डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

‘‘या वयात तुम्हाला अख्खा दिवस आमच्यासारख्या अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांसोबत घालवताना उदास वगैरे वाटत नाही का?’’ आजोबांनी हसत हसत विचारले. ‘‘तसे काही नाही आजोबा. उलट या क्षेत्रात काम करण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला भाग्यवानच समजतो. तुच्यासारख्या ज्येष्ठांशी संवाद साधताना मला जगण्याचे तत्त्वज्ञान रोज नव्याने शिकायला मिळते. इतकी वर्षे जे विविध विषयांवरची पुस्तके वाचून आणि व्याख्याने ऐकून शिकता आले नाही ते तुच्या-सारख्यांच्या सहवासात वावरताना मला शिकायला मिळते आहे. त्यामुळे माझे जगणे अधिक समृद्ध होऊ लागले आहे.’’ मी त्यांना मनापासून सांगितले.

रोज सकाळी सहा वाजता संवेदना शुश्रूषा केंद्रात आलो की एका आजोबांना ‘गुड मॉर्निंग आजोबा’ म्हणून माझा दिवस सुरू व्हायचा आणि रात्री दहा वाजता त्यांना ‘गुड नाइट’ करून मी घरी परतायचो. जवळपास गेल्या अडीचतीन वर्षांपासून सुरू असलेला हा सिलसिला आज सकाळी थांबला. संवेदना शुश्रूषा केंद्रात सर्वांत प्रथम भरती झालेल्या त्या आजोबांचे रात्री निधन झाले. खरं तर येत्या काही दिवसांत हा क्षण कधी तरी येणार हे आम्हा सर्वांप्रमाणेच त्यांनीही जाणले होते. त्यांना प्रोस्टेट कॅन्सर होता. गेल्या महिन्यातच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना काही दिवस एका हॉस्पिटलमध्ये अँडमिट करून परत इथे आणले होते. त्यावेळीच त्यांनी आपल्या नातेवाईकांना स्पष्टपणे सांगितले होते की, ‘मला आता इथून कुठेही नेऊ नका. मला इथेच शांतपणे जाऊ द्या.’ त्यानुसार त्यांची सेवाशुश्रूषा सुरू होती.

पण अलीकडे रोज रात्री त्यांना ‘गुड नाइट’ करून घरी जाताना, उद्या आपल्याला ‘गुड मॉर्निंग’ म्हणायला हे आजोबा असतील का? या विचाराने मी अस्वस्थ व्हायचो. मनात असाही विचार यायचा की, मी जर एवढे अस्वस्थ होतो आहे तर त्यांची मनःस्थिती काय असेल? कदाचित माझ्या मनातली ही व्याकुळता त्यांच्या नजरेने टिपली असावी. त्यामुळे मी ‘गुड नाइट’ म्हणून निघालो की, लहान बाळाच्या निरागसतेने हात हलवत ते मला बाय बाय करायचे. काल रात्रीही त्यांनी तसाच हात हलवत मला निरोप दिला होता आणि तो अखेरचा ठरला. अर्ध्या तासातच मला सिस्टर्सनी फोन करून बोलावले. मी लगेच संवेदना शुश्रूषा केंद्रात परत आलो. थोड्या वेळातच आजोबांचे नातेवाईकही आले. ‘मृत्युसमयी त्यांना काही त्रास झाला नाही, हे किती बरे झाले.’ त्यांच्या नातेवाईकांपैकी एकजण म्हणाले. ते ऐकून माझ्या मनात विचार आला की, त्यांना त्रास झाला नाही की त्यांनी त्रास करून घेतला नाही? आपल्या मृत्यूला असे शांतपणे सामोरे जाण्याची सिद्धी त्यांनी कशी प्राप्त केली होती, याचा मी गेल्या दीड वर्षांपासूनचा साक्षीदार होतो. आजोबांचा मृत्यू पाहून मला जाणीव झाली की  माणसाला जर सुखाने मरण हवे असेल तर त्याने आपल्या जगण्यातली क्षणभंगुरता मनस्वीपणे स्वीकारलेली असायला हवी. या आजोबांनी तर आपला आजारही मनस्वीपणे स्वीकारला होता.

‘आयुष्यभर सिगारेटी फुंकल्या. मग आता माझ्याच वाट्याला हा आजार का दिलास म्हणून देवाला तरी कोणत्या तोंडाने जाब विचारू?’ असं ते हसत हसत म्हणायचे. त्यांची पत्नी वारल्यानंतर बरोबर तेराव्या दिवशी त्यांच्या मुलीने त्यांना आमच्याकडे भरती केले होते. मुलीचाही नाईलाज होता. कारण तिचे सासर तिकडे कर्नाटकात होते. नवऱ्याची फिरतीची नोकरी, मुलाची बारावी, त्यामुळे आणखी काही दिवस तिला इथे राहणे शक्य नव्हते. आजोबांना एक मुलगाही होता. पण तो अपंग आणि मतिमंद होता. आजोबांचा त्याच्यावर खूप जीव होता. पण तो मात्र तापट स्वभावाचा असल्यामुळे आजोबांशी सतत भांडायचा. कधीकधी आजोबांच्या अंगावरही धावून जायचा. आजोबांची पत्नी होती तोपर्यंत ती त्याला अडवायची. पण त्या हिंडत्या-फिरत्या असतानाच अचानक हृदयविकाराने गेल्या. त्यामुळे आता त्या दोघांना एकत्र ठेवणे शक्य नव्हते. म्हणूनच आजोबांच्या मुलीने त्यांना आमच्याकडे भरती करण्याचा निर्णय घेतला होता. कदाचित एकटे राहायला लागल्यावर आपला भाऊही थोडाफार स्वावलंबी होईल अशी तिला आशा होती. भावाला मात्र तिने ‘मी बाबांना विजापूरला माझ्या घरी घेऊन जाते आहे’ असे सांगितले होते. नाहीतर तो आमच्या शुश्रूषा केंद्रात आजोबांना भेटायला येऊन गोंधळ घालेल अशी तिला भीती होती. आजोबांनाही तिने हे सर्व समजावून सांगितले होते. त्यामुळे त्यांना इथे भरती केल्यानंतर इथले राहणे त्यांनी मनापासून स्वीकारले होते.

ते आमच्याकडे भरती होणारे सर्वांत पहिले आजोबा असल्यामुळे, मी त्यांना इथल्या सोयीसुविधांबाबत अगत्याने विचारायचो. ‘‘म्हातारपणी माणसाला काय लागतं डॉक्टर? कोणीतरी आपुलकीने आपली विचारपूस करत आहे, इतकेच पुरे असते’’ ते भावुक होऊन म्हणायचे. वृद्धापकाळी माणूस प्रेम आणि आपुलकीला किती भुकेलेला असतो याचा प्रत्यय रोजच आम्हांला इथे संवेदना शुश्रूषा केंद्रात येत असतो आणि त्यांच्यावर प्रेम करण्याची संधी आपल्याला लाभते आहे, याचे विलक्षण समाधानही वाटत असते. सवड मिळाली की अधूनमधून मी या आजोबांशी गप्पा मारत बसायचो. कधीकधी गमतीने आजोबा म्हणायचे, ‘तुच्या तावडीत सापडलेला मी पहिला बकरा’.

‘‘तुम्हाला हे शुश्रूषा केंद्र सुरू करण्याबाबत कसे काय सुचले?’’ त्यांनी मला एकदा कुतूहलाने विचारले होते.

‘‘मला लेखनाची आवड आहे. वृद्धांचे भावविश्व आणि आपली कौटुंबिक जबाबदारी या विषयावर ‘चिखलाचे पाय’ हे सदर मी साप्ताहिक साधनामध्ये लिहीत होतो. त्यांपैकी एक लेख वाचून एका आजीने मला विचारले की, ‘तुम्ही स्वतः वृद्धांसाठी काय करता?’ त्यांचा हा प्रश्न ऐकून मी अस्वस्थ झालो होतो. मग आपणही आपल्या परीने काहीतरी प्रत्यक्ष कृती करायला हवी, अशी बोच मनाला जाणवू लागली. फॅमिली डॉक्टर म्हणून रुग्ण तपासणीसाठी व्हिजिटला घरी गेल्यानंतर अनेक घरांधून अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांची होणारी आबाळ पाहात होतो. त्यातून ही कल्पना मला सुचली.’’ मी प्रांजळपणे सांगितले.

‘‘दिवसेंदिवस आता अशा केंद्रांची गरज वाढतच जाणार आहे डॉक्टर’’ ते उदासपणे म्हणाले.

‘‘मलाही सुरुवातीला लेखन करताना वृद्धाश्रम किंवा अशी शुश्रूषा केंद्रे असू नयेत असे वाटायचे. पण प्रत्यक्ष या क्षेत्रामध्ये काम करू लागल्यावर समाजाला अशा उपक्रमांची गरज आहे हे लक्षात आले.’’

‘‘या वयात तुम्हाला अख्खा दिवस आमच्यासारख्या अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांसोबत घालवताना उदास वगैरे वाटत नाही का?’’ आजोबांनी हसत हसत विचारले.

‘‘तसे काही नाही आजोबा. उलट या क्षेत्रात काम करण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला भाग्यवानच समजतो. तुच्यासारख्या ज्येष्ठांशी संवाद साधताना मला जगण्याचे तत्त्वज्ञान रोज नव्याने शिकायला मिळते. इतकी वर्षे जे विविध विषयांवरची पुस्तके वाचून आणि व्याख्याने ऐकून शिकता आले नाही ते तुच्यासार ख्यांच्या सहवासात वावरताना मला शिकायला मिळते आहे. त्यामुळे माझे जगणे अधिक समृद्ध होऊ लागले आहे.’’ मी त्यांना मनापासून सांगितले.

या आजोबांना दम्याचाही त्रास होता. अधूनमधून धाप लागायची. त्यामुळे मी त्यांना थंड, तेलकट खाऊ नका म्हणून अडवायचो. पण ते माझं ऐकायचे नाहीत. रविवारी फीस्ट म्हणून आमच्याकडे वेगळे जेवण असते. त्यादिवशी ते बासुंदीने काठोकाठ भरलेली वाटी मला खिजवत चिअर्स म्हणून तोंडाला लावायचे. मी रागावू लागलो की, ‘‘उगाच कशाला मन मारू डॉक्टर. आता माझे किती दिवस राहिले  आहेत, जेवढं जगायचं ते मनसोक्त जगतो की!’’ असं म्हणायचे. त्यावेळी माझाही नाइलाज व्हायचा. एकदा त्यांची मुलगी त्यांना भेटायला आल्यावर ते तिच्याशी कोणत्यातरी विषयावर गंभीरपणे चर्चा करीत होते. मुलगी भेटून गेल्यानंतर त्यांनी मला त्याबाबत सांगितले. ‘‘मुलगी घर विकायचे म्हणते आहे. मुलाला घराची देखभाल करणे जमत नाही. ते बिल्डरला विकून नवीन फ्लॅट घ्यायचा तिचा विचार आहे. डॉक्टर, एक दिवस मला आमच्या घरी जाऊन यायचे आहे. तुम्ही परवानगी द्याल का?’’ आजोबांनी भावूक होऊन विचारले होते. ‘‘काहीच हरकत नाही आजोबा. तुची मुलगी भेटायला आल्यावर जाऊन या. फार तर मीही तिला तसे सांगतो.’’ मी त्यांना म्हणालो.

माणसाचा जीव आपल्या घरामध्ये किती गुंतलेला असतो ही गोष्ट त्यांची घालमेल पाहून माझ्या लक्षात आली. पुढच्या वेळी त्यांची मुलगी त्यांना भेटायला आल्यावर मी तिला आग्रहाने आजोबांना एक दिवस घरी नेऊन आणण्याबाबत सांगितले. त्यानुसार आजोबा एक दिवस आपल्या घरी जाऊन आले. त्यांच्या मदतीसाठी मी आमच्या शुश्रूषा केंद्रातील एका सिस्टरना सोबत पाठविले होते. ‘‘आता तुमच्या ताब्यात मरायला मोकळा झालो बघा.’’ घरी जाऊन आल्यानंतर आजोबा समाधानाने म्हणाले होते. ‘‘घरी जाऊन काय काय चैनी करून आलात ते अगोदर सांगा.’’ मी आजोबांना गमतीने विचारले होते. ‘‘चैनच म्हणायची की डॉक्टर. घर, घराचे आवार एकदा डोळे भरून पाहून घेतले. घरात गेल्याबरोबर बायकोच्या आठवणी मनात फेर धरून नाचू लागल्या. मला किमान सर्वांचा निरोप घ्यायची संधी तरी मिळते आहे. बायकोला तीही मिळाली नाही.’’ आजोबा लगेच भावूक होऊन म्हणाले. त्यानंतर पुढील काही दिवसांध्ये त्यांच्या मुलीने एका बिल्डरशी घराचा व्यवहार निश्चित केला. यथावकाश आजोबांना रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नेऊन घराचे खरेदीपत्रही करून दिले. ‘‘आता मी सर्व पाशांतून रिकामा झालो बघा’’ तिकडून परत आल्यावर अंगठ्यावरची शाई दाखवत आजोबा मला म्हणाले होते. ‘‘बिल्डरने घराच्या बदल्यात आम्हाला एक फ्लॅट आणि काही रक्कम दिली. त्याची मुलाच्या नावावर एफ.डी. केली. काही कामधंदा जमला नाही तर त्याला जगण्यासाठी तेवढाच आधार होईल.’’ आजोबा मोकळेपणाने म्हणाले होते. ते त्यांच्या सर्व कौटुंबिक गोष्टी मला विश्वासाने सांगायचे. त्यांनी मला खूपच लळा लावला होता.

हे आजोबा आमच्याकडे भरती झाल्यानंतर काही दिवसांनी डिमेन्शिया हा मानसिक आजार असलेल्या एक आजी आमच्याकडे भरती झाल्या होत्या. त्या जेवण, औषध घेताना लहान मुलीसारखा खूप हट्ट करायच्या. त्यामुळे त्यांना जेवण आणि औषध देण्यासाठी त्या त्या ड्युटीमधल्या सिस्टर्स वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवायच्या. एके दिवशी एका सिस्टरने या आजोबांना त्या आजींच्या खोलीत नेले व त्यांना आजींना जेवण, औषध घ्यायला सांगायला सांगितले. आजोबांनीही थोडा आवाज वाढवत दरडावून त्या आजींना जेवण, औषध घ्यायला सांगितले. आश्चर्य म्हणजे त्या दिवशी आजींनी निमूटपणे सर्व जेवण, औषध घेतले. हा किस्सा सिस्टर्सनी मला ओपीडीत येऊन सांगितला तेव्हा मलाही खूप गंमत वाटली होती. पुढे ही आयडिया अनेक दिवस सुरू होती. जेवणाची वेळ झाली की आजोबाच पुढाकार घेत होते. सिस्टरांच्या मदतीने आजींच्या खोलीत जायचे. सिस्टर त्या आजींना जेवण, औषध भरवायच्या. आजोबा मध्ये मध्ये हातवारे करत खोटं खोटं रागवत राहायचे. आजींचे जेवण, औषध झाले की परत सिस्टरांच्या मदतीने आपल्या खोलीत यायचे व स्वतःचे जेवण घ्यायचे. कोण कुठल्या आजी? कोण कुठले आजोबा? पण आजींनी पोटभर जेवण केले आणि औषध घेतले की, आजोबांचे डोळे समाधानाने पाणावलेले असायचे. त्यांच्या डोळ्यातील ते अश्रू म्हणजे त्या अनोळखी आजी आपले ऐकून जेवण, औषध घेतात याबद्दलचे आनंदाश्रू असतील, की काही दिवसांपूर्वी गेलेल्या पत्नीच्या आठवणींचे अश्रू?

काही का असेना, पण या कृतीतून त्यांनी ‘आपण केवळ स्वतःच्या नव्हे तर इतरांच्याही जगण्याचे आणि जगण्यातील आनंदाचे निमित्त व्हायला हवे’ अशी जणू शिकवणच आम्हाला दिली होती. हेच खरे माणसाच्या जगण्याचे प्रयोजन आहे का?

Tags: मृत्यू. आयुष्य संवेदना शुश्रूषा केंद्र डॉ. दिलीप शिंदे जगण्याचे प्रयोजन जगण्याचे भान affection love cure diseases hospital death life Sangali Sanvedana Shusrusha Kendra Dr. Dilip Shinde jagnyache prayojan Jagnyache bhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात