डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

अक्षरं मागणारा अक्षर ‘पिस्तुल्या!’

‘पिस्तुल्या’ पाहताना जाणवते ती त्याची बांधीव, नेमकी पटकथा. कवितेकडून फिल्मकडे वळलेल्या नागराजने या नव्या माध्यमाची भाषा नेमकी जोखली आहे. शब्दांतून बोलण्याऐवजी चित्रातून तो प्रभावीपणे बोलताना दिसतो.

गावातल्या तापलेल्या रस्त्यावरून पाटा, वरवंटा विकत फिरणारी असहाय वडार बाई आणि घरात कर्कश्शपणे फिरणारा मिक्सर, चोऱ्यामाऱ्या करत शाळेच्या काटेरी कुंपणाजवळ थबकलेला अगतिक पिस्तुल्या आणि ‘जितनी भी दे भली जिंदगी दे’ हे शाळेतील प्रार्थनेचे स्वर, अशा छोट्या छोट्या फ्रेममधून नागराज पडद्यावर कविता लिहीत जातो.

19 मे 2011. मी माझ्या कार्यालयात कसल्याशा कामात व्यस्त असताना माझा मोबाईल गाऊ लागला. नागराज बोलत होता, ‘‘डॉक्टर, ‘पिस्तुल्या’ला नॅशनल ॲवॉर्ड मिळालं!’’

मी आश्चर्याने, आनंदाने अवाक्‌!

‘‘म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार?’’ मी खुळ्यासारखा प्रश्न केला.

 नागराजचे अभिनंदन करताना माझे ओठ आनंदाने थरथरत होते. नंतर पूजा डोळसचा फोन. ती तर फोनवर नाचत होती. टेबलावरील फाइलिंगचा गठ्ठा मला दिसेनासा झाला. मनासमोर एक फ्लॅशबॅक तरळू लागला.

 साधारण 2004-05 ची गोष्ट असावी. मी त्या वेळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे कुटिर रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत होतो. भाग तसा दुष्काळी पण परिसरात साहित्य-संस्कृतीच्या छोट्यामोठ्या कार्यक्रमांची रेलचेल असे. साहित्याची आवड असल्याने माझ्या वैद्यकीय सेवेच्या धबडग्यातून सवड काढून मी अशा अनेक कार्यक्रमांत सहभागी होत असे.

 प्रा.राजेंद्र दास, संजय चौधरी, बाबूराव हिरडे, भीष्माचार्य चांदणे, महेंद्र कदम, प्रदीप मोहिते अशा अनेक साहित्यरसिकांचे आमचे छान वर्तुळ तयार झाले. कुर्डुवाडीचे माझे सर्जन मित्र डॉ.दिनेश कदम दर वर्षी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट वाङ्‌य पुरस्कार देतात. हा कदम गुरुजी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम म्हणजे आम्हां साहित्य रसिकांकरिता पर्वणीच!

पुरस्कारप्राप्त लेखक-कवींना ऐकायला मिळे आणि त्यानंतर रात्री निमंत्रित आणि नवोदित कवींचे कविसंमेलन! अगदी मध्यरात्रीनंतरही कवितांच्या मस्त फैरी झडत असत. त्या वर्षीच्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र दास करत होते.

 माझ्या काव्यवाचनाच्या आगेमागे दास सरांनी एका कवीचे नाव पुकारले, ‘नागराज मंजुळे’ आणि श्रोत्यांधून एकच कल्लोळ झाला, ‘एका पावसाची गोष्ट...!’

एक शिडशिडीत बांध्याचा, उंचापुरा, नाकेला, सावळा तरुण मैफिलीच्या मध्यभागी येऊन आपली कविता सादर करू लागला- ‘पावसालाही आवडावी

इतकी ती सुंदर होती

म्हणूनच की काय

 वेळीअवेळी रस्त्यानं येता जाता

पाऊस तिची वाट अडवायचा

पावसाला चुकवून

 ती घर गाठायची

पाऊस मागं मागं जाऊन

 तिच्या घराच्या खिडकीसमोर कोसळत राहायचा

 तासन्‌ तास...!’

एका नादावणाऱ्या लयीत त्याची ‘पावसाची गोष्ट’ बरसू लागली आणि थांबली तेव्हा आषाढमेघांच्या गडगडाटालाही लाजवेल, असा टाळ्यांचा कडकडाट झाला. मध्यरात्र उलटून गेली होती आणि पूर्वेकडे लाली पसरू लागली होती. एका विलक्षण क्षणी नागराज आणि त्याचे  शब्द मला भेटले होते.

त्या दिवशी पावसाने चिंब केलेल्या नागराजच्या मैफिलीत वाफाळलेला चहा पिता पिता दास सरांनी मला नागराजची पार्श्वभूमी सांगितली. वडार समाजात दगड फोडणाऱ्या आई-बापाच्या पोटी जन्माला आलेल्या या पोराच्या जगण्याची चित्तरकथा ‘उचल्या’, ‘उपरा’, ‘बलुतं’चा पुढचा अध्याय आहे, हे माझ्या लक्षात आले.

जगतात अनेक, भोगतात अनेक पण किती जणांना त्या जगण्याचा सारांश नेमकेपणाने सांगता येतो, मांडता येतो? नागराजला ते कसब गवसले आहे. तो त्याच्या शब्दांतून जगण्याचा स्फटिकस्वच्छ तळ आपल्यासमोर मांडत जातो.

या पहिल्या भेटीनंतर नागराज आणि मी अनेकदा भेटलो, कधी ठरवून, कधी अचानक! त्याच्या नव्या नव्या कविता ऐकत गेलो आणि तो सांगत असलेला जगण्याचा सारांश मनाच्या कुपीत साठवीत गेलो, त्याच्या प्रवाहाबाहेरील शब्दकळेने वेडावत गेलो.

पण मग पुढील 3-4 वर्षे मी जागतिक आरोग्य संघटनेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात असा भटकत राहिलो आणि नागराजचा प्रत्यक्ष संपर्क कमी झाला. अधूनमधून एखादा फोन, तेवढाच काय तो संपर्क!

 मग अचानक एके दिवशी 2009 मध्ये तो पुणे विद्यापीठात भेटला, गार्गीसोबत!

खूप उत्साहाने बोलत होता, ‘‘सर, मी एक शॉर्ट फिल्म तयार केलीय ‘पिस्तुल्या’ नावाची!’’

 कविता ते शॉर्ट फिल्म...?

मी एकदम गांगरलोच.

पण मग सारा खुलासा झाला. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. एम.ए. (मराठी) नंतर नागराज विद्यापीठात एम.फिल. करत होता, पण ‘कशाला झाली पुस्तकाची ओळख?’ ही त्याचीही अवस्था झाली होती. संवेदनेच्या इंगळ्या जागोजागी डसत होत्या. मन प्रचंड ‘डिप्रेशन’च्या ओझ्याखाली बधीर झाले होते, तशात नानांचे म्हणजे नागराजच्या वडिलांचे निधन झाले.

पाय जगण्याचा कडेलोट करू पाहत होते. ‘मला मिळाला नाही, माझ्या धसकटलेल्या जगण्याला पर्याय’, अशी मनाची गत.

 पण मग अशा वेळी त्याला मिथुन चौधरी भेटला. मिथुनमुळे नागराजने नगरच्या कॉलेजात ‘मास कम्युनिकेशन’ला प्रवेश घेतला. तिथे मिथुनच त्याचा प्राध्यापक. या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला एक लघुपट, माहितीपट तयार करावा लागतो. म्हटले तर ते एक होमवर्क होते, पण नागराजला नवे माध्यम गवसले होते, कदाचित शब्दांहूनही प्रभावी!

जेऊर-करमाळ्यात लहानाचा मोठा होताना, दगडी व्यवस्थेखाली अडकलेला हात मोठ्या कष्टाने काढून घेताना, स्वत:च्या, आजूबाजूच्या जगण्यात वेदनेच्या किती गाथा त्याने पाहिल्या होत्या, अनुभवल्या होत्या. हे सारे मूक हुंदके एका नव्या भाषेत मांडायला तो तयार झाला आणि त्यातूनच जन्म झाला ‘पिस्तुल्या’चा! नागराजकरता ‘पिस्तुल्या’ अभ्यासक्रमातील अनिवार्य प्रकल्प नव्हता, ती त्याच्या जगण्याची चित्तरकथा होती, हृदयात खोल खोल जपून ठेवलेली. किती युगांपासून त्याला ती सांगायची होती.

‘पिस्तुल्या’ वडार समाजातील 8-10 वर्षांच्या एका लहानग्याची हृदयस्पर्शी कहाणी आहे. वडील दगडखाणीच्या अपघातात गेलेले, आई पाटे-वरवंटे विकून, भीक मागून गुजराण करते आहे. लाली त्याची छोटी बहीण. पिस्तुल्याला काहीबाही लिवलेला प्रत्येक कागद खुणावतो आहे, पाटी पेन्सिल मनात रुंजी घालते आहे. पण व्यवस्थेच्या निर्दय वरवंट्याखाली जगणाऱ्या ‘पिस्तुल्या’साठी शिक्षण हेसुद्धा आभाळीचा चंद्र मागण्याइतके दुष्प्राप्य आहे.

 हृदयात कालवाकालव करणाऱ्या नजरेने तो शाळेच्या काटेरी कुंपणाबाहेर उभा राहून शाळेकडे पाहत राहतो. म्हटले तर ही एका शाळाबाह्य मुलाची कहाणी आहे, म्हटले तर आपल्या पडझड झालेल्या गढीच्या आजही मजबूत असलेल्या राक्षसी अवशेषांची कहाणी आहे.

 अवघी 15 मिनिटे आणि 11 सेकंदांची ही शॉर्ट फिल्म तयार झाली आणि देशभरातील, कानाकोपऱ्यातील जाणत्यांना ती विलक्षण भावली. 15 मिनिटांच्या या फिल्मला आजवर 14 महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. आरोही फिल्म फेस्टिवल, हैद्राबाद आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल अशा नामांकित फिल्म फेस्टिवल्समध्ये या शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट लघुपटाचे, अभिनयाचे पुरस्कार मिळाले.

आपल्याकडील अत्यंत प्रतिष्ठेचा म्हटला जाणारा ‘म.टा.सन्मान’ या लघुपटाला मिळाला. हैद्राबाद, कलकत्ता, मुंबई येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी या लघुपटाची निवड झाली. नाशिक येथील चित्रपट महोत्सवात ‘जोगवा’, ‘पांगिरा’च्या राजीव पाटलांनी नागराजची पाठ थोपटली. आणि आता राष्ट्रीय पुरस्काराने ‘पिस्तुल्या’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

‘पदार्पणातील सर्वोत्कृष्ट लघुपट’ हा राष्टीय सन्मान ‘पिस्तुल्या’च्या निर्मिती व दिग्दर्शनासाठी मिळाला आहे तर या निवड मंडळाने ‘पिस्तुल्या’ची भूमिका केलेल्या सूरज पवारच्या अभिनयाचा विशेष उल्लेख केला आहे. गेल्या वर्षी मुंबईत नागराजच्या लॅपटॉपवर ही फिल्म मी प्रथम पाहिली आणि त्यानंतर ती मी अनेक वेळा पाहिली आहे आणि प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत.

 असे काय आहे या पंधरा मिनिटांच्या शॉर्ट फिल्ममध्ये?

एक कृश, काळेली बाई डोक्यावर दगडी पाटा घेऊन झपझप चालते आहे आणि तिच्या मागोमाग तिचा 9-10 वर्षांचा पोर विजेच्या जाडजूड वायरमधील तारेची तयार केलेली तथाकथित गाडी खेळत, चालवत, मध्येच हॉर्नचा आवाज तोंडाने काढत रमतगमत येतो आहे. मध्येच त्याला रस्त्यात काहीबाही लिहिलेला कागद सापडतो आणि सारे काही विसरून तो त्या कागदात हरवून जातो. जणू कागदावर लिहिलेल्या अक्षरांचे गूढ उकलण्याचा तो लहानगा जीव प्रत्यत्न करू लागतो.

 तेवढ्यात त्याच्या आईचा आवाज त्याच्या कानावर पडतो, ‘‘पिस्तुल्याऽऽ, फदा लग्गा ना!’’ (पिस्तुल्या, चल लवकर) आणि मग मायलेकरांची दुक्कल वेशीतून गावात शिरते.

‘पिस्तुल्या’चे हे पहिले दृश्य अगदी साधे पण खूप काही बोलणारे, सांगणारे! पिस्तुल्या वडार समाजातील एक मुलगा, आपल्या आईपाठोपाठ तारेची गाडी खेळत खेळत भर उन्हात त्या गावातील अरुंद रस्त्यावरून फिरतो आहे.

‘पाटा वरवंटा घ्या’, म्हणून त्याची आई लक्षाक्का ओरडते आहे, पण ज्या  वरवंट्याखाली तिचे, तिच्या लेकरांचे जिणे चिरडले जात आहे तो कुणाला दिसणार? मिक्सर ग्राइंडरच्या जमान्यात तिच्या पाट्यावरवरवंट्याला कोण विचारणार?

दमलेली, घामेजलेली लक्षाक्का एका घरासमोर झाडाच्या कट्‌ट्यावर थोडी विसावते आणि पाटा वरवंटा तेथेच ठेवून दारोदार कोर-दोन कोर भाकरी आणि कोरड्यास (भाजी) मागू लागते. पण ती तरी कोण देणार? मग ती एका घरासमोर खेळणाऱ्या मुलाला ‘पिस्तुल्या’ची तारेची गाडी आमिष म्हणून देऊन टाकते आणि त्या बदल्यात भाकरी मिळवते.

भाकरी पदरात पडते खरी, पण त्या बदल्यात आपली तारेची गाडी आणि त्या तारेला अडकवलेली ‘लिवलेली’ पाने फाटताना पाहून ‘पिस्तुल्या’ स्तब्ध उभा राहतो. पण त्याचे डोळे खूप काही सांगून जातात. असा हा पिस्तुल्या, पाटी-पेन्सिलीचे वेड घेतलेला. शाळेत जाऊन खूप शिकायचं, मोठं व्हायचं हा त्याचा ध्यास आहे. हा ध्यास कदाचित दगडखाणीत पडून मेलेल्या त्याच्या बापाने त्याच्यामध्ये पेरला आहे.

‘रे रस्ते करणाऱ्यांनो,

रे ओझी वाहणाऱ्यांनो

रे पिचत झिजणाऱ्यांनो

रे जोखड घेणाऱ्यांनो,

ग म भ न शिका

आणखी उचला पेन्सिल पाटी

शिका अक्षरे कशी करावी, शस्त्रे लढण्यासाठी!’

 व्यवस्थेचे जोखड वाहता वाहता मरून गेलेल्या पिस्तुल्याच्या बापाला कदाचित अक्षरांची ही ताकद आतूनच उमजली असावी, पण विधवा आई, गावाबाहेर पालात राहणारी. पदरात दोन पोरं पिस्तुल्या न्‌ लाली. शिक्षणासाठीचा सामान्य वाटणारा खर्च करायचीही तिची ऐपत नाही.

शाळेतल्या गुरुजीला पिस्तुल्याची ही तहान उमगत नाही. तो पिस्तुल्याला ‘पाटी-पुस्तकं हवीत, गणवेश हवा’, याची सक्ती करत राहतो. इकडे पालावर शिक्षणाचे वातावरण नाही. ‘शाळा शिकाया तू काय वाण्या-बामणाच्या पोटचा हायेस का?’ ही साऱ्यांची प्रतिक्रिया.

पोट जाळण्यासाठी भुरट्या चोऱ्या करणे, हाच या वंचित समाजाचा धंदा होऊन बसलेला आणि म्हणूनच फौजदार, त्याचे चमकते पिस्तुल, कोर्टातला फाड्‌फाड फौजदार, त्याचं चमकतं पिस्तुल, याबद्दल आदरयुक्त दहशत म्हणूनच पोरांची नावंदेखील ‘फौजदाऱ्या’, ‘पिस्तुल्या’, ‘वकिल्या’ अशी!

अज्ञान पाचवीला पुजलेले! इतके की साधी अंकओळखदेखील नाही. हॉटेलमध्ये पाणी भरणारी लक्षाक्का पाण्याच्या किती खेपा झाल्या, हे मोजणार कशी? तर पदरात इवले इवले खडे बांधून! ते खडे हॉटेल मालकाच्या काऊंटरवर पसरून घामेजल्या, दीनवाण्या नजरेने ‘लय खेपा झाल्या’, म्हणणारी लक्षाक्का अखेरीस मालक देईल तेवढे पैसे घेऊन गप्प बसते. कारण पुढला हिशेब कोण करणार?

अशा वातावरणात पिस्तुल्याला शाळेत घालण्यापेक्षा त्याला आपला चोरीचा धंदा शिकवणं फायद्याचं आहे, हे तिला नात्यातील वडीलधारी मंडळी शिकवतात आणि कधी पोलिसांची, कधी या वडीलधाऱ्यांची जीवघेणी मारहाण सहन करत पिस्तुल्या छोट्यामोठ्या चोऱ्या करू लागतो.

पण पिस्तुल्याची मनातील शाळेची ओढ कायम आहे. शाळेच्या कुंपणाबाहेर तो येता-जाता रेंगाळतो, देखण्या गणवेशातील पोरांकडे कुंपणापलीकडून आशाळभूत नजरेने पाहत राहतो, एखाद्या भुकेल्या जिवाने पंचपक्वाने झोडणाऱ्या पंक्तीकडे पाहावे तसे. कधी मातीवर खड्यांनी तो आपले आणि बहिणीचे नाव लिहितो आणि कौतुकाने आपल्या लहानग्या बहिणीला दाखवतो.

 पण आता हे सारेच एखाद्या स्वप्नासारखे आहे. भांडी-कुंडी, कोंबड्या, प्रवाशांची पाकिटे, इतर चीजवस्तू चोरणे, हेच त्याचे वास्तव आहे. लाटांसोबत वाहणाऱ्या ओंडक्यासारखी शाळा दूर दूर चालली आहे आणि मग एके दिवशी त्याच्या मनात काय संचारते कोण जाणे! तो एका कापडाच्या दुकानात चोरी करतो आणि दुकानदार, इतर गिऱ्हाईके, रस्त्यावरले बघे यांना न जुमानता सुसाट धावत सुटतो. धावतो, धावतो... आणि पेठेच्या थोडे बाहेर आल्यावर, गर्दी कमी झाल्यावर, धावून धावून दमलेले त्याचे पाय घसरतात आणि तो धुळीत पडतो.

पिस्तुल्या हलकेच उठतो आणि जमिनीवर पडलेली वस्तू उचलतो. ती वस्तू आपल्याला दिसते आणि आपले काळीज लखकन्‌ हलते. सहा-सात वर्षांच्या मुलीचा तो नवा कोरा गणवेश असतो.

‘मी नाही, पण निदान माझी लाली तरी शिकली पाहिजे’, पिस्तुल्या काहीही न बोलताही हे सारे आपल्या कानापर्यंत पोहोचते. पिस्तुल्या हलकेच आपल्या हातांनी तो धुळीत मळलेला नवा गणवेश झटकू लागतो. पिस्तुल्या, मित्रा किती युगांची धूळ आहे रे ही! तुला एकट्याला येईल झटकता?

सैरभैर मनाला  संतोष खाटोडेचे संगीत कातर करीत जाते आणि पडद्यावर फुल्यांचे ‘विद्येविना मती गेली’ उमटू लागते आणि एक अस्वस्थ आनंद देत ‘पिस्तुल्या’ आपला निरोप घेतो, पण तो आपल्या वस्तीत आता कायमचाच आलेला असतो.

 ‘पिस्तुल्या’च्या निर्मितीची कहाणी ही उद्याच्या एका महान दिग्दर्शकाच्या जडणघडणीची कहाणी आहे आणि त्याच वेळी ती नवसर्जनाच्या ध्यासाने वेडावलेल्या तरुणाईची कहाणी आहे. तांत्रिकदृष्ट्या प्राथमिक माहिती असणाऱ्या, नवख्या, हौशी परंतु कल्पक तरुणांनी ही शॉर्ट फिल्म बनविली आहे. लेखक-दिग्दर्शक म्हणून नागराज मंजुळे या फिल्मचा सर्वेसर्वा असला तरी अनेकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष महत्त्वपूर्ण हातभार या निर्मितीला लागला आहे.

ही फिल्म अवघ्या दोन दिवसांत शूट केली आहे, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, पण झपाटलेल्या पोरांनी हे सारे घडविले आहे. मुळात ‘पिस्तुल्या’ची कथा ही शॉर्ट फिल्म प्रकारासाठी योग्य कथा नाही. अनेक पात्रे, अनेक लोकेशन्स असणारी, मोठा पट असणारी ही कथा शॉर्ट फिल्मच्या बाजात प्रस्तुत करणे अत्यंत आव्हानात्मक होते, पण नागराज आणि त्याच्या टीमने हे आव्हान स्वीकारले.

 शिक्षण घेऊ पाहणाऱ्या वडार समाजातील एका लहानग्याची कथा रुपेरी पडद्यावर मांडताना ग्रामीण समाजजीवनातील वेगवेगळी पात्रे उभी करण्यासाठी कलाकारांची निवड करणे ही सोपी गोष्ट नव्हती, पण नागराजने पूर्वी कधीच अभिनय न केलेली नॉनॲक्टर मंडळी या फिल्मसाठी निवडली. 

लघुपटातील मुख्य पात्र ‘पिस्तुल्या’ व त्याची आई लक्षाक्का यांची निवड अधिक महत्त्वाची होती. करमाळा तालुक्यातील पोफळज गावात राहणाऱ्या सूरज पवार या अनाथ पारधी मुलाची निवड नागराजने ‘पिस्तुल्या’ म्हणून केली. सूरजला पडद्यावर पाहताना, दुसरा कोणी ‘पिस्तुल्या’ असूच शकत नाही, याची आपल्याला खात्री पटते.

राष्ट्रीय पुरस्काराने सूरजच्या निवडीवर शिक्कामोर्तबच केले आहे. वैशाली केंदळे या ‘मास कम्युनिकेशन’च्या विद्यार्थिनीने ‘पिस्तुल्या’च्या आईची भूमिका साकारलेली आहे. नागराजमध्ये एक निर्दय ‘परफेक्शनिस्ट’ लपला आहे. दगड फोडायच्या काही सेकंदांच्या शॉटसाठी नागराजने वैशालीकडून वडाराच्या पालावर अर्धा-अर्धा तास दगड फोडायचा सराव करून घेतला आहे.

 या फिल्मच्या छायाचित्रणाची जबाबदारी गार्गी कुलकर्णी व कुतुबुद्दीन इनामदार यांच्याकडे होती, तर फिल्मचे संकलनही कुतुबने केले आहे. ही सारी मंडळी आयुष्यात प्रथमच कॅमेरा हाताळत होती. कुतुबचा कॅमेऱ्याचा अनुभवही लग्नातील शूटिंगपुरता मर्यादित होता, पण फिल्ममधील ‘पिस्तुल्या’ चोरी करून पळतानाचा प्रसंग या नवख्या पोरांनी ट्रॅक ट्रॉली कॅमेरा नसताना शूट केला आहे, हे ऐकून जाणती मंडळी तोंडात बोट घालतात.

बाईक चालविणाऱ्या नागराजच्या पुढ्यात बसून कुतुबने हा शॉट घेतला आहे, हे सारे करताना रस्त्यावरील खड्‌ड्याचा दणका बसून त्याचे तोंड रक्ताळलेदेखील आहे. पण कुतुब म्हणतो, त्याप्रमाणे ‘दिल से काम करने का मजाही कुछ और है!’ ना गाठीशी पैसा, ना अत्याधुनिक तंत्रज्ञान, ना अनुभव पण काही भन्नाट, बेफाम निर्माण करायच्या ऊर्मीतून नागराज, गार्गी, कुतुब, मिथुन चौधरी, प्रियांका दुबे, पूजा या साऱ्या मंडळींनी ‘पिस्तुल्या’ साकारला आहे.

 ‘पिस्तुल्या’ पाहताना जाणवते ती त्याची बांधीव, नेमकी पटकथा. कवितेकडून फिल्मकडे वळलेल्या नागराजने या नव्या माध्यमाची भाषा नेमकी जोखली आहे. शब्दांतून बोलण्याऐवजी चित्रातून तो प्रभावीपणे बोलताना दिसतो.

गावातल्या तापलेल्या रस्त्यावरून पाटा, वरवंटा विकत फिरणारी असहाय वडार बाई आणि घरात कर्कश्शपणे फिरणारा मिक्सर, चोऱ्यामाऱ्या करत शाळेच्या काटेरी कुंपणाजवळ थबकलेला अगतिक पिस्तुल्या आणि ‘जितनी भी दे भली जिंदगी दे’ हे शाळेतील प्रार्थनेचे स्वर, अशा छोट्या छोट्या फ्रेममधून नागराज पडद्यावर कविता लिहीत जातो.

संतोष खाटोडेंचे सहज सोपे वाटणारे संगीत फिल्मला अधिक आशयघन करीत जाते. कालबाह्य झालेले वंचितांचे व्यवसाय, म्हणून भीक नाही तर चोरी हे दुष्टचक्र तर ही फिल्म समर्थपणे मांडतेच, पण त्याचबरोबर ‘शंकरनाना, मला जिलबी नगं! मला पाटी-पेन्सिल घितू?’ हे या व्यवस्थेतील तमाम पिस्तुल्यांचे आर्जव प्रस्थापितांच्या बहिऱ्या कानापर्यंत पोहोचविते, हेच या शॉर्ट फिल्मच्या यशाचे इंगित आहे.

फिल्म संपते पण मातीवर दगडगोट्यांच्या साहाय्याने आपले व आपल्या बहिणीचे नाव लिहिणारा पिस्तुल्या तुमचा पाठलाग करू लागतो, काटेरी कुंपणापलीकडून शाळेकडे पाहणारी पिस्तुल्याची अगतिक नजर तुम्हाला फूटपाथवरील पोरांमध्ये दिसू लागते.

एका शॉर्ट फिल्मचे मागणे आणखी काय असते? गार्गी म्हणाली त्याप्रमाणे, ‘‘पिस्तुल्याने आम्हांला फिल्मनिर्मितीचा पहिलावहिला कोरा करकरीत अनुभव तर दिलाच, पण या फिल्मच्या ऑडिशनसाठी, लोकेशन्ससाठी, शूटिंगसाठी पालापालांवर फिरताना, वडार, पारधी समाजाचं जगणं जवळून पाहताना आमच्या मध्यमवर्गीय जाणिवांच्या, माणूसपणाच्या कक्षा अधिक रुंदावल्या. ‘पिस्तुल्या’ची भूमिका करणाऱ्या आणि प्रत्यक्षात तेच जगणं जगणाऱ्या सूरज पवारच्या शिक्षणाचा, भविष्याचा विचार आम्ही सारे मिळून करतो आहोत.’’

उद्या पोफळजच्या कुठल्या तरी वावरातल्या पालात राहणारा सूरज पवार विमानाने दिल्लीला जाईल आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक स्वीकारेल तेव्हा त्याच्या डोळ्यांत जे दिसेल तीच उद्याची पहाट असेल का?

Tags: कुतुबुद्दीन इनामदार गार्गी कुलकर्णी वैशाली केंदळे सूरज पवार नागराज मंजुळे पिस्तुल्या Qutbuddin Inamdar Gargi Kulkarni Vaishali Kendals Suraj Pawar Nagraj Manjule Pistula weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. प्रदीप आवटे
dr.pradip.awate@gmail.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात