डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘‘थँक्यू सर.’’ मी त्यांचे आभार मानून फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी सकाळी रुपाली आपल्या वडिलांना घेऊन मला भेटायला आली. तिने आपल्या वडिलांना आग्रहाने पुढे घालून सोबत आणले असावे. त्यांना कामावर जाण्याची घाई दिसत होती. ते बरेच थकलेले दिसत होते. श्रमाने रापलेला चेहरा, काळासावळा वर्ण, गळ्यात तुळशीमाळ होती. कपाळावर गंध आणि दोन्ही भुवयांजवळ पसरलेले कोडाचे पांढरे डाग. आपल्या मुलींची लग्ने जमवताना त्यांना किती ससेहोलपट सहन करावी लागत असेल याची मला कल्पना आली. मी त्यांना बसायला सांगितले. ते कसेबसे संकोचून माझ्या समोरच्या खुर्चीत बसले. 

एखाद्याने किंवा विशेषतः एखादीने लग्न केले की, त्यांचे आयुष्य मार्गी लागते अशी आपली पारंपरिक मानसिकता झाली आहे. याचे मूळ भलेही आपल्या विवाहाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात दडलेले असेल. पण जर कोणी ही चाकोरी मोडण्याची भाषा करू लागले तर आपण ऐकणारेच उलट बुचकळ्यात पडतो. ‘मला लग्न करायचं नाही’ असं तिनं ठामपणे सांगितल्यावर सुरुवातीला मीही असाच गोंधळून गेलो. 

ती काही दृष्ट लागावी इतकी सुंदर नाही. म्हणजे नाकी-डोळी बरी आहे, पण गोरीपान वगैरे अशी नाही. तिला नीटनेटकं राहता आलं तर ती चारचौघींत उठूनही दिसू शकेल. पण तिला त्याची फिकीर नसावी. ती बोलताना आणि ऐकताना मधेमधे छान हसते. तिच्याशी बोलू-ऐकू लागले की तिचे हे खास वेगळेपण जाणवते.

‘‘मी काही पेशंट म्हणून आले नाही.’’ असं म्हणून ती मधे छान हसली, ‘‘तुम्हांला दवाखान्यामध्ये कामासाठी मुलगी पाहिजे का?’’ 

‘‘तुझे नाव काय?’’

 ‘‘रुपाली. मी तुमची पेशंटच आहे. आमच्या घरातील सर्वजण तुच्याकडेच येतात.’’ 

‘‘हो. तुझा चेहरा मला ओळखीचा वाटला. तुझे शिक्षण किती झाले आहे?’’ 

‘‘मी दहावीतून शाळा सोडली आहे.’’

‘‘पुढे का शिकली नाहीस?’’

‘‘डोकं चाललं नाही.’’

‘‘तुम्ही राहायला कुठे आहे?’’

‘‘इथं पाठीमागंच गंगानगरमध्ये राहतो.’’

‘‘तुझे वडील काय करतात?’’

‘‘गवंडीकाम करतात.’’

‘‘माझ्याकडे सध्या दोघीजण आहेत. तरीही तू तुझा पत्ता देऊन ठेव. मला आवश्यकता असेल तेव्हा मी तुला कळवतो.’’ मी तिच्याकडे डायरी आणि पेन देत म्हणालो. ऐनवेळी गरज भासल्यास उपयोगी होईल म्हणून मी तिच्याकडून तिचा पत्ता घेऊन ठेवला. 

‘‘मला सध्या कामाची खूप गरज आहे.’’ ती अजिजीच्या सुरात म्हणाली. 

‘‘तू यापूर्वी कोठे दवाखान्यात काम केले आहेस का?’’ 

‘‘नाही.’’

‘‘मी शक्यतो मुलींना दवाखान्यात कामासाठी घेत नाही. मुली सुरुवातीला काही दिवस उत्साहाने येतात आणि आवडत नाही किंवा लग्न ठरले म्हणून मध्येच काम सोडून जातात. तुझ्या घरी तुझ्या लग्नाबाबत चर्चा सुरू असेल ना?’’ 

‘‘मी लग्न करणार नाही.’’ 

‘‘लग्नापूर्वी सर्व मुली असंच म्हणत असतात.’’ मी तिला हसत हसत म्हणालो. 

‘‘पण मला खरंच लग्न करायचं नाही.’’ ती अगदी ठामपणे म्हणाली. 

‘‘का बरं?’’ मी काहीशा कुतूहलानं विचारलं.

‘‘डॉक्टर, माझ्या हातावर कोड आहे.’’ ती आपल्या उजव्या हाताचा कोपर दाखवीत म्हणाली,‘‘मी गेली सात-आठ वर्षे यासाठी ट्रीटमेंट घेते आहे. हे बरं झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही, असं वडिलांना सांगितलं आहे आणि हे काही बरं होईल असं मला वाटत नाही.’’ हे सांगितल्यावरही ती नेहमीप्रमाणं छान हसली. 

‘‘ सॉरी, मी तुला सहज विचारलं. मुलींच्या बाबतीत काय होतं की, त्या मध्येच काम सोडून गेल्यावर नवीन येणाऱ्याला पुन्हा ट्रेन करावे लागते.’’ मी थोडंसं ओशाळून म्हणालो, ‘‘तू यासाठी कोणाकडे ट्रीटमेंट घेते आहेस?’’ 

‘‘स्टँडजवळ डॉ. गोखले मॅडम आहेत. त्यांच्याकडे होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेते आहे.’’ 

‘‘तू एखाद्या त्वचारोग तज्ज्ञांना दाखविले नाहीस का?’’ 

‘‘सुरुवातीला एक-दोन वेळा वडील त्वचारोग तज्ज्ञांकडे घेऊन गेले होते. पण त्यांच्या औषधाचा खर्च आम्हांला परवडेना. ते डॉक्टर महिन्याला हजार-दीड हजारांची औषधं आणि मलमं लिहून द्यायचे. म्हणून मग आम्ही गोखले मॅडमकडे दाखविले. कोड असणारे खूपजण त्यांच्याकडे येतात. त्या अडीचशे रुपये फी मध्ये महिन्याचे औषध देतात.’’

‘‘त्यांच्या ट्रीटमेंटमुळे तुला फरक पडतो आहे ना?’’ ‘‘कोपराजवळचा डाग थोडा कमी होऊ लागला आहे. पण पायाच्या घोट्यावर नवीन डाग उठू लागला आहे.’’ ‘‘तुमच्या घरी यापूर्वी कोणाला असा त्रास होता का?’’ ‘‘पूर्वी कोणाला असा त्रास नव्हता. पण अलीकडे वडिलांनाही भुवयांजवळ पांढरे डाग उठू लागले आहेत.’’

‘‘हल्ली यावर अनेक नवीन उपचार पद्धती निघाल्या आहेत. कृत्रिम अतिनील किरणांद्वारे किंवा लेसर ट्रीटमेंटद्वारे असे डाग घालविता येतात. काही प्रकारच्या कोडामध्ये त्वचारोपण  शस्त्रक्रियेचाही चांगला फायदा होऊ शकतो. तू परत एकदा त्वचारोग तज्ज्ञांना भेटून ये.’’

 ‘‘त्यांना भेटून काय उपयोग? वडिलांच्या आठवड्याच्या पगारात आमचा घरखर्चही धड भागत नाही. इतके पैसे आम्ही कुठून आणणार?’’ तिने हसत-हसत विचारले. 

तिचा हा प्रश्न ऐकून आपण तिला उगीचच खोटी आशा दाखवीत आहे, या जाणिवेनं मला अपराधी वाटू लागलं. या अशा अत्याधुनिक उपचार पद्धती आणि वैद्यकीय क्षेत्रातील क्रांती सर्वसामान्यांपर्यंत माफक दरात पोहोचविण्यामधे आपण कधी यशस्वी होणार? या विचाराने मी अस्वस्थ झालो. 

‘‘पुण्यामध्ये ‘श्वेता असोसिएशन’ नावाची एक संस्था आहे. कोड असणाऱ्यांसाठी तेथे अनेक उपक्रम राबविले जातात. विविध प्रकारच्या कोडासाठी उपचार व मार्गदर्शन केले जाते. तसेच नोकरी आणि करिअर बाबतही मदत केली जाते. कोड असणाऱ्यांसाठी त्यांनी वधूवर मंडळही सुरू केले आहे. वर्षातून दोनवेळा वधूवर मेळावे आयोजित केले जातात. तू वडिलांना सोबत घेऊन त्यांना एकदा भेटून ये.’’

‘‘डॉक्टर, आपल्या समाजामध्ये लग्न केल्याशिवाय बाईला जगताच येत नाही का?’’ तिने हेही मला हसत-हसतच विचारले. तिचा हा प्रश्न ऐकून मी निरुत्तर झालो. ‘‘मला भेटणाऱ्या प्रत्येकालाच नेहमी माझ्या लग्नाबद्दल सहानुभूती वाटत असते.’’ 

‘‘तुझ्या मनामध्ये लग्नाबद्दल एवढा राग का आहे?’’ मी तिला न राहवून विचारले. 

‘‘लग्नामुळेच तर आम्हा कोड असणाऱ्या बहुतेकांना सर्वाधिक कुचंबणा सहन करावी लागत असते. गोखले मॅडमकडे येणाऱ्या अनेकांची परवड मी ऐकली आहे.’’ ती कसलेही आढेवेढे न घेता मोकळेपणानं सांगू लागली, 
‘‘माझ्या मोठ्या बहिणीला कोड नाही. पण मला आणि माझ्या वडिलांना कोड असल्यामुळे गेली तीन-चार वर्षं झाली तिचे लग्न जमेना झाले आहे. माझे आई-वडील रात्रंदिवस काळजी करत असतात. घरातील या रोजच्या कटकटींना कंटाळून माझ्या मधल्या बहिणीने पळून जाऊन लग्न केले आहे. ती दिसायला थोडी स्मार्ट आहे. तिचा नवरा हॉटेलमध्ये वेटर आहे. तिचीही खूप ओढाताण होत असते. पण कसाबसा आपला संसार निभावते आहे.’’ 

‘‘तुझ्या घरी आणखी कोण-कोण असते?’’ ‘‘आई-वडील, आम्ही दोघी बहिणी, मला एक मोठा भाऊ आहे. त्याचं लग्न झालं आहे. पण त्याचं आणि वहिनींचं अजिबात पटत नाही. ते दोघे सतत भांडत असतात. भावाला दारूचे व्यसन आहे. तो फारसा काही कामधंदाही करत नाही. त्यांना एक मुलगी आहे. मुलीच्या अंगावर जरा कुठे काही डाग वगैरे दिसला तर वहिनी लगेच अस्वस्थ होते. आपल्या मुलीच्या अंगावरही कोड उठतात की काय, अशी धास्ती तिला वाटत असते. त्यांचं लग्न झालं तेव्हा माझ्या वडिलांना अजून कोडाचा त्रास नव्हता आणि मला कोड असल्याचे त्या लोकांना माहीत नव्हते. त्यामुळे वहिनी सारखा माझा राग-राग करत असते. कधीकधी मला हे घर आणि गाव सोडून निघून जावसं वाटतं. पण आई-वडिलांसाठी जीव अडकतो.’’ आता मात्र तिचे डोळे पाणावले होते.

‘‘तुला दुसऱ्या एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली तर चालेल का? मी तुझी त्यासाठी शिफारस करतो. तुला तिकडे पगारही चांगला मिळेल.’’

‘‘मला वडिलांना विचारायला पाहिजे. घरापासून लांब पाठवायला ते तयार होणार नाहीत आणि मला इंग्रजी लिहितावाचताही येत नाही.’’ ती आपले डोळे पुसत म्हणाली.

 ‘‘उद्या सकाळी तू तुझ्या वडिलांना घेऊन ये. मी त्यांना समजावून सांगतो आणि तुला नोकरी मिळवून देण्यासाठी निश्चित मदत करतो. तुझं शिक्षण कमी झालं असल्यामुळे सुरुवातीला काही दिवस तुला मदतनीस किंवा आया म्हणून काम करावे लागेल. पण नोकरी करत करत तुला पुढे शिकता येईल. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे तू दहावीची परीक्षा दे. म्हणजे तुला नर्सिंगचा कोर्स करता येईल.’’ मी तिला धीर देत म्हणालो. ती कृतज्ञतापूर्वक छान हसली. तिच्या कोपरावरच्या पांढऱ्या डागानं भलेही तिचं अवघं जगणं डागाळून टाकलं असेल, पण तिनं आपल्या चेहऱ्यावरचे हसू मात्र डागाळू दिले नव्हते. माझा निरोप घेऊन ती निघून गेली.

आपल्या समाजामध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार ह्या जीवघेण्या आजारांना सामाजिक प्रतिष्ठा लाभली आहे. कोड हा वैद्यकीयदृष्ट्या आजार नाही. त्यामुळे कोणत्याही अवयवास अथवा जीवितास काही अपाय होत नाही. तो संसर्गजन्यही नाही. काही कारणाने शरीराच्या एखाद्या भागातील ‘मेलॅनिन’ नावाच्या रंगद्रव्य तयार करणाऱ्या रंगपेशी हळूहळू नाहीशा होतात आणि नेहमीचा रंग जाऊन तेथील त्वचा पांढरी होऊ लागते. त्या डागावर खाज, वेदना, दाह असा कोणताही त्रास होत नाही. केवळ बाह्यरंग विद्रूपतेुळे त्या व्यक्तीला अवहेलना सहन करावी लागते.

कोड उद्‌भवण्याची निश्चित कारणे अजून वैद्यक शास्त्रालाही पूर्णपणे माहीत झालेली नाहीत. त्यावर संशोधन सुरू आहे. संशोधकांच्या मते मानसिक ताण व काही प्रमाणात आनुवंशिकता कोड उद्‌भवण्यासाठी कारणीभूत असू शकते. प्रतिरक्षा यंत्रणेतील बिघाड हेही एक कारण मानले जाते. पूर्वी लोकांच्या मनामध्ये कोडाबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा होत्या. कोड हा मागच्या जन्माचे पाप मानले जायचा. विशेषतः स्त्रियांच्याबाबतीत तिला पांढऱ्या पायाची संबोधून हेटाळले जायचे. अलीकडे मात्र लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. पण लग्नाच्या बाबतीत मात्र अजूनही काकदृष्टीनेच पाहिले जाते. समाजाचा हा दृष्टिकोन बदलण्यासाठी या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनी स्वतःच्या मनातील नैराश्य झटकून आपल्या कर्तृत्वाने या समाजास दीपवून  टाकायला हवे. त्यादृष्टीने मी रुपालीला मदत करण्याचा निश्चय केला. केवळ तिला नोकरी मिळवून देण्यापुरतेच नव्हे तर तिच्या मनातील न्यूनगंड दूर करून तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न करायचे ठरवले. 

हल्ली हॉस्पिटलमध्येही विश्वासू कामगार मिळणे कठीण झाले आहे. विशेषतः सेवा सुश्रुषेची कामे करण्यासाठी कोणी तयार होत नाहीत. यासाठी शहरातील सर्व हॉस्पिटलधारक डॉक्टरांनी एकत्र येऊन हॉस्पिटल ओनर असोशिएशन स्थापन केली आहे. त्यातील एक सदस्य माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. रुपालीच्या नोकरी संदर्भात तिची शिफारस करण्यासाठी मी त्यांना फोन लावला. ‘‘हॅलो, गुड आफ्टरनून सर. मी डॉ. दिलीप शिंदे बोलतोय.’’

 ‘‘गुड आफ्टरनून. बोला डॉक्टर’’ 

‘‘सर माझ्या माहितीतील एक विश्वासू आणि होतकरू मुलगी आहे. तिला नोकरीची खूप गरज आहे.’’ 

‘‘तिचं शिक्षण किती झालं आहे?’’ 

‘‘शिक्षण फारसं झालेलं नाही. दहावी झाली आहे.’’ 

‘‘तिला सुरुवातीला काही दिवस आया म्हणून काम करावे लागेल. तिची तशी तयारी असेल तर तिला पाठवून द्या. तिचं लग्न झालं आहे का?’’ मी तिला विचारलेला प्रश्नच त्यांनीही मला विचारला. 

‘‘सर तिला व्हिटीलिगो आहे. तिला सध्या नोकरीची खूप गरज आहे. प्लीज हेल्प हर.’’ ‘‘ठीक आहे. 

तुम्ही तिला माझ्या हॉस्पिटलमध्ये भेटायला पाठवून द्या. मी तिला निश्चित मदत करतो.’’

‘‘थँक्यू सर.’’ मी त्यांचे आभार मानून फोन बंद केला. दुसऱ्या दिवशी सकाळी रुपाली आपल्या वडिलांना घेऊन मला भेटायला आली. तिने आपल्या वडिलांना आग्रहाने पुढे घालून सोबत आणले असावे. त्यांना कामावर जाण्याची घाई दिसत होती. ते बरेच थकलेले दिसत होते. श्रमाने रापलेला चेहरा, काळासावळा वर्ण, गळ्यात तुळशीमाळ होती. कपाळावर गंध आणि दोन्ही भुवयांजवळ पसरलेले कोडाचे पांढरे डाग. आपल्या मुलींची लग्ने जमवताना त्यांना किती ससेहोलपट सहन करावी लागत असेल याची मला कल्पना आली. मी त्यांना बसायला सांगितले. ते कसेबसे संकोचून माझ्या समोरच्या खुर्चीत बसले. 

‘‘मी हिच्या नोकरी संदर्भात एका हॉस्पिटलमध्ये बोललो आहे. तुम्हांला पत्र देतो. तुम्ही त्यांना भेटून या.’’ मी त्यांचा अंदाज घेत म्हणालो. त्यावर ते काहीच बोलले नाहीत. 

‘‘ते हॉस्पिटल कोठे आहे?’’ रुपालीनं विचारलं.

‘सरकारी दवाखान्याजवळ आहे.’’ 

‘‘इथं तुमच्या दवाखान्यातच बघा की डॉक्टर. एकट्या पोरीला एवढ्या लांब कसं पाठवायचं?’’ ते आढेवेढे घेत म्हणाले. ‘‘काका, हिला तिकडे पगारही चांगला मिळेल आणि शिकायलाही मिळेल. अहो ही घराबाहेर पडल्याशिवाय तयार कशी होणार?’’ मी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागलो.

‘‘डॉक्टरसाहेब, भगवंताच्या कृपेनं हिच्या लग्नाचं कुठं काय जमलं तर बघावं म्हणतोय. हिनं नोकरी करून हिचा पगार आम्हांला काय करायचाय? तुमच्या माहितीतला आमच्यापैकी असा एखादा मुलगा असला तर सांगा.’’ 

‘‘पुण्यामध्ये डॉ. माया तुळपुळे यांची ‘श्वेता असोसिएशन’ नावाची एक संस्था आहे. मी रुपालीला काल त्याबद्दल सांगितले आहे. कोड असणाऱ्यांसाठी त्या अनेक प्रकारे मदत करत असतात. त्यांनी वधूवर सूचक मंडळही सुरू केले आहे. तुम्ही एकदा त्यांना भेटून या.’’ सुरुवातीला चुळबुळ करणारे काका, मी हे सांगितल्यावर खुर्चीत सावरुन बसले.

त्यांना तिच्या नोकरीपेक्षा तिचे लग्न जमविण्यामध्ये अधिक रस असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘‘त्यांचा पत्ता आम्हांला द्या. आम्ही एकदा पुण्याला जाऊन येतो.’’ 

‘‘काका, मी तुम्हांला तो पत्ता देतोच. पण तुम्ही हिला हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्यासाठी परवानगी द्या. हिनं स्वावलंबी होणं हे हिच्या लग्नाइतकंच महत्त्वाचं आहे.’’ मी त्यांना आग्रहानं म्हणालो. लग्नाहून अधिक महत्त्वाचं आहे, असं मी त्यांना कसं म्हणणार? त्यांनी नुसतीच मान हालवून होकार दिला. मी रुपालीकडे दोन्ही पत्ते दिले. 

‘‘तुला काही अडचण वाटल्यास मला जरूर कळव आणि तुला कसलीही मदत लागली तर मला निःसंकोचपणे येऊन भेट.’’ मी तिला पुन्हा एकदा धीर देत म्हणालो. मग ती नेहमीप्रमाणे छान हसली. काकाही हात जोडत खुर्चीतून उठले. माझे आभार मानून ती दोघं निघून गेली. 

वडिलांनी नोकरीसाठी परवानगी दिल्यामुळे आपल्याला या कोषातून थोडं बाहेर पडायला मिळणार या कल्पनेनं रुपाली खूश झाली होती आणि तिच्या लग्नाबाबत चौकशी करण्यासाठी एक कवडसा हाती गवसल्यामुळे काकाही खूश झाले होते. मी मात्र अजूनही, मला निरुत्तर करणाऱ्या तिच्या त्या प्रश्नाच्या खोल गर्तेत सापडलो होतो. 

ती म्हणाल्याप्रमाणे, माझ्यासहित तिला भेटणाऱ्या प्रत्येकाला तिच्या लग्नाविषयी सहानुभूती का वाटत असावी? आपल्याकडे अजूनही लग्न झाल्याशिवाय स्त्रीचं आयुष्य सार्थकी लागू शकत नाही काय? अर्थात तिचं लग्न जमलं तर कोणालाही आनंदच वाटेल. पण ते तिच्या मनाप्रमाणं जमलेलं असावं, तडजोडीनं उरकलेलं नसावं! 

Tags: deficiency color tissues रंगपेशी मेलॅनिनची कमतरता श्वेता असोसिएशन अवलंबित्व लग्न स्त्रिया वैद्यकीय समस्या त्वचा समस्या व्हिटिलिगो लग्नव्यवस्था मला करायचं नाही लग्न डॉ. दिलीप शिंदे रूग्णानुबंध कोड Necessity laser treatment Melanin deficiency Shweta Association dependency Marriage Woman Not Skin disease Medical Condition Skin problem Viteligo Marriage System Mala karaych nahi lagna Dr. Dilip Shinde Rugnanubandh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके