डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मनोगत (साने गुरुजी जन्मशताब्दी)

'साधना'ला आता मित्रमंडळाचे मजबूत हात हवे आहेत. आपापल्या ठिकाणी ‘साधना’साठी आठवड्यातून दोन तास देणारे शंभर साथी गुरुजींच्या जन्मशताब्दिवर्षात मिळवण्याचा संकल्प आम्ही सोडत आहोत आणि तो सिद्धीस आणणारच याची उमेद बाळगत आहोत.

जन्मशताब्दी पूर्वीचा हा विशेषांक वाचकांच्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. प्रा. रा. ग. जाधव यांच्यासारख्या ज्येष्ठ समीक्षकाच्या साक्षेपी संपादनाचा स्पर्श लाभलेला हा अंक वाचकांना संग्राह्य वाटेल अशी आशा वाटते. साने गुरुजी जन्मशताब्दिवर्षात राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी कथामाला, साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक समिती यांनी जी दमदार वाटचाल केली आहे, त्याची नोंद अंकात आहे. 'साधना’नेही आपला प्रयत्न चालू ठेवला आहे. या वर्षातच साधनाची पृष्ठसंख्या चारने वाढली. साहित्यविशेष हा विभाग चालू झाला. नारीजातक, जनअरण्य, वास्तव, घटनाविशेष, भारतीय संविधानाचा सुवर्ण महोत्सव ही वाचनीय, अभ्यासू व वाचकप्रिय सदरे चालू  झाली. निवडणूक काळातील विस्तृत आढावाही अनेकांना समाधानकारक वाटला. ही तर सुरुवात असल्याची आमची धारणा आहे. पुढील टप्पा आहे 'साधना'चा नेहमीचा अंक 32 पानी करण्याचा. 19 जून 2000 पासून तो 32 पानी करण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे हे आम्ही सहर्ष जाहीर करू इच्छितो. याबरोबरच वर्षातून चार विशेषांक प्रसिद्ध होतील. महत्त्वाच्या एका विषयावर त्यात 6 ते 8 अभ्यासपूर्ण लेख असतील. शिवाय नेहमीचीही सदरे असतील. गुरुजींची 'साधना' सर्वांगाने अधिकाधिक फुलून येणे यापेक्षा गुरुजींचे स्मरण करण्याचा दुसरा औचित्यपूर्ण मार्ग कोणता?

मात्र यासाठी वाचकांचा उदंड पाठिंबा हवा आहे. तो गृहीत धरून विस्ताराची झेप आम्ही घेत आहोत. येत्या वर्षात प्रत्येक वर्गणीदाराने फक्त आणखी एक वर्गणीदार मिळवून दिला तर किती बहार येईल? 'साधना'च्या नेहमीच्या अंकात जाहिराती नसतात. संपूर्ण वर्षात एखादी छोटी-मोठी जाहिरात साधनासाठी मिळवणे अनेक ग्राहकबंधूंना शक्य नाही काय? त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे 'साधना' सार्वजनिक ठिकाणी अनेकांच्याकडून वाचला जाणे. त्या प्रयत्नासाठी तर पैशाची तोशीसही नाही. सर्वांचा सारांश एवढाच, 'साधना'ला आता मित्रमंडळाचे मजबूत हात हवे आहेत. आपापल्या ठिकाणी ‘साधना’साठी आठवड्यातून दोन तास देणारे शंभर साथी गुरुजींच्या जन्मशताब्दिवर्षात मिळवण्याचा संकल्प आम्ही सोडत आहोत आणि तो सिद्धीस आणणारच याची उमेद बाळगत आहोत. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी विचारांच्या चळवळीचा सहकार्याचा भक्कम हात म्हणजे ‘साधना’. जो मदतीला सदैव तत्पर व पुढे असतो आणि अन्यायाविरुद्धच्या मुकाबल्यात मूठ बनून सिद्ध होतो. हे सामर्थ्य सतत वर्धिष्णू होत जाईल असा आशावाद साने गुरुजींच्या जन्मशताब्दिपूर्तीच्या निमित्ताने प्रकट करत आहोत. 
 

गुरुजी किती थोर होते याची नीटशी कल्पना आपल्याला येणार नाही. फुलाची एकेक पाकळी उमलावी त्याप्रमाणे आपल्या मनाची गुरुजींनी एकेक पाकळी उमलविली. आपल्याला आपल्या कपड्यावर डाग पडलेला खपत नाही, तसा गुरुजींना आपल्या मनावर डाग पडलेला खपत नसे. गुरुजी जन्मतः मोठे नव्हते, ते मोठे झाले. सर्वांना आपल्या मायेच्या पंखाखाली घेण्यास त्यांनी मनाला शिकविले. गुरुजींनी आपल्याला पेरते व्हा! पेरते व्हा! पेरा, मुबलक पेरा, सर्वत्र पेरा, निवडक पेरा म्हणजे सगळीकडे सुगी होईल असे अगदी शेवटी जाता जाता आवर्जून सांगितले.

साथी ना. ग. गोरे
 

Tags: जन्मशताब्दी विशेष birth centenary special संपादकीय editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके