Diwali_4 जीवन यांना कळले
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

संवेदना शुश्रूषा केंद्रास भेट द्यायला येणारे अनेक मान्यवर त्यांच्या ओळखीचे असायचे. त्या वेळी ते त्यांच्याशी शुश्रूषा केंद्राबद्दल भरभरून बोलायचे. ‘‘काका, तुम्ही आता संवेदना शुश्रूषा केंद्राचे व्यवस्थापक म्हणून ऑफिसमध्येच बसायला सुरुवात करा.’’ मी एकदा गमतीने त्यांना म्हणालोही होतो.

एके दिवशी रात्री माझा राउंड संपल्यावर मी घरी जायच्या तयारीत असताना काका माझ्या केबिनमध्ये आले.

‘‘डॉक्टर, रोज सकाळी तुमच्या राऊंडची सुरुवात तुम्ही या प्रार्थनेने करत जा.’’ असे म्हणत त्यांनी ‘अनायासेनं मरणं’ हा श्लोक लिहिलेला कागद माझ्या हातात दिला.

‘‘माणसाला कसं चालता-बोलता मरण यायला हवं. मी रोज सकाळी हीच प्रार्थना करत असतो. इथल्या अंथरुणावर खिळलेले आणि बेडसोर्स झालेले लोक पाहिले की, माझा जीव व्याकूळ होतो. बेडसोर्स होऊ नयेत म्हणून आपल्याला खबरदारी घेता येत नाही का?’’ काकांनी अस्वस्थपणे विचारले.

‘अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम्‌’ ही प्रार्थनेची पहिली ओळ म्हटल्यानंतर कधी-कधी दुसरी ओळच मला चटकन आठवत नाही. मी पॉज घेऊन ती आठवण्याचा प्रयत्न करतो. इतक्यात सोबत प्रार्थना म्हणत असणाऱ्या आजी-आजोबा किंवा स्टाफपैकी कोणी तरी ‘देहान्ते तव सायुज्यं देहिमें पार्वतीपते’ ही दुसरी ओळ म्हणू लागते आणि मीही त्यांच्या सुरात सूर मिसळतो. खरं तर गेले कित्येक दिवस रोज सकाळी साडेनऊ वाजता या प्रार्थनेने मी माझ्या राउंडची सुरुवात करतो, पण तरीही अधून-मधून असे होते. त्या वेळी मला प्रार्थनेसाठी हा श्लोक म्हणण्याची कल्पना सुचविणारे किशोरकाका आठवत असतात. अंथरुणावर खिळलेल्या वृद्धांसाठी हे संवेदना शुश्रूषा केंद्र चालवत असताना ही प्रार्थना किती अर्थपूर्ण आहे, याची जाणीव मला इथे वारंवार होत असते. सहजपणे मृत्यू म्हणजे- अंथरुणावर खिळून राहण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, दुःख-कष्टाविना जीवन म्हणजे दैनंदिन व्यवहारासाठी इतरांवर विसंबून जगण्याची वेळ येऊ नये आणि मृत्युसमयी ईश्वराचे दर्शन व त्याच्याशी एकरूप होण्याची शक्ती आपल्याला लाभावी- यासाठी शुद्ध अंतःकरणाने ईश्वराकडे केलेली ही प्रार्थना आहे. किशोरकाकांना लाभलेला मृत्यू म्हणजे जणू या प्रार्थनेच्या यशाचे मूर्तिमंत उदाहरणच होते.

संवेदना शुश्रूषा केंद्र सुरू केल्यानंतर पहिल्या काही महिन्यांतच किशोरकाका मला भेटायला आले होते. त्या वेळी मी त्यांना सुरुवातीलाच ‘‘तुम्ही कोणासाठी चौकशी करायला आला आहात?’’ म्हणून विचारले होते. कारण ते हिंडते-फिरते होते आणि प्रथमदर्शनी त्यांची तब्येत बऱ्यापैकी धडधाकट वाटत होती.

‘‘मी माझ्यासाठीच चौकशी करायला आलो आहे.’’ ते हसत-हसत म्हणाले होते, ‘‘मी हृदयविकाराचा पेशंट आहे. माझे हृदय सध्या केवळ 30 टक्केच काम करते आहे. त्यामुळे माझे कधीही ‘राम नाम सत्य’ होऊ शकते. हृदयाची दोन वेळा ऑपरेशन्स झाली आहेत. आता या वयात आणखी फाडाफाडी करून घ्यायची माझी इच्छा नाही. मिळेल तेवढे बोनस आयुष्य समाधानाने आणि शांतपणाने जगायचे ठरवले आहे.’’

‘‘पण आमच्याकडे इथे सर्व अंथरुणावर खिळलेले वृद्ध आहेत. त्यांच्यासोबत राहताना कदाचित तुम्हाला त्रास होईल.’’ मी माझ्या मनातली शंका व्यक्त करत त्यांना विचारले होते.

‘‘घरी मी एकटाच असतो. रात्री सोबतीला एक मदतनीस असतो, पण दिवसभर घरात एकट्याला वेळ जात नाही. तुमचे मित्र डॉ.पाटील यांनी मला तुमच्याकडे भरती होण्याबाबत सुचविले आहे. हृदयविकारासाठी मला त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे. सोबतही मिळेल आणि चोवीस तास देखभालही होईल म्हणाले. ते तुमच्याशी फोनवरून बोलतोही म्हणाले आहेत. मला अधून-मधून धापही लागते. ऑक्सिजन लावावा लागतो. माझ्याकडे ऑक्सिजन सिलिंडर आहे, मी येताना सोबत घेऊन येईन.’’ किशोरकाका सविस्तरपणे एक-एक गोष्ट सांगत होते.

‘‘पण इथे भरती होण्याविषयी तुम्ही तुमच्या नातेवाइकांशी चर्चा केली आहे का?’’ मी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेण्याच्या हेतूने त्यांना विचारले.

‘‘नातेवाइकांची काही हरकत असणार नाही. माझा मुलगा मुंबईला असतो. त्याची फिरतीची नोकरी आहे. मुलगी बेंगलोरला असते, तीही नोकरी करते. दोघेही मला त्यांच्याकडे राहायला बोलवत असतात, पण माझा त्यांच्याकडे वेळ जात नाही. माझी सर्व हयात इथे सांगलीत गेली आहे. पस्तीस वर्षे प्राचार्य म्हणून नोकरी केली आहे, आता रिटायर्ड होऊनही एकोणीस वर्षे झाली. माझे विद्यार्थी, मित्र मला इथे भेटतात. त्यामुळे चार-आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस मी माझ्या मुला-मुलीकडे राहत नाही.’’ काका मला समजावीत म्हणाले.

मी आमच्याकडे व्यवस्थापिका म्हणून काम पाहणाऱ्या माधुरीला बोलवून इथल्या सोई-सुविधांविषयी सर्वत्र फिरून काकांना सविस्तर माहिती द्यायला सांगितले. त्यांना इथली व्यवस्था पसंत असल्यास माहिती पुस्तिका व प्रवेशअर्जही द्यायला सांगितला. भरती व्हायला येण्यापूर्वी एक-दोन दिवस अगोदर कल्पना देऊन येण्याबाबत ही सुचविले.

माहिती घेऊन झाल्यावर किशोरकाका पुन्हा माझ्या केबिनमध्ये आले. छान माहिती सांगितल्याबद्दल त्यांनी माधुरीचे कौतुक केले. तसेच आम्ही सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी त्यांनी माझी पुस्तके वाचण्यासाठी आवर्जून मागून घेतली. ‘भरती व्हायला येण्यापूर्वी एक-दोन दिवस अगोदर तुम्हाला कळवितो’ असे सांगून त्यांनी निरोप घेतला.

पुढच्या आठवड्यात किशोरकाका मला पुन्हा एकदा भेटायला आले. सोबत नेहमीचा रिक्षावाला होता.

‘‘उद्या सकाळी मी भरती व्हायला येतो आहे. आज थोडे साहित्य सोबत आणले आहे, बाकीचे उद्या घेऊन येतो.’’ असे सांगत त्यांनी प्रवेशअर्ज माझ्याकडे दिला. सर्व माहिती व्यवस्थित सुवाच्य अक्षरात भरली होती. सोबत आधारकार्डची झेरॉक्स आणि शुश्रूषा केंद्राच्या नावे फीचा चेक होता.

‘‘पण यावर तुमच्या मुलाची किंवा जवळच्या नातेवाइकांची सही हवी.’’ फॉर्म वाचून झाल्यावर त्यांना सांगितले.

‘‘माझा मुलगा शनिवारी मुंबईहून येणार आहे. त्या वेळी तो तुम्हाला भेटायला येईल. मी माझ्या मुलाला व मुलीला याबाबत सर्व कल्पना दिली आहे. हवं तर तुम्ही फोनवरून मुलाशी बोलता का? मी तुम्हाला फोन लावून देतो.’’ असे म्हणत काकांनी खिशातून मोबाईल काढला व लगेच आपल्या मुलाला फोन लावला.

‘‘बाबांनी मला सर्व कल्पना दिली आहे. त्यांची तुमच्याकडे भरती व्हायची इच्छा आहे. त्यांना तुमच्याकडची व्यवस्था आवडली आहे. मी याबाबत त्यांच्या डॉक्टरांशीही बोललो आहे. तुम्ही त्यांना भरती करून घ्या. मी शनिवारी सांगलीत आल्यावर तुम्हाला भेटतो.’’ त्यांचा मुलगा मोकळेपणाने म्हणाला.

‘‘ठीक आहे ’’ असे म्हणून मी फोन बंद केला व मोबाईल काकांकडे परत दिला.

‘‘उद्या सकाळी दहा वाजता या. येताना डॉ.पाटीलसरांची ट्रीटमेंटची फाईलही आठवणीने घेऊन या.’’ असे सांगून मी त्यांचा प्रवेशअर्ज माधुरीकडे दिला आणि उद्या सकाळी त्यांच्यासाठी बेड तयार करून ठेवण्याबाबत सूचना दिल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर दहा वाजता किशोरकाका आमच्याकडे भरती व्हायला आले. या वेळी रिक्षावाल्यासोबतच त्यांचा मदतनीस सोमनाथही होता. सोमनाथने पुढाकार घेऊन त्यांचे सर्व साहित्य रूममध्ये व्यवस्थित लावून दिले. दैनंदिन वापरासाठी लागणारी प्रत्येक छोटीशीही गोष्ट किशोरकाका आठवणीने आपल्यासोबत घेऊन आले होते. ऑक्सिजन सिलिंडर-सोबतच रक्तदाब व साखर तपासण्याचे मशीन याही गोष्टी त्यांनी आणल्या होत्या. इतकेच नव्हे, तर आपल्या खोलीत भिंतीवर लावण्यासाठी स्वतःचे घड्याळही घेऊन आले होते. त्यांची शिस्त आणि नीटनेटकेपणा पाहून मला अप्रूप वाटले.

रूममध्ये साहित्य लावून झाल्यावर सोमनाथ मला भेटायला आला. गेली चार-पाच वर्षे तो त्यांच्याकडे मदतनीस म्हणून नोकरी करत होता. रात्री आठ ते सकाळी आठ अशी त्याची ड्युटी होती. दिवसभरातही काही मदत लागली तर काका त्याला फोन करून बोलावून घ्यायचे. हृदयविकारामुळे अचानक छातीत दुखू लागल्यावर दोन्ही वेळा सोमनाथनेच काकांना हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. तो जणू त्यांचा जिवाभावाचा सखाच बनला होता.

सोमनाथने मला काकांच्या सवयींविषयी सांगितले.

‘‘काकांना हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे त्यांना बेडवर आडवे पडून व्यवस्थित झोप लागत नाही. त्यामुळे ते बऱ्याच वेळा आरामखुर्चीत बसूनच झोप घेतात. डॉ.पाटीलसरांनी त्यांना ऑपरेशन करायला सांगितले आहे. पण या वयात काका ऑपरेशन करून घ्यायला तयार नाहीत. आम्ही येताना सोबत आरामखुर्ची घेऊनच आलो आहोत. मला रोज सकाळी सात वाजता त्यांनी इकडे यायला सांगितले आहे. ते रोज सकाळी माझ्याकडून तीळतेलाने बॉडी मसाज करून घेतात. तसेच मी त्यांना व्यायामासाठीही मदत करत असतो. इथे येण्याबाबत काकांनी मला तुम्हाला भेटून तुमची परवानगी घ्यायला सांगितले आहे.’’ तो अदबीने म्हणाला.

‘‘माझी काही हरकत नाही. मी माधुरीला तशी कल्पना देऊन ठेवतो. फक्त रोजच्या रोज इथल्या रजिस्टरमध्ये तुम्ही येऊन गेल्याची नोंद करत जा.’’ मी सोमनाथला अनुमती देत म्हणालो. मला त्याच्या व्यक्तिमत्त्वातला ज्येष्ठांविषयीचा आस्थेवाईकपणा भावला.

‘‘काकांना काही त्रास होऊ लागल्यास रात्री-अपरात्री मला कधीही फोन करा. मी लगेच येईन.’’ तो आपुलकीच्या सुरात म्हणाला व माझे आभार मानून निघून गेला.

त्या दिवशी सायंकाळी चारच्या सुमारास मी किशोरकाकांना भेटण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेलो. त्या वेळी त्यांचे आरामखुर्चीत बसून मोबाईलवरून चॅटिंग सुरू होते. माझी चाहूल लागताच त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला.

‘‘नातीशी गप्पा मारत होतो. मी तिला होस्टेलवर राहायला आलो आहे म्हणून सांगितले.’’ काका हसत-हसत म्हणाले.

‘‘हा उपक्रम आम्ही नवीनच सुरू केला आहे. तुमची काही गैरसोय होऊ लागल्यास निःसंकोचपणे सांगा.’’ मी त्यांचा अंदाज घेत म्हणालो. इथे भरती झाल्यानंतर बहुतेकांना इथल्या वातावरणामध्ये रुळण्यासाठी चार-आठ दिवस लागतात. त्यामुळे सुरुवातीस काही दिवस त्यांच्याशी आपलेपणाने संवाद साधून धीर देण्याची गरज असते, असा माझा अनुभव आहे.

‘‘आम्ही म्हातारे लोक खूप तक्रारखोर असतो डॉक्टर. तुम्ही कितीही उत्तम व्यवस्था केली, तरी काही तरी खुसपट काढणारच!’’ ते खट्याळपणाने म्हणाले, ‘‘बाकी तुम्ही स्ट्रक्चर छान तयार केले आहे. आता छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये थोडेफार लक्ष घालायला हवे. त्याबाबत मी तुम्हाला वेळोवेळी सुचवत जाईन. त्यांपैकी तुम्हाला जे शक्य असेल ते अमलात आणा. पण हे सर्व करण्यामागची तुमची तळमळ मला खूप महत्त्वाची वाटते.’’ काका कौतुकाच्या सुरात म्हणाले.

‘‘सोई-सुविधांबरोबरच कौटुंबिक वातावरण तयार करण्याकडे आमचा अधिक कल आहे. तुम्हा सर्वांचे इथले वास्तव्य जास्तीत जास्त आनंददायी कसे करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. त्या दृष्टीने तुम्ही आम्हाला अवश्य मार्गदर्शन करा.’’ मी त्यांना विनंतीच्या सुरात म्हणालो.

‘‘प्राप्त परिस्थितीत आनंदी आणि समाधानी कसे राहायचे, ही तडजोड आम्हा वृद्धांनाही करता यायला हवी; कारण आता दिवसेंदिवस अशा उपक्रमांची आवश्यकता वाढत जाणार आहे. आपण लहान मुलांना पाळणाघरात ठेवतो, मग आम्ही ज्येष्ठांनीही अशा उपक्रमांना स्वीकारण्याची तयारी ठेवायला नको का?’’ काका स्थितप्रज्ञपणे म्हणाले. त्यांच्या बोलण्यातील आणि विचारातील समजूतदारपणा पाहून मला त्यांच्याबद्दल अधिक कुतूहल वाटू लागले.

माझी आणि किशोरकाकांची हळूहळू छान गट्टी जमली. मी वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारायचो. त्यांचे वाचन अफाट होते. मी एकदा त्यांना डायरी लिहिण्याबाबतही सुचविले. पण त्यांनी मला स्पष्ट शब्दांत नकार दिला.

‘‘मी सध्या केवळ वर्तमानात आनंदाने जगायचा प्रयत्न करतो आहे. उगीच भूतकाळ उगाळत बसायचे नाही आणि भविष्याबद्दल विचार करूनही चिंतित व्हायचे नाही, असे मी ठरविले आहे. मला पेंटिंग काढण्याची आवड आहे, त्यासाठी मला साहित्य आणून द्यायला सांगा. मी पेंटिंग काढत जाईन.’’ त्यानुसार मी माधुरीला त्यांना कागद व कलर आणून द्यायला सांगितले.

ठरल्याप्रमाणे शनिवारी सकाळी त्यांचा मुलगा त्यांना भेटायला आला. काकांचे आपल्या मुलाशी मैत्रीपूर्ण नाते असल्याचे त्यांच्यातील गप्पांवरून माझ्या लक्षात आले. वडिलांची विचारपूस करून झाल्यावर तो माझ्या केबिनमध्ये आला.

‘‘माझे वडील खूप शिस्तप्रिय आणि करारी आहेत, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. त्यामुळे आम्ही कोणी त्यांच्या मनाविरुद्ध जात नाही. आज-उद्या दोन दिवसांकरता मी त्यांना घरी घेऊन जातो आहे. सोमवारी सकाळी त्यांना परत आणून सोडतो. बाकी ते तुमच्या इथे छान रुळल्याचे पाहून बरे वाटले.’’ तो समाधानाने म्हणाला.  त्यानुसार काका आपल्या घरी दोन दिवस जाऊन आले. पुढच्या आठवड्यात त्यांची मुलगीही त्यांना भेटायला आली. ती मात्र काहीशी भावुक झाली होती. काकांनी तिची समजूत काढली. या वेळी काकांची नातही त्यांना भेटायला आली होती. काकांनी तिला आपल्याकडील वारली पेंटिंग भेट दिलं. त्या दोघांची बराच वेळ धमाल चालली होती. मुलगीही दोन दिवस सांगलीत राहणार होती. पण या वेळी काका आपल्या घरी गेले नाहीत. मुलीला त्यांनी दुसऱ्या दिवशी परत एकदा भेटायला यायला सांगितले. या वेळी काकांच्या मनातील आपल्या नातीविषयीचा हळवा कोपराही माझ्या लक्षात आला. ‘‘घरी गेलो तर नातीला निरोप देणे मला जड गेले असते.’’ ते हळवे होऊन मला म्हणाले होते.

त्यानंतर काकांनी इथल्या व्यवस्थापनामध्ये लक्ष घालायला सुरुवात केली. सर्वांत पहिल्यांदा त्यांनी आठवडाभरासाठी नाश्त्याच्या वेगवेगळ्या पदार्थांची यादीच करून दिली.

‘‘रोज-रोज तेच ते पदार्थ नकोत. नाश्त्यामध्ये वैविध्य हवे. शेवटी आम्ही दावणीला बांधलेले. तुम्ही द्याल तेच खाणार.’’ काका मला चिडवत म्हणाले. त्यांचे ते बोलणे ऐकून मी खजील झालो, पण तेव्हापासून आमच्या नाश्त्यामध्ये मात्र वैविध्य आले.

दुपारी रिकाम्या वेळी ते सर्व सिस्टर व मावश्यांना एकत्र बोलावून घ्यायचे आणि त्यांना वेगवेगळ्या सूचना द्यायचे.

‘‘कपड्यांच्या घड्या घालून ज्यांच्या-त्यांच्या रूममध्ये ट्रॉलीवर ठेवत जा, म्हणजे सकाळी अंघोळीच्या वेळी गोंधळ होणार नाही.’’ इथपासून ते सिस्टरांनी व मावश्यांनी मास्क वापरून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयीही बजावायचे. विशेष म्हणजे, ते कधीही इथल्या स्टाफशी अरेरावीच्या सुरात बोलले नाहीत. त्यामुळे त्यांची सर्वांशी छान गट्टी जमली होती.

दर महिन्याला ते सोमनाथसोबत डॉ. पाटील यांच्याकडे तपासणीसाठी नियमितपणे जाऊन यायचे. ‘‘तुमच्या इथे भरती झाल्यावर काकांची तब्येत सुधारली आहे बघा.’’ सोमनाथ मला कौतुकाने सांगायचा. ते दिवसभर स्वतःला वेगवेगळ्या उपक्रमांत व्यग्र ठेवायचे. ते मला कधीच कंटाळलेले आणि उदास दिसले नाहीत.

संवेदना शुश्रूषा केंद्रास भेट द्यायला येणारे अनेक मान्यवर त्यांच्या ओळखीचे असायचे. त्या वेळी ते त्यांच्याशी शुश्रूषा केंद्राबद्दल भरभरून बोलायचे. ‘‘काका, तुम्ही आता संवेदना शुश्रूषा केंद्राचे व्यवस्थापक म्हणून ऑफिसमध्येच बसायला सुरुवात करा.’’ मी एकदा गमतीने त्यांना म्हणालोही होतो.

एके दिवशी रात्री माझा राउंड संपल्यावर मी घरी जायच्या तयारीत असताना काका माझ्या केबिनमध्ये आले.

‘‘डॉक्टर, रोज सकाळी तुमच्या राऊंडची सुरुवात तुम्ही या प्रार्थनेने करत जा.’’ असे म्हणत त्यांनी ‘अनायासेनं मरणं’ हा श्लोक लिहिलेला कागद माझ्या हातात दिला.

‘‘माणसाला कसं चालता-बोलता मरण यायला हवं. मी रोज सकाळी हीच प्रार्थना करत असतो. इथल्या अंथरुणावर खिळलेले आणि बेडसोर्स झालेले लोक पाहिले की, माझा जीव व्याकूळ होतो. बेडसोर्स होऊ नयेत म्हणून आपल्याला खबरदारी घेता येत नाही का?’’ काकांनी अस्वस्थपणे विचारले. पहिल्यांदाच काकांना असे दुःखी-कष्टी होताना पाहत होतो.

‘‘एअर बेड वापरणे, सतत पोझिशन बदलणे अशी खबरदारी घ्यावी लागते.’’ मी त्यांना समजावत म्हणालो.

‘‘मी रोज सकाळी माझ्या अंगाला तीळतेल लावून घेत असतो. तुम्ही सर्वांसाठीच हा प्रयोग करून बघायला हरकत नाही.’’ ते आपल्या परीने मला उपाय सुचवीत म्हणाले. ‘ठीक आहे’ म्हणत त्यांना गुड नाइट करून मी त्यांचा निरोप घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता मी नेहमीप्रमाणे संवेदना शुश्रूषा केंद्रात आलो. सर्वत्र फेरफटका मारून व विचारपूस करून झाल्यावर माझ्या केबिनमध्ये येऊन वाचत बसलो. किशोरकाका अजून झोपलेले दिसत होते. रात्री त्यांना लवकर झोप येत नसल्याने सकाळी ते उशिरा उठायचे.

साडेसातच्या दरम्यान माधुरी धावतच माझ्या केबिनमध्ये आली.

‘‘सर, किशोरकाका स्टॉप झाले आहेत!’’ ती घाबरलेल्या स्वरात म्हणाली. ते ऐकून मला धक्का बसला. स्टेथास्कोप घेऊन गडबडीने त्यांच्या रूममध्ये गेलो. सोमनाथ त्यांच्या बेडजवळ उभा राहून हुंदके देत रडत होता. मी काकांना तपासून पाहिले. रात्री झोपेतच त्यांचा मृत्यू झाला होता. मी सोमनाथच्या पाठीवर हात फिरवत त्याला धीर दिला.

‘‘मी सात वाजता आल्यावर त्यांना गाढ झोप लागली आहे, असे समजून त्यांना उठवले नाही. पण अर्धा तास झाला तरी त्यांची काहीच हालचाल दिसेना म्हणून जागे करायला गेलो, तेव्हा माझ्या लक्षात आले.’’ सोमनाथ रडतच म्हणाला.

‘‘काकांच्या मुलाला आपण कळवायला हवे.’’ मी सोमनाथला म्हणालो. त्याने आपल्या खिशातील मोबाईल काढून लगेच फोन लावला. मी काकांच्या मुलाला झाल्या प्रकाराची कल्पना दिली.

‘‘मी लगेच तिकडे यायला निघतो आहे. थोड्या वेळात मी तुम्हाला फोन करून पुढच्या व्यवस्थेबद्दल कळवतो.’’ त्यांचा मुलगा स्वतःला सावरत म्हणाला.

‘‘काकांनी मला पुढच्या तयारीबद्दल अगोदरच सर्व सांगून ठेवले आहे. दादा मुंबईहून येईपर्यंत त्यांनी आपली बॉडी भारती हॉस्पिटलमध्ये शवागारात ठेवायला सांगितली आहे. त्यांच्या खिशात नेहमी चार-पाच हजार रुपये असतात. ते घेऊन त्यांनी मला घाटावर जाऊन पुढची सर्व तयारी करून ठेवायला सांगितली आहे. अहो डॉक्टर, काकांनी आपल्या मृत्यूनंतर अंगावर घालायला पांढरा शर्ट आणि विजार स्वतःच्या हातांनी शिवून आपल्या बॅगमध्ये मला दाखवून ठेवली आहे. काकांना मरण मात्र अगदी त्यांच्या मनासारखे आले बघा. आपल्याला असेच सहज मरण यावे, असे त्यांची इच्छा होती.’’ सोमनाथ एकेक गोष्ट सांगत होता. ते ऐकताना मी चक्रावून गेलो होतो. मी काकांचे डेथ सर्टिफिकेट तयार करून सोमनाथकडे दिले. त्यानंतर ॲम्ब्युलन्स बोलवून काकांचा मृतदेह शवागारात ठेवण्यासाठी भारती हॉस्पिटलमध्ये पाठविला. हृदयविकाराचा त्रास असल्याने काकांना कधीही मृत्यू येऊ शकतो, ही गोष्ट माहिती असूनही त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने मीही सुन्न झालो होतो.

काही दिवसांनंतर काकांचा मुलगा आणि मुलगी मला भेटायला आले.

‘‘बाबांनी तुमच्याकडे जमा असलेल्या डिपॉझिटची रक्कम तुमच्या शुश्रूषा केंद्रासाठी देणगी द्या, असे लिहून ठेवले आहे.’’ काकांचा मुलगा डिपॉझिटची पावती माझ्याकडे देत म्हणाला.

‘‘त्यांच्या बॅगेत आम्हाला काही आंतरदेशीय पत्रे मिळाली. त्यांनी ती आपल्या मित्रांना लिहिली आहेत. ‘तुम्ही शुश्रूषा केंद्राला एकदा भेट द्या आणि तुम्हाला मदत करा’, असे आवाहन त्यात केले आहे. त्यांना तुमच्या कामाविषयी खूप कौतुक वाटायचे. बाबांनी आयुष्यभर आपल्या परीने सर्वांना मदत तर केलीच, पण आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याबाबत ते नेहमी दक्ष असायचे. अगदी आम्हा कुटुंबीयांच्या बाबतीतही त्यांनी आपल्या या भूमिकेत तडजोड केली नाही.’’ त्यांची मुलगी गहिवरल्या सुरात म्हणाली. ते ऐकताना माझ्याही डोळ्यांत अश्रू तरळले होते.

आपल्या मरणाचाही उत्सव करणाऱ्या या अवलियाला कविवर्य बा.भ. बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे जीवन अधिक नेमकेपणाने कळले असेल का?

Tags: सदर साधना सदर संवेदना शुश्रुषा केंद्र संवेदना जगण्याचे भान दिलीप शिंदे sadhana sadar arogya series jaganyache bhan sanvedana dr dilip shinde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात