डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हे खरं आहे की आज स्त्री-भ्रूण हत्या ह्या गंभीर सामाजिक समस्येबाबत आपण सर्वजण खडबडून जागे झालो आहोत. शासकीय आणि सामाजिक स्तरावर अनेक घटक जनजागृतीपासून ते स्टिंग ऑपरेशनपर्यंत वेगवेगळ्या मोहिमा राबवीत आहेत. पण त्याचबरोबर हेही खरंच आहे की अजूनही काही अपप्रवृत्ती विज्ञानाचा गैरफायदा घेऊन वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत गर्भलिंग तपासणी करत आहेत आणि तो गर्भपात करण्यासाठी कसायालाही लाजविणारे काही हात धजावत आहेत. हे अनंतकाळाचे माते, समाजमनातील स्त्री-भ्रूणहत्येची ही विषवल्ली उखडून काढण्यासाठी आता तुलाच दुर्गावतार धारण करायला हवा.

‘‘आरं अधिकराव, पाखरं का एवढी कोयळत्याती रं? सापबिप निघालाय का बघ.’’ आजी अंगणात येऊन असं वडिलांना सांगायची आणि मी घाबरून आजीच्या कुशीत शिरायचो. ‘साप निघाल्यावर पाखरं का ओरडतात?’ म्हणून आजीला मी एकदा विचारलंही होतं. ‘साप पाखरांच्या घरट्यात जाऊन त्यांची अंडी-पिल्लं खातो; म्हणून त्याला हुसकावून लावण्यासाठी पाखरं ओरडत असतात’ असं आजीनं तेव्हा सांगितलं होतं.

अचानक पाखरांच्या कलकलाटाने मला जाग आली आणि मी उठून बसलो. रविवार होता. सुट्टीचा दिवस. दुपारची वेळ होती. मी सहलीसाठी सहकुटुंब ब्रह्मनाळला चिंचेच्या बनात आलो होतो. शहरातील गोंगाटापासून दूर, नदीकाठावरचं हे एक सुंदर ठिकाण आहे. तिथे जितसिद्धेश्वराचं प्राचीन मंदिर आहे. चिंचेच्या झाडांची गर्द सावली असते. पारंब्यांचे हातपाय पसरून काही वटवृक्षही विस्तारले आहेत. पाखरांचा अखंड किलबिलाट सुरू असतो. लोकांचीही फारशी वर्दळ नसते. मला हे ठिकाण खूपच आवडतं.

निसर्गाच्या सान्निध्यातले हे काही तास माझ्या खेड्यातील बालपणाच्या आठवणी ताज्या करतात. नेहमीप्रमाणे आम्ही घरातूनच डबा घेऊन आलो होतो. मनसोक्त जेवण झालेलं. चटई अंथरून मी वामकुक्षी घेत होतो. मुलं खेळता खेळता बरीच लांब गेली होती. मिसेस झाडावरच्या चिंचा काढत होती.  ‘‘अरे इतक्या लांब जाऊ नका. इकडे या.’’ मी मुलांना हाक मारून बोलावलं. मुलं आपला खेळ अर्ध्यात सोडून माझ्याकडे आली. मी असं अचानक उठून मुलांना बोलवीत असल्याचं पाहून मिसेसही माझ्याकडे आली.

‘‘काय झालं हो?’’ मिसेसने विचारलं. 

‘‘पाखरं किती कलकलाट करताहेत बघ ना! कुठेतरी साप वगैरे निघाला असेल.’’ 

‘‘बाबा, साप निघाल्यावर पाखरं का ओरडतात हो?’’ 

मी लहानपणी आजीला विचारलेला प्रश्नच माझ्या मोठ्या मुलाने मला विचारला. ‘‘तुला तो बहाद्दर चिमण्यांचा धडा आठवतोय का ग?’’

मी मिसेसला विचारले, ‘‘बहुतेक आपण प्राथमिक शाळेत असताना वगैरे असावा.’’ 

‘‘नाही.’’ मिसेस थोडा वेळ आठवून म्हणाली. मला इयत्ता नक्की आठवत नाही, पण आमच्या लोहारबार्इंनी तो शिकवल्याचं मला चांगलं आठवतं.

ती साप आणि बहाद्दर चिमण्यांची गोष्ट मी मुलांना सांगू लागलो... 

‘एकदा एक साप एका झाडाकडे चालला होता. त्या झाडावर चिमण्यांची बरीच घरटी होती. साप आता आपल्या घरट्यातील अंडी, पिल्लं खाणार म्हणून सर्व चिमण्या चिवचिवाट करत एकत्र आल्या. सापाच्या पाठीवर आपल्या इवल्याशा चोचीनं वार करून त्याला हुसकावू लागल्या. सापही फणा काढून त्यांच्यावर फूत्कारू लागला. साप आणि चिमण्यांची ही झुंज बराच वेळ सुरू होती. अचानक एक चिमणी सापाच्या फण्याजवळ आली. सापाने तिला दंश केला. ती चिमणी बिचारी मरून पडली. तरीही बाकीच्या चिमण्या घाबरल्या नाहीत. आपल्या घरट्यातील पिल्लांचा जीव  वाचविण्यासाठी त्वेषाने सापाशी लढत राहिल्या. शेवटी तो साप जखमी झाला आणि मरून पडला. त्याला मुंग्या लागल्या. अशा प्रकारे चिमण्यांच्या थव्याचा विजय झाला.’

... गोष्ट ऐकून मुलं खूष झाली आणि परत खेळायला निघाली. 

‘‘जास्त लांब जाऊ नका रे. इथं जवळच खेळा.’’ मी मुलांना बजावलं. 

माझ्या डोळ्यांसमोर मात्र सापाशी झुंजणारा चिमण्यांचा थवा नाचू लागला. 

‘‘अग काल रात्री मी तुला सांगायचं विसरलोच. तो रिक्षावाला अरुण पेढे घेऊन आला होता. त्याला चक्क मुलगा झाला म्हणे.’’

मी मिसेसला सांगितलं. ‘‘मुलगा झाला? तुम्ही तर म्हणाला होता की, त्यांनी कुणाकडे तरी सोनोग्राफी करून तपासणी करून घेतली आहे. दुसरीही मुलगीच आहे म्हणून गर्भपात करण्यासाठी तुमच्याकडे शिफारस मागायला आला होता ना?’’ 

‘‘होय. त्याच्या बायकोचा कोणीतरी नातेवाईक शासकीय रुग्णालयात शिपाई म्हणून नोकरीला आहे. त्याने त्याच्या ओळखीने सोनोग्राफी केल्यावर गुपचूप बाहेर येऊन मुलगी आहे म्हणून त्यांना सांगितलं होतं म्हणे.’’ 

‘‘अवघड आहे. लोक कोणत्या थराला जातील, काही सांगता येत नाही. आता त्याच्या बायकोच्या त्या नातेवाईकाला अगोदर पेढे देऊन ये म्हणून सांगायचं नाही का?’’ मिसेस उद्वेगानं म्हणाली. इतक्यात मुलांचं खेळताखेळता कशावरून तरी भांडण सुरू झालं. छोटा मुलगा रडू लागला. मिसेस त्यांच्याकडे गेली. 

मला सहा-सात महिन्यांपूर्वी अरुणने माझ्याशी घातलेली हुज्जत आठवली. त्या वेळी मी खूप अस्वस्थ झालो होतो. पण केवळ अरुणला समजावून सांगण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हतो. अरुण माझा नेहमीचा पेशंट. त्याची रिक्षा आहे. तो शाळेतील मुलांची ने-आण करतो. त्याला एक मुलगी आहे. 

एके दिवशी दुपारी तो माझ्या दवाखान्यात आला. ‘‘डॉक्टर, तुमचा थोडा सल्ला पाहिजे आहे.’’  तो दबकत दबकत म्हणाला, ‘‘माझी मिसेस प्रेग्नंट आहे. तीन महिने झाले आहेत. ती परवा माहेरी गेली होती. तिकडे ती तपासणी करून आली आहे. दुसरीही मुलगीच आहे म्हणे. ती गर्भ खाली करून घेऊ या म्हणून हट्ट धरून बसली आहे. ते काही खरं असेल का हो?’’

‘‘अरे अरुण, हल्ली असं कोणी काही करत नाही. गर्भलिंग तपासणी करणं कायद्याने गुन्हा आहे, तुम्हाला हे कोणी सांगितलं?’’ 

‘‘तिचा एक नातेवाईक सरकारी दवाखान्यामध्ये शिपाई म्हणून नोकरीला आहे. ती आणि सासूबाई त्याच्या ओळखीने तिची तपासणी करून आल्या आहेत.’’ 

तो कचरत कचरत म्हणाला. काही खाजगी रुग्णालयांमधे भरमसाठ पैसे घेऊन असे प्रकार गुपचूप होत असल्याची कुजबूज मी ऐकून होतो. पण अरुण सांगत होता त्याप्रमाणे शासकीय रुग्णालयातच असा प्रकार होत असेल तर कुंपणच शेत खाऊ लागल्यावर दाद कोणाकडे मागायची? 

कदाचित तो माझा अंदाज घेण्यासाठी खोटंनाटंही सांगत असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

‘‘मला हे काही खरं वाटत नाही. अरे हल्ली असं कोणी काही करत नाही. आणि मुलगी असली म्हणून काय झालं? हल्ली उलट मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे.’’ 

‘‘माझं काही नाही डॉक्टर, बायकोच ऐकायला तयार नाही.’’

‘‘अरे पण तू तिला समजावून सांग ना.’’ 

‘‘मी तिला खूप समजावून सांगितलं. जे काय असायचं ते असू दे. पण ती काही ऐकायला तयार नाही. डॉक्टरांकडे जाऊन चौकशी करून या म्हणून दोन दिवस झाले. माझ्या मागं लागली आहे. तुम्ही आमचे फॅमिली डॉक्टर आहात. आम्ही नेहमी तुमच्याकडे येतो. एवढ्या वेळेपुरती आम्हांला मदत करा.’’ 

‘‘अरे मी तुला सांगितलं आहे ना? हल्ली असं कोणी काही करत नाहीत.’’ 

‘‘मला माहीत आहे डॉक्टर, ओळख आणि पैसे असले की सहज करतात. तिचा तो नातेवाईक सांगत होता म्हणे की, तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जा. तिकडे कोणी फारशी चौकशी करायला येत नाही. तुमच्या ओळखीनं आम्हांला एखादं नाव सांगा. आम्ही कोणाकडे अजिबात वाच्यता करणार नाही. त्यांची जी काही फी असेल ती द्यायचीही आमची तयारी आहे.’’ 

तो आता मोकळेपणानं बोलू लागला होता. पूर्वी लोक वैद्यकीय उपचारांसाठी ग्रामीण भागातून, तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्ह्याच्या ठिकाणी यायचे. या बाबतीत मात्र आता उलटी गंगा वाहायला लागली आहे. लोक जिल्ह्याच्या ठिकाणाहून ग्रामीण भागात जाऊ लागले आहेत. 

‘‘अरे पण अशा गैरसोयीच्या ठिकाणी जाऊन गर्भपात करण्याने तुझ्या बायकोच्या जिवाला धोका होऊ शकतो किंवा तिला वंध्यत्वही येऊ शकतं आणि तुझ्या बायकोच्या त्या नातेवाईकाला कोणत्या डॉक्टरनी हे सांगितलं आहे? त्यांचं तुला किमान नाव तरी माहीत आहे का?’’

‘‘तो आम्हांला त्यांचं नाव कसं सांगेल डॉक्टर? तुम्ही आम्हांला मदत करण्याऐवजी माझीच उलट तपासणी घ्यायला लागलाय बघा.’’ तो माझ्यावर वैतागून म्हणाला. 

‘‘हे बघ अरुण, माझा ह्या गोष्टीला विरोध आहे. या बाबतीत मी तुला मदत करू शकत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही तुमच्या बाळाचा जीव घ्यायला निघाला आहात. अरे तुला काहीच कसं वाटत नाही?’’ मीही थोडं संतापून म्हणालो.

तो मग निमूटपणे निघून गेला. शासकीय रुग्णालयातील एक अधिकारी माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. मी लगेच त्यांना फोन करून ही हकीकत सांगितली. 

‘‘तुम्ही त्या कर्मचाऱ्याचं नाव विचारून घ्यायचं नाही का? कदाचित तो डॉक्टरांचं नाव सांगून स्वतःच पैसे उकळत असेल.’’ त्यांनी शंका व्यक्त केली. 

आता त्या कर्मचाऱ्याचं नाव अरुण मला सांगणं शक्य नव्हतं. त्याच्या दृष्टीने मीच कुचकामी होतो. 

‘‘ते तो मला कसं सांगेल साहेब?’’ मी म्हणालो. 

‘‘ठीक आहे डॉक्टर. मी आमच्या अधिकाऱ्यांना या गोष्टीची कल्पना देऊन काही ट्रेस लागतो का ते पाहतो. तुम्हांलाही काही अधिक माहिती मिळाल्यास मला कळवा.’’ असं म्हणून त्यांनी फोन बंद केला. या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं असं मला खूप वाटत होतं. पण माझ्याजवळ काहीच पुरावा नव्हता. त्यामुळे केवळ चरफडत राहणं एवढंच माझ्या हातात होतं. पुढे काही दिवसांनंतर अरुण माझ्या दवाखान्यात आला. 

‘‘तुझ्या मिसेसची तब्येत कशी आहे?’’ मी त्याला मुद्दाम विचारलं.

‘‘तब्येत चांगली आहे. तो विषय आता आम्ही डोक्यातून काढून टाकला आहे.’’ तो हसत हसत म्हणाला, ‘‘मी एक-दोन ठिकाणी चौकशी केली. पण कोणी काही दाद लागू देईनात. शेवटी मग मी बायकोचीच समजूत काढली. मुलगी झाली तर आम्ही आणखी एक चान्स घ्यायचं ठरवलं आहे. नाहीतर आता मला कुठं निवडणूक लढवायची आहे आणि कोण सरकारी नोकरी देणार आहे?’’ तो उपरोधाने म्हणाला. काही का असेना, पण त्याने आपल्या बायकोचा गर्भपात करण्याचा निर्णय रद्द केल्याचं ऐकून मला तेव्हा खूप बरं वाटलं होतं. 

काल तोच अरुण मुलगा झाला म्हणून आनंदाने मला पेढे द्यायला आला होता. काही महिन्यांपूर्वी आपण आपल्या बायकोचा गर्भपात करायला निघालो होतो, याचा खेद वा खंत त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. मी चेहऱ्यावर उसनं हसू आणत ते पेढे स्वीकारले. 

‘‘तुझ्या बायकोच्या त्या नातेवाईकाला भेटलास का नाही?’’ 

‘‘त्याला उगीच कशाला दोष द्यायचा? त्या डॉक्टरांचीच तपासणीमध्ये काहीतरी चूक झाली असणार आहे.’’ 

‘‘अरे पण ही खूप गंभीर बाब आहे अरुण. मला त्या डॉक्टरांचं नाव तरी सांग.’’ 

‘‘मला खरंच काही माहीत नव्हतं डॉक्टर. त्यावेळी तुमचं ऐकलं ते बरं झालं बघा.’’ असं म्हणून तो लगेच निघून गेला. 

हे खरं आहे की आज स्त्री-भ्रूण हत्या ह्या गंभीर सामाजिक समस्येबाबत आपण सर्वजण खडबडून जागे झालो आहोत. शासकीय आणि सामाजिक स्तरावर अनेक घटक जनजागृतीपासून ते स्टिंग ऑपरेशनपर्यंत वेगवेगळ्या मोहिमा राबवीत आहेत. पण त्याचबरोबर हेही खरंच आहे की अजूनही काही अपप्रवृत्ती विज्ञानाचा गैरफायदा घेऊन वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत गर्भलिंग तपासणी करत आहेत आणि तो गर्भपात करण्यासाठी कसायालाही लाजविणारे काही हात धजावत आहेत. हे अनंतकाळाचे माते, समाजमनातील स्त्रीभ्रूणहत्येची ही विषवल्ली उखडून काढण्यासाठी आता तुलाच दुर्गावतार धारण करायला हवा.

जितसिद्धेश्वराच्या मंदिरात घंटानाद सुरू झाला. ढोल वाजू लागला. संध्याकाळची आरती सुरू झाली होती. आम्ही परतीच्या तयारीला लागलो. निघण्यापूर्वी थोडं ताजंतवानं व्हावं म्हणून आम्ही घाट उतरून नदीच्या डोहाकडे आलो. डोहातील ओंजळभर पाण्याचा चेहऱ्यावर शिडकावा मारला. त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने अंगावर शहारे आले.

सूर्यास्त होऊ लागला होता. नदीकाठचा तो देखावा डोळ्यांत साठवत आम्ही घाट चढू लागलो. माझं लक्ष नदीकाठच्या एका उंच बाभळीच्या झाडाकडे गेलं. त्या झाडावर सुगरणींची अनेक घरटी लोंबकळत होती. मी ती मुलांना दाखविली. माझा मोठा मुलगा लगेच ‘अरे खोप्यामधी खोपा’ ही बहिणाबार्इंची कविता म्हणू लागला. ती घरटी न्याहाळताना मला असं जाणवलं की, सुगरणींच्या खोप्याचा आकार हुबेहूब स्त्रीच्या गर्भाशयासारखाच असतो. पाखरं किती हुशार असतात. उंच झाडाच्या शेंड्यावर. खोल नदीच्या काठी. किती सुरक्षित बांधलीत घरटी. आपल्या पिल्लांसाठी. मला सुगरण म्हणजे बाया पक्ष्यांचा घरोबा करण्याबद्दलचा एक संदर्भ आठवला. 

विणीच्या हंगामात नर बाया आपली तहानभूक विसरून घरटं विणण्याच्या तयारीला लागतो. साप, कावळे, मैना या नैसर्गिक शत्रूंपासून घरट्यांचा बचाव व्हावा म्हणून विहिरीकाठी पसरलेल्या बाभळीच्या उंच फांदीचं टोक घरटं बांधण्यासाठी तो निवडतो. 

या वेळी त्या नर बायाचं डोकं, छाती, मानेकडील भाग पिवळाधमक झालेला असतो. तो हळद लावलेल्या नवरदेवासारखा दिसत असतो. घरटं अर्धवट बांधून झालं की तो पंख पाडून मादीची विनवणी करू लागतो. त्याच्या या विनंतीला मान देऊन एखादी मादी त्या घरट्याचं निरीक्षण करते. 

ते घरटं मादीला पसंत पडलं असेल तरच नर बाया ते पूर्णत्वाला नेतो. ते दोघे त्या घरट्यात घरोबा करतात. घरट्याच्या फुगीर भागात मादी अंडी घालते. खरंच बाया पक्ष्याच्या मादीला भाग्यवानच म्हणायला हवं. तरारून वाढलेल्या ऊसशेतीमधून वळणावळणाने गेलेल्या रस्त्यावरून वेगाने गाडी चालवीत आम्ही शहराकडे परतू लागलो होतो. माझ्या मनात मात्र उगीचच सारखं सारखं येत होतं, 

विज्ञानाचे लागलेत डोहाळे 
गर्भांकुरांनाही घालताहेत अटी 
किती भाग्यवंत जन्म घेणं 
माणसाहून पाखरापोटी! 

Tags: नैसर्गिक शत्रू साप घरटं नर बाया विणीचा हंगाम natural enemy snake nest male foe weeding season weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके