माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून गौतम म्हणाला, "अरे प्रकाश, काकांना काय ते नीट सांग. आणि त्यांना घरात तरी घेशील की नाही?' "काका, मला पडलेली स्वप्नं ह्या फळ्यावर काढतो, म्हणजे ह्या दारावर काढतो. माझ्या किनई स्वप्नात सारखे प्राणीच प्राणी येतात. प्रकाशचं बोलणं ऐकत, मी त्याची रंगीत स्वप्नं काळजीपूर्वक पाहिली. मी प्रकाशचा हात धरून आत गेलो आणि मला आणखी कितीतरी आश्चर्याचे झटके बसले. प्रकाशचं वय वर्ष साडेपाच. प्रकाशला फक्त प्राण्यांचीच चित्र काढायला खूप आवडतात. इतकंच नाही; तर वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रं जमवायला पण आवडतात. घरात जागा मिळेल तिकडे त्याने वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रं चिकटवली होती. काही चित्र जमवलेली तर काही त्यानेच काढलेली. पण एक विशेष गोष्ट होती. प्रकाशने एकही चित्र, बघून काढलेलं नव्हतं.
प्रिय मुलांनो, अनेक आशीर्वाद. अचानक गौतम कांबळे भेटला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. गौतम माझा शाळेतला मित्र. आम्ही चार वर्षे एकाच वर्गात होतो. बाजू- बाजूच्या बाकावर बसायचो. (मुलांनो, आपला शाळेतला जुना मित्र, जर आपल्याला खूप खूप वर्षांनी भेटला तर किती आनंद होतो, हे बहुधा आज तुम्हांला कळणार नाही.) मी त्याला काही विचारण्याअगोदरच त्याने माझा ताबा घेतला. माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणाला, 'चल, आधी घरी चल. मी इथेच राहतो जवळ.' माझ्या कामानिमित्त मी ह्या नवीन गावात आलो होतो आणि अचानक गौतमची भेट झाली. आम्ही शाळेतल्या जुन्या आठवणी जागवत, त्याच्या घरापाशी पोहोचलो. आणि आश्चर्याचा धक्का क्रमांक दोन बसला कारण, त्याच्या घराचा दरवाजा उघडण्याची मला हिंमतच होईना. मला वाटलं गौतम माझी गंमत करतोय. हा दरवाजा नसणारच. मी दरवाजा समजून उघडायचा प्रयत्न करीन आणि मग माझी मस्त फजिती होईल. झाडाबिडामागे लपलेली मंडळी मग फॅ फॅ करून हसतील. माझ्या मनातले विचार, बहुधा गौतमने ओळखले.
तो माझा खांदा थोपटत म्हणाला, 'मित्रा, खरंच हे दार आहे. उघड' सहा फूट उंच आणि तीन फूट रूंद असा तो भला मोठा फळा होता. त्या काळ्या कुळकुळीत फळ्यावर पांढऱ्या, लाल, पिवळ्या आणि निळ्या रंगांच्या खडूने चित्र काढलेली होती. फळ्याच्या एका कोपऱ्यात खडूची पिशवी आणि दुसऱ्या कोपऱ्यात डस्टर टांगून ठेवले होते. चित्रसुद्धा एकदम भन्नाटच होती. झाडावर बसलेले मासे. नदीवर चालणारी सायकल. दात घासणारी मोठी माणसं आणि लांब शेपटीची माकडं. आणि एका माकडाच्या बाजूला लिहिलं होतं 'बाजूला ढकला.' त्याच्या बाजूला तोंड वेंगाडून हसणारा झेब्रा. आता मला सांगा, या सर्व प्रकाराला 'दरवाजा' कसं काय म्हणायचं? हा माझ्यापुढे प्रश्न होता. दरवाजा उघडण्यासाठी मी तो हळूच ओढला. पण तो उघडलाच नाही. मी तो जोरात ढकलला. पण काहीच झालं नाही. माझी अडचण ओळखून गौतम काही बोलणार, इतक्यात तो दरवाजा अगदी अलगदपणे बाजूला सरकला आणि घरातून एक छोटा मुलगा बाहेर आला. त्याचं नाव प्रकाश, दाट कुरळ्या केसांचा प्रकाश चुणचुणीत आहे. प्रकाश दाराजवळच थांबला. एक हात दारावर ठेवत, ऐटीत मला म्हणाला, 'काका, माझी स्वप्नं कशीएत?' मला काही कळलंच नाही.
माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून गौतम म्हणाला, "अरे प्रकाश, काकांना काय ते नीट सांग. आणि त्यांना घरात तरी घेशील की नाही?' "काका, मला पडलेली स्वप्नं ह्या फळ्यावर काढतो, म्हणजे ह्या दारावर काढतो. माझ्या किनई स्वप्नात सारखे प्राणीच प्राणी येतात. प्रकाशचं बोलणं ऐकत, मी त्याची रंगीत स्वप्नं काळजीपूर्वक पाहिली. मी प्रकाशचा हात धरून आत गेलो आणि मला आणखी कितीतरी आश्चर्याचे झटके बसले. प्रकाशचं वय वर्ष साडेपाच. प्रकाशला फक्त प्राण्यांचीच चित्र काढायला खूप आवडतात. इतकंच नाही; तर वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रं जमवायला पण आवडतात. घरात जागा मिळेल तिकडे त्याने वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रं चिकटवली होती. काही चित्र जमवलेली तर काही त्यानेच काढलेली. पण एक विशेष गोष्ट होती. प्रकाशने एकही चित्र, बघून काढलेलं नव्हतं. त्याची चित्र म्हणजे छापील चित्रांची नक्कल नव्हती. त्याला जे वाटायचं तेच तो काढायचा. त्यामुळे त्याची चित्र ही 'खास त्याचीच' होती. बहुधा जगात कुठेही पाहायला मिळणार नाहीत, अशी 'दुर्मिळ चित्र' प्रकाशने त्याची चित्रकलेची वही मला दाखवली. वहीतलं पहिलंच चित्र दाखवून तो म्हणाला, 'ओळखा पाहू हे चित्र कुणाचं आहे? पटकन् सांगा. एकदम सोपं आहे."
मी वेगवेगळ्या कोनातून त्या चित्राकडे पाहिलं. पण ते 'महान चित्र' ओळखणं केवळ अशक्य होतं. माझा बापुडवाणा चेहरा पाहून तो सहजी म्हणाला, 'काका, कमालच आहे हं तुमची! काळ्या रंगातलं एवढं स्पष्ट चित्र तुम्हांला ओळखता येत नाही? अहो, दुपारच्या वेळी छत्री घेऊन जाणारा हा गेंडा आहे. पहा नं नीट' 'छत्री घेतलेल्या गेंड्याच्या मदतीने,' मी पुढची चार-पाच चित्र ओळखली तेव्हा प्रकाशला खूप आनंद झाला. पिशवीभर गाजरं घेऊन पळणारा ससोबा, चहा पिणारा वाघोबा, गप्पा मारणारे साप.' अशी ती 'दिसायला सुंदर पण ओळखायला कठीण' चित्रं होती. 'काका, माशांनी जर तोंड उघडलं तर त्यांच्या तोंडात पाणी जातं का हो? आणि ते पाणी पितात की चूळ मारतात?' प्रकाशच्या ह्या प्रश्नाने क्षणभर माझ्याच नाका तोंडात पाणी गेल्यासारखं वाटलं. मी 'त्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधीच प्रकाश म्हणाला, 'माशांची आई आपल्या बाळांना हाका कशी मारते? छोटे छोटे मासे एकमेकांशी कसे बोलतात हो काका? सांगा ना मला.' आता माझी अवस्था माशासारखी झाली. म्हणजे तोंड उघडलं पण शब्द काही फुटेना. माझ्या कानातून हवेचे बुडबुडे येत आहेत, असं मला उगाचंच वाटलं. माझी निघायची वेळ झाली होती. मी प्रकाशला शाबासकी देत तो 'स्वप्नांचा दरवाजा' सरकवला आणि बाहेर आलो. 'मुलांनो. 'तुमची स्वप्नं पाहण्याची दृष्टी जर आम्हा मोठ्या माणसांना मिळाली, तर तुमचे प्रश्न आम्ही ओळखू शकू आणि सोडवू पण शकू.' असं स्वप्नांचा दरवाजा सरकवताना, वाटलं मला. तुम्हांला काय वाटतं? कळावे, घरच्या सर्वांना नमस्कार.
तुमचा, राजीवदादा
Tags: राजीव तांबे बालसाधना Rajeev Tambe Balasadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या