डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वेळेच्या बाबतीत काटेकोर असणे, हा त्यांचा गुणविशेषच त्यांच्या बाबतीत त्यांची मर्यादा ठरला. त्यांचे पाहूनच मीही काटेकोरपणे वेळ पाळायला शिकलो आहे व समोरच्या-कडूनही तशी अपेक्षा ठेवतो. पण त्याच्यावर कधी सक्ती करत नाही. माझे बाबा मात्र समोरच्यावर लगेच आगपाखड करायचे. त्यामुळे त्यांना फारसे कुणी जिवलग मित्रही जोडता आले नाहीत. त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या हाताखाली काम करणारे दोघे-चौघे हेच त्यांचे मित्र होते. त्यामुळे बाबांच्या स्वभावातला हा अलिप्तपणा आणि त्यातून त्यांच्या वाट्याला आलेला एकटेपणा- यातून मी हे शिकलो की,  नात्यांची जपणूक ही जबाबदारीची गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याकडे विनाशर्त स्वीकारण्याची तयारी हवी आणि ही गोष्ट लक्षात आल्यावर मी सर्वांत प्रथम माझ्या बाबांनाच आहे तसे स्वीकारायचे ठरविले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांतील त्यांचा एकटेपणा थोडाफार कमी करू शकलो.’’

एक बाप आपल्या मुलाच्या लहानपणी त्याला आपली प्रत्येक गोष्ट सक्तीने ऐकायला लावतो; तोच बाप आपल्या म्हातारपणी मात्र आपल्या मुलाची प्रत्येक गोष्ट आज्ञाधारकपणे ऐकू लागतो. हा त्यांच्या भावनिक स्थित्यंतराचा प्रवास समजून घेणे कुतूहलाचे नाही का?  विशेष म्हणजे म्हातारपणीही ते फक्त आपल्या मुलाचेच तेवढे आज्ञाधारकपणे ऐकायचे, बाकी कोणाचीही सक्ती त्यांच्यावर चालायची नाही. आयुष्यभर ते ‘माझं तेच खरं’ या वर्चस्ववादी भूमिकेने जगले होते. त्यामुळे त्यांना फारसे कोणी जिवाभावाचे सोबतीही लाभले नव्हते. आयुष्याच्या शेवटी-शेवटी त्यांना केवळ आपल्या मुलाशी तेवढी मैत्री करणे जमले होते. लहानपणी जसे प्रत्येक मुलासाठी आपले वडील हे रोल मॉडेल असतात, तसे म्हातारपणी त्यांना आपला मुलगा आपले रोल मॉडेल वाटू लागला होता. आपल्या मुलाबद्दल त्यांना अपार कौतुक आणि अभिमान वाटत होता. त्यामुळेच डिमेन्शियाने स्मृती धूसर झाल्यावरही ते शेवटपर्यंत आपल्या मुलाला तेवढे प्रतिसाद देत होते.

जवळपास चार वर्षांपासून त्यांना डिमेन्शियाचा त्रास सुरू झाला होता. पण अलीकडच्या सहा महिन्यांत मात्र तो अधिक वाढला होता. छोट्या-छोट्या गोष्टीही ते विसरू लागले होते. तसेच किरकोळ कारणांवरूनही ते लगेच अस्वस्थ व्हायचे आणि चिडचिड करायचे. तीन-चार महिन्यांपूर्वी एकदा त्यांचा मुलगा मला भेटून संवेदना शुश्रूषा केंद्राबाबत माहिती घेऊन गेला होता. पण तेव्हा ते हिंडते-फिरते असल्यामुळे जितके दिवस शक्य आहे तितके दिवस घरीच त्यांची सेवाशुश्रूषा करण्याचे मुलाने ठरविले होते, कारण आम्ही आमच्याकडे शक्यतो अंथरुणावर खिळलेल्या वृध्दांनाच सेवाशुश्रूषेसाठी भरती करून घेतो. गेल्या आठवड्यात मात्र त्यांना पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे तातडीने एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. त्या वेळी इथून पुढे त्यांना आता अंथरुणावरच खिळून राहावे लागणार, ही गोष्ट मुलाच्या लक्षात आली. त्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुलाने त्यांना सेवाशुश्रूषेसाठी आमच्याकडे भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सायंकाळी चार-पाचच्या सुमारास तो त्यांना आमच्याकडे घेऊन आला. सोबत त्याची आई व बहीणही होती. भरती करून झाल्यानंतर तो माझ्या केबिनमध्ये मला भेटायला आला.

‘‘माझे वडील खूप हट्टी आहेत डॉक्टर. त्यांच्या मनाविरुध्द वागले की, ते लगेच आरडाओरडा व त्रागा सुरू करतात. त्यांच्यावर कोणी सक्ती केलेली त्यांना चालत नाही. तुमच्या स्टाफला थोडं त्यांच्या कलाने वागायला सांगा.’’ मुलगा अजीजीच्या सुरात म्हणाला.‘‘कोणताही नवा वृध्द भरती झाला की, त्यांचा अंदाज यायला आम्हाला एक-दोन दिवस लागतात. मी लक्ष देतो. तुम्ही काळजी करू नका. रात्री त्यांना झोप कशी लागते?’’ ‘‘झोपेसाठी त्यांना एक गोळी सुरूच आहे, पण तिचा फारसा उपयोग होत नाही. तिकडे हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ त्यांचे हात बांधूनच ठेवले होते. नाही तर सारखे बेडवरून खाली यायचा प्रयत्न करायचे. त्यामुळे ते खाली पडणार नाहीत, याची सतत दक्षता घ्यावी लागते.’’

‘‘गरजेनुसार आम्हीही रात्री हाताला रिस्टनर किंवा छातीला चेस्टगार्ड बांधतच असतो. बघू या- काही आवश्यकता वाटल्यास तुमच्याशी संपर्क करतो.’’ मी त्याला धीर देत म्हणालो. माझे आभार मानून तो निघून गेला.

त्या दिवशी पहिल्याच रात्री आठच्यादरम्यान जेवण भरविताना आजोबांनी दंगा सुरू केला. मी सी.सी. टीव्ही कॅमेऱ्यातून सर्व प्रकार पाहत होतो. दोन सिस्टर, दोन मावश्या त्यांच्याभोवती जमून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होत्या, पण ते जेवायला तयार नव्हते. बेडवरून खाली उतरण्याचा प्रयत्न सतत करत होते. सिस्टरनी अडवायचा प्रयत्न केला, तर पाय झाडत त्यांना लाथा मारू लागायचे. मग मी स्वतः त्यांच्या रूममध्ये गेलो.

‘‘काय झाले आहे आजोबा?’’ मी त्यांना प्रेमाने विचारले.

‘‘मला कुठे काय झाले आहे? हे तुमचे लोकच माझ्यावर जेवणासाठी सक्ती करत आहेत.’’ ते माझ्याशी व्यवस्थित बोलू लागले. कदाचित माझ्या गळ्यातील स्टेथास्कोपमुळे त्यांनी मला डॉक्टर म्हणून ओळखले असावे. मी सिस्टर्स आणि मावश्यांना खुणेनं त्यांच्यापासून बाजूला जायला सांगितले.

‘‘तुमचे तुम्हाला हाताने जेवण करायचे आहे का?’’ मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत विचारले.

‘‘नाही, मला इथे जेवायचेच नाही. मला माझ्या घरी जायचे आहे.’’ ते हात नाचवीत म्हणाले.

‘‘तुम्हाला बरे वाटू लागल्यानंतर घरी जायचे. आता खूप रात्र झाली आहे. जेवण करून औषध घ्या आणि झोपा.’’ मी त्यांना समजावीत म्हणालो. ‘‘तुम्हाला तुमच्या मुलाशी बोलायचे आहे का? मी तुम्हाला फोन लावून देतो.’’ असे म्हणत मी माझ्या मोबाईलवरून त्यांच्या मुलाला फोन लावला. त्याला घडलेला सर्व प्रकार थोडक्यात सांगितला व त्यांची समजून काढायला सांगत फोन आजोबांच्या हातात दिला.

‘‘काय झाले आहे बाबा?’’ मुलाने आपुलकीने विचारले.

‘‘अरे, तू मला इथे एकट्याला सोडून कुठे गेला आहेस?’’ ते त्रासिकपणाने म्हणाले.

‘‘मी आता घरी आलो आहे. उद्या सकाळी तुम्हाला भेटायला येतो. तुम्ही आता जेवण करा आणि औषध घ्या बघू.’’

‘‘पण मला इथे जेवायचे नाही.’’

‘‘असे नका करू बाबा. तुम्हाला लवकर बरे व्हायचे आहे की नाही? मग तुम्हाला वेळेवर जेवण आणि औषधं घ्यायला हवीत. तुम्ही माझे ऐकणार आहात की नाही?’’

‘‘ठीक आहे. तू सांगतो आहेस म्हणून जेवतो. पण उद्या सकाळी लवकर ये.’’ आजोबा समजूतदारपणे म्हणाले. मुलाचा परिचित आवाज ऐकल्यामुळे ते आता बऱ्यापैकी शांत झाले होते. विशेष म्हणजे, त्यानंतर ते व्यवस्थितपणे स्वतःच्या हातांनी जेवले. सिस्टर्सनी दिलेली औषधे घेतली. मी सिस्टर्सना गर्दी करून त्यांच्यासमोर न जाण्याचा सल्ला दिला आणि परत माझ्या केबिनमध्ये आलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा त्यांना भेटायला आला. त्या वेळी त्यांनी आपल्या मुलाशी व्यवस्थित गप्पा मारल्या, पण नर्सिंग स्टाफला मात्र ते अजिबात सहकार्य करत नव्हते. त्यामुळे त्यांची शुश्रूषा करताना आम्हाला अनेक अडचणी येत होत्या. एकदा तर त्यांना जेवण भरविताना त्यांनी एका सिस्टरचे चक्क बोटच चावले. मी त्यांच्या मुलाशी सविस्तर चर्चा केली. शेवटी आम्ही मानसोपचारतज्ज्ञांना व्हिजिटला बोलावून त्यांचा सल्ला घ्यायचा ठरविले. त्यानुसार दुसऱ्या दिवशी मानसोपचारतज्ज्ञ येऊन त्यांना तपासून औषध देऊन गेले. पण त्यांच्या ट्रीटमेंटमुळेही त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही. दिवसेंदिवस ते अधिकच व्हायोलंट होऊ लागले.

त्यांचा मुलगा नियमितपणे त्यांना भेटायला यायचा. त्याच्याशी मात्र ते अगदी व्यवस्थित बोलायचे. त्यांची पत्नी आणि मुलगीही त्यांना अधून-मधून भेटून जायची. विशेषतः दिवसभर ते शांत असायचे. पण रात्री जेवणाची वेळ झाली की, त्यांचा दंगा सुरू व्हायचा, तो मग रात्रभर सुरू असायचा.

पुढे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली. त्यांनी जेवण घेणेही कमी केले होते. नंतर-नंतर जेवणाचा घास बराच वेळ तोंडात धरून बसायचे. कितीही आग्रह केला तरी घास लवकर गिळायचे नाहीत. त्यांना घास व्यवस्थित गिळता येत नाही, की ते मुद्दाम घास गिळत नाहीत, अशी मला शंका येऊ लागली. त्यासाठी आम्ही नाक, कान, घसा तज्ज्ञांचाही सल्ला घेतला. पण त्यांच्या घशात काही दोष नसल्याचे लक्षात आले. अतिशय शिस्तबध्द आणि काटेकोर आयुष्य जगलेल्या या आजोबांना असे परावलंबी जगणे नकोसे झाले असावे. म्हणून कदाचित ते जेवण घ्यायला विरोध करत असावेत, असे मला वाटत होते. त्यांचा मुलगा त्यांना भेटायला आला की, खाण्याचा आग्रह करायचा आणि ते आपल्या आग्रह करणाऱ्या मुलाकडे डोळे भरून पाहत राहायचे. त्या वेळी त्यांचे डोळे आपल्या मुलाबद्दलच्या प्रेमाने व आपुलकीने काठोकाठ भरलेले असायचे. त्यांच्यातील हे बाप-लेकाचे अनोखे नाते पाहून मला त्या दोघांचेही खूप कौतुक वाटायचे.

एके दिवशी दुपारी त्यांना अचानक हुडहुडी भरली आणि त्यांचे अंग तापाने फणफणले. त्यांना युरिन इन्फेक्शन झाले असावे, अशी मला शंका आली. मी त्यांच्या मुलाशी चर्चा करून त्यांना परत हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला सांगितले. तिथे ॲडमिट केल्यावर दोन-चार दिवसांत त्यांचा ताप कमी झाला, पण प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. त्यातच त्यांना न्यूमोनियाची लागण झाली. छातीत कफ झाल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यासाठीही औषधोपचार सुरू केले. पण ते आता उपचारांना फारसा प्रतिसाद देईनात. शेवटी आठ-दहा दिवसांनंतर त्यांच्या मुलाने त्यांना पुन्हा आमच्या शुश्रूषा केंद्रात शिफ्ट केले. त्या वेळी त्यांच्या नाकात नळी घातलेली होती. त्याद्वारेच त्यांना द्रव आहार व औषधं सुरू होती.

‘‘बाबांचे हे हाल मला बघवत नाहीत डॉक्टर. आयुष्यभर ते बाणेदारपणे जगले आहेत. आता त्यांना अशा अवस्थेत पाहवत नाही.’’ मुलगा कासावीस होऊन म्हणाला.

‘‘शक्य होते ते सर्व प्रयत्न करून झाले आहेत. आता केवळ शुश्रूषा करत राहणे, इतकेच आपल्या हातात आहे.’’ मी त्याची समजूत काढत म्हणालो.

आमच्याकडे शिफ्ट केल्यानंतर दोन दिवसांनी ते आजोबा गेले. शेवटपर्यंत ते आपल्या मुलाला प्रतिसाद देत होते आणि त्यांचा मुलगा त्यांना ‘बाबा, मी आहे ना!’ असे म्हणत धीर देत होता. स्ट्रेचरवर ठेवलेला त्यांचा निश्चेष्ट मृतदेह पाहून त्यांच्या मुलासोबतच माझे व शुश्रूषा केंद्रातील सर्वांचेच डोळे पाणावले. जवळपास दोन महिने त्यांनी आपल्या खणखणीत आवाजाने आमचे शुश्रूषा केंद्र दणाणून सोडले होते.

पुढे आठ-दहा दिवसांनंतर त्यांचा मुलगा भेटायला आला.

‘‘तुमच्या शुश्रूषा केंद्राची खूप मदत झाली. घरी आम्हाला त्यांची अशी व्यवस्था करणे जमले नसते. पण माझ्या बाबांमुळे तुमच्या नर्सिंग स्टाफला मात्र बराच त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल मी तुमच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो.’’ तो ओशाळल्या स्वरात म्हणाला.

‘‘अहो, असे काही मनात आणू नका. आमचे हे कर्तव्यच आहे.’’ मी त्याला अडवीत म्हणालो. ‘‘मला तुमच्या बाप-लेकाच्या नात्याबद्दल जाणून घेण्याविषयी खरंच खूप जिज्ञासा आहे. तुमची हरकत नसेल, तर मला थोडं सविस्तरपणे सांगाल का?’’

‘‘अगदी आनंदाने सांगेन डॉक्टर. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही; पण ते इतके हेकेखोर होते तरीही माझे आणि माझ्या बाबांचे आयुष्यात एकदाही कडाक्याचे भांडण झाले नाही. अगदी अलीकडे या आजारपणाच्या निमित्ताने मी एक-दोन वेळा त्यांच्यावर थोडे ओरडलो असेल तर, तेवढेच. पण आमच्यात कधी मतभेद झाल्याचे मला आठवत नाही. जशी त्यांना शिस्त आवडायची तशी मलाही आवडते. ती त्यांच्या रक्तातूनच माझ्यात आली असावी. त्यामुळे त्यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता.’’ तो भावुक होऊन सांगू लागला.

‘‘माझ्या बाबांचे बालपण हलाखीत गेले होते. त्यामुळे आयुष्यभर ते चिकाटीने वागले. एखादी गोष्ट ठरवली म्हणजे ती तशीच झाली पाहिजे, असा त्यांचा अट्टहास असे.’’

‘‘त्यांच्या डिमेन्शियाबाबत तुमच्या कधी लक्षात आले?’’

‘‘चार वर्षांपूर्वी लक्षात आले. दोन वेळा त्यांनी हॉलमध्ये लघवी केली. त्याबद्दल त्यांना विचारले तर, ‘हे कोणी केले आहे, मला माहीत नाही’ म्हणून सांगितले. त्यानंतर आम्ही त्यांना दवाखान्यात दाखविले, पण आपल्याला काही समस्या आहे किंवा आपण काही गोष्टी विसरतो आहोत, हेच ते मान्य करायचे नाहीत. त्यामुळे खिशात पत्ता असूनही रस्ता चुकला तरी ते लोकांना काही विचारायचे नाहीत. खूप वेळ भटकत राहायचे. मग आम्ही त्यांना शोधून आणायचो. काही कामानिमित्त बाहेर गेल्यावरही तेथील लोकांशी किरकोळ गोष्टीवरूनही वाद घालायचे.’’

‘‘हा सर्व त्यांच्या आजाराचा भाग झाला. पण तुमच्यावर जो त्यांचा विशेष लोभ आणि भरवसा होता, त्याबद्दल सांगाल का?’’

‘‘डॉक्टर, मला असे वाटते की, माणसाला आपल्या गुणावगुणांसह स्वीकारणारा एक तरी माणूस हवा असतो. माझ्या बाबांच्या बाबतीत कदाचित तसा मी होतो. त्यांच्यासारखाच माझा स्वभावही शिस्तप्रिय व काटेकोर असल्याचा त्यांना अभिमान वाटायचा आणि तरीही मी सर्वांशी जुळवून घेऊ शकतो, याचे त्यांना कौतुक वाटायचे. ते मला तसं कधी कधी बोलूनही दाखवायचे. त्यांना मात्र आपल्या शिस्तप्रिय स्वभावाला व्यावहारिकतेची जोड देता आली नव्हती. त्यामुळे वेळेच्या बाबतीत काटेकोर असणे, हा त्यांचा गुणविशेषच त्यांच्या बाबतीत त्यांची मर्यादा ठरला. त्यांचे पाहूनच मीही काटेकोरपणे वेळ पाळायला शिकलो आहे व समोरच्याकडूनही तशी अपेक्षा ठेवतो. पण त्याच्यावर कधी सक्ती करत नाही. माझे बाबा मात्र समोरच्यावर लगेच आगपाखड करायचे. त्यामुळे त्यांना फारसे कुणी जिवलग मित्रही जोडता आले नाहीत.

त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या हाताखाली काम करणारे दोघे-चौघे हेच त्यांचे मित्र होते. त्यामुळे बाबांच्या स्वभावातला हा अलिप्तपणा आणि त्यातून त्यांच्या वाट्याला आलेला एकटेपणा- यातून मी हे शिकलो की, नात्यांची जपणूक ही जबाबदारीची गोष्ट आहे. त्यासाठी आपल्याकडे विनाशर्त स्वीकारण्याची तयारी हवी आणि ही गोष्ट लक्षात आल्यावर मी सर्वांत प्रथम माझ्या बाबांनाच आहे तसे स्वीकारायचे ठरविले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांतील त्यांचा एकटेपणा थोडाफार कमी करू शकलो.’’ तो समाधानाने म्हणाला. मृत्यूप्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांवर सही-शिक्का घेऊन पुन्हा एकदा माझे आभार मानून त्याने निरोप घेतला.

आपल्या लहानपणी वडिलांनी आपल्याला कसे स्वातंत्र्य दिले नाही, हे हिरिरीने सांगणारी आणि प्रसंगी त्यांचा पाणउताराही करणारी अनेक मुले आपण आपल्या अवतीभोवती पाहतच असतो. पण आपल्या हट्टी व हेकेखोर पण शिस्तप्रिय वडिलांना प्रेमाने समजून घेणाऱ्या आणि भावनिक आधार देणाऱ्या या मुलाच्या समंजसपणाचे मला कौतुक वाटले.

वृध्दापकाळी जीवशास्त्रीय बदलांमुळे तसेच मेंदूच्या पेशींचा ऱ्हास झाल्याने अनेक वृध्दांना मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी त्यांच्या मुलांनी आणि कुटुंबीयांनी त्यांना असाच ‘मी आहे ना’ म्हणून प्रेमाने आधार द्यायला हवा.

Tags: वडील डॉक्टर म्हातारपण बाप लहानपण मुलगा wadil doctor mhatarpan lahanpan mulga weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके