले किती तरी रुग्ण अशा अवयवांच्या प्रतीक्षेत ताटकळत असतात. ही दरी खूपच प्रचंड आहे. भारतात रोज जितके मृत्यू होतात, त्यापैकी काही लोकांचेच का असेना- जर अवयव मिळाले, तर हा प्रश्न चटकन सुटू शकतो.
तेव्हा या विषयासंबंधी परिसरात एक कार्यक्रम करावा, यावर विवेकमंचातील सर्व सदस्यांचे एकमत झाले. सुरुवात अर्थातच व्याख्यानाने करावी, असे ठरले. पीटरने यासंबंधी बराच पुढाकार घेतला. कधी कधी असे होते की, एखादा विषय चर्चेसाठी येतो, पण त्याचा पाठपुरावा न झाल्यामुळे तो मागे पडतो. पीटरला कोणत्या तरी कार्यात सहभागी व्हायचेच होते आणि विशेष म्हणजे जे विवेकमंचावर टीका करतात, त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्याला कृती करून दाखवायची होती. त्याची कार्य करण्याची तळमळ दिसत होती. त्याने हा मुद्दा बराच धसास लावलेला होता. अवयवदानाविषयी आपण काही करणार आहोत की नाही, अशी वारंवार आठवण तो विवेकमंचाला करून द्यायचा. ॲड.अनुप डिसोझा यांना वसईमध्ये ‘देहमुक्ती मिशन’ चालवणारे व अवयवदानासंबंधी कार्य करणारे पुरुषोत्तम पवार यांची माहिती मिळाली. किंबहुना, खंड्या मास्तरांनी जे वृद्धापकाळामुळे अवयवदान केले होते, त्यात पुरुषोत्तम पवारांनी त्यांच्या कुटुंबीयांना बरीच मदत केली होती. अवयवदानासंबंधी कार्य करणारी वसईत तीच एक व्यक्ती होती. तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधून अवयवदानासंबंधी एखादा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरत आहे, तोच ‘ती’ घटना घडली.
मे महिन्यातील एक संध्याकाळ. मी नुकताच कामावरून घरी आलेलो होतो व अंगणात शतपावली करत होतो. मंडळातील लायब्ररीच्या कार्यकारिणीवर असलेल्या व कधी कधी विवेकमंचाच्या सभेसही येणाऱ्या एडिसननी मला फोन केला, ‘‘तुला काही कळले का?’’
‘‘काय?’’ मी विचारले.
‘‘पीटरच्या मुलाला शॉक लागलेला आहे.’’
‘‘काऽऽय? कधी? आणि कसा? कुठे आहे तो ॲडमिट? सिरीयस आहे का?’’
‘‘अरे, अशी बातमी येतेय की, तो मरण पावला आहे.’’
‘‘काऽऽय? तू खरे बोलतोयस?’’
मला आठवतही नाही की, पुढे एडिसन काय बोलला ते. मी अगदी स्तब्ध झालो होतो. मला काही सुचेना. मी तत्काळ बाईक काढली आणि पीटरच्या घराकडे घेतली. पीटर आणि त्याची मुलगी रियोना हे दर रविवारी मंचात यायचे, त्यामुळे त्यांच्याशी बऱ्यापैकी स्नेह जमला होता. पण त्याच्या मुलाशी कधी बोलण्याचा योग आला नव्हता. अर्थात, त्याला एक-दोनदा मी पीटरबरोबर पाहिले होते. दहा दिवसांपूर्वीच मी पीटरला त्याच्या कुटुंबीयांसोबत एका हॉटेलमधून जेवण घेऊन बाहेर पडताना पाहिले होते. त्याचा मुलगा व मुलगी यांच्यात थट्टा-मस्करी चालली होती. ते चौकोनी कुटुंब वार्तालाप करीत हॉटेलमधून जाताना किती आनंदी दिसत होते. तेव्हाच मी त्या थोरल्या मुलाला- गिल्सनला शेवटचे पाहिले होते. पीटरची काय अवस्था असेल?
त्याचे घर सरांच्या बाजूलाच होते. मुलाचे प्रेत हॉस्पिटलमधून अजून आणायचे होते. घराच्या आजूबाजूला बरीच गर्दी जमली होती. घरातून रडण्याचे आवाज येत होते. मी घरात गेलो. हॉलमध्ये पीटरची बहीण कॅथरिन जोर-जोरात शोक करत होती, सोबत त्याची मुलगीसुद्धा होती. हॉलच्या कोपऱ्यात पीटर व त्याची पत्नी मॅग्देलेन हे जोरजोरात रडत होते, आक्रोश करत होते. बरीच नातेवाईक मंडळी त्यांच्या आजूबाजूला होती. दु:खाचा प्रचंड डोंगर कोसळला होता. मोठा घात झालेला होता. ‘त्यांच्या जवळ जावे का?’- मी विचार केला, पण काहीच सुचत नव्हते. मी घराबाहेर आलो.
संध्याकाळी अंगणात विजेच्या तारेचा शॉक लागून गिल्सन जागीच कोसळला, त्या वेळी त्याचे ममी-पप्पा घरीच होते. मुलाचा जोरात आवाज ऐकताच ते बाहेर आले आणि त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची लगबग सुरू केली. विजेचा जोरात धक्का बसल्याने गिल्सनचा जागीच मृत्यू झाला होता. आई-वडिलांना हे तेव्हाच जाणवले होते. गावांतील लोकांनी गिल्सनला हॉस्पिटलला नेल्यावर डॉक्टरांनी त्याला लगेचच मृत घोषित केले. तरुण मुलाचा मृत्यू झाला असल्याने पीटरच्या घराच्या परिसरात खूपच गर्दी उसळली होती. संपूर्ण समाज शोकसागरात बुडालेला होता. गाव एक वेळ आनंदात सहभागी होत नसेल, पण दु:खात मात्र संपूर्ण गाव साथ देतो. पीटर, त्याची पत्नी, त्याची मुलगी हे दु:खाच्या सागरात लोटले गेले होते.
रात्रीचे नऊ वाजत आले होते. उपस्थित लोकांमध्ये ‘बॉडी कधी आणणार?’ अशी कुजबूजही सुरू झाली होती. अचानक पीटर हॉलमधून उठला, आतील खोलीत गेला आणि त्या दु:खाच्या प्रसंगी त्याने सरांना फोन लावला. सर व इतर आप्त गिल्सनच्या बॉडीसोबत हॉस्पिटलमध्ये थांबले होते. पोस्टमॉर्टेम होत असल्यामुळे त्यांना घरी येण्यास विलंब लागत होता. ‘पीटरचा का फोन येत आहे बरं?’ म्हणून त्यांनी फोन उचलला. पलीकडून पीटर म्हणाला, ‘‘मामा, माझ्या गिल्सनचे काही अवयवदान करता येते का बघा. अवयवदान करूनच त्याला घरी आणा.’’ असे म्हणत रडतच त्याने फोन ठेवला. सरांना काय बोलावे, ते सुचलेच नाही.
स्वतःच्या तरुण मुलाचे अकाली निधन झाले असले तरी पीटरने किती मोठा निर्णय घेतला होता! अपघाताला पाच तास होत आलेले होते. घरी मृताचे दर्शन घेण्यासाठी गर्दी जमली होती, तरी मृताचा हा धीरोदात्त बाप अजूनही काही वेळ थांबायला तयार होता. पीटरने ‘अवयवदान करा’, असे म्हटल्यावर सरांनी ‘देहमुक्ती मिशन’चे पुरुषोत्तम पवार यांना फोन केला. पवारांनी मग पुढची सारी सूत्रे हातात घेतली. डोळे कसे काढावेत, हे त्यांना माहीत होते. ते त्यांनी काढून ठेवले. गिल्सनला विजेचा शॉक लागल्याने किडनी, लिव्हर हे अवयव काहीसे खराब झाले होते; पण गिल्सनची त्वचा दान होऊ शकत होती. ती काढणारे डॉक्टर मुंबईहून येणार होते. मुंबईतून वसईला येता-येता त्यांना तीन तास लागले. शेवटी डॉक्टरांनी गिल्सनच्या पाठीवरील व पायावरील भागाची त्वचा काढून घेतली. मग सर व त्यांच्यासोबत असलेले पीटरचे भाऊ, भावजी, मंडळाचे इतर पदाधिकारी व गावकरी हे गिल्सनचे प्रेत घेऊन पहाटे तीन-चारच्या सुमारास घरी आले.
मी आदल्या रात्री पीटरच्या इथे थांबून घरी आलो होतो. गिल्सनच्या अंत्यसंस्काराची वेळ सकाळी नऊची होती. दुसऱ्या दिवशी अंतिम दर्शनासाठी मी पीटरच्या घरी पोहोचलो. घर मुख्य रस्त्यापासून काहीसे आतमध्ये होते. अंत्यदर्शनासाठी खूपच मोठी गर्दी उसळली होती. पीटरच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला होता. वसईतून अंत्यदर्शनासाठी लोक येत होते. वेगवेगळ्या स्तरांतून लोक आलेले होते. गिल्सन निळ्या रंगाच्या सूटमध्ये त्या लाकडाच्या पेटीत पहुडलेला होता. ज्या पेटीत त्याला ठेवण्यात आले होते, ती पांढऱ्या रंगाची होती; कारण तो 18 वर्षांखालील होता. पेटीत बरीच फुले त्याच्या पार्थिवावर टाकण्यात आली होती. पेटीच्या पुढच्या बाजूला, जिथे गिल्सनचे डोके होते, तिथे त्याची आई गळ्यात हात टाकून जोरजोरात आक्रोश करत होती. पेटीच्या बाजूला त्याची बहीण, आजी, आत्या, काकी अशा सर्व जणी रडत होत्या. बाजूलाच बाकावरती पीटर व त्याचे बंधू बसले होते. त्यांना सांभाळण्यासाठी त्यांचे परिचित बसले होते.
मी सरांना पाहिले. सर एकटेच पेटीच्या बाजूला शून्यात नजर लावून उभे होते. विस्कटलेले केस, चेहऱ्यावरील हताश भाव, उद्विग्न चेहरा... त्यांच्या कुटुंबात तेच ज्येष्ठ असल्याने त्यांना इतरांना धीर देण्याची जबाबदारी पार पाडायची होती आणि स्वतःचे दुःख लपवायचे होते ते वेगळेच. बरोबर सकाळी 9 वाजता फादर आणि त्यांच्याबरोबर दफनभूमीतील विधींत मदत करण्यास दोन स्वयंसेवक- ज्यांना ‘ऑल्टर बॉइज’ म्हटले जाते, ते- हातात क्रूस धरून आले आणि त्यांना येताना पाहताच रडण्याचा आक्रोश आणखी जोरात सुरू झाला.
काही मिनिटांतच तरुण गिल्सनची प्रेतयात्रा त्याच्या घरून परिसरातील दफनभूमीच्या दिशेने निघाली. आपल्या कुटुंबीयांस शोकसागरात लोटून गिल्सन पैलतीरीच्या प्रवासास निघाला होता, तो कधीही परत न येण्यासाठी. दुसऱ्या दिवशी पीटरच्या घरी शोकसभेचे आयोजन केले गेले होते. तो मंडळाशी निगडित असल्याने मंडळाचे विविध पदाधिकारीही उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष जॉन आल्मेडा श्रद्धांजली म्हणून आपले सांत्वनपर मत व्यक्त करत म्हणाले, ‘‘गिल्सनचा जरी अपघाती मृत्यू झाला असला, तरी त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदान करून खूप धीराचे पाऊल उचलले आहे. आपण सर्व जण या जगाचे प्रवासी आहोत. दुर्दैवाने मृत्यू हेच शाश्वत सत्य आहे.’’ जॉन आल्मेडा त्यांच्या परीने उपस्थित जनसमुदायाला संबोधन करीत होते.
त्यानंतर बोलण्यास पुढे आले परिसरातील चर्चचे फादर कुरेल. ‘‘आज आपला बंधू गिल्सन हा आपल्यातून निघून गेला आहे. आपण सारेच दुःखी आहोत. प्रभू येशूने सांगितल्याप्रमाणे...’’ अशी त्यांनी नेहमीच्या प्रार्थनेने सुरुवात केली आणि काही गरज नसताना ते पुढे बरळले, ‘‘गिल्सनच्या कुटुंबीयांनी अवयवदान केले आहे, त्यात काही नवीन नाही. आमचे सिनिअर फादर फिलिप यांनीही अवयवदान केले होते.’’ काही लोकांना काळाचे, वेळेचे काही भानच नसते. ज्या फादरांनी अवयवदान केले होते, ते वयोवृद्ध होते आणि इथे अकाली मृत्यू झालेल्या तरुणाचे अवयदान केले होते- हा फरक फादरांना न कळावा, हे खरेच दुर्दैवी होते.
मृत्यू हे जरी जीवनाचे सत्य असले, तरी माणसाला त्याची भीती ही वाटतेच. जीवनाची क्षणभंगुरता तरुणाच्या अशा आकस्मिक मृत्यूने अधिकच गडद होते. गिल्सनच्या मरणाने सगळा समाज दुःखात बुडाला. गिल्सनला जरी मी प्रत्यक्षात भेटलो नव्हतो, तरी पीटरला मंचाच्या सभेच्या निमित्ताने दर रविवारी भेटत होतो. तसेच मीही एका मुलाचा बाप होतो, त्यामुळे पीटरची सहवेदना मी समजू शकत होतो. आपल्या मुलाचा मृत्यू पाहणे यापेक्षा आई- वडिलांचे मोठे दुःख ते काय? तो संपूर्ण आठवडा मला निराश जाणवत होता. उरात एक अनामिक भीती भरून राहिली होती. ज्या अवयवदानासंदर्भांत काही तरी करावे म्हणून पीटर प्रयत्नशील होता, त्याची नियतीने किती क्रूर परीक्षा पाहिली होती!
पण त्यात तो ज्या जोमाने पास झाला, त्याला तोड नाही. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले!’ पीटरची प्रतिमा माझ्या मनात उंचावली होती. त्याने उचललेल्या या पावलामुळे पुढे समाजात बरेच चांगले बदल घडणार होते.
माझा मित्र स्टॅनी याचाही असाच वयाच्या 27 व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या माता-पित्याला तो धक्का पचवता आला नव्हता. स्टॅनीचे आई-वडील कसे दुःखाच्या खोल गर्तेत अडकून गेले होते- किंबहुना, त्यांनी अडकवून घेतले होते, हे मी पाहिले होते. त्याला काहीसा समाजही जबाबदार होता. जवळचे कोणी मेले आहे, ‘मग सुतकी चेहरा ठेवा, घराबाहेर पडू नका, हसू नका, दुःखातच राहा’ अशी समाजाची मयताच्या कुटुंबीयांबाबत अप्रत्यक्ष इच्छा असते. ती व्यक्ती दुःखातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला समाज पुन्हा नावे ठेवण्यास मोकळा. जो समाज दुःखाच्या प्रसंगी धावत येतो, त्याच समाजाला त्या कुटुंबाने दुःखातून चटकन सावरले तर चालत नाही. काहीसे विरोधाभासाचे हे चित्र आपल्या समाजात दिसते.
पीटर आणि कुटुंबीयांचीही अशी गत तर नाही ना होणार? तो माझ्यापेक्षा किती तरी मोठा; त्याला मी काय सांगणार? त्यापेक्षा त्याला मी पत्र लिहिले तर? मला जे काही सांगायचे आहे, ते लिखित स्वरूपात त्याला द्यायचे मी ठरविले आणि मग शेवटी विवेकमंचाच्या सर्व सदस्यांतर्फे त्याला एक पत्र मी लिहिले. पीटरचे नशीब की, सरांसारखी व्यक्ती त्याच्या पाठीशी उभी होती. अशी व्यक्ती- जी विवेकी, खंबीर असा पाठिंबा देऊ शकेल. पुढच्या रविवारची विवेकमंचाची सभा होते की नाही, याबाबत मी साशंक असतानाच सरांनी मंचाची सभा पीटरच्या घरी घेण्याचे सुचविले. या निर्णयाने त्यांची प्रतिमा माझ्या मनात अधिकच उंचावली. आम्ही सर्व जण पीटरच्या घरी जमलो. सांत्वनासाठी पाहुण्यांची वर्दळ सुरूच होती. नारळाच्या शीतल सावलीने कवेत घेतलेल्या त्या अंगणात आम्ही खुर्च्या मांडून सभेला सुरुवात केली. सर पीटरला घेऊन आले. सभेची सुरुवात मी जे पीटरला पत्र लिहिले होते, त्याने झाली.
‘प्रिय पीटर आणि मॅग्देलेन,
‘तुम्हा दोघांवर आणि तुमच्या कुटुंबीयांवर हा जो मोठा आघात झालेला आहे, त्या दुःखात आम्ही सर्व जण तुमच्या बरोबर आहोत. तरुण गिल्सनच्या अकाली जाण्याने आमच्या मनाला खूप अस्वस्थ केले आणि आपले जीवन किती क्षणभंगुर आहे, या विदारक सत्याची जाणीव करून दिली. तरुण मुलाचे असे अपघाताने जाणे हे त्याच्या कुटुंबीयांसाठी व खासकरून त्याच्या माता- पित्यासाठी क्लेशदायकच असते. असे अकाली मृत्यू याअगोदरही झाले आहेत व दुर्दैवाने यापुढेही ओढवणार आहेत. या पार्श्वभूमीवर तुम्ही गिल्सनच्या अवयवदानाचा निर्णय घेऊन खूप मोलाचे कार्य केले आहे. तुम्ही किती मोठे काम केलेले आहे, हे सांगण्यासाठी अधिकृत माहिती इथे देतो.
दीड ते दोन कोटी लोकसंख्या असलेल्या व भारतातील एक प्रगत शहर असा नावलौकिक असणाऱ्या या मुंबई शहरात चालू वर्षात फक्त 19 अवयवदान झाले आहेत. अशी सरकारी दफ्तरी नोंद आहे (संदर्भ : लोकसत्ता बातमी, दि. 15 मे 2015). गिल्सनचे दान केलेले डोळे व त्वचा यामुळे पाच जणांच्या आयुष्यात आनंद फुलणार आहे. तुम्ही उचललेल्या या पावलामुळे आपल्या समाजातील घराघरांत आता अवयवदान हा विषय पोहोचला आहे. या मागील काही दिवसांत अनेक लोकांनी अवयवदानाविषयी चौकशी केली आहे व त्यांनाही अवयवदान करावेसे वाटत आहे. समाज मुळातच भित्रा असतो आणि त्याला असे वेगळे करण्यासाठी उदाहरणांची गरज भासते. तुम्ही जो काही धाडसी निर्णय घेतला आहे, त्यामुळे तुम्ही एक आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवले आहे; त्या अर्थी गिल्सनचे एका महत्त्वाच्या समस्येसाठी बलिदानच झाले.
‘आपल्या तरुण मुलाचे अकाली मृत्यू पाहिलेल्या आपल्या समाजातील दोन उदाहरणे तुम्हाला द्यावीशी वाटतात. ‘बँडमास्तर फराससरांचा खूपच अगोदर वाचलेला एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. त्यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर एका महिन्याच्या आतच ते बॅण्ड वाजविण्यासाठी एका लग्नात सहभागी झाले होते. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील- हा विचार न करता रूढी-परंपरा यांना त्यांनी छेद दिला आणि आपले दुःख विसरून ते दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी सज्ज झाले; तेव्हा खऱ्या अर्थाने ते मुक्त वाटले. त्यांच्याबद्दल त्या दिवसापासून खूपच आदर वाटत आला आहे. तो फक्त ते उत्तम बॅण्ड वाजवतात, चांगले मराठी शिकवतात म्हणून नाही; तर त्यांनी त्या क्षणी दाखवलेल्या त्या विवेकी, धाडसी निर्णयामुळे.
तुमची आठवणही अशीच एक धीट पाऊल उचलणारे आई-बाप म्हणूनच आयुष्यभर राहील. ‘काही वर्षांपूर्वी वसईतील एका दांपत्याचा एकुलता एक मुलगा ब्रेन हॅमरेजने अचानक मृत्युमुखी पडला. तेही अकाली आघातामुळे भांबावले, सैरभैर झाले; पण त्यांनी स्वतःला सांभाळले. आज वसईत जेव्हा जेव्हा असे तरुण मुला-मुलींचे अपघात होऊन मृत्यू होतात, तेव्हा तेव्हा हे दांपत्य तिथे जाऊन त्यांच्या पालकांचे, कुटुंबीयांचे सांत्वन करते. ‘तुम्हीही या आघातातून स्वतःला सावरा व आपापल्या आवडीच्या गोष्टींमध्ये झोकून द्या. आपल्या मुलाचे अवयवदान करून एक उदाहरण तर तुम्ही या समाजापुढे ठेवलेच आहे; आता या दुःखातून बाहेर पडून, सामान्य आयुष्य जगून समाजापुढे दुसरे उदाहरण ठेवा.
आपण सर्व जण हे काही काळाचेच सोबती आहोत. मरण सर्वांनाच येणार आहे. किती तरी तरुण मुले ही अपघातात, आजारात, नैसर्गिक आपत्तीत, युद्धात अशी अकाली दगावतात. नेपाळमधील भूकंपात कितीतरी लहान मुले दगावली. किती तरी मुलांचे आई-बाप आपले सर्वस्व गमावून बसले. भावनिक, आर्थिक, शारीरिक, सामाजिक सर्वच पातळ्यांवर त्यांची वाताहत झाली. परंतु नियती अशी कठोर परीक्षा पाहतच असते. आम्हाला आशा आहे की, तुम्ही सर्व जण यातून लवकरच बाहेर याल आणि उद्या ज्या पालकांवर असे आघात होऊ शकतात, त्यांच्यासाठी एक दीपस्तंभ व्हाल.
आपलाच, विवेकमंच’
सभेसाठी मंडळाचे अध्यक्ष जॉन आल्मेडा हेही उपस्थित होते. फादर कुरेल यांनी शोकसभेच्या वेळी जे असंवेदनशील वक्तव्य केले होते, त्यासंबंधी त्यांनी नाराजी व्यक्त केली. आमचे हे असे डिस्कशन चालू आहे, तोच पीटरला भेट देण्यासाठी दूरच्या गावातील फादर मायकल हे आले. पीटरच्या कुटुंबीयांशी बोलून, त्यांचे सांत्वन करून मग तेही सभेत सहभागी झाले. अवयवदानासंबंधी चर्चा सुरू होती.
तेव्हा त्यांनी आपले मत मांडताना म्हटले, ‘‘अवयवदान वगैरे सगळे ठीक आहे, पण मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या भावनांचा आदर केला गेला पाहिजे, असे मला वाटते. त्यांच्या भावना दुखावता कामा नयेत.’’ असे बोलून त्यांनी त्यांच्या चर्चमध्ये पाहिलेले उदाहरण सांगितले. ‘‘एकदा आमच्या येथे एका कुटुंबीयांनी तसा निर्णय घेतला होता आणि जे अवयव घेण्यास आले होते, त्यांनी सगळ्यांसमोर चर्चमध्ये मृत देहाची त्वचा काढण्यास सुरुवात केली. ते रक्त, त्वचा काढण्याचे ते त्यांचे कार्य! किती किळसवाणे होते.’’ किळसवाणेपणाचे भाव आपल्या चेहऱ्यावर आणत ते पुढे म्हणाले, ‘‘माझे म्हणणे आहे की, अवयव घ्या पण मृत व्यक्तीच्या शरीराचा सन्मान ठेवा. तसेच त्यांच्या नातेवाइकांच्या भावनांचा आदर ठेवला गेला पाहिजे, असे मला वाटते.’’
यावर सर म्हणाले, ‘‘त्वचा किंवा इतर अवयव सर्वांदेखत काढत नाहीत. ते करताना नातलगांना लांब ठेवायला हवे होते.’’ तेव्हा फादर म्हणाले, ‘‘तेच तर मी म्हणतोय. कोणीतरी ते करायला हवे होते.’’ आपल्या मनातील भाव जराही चेहऱ्यावर वा आवाजात न जाणवून देता सर बोलले, ‘‘कोणी तरी म्हणजे कोणी? नातेवाईक तर दु:खात होते, तुम्हीही तिथे हजर होता; तुमच्यातील लीडरने त्या प्रसंगाचा ताबा घेऊन ती परिस्थिती नियंत्रणात आणायला हवी होती; नाही का?’’ फादरांना आपली चूक काहीशी उमगली होती आणि मग त्यांनी ‘हो, हो, खरं आहे तुमचे.’ म्हणून त्यास दुजोरा दिला.
अवयवदानाची चळवळ ही आता पुढे न्यायचीच हा निश्चय करून आमची ती विवेकमंचाची सभा आटोपली. गिल्सनची त्वचा आणि डोळे दान केल्यानंतर काही दिवसांनी मुंबई येथील काळबादेवी येथे एका इमारतीला आग लागली आणि ती आग विझवताना अग्निशमन विभागाचे कर्मचारी व अधिकारी हे गंभीररीत्या भाजले. त्यातील काही आधिकाऱ्यांना गिल्सनच्या दान केलेल्या त्वचेमुळे जीवदान मिळाले. गिल्सन जरी देवाघरी गेलेला असला, तरी त्याच्यामुळे या समाजाच्या कामी येणाऱ्या धीरोदत्त अधिकाऱ्यांचे प्राण वाचले होते.
अवयवदानासंबंधी व्याख्यान आयोजित करण्याचे ठरल्यावर आम्ही तत्काळ त्या गोष्टीचा पाठपुरावा करून एका महिन्याभरातच कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली. कार्यक्रमासाठी ‘देहमुक्ती मिशन’चे पुरुषोत्तम पवार-पाटील यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित केले. वैद्यकीय क्षेत्राशी हा विषय निगडित असल्याने वसईतीलच डॉक्टर जॉन डिसुझा यांनाही वक्ता म्हणून आमंत्रित केले. त्याचबरोबर समाजातील ज्या-ज्या लोकांनी त्यांच्या नातलगांचे मृत्यूनंतर अवयवदान किंवा देहदान केले होते, त्यांचा व ज्यांनी जिवंतपणी किडनी किंवा तत्सम अवयव देऊन आपल्या निकटवर्तीयांचे प्राण वाचविले होते त्यांचाही सत्कार करण्याचे ठरले.
कार्यक्रमाचे बॅनर तयार करून ते वेगवेगळ्या मोक्याच्या ठिकाणी लावले गेले. चांगली जाहिरात केली. हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून फेसबुक, व्हॉट्सॲपवरूनही आम्ही कार्यक्रमाचा मेसेज शक्य तितक्या लोकांना फॉरवर्ड केला. दुर्दैवाने कार्यक्रमाच्या दिवशीच आणखी एक हेलावून टाकणारी घटना घडली. रविवारी संध्याकाळी आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता आणि रविवारी सकाळी मूळचे वसईचे रहिवासी व बोरिवली येथे राहणारे नेल्सन मिनेजस यांचा मॅरेथॉनदरम्यान धावताना हृदयविकाराच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला.
नेल्सन हे वसईतील युवकांमध्ये खूप प्रसिद्ध होते, अंगभूत करिष्मा असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे येथील समाजाला खूपच मोठा असा तो धक्का होता. दुर्दैवी योगायोग म्हणजे आम्ही जी फेसबुकवरून अवयवदानाच्या या कार्यक्रमाची जाहिरात केली होती, त्याविषयी नेल्सनलाही कुतूहल निर्माण झाले होते. त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितले होते की, सकाळी मी मॅरेथॉन धावेन आणि दुपारी आपण जेवण करून वसईला जो अवयवदानाचा कार्यक्रम आहे तिथे जाऊ या. दुर्दैवाने त्यांचा सकाळीच असा अकाली मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने एक मोठे पाऊल उचलले. अवयवदानाच्या कार्यक्रमासाठी जायचेच होते म्हणून त्यांचे डोळे दान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला.
संध्याकाळी कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमात पुरुषोत्तम पवार यांनी अतिशय सुंदर विचार व्यक्त केले. ‘‘मृत्युपश्चात आपण मृताच्या शरीरावरचे सोन्यासारखे दागिने पटकन काढून घेतो, पण सोन्याहूनही अमूल्य असलेले असे अवयव तसेच नष्ट होऊ देतो.’’ पुढे ते म्हणाले की, माणूस जिवंतपणी त्याची वेगवेगळी अशी ओळख कुरवाळत असतो, परंतु अकस्मात अशा मृत्यूनंतर मात्र ही ओळख क्षणात पुसली जाते व ती शरीरापुरतीच राहते. त्यामुळे मृत्यूनंतरही आपली ओळख कायम राहावी म्हणून अवयवदान, देहदान करा- असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
भारतात अवयवदान, देहदानाची संख्या कशी खूपच नगण्य आहे आणि त्यासंदर्भात मोठी जनजागृती होणे कसे गरजेचे आहे, यासंबंधीही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याच कार्यक्रमात परिसरातील सर्जन डॉक्टर जॉन डिसुझा हेही उपस्थित होते. त्यांनीही वेगवेगळ्या अवयवदानाविषयी बहुमूल्य माहिती दिली. सध्याच्या काळात नेत्रदान, त्वचादान व देहदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. डोळ्यांबरोबरच हृदय, फुप्फुस, मूत्रपिंड, यकृत, स्वादुपिंड, आतडी या अवयवायांचे दान व प्रत्यारोपण कसे करता येते, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. त्याच कार्यक्रमात आधी ठरविल्याप्रमाणे ज्या कुटुंबीयांनी त्यांच्या नातेवाइकांच्या मृत्युपश्चात अवयवदान व देहदान केले होते, त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ज्यांनी हयातीत किडनीदान केले आहे, त्यांचाही खास सत्कार मंडळातर्फे करण्यात आला.
कार्यक्रमास परिसरातील लोकांची बरीच गर्दी होती. कार्यक्रम आटोपून नेल्सन यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. त्यांचा मृतदेह त्यांच्या पळसवाडी येथील गावात आणलेला होता. लोकांची अभूतपूर्व अशी गर्दी त्यांच्या अंत्यदर्शनाला उसळली होती. यावरून पंचक्रोशीत ते किती प्रसिद्ध होते याची प्रचिती आली. खूपच तरुण व धडाडी असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या नेत्रदानामुळे मात्र एक झाले की, हे अवयवदान आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचले. नेल्सन यांच्या मृत्यूनंतर समाजात जे काही मृत्यू झाले, त्या वेळीही सक्रियता ठळकपणे दिसून आली.
उमेळा या गावातील मिल्टन डिसोझा यांच्या वडिलांचे जेव्हा निधन झाले, तेव्हा त्यांचे डोळे दान करण्यात आले. त्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाला, तिच्या कुटुंबीयांनीही तिचे नेत्रदान केले. ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’ याप्रमाणे अवयवदान करण्याची एक मानवी साखळीच तयार झाली आणि ही चळवळ परिसरात अधिकच सक्रिय झाली. याचा उच्चांक म्हणजे आगाशी या गावातील एकाच कुटुंबातील 80 जणांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्याची नोंदही ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने आणि विविध न्यूज चॅनेलद्वारे देशपातळीवरसुद्धा घेतली गेली.
पुरुषोत्तम पवार यांचे जे व्याख्यान आम्ही आयोजित केले होते, त्याच धर्तीवर इतर सामाजिक संस्थांनी त्यांची व्याख्याने बऱ्याच पॅरिशेसमध्ये आयोजित केली. त्यामुळे अवयवदानासंदर्भात अभूतपूर्व अशी जनजागृती झाली. पारगाव येथील खंड्या मास्तरांनी जेव्हा मृत्युपश्चात देहदान केले तोपर्यंत जे काही अवयवदान व्हायचे ते वृद्ध, ज्येष्ठ अशा व्यक्तीपुरतेच सीमित असायचे. परंतु अकाली किंवा अपघाताने मरण पावलेल्या तरुण लोकांचे नातेवाईक दुःखात इतके बुडालेले असतात की, त्यांना अवयवदानाविषयी विचारण्याची कोणाची हिंमत होत नाही. अशा संदर्भात गिल्सनबद्दल पीटरने जे धाडसी पाऊल उचलले, त्यातून समाजात एक आदर्श निर्माण झाला. मग अवयवदानाची ही साखळी निर्माण झाली. अवयव हे असेच मातीत जाण्यापेक्षा आपण ते अवयव काढून गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवू शकतो, ही जाणीव समाजात अधिकच दृढ झाली.
जे अगोदर विवेकमंचाला दूषणे द्यायचे की- हे लोक काहीच करत नाहीत, फक्त चर्चाच करत राहतात; त्यांना आता उत्तर मिळाले होते. विवेकमंचाच्या सदस्याने या परिसरात अवयवदानासंबंधी जी कृती केली होती, त्यामुळे या विषयाला अनपेक्षितरीत्या भरीव अशी मदत झाली होती. आपल्या मृत्यूनंतर आपले शरीर व अन्य अवयव इतर व्यक्तीच्या उपयोगी पडले, तर त्यासारखे पुण्य असू शकणार नाही. मंचातील सर्व सदस्यांनीही अवयवदानाचे फॉर्म भरले. विवेकमंचाने मग अवयवदानासंबंधी अधिकच जनजागृती व्हावी म्हणून निबंधस्पर्धाही आयोजित केली. अवयवदान हा विषय तसा नवा आहे; पण या स्पर्धेसाठी विद्यार्थी गटातून, कॉलेज गटातून, खुल्या गटातून अनेक जणांनी आपली मते व्यक्त केली, विचार मांडले आणि या स्पर्धेला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला.
माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या अवयवाच्या रूपाने आपली आवडती व्यक्ती जिवंत राहू शकते. अवयवदानाचा निश्चय करून आपण मानवजातीची ही ज्योत दीर्घ काळ तेवत ठेवू शकतो. अवयवदानासंबंधात काम करणारे मुकेश कुंदन यांनी लिहिलेली हिंदी कविता इथे उद्धृत करावीशी वाटते.
जीने के लिये जीना ही जिंदगी है, न की मरने के लिए,
मरकर भी तो जिया जा सकता है, इस जमींपर लोगों के लिए,
दे भी तो वो रहा हॅूं जिसकी मुझे अब जरुरत नहीं,
किसी के भी काम न आ सकू इतना भी गया-गुजरा नहीं,
न चिता की राख बनूँगा, न कबर मे कैद रहूँगा,
मेरी फितरत आजादी में, मै आजाद ही रहूँगा।
Tags: manch 15 daniel mascarenhas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या