डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कुलकर्णीसर आयुष्यभर अतिशय कडक शिस्तीत वावरले होते. आपल्या शाळेतील मुला-मुलींवर योग्य संस्कार करणे आणि त्यांना घडविणे हेच त्यांनी आपल्या जगण्याचे प्रयोजन मानले होते. आजींनीही त्यांचा प्रत्येक शब्द इमानेइतबारे झेलला होता. स्वतःच्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालत काटकसरीने संसार केला होता. सरांच्या मुलीकडून मला त्यांच्याबद्दल थोडेफार समजले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सर आजींना भेटायला आले, तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्यांनी आपल्या खिशातून एका चुरगळलेल्या पुडीतून आजींसाठी चक्क मोगऱ्याचा गजरा आणला होता. सिस्टरांना बोलावून त्यांनी तो आजींच्या केसांत माळायला सांगितला होता. आजी मात्र त्यांच्या मानसिक आजारामुळे सरांचे हे प्रेम समजू शकत नव्हत्या, याची मला तेव्हा खंत वाटली होती. 

आयुष्यभर पहाडासारखा खंबीर व स्थितप्रज्ञ असलेला माणूस आयुष्याच्या संध्याकाळी मात्र कसा भावुक अन्‌ हळवा होतो, हे आम्ही संवेदना शुश्रूषा केंद्रात वारंवार अनुभवत असतो. कुलकर्णीसरांच्या बाबतीत तर त्यांची शिस्त आणि दरारा अनुभवलेले विद्यार्थी व परिचितांना त्यांचं हे आत्ताचं बदललेलं रूप पाहून विश्वासही बसणार नाही. दर महिन्याच्या चार तारखेला सायंकाळी सहा-सातच्या दरम्यान सरांचा मला न चुकता फोन येतो. आजही त्याप्रमाणे सरांचा फोन आला होता. 

‘‘हॅलो डॉक्टर, कुलकर्णीसर बोलतोय.’’ 

‘‘नमस्कार सर, कसे आहात?’’ 

‘‘मी बरा आहे. उद्या किती तारीख आहे, लक्षात आहे ना?’’ 

‘‘होय सर, पाच तारीख आहे.’’ 

‘‘मग या वेळी काय पाठवायचे आहे?’’ 

‘‘तुमच्या इच्छेनुसार काहीही पाठवा सर.’’ 

‘‘तसे नाही, तुम्ही सांगा. तेथील लोकांना काय दिलेले चालते, ते तुम्हाला अधिक माहीत आहे.’’ 

‘‘या वेळी क्रीमची बिस्किटे पाठवा सर.’’ 

‘‘बिस्किटे पाठवू? ठीक आहे. पण त्यामध्ये मैदा अधिक असतो ना?’’ 

‘‘फार तर गव्हाची पाठवा सर. येथील लोकांना कोरडा खाऊच अधिक आवडतो.’’ 

‘‘ठीक आहे. उद्या सकाळी पाठवितो.’’ असं म्हणत सरांनी फोन बंद केला. 

गेले वर्षभर दर महिन्याला काय वेगळा पदार्थ निवडावा, असा मला प्रश्न पडायचा. दिवाळीचा फराळ झाला, ड्रायफ्रूट्‌स झाले, संक्रांतीला तिळाच्या वड्या झाल्या, 15 ऑगस्टला तुपातील जिलेबी झाली, गणपतीला उकडीचे मोदक झाले, कोजागरीला मसाला दूध झाले. रवा, साखर, मैदा वगैरे बऱ्याच गोष्टी सरांनी देऊन झाल्या होत्या. संवेदना शुश्रूषा केंद्रात आजी पाच तारखेला गेल्या होत्या आणि त्यांची आठवण म्हणून दर महिन्याच्या पाच तारखेला येथील लोकांसाठी सर काही तरी मिठाई न चुकता कोणाकडून तरी पाठवून द्यायचे. 

आजींना डिमेनशिया होता. डिमेनशिया हा खरं तर आजार नसून लक्षणांचा समूह असतो. याला ‘विसरण्याचा आजार’ असेही म्हणताता. मेंदूच्या कोणत्या भागाची हानी झाली आहे, यावर त्याची लक्षणे अवलंबून असतात. कधी कधी या व्यक्तीला पूर्वीच्या काही गोष्टी थोड्याफार प्रमाणात आठवू शकतात. या आजी मात्र फारसं कोणाला ओळखूही शकत नव्हत्या. पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य सदैव विलसत असायचे. त्यांचे ते लोभस हास्य पाहून सर्व जणच त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची आस्थापूर्वक सेवा-शुश्रूषा ही भूमिका उराशी बाळगून आम्ही हे संवेदना शुश्रूषा केंद्र सुरू केले आहे आणि सुरुवातीलाच एका निर्मळ व निरागस आजींची सेवा-शुश्रूषा करण्याची संधी आम्हास लाभली होती. अलगद पापण्या मिटत एखाद्याने सुखाने निद्राधीन व्हावे, असा त्यांना लाभलेला मृत्यू पाहून साक्षात मृत्यूही त्यांच्या चेहऱ्यावरचे ते लोभस हास्य हिरावून घेताना ओशाळला असेल, असे आजी गेल्या तेव्हा मला वाटले होते. 

आजींना आमच्याकडे भरती करताना त्यांच्या मुलीची खूपच घालमेल झाली होती. प्रथमदर्शनी खंबीर आणि कणखर वाटणारी ती भगिनी जेव्हा माझ्या खांद्यावर डोके टेकवून ओक्साबोक्शी रडू लागली, तेव्हा मीही हेलावून गेलो होतो. 

‘‘डॉक्टर, तुम्ही मला माझ्या भावासारखे आहात. आईला मोठ्या विश्वासाने तुच्याकडे सुपूर्द करते आहे.’’ ती रडत-रडत म्हणाली होती. 

‘‘भाऊ म्हटले आहे ना; मग आता डोळे पुसा आणि बिनधास्तपणे पुण्याला जा. मी तुचा विश्वास आणि भरवसा सार्थ ठरवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन.’’ मी तिला शब्द दिला होता. 

या वेळी तिला आपल्या भावाची जाणवत असलेली उणीव मी समजू शकत होतो. तो कॉलेजमध्ये असताना एका अपघातात वारला होता. तेव्हापासूनच आजींचा मानसिक आजार दिवसेंदिवस बळावत गेला होता. सरांना शक्य होते तोपर्यंत त्यांनी आपल्यापरीने आजींची देखभाल केली होती. पण आता वयपरत्वे त्यांनाही ते जिकिरीचे होऊ लागले होते. जवळपास पंधरा वर्षे अधून-मधून करावे लागणारे हॉस्पिटलायझेशन आणि आजींचे होणारे हाल त्या दोघांनाही बघवेनासे झाले होते. त्यामुळे आता केवळ सेवा-शुश्रूषा करत राहण्याचा निर्णय घेऊन त्यांनी आजींना आमच्याकडे भरती केले होते. रोज सायंकाळी चारच्या दरम्यान आजोबा आजींना भेटायला नियमितपणे यायचे. कधी खडीसाखर, कधी लेनगोळ्या, तर कधी कॅडबरी असे रोज वेगवेगळे पदार्थ घेऊन यायचे. आजींना गोड खूप आवडायचे. त्यामुळे असा कोरडा खाऊ त्या मिटक्या मारीत खायच्या आणि सर आजींच्या डोळ्यांत आपली ओळख शोधत राहायचे. 

‘‘घरात मला एकट्याला वेळ जात नाही. रिकामे घर खायला उठते.’’ सर कासावीस होऊन सांगायचे. 

आपण जे बोलतो आहे ते आजींना समजत नाही, हे माहीत असूनही सर रोज तासभर असेच काहीबाही आजींशी बोलत राहायचे. त्यांना आजींबद्दल वाटणारा जिव्हाळा आणि प्रेमी सहा-सात महिने जवळून अनुभवले आहे. 

एक डॉक्टर या नात्याने एखाद्या रुग्णामध्ये इतके गुंतणे बरे नाही, हे समजत असूनही ‘आजी गेल्या’ हे सरांना सांगताना माझ्या डोळ्यांत दाटणारे अश्रू मी तेव्हा रोखू शकलो नव्हतो. दुसऱ्या दिवशी फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे कुलकर्णीसर बिस्किटांच्या पुड्यांची पिशवी घेऊन स्वतःच संवेदनामध्ये आले. ते पाहून मला नवल वाटले. दर वेळी ते कोणाला तरी पाठवून द्यायचे. या वेळी मात्र स्वतःच आले होते. मी त्यांना नमस्कार करून खुर्चीत बसायला सांगितले. 

‘‘बघता-बघता वर्ष सरले बघा डॉक्टर.’’ सर आवंढा गिळत म्हणाले, ‘‘येत्या चोवीस तारखेला तिथीनुसार पुण्यतिथी आहे. माझी मुलगी तुम्हाला फोन करेलच. तुम्ही दोघांनीही आवर्जून यायचे आहे.’’ 

‘‘हो सर, नक्की येणार.’’ मी सरांना म्हणालो. 

शुश्रूषा केंद्राची व्यवस्थापिका माधुरीला बोलवून मी सरांकडून बिस्कीट पुड्यांची पिशवी घेऊन जायला सांगितले. सरही जड पावलांनी माधुरीपाठोपाठ शुश्रूषा केंद्रात गेले. थोड्या वेळाने शुश्रूषा केंद्रातील सर्वांची विचारपूस करून सर परत माझ्याकडे ऑफिसमध्ये आले. पुन्हा एकदा मला आजींच्या पुण्यतिथीला येण्याचे बजावून त्यांनी माझा निरोप घेतला. बिस्कीट पुड्यांची रिकामी झालेली पिशवी हातात घेऊन परतणारी त्यांची पाठमोरी आकृती पाहून मला आजी आमच्या शुश्रूषा केंद्रात अँडमिट होत्या, तेव्हाचा एक प्रसंग आठवला. 

एकदा आजींची एक जुनी मैत्रीण आजींना भेटायला आली होती. आजींनी तिला मात्र नावानिशी ओळखले होते. आजींच्या त्या मैत्रिणीने त्या वेळी केसांत मोगऱ्याचा गजरा माळला होता. आजींना तो आवडला  असावा. त्या आपल्या मैत्रिणीकडे तो गजरा मागू लागल्या. आपण एकदा वापरलेला गजरा कसा द्यायचा, असा प्रश्न आजींच्या मैत्रिणीस पडला असावा. त्या आजींचा कसाबसा निरोप घेऊन निघून गेल्या. थोड्या वेळाने आजींच्या त्या मैत्रिणीने आपल्या सुनेला पाठवून दिले. त्यांनी आजींसाठी एक नवा गजरा बनवून पाठविला होता. पण तोपर्यंत आजी आपण आपल्या मैत्रिणीकडे गजरा मागितल्याचे विसरल्या होत्या. शेवटी आजींच्या मैत्रिणीच्या सुनेने तो गजरा ट्रॉलीवर तसाच ठेवून दिला व ती निघून गेली. त्या दिवशी सायंकाळी सर नेहमीप्रमाणे आजींना भेटायला आले. त्या वेळी त्यांनी त्या ट्रॉलीवर ठेवलेल्या गजऱ्याबद्दल विचारले. मी त्यांना घडलेली सर्व हकिगत सांगितली. 

‘‘आयुष्यभर कधी हौस-मौज केली नाही, नटली-थटली नाही आणि आता या वयात असे कसे वागू लागली आहे?’’ सर तेव्हा काहीसे अंतर्मुख होऊन म्हणाले होते. 

कुलकर्णीसर आयुष्यभर अतिशय कडक शिस्तीत वावरले होते. आपल्या शाळेतील मुला-मुलींवर योग्य संस्कार करणे आणि त्यांना घडविणे हेच त्यांनी आपल्या जगण्याचे प्रयोजन मानले होते. आजींनीही त्यांचा प्रत्येक शब्द इमानेइतबारे झेलला होता. स्वतःच्या इच्छा- आकांक्षांना मुरड घालत काटकसरीने संसार केला होता. सरांच्या मुलीकडून मला त्यांच्याबद्दल थोडेफार समजले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सर आजींना भेटायला आले, तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्यांनी आपल्या खिशातून एका चुरगळलेल्या पुडीतून आजींसाठी चक्क मोगऱ्याचा गजरा आणला होता. सिस्टरांना बोलावून त्यांनी तो आजींच्या केसांत माळायला सांगितला होता. आजी मात्र त्यांच्या मानसिक आजारामुळे सरांचे हे प्रेम समजू शकत नव्हत्या, याची मला तेव्हा खंत वाटली होती. 

त्या दिवशी तो गजरा देताना आणि गेले वर्षभर येथील वृद्धांना मिठाई पाठवून देताना आपल्यासोबत संसार करता- करता आजींचे स्वतःसाठी जगायचे राहून गेले आहे, ही सरांना झालेली जाणीव आणि मनाला वाटणारा सल मी समजू शकत होतो. पण सरांचे हे अव्यक्त प्रेम आता आजींना कसे समजणार? 

Tags: कुलकर्णी सर डिमेनशिया संवेदना शुश्रूषा केंद्र डॉ. दिलीप शिंदे अव्यक्त प्रेम जगण्याचे भान Kulkarni Sir Sangali Sanvedana Shusrusha Kendra Dr. Dilip Shinde ayakt prem Jagnyache bhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके