डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ते आपल्या आईला असं म्हणाले होते की, ‘मला जर काही जमलं नाही तर मी ड्रायव्हर होईन. पण नाटकाच्या बसचा ड्रायव्हर होईन. दुसरं काही चालणार नाही.’ हा संदर्भ देऊन मी त्यांना त्यांच्या ह्या मॅडनेसबद्दल विचारले होते. त्यावर अतुल कुलकर्णी ह्यांनी मलाच उलट प्रश्न विचारला होता की, ‘मी तेव्हा असं म्हणालो होतो हे खरं आहे. पण खरोखरच ड्रायव्हर होण्याची वेळ माझ्यावर आली असती तर तुम्ही मला आज इथं मुलाखतीसाठी बोलवले असते का?’ कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ मॅडनेस जरूर असायला हवा. पण तो कॅलक्युलेटेड मॅडनेस असायला हवा. आपल्याला आपल्या क्षमतांची पुरेपूर जाणीव असायला हवी. नाहीतर पुढे आयुष्यभर अशी कुचंबणा अथवा फरफट सोसावी लागते.  

‘‘सर अभिनंदन, परवाचा कार्यक्रम छान झाला. तुम्ही खूप सुंदर मुलाखत घेतलीत.’’

‘‘अरे मुलाखत कसली, मी केवळ त्यांना बोलतं केलं. अतुल कुलकर्णी छान बोलले ना!’’ 

‘‘त्यांची मतं किती ठाम आणि परखड आहेत.’’

‘‘ते केवळ उत्तम अभिनेतेच नाहीत, अनेक सामाजिक उपक्रमांध्ये त्यांचा सहभाग असतो. साताऱ्याजवळ वनकुसवडे या गावी डोंगरमाथ्यावर त्यांनी शेतजमीन घेतली आहे. गेली आठ वर्षे ते तेथे जंगल वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ‘क्वेस्ट’ संस्थेच्या माध्यमातून ते शैक्षणिक क्षेत्रामध्येही काम करत असतात. मुंबईसारख्या शहरात इकोफ्रेंडली जीवनशैली अंगीकारण्याच्या मोहिमेत त्यांचा पुढाकार असतो.’’ मी उत्साहाने जितेंद्रला सांगितले. 

सांगलीतील आम्ही काही फॅमिली डॉक्टरांनी मिळून ‘संवेदना’ ही संस्था स्थापन केली आहे. गेली दहा वर्षे या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवीत आलो आहोत. या वर्षी प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांची ‘सामाजिक स्वास्थ्यरक्षण आणि आपली जबाबदारी’ या विषयावर मुलाखत आयोजित केली होती. या कार्यक्रमाला लोकांचा भरघोस प्रतिसाद लाभला होता. स्थानिक वृत्तपत्रांनीही चांगली प्रसिद्धी दिली होती. आम्ही सर्व संयोजक खूष होतो. 

या कार्यक्रमासाठी माझे बरेचसे पेशंटही उपस्थित होते. दवाखान्यात आल्यावर ते आपली प्रतिक्रिया आवर्जून सांगायचे. जितेंद्रही त्या कार्यक्रमाला आला होता. 

‘‘तुला तुझ्या दुकानाच्या व्यापातून कशी काय सवड मिळाली होती?’’ मी त्याला उत्सुकतेने विचारले . 

‘‘मी अतुल कुलकर्णींचा फॅन आहे. यापूर्वी मी त्यांना एकदा भेटलो आहे. पन्हाळ्याला आमचे एक शिबिर होते. त्या शिबिरासाठी ते मार्गदर्शक म्हणून आले होते. कॉलेजमध्ये असताना मला अभिनयाची खूप आवड होती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली यांच्या वतीने आपल्याकडे एक राष्ट्रीय पातळीवरील नाट्य प्रशिक्षण शिबिर झाले होते. त्यासाठी माझी निवड झाली होती. एरवी अशी शिबिरे केवळ दिल्ली आणि गोव्यालाच होत असतात. सांगली ही नाट्यपंढरी असल्यामुळे आपल्याकडे ते एक वेळ आयोजित केले होते.’’ नेहमी अस्वस्थ आणि घाईगडबडीत असणारा जितेंद्र आज मात्र भारावल्यासारखा बोलत होता. ते पाहून मला नवल वाटले. 

‘‘कार्यक्रमानंतर तू त्यांना भेटलास की नाही?’’

‘‘नाही. मला लगेच दुकानाकडे परत यावे लागले. सायंकाळी सात नंतर दुकानात गर्दी असते. वडिलांची एकट्यांची खूप धावपळ होते. अतुल कुलकर्णी इंजिनिअरिंग अर्ध्यात सोडून अभिनय क्षेत्राकडे वळले ना?’’ त्याने कुतूहलाने विचारले. 

‘‘होय. त्यांची एकूण जडण-घडण आणि शैक्षणिक वाटचाल उद्‌बोधकच आहे.’’ मी म्हणालो, ‘‘तुझी तब्येत कशी आहे?’’

‘‘तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही न्यूरॉलॉजिस्टकडे जाऊन आलो. त्यांनी ईसीजी वगैरे बऱ्याच तपासण्या केल्या. त्यांमध्ये काही विशेष दोष नाही म्हणाले. मायग्रेनमुळेच मला हा त्रास होतो आहे, असे त्यांनीही सांगितले. एक महिन्याची औषधे आणि इंजेक्शने लिहून दिली आहेत. आठवड्यातून एक असे तुमच्याकडून इंजेक्शन टोचून घ्यायला सांगितले आहे.’’ त्याने रिपोर्टची फाईल आणि इंजेक्शन माझ्याकडे दिले. 

‘‘तुझे बाबा कुठे आहेत?’’ ‘‘ते दुकानात थांबले आहेत. नंतर येऊन तुम्हांला भेटतो म्हणाले आहेत.’’ 

‘‘आता तरी तुझ्या मनातली शंका दूर झाली की नाही?’’ मी त्याचे रिपोर्ट पाहत पाहत त्याला विचारले. त्यावर तो काही बोलला नाही. मी त्याला त्यातील एक इंजेक्शन दिले. 

गेली चार-पाच वर्षे जितेंद्र महिन्या दोन महिन्यांतून एकदा तरी हमखास माझ्या दवाखान्यात यायचा. ‘डॉक्टर, माझं डोकं खूप दुखू लागलं आहे.  मला अगोदर एक इंजेक्शन द्या’ म्हणून हट्ट धरायचा. त्याला अर्धशिशीचा त्रास आहे. शारीरिक व मानसिक ताणामुळे त्याला हा त्रास होतो आहे. इथल्या मुख्य चौकात त्याचे डिपार्टमेंट स्टोअर आहे. दुकान जोरात चालते. त्यामुळे तो नेहमी गडबडीत असतो. त्याच्या ह्या नेहमीच्या तक्रारीमुळे त्याचे वडीलही त्याच्यावर वैतागले आहेत. ‘त्याच्या एकदा सर्व तपासण्या करून बघू या’ असे मला ते परवा आग्रहाने म्हणाले. म्हणून त्या दोघांच्याही मनातील शंका दूर करण्यासाठी मी त्यांना न्यूरॉलॉजिस्टचा सल्ला घेण्याबाबत सुचविले होते. त्यानुसार ते न्यूरॉलॉजिस्टना भेटून आले होते. 

‘‘तू काही व्यायाम वगैरे करतोस की नाही?’’ मी त्याला मुद्दाम विचारले. 

‘‘व्यायाम करायला सवड कुठे असते सर? सकाळी साडेसहा वाजता दुधाची गाडी येते. त्या अगोदर येऊन दुकान उघडावे लागते. रात्री थेट साडेदहा-अकरा पर्यंत दुकान सुरू असते. वडील सकाळी खरेदीचे बघतात. आमच्याकडे एकूण जवळजवळ सातशे जिन्नस आहेत. गिऱ्हाइकाला परत पाठवून चालत नाही. आमच्या व्यवसायातही हल्ली खूप स्पर्धा सुरू झाली आहे. दुपारी वडील आले की थोडावेळ जेवायला जातो. सायंकाळी चार वाजता पुन्हा दुकानात परत यावे लागते.’’

‘‘तुम्ही आठवड्यातून एक दिवस सुट्टी का घेत नाही?’’

‘‘वडील ऐकायला तयार नाहीत. त्यांनी दुकान सुरू केल्यापासून हे असेच सुरू आहे. रविवारी सुट्टी घ्यावी म्हटले तर उलट रविवारी दुकानात जास्त गर्दी असते. त्यामुळे घरी काही महत्त्वाचा कार्यक्रम वगैरे असला तरच सुट्टी. वडिलांना काही सांगायला गेले तर लगेच चिडतात. ‘मी किती कष्टाने हे सर्व उभे केले आहे, तुला त्याची जाणीव नाही’ म्हणतात. एक तर मला त्यांनी अर्ध्यातून कॉलेज सोडायला लावून दुकानात बसवले आहे. अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करण्याची माझी खूप इच्छा होती.’’ जितेंद्र अस्वस्थपणे म्हणाला. अतुल कुलकर्णींची मुलाखत ऐकून तो एवढा का भारावला होता हे आता माझ्या लक्षात आले.

‘‘हे बघ जितेंद्र, आपण आपला व्यवसाय सांभाळूनही आपली आवड जोपासू शकतो. प्रत्येकाला करिअर करण्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र मिळतेच असे नाही. त्यामुळे मिळेल त्या क्षेत्रातही आपल्याला आवड निर्माण करता यायला पाहिजे. मलाही साहित्यक्षेत्रामध्ये आवड आहे. म्हणून तर मी माझा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून असे कार्यक्रम आयोजित करीत असतो. वाचन, लेखन सुरू असते.’’ मी त्याला समजावीत म्हणालो.

‘‘तुमचं ठीक आहे सर, पण माझा अख्खा दिवस दुकानात पुड्या बांधण्यात जातो. काउंटरवरून जरासुद्धा हलता येत नाही. कोणी एखादी वस्तू ढापली तर पन्नास-शंभर रुपयांना फटका बसतो. लोकांना हल्ली थांबायलाही वेळ नसतो. एखाद्या वेळी अशी मुद्दाम सवड काढून कार्यक्रमाला किंवा नाटक-सिनेमाला गेलो तर त्याने हुरूप येण्याऐवजी उलट अस्वस्थ वाटू लागते. आपली साईड चुकली आहे, याची बोच मनाला कुरतडू लागते. बायकोलाही नाटक-सिनेमात फारसा रस नाही. उगीच माझं मन राखायचं म्हणून सोबत येते. लौकिकार्थानं आज मी सुखी आहे सर. मुख्य चौकात दुकान आहे. बंगला आहे, गाडी आहे. समजूतदार बायको आहे. पण या सर्वांमध्ये माझी घुसमट होते आहे. माझी एक मैत्रीण सध्या टी.व्ही. सीरीयलमध्ये काम करते आहे. आमचं दोघांचं अफेअर होतं. पण मला अर्ध्यातून कॉलेज सोडावं लागल्यामुळं मी तिला भेटायचं बंद केलं. शेवटी आमच्या ग्रुपमधल्या एका मुलाबरोबर तिनं लग्न केलं.’’ तो आवंढा गिळत म्हणाला. त्याच्या मनातले हे गुपित ऐकून मी चकित झालो. त्याची अशी काही ट्रॅजिडी असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. गेली चार-पाच वर्षे तो माझ्याकडे पेशंट म्हणून येतो आहे. पण आज प्रथमच इतक्या मोकळेपणानं माझ्याशी बोलत होता.

‘‘जितेंद्र, तुझी व्यथा मी समजू शकतो. पण असं हताश होऊन आणि परिस्थितीला बोल लावून चालणार नाही. तुला स्वतःला यातून सावरायला हवं. त्याशिवाय तुझा हा मायग्रेनचा त्रासही कमी होणार नाही. मी तुला एक प्रश्न विचारतो, तुम्ही किती मुलं त्या वेळी नाट्य प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झाला होता?’’

‘‘आमची पन्नास मुलांची बॅच होती.’’ 

‘‘त्यांपैकी किती मुलांनी अभिनय क्षेत्रात करिअर केलं आहे?’’ 

‘‘दोघे-तिघेजणच सध्या मुंबईमध्ये असतात.’’ त्याने आठवून सांगितले. 

‘‘मग आता तूच विचार कर. हौस आणि करिअर यामधला फरक आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आज जर तू केवळ अभिनय क्षेत्रामध्ये करिअर करायचे ठरविलेस तर आत्ता तुला ते शक्य आहे का? तू वेळेचं नियोजन कर. वडिलांना पटवून आठवड्यातून एक दिवस सुट्टी घ्यायला सुरुवात कर. बदलत्या काळानुरूप व्यवसाय पद्धतीमध्ये बदल कर. काही नवीन कल्पना राबव. शेवटी पोटापाण्याचा उद्योग म्हणून तुला तुझा व्यवसाय जिद्दीने करायलाच हवा आणि हे सर्व करत असताना तू अभिनयाशीही मैत्री जपू शकतोस. हवं तर दुकानात मदतीला एक-दोन कामगार घे.’’ 

‘‘आम्ही शेजारचा दुकानगाळाही विकत घेतला आहे. वडील त्यामध्ये होलसेल दुकान सुरू करू या म्हणताहेत. मी त्यांना दोन्ही गाळे एकत्र करून मिनी मार्केट सुरू करू या म्हणून सांगतो आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे गिऱ्हाइकांवर नजर ठेवणंही सोपे जाईल आणि धावपळही थोडी कमी होईल. बघू या काय होतंय ते.’’ जितेंद्र स्वतःला सावरत म्हणाला. 

‘‘ठीक आहे. मी तुझ्या बाबांशी बोलतो.’’ मी त्याला हसत हसत म्हणालो. माझा निरोप घेऊन तो निघून गेला. एकंदरीत तो आपल्या व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवू पाहत होता, ही समाधानाची बाब होती. केवळ परिस्थितिशरण न होता त्याने मनापासून व्यवसायामध्ये समरस होणे गरजेचे होते. 

जितेंद्रची ही घुसमट ऐकून मला माझ्या उमेदीच्या काळातले द्वंद्व आठवले. दादांच्या आग्रहावरून मी बी.ए.एम.एस. तर झालो होतो. डॉक्टरकीची पदवी हातात होती. पण पुढे काय करायचे ते नक्की ठरविले नव्हते. एका हॉस्पिटलमध्ये शिकाऊ डॉक्टर म्हणून नोकरी करत होतो. साहित्य क्षेत्रामध्ये आवड असल्यामुळे बहि:स्थ एम.ए. मराठीही केलं होतं. नेट-सेटची परीक्षा देऊन सरळ प्राध्यापक व्हावं, असंही कधीकधी वाटायचं. दरम्यानच्या काळात माझी नीलमशी म्हणजे माझ्या मिसेसशी भेट झाली. आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे आम्ही लग्नानंतर दोघांनी मिळून आमचा दवाखाना सुरू केला आहे. डॉक्टरकीच्या बऱ्याच गोष्टी मला माझ्या मिसेसने शिकविल्या आहेत. त्याचप्रमाणे माझी आवड ओळखून इतर उपक्रम राबविण्यासाठी मला वाव दिला. 

आम्ही ‘संवेदना’ ही आरोग्य, साहित्य व सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेार्फत आम्ही पहिल्याच वर्षी डॉ.गिरीश ओक यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारातील एक प्रसंग आठवतो. मी त्यांना पत्रात असं लिहिलं होतं की, वैद्यकीय क्षेत्रात असूनही मला साहित्यक्षेत्रामध्ये विशेष आवड आहे. म्हणून हा कार्यक्रम आयोजित करत आहे वगैरे वगैरे. त्यावर पत्रोत्तरात डॉ.गिरीश ओक यांनी असे लिहिले होते की, वैद्यकीय क्षेत्रात असूनही नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळेही साहित्यक्षेत्रामध्ये विशेष आवड जोपासता येईल. पुढे हळूहळू मलाही याची जाणीव होत गेली. एक डॉक्टर या नात्याने आपल्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण आपण अंतर्बाह्य तपासत असतो. त्यामुळे माणूसपण आपल्याला अधिक समजू शकते. अशा प्रकारे आपला पेशा आणि आवड हे दोन्ही किती परस्परपूरक आहेत, याचा मला अनुभव येत गेला आणि या क्षेत्रामध्ये डोळसपणे काम करण्याचे भान आले. अर्थात आज जरी मी माझ्या या वाटचालीचे इथे कौतुकाने विश्लेषण करत असलो तरी काही काळ मलाही अंतर्द्वंद्व अनुभवावे लागले आहे. कदाचित बहुतेकांनाच कोणत्याही क्षेत्राची निवड करताना सुरुवातीला ते अनुभवावे लागत असावे. 

रात्री मी दवाखाना बंद करण्याच्या तयारीत होतो. इतक्यात जितेंद्रने सांगितल्याप्रमाणे त्याचे वडील मला भेटायला आले. अंगात विजार-शर्ट, डोक्यावर गांधीटोपी असा पेहराव. कपाळाला गंध. त्यांचं शिक्षण बेताचेच झालं आहे. पण स्वभाव मात्र बोलका आहे.

‘‘डॉक्टर, येऊ का? पेशंट अजून संपले का नाही?’’ असं विचारत ते सरळ केबिनमध्ये आले. 

‘‘या काका. तुम्ही दुकान बंद केलं की नाही?’’

‘‘मुलगा दुकानात आहे. त्याला बंद करायला सांगून आलो आहे. त्याचे रिपोर्टस्‌ कसे काय आहेत?’’ 

‘‘रिपोर्ट नॉर्मल आहेत. काळजी करण्याचे काही कारण नाही. त्या डॉक्टरांनी तुम्हांला सर्व कल्पना दिलीच असेल.’’ 

‘‘त्यांच्याकडे खूप गर्दी होती. त्यांना धड बोलायलाही सवड नव्हती. काही दोष नाही म्हणाले आणि औषधाची चिठ्ठी लिहून दिली. त्याला कशामुळं हा त्रास होत असेल?’’ 

‘‘त्याची थोडी दगदग होते आहे. तुम्ही दुकानाची वेळ थोडी कमी का करत नाही? आणि आठवड्यातून एक दिवस सुट्टीही घ्यायला पाहिजे...’’

‘‘अहो डॉक्टर, सुरुवातीच्या काळामध्ये मी सायकलला पिशव्या अडकवून घरोघरी जाऊन माल विकला आहे. चार पैसे हातात आल्यावर आठवडा बाजारात फिरते दुकान सुरू केले. त्यानंतर हा दुकानगाळा घेतला. गेली तीस-बत्तीस वर्षे मी आणि बायको मेहनत करतो आहोत. एवढं सगळं आयतं करून ठेवलं आहे. त्याला हे नुसते चालवायलाही जमू नये का?’’ काका जाब विचारल्यासारखे म्हणाले. आपला व्यवसाय हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा पण एक छोटासा भाग आहे. तो सांभाळून आपल्याला इतर अनेक गोष्टींशी मैत्री जपता यायला पाहिजे, हे काकांना मी कसे समजावून सांगणार?

‘‘तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे काका. पण आता सर्व  स्थिरस्थावर झाले आहे ना? तुम्ही त्याला थोडी मोकळीक द्यायला हवी. त्याला पुढे शिकायला मिळाले नाही म्हणून तो काहीसा नाराज आहे.’’ ‘‘कॉलेज शिकून तरी शेवटी काय करणार होता? दुकानच चालवायचे आहे ना? का नाटक सिनेमा करून त्याचं पोट भरणार होतं?’’ काका एकदम उसळून म्हणाले, ‘‘एकुलता एक मुलगा आहे. सोन्यासारखी बायको आहे. तुम्ही उलट त्यालाच समजावून सांगा.’’

‘‘पुढच्या वेळी तो इंजेक्शन घ्यायला आल्यावर मी त्याला समजावून सांगतो.’’ मी निमूटपणे मान हालवीत म्हणालो. काकांची समजूत काढणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखी माझी अवस्था झाली होती. काका थोडे घुश्शातच निघून गेले. 

अभिनय क्षेत्र हे एक आकर्षक क्षेत्र आहे. कॉलेज जीवनामध्ये ह्याची अनेकांना भुरळ पडू शकते. पण करिअरसाठी मात्र हे सर्वाधिक बेभरवशाचे क्षेत्र आहे. त्यामुळे हे क्षेत्र निवडताना बहुतेकांना आपल्या घरापासूनच संघर्षाची सुरुवात करावी लागते. या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची तयारी, निष्ठा आणि दृढता या गोष्टींची आवश्यकता असते. आपली शक्तिस्थाने आणि मर्यादा ओळखता याव्या लागतात. 

अतुल कुलकर्णींना मुलाखतीमध्ये मी एक प्रश्न विचारला होता. ‘झपाटलेपण ते जाणतेपण’ या साधनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये त्यांचा एक लेख आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या अभिनयक्षेत्रातील वाटचालीविषयी एक किस्सा नमूद केला आहे. ते आपल्या आईला असं म्हणाले होते की, ‘मला जर काही जमलं नाही तर मी ड्रायव्हर होईन. पण नाटकाच्या बसचा ड्रायव्हर होईन. दुसरं काही चालणार नाही.’ हा संदर्भ देऊन मी त्यांना त्यांच्या ह्या मॅडनेसबद्दल विचारले होते. त्यावर अतुल कुलकर्णी ह्यांनी मलाच उलट प्रश्न विचारला होता की, ‘मी तेव्हा असं म्हणालो होतो हे खरं आहे. पण खरोखरच ड्रायव्हर होण्याची वेळ माझ्यावर आली असती तर तुम्ही मला आज इथं मुलाखतीसाठी बोलावलं असतं का?’ कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी माणसाजवळ मॅडनेस जरूर असायला हवा. पण तो कॅलक्युलेटेड मॅडनेस असायला हवा. आपल्याला आपल्या क्षमतांची पुरेपूर जाणीव असायला हवी.  नाही तर पुढे आयुष्यभर अशी कुचंबणा अथवा फरफट सोसावी लागते. प्रत्येकाला योग्यवेळी अशी जाणीव करून देण्यामध्ये आपली शिक्षणपद्धती आणि समाज कधी यशस्वी होईल? 

Tags: कुचंबणा फरफट कौशल्य क्षमतांची ओळख जीवनानुभव अतुल कुलकर्णी बेभरवशी क्षेत्र अभिनय क्षेत्र शिक्षण संस्था आरोग्य समवेदना डॉक्टर दिलीप शिंदे कॅलक्युलेटेड मॅडनेस रूग्णानुबंध Fight to survive Acting Field Skills Know your Ability Madness Atul Kulkarni Actor Acting Practicle Approch Education System Arogya Samvedana Doctor Dilip Shinde Calculated Madness Rugnanubandh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके