डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

दिनकरमध्ये झालेले हे डौलदार परिवर्तन पाहून मला एका गोष्टीची जाणीव झाली. आपला समाज व्यसनी व्यक्तींना नेहमी दारुडा, बेवडा म्हणून हेटाळत असतो. त्यामुळे ते अधिकच वैफल्यग्रस्त होऊन इतरांवर आणि स्वतःवरही सूड उगवत राहतात. पण व्यसनाधीनतेच्या आजारामध्ये त्यांचे ‘दारू पिणे’ हे एक वर्तन अयोग्य असले तरी तो अख्खा माणूस वाईट नसतो, हे आपण समजून घ्यायला हवे. आपले हे समजून घेणेसुद्धा व्यसनमुक्तीस हातभार लावण्यासारखे आहे.

एक माणूस भोऽऽ भोऽऽ भुंकण्याचा आवाज करत रस्त्याने लोकांच्या पाठीमागे धावतो आहे. त्याच्या आजूबाजूचे लोक सैरावैरा धावत सुटले आहेत. त्याला पकडण्यासाठी पोलीस त्याच्यामागे धावताहेत. अशी बातमी वर्तानपत्रामध्ये फोटोसह छापून आली होती. हा काय विचित्र प्रकार आहे म्हणून मी कुतूहलाने पाहू लागलो. त्या माणसाचा चेहरा मला ओळखीचा वाटला. मी थोडं निरखून पाहिलं. मला आश्चर्याचा धक्काच बसला. तो तर माझा नेहमीचा पेशंट दिनकर होता.

दोन-तीन दिवसांपूर्वीच माझ्या दवाखान्यात येऊन गेला होता. त्या दिवशी मी त्याला दिवसभर ॲडमिट करून घेतले होते. तो पोलिसमध्ये नोकरीला आहे. खूप दारू पीत असतो. दारू पिण्याचीसुद्धा त्याची एक वेगळी स्टाईल आहे. पगार झाला की सलग दोन-तीन दिवस तो भरपूर दारू पितो. त्याला अन्न-पाण्याचे आणि नोकरीचेही भान राहत नाही. उलट्या होऊन त्याला फारच अशक्तपणा आला तर त्याची बायको आणि मुलगा माझ्याकडे दवाखान्यात घेऊन येतात.

मी दिवसभर ॲडमिट करून सलाईन व इंजेक्शन्स देतो. त्यानंतर पुन्हा महिना दोन महिने तो दारूचे नाव काढत नाही. ‘आता पुन्हा दारूला हातसुद्धा लावणार नाही बघा’ असे प्रत्येकवेळी तो मला शपथेवर सांगत असतो. असे वारंवार होत असते. त्याच्या बाबतीत हे आणखी काय झाले म्हणून मी ती बातमी सविस्तर वाचू लागलो.

काल सकाळी तो महानगरपालिकेच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये गेला होता. कुत्रे चावल्यानंतर दिली जाणारी रेबीजची लस तेथे मोफत दिली जाते. सकाळी 9 ते 10 या वेळेत नाव नोंदणी करून घेतली जाते. त्यानुसार आवश्यक तेवढी लस मुख्यालयातून मागविली जाते. तेथे तो नाव नोंदणी करण्यासाठी रांगेत उभारला होता. त्याचा नंबर आल्यानंतर सिस्टरनी त्याला ‘तुम्हांला कधी आणि कुठे कुत्रे चावले आहे?’ म्हणून प्राथमिक माहिती विचारली.

त्यावर त्याने ‘मला कुत्रे चावले नाही, माणूस चावला आहे. मी पोलीस आहे. माझ्या हाताला परवा एक गुन्हेगार चावला आहे.’ असे म्हणून आपल्या हाताची जखम दाखविली. ‘माणूस चावल्यानंतर ही लस घ्यायची आवश्यकता नाही. कुत्रे चावल्यानंतर लस घ्यावी लागते.’ असे सिस्टरांनी त्याला समजावून सांगितले. पण तो त्यांचे काही ऐकेना. ‘मी पोलीस आहे. माझे नाव नोंद करून घ्या.’ असे म्हणत आपले ओळखपत्र दाखवू लागला.

 ‘तुम्ही मॅडम आल्यानंतर त्यांना भेटा’ असे म्हणून सिस्टरांनी त्याला थांबायला सांगितले. त्या पुढच्या लोकांची नावे नोंद करून घेऊ लागल्या. तो बराच वेळ तेथे काउंटरजवळ उभा होता. थोड्या वेळाने मेडिकल ऑफिसर आल्या. तो त्यांच्या पाठोपाठ लगेच केबिनमध्ये गेला. ‘मला लस घ्यायची आहे. सिस्टर माझे नाव नोंद करून घेत नाहीत. मी पोलीस आहे. माझ्या हाताला परवा एक गुन्हेगार चावला आहे.’ असे म्हणून त्यांच्याकडे तक्रार करू लागला.

‘माणूस चावल्यानंतर ही लस घेण्याची आवश्यकता नाही.’ असे मेडिकल ऑफिसरनी त्याला पुन्हा एकदा समजावून सांगितले.

पण तो त्यांचेही ऐकेना. त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. त्याने मद्यपान केले असावे अशी त्यांना शंका आली. शेवटी त्यांनी शिपायाला बोलावून त्याला बाहेर काढायला सांगितले. त्यानुसार शिपाई त्याला बाहेर काढू लागला. अचानकपणे त्याने त्या शिपायाच्या अंगावर भुंकायला सुरुवात केली. त्यामुळे तो शिपाई घाबरून बाहेर पळाला. त्याच्या पाठोपाठ दिनकरही भुंकतच बाहेर आला. काउंटरवरील सिस्टर व वेटिंगमध्ये बसलेल्या लोकांच्या अंगावरही आळीपाळीने भुंकू लागला. त्याच्या या विचित्र वागण्यामुळे आणि भुंकण्याच्या पद्धतीमुळे त्याला कदाचित रेबीज झाला असावा, असा सर्वांना संशय आला. लोक घाबरून दरवाजातून बाहेर पळू लागले. शिपाई तो आपला चावा घेणार नाही याची दक्षता घेत खुर्ची हातात आडवी धरून त्याला बाहेर हाकलू लागले.

 मेडिकल ऑफिसरने तातडीने आरोग्य अधिकाऱ्यांना व पोलिसांना फोन करून कल्पना दिली. तोपर्यंत दिनकर रस्त्यावर पोहोचला होता. आठ-दहा पावले पुढे चालायचा, गोल गिरकी घ्यायचा आणि आजूबाजूच्या लोकांच्या अंगावर भुंकायचा. रस्त्यावरची वाहनेही अडवू लागला. काही वेळाने पोलीस आल्यावर मात्र तो अधिक वेगाने धावू लागला. तो पुढे, पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी पाठीमागे असा बराच वेळ पाठलाग सुरू होता.

शेवटी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत त्याला पकडले व रस्त्याकडेच्या झाडाला बांधून घातले. झाडाला बांधल्यावर मात्र त्याने भुंकणे बंद केले. त्यानंतर त्याला ॲम्ब्युलन्समधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला प्यायला पाणी दिले. ते पाणी तो व्यवस्थित प्याला. रेबीज झालेली व्यक्ती पाणी व्यवस्थित पिऊ शकत नाही. त्यावरून त्याला रेबीज झाला नाही, हे लक्षात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मानसिक संतुलन बिघडल्याचे निदान करून त्याला ॲडमिट करून घेतले. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दिनकरची ही परवड वाचून मला वाईट वाटले.

वर्तमानपत्रामध्ये ही बातमी फोटोसह इतक्या ठळकपणे का छापली असेल? असा विचार माझ्या मनात आला. आता त्याच्या बायकोला आणि मुलाला लोकांना तोंड दाखवणेही मुश्किल झाले असणार.

दिनकरला मी गेल्या चार-पाच वर्षांपासून ओळखत होतो. दारू प्यायल्यानंतरचे चार-दोन दिवस वगळता एरवी तो नेहमी शांत आणि समजूतदारपणे वागायचा. ‘माझ्या भावांनी मला फसवले आहे. माझ्या जमिनीचा हिस्सा त्यांनी बळकावला आहे. त्या टेंशनमध्ये हातात पैसे आले की मला काही सुचत नाही. माझे पाय आपोआप दारूच्या दुकानाकडे वळतात.’ असे तो आपल्या दारू पिण्याबद्दल सांगायचा.

आपण दारू पीत असल्याचा त्याला पश्चात्तापही व्हायचा. त्याचा मुलगा अतिशय हुशार होता. बारावी सायन्समध्ये शिकत होता. तीनचार महिन्यांपूर्वी मी त्या मुलाला आणि बायकोला समजावून दिनकरला एका व्यसनमुक्ती केंद्रात भरती करायला सांगितले होते. तो तिकडे ॲडमिट व्हायलाही तयार नव्हता. त्याच्या मुलाने आपला मामा आणि मित्रांच्या मदतीने रिक्षात घालून त्याला ॲडमिट केले होते. पण त्याचाही त्याला काही उपयोग झाला नव्हता. हल्ली त्याचे पिण्याचे प्रमाण वाढतच चालले होते. तो इतका सैरभैर कशामुळे झाला असेल? याचा मी विचार करू लागलो.

परवा त्याने मलाही आपल्या हाताची जखम दाखवली होती. ‘माणूस चावला तर कुत्रे चावल्यानंतर दिली जाणारी लस घेण्याची आवश्यकता नाही,’ असे मीही त्याला समजावून सांगितले होते. तरीही तो असा का वागला असेल? त्याला ॲडमिट केले होते तेव्हाचा एक एक प्रसंग मी आठवू लागलो.

त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे त्याला आतल्या खोलीत सलाईन सुरू केली. उलट्या थांबण्यासाठी इंजेक्शन्स दिली. पुढचे पेशंटस्‌ तपासण्यासाठी मी परत माझ्या केबिनमध्ये आलो. काही वेळाने त्या दोघां नवरा-बायकोध्ये काहीतरी वाद सुरू असल्याचे माझ्या लक्षात आले. ‘तुम्ही सगळेजण मिळून माझ्या जिवावर उठला आहे. मला मारायला टपला आहे. माझ्या हाताला चावताना तुला लाज कशी वाटली नाही?’ असे म्हणून तो बायकोशी हुज्जत घालत होता. सुरुवातीला मी तिकडे दुर्लक्ष केले. पण त्याचा आवाज अधिकच वाढल्यानंतर मी आतल्या खोलीत गेलो.

 ‘‘दिनकर, काय चालले आहे?’’ मी त्याला दरडावून विचारले.

‘‘काही नाही डॉक्टरसाहेब.’’ तो ओशाळून म्हणाला.

‘‘आता कसं आहे?’’

 ‘‘बरं वाटतंय.’’ असे म्हणून तो डोळे मिटून शांतपणे पडून राहिला.

तो खूपच अस्वस्थ असल्यासारखा वाटत होता. थोड्या वेळाने माझे पेशंट तपासून संपल्यानंतर दिनकरची बायको मला केबिनमध्ये भेटायला आली. ‘‘माणूस चावल्यानंतर काही इंजेक्शन वगैरे घ्यावे लागते का?’’ तिने दबकत दबकत मला विचारले.

 ‘‘धनुर्वाताची लस घ्यावी लागते आणि जखम मोठी असल्यास औषध-गोळ्या घ्याव्या लागतात.’’

‘‘कुत्रे चावल्यानंतर देतात ती इंजेक्शने घ्यायची गरज आहे का?’’

‘‘नाही नाही. त्याची काही गरज नाही.’’ मी म्हणालो.

‘‘दिनकर यावेळी इतका का बरं चिडला आहे?’’

‘‘ह्यांच्या बाबतीत काय करावं हेच आम्हांला समजेनासं झालं आहे डॉक्टर. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जास्तच बिथरले आहेत. आम्ही त्यांना जबरदस्तीने व्यसनमुक्ती केंद्रात ॲडमिट केल्यापासून माझ्यावर, माझ्या भावावर, मुलावर वाट्टेल तो संशय घेऊ लागले आहेत. अगोदर पगार झाल्यानंतर दोन-चार दिवस प्यायचे. बाकी सगळा पगार घरात आणून द्यायचे. हल्ली मात्र दर आठवड्याला सुट्टीदिवशी प्यायला लागले आहेत. माझ्याकडे वरचेवर पैसे मागतात. पैसे दिले नाहीत तर लगेच भांडण काढतात. मला मारहाणही करतात. ह्यांचे हे पिणे असेच वाढत राहिले तर एखाद्या दिवशी ह्यांना नोकरीवरूनसुद्धा काढून टाकतील.’’

दिनकरची बायको काळजीच्या सुरात सांगत होती, ‘‘मुलगाही वैतागला आहे. त्याची बारावीची परीक्षा जवळ आली आहे. काल सकाळी तर हे त्याच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी म्हणून ठेवलेले पैसे दारू पिण्यासाठी घेऊ लागले. मी अडवायला गेले तर मला मारहाण करू लागले. त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेताना रागाच्या भरात मी त्यांच्या हाताला कशी चावले ते माझे मलाच समजले नाही. तेव्हापासून घरात नुसता हैदोस घातला आहे. शेजाऱ्यांना तोंड दाखवणेही अवघड झाले आहे.’’  

‘‘सलाईन संपल्यानंतर मी दिनकरला समजावून सांगतो.’’ मी त्यांना धीर दिला, ‘‘तुम्ही परत एकदा व्यसनमुक्ती केंद्रातील डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्या. माझ्याकडे असे वारंवार सलाईन लावून तात्पुरता इलाज करून उपयोग नाही. त्याची दारू सुटण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवेत.’’

‘‘मुलगा व्यसनमुक्ती केंद्रातील डॉक्टरांना भेटून आला आहे. ते ह्यांना बरोबर घेऊन या म्हणतात. त्यांनी दिलेली गोळ्या औषधेही ह्यांनी घेतली नाहीत. त्यांनी जर पुन्हा ॲडमिट करायला सांगितले तर आणखी पाच-दहा हजार कोठून आणू? तेव्हाच भावाकडून पैसे घेऊन  ॲडमिट केले होते. आपण दारू सोडावी यासाठी ह्यांनी स्वतः काही प्रयत्न करायला नकोत का? ह्यांच्या वागण्यात काहीच बदल होणार नसेल तर उगीच जबरदस्तीने तिकडे ॲडमिट करून काय उपयोग? ह्यांच्या दारू आणि औषधपाण्यापायी आम्हांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.’’ दिनकरची बायको उद्वेगाने म्हणाली.

इतक्यात सिस्टर दिनकरची सलाईन संपल्याचे सांगत आल्या. मी त्यांना दिनकरला माझ्याकडे पाठवायला सांगितले. तो केबिनमध्ये आला. मी त्याला धनुर्वाताची लस टोचली.

‘‘दिनकर, मी तुला धनुर्वाताचे इंजेक्शन दिले आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. पण तू व्यसनमुक्ती केंद्रातील डॉक्टरांना भेटून ये आणि त्यांनी दिलेली औषधे नियमित घे.’’ मी त्याला माझ्या परीने समजावून सांगितले. केवळ मानेनेच होकार देत तो निघून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच हा प्रकार घडला होता.

पुढे दहा-पंधरा दिवसांनंतर दिनकर माझ्या दवाखान्यात आला. यावेळी मात्र त्याचा अवतार नीटनेटका होता.

‘‘अरे दिनकर, तुझे हे काय चालले आहे?’’ मी विचारले.

‘‘डॉक्टर साहेब, मी असा कसा काय वागलो हे माझे मलाच समजले नाही.’’

‘‘सिव्हिल हॉस्पिटलमधून तुला कधी डिस्चार्ज मिळाला?’’

‘‘दोन दिवस झाले. तेथील डॉक्टरांनी ही पाच इंजेक्शन्स दिली आहेत. फॅमिली डॉक्टरांकडून एक दिवस आड टोचून घ्या म्हणून सांगितले आहे.’’ मी त्याला त्यांपैकी एक इंजेक्शन दिले.

‘‘दिनकर, झाले गेले विसरून आता मात्र व्यवस्थित वाग.’’

‘‘अहो डॉक्टर, एवढा तमाशा झाल्यावर आता कशाला दारूच्या वाटेला जातोय? दारूचा विचार जरी डोक्यात आला तरी आपण कुत्र्यासारखे रस्त्याने भुंकत पळतोय, असे चित्र माझ्या डोळ्यांसमोर येऊ लागते. काल बहीण आणि भाऊजी भेटायला आले होते. त्यांच्याबरोबर पंढरपूरलाही जाऊन आलो. पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून गळ्यात तुळशीमाळ घातली आहे. आता पुन्हा दारूला हातसुद्धा लावणार नाही अशी शपथ घेतली आहे.’’ त्याचा हा संकल्प ऐकून एरवी मी त्याला हसलो असतो,

पण अचानक मला एक प्रसंग आठवला. काही दिवसांपूर्वी मी पुण्याला गेलो होतो. तेव्हा तेथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र पाहण्याची संधी मला मिळाली. दीपाली नावाची माझी एक मैत्रीण तेथे नोकरी करते. तिने मला ते सर्व केंद्र फिरून दाखवले होते आणि तेथे चालणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती सांगितली होती. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य पाहून मी भारावून गेलो होतो.

‘इथे ॲडमिट होणाऱ्या लोकांपैकी सरासरी किती लोकांची दारू सुटते?’ असे मी तिला तेव्हा अडाणीपणाने विचारले होते.

‘अरे, असे हे टक्केवारीत सांगता येणार नाही.’ ती माझी कीव करत म्हणाली होती.

‘इथे ॲडमिट झाल्यावर चुटकीसरशी दारू सुटायला हवी असे लोकांना वाटत असते. पण असे होत नसते. दारू सोडण्यासाठी शेवटी स्वतःलाच स्वतःशी संघर्ष करावा लागत असतो. काहीजण स्वतःच्या मर्जीने आलेले असतात. काहींना त्यांच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने ॲडमिट केलेले असते. आमच्यासाठी दोघेही सारखेच आणि विशेष असतात. कारण व्यसनाधीनतेच्या आजारामध्ये कोणतीच केस होपलेस नसते. आम्ही त्यांना त्यांच्या जीवनातील साक्षात्कारी क्षणांची जाणीव करून देतो. त्यातूनच त्यांच्या मनामध्ये संकल्पाचे बीज रुजू शकते. मात्र त्यासाठी प्रत्येकाने नेहमी प्रयत्नशील आणि सतर्क रहावे लागते....’ तिने मला असे बरेच काही सांगितले होते.

दिनकरचा हा सुंदर संकल्प ऐकून ते सारे लख्खपणे आठवले. दिनकरच्या बाबतीतही ‘कुत्र्यासारखे रस्त्यावरून भुंकत पळणे’ हा त्याच्यासाठी साक्षात्काराचा क्षण आहे, हे माझ्या लक्षात आले. मी त्याच्या या सुंदर संकल्पाला प्रोत्साहन देण्याचे ठरविले.

‘‘हे बघ दिनकर, तुझा हा संकल्प अतिशय सुंदरच आहे. पण दारू हे तुझ्या बाबतीत केवळ व्यसन नसून एक आजार आहे. त्यामुळे तुझ्या या प्रामाणिक प्रयत्नांना तुला उपचारांचीही जोड द्यायला हवी. त्यासाठी तू व्यसनमुक्ती केंद्रातील डॉक्टरांना भेटून ये.’’

‘‘ठीक आहे डॉक्टर. मी त्यांच्याकडे जाऊन येतो.’’ असे म्हणून तो निघून गेला.

त्यानंतर जवळजवळ चार-सहा महिने दिनकर माझ्याकडे फिरकलाच नाही. त्याच्या बाबतीत काय झाले असेल, याची मला उत्सुकता लागून राहिली होती. एकेदिवशी अचानक दिनकर त्याच्या पोलिसाच्या गणवेशात माझ्या दवाखान्यात आला. केबिनमध्ये आल्याबरोबर पेढ्यांचा बॉक्स माझ्या हातात दिला.

‘‘डॉक्टर साहेब, हे घ्या पेढे. माझं प्रमोशन झालं. मी पोलीस शिपायाचा हवालदार झालो. माझे वर्तन सुधारल्याचे पाहून साहेबांनी मला प्रमोशन दिले.’’ आपल्या खांद्यावरचे स्टार दाखवीत तो आनंदाने म्हणाला.

‘‘अरे व्वा अभिनंदन! आता तुझी तब्येत कशी आहे?’’

‘‘तब्येत आता ठणठणीत आहे. आता ते सर्व सोडून दिले आहे. माझ्या हाताखाली पंधरा लोक आहेत. मला व्यवस्थित वागलेच पाहिजे. ’’ तो आत्मविश्वासाने म्हणाला.

मला त्याचे कौतुक वाटले. मी त्याच्या नवीन पोस्टसाठी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या. माझा निरोप घेऊन तो निघून गेला. दिनकरमध्ये झालेले हे डौलदार परिवर्तन पाहून मला एका गोष्टीची जाणीव झाली. आपला समाज व्यसनी व्यक्तींना नेहमी दारुडा, बेवडा म्हणून हेटाळत असतो. त्यामुळे ते अधिकच वैफल्यग्रस्त होऊन इतरांवर आणि स्वतःवरही सूड उगवत राहतात. पण व्यसनाधीनतेच्या आजारामध्ये त्यांचे ‘दारू पिणे’ हे एक वर्तन अयोग्य असले तरी तो अख्खा माणूस वाईट नसतो, हे आपण समजून घ्यायला हवे. आपले हे समजून घेणेसुद्धा व्यसनमुक्तीस हातभार लावण्यासारखे आहे.

Tags: मुक्तांगण डॉ. दिलीप शिंदे दिनकर व्यसन dinkar muktangan dilip shinde addiction weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. दिलीप शिंदे,  विश्रामबाग, सांगली

संचालक, संवेदना शुश्रुषा केंद्र, सांगली


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके