डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी त्यांची माध्यमांदारे आणि दैनंदिन जीवनातील वापरामुळे जवळीक वाढलेली असते. त्याविषयी जाणून घेण्याचे कुतूहल त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले असते. अशावेळी त्यांना समजेल आणि रुचेल अशा प्रकारे विज्ञानविषय त्यांच्यापुढे मांडला तर त्यांच्या कुतूहलाचे रूपांतर जिज्ञासेत होऊ शकते. ह्या जिज्ञासेये जाणीवेत रूपांतर झाले, तरच समाजाची विज्ञानविषयक प्रगल्भता वाढीस लागेल; ही आजची गरज आहे.

काही दिवसांपूर्वी मराठी विज्ञान परिषदेतर्फे व्याख्यान देण्यासाठी एका माध्यमिक विद्यालयात जाण्याचा योग आला. स्थानिक कार्यकर्त्यांनी अगोदर संपर्क साधून आणि पोहोचण्यापूर्वी दूरध्वनीवरून संपर्क साधूनही तिये पोहोचल्यानंतर व्याख्यानाची तयारी सुरू झाली. ध्वनिवर्धकाची व्यवस्था आहे असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष व्याख्यानाच्या ठिकाणी त्याचा पत्ताच नव्हता. मुख्याध्यापकांनी 'कार्यक्रमाला सुरुवात करा, तोपर्यंत व्यवस्था करतो. असे सांगितले. स्थानिक संयोजकांनी आपले म्हणणे लावून धरल्यानंतर ध्वनिवर्धकाला लागणारा ऑम्लिफायरच चोरीस गेल्याचे सांगितले. त्यामुळे कार्यक्रम सुरू करण्यावाचून गत्यंतर नव्हते. समोर दोनशे मुला-मुलींचा समुदाय बसलेला. त्यात 'एका तासानंतर मधली सुट्टी होणार आहे, त्याआधी भाषण आटोपलेले बरे,' असा हळूच सल्ला देण्यात आला. विद्यार्थ्यांनी गडबड करू नये यासाठी शिक्षक मोक्याच्या जागा धरून उभे राहिले. भाषण सुरू झाले, शक्यतो मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला. शेवटपर्यंत ऐकू जाईना, त्यामुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये उभे राहून भाषण सुरू केले. सर्वजण भाषणात रंगून गेले. विद्यार्थी एवढे समरस झाले की मधल्या सुट्टीची घंटा होऊनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे भाषणानंतर अनेक प्रश्न विचारले. मुख्याध्यापकांना विद्याथ्यांची  जणू नव्यानेच ओळख झाली. त्यांनी तसे बोलूनही दाखवले. भाषण आणि तेही विज्ञान विषयावरचे. त्यात विद्यापीठामध्ये संशोधन करणाऱ्या प्राध्यापकाचे; म्हणजे विद्यार्थ्यांना शांत बसविण्यातच आपला वेळ जाणार अशीच त्यांची धारणा होती. विज्ञान विषयावर व्याख्यान देण्यासाठी गेल्यानंतर व्याख्यानापूर्वी सर्वसाधारणपणे अशीच परिस्थिती असते. विज्ञान सोप्या, सरळ आणि सर्वांना समजेल अशा रितीने सांगितले जात नसावे, हे त्यामागचे कारण असल्याची शक्यता आहे; परंतु प्रयत्नपूर्वक ही गोष्ट साध्य करता येणे शक्य असूनही अनेक संशोधक, प्राध्यापक आणि विज्ञान विषयावर भाषण देणारे वक्ते तसे करीत नाहीत. त्यांतील बरेचजण भाषेची अडचण पुढे करतात. मराठीत प्रतिशब्द शोधणे त्यांना अवघड जाते. परंतु अशी तक्रार करणारे इंग्रजीतून सर्वांना समजेल असे भाषण देऊ शकतील, अशीही परिस्थिती नसते; किंबहुना कित्येक वेळा न समजणान्या मराठी शब्दाऐवजी समजणारा इंग्रजी शब्द वापरणेच योग्य ठरते. मी लेक्चरर असताना पुणे विद्यापीठात अधिव्याख्याता अशी ओळख करून दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीने मला 'आता कुठे असता?' असा प्रश्न विचारला होता. त्यामुळे विज्ञानविषय समजावून देताना भाषेचे फार अवडंबर माजविण्याची गरज नाही, याची मनोमन खात्री पटली.

पुणे विद्यापीठातील प्राध्यापक दामले इंग्रजी बोलताना व्याकरणाच्या चुका करीत; मात्र त्यांचे भौतिकशास्त्राचे आकलन खूपच चांगले असल्याने त्यांच्याकडून विषय समजून घेताना खूपच आनंद होत असे. प्रोफेसर ओबेद सिद्दीकी खूपच सुंदर व्याख्यान देतात. व्याख्यान देताना त्यांची त्यात असणारी तादात्म्यता दाद देण्यासारखी असते. डॉ.जॉन निकोल्स हे संशोधक इतकी सुंदर व्याख्याने देतात की, दोन-अडीच तासानंतरही त्यांचे व्याख्यान संपूच नये असे वाटते. विषय सोपा करून कसा सांगावा हे त्यांच्याकडून शिकावे. त्यांनी चेतासंस्थेविषयी लिहिलेल्या पुस्तकातही ही सहजता उतरवली आहे. विज्ञानविषय सामान्य लोकांना समजून देताना ते कशा पद्धतीने विचार करतात हे समजून घेणे जरूरीचे असते, हा धडा मी एका विज्ञान चाहत्याकडून शिकलो. गुरुत्वमध्य हा स्यैर्यासाठी कसा महत्त्वपूर्ण असतो हे समजावून सांगण्यासाठी एक चौकोनी सांगाड्याचा वापर आम्ही करीत असू. ह्या सांगाड्याच्या मध्यभागी एक लंबक टांगलेला असे. हा सांगाडा हव्या त्या प्रमाणात वाकवता येत असे. सांगाडा वाकवताना लंबक त्याच्या पायाच्या बाहेर गेला तर सांगाडा कोलमडत असे. त्यामुळे सांगाडा स्थिर राहण्यासाठी लंब हा पायामध्ये राहणे आवश्यक आहे हे सांगण्याचा आणि त्यावरून अधिक उंचीपर्यंत माल भरलेली बैलगाडी कोलमडण्याची कशी शक्यता असते हे समजावून सांगता येत असे.

हे सर्व समजावून सांगितल्यानंतर कोलमडण्याचा आणि गुरुत्वमध्याचा काहीच संबंध नाही, असा प्रतिवाद त्या विज्ञान जिज्ञासूने केला. मग सांगाडा का पडतो, असे विचारल्यावर त्याचा तोल जातो म्हणून तो पडतो,' असे उत्तर मिळाले. त्याच्या ह्या उत्तरामुळे मीही क्षणभर बुचकळ्यात पडलो. मात्र प्रसंगावधान दाखवून मी त्याला 'तोल जातो म्हणजे काय होते ?' असा प्रतिप्रश्न विचारला, त्यावर तो निरुत्तर झाला. त्यानंतर त्याला तोल जातो म्हणजे काय होते, हेच आम्ही समजावून सांगतो आहोत हे सांगितल्यावर त्याचे समाधान झाले.

विज्ञान विषयावर सर्वसामान्य लोकांना व्याख्यान देताना विज्ञानातील तत्त्व आणि त्यांचा दैनंदिन जीवनाशी असणारा संबंध समजण्यासाठी क्लिष्ट समीकरणे समजण्याची आवश्यकता नसते, हे स्पष्ट करणे जरूरीचे आहे. त्याचप्रमाणे त्यासाठी त्यांना प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करण्याचीही गरज नाही. त्यांचा रोजच्या व्यवहारात ज्या तंत्रज्ञानाशी संबंध येतो, त्यातून त्यांना विज्ञानाची ओळख सहजपणे करून घेता येणे सहज शक्य आहे. त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची होणारी वाटचाल जाणून घेण्याची आवश्यकता सर्वांनाच कशी आहे हे नीटपणे समजावून देता आले पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी त्यांची माध्यमांद्वारे आणि दैनंदिन जीवनातील वापरामुळे जवळीक वाढलेली असते. त्याविषयी जाणून घेण्याचे कुतूहल त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले असते. अशावेळी त्यांना समजेल आणि रुचेल अशा प्रकारे विज्ञानविषय त्यांच्यापुढे मांडला तर त्यांच्या कुतूहलाचे रूपांतर जिज्ञासेत होऊ शकते. ह्या जिज्ञासेचे जाणिवेत रूपांतर झाले तरच समाजाची विज्ञानविषयक प्रगल्भता बाढीस लागेल. ही आजची गरज आहे. मात्र त्यासाठी 'विज्ञान हे न कळणारे आहे.' ही धारणा नष्ट व्हायला हवी. विज्ञान प्रसारकांपुढे हे एक मोठे आव्हान आहे.

Tags: डॉ.जॉन निकोल्स प्रोफेसर ओबेद सिद्दीकी भौतिकशास्त्र पुणे विद्यापीठ डॉ. पंडित विद्यासागर न कळणारे विज्ञान! weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके