डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

त्या काळात हवा, कार्बन डाय ऑक्साईड आणि हायड्रोजन हे तीनच वायू माहीत होते. बॉयल यांनी अमोनिया, नायट्रस ऑक्साईड आणि हायड्रोजन क्लोराईड यांचा शोध लावला. असाच एक प्रयोग करत असताना त्यांनी मर्क्युरिक ऑक्साईड या पदार्थावर सूर्याची किरणे भिंगाच्या साहाय्याने एकत्रित केली. या पदार्थाच्या ज्वलनातून जो वायू बाहेर आला त्या वायूच्या सान्निध्यात मेणबत्ती अधिक जोमाने जळते हे त्यांना दिसून आले. शिवाय हा वायू पाण्यामध्ये सहजासहजी विरघळतही नव्हता. या वायूच्या सान्निध्यात उंदीर काचेच्या भांड्याखाली अधिक काळ जगू शकतो हेही त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी या हवेच्या घटकाला चांगली हवा असे नाव दिले. त्यांना हा वायू ऑक्सिजन आहे हे माहीत नव्हते.

वायूंचा सखोल अभ्यास। करुनी बहुत सायास। 
एकमेकां मिसळूनी वायूस। नवीन वायू शोधले।।
भौतिकीचा अभ्यास केला। शोधनिबंधे वर्णिला। 
संख्या भिडे दीड शतकाला। प्रीस्टले नाम असे।। 
नत्र वायूचा उपयोग। शीत पेयांसाठी प्रयोग। 
उद्योगधंद्याशी उपयोग। त्याने घडवून आणला।।
धर्मशास्त्रामाजी रस। परी साकडे विज्ञानास।
कुतूहल जागवी प्रज्ञेस। हेची यातुनी दिसतसे।। 

जोसेफ प्रीस्टले यांनी ऑक्सिजन वायूचा शोध लावला. आज या शोधाचे महत्त्व कदाचित लक्षातही येणार नाही. कारण हवेमध्ये असणाऱ्या निरनिराळ्या वायूंच्या प्रमाणाविषयी अचूक माहिती उपलब्ध आहे. 18 व्या शतकामध्ये मात्र तशी परिस्थिती नव्हती. हवा ही एकच मानली जाई, त्यामुळे हवेचे निरनिराळे घटक असतात याविषयी कोणालाच माहिती नव्हती. 

खरे तर जोसेफ प्रीस्टले यांना इतिहास, राज्यशास्त्र, साहित्य यांमध्ये रस होता. प्रीस्टले हे स्वतः चर्चमध्ये मिनिस्टर होते. त्यांना त्यामुळे विद्यापीठामध्ये शिक्षण घ्यायला बंदी होती. मात्र योगायोगाने बेंजामिन फ्रँकलिन यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांच्या भेटीमुळे विज्ञान अभ्यासाकडे कल वाढला. व्यवसायाच्या निमित्ताने पाण्यामध्ये बीअर बनविण्याच्या तंत्रज्ञानाशी त्यांचा संबंध आला. त्यांनी वाईन आणि बीअर तयार करण्याच्या कारखान्यात काम केल्यामुळे हवेविषयी प्रयोग केले. त्यातून त्यांना कार्बन डाय ऑक्साईड तयार करण्याच्या कृतीची माहिती मिळाली. हा वायू हवेपेक्षा जड आहे आणि त्याच्यामुळे मेणबत्ती विझते याचा त्यांनी शोध लावला. त्यांनी तो पाण्यात विरघळवल्यानंतर पाण्याला आनंददायी चव येते याचा शोध लावला. त्यातून सोडा वॉटर हे पेय तयार झाले. 

त्या काळात हवा, कार्बन डाय ऑक्साईड आणि हायड्रोजन हे तीनच वायू माहीत होते. बॉयल यांनी अमोनिया, नायट्रस ऑक्साईड आणि हायड्रोजन क्लोराईड यांचा शोध लावला. असाच एक प्रयोग करत असताना त्यांनी मर्क्युरिक ऑक्साईड या पदार्थावर सूर्याची किरणे भिंगाच्या साहाय्याने एकत्रित केली. या पदार्थाच्या ज्वलनातून जो वायू बाहेर आला त्या वायूच्या सान्निध्यात मेणबत्ती अधिक जोमाने जळते हे त्यांना दिसून आले. शिवाय हा वायू पाण्यामध्ये सहजासहजी विरघळतही नव्हता. या वायूच्या सान्निध्यात उंदीर काचेच्या भांड्याखाली अधिक काळ जगू शकतो हेही त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी या हवेच्या घटकाला चांगली हवा असे नाव दिले. त्यांना हा वायू ऑक्सिजन आहे हे माहीत नव्हते.

त्यांनी आपल्या प्रयोगाची माहिती लेव्हायझेअर या शास्त्रज्ञाला दिली. लेव्हायझेअर यांनी या माहितीचा उपयोग करून प्रयोग केले. त्यांनी या वायूचा ज्वलनाशी असणारा संबंध योग्यरीत्या प्रस्थापित केला. असे असले तरी ऑक्सिजनच्या शोधाचे श्रेय जोसेफ प्रीस्टले यांनाच देणे योग्य ठरते. जोसेफ प्रीस्टले स्वतंत्रपणे विचार करणारे आणि तो स्पष्टपणे मांडणारे होते. ख्रिचन धर्मग्रंथांमध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता. त्याप्रमाणे त्या काळी प्रचलित असलेल्या अनेक समजांबाबतही त्यांचे आक्षेप होते. परंतु त्यामुळेच त्यांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले. 

विज्ञानविषयक संशोधनावर विचारविनिमय करण्यासाठी त्यांनी एक गट स्थापन केला होता. बेंजामिन फ्रँकलिन यांसारखा प्रसिद्ध शास्त्रज्ञ त्या गटात सहभागी असूनही कडव्या विचारसरणीच्या लोकांचा त्यांना प्रचंड विरोध. ते ज्या ज्या जागी आपली सभा भरवत असत, त्या ठिकाणी लोकांनी हल्ला करून जाळून टाकले. त्यामुळे त्यांना बर्मिंगहॅम सोडून लंडनला जावे लागले. तिथेही त्यांचा निभाव न लागल्याने शेवटी ते अमेरिकेला रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांनी आपले संशोधन कार्य, लिखाण शेवटपर्यंत सुरू ठेवले. शेवटचे हस्तलिखित तपासल्यानंतर त्यांनी सर्वांबरोबर मिळून प्रार्थना केली आणि त्यानंतर अर्ध्या तासातच त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. 

Tags: मर्क्युरिक ऑक्साईड लेव्हायझेअर बेंजामिन फ्रँकलिन ऑक्सिजन वायू जोसेफ प्रीस्टले mercuric oxide Lavoisier Benjamin Franklin Oxygen gas Joseph Priestley Joseph Priestley weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

प्रतिक्रिया द्या

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके