डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पुणे विद्यापीठात ‘फिजिक्स’ विषयाचे प्राध्यापक असलेल्या डॉ.विद्यासागर यांनी लिहिलेले ‘महामानव आइन्स्टाइन’ आणि अनुवादित केलेले ‘आम्ही शास्त्रज्ञ असे झालो’ ही दोन पुस्तके (गंवर्धवेद प्रकाशनाने प्रकाशित केलेली) मराठी वाचकांत विशेष लोकप्रिय ठरली आहेत. त्यांची ‘सुपरक्लोन’ ही मराठी कादंबरी कन्नड व हिंदी या भाषांत अनुवादित झाली आहे. ‘साधना’त या अंकापासून त्यांची ‘विज्ञानबोध’ ही लेखमाला क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत. समर्थ रामदासांच्या ‘दासबोध’ची आठवण करून देणाऱ्या काव्यपंक्ती हे ‘विज्ञानबोध’ या लेखमालेचे मुख्य वैशिष्ट्य राहणार आहे. - संपादक

मानवामधील काही नारी नर। होती विचारमग्न फार ।।

नवल करिती हे चराचर । कसे दृग्गोच्चर जाहले ।।

पाहती चंद्रसूर्याचा खेळ । घालू पाहती नक्षत्रांचा मेळ ।।

विस्मित करी ग्रहणकाळ । कार्यकारण काय असे ।।

कुतूहल जरी मनी उपजते । तरी ते विश्व व्यापते ।।

मन उराउरी धावते । जाणावया अगम्य ते।।

उफाळून येई बाहेर । जसा धनामधील कल्लोळ ।।

वीज जैसी झेपे धरेवर । तैसे कुतूहल धावतसे ।।

कुतूहल मनी आले । आणि तै क्षणी निमाले ।।

त्याचेनी जिज्ञासा ठेले । हे होणे असंभव ।।

कुतूहल जागृत राहिले । त्यासी निरीक्षण जोडिले ।।

सारासार विचारे केले । यथायोग्य विश्लेषण ।।

विश्लेषणामाजी निष्कर्ष निघाला । तो पुन्हा पुन्हा पडताळिला ।।

निष्कर्ष तोचि राहिला । तरि तो स्वीकारावा ।।

मानवाचा विकास त्याच्या शारीरिक विकासाशी जोडलेला आहे, त्याहून अधिक तो बुद्धीच्या विकासाशी जोडलेला आहे. मानवी मेंदूचा झालेला विकास हा मानवाचे इतर प्राण्यांपेक्षा असलेले वेगळेपण सिद्ध करतो. कीटक, पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या मेंदूचा अभ्यास हा त्यांच्यामधील साम्य आणि फरक दाखवतो. प्राथमिक स्तरावरील मेंदूचे अस्तित्व मानवी मेंदूमध्ये आढळते. जीवनासाठी आवश्यक अशा श्वसन, रक्ताभिसरण, हालचाल अशा प्रक्रियांचे नियमन या भागांद्वारे होते. मात्र या प्रक्रियांवर नियंत्रण ठेऊन त्यांचे हवे तसे कार्य घडवून आणणाऱ्या मोठ्या मेंदूचा विकास सस्तन प्राण्यांमध्ये झालेला आढळतो.

चिंपाझी हा मानवाच्या अगदी जवळचा प्राणी, मात्र त्याच्या मेंदूची तुलना मानवी मेंदूशी केली असता, मानवी मेंदूतील ‘निओकॉटेक्स’ या मोठ्या मेंदूच्या पुढील भागाचा विकास अधिक प्रमाणात झालेला आढळतो. याचा परिणाम मानवामध्ये आढळणाऱ्या क्षमतेत दिसून येतो. मानवी मेंदू म्हणजे एक महाकाय जाल आहे. यात शंभर अब्ज पेशींचा समावेश असून या पेशी एकमेकांशी ऐंशी हजार संपर्कबंध निर्माण करतात. मज्जासंस्थेतील या पेशींचे कार्य विद्युत स्पंदनांद्वारे चालते. ही एक जैवरासायनिक प्रक्रिया आहेच, परंतु यामध्ये भौतिक नियमांचाही आधार घेतला आहे हे विशेष.

मेंदूमध्ये निरनिराळी केंद्रे आहेत. स्नायूंची हालचाल घडवून आणणारा भाग, ध्वनीचे आकलन आणि विश्लेषण करणारा भाग, दृश्य पाहणे आणि त्याचे आकलन करणारा भाग इत्यादी. असे असले तरी हे भाग एकमेकांशी जोडलेले असून ते माहितीची देवाणघेवाण करतात. या संकलित माहितीचे विश्लेषण करून त्यापासून कल्पना तयार करण्याची क्षमता मानवी मेंदूमध्ये आहे. मानवामध्ये आढळणाऱ्या लिहिणे, वाचणे, कल्पना करणे, भविष्याचा वेध घेणे, निसर्गनियमांचे आकलन करणे, संगीत- चित्रकलेचा आस्वाद घेणे, प्राणिभाषा विकसित करणे या क्षमता चिंपाझींमध्ये दिसून येत नाहीत. शब्द उच्चारण्याला सुरुवात केल्यापासून मानवी मूल सहा महिन्यांच्या कालावधीत बोलायला शिकते. चिंपाझी हा महिन्यात ममा आणि कप हे दोनच शब्द बोलायला शिकतो.

निसर्गाशी संपर्क आल्यानंतर आलेल्या अनुभवांवर विचार करणे आणि त्यामागील कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न करणे हा मानवाचा स्थायीभाव आहे. यातूनच सूर्य आणि चंद्र यांचे निरीक्षण करताना तो त्याविषयी विचार करू लागला. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाने त्याला आकर्षित केले असल्यास आश्चर्य ते काय? विशेषत: खग्रास सूर्यग्रहणामुळे तो भयभीत होणे सहज शक्य आहे. आजही खग्रास सूर्यग्रहण अनेकांना भीतिदायक वाटते. परंतु अशा घटनांमुळे तारे, नक्षत्रे आकाशगंगा यांबद्दल त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले की, त्याच्या विचारांना चालना मिळते. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मन त्या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते. जितके कुतूहल अधिक तेवढे मन विचारांनी अधिक व्यापते. कुतूहल माणसाला स्वस्थ बसू देत नाही. अज्ञाताचा वेध घेण्यासाठी मनाचा प्रवास सुरू होतो. कधीकधी विश्व व्यापून टाकणारा हा प्रवास मानसिक दमछाक करणारा असतो.

कुतूहल जागृत असणे ही नवनिर्मितीसाठी आवश्यक अशी बाब आहे. लहान मुलांमध्ये कुतूहल खूप मोठ्या प्रमाणावर असते. लहान मुलाला प्रत्येक गोष्ट करून पाहवयाची असते. त्यातून आलेल्या अनुभवांतून ते शिकत असते. विद्यार्थीदशेत हे कुतूहल अधिक प्रमाणात असते. साधारणपणे 12 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये हे कुतूहल अगदी शिखरावर असते असे म्हटले तरी वावगे ठरू नये. वयोानानुसार हे कुतूहल कमी होत जाते.

विद्यार्थीदशेत जागृत असलेल्या या कुतूहलाची जोपासना तर सोडाच, परंतु त्याला दडपून टाकण्याची वृत्ती सर्वत्रच आढळते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी या वृत्तीचा पुरेपूर अनुभव घेतला होता. त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीमुळे त्यांना शालेय जीवनात कटु अनुभवांना सामोरे जावे लागले. ही कटुता त्यांच्या मनात शेवटपर्यंत घर करून राहिली. त्यांनी म्हटले आहे की, कुतूहल हे लाजाळूच्या झाडाप्रमाणे असते. थोड्याशाही आघाताने ते कोमेजते. त्यामुळे कुतूहलाची जोपासना हळुवारपणे करावयाला हवी.

अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा काही प्रमाणात दिली जात असली, तरी ती पुरेशी आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मात्र ज्यांना संशोधन करायचे असेल त्यांना कुतूहल जागृत ठेवणे गरजेचे असते. विज्ञान संशोधनाची सुरुवात कुतूहलापासून होते, परंतु कुतूहल जागृत झाले की लगेचच शमले तर त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. पाण्यावर वाऱ्यामुळे जसे तरंग निर्माण होतात आणि क्षणार्धात नाश पावतात, त्याप्रमाणे ही स्थिती होते. अशा प्रकारे कुतूहल टिकले नाही तर जिज्ञासा निर्माण होत नाही. जिज्ञासा ही अधिक काळ टिकणारी भावना आहे. जिज्ञासा जागृत झाली तर मनात निर्माण झालेले कुतूहल शमविण्यासाठी व्यक्ती मनात निर्माण झालेल्या प्रश्नावर अधिक सखोलपणे विचार करू लागते.

कुतूहल आणि जिज्ञासा यांना अधिक सुयोग्य बनविण्यासाठी निरीक्षणाचा आधार घ्यावा लागतो. निरीक्षणाचा अर्थ केवळ पाहणे असा अभिप्रेत नाही, तर पाहण्याच्या क्रियेतून ज्या गोष्टीबद्दल कुतूहल निर्माण झाले, त्याबद्दल अधिक माहिती मिळविणे हा त्यामागे हेतू असतो. या माहितीच्या आधारे संबंधित घटनेचे विश्लेषण करता येते. निष्कर्ष काढण्यासाठी अशा विश्लेषणाची आवश्यकता असते. निरीक्षण आणि पाहणे यातील फरक जाणून घ्यायला हवा.

सुंदर फुलझाडे असलेल्या बागेतून फिरत असताना अनेक फुलझाडे आपण पाहत असतो. मात्र ज्या वेळी एखाद्या विशिष्ट फुलझाडाजवळ थांबून त्या फुलझाडाचा प्रकार, उंची, फुलांचा रंग, गंध आणि रचना याबद्दल विशेषत्वाने जाणून घेतो, त्याला निरीक्षण म्हणता येईल. या निरीक्षणावरून काही निष्कर्ष काढण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे विश्लेषण करावे लागेल. विशिष्ट जातीच्या फुलझाडाला विशिष्ट रंगांचीच फुले येतात, हा निष्कर्ष काढण्यासाठी त्याच प्रकारच्या अनेक झाडांचे निरीक्षण करावे लागेल. अशा अनेक निरीक्षणानंतर निष्कर्ष तोच राहिला तर तो स्वीकारण्याला योग्य आहे असे समजावे. परंतु प्रत्येक वेळी केवळ निरीक्षणावरून निष्कर्ष काढता येणे शक्य होत नाही. अशा वेळी केवळ अनुमानावरच समाधान मानावे लागते. विज्ञानामध्ये त्यासाठी अधिक सबळ मार्ग अवलंबिता जातो, त्याला प्रयोग असे म्हणतात. विज्ञानाच्या अभ्यासात प्रयोगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Tags: जिज्ञासा मेंदू पंडित विद्यासागर विज्ञान विज्ञानबोध brain vidnyanbodh dr. Pandit vidyasagar science weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके