डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पहिली आणि अंतिम बांधिलकी राज्यघटनेशीच...

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार : निखिल वागळे

नारायण राणेंच्या समर्थकांनी आमच्यावर केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणाची केस अंतिम टप्प्यात होती. सिंधुदुर्ग कोर्टातून निखिल वागळेंचा फोन आला. ‘‘अरे हे बघ, ते सगळे आरोपी आपली माफी मागतायत, या हल्ल्याचा आम्हाला पश्चाताप झालाय म्हणतायत. कोर्टात लिहून द्यायला तयार आहेत. जज्‌ म्हणाले की, ‘यांची माफी स्वीकारताय का?’ मी विचार करायला थोडा वेळ मागितलाय, तुला काय वाटतं? म्हणजे तुझं मत काय?...’’ मी काहीसा ब्लँक झालो. सरसरसर सगळा तो हल्ला डोळ्यापुढे उभा राहिला... नाथ पै सेवांगणातच घुसलेल्या त्या गुंड जमावाने हातात मिळेल ते घेऊन आम्हाला रक्तबंबाळ केलं. आमच्यावर कसलं केमिकल टाकलं. त्या मातीत आम्ही दोघे एकमेकांजवळच अर्धमुर्च्छितावस्थेत पडलेले असतानाच, डोक्यात घालायला मारेकऱ्यांनी दगड उचलला, पण एका आजीने पुढे येत आमचा जीव वाचवला. थोडं शुद्धीत आल्यावर त्या रक्तबंबाळ अवस्थेतच आम्ही चालत पोलीस स्टेशनला पोचलो. अख्खा गाव पहात होता... ‘‘हे बघ यांनी माफी मागणं, पश्चाताप व्यक्त करणं हीच यांना मोठी शिक्षा आहे, नाही का? शेवटी गांधी, बुद्धाचा हाच तर मार्ग आहे, पश्चाताप होणं ही सगळ्यात मोठी शिक्षा... तुला काय वाटतं? सांग लवकर...’’ मी भानावर आलो. मला ते म्हणणं अर्थातच पटत होतं. मी ‘हो’ म्हटलं. एक तर आमच्यावर झालेल्या आजवरच्या हल्ल्यात कुणालाच शिक्षा झालेली नाहीये. आणि आरोपींनी माफी मागायचा हा पहिलाच प्रसंग. त्यामुळे वागळेंची भूमिका योग्यच होती. 

प्रश्न : महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराचे तुम्ही मानकरी ठरला आहात. तुम्हाला या आधी अनेक पुरस्कार मिळालेत. मात्र या पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे सुस्मृत डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने हा पुरस्कार आहे. तुमचं आणि दाभोलकरांचं दीर्घ काळाचं घट्ट वैचारिक नातं होतं. ज्याला आदर्श मानलंय, ज्या माणसासोबत आपण काम केलंय; त्यांच्या नावे पुरस्कार घेताना काय भावना आहेत?

- मला वाटतं की, डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं हा एकूणच माझा आणि मी जो विचार मांडतो- ज्या विचारांनी काम करतो, त्या सगळ्याचा गौरव आहे. मी असं मानत नाही की, हा पुरस्कार वैयक्तिक आहे. कारण आपण जे काम करतो, ते एकटा माणूस कधीच करत नाही; त्यात आपले अनेक लोक सहभागी असतात. आपले कुटुंबीय, माझे ‘महानगर’मधील, आयबीएन-लोकमतमधले सहकारी यांचाही यात वाटा आहे. त्यामुळे माझ्या या सगळ्या सहकाऱ्यांचा हा सन्मान आहे, असं मी मानतो...

तू म्हणालास ते बरोबर आहे की, दाभोलकरांबरोबरचं माझं नातं होतं ते वैचारिक होतं. दाभोलकरांनी जो विचार मांडला, तो आमचा सगळ्यांचा होता. आम्ही आमच्या तरुणपणाची सुरुवात केली ती या विचारांवर श्रद्धा ठेवूनच. डॉ.दाभोलकरांनी या विचारांसाठी आपलं बलिदान दिलं... म्हणूनच हा पुरस्कार म्हणजे जबाबदारी आहे- हा विचार पुढे घेऊन जाण्याकरता, त्यासाठी निष्ठेने उभं राहण्याकरता. कोणतीही संकटं आली तरी मागे हटता कामा नये, असं जणू काही हा पुरस्कार सुचवतोय.

पत्रकारिता हा लोकशाहीतला चौथा स्तंभ असेल, तर घटनेच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्यामुळे या क्षेत्रात जी माणसं आहेत, त्यांची भारतीय घटनेवर आधी श्रद्धा पाहिजे. घटनेची जी मूल्ये आहेत- धर्मनिरपेक्षता, समता, वैज्ञानिक दृष्टिकोन अशा या सर्व मूल्यांवर त्या पत्रकाराची बांधिलकी असायलाच हवी; तरच लोकशाहीची बूज राखता येईल.

प्रश्न : या सामाजिक बांधिलकीच्या पत्रकारितेचा प्रवास सहज-सोपा नाही. मात्र या सगळ्याची बीजं कुठली होती? कोणता असा प्रभाव होता? माझा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबात जसं मुलांनी खूप शिकलं पाहिजे, पदवीधर झालं पाहिजे, डॉक्टरइंजिनिअर व्हायला पाहिजे असा आग्रह असतो; तसंच वातावरण माझ्या घरात होतं. मात्र माझ्या घरात पुस्तकं खूप यायची. त्यांत साप्ताहिकं, मासिकं बरीच असायची. त्यामुळे माझं वाचन प्रचंड होतं. महाराष्ट्रातील जी महत्त्वाची साप्ताहिकं होती- म्हणजे साधना, माणूस, मनोहर- ही सगळी नजरेखालून जात होती.

त्या काळातच युक्रांद (युवक क्रांती दल) चळवळ जोरात सुरू होती. युक्रांदची छाप महाराष्ट्रातल्या तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणावर होती. पुढे जयप्रकाशजींच्या चळवळीने याला खरा आकार दिला. आपण यात उडी घेतली पाहिजे, असं वाटू लागलं आणि आम्ही बिहारला गेलो. मुंबईतलं जे पांढरपेशी आयुष्य होतं, त्यापेक्षा वेगळं जग तिथे पाहायला मिळालं. मी असं मानतो की, खरा भारत मला बिहारमध्ये समजला. मी सुरुवातीला छात्र युवा संघर्ष वाहिनीचं काम करत होतो. मात्र तिथे फार काळ माझं जमलं नाही. त्यानंतर काही समविचारी लोक मला राष्ट्र सेवादलात घेऊन गेले. मधल्या काळात मी सर्वोदयी लोकांसोबतही काम करत होतो. पण माझं जमलंच नाही. सेवादलात असताना माझ्या एक लक्षात आलं की, विशिष्ट संघटनेत बांधून घेण्यासारखी आपली प्रकृती नाही.

त्यानंतर मी पूर्णवेळ पत्रकारितेत आलो. दिनांक साप्ताहिकात वयाच्या 19 व्या वर्षी संपादक झालो. खरं तर माझ्यासारख्या छोट्या मुलाला जयंत धर्माधिकारींनी संपादक का केलं, हे सगळं त्यांचंच श्रेय आहे. धोका पत्करायची माझी कायम तयारी असल्याने मी ही जबाबदारी स्वीकारली. मी वयाने, अनुभवाने लहान होतो; पण माझ्या भोवती जी लेखकांची टीम तयार झाली, ते सगळे माझे महत्त्वाचे सहकारी होते. मी या लेखकांसोबत वाढत होतो. त्यांचे अनुभव मला संपन्न करत होते.

प्रश्न : तो एकूणच वेगळ्या स्थित्यंतराचा काळ होता. पत्रकारितेतही नवी आव्हाने असतील?

- एक वेगळ्या प्रकारची पत्रकारिता त्या काळात सुरू झाली. त्या काळात आमच्यावर ‘संडे’ आणि ‘इंडिया टुडे’ यांचा प्रभाव होता. साधारण 1975 मध्ये सुरू झालेल्या या इंग्रजी साप्ताहिकांच्या प्रभावाखालीच ‘दिनांक’ सुरू झालं होतं. व्यवस्थेच्या विरोधात थेट पत्रकारिता ‘संडे’ आणि ‘इंडिया टुडे’ने सुरू केली. 1947 पासून 1975 पर्यंत पत्रकारितेचं एक पर्व मानता येईल.

1960 पर्यंत देशातील माध्यमांवर, पत्रकारांवर स्वातंत्र्य आंदोलनाचा प्रभाव होता. पण स्वातंत्र्याकडून ज्या आशा-आकांक्षा होत्या, त्या कमी-कमी होत गेल्या. त्याचे पडसाद उमटू लागले. 1975 मध्ये आणीबाणी लागू झाली. माझ्या मते, भारतीय पत्रकारितेचा सगळ्यात मोठा कसोटीचा हाच काळ होता. पण 90 टक्के पत्रकार या कसोटीला उतरले नाहीत. वर्तमानपत्रांनी सत्तेपुढे, इंदिरा गांधींच्या हुकूमशाहीपुढे माना टाकल्या.

अर्थात काही वर्तमानपत्रं म्हणजे ‘स्टेट्‌समन’, ‘इंडियन एक्स्प्रेस’ किंवा मराठी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांतील ‘साधना’सारखं साप्ताहिक ताठ मानेने उभं राहिलं. ‘दिनांक’ चालवताना या कहाण्या ऐकल्या होत्या. सत्तेला अंगावर घेता येतं, याचा प्रभाव आमच्यावर होता. संपादक झाल्यावर आपल्याला काही वेगळं करायचं, असं ठरवलं होतं.

प्रश्न : ‘दिनांक’चा वेगळा छाप होताच. त्यातून थेट मांडणी करणं, राजकीय-सामाजिक प्रश्नांना भिडणं हे सुरू होतंच आणि यातच पहिला हल्लाही त्या वेळी तुमच्यावर झाला; शिवसेनेला तुम्ही शिंगावर घेतलंत. काय होता हा संघर्ष?

- ‘दिनांक’मधील आमच्या एका कव्हरस्टोरीमुळे तो हल्ला झाला. ‘आवाज कुणाचा, शिवसेनेचा...’ असं त्या कव्हरस्टोरीचं शीर्षक होतं. शिवसेनेने सीमा-प्रश्नावर एक मोर्चा काढला होता. हा मोर्चा नंतर हिंसक झाला. जाताना त्यांनी त्या वेळच्या व्हीटी स्टेशनवर तोडफोड केली. तिथल्या शोकेस लुटल्या होत्या. अगदी ब्रेसिअर्सची शोकेसही लुटून नेली होती मावळ्यांनी. तर, आम्ही ते सगळे फोटो छापले. खरं तर आता सांगायला हरकत नाही, पण ती कव्हरस्टोरी दिनू रणदिवेंनी लिहिली होती. त्या काळात ते ‘मटा’मध्ये नोकरीला असल्याने त्यांचं नाव छापलं नव्हतं. याच अंकात शिवसेनेची जी परिणामकारक बाजू आहे, स्थानीय लोकाधिकार समितीचं काम वगैरे; त्यावरही हेमंत कर्णिकने लेख लिहिला होता. मी स्वतः ठाकरेंची मुलाखत घेतली होती. मी बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत घ्यायला गेलो, तेव्हा वयाने लहान असल्याने माझी काळजी वाटून जयंत धर्माधिकारी, माधव साठे हे माझ्यासोबत आले होते.

‘मातोश्री’ची जुनी इमारत होती. तिथे मला मुलाखत देऊन झाल्यावर बाळासाहेब म्हणाले, ‘‘अरे, तू लहान आहेस; लिहिशील ना बरोबर?’’ मी ‘हो’ म्हणालो. त्यावर ते पुन्हा म्हणाले की, ‘‘उद्या लिहून आणून दाखव.’’ त्यानुसार मी लिहून ते त्यांना दाखवलं. शांतपणे ते वाचत एकही चूक न काढता बाळासाहेबांनी त्यावर त्यांची सही केली. ते इतके खूश झाले की, त्यांनी स्वतःचंच कार्टून काढून मला दिलं. त्यांनी काढलेलं ते सेल्फ पोट्रेट आम्ही दिनांकमध्ये छापलं होतं. हे सगळं करताना, छापताना शिवसेना हल्ला करेल असं वाटलं नव्हतं. आमचं ऑफिस तेव्हा लॅमिंग्टन रोडवर होतं. तिथे दिनकर झारापकर हा शिवसेनेचा नगरसेवक होता. त्याच्या मुलांनी हल्ला केला, असं सांगतात. वडाळ्याला प्रेसजवळ मी आणि राजीव नाईक जेवायला जात होतो. तेव्हा लोखंडी कांबी-सळ्या घेऊन शिवसैनिकांनी हल्ला केला. दुपारी एक-दीडच्या सुमारास हे घडलं. लंच टाइममध्ये बेस्टचे कामगार बाहेर पडू लागल्याने हल्लेखोर पळून गेले. मात्र जाताना त्यांनी माझ्या पाठीवर ब्लेडने वार केले.

ज्येष्ठ पत्रकार मला सांगायचे की- निखिल, तू हा धोका पत्करू नकोस; हे लोक तुझा कधीही खून करतील वगैरे... मराठी वृत्तपत्रसृष्टी बाळासाहेबांना  घाबरतेय, हे उघड होतं. म्हणजे इथे बसून यशवंतराव चव्हाणांना किंवा रिचर्ड निक्सनला सल्ला देणारे संपादक ठाकरेंवर कडक लिहायची हिंमत दाखवायला तयार नव्हते. वर्तमानपत्रांनी हल्ल्याची ही बातमी तशी दुर्लक्षितच केली. खरं सांगायचं तर त्या हल्ल्याने मी प्रचंड तणावाखाली होतो. रस्त्याने चालताना मागे वळून मी पाहायचो; मागून हल्लेखोर येताहेत, असं सतत वाटत राहायचं. एकटा कुठे जायला भीती वाटायची. पण हे काही दिवसच. दहा-पंधरा दिवसांनंतर माझा मूळ स्वभाव परत आला. काय होईल मरून जाऊ ना? आपण आपलं काम करत राहायचं; काय व्हायचं ते होवो, असं मी ठरवून टाकलं.

प्रश्न : ‘महानगर’चा प्रयोग हा एकूणच आधुनिक पत्रकारितेच्या इतिहासातील मापदंड ठरला आहे. तरुण पत्रकारांची एक पिढी ‘महानगर’च्या मुशीतून तयार झाली. पत्रकारितेला एक वेगळा आयाम मिळाला. त्यावर बोलूच; पण मुळात ‘महानगर’चा हा प्रयोग करताना त्या वेळी नेमका काय विचार केला होता?

 - ‘अक्षर’नंतर षटकार, चंदेरी तसंच गुजराती भाषेतील ‘रुपेरी’ असा मॅगझिनचा प्रयोग यशस्वी झाला होता. मीना (कर्णिक) नवशक्ती सोडून आमच्यासोबत आली. संदीप पाटील, रोहिणी हट्टंगडी, गौतम राजाध्यक्ष अशा सेलिब्रेटी एडिटरचा पहिला प्रयोगही आम्ही केला. प्रस्थापित पत्रकारिता ही जुनाट डबक्यासारखी झालीय, हे ‘दिनांक’पासून मी मांडत होतो. त्यानंतर 1990 पर्यंत माझं हे मत अगदी ठाम झालं. मराठी पेपर आणि इंग्रजी पेपर, साप्ताहिकं किंवा एस.पी.सिंग यांचं हिंदीतील ‘रविवार’ हे पाहिलं तरी त्यात जमीनअस्मानाचा फरक जाणवत होता. बदलाशी, नव्या काळाशी मराठी पत्रकारितेचा जणू काही संबंधच नव्हता. मी यावर सातत्याने विचार करत होतो. मुंबईत दोन प्रयोग यशस्वी झाले होते, ते म्हणजे ‘मिड-डे’ आणि ‘आफ्टरनून.’ मिड-डे खलिद अन्सारींनी सुरू केला, पण त्यांचं तिथे नाही पटलं म्हणून त्यांनी मग ‘आफ्टरनून’ काढला. तोही यशस्वी ठरला.

माझ्या लक्षात आलं की, सकाळच्या वर्तमानपत्राच्या पलीकडे लोकांना काही तरी हवंय. मराठीत संध्याकाळचा पेपर म्हणजे अगदी फालतू मानला जायचा. पण माझं निरीक्षण असं होतं की, सकाळचा पेपर माणूस सकाळी वाचू शकत नाही. कारण तो कामावर जाण्याच्या घाईत असतो. नुसत्या हेडलाईन वाचण्यापलीकडे काहीच वाचता येत नाही. दुपारी लंचटाइममध्ये जर चांगला पेपर हातात आला, तर लोक कदाचित वाचतील. परतीच्या प्रवासात मिड-डे, आफ्टरनून यांचा आकार छोटा असल्याने लोक लोकलमध्ये वाचतात. त्यामुळे पेपरचा आकार, भाषा, शैली, हे सगळं बदललं; तर मराठी वाचक त्याचा स्वीकार करतील, असा मला ठाम विश्वास वाटत होता. तो खरा ठरला. 1990 मध्ये वर्तमानपत्रांच्या गर्दीत ‘महानगर’ लोकांनी स्वीकारला.

प्रश्न : ‘महानगर’ एक भूमिका घेऊन झंझावात निर्माण करत असतानाच त्याची किंमत मोजावी लागली, तोशीस सहन करावी लागली. ‘महानगर’च्या टीकेने अस्वस्थ होत पहिला हल्ला चढवला तो शिवसेनेने. ही अपेक्षा होती तेव्हा?

 - राजकीय-सामाजिक प्रश्न ऐरणीवर घेतल्याने ‘महानगर’ लोकप्रिय झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर 1991 मध्ये पहिली कडक टीका केली. भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचला त्यांनी विरोध केला आणि शिवसैनिकांनी वानखेडेचं पीच उखडलं. याबाबत लोकांत संताप होता, तो व्यक्त होत नव्हता. या फॅसिस्ट प्रवृत्तीविरुद्ध मी लिहिलं. ‘बालबुद्धीचे प्रताप’ नावाचा अग्रलेख लिहिला. ती टीका सहन न झालेल्या शिवसैनिकांनी 24 ऑगस्ट 1991ला ‘महानगर’वर हल्ला चढवला. एका मराठी पेपरवर शिवसेनेने हल्ला चढवला याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. (अगदी 11 वर्षांपूर्वी माझ्यावर शिवसैनिकांनीच हल्ला केला होता, हे कुणाच्या लक्षात नव्हतं.) या हल्ल्याची दखल देशभरातल्या सगळ्या मीडियाने घेतली. फोटो वगैरे छापून आले. देशभरातून लोक धावून आले. मग मात्र इथल्या प्रतिष्ठित मराठी संपादकांना त्याची दखल घ्यावी लागली.

 प्रश्न : ‘महानगर’वरच्या या हल्ल्यातूनच अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दाही पुन्हा एकदा प्रकर्षाने ऐरणीवर आला. बीयूजे संघटनेमार्फत पत्रकारही यावर संघटित झाले...

 - अभिव्यक्तिस्वातंत्र्य, राजकीय गुंडगिरी हे सगळंच ऐरणीवर आलं. राजकारणातील गुंडगिरी किंवा राजकारणाचं गुन्हेगारीकरण याबाबत जी चर्चा आजही सुरू असते, त्याविरुद्ध जो आवाज उठवला तो   ‘महानगर’नेच. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या मुद्यावर शरद पवारांविरुद्धही लिहिलं. तू होतासच. वसई, उल्हासनगरमधील गुंडांना राजकीय पाठबळ दिल्याप्रकरणी पवारांवर आपण सडकून टीका केली. त्याचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने सहनही केले... महानगरवर 1991 मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. तेव्हा बीयूजेने आंदोलन आणि धरणं आयोजित केली होती. शिवसेना भवनावर पहिल्यांदा मूकमोर्चा काढला होता, जो माहिमपासून शिवसेना भवनावर गेला. हिंदूचे संपादक एन.राम, प्रभाष जोशी अशी दिग्गज मंडळी रस्त्यावर उतरली होती. यात विविध संघटनांचे लोक, सर्वसामान्य माणसं सहभागी झाली होती. दहशतवादाविरुद्ध हा पहिला मोठा आवाज होता.

या आंदोलनानंतर तीन पत्रकारांवर हल्ला झाला. मणिमाला, मिलिंद खांडेकर वगैरेंवर हल्ला झाला. पुढेसुद्धा शिवसेनेने हल्ले केले. इतकंच नाही, तर ठाकरेंनी बंदीही घातली. पण महानगरवर बंदी घातल्यानंतर महानगरचा सर्व स्टाफ रस्त्यावर उतरला आणि त्यांनी रस्त्यावर उभं राहून महानगर विकला. त्या वेळी अनेक संघटनांचे लोक सोबतीला आले. प्रामुख्याने आंबेडकरी चळवळींतले लोक आले, इतरही सर्व चळवळीतले कार्यकर्ते आले, एनजीओतले लोक आले. लोकांनी जागोजागी स्वतःहून महानगर विकला. मला आज असं वाटतं की ठाकरेंविरुद्ध बोलतोय, हे लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं का? तर, नाही. पण लोकांना कुणाचीच अरेरावी नको असते. ठाकरेंची असेल किंवा पवारांची असेल... हा कुणाच्या तरी अरेरावीविरुद्ध बोलतोय, हे त्यांना महत्त्वाचं वाटतं.

प्रश्न : ‘महानगर’ने इथल्या लोकांचे लढे, चळवळी, आंदोलनं यांनाही पाठबळ दिलं. जनआंदोलनाला एवढा सपोर्ट कुठल्याही माध्यमाने कधी दिला नव्हता; नाही का?

- गिरणी कामगारांच्या बाजूने ‘महानगर’ सर्वशक्तिनिशी उभा होता. प्रत्येक आंदोलन, सरकारचं मालकधार्जिणं धोरण हे सगळं तेव्हा आपण अग्रक्रमाने मांडत होतो. देशोधडीला लागलेल्या गिरणी कामगारांच्या या लढ्यातील ‘महानगर’चं योगदान कुणीही नाकारणार नाही. नर्मदा बचाव आंदोलनाचा, विस्थापित आदिवासींचा सगळा संघर्ष ‘महानगर’ने आपला मानला. अगदी मुंबईत होणाऱ्या मेधा पाटकरांच्या आंदोलनाकडे प्रस्थापित मीडिया पाठ फिरवत असताना सरकारवर दबाव आणण्याचं काम आपण केलं. मुंबई महापालिकेचे माजी अधिकारी गो.रा.खैरनार यांनी दाऊद आणि अनधिकृत बांधकामांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत ‘महानगर’ सहभागी झाला. अण्णा हजारेंची 1990 पासून भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जी-जी उपोषणं-आंदोलनं झाली त्याला ‘महानगर’ने प्राधान्य दिलं.

मुख्य प्रवाहातील माध्यमं तेव्हा मेधा पाटकर, अण्णा हजारे किंवा अगदी दत्ता इस्वलकरांना महत्त्व देत नव्हती; तेव्हा ‘महानगर’ त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा होता. अगदी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीलाही ‘महानगर’ने आपलं मानलं. केवळ बुवाबाजी नव्हे, तर दाभोलकर जो विवेकवाद मांडत होते; तो वर्तमानपत्रांच्याच पचनी पडत नव्हता. अंधश्रद्धाविरोधी कायदा व्हायला पाहिजे, यासाठी दाभोलकरांसोबत ‘महानगर’ने मोहीम चालवली. ‘महानगर’ हा लोकांचा आवाज बनला.

प्रश्न : ‘महानगर’ हे चळवळींचं मुखपत्र बनलं. ज्यांना कुणी कधी महत्त्व दिलं नाही, त्या तळातल्या माणसांचे विषय ऐरणीवर येऊ लागले. हा एक वेगळाच काळ होता. देशात धार्मिक विद्वेषाचं राजकारण सुरू झालं, तेव्हा महानगरच्या कसोटीचा काळ होता...

- हे अगदी खरंय. या धार्मिक विद्वेषाविरुद्ध   ‘महानगर’ने सातत्याने लिखाण केलं. त्यातील धोक्यांची मांडणी सातत्याने केली. जातीय दंगलीत दंगलखोरांचे नकाब उतरवत दंगलग्रस्तांच्या वेदनेला हुंकार दिला तो ‘महानगर’नेच. दंगलीत अफवा पसरवू नयेत यासाठी ‘महानगर’ने मोहीम सुरू केली. त्या कठीण काळातही ‘महानगर’ची अख्खी टीम कार्यरत होती. इथल्या शोषित, पीडित समाजाचा आवाज बनण्याचं काम ‘महानगर’ने केलं. दलितांवर होणारे अत्याचार असोत की रमाबाई कॉलनीतील गोळीबारात मृत्युमुखी पडलेले दलित बांधव असोत; ‘महानगर’ त्यांच्या बाजूने उभा राहिला. श्रीकृष्ण आयोग, गुंडेवार आयोग यांच्या कामावर लक्ष ठेवून त्याच्या वार्तांकनाला दररोज अग्रक्रम दिला. लोकांचे प्रश्न, चळवळी, आंदोलनं यांचा ‘महानगर’ हा आवाज बनला. 

लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ अशा पेपरच्या आधी हा पेपर बोलतो, हे लोकांना वाटायला लागलं. कदाचित बड्या पेपरच्या तुलनेत ‘महानगर’ हे लहान पोर होतं. त्याचा आवाज मोठा नसेल; पण जे बोलतो ते सत्य बोलतो, हा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला. माझ्या मते, मराठी पत्रकारितेला शिळ्या वातावरणातून बाहेर काढण्याचं काम ‘महानगर’ने बजावलं.

प्रश्न : मधल्या काळात अनेक चॅनेल्स सुरू झाले. अनेक ठिकाणी तुम्ही पॅनेलिस्ट म्हणून जात होतात. तिथल्या चर्चेत सहभागी होत होतात. तो एक वेगळा काळ सुरू झाला होता. अशा पद्धतीने मराठी किंवा हिंदीमध्ये परखड बोलणारं- थेट बोलणारं, टीकात्मक मांडणी त्या काळात होत नव्हती. पण तुम्ही थेट बोलायचात, म्हणून लोक तुम्हाला बोलवायचे. यातूनच तुम्हाला तुमची स्टाईल सापडली?

 - मी टेलिव्हिजनवर 92-93 पासूनच जायला लागलो. दंगली वगैरेंनंतर... त्या वेळी एनडी टीव्हीवर राजदीप सरदेसाई मला बोलवायचा. एनडी टीव्ही हे त्या वेळेला मेजर चॅनेल झालेलं होतं. मग बाकीच्या चॅनेल्सवरही बोलवायचे... पण मी जे लिहीत होतो ना, तेच बोलायचो. खरी गोष्ट हीच आहे की, मी जे लिहीत होतो तेच बोलत होतो. तिथे जाऊन वेगळं बोललं पाहिजे, हातवारे केले पाहिजेत, टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर जाऊन असं केलं पाहिजे- असा विचारच माझ्या डोक्यात कधी नाही आला. मी जे करत होतो ते टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यातून लोकांसमोर गेलं. मुळामध्ये मला असं वाटतं की, ती माझी शैली नैसर्गिक होती. ती टेलिव्हिजनने पकडली आणि ती टेलिव्हिजनला सूट झाली. म्हणजे लोक मला आता विचारतात की, तुम्ही टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर जसं बोलता, तसंच बाहेरही बोलता का? तर, मी तसाच बोलतो... मी वेगळं काही करत नाही. मी कॅमेऱ्याबाहेरसुद्धा असेच हात हलवतो.

जेव्हा ‘तारा’ नावाचं चॅनेल सुरू झालं, तेव्हा नितीन वैद्यने मला तिथे ‘आमने-सामने’ हा कार्यक्रम दिला. नितीन वैद्य आणि प्रकाश बाळ तेव्हा तिथे होते. आमनेसामनेला मी अँकर होतो. मी पहिल्यांदाच अँकरिंग करत होतो. मी पहिला कार्यक्रम केला भुजबळ आणि नारायण राणे यांचा. तो खूप चांगला झाला. मी हे सगळे एपिसोड करणार नव्हतो. पण त्याच रात्री नितीन वैद्यने मला सांगितलं की, तूच आता सगळं कर. मग कन्सल्टिंग एडिटर म्हणून रुजू झालो आणि तारा असेपर्यंत तिथे मी काम केलं. त्यानंतर हाच कार्यक्रम नितीन वैद्यने झी (अल्फा)वर चालू केला 2004 मध्ये. तूही सोबत होतास. दोन वर्षं हा कार्यक्रम हिट झाला. मग 2007 मध्ये आयबीएन-लोकमतचं संपादकपदच मला राजदीप सरदेसाईने दिलं.

प्रश्न : आयबीएन-लोकमत हा एक वेगळाच प्रवास तुमचा सुरू झाला. ते जगच वेगळ्ं होतं. काय होता हा अनुभव?

 - जी पत्रकारिता मी महानगरमध्ये करत होतो, तीच अधिक मोठ्या कॅनव्हासवर आयबीएन-लोकमतमध्ये केली. तत्त्वं बदलली नाहीत, फक्त फॉरमॅट बदलला. कदाचित मी जिथे दोन पानांचा लेख लिहीन; तेच मी इथे वीस मिनिटांचा कार्यक्रम करत होतो, एवढाच फरक होता. आयबीएन-लोकमतची नोकरी स्वीकारली; तेव्हाच माझी स्पष्ट अट होती की, मला शंभर टक्के स्वातंत्र्य हवं. याचा अर्थ मला जे हवंय ते मी करीन, असाच होता. ते दर्डा आणि राजदीप सरदेसार्इंनी पण मान्य केलं. मुळात त्या दोघांनाही हे मान्य होतं, म्हणूनच त्यांनी मला आठ वर्षं संपादक म्हणून ठेवलं. आठ वर्षं मी मला हवं ते केलं. फक्त हे माध्यम अधिक मोठं आणि व्यापक होतं. त्यामुळे माझ्यामध्ये मोकळेपणा अधिक आला. म्हणजे विचारांचा आग्रह धरतानासुद्धा तुमच्यामध्ये ठरावीक असा एक मोकळेपणा असला  पाहिजे.

मी ‘ग्रेट भेट’मध्ये जवळजवळ 300-400 लोकांच्या मुलाखती घेतल्या. ‘आजचा सवाल’ रोज करत होतो. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की- आपले विचार न पटणारे जे लोक आहेत, तेसुद्धा आपला कार्यक्रम बघतात... का बघतात? तर हा माणूस काय म्हणतो, हे समजून घेण्यासाठी. माझं सगळ्यांनाच पटायला पाहिजे, असा माझा आग्रह असण्याची कधीच गरज नव्हती. आयबीएन-लोकमत येईपर्यंत बाकीच्या चॅनेलचा जर्नालिझम हा बाईट घेणं, बोंबलणं, काय वाट्टेल ते बोलणं- एवढ्यापुरता होता. आम्ही ते केलं नाही. ‘ब्रेकिंग न्यूज’च्या पाठी कधीही धावलो नाही, हे आयबीएन-लोकमतचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. तुमच्याकडे विश्वासार्ह बातमी असेल, तर लोक ती पाहतात. पाच मिनिटं उशिरा आली तरी पाहतात...

प्रश्न : आयबीएन-लोकमतमध्ये वार्ताहरांचे वेगळे, नवे चेहरे होते. समाजातल्या सर्व घटकांतील तरुणांना सामावून घेतलं होतं. एक विशेष प्रशिक्षण यासाठी घेतलंत. कसा अनुभव होता?

- महाराष्ट्र-भरात फिरून आम्ही 200 मुलं घेतली. ती राज्यातील सर्व विभागांतील, सर्व जाती-धर्मांचं प्रतिनिधित्व करणारी होती. मला असं वाटतं की, मराठी पत्रकारितेमध्ये किंवा भारतीय पत्रकारितेमध्ये हा अशा प्रकारे जाणीवपूर्वक करण्यात आलेला पहिला प्रयोग होता. गुणवत्तेबाबत कुठेही आम्ही कॉम्प्रोमाईज केलं नाही. जी शंभर-दोनशे मुलं आमच्याकडे होती, ती समाजाच्या सर्व स्तरांचं प्रतिनिधित्व करणारी होती. त्यामुळे असं झालं की, आम्ही फक्त पश्चिम महाराष्ट्राचं माध्यम नाही राहिलो; तर आम्ही विदर्भाचे झालो, कोकणाचे झालो, खानदेशाचे झालो. अगदी आदिवासी भागातलेही झालो. आमच्याकडे आदिवासी समाजातीलही रिपोर्टर होता; हे लक्षात घ्या.

म्हणजे त्या-त्या समाजातून येणारी मुलं तिथे काम करणारी असल्यामुळे सगळ्या समाजाचे प्रतिनिधी आम्ही झालो. आयबीएन-लोकमतचं हे सगळ्यात मोठं यश आहे, असं मला वाटतं. आपोआपच ते असं रीच माध्यम बनलं. म्हणजे म्हणतात, आयबीएन-लोकमतचा इम्पॅक्ट कुठे नव्हता? त्याचं कारण ही सारी मुलं तो इम्पॅक्ट देत होती. माझ्याकडे पाचही प्रादेशिक विभागांतली मुलं होती. विदर्भातली जर बातमी आली, तर कोकणातला मुलगा बोंबलायचा- आमची बातमी नाही आली म्हणून. कोकणातली बातमी आली, तर मराठवाड्यातला मुलगा बोंबलायचा- त्यामुळे हा जो सामाजिक बॅलन्स होता, तो अत्यंत महत्त्वाचा होता आणि मला असं वाटतं की, कोणत्याही माध्यमात हा बॅलन्स असायला हवा. बहुसंख्य संपादक काय करतात, तर ते आपल्या ओळखीचे लोक घुसवतात- मग वृत्तपत्र असो किंवा टेलिव्हिजन चॅनेल.

प्रश्न : आयबीएन-लोकमतवरही हल्ला झाला. तोही शिवसेनेने केला. लोक असं म्हणतात की, वागळे जिथे जातात तिथे शिवसैनिक हल्ले करतात... पण हा हल्ला वेगळ्या पद्धतीने हाताळला गेला होता. आयबीएनच्या कर्मचाऱ्यांनी हा हल्ला परतवून लावला होता...

 - हां... एक हल्ला झाला. तोसुद्धा शिवसेनेने केला. स्वसंरक्षणार्थ घ्यायची ती दखल घेत आमच्या लोकांनी त्या हल्लेखोरांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. आत्तापर्यंत ‘महानगर’वर हल्ले करून ते पळाले होते, इथे मात्र ते पकडले होते. आणि इतके घट्ट पकडले होते की, त्यांना आपली सुटका करून घेण्यासाठी पुन्हा माझ्याच पाया पडावं लागलं.

प्रश्न : तुम्ही या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये होतात. हा हल्ला झाला तेव्हा मॅनेजमेंटकडून असे काही फिलर आले का, की- असं काही करू नका, तसं करू नका वगैरे...?

 - असे फिलर वगैरे काही आले नाहीत मला. ते आले अशासाठी नाहीत की, त्या कंपनीमध्ये मी जी नोकरी स्वीकारली होती; तेव्हा माझ्या अपॉर्इंटमेंट लेटरमध्येच असं लिहिलं होतं की, तुम्ही फक्त राजदीप सरदेसार्इंना आन्सरेबल आहात. त्यामुळे त्या अख्ख्या कॉर्पोरेटमध्ये मी एकटा एक वेगळा माणूस होतो आणि माझी काळजी घ्यायला राजदीप सरदेसाई समर्थ होते. माझे जे सगळे आग्रह होते, ते त्यांनी मान्य केले. म्हणजे आसारामबापूंनी विकत घेतलेला अर्धा तास आम्ही नाकारला. त्यामध्ये कंपनीचं एक कोटी रुपयांचं नुकसान झालं. तरीसुद्धा कंपनीने ते सहन केलं. मॅनेजमेंटच्या बाजूने त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये दर्डा नावाच्या माणसाला ढवळाढवळ करू दिली नाही.  

मुलाखत : युवराज मोहिते

Tags: मुलाखत युवराज मोहिते निखिल वागळे डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार 2014 interview mulakhat yuvraj mohite Nikhil wagle dr narendra Dabholkar smruti purskar Maharashtra foundation awards 2014 Maharashtra foundation purskar 2014 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

निखिल वागळे
nikhil.wagle23@gmail.com

पत्रकार, माजी संपादक- महानगर, दिनांक, आय बी एन लोकमत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके