डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘अनोखा संघर्ष’, ‘ये दिल मांगे मोअर’ हे लेख वाचून त्यांचे पुढे काय झाले, अशी विचारणा करणारेही फोन आले. ‘साक्षात्काराचा क्षण’ या लेखातील हरिभाऊने आपल्या व्यसनमुक्तीच्या प्रवासाबाबत सांगताना ‘माझे नाव न बदलताच लिहा’ अशी अट घातली होती. सध्या हरिभाऊ जेव्हा कधी माझ्या दवाखान्यात येतो तेव्हा ‘जय हिंद’ म्हणून सॅल्यूट करतो आणि आता मी व्यसनमुक्तीचा प्रचार करीत आहे असे अभिमानाने सांगतो. या नेम नॉट नोन वाचकांच्या प्रतिक्रिया आणि शंकांमुळे मला नियमितपणे लिहिण्याचे बळ मिळाले.

‘मी डॉक्टर का झालो आहे?’ हा माझा पहिला लेख रुग्णानुबंध सदरामध्ये जवळपास दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला आणि त्याला साधनाच्या वाचकांच्या भरघोस प्रतिक्रिया आल्या, हे ठीक आहे. पण एके दिवशी खाकी लखोट्यातून एक पत्र आले.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सातारा यांनी ते पाठविले होते. मी ते अधीरतेने उघडून पाहिले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम देशपांडे यांचे ते पत्र होते. त्यांनी माझे अभिनंदन करून असे लिहिले होते की, ‘आपल्या लेखाच्या प्रती सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना वाचण्यासाठी आणि त्याप्रमाणे कृती करण्यासाठी पाठविल्या आहेत...’ ते पत्र वाचून मला साधनाच्या सामाजिक बांधिलकीची आणि माझ्यावरील जबाबदारीची जाणीव झाली.

ही जाणीव मनात सदैव बाळगत ‘रुग्णानुबंध’ सदरातील 25 लेखांतून मी माझे अनुभव आपल्यासमोर मांडले आहेत. सत्य हे नेहमी कल्पिताहून अद्‌भुत असते, असे म्हणतात. एक फॅमिली डॉक्टर या नात्याने दवाखान्याच्या चार भिंतींत वावरताना अशी अनेक अद्‌भुत सत्यं आम्हांला आमच्या दैनंदिनीत पाहावी-ऐकावी लागतात. ती पाहून-ऐकून मन कधी हेलावून जातं तर कधी हरखूनही जातं. या संवेदनशीलतेचे रूपांतर भावनाविवशतेत होऊ न देता रुग्णांशी संवाद साधण्याची कला आम्हांला जोपासावी लागते. मानवी स्वभावाचे मनोज्ञ दर्शन आम्हांला आमच्या दवाखान्यात घडत असते.

दिवसभर तापानं फणफणत असूनही घरात राबणारी गृहिणी, नवरा कामावरून परत आल्याशिवाय आणि त्याने पुढे घालून आणल्याशिवाय बहुतेक वेळा दवाखान्यात येत नाही. किंवा आज अंगात थोडी कणकण आहे म्हणून ऑफिसमधून लवकर बाहेर पडणारा नवरा घरी जाता जाता दवाखान्यात येत नाही. तो अगोदर घरी जातो, अंगावर शाल पांघरून झोपतो. मग त्याची बायको त्याच्या कपाळावर हात ठेवून आपुलकीने विचारपूस करते आणि त्याला पुढे घालून दवाखान्यात घेऊन येते.

आजारी व्यक्ती अशी कधी हट्टी बाळ बनून आमच्या दवाखान्यात येते तर कधी स्थितप्रज्ञ होऊन आपल्या जगण्याचे सिंहावलोकन करू लागते. कधी अबोल होऊन शून्यात हरवते तर कधी वात झाल्यासारखे भरभरून बोलून घेते. अशावेळी त्या व्यक्तीला आपल्या सोबत कुणीतरी जिवाभावाचे हवे असते. आम्ही फॅमिली डॉक्टरही केवळ त्यांच्या सुख-दुःखाचे साक्षीदार न राहता आपसूकपणे वाटेकरी होऊन जातो.

माझ्याकडे एक 93 वर्षांचे आजोबा आणि 86 वर्षांची आजी हे सहस्त्रबुद्धे दांपत्य रुग्ण म्हणून येते. पेन्शन हातात पडली की दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ते पिकनिकला आल्यासारखे माझ्या दवाखान्यात येतात. ‘ह्यांचं ब्लडप्रेशर बघा.’ ‘हिचं वजन किती आहे?’ असे अनेक प्रश्न विचारून ते मला भंडावून सोडतात. शिवाय त्या दोघांना ऐकायलाही नीट येत नाही. पण त्यांच्या जगण्यातील उत्कटता आणि प्रेम पाहून मी अंतर्मुख होतो.

अशा अनेक रुग्णांनी माझा दृष्टिकोन समृद्ध केला आहे आणि मला लेखनासाठी ऊर्जा दिली आहे. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला असे वाटत असते की आपली गोष्ट, आपली सुख-दुःखे, आपले ताणतणाव, आपले प्रश्न इतरांहून निराळे आहेत. प्रत्यक्षात मात्र कोणताही रुग्ण जेवढे वैयक्तिक आणि खाजगी बोलू लागतो तेवढे ते अधिक सार्वजनिक असते याची मला जाणीव झाली आहे. या जाणिवेमुळेच हे अनुभव मी तुमच्यासमोर मांडले आहेत.

ते मांडत असताना हिपोक्रॅटिसच्या नैतिकतेच्या शपथेचे भान ठेवून कुणाच्याही वैयक्तिक जीवनाला बाधा पोहोचणार नाही, याची दक्षता मी घेतली आहे. हे अनुभव वाचून काही वाचकांच्या जगण्यातील काही प्रश्न थोडे सोपे झाले असतील आणि काहींना त्यांच्या जीवनातील आनंदाचे अनुभवरहस्य शोधता आले असेल तर माझ्या या लेखनाचे सार्थक झाले असे मी समजेन.

कोणत्याही आजाराची कारणपरंपरा केवळ वैयक्तिक किंवा शारीरिक पातळीवर मर्यादित राहत नसून सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय अशा अनेक घटकांमध्ये गुंतलेली असते. त्याची निदान-चिकित्सा करण्यासाठी डॉक्टर, रुग्ण आणि समाज यांनी एकत्रितपणे प्रयत्नशील राहायला हवे. आपण असा संवाद साधू शकलो तर डॉक्टर-रुग्ण नातेसंबंधांचे बदलत चाललेले स्वरूप सुधारू शकेल.

काही दिवसांपूर्वी आम्ही ‘डॉक्टर्स डे’ निमित्त ‘असा असावा माझा फॅमिली डॉक्टर’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्या वेळी व्यासपीठावरून बोलताना काही मान्यवर लोक ‘फॅमिली डॉक्टर’ या संकल्पनेबाबत आठवणींतच रमल्याची खंत मला वाटली होती. पण साधनाच्या वाचकांच्या प्रतिक्रियांवरून लोकांना ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना अबाधित राहायला हवी  आहे, हा दिलासा मला मिळाला. हे माझ्या या लेखमालेचे फलित आहे असे मी समजतो.

या लेखमालेच्या निमित्ताने गेली दोन वर्षे अनेक मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया मला प्रत्यक्ष भेटीत, फोनवरून, एस.एम.एस. करून वा पत्रांद्वारे कळविल्या आहेत. हे केवळ माझ्या लेखनाचे कौतुक नसून मला वैद्यकीय व्यवसाय अधिक निष्ठेने आणि मानवतावादी दृष्टिकोनातून करण्यासाठी दिलेल्या शुभेच्छा आहेत असे मी मानतो.

ज्येष्ठ समीक्षक आणि 81 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म.द.हातकणंगलेकर सरांनी साधनातील माझे लेख वाचून आवर्जून बोलावून घेतले. साधनामध्ये लेखनाची संधी ही राज्यस्तरावरील मान्यता आहे, असे सांगून नियमितपणे लेखन करण्याचा सल्ला दिला. साधनाचे स्टार लेखक राजाभाऊ शिरगुप्पे यांनी ‘तुमच्यातील माणूस मला भावतो,’ अशी दाद देऊन अधिक स्पष्ट आणि परखडपणे लिहिण्याचा कानमंत्र दिला. पुणे विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.मनोहर जाधव यांनी प्रतिक्रिया कळविली तेव्हा मी त्यांच्याशी लेखनप्रक्रियेबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ‘तुम्ही फॉर्मबाबत चिंता करू नका. तुमचे अनुभव अस्सल आहेत. त्यामुळे असेच उत्स्फूर्तपणे लिहा.’ असा त्यांनी मला धीर दिला.

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं.बोराडे यांना मी दहा वर्षांपूर्वी आमच्या एका दिवाळी अंकाच्या प्रकाशनासाठी निमंत्रित केले होते. तेव्हा त्यांनी खाजगीत मला वैद्यकीय व्यवसायाकडे अगोदर नीट लक्ष देण्याचा वडीलकीचा सल्ला दिला होता. मधे बरीच वर्षे माझा त्यांच्याशी संपर्क नव्हता. साधनातील लेख वाचून त्यांनी आवर्जून माझे कौतुक केले आणि दवाखाना कसा चालला आहे, म्हणून विचारपूस केली. ‘दवाखाना उत्तम चालला असून, या लेखनामुळे वैद्यकीय पेशाकडे मी अधिक डोळसपणे पाहू लागलो आहे’ अशी कबुली मी त्यांना दिली.

सामाजिक भान असलेले सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्याशी या लेखमालेमुळेच माझा स्नेह जुळला. आम्ही आयोजित केलेल्या ‘सामाजिक स्वास्थ्यरक्षण आणि आपली जबाबदारी’ या विषयावरील मुलाखतीसाठी ते आवर्जून उपस्थित राहिले. डॉ.नरेंद्र दाभोलकर सरांनी पहिल्याच भेटीत ‘लेखन छान चालले आहे’ अशी पाठीवर शाबासकीची थाप दिली. माझे मित्र नामदेव माळी यांनी मला वारंवार गद्यलेखनासाठी प्रेरणा व प्रोत्साहन दिले, अजूनही देत असतात.

या लेखमालेच्या निमित्ताने माझे आवडते लेखक राजन गवस यांच्याशी माझा परिचय झाला. अनंत भावे, डॉ.अनंत फडके, अनंत साठे, डॉ.रवी बापट, द.ना.धनागरे, बाबा भांड, प्रकाश कामत, कुसुम कर्णिक, सुनीलकुमार लवटे, कृष्णात खोत, श्रीपाद जोशी अशा अनेक मान्यवरांनी माझ्या लेखनाची दखल घेणे मला मोलाचे वाटते. मालती किर्लोस्कर, प्रा.अविनाश सप्रे, तारा भवाळकर, प्रा.व.के.पाटील, प्रा.एम.एस.रजपूत, ॲड.चिमण लोकूर, ॲड.के.डी.शिंदे, महेश कराडकर, डॉ.शीतलप्रसाद भरमगुडे या सांगलीतील माझ्या घरच्या मंडळींनी तोंडभरून कौतुक केले.

मला या सर्व प्रतिक्रियांचा आनंद आणि अभिमान आहेच, पण पुढचा प्रत्येक लेख लिहिण्यासाठी मला उद्युक्त केले ते साधनाच्या सर्वसामान्य वाचकांनी. त्यांपैकी काही प्रतिक्रियांचा उल्लेख करणे आवश्यक वाटते.

‘मी डॉक्टर का झालो आहे?’ हा माझा लेख वाचून मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही मुलांचेही मला फोन आले. अगदी योग्यवेळी तुमचा लेख आम्हांला वाचायला मिळाला, असे ते भारावून सांगत होते. (त्यांनी हे आपले भारावलेपण वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्यावर जाणतेपणाने जपावे, ही अपेक्षा.)

‘काइंडली को- रिलेट’ या लेखासाठी मी एका विशेषज्ञांना माहिती विचारत होतो. तेव्हा त्यांनी मला ‘हे असले काही तुम्ही लिहू नका. आधीच आपल्या व्यवसायाबद्दल बरं बोललं जात नाही’ असा सल्ला दिला.

‘आंधळी कोशिंबीर’ हा लेख वाचून काही तरुणांचे शंका विचारणारे फोन आले. काही बुजुर्गांनी ‘हे लिहिण्याची काय गरज होती’, असा नाराजीचा सूरही व्यक्त केला. एका गृहस्थाने आपल्या पत्नीला गर्भाशय शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते. तेव्हा त्यांना त्या हॉस्पिटलमधील काऊंटरवर साधनाचा अंक दिसला आणि योगायोगाने त्या अंकातील माझा ‘गर्भाशयाची गोष्ट’ हा लेख त्यांनी वाचला आणि लगेच मला फोनवरून सेकंड ओपीनियन विचारले.

‘अनोखा संघर्ष’, ‘ये दिल मांगे मोअर’ हे लेख वाचून त्यांचे पुढे काय झाले, अशी विचारणा करणारेही फोन आले. ‘साक्षात्काराचा क्षण’ या लेखातील हरिभाऊने आपल्या व्यसनमुक्तीच्या प्रवासाबाबत सांगताना ‘माझे नाव न बदलताच लिहा’ अशी अट घातली होती. सध्या हरिभाऊ जेव्हा कधी माझ्या दवाखान्यात येतो तेव्हा ‘जय हिंद’ म्हणून सॅल्यूट करतो आणि आता मी व्यसनमुक्तीचा प्रचार करीत आहे असे अभिमानाने सांगतो. या नेम नॉट नोन वाचकांच्या प्रतिक्रिया आणि शंकांमुळे मला नियमितपणे लिहिण्याचे बळ मिळाले.

आता माझे मित्र बनलेले, साधनाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांचा नामोल्लेख केल्याशिवाय मी या मनोगताचा आणि लेखमालेचा समारोप करू शकत नाही. त्यांनी मला साधनामध्ये लेखनाची संधी दिली म्हणूनच नव्हे तर त्यांच्याशी झालेल्या अनेक प्रदीर्घ चर्चांनी लेखनासोबतच माझा जगण्याबाबतचा आणि वैद्यकीय पेशाबद्दलचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होत गेला म्हणूनही! मी त्यांच्या व साधना परिवाराच्या ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद!

Tags: गर्भाशय व्यसनमुक्ती दवाखाना वैद्यकीय पेशा साधना uterus detox clinic medical profession sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके