डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

माओंच्या मृत्यूनंतर हुआ गुओफेंग व डेंग यांच्यात बंद दराआड सत्तेची रस्सीखेच सुरू असताना ही लोकशाहीची भिंत मात्र राजकीय स्वातंत्र्य, मानवी हक्क, लोकांच्या वाढत्या आकांक्षा- अशा अनेक मागण्यांनी व रंगांनी अक्षरशः फुलून येत होती. सांस्कृतिक क्रांती संपल्यानंतर व माओंच्या मृत्यूनंतर लोकांच्या कथनांना एक वेगळा बहर येत होता. वैयक्तिक अडचणी, त्या काळात झालेली ससेहोलपट, उद्‌ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या कहाण्या, राजकीय नेत्यांना जबाबदार धरणारी आरोपपत्रे, अधिक स्वातंत्र्याची व लोकशाहीची मागणी करणारी निवेदने- अशी अनेक प्रकारची कथने आणि मागण्या या लोकशाही भिंतीवर दिसू लागल्या. माओंच्या ग्रेट लीप फॉरवर्ड, सांस्कृतिक क्रांती इत्यादी जीवघेण्या कार्यक्रमांतून व जुलमी राजवटीतून बाहेर पडून चिनी समाज सजग, संवेदनशील व अभिव्यक्त होऊ लागल्याचे हे लक्षण होते. अभिव्यक्तीच्या या बहरामध्ये माओंबद्दलची नकारार्थी भावना आणि डेंग व सुधारणावादी यांच्याबद्दल चांगली भावना व्यक्त होत होती.

डेंग यांच्या अध्यक्षतेखाली चीनच्या आधुनिकी-करणासाठी असलेल्या समितीची (Forum on Principles to Guide Four Modernizations) बैठक दि.6 जुलै ते 9 सप्टेंबरदरम्यान झाली. सकाळी अधिवेशनात चर्चा, दुपारी प्रत्यक्ष काम व निर्णय असे कामकाज चाले. शेती, उद्योग, विज्ञान/तंत्रज्ञान व सैन्यदल या चार क्षेत्रांत आधुनिकीकरण कसे करावे, यासंबंधी ही बैठक होती. बाजारपेठा, विकेंद्रीकरण, किमती, परदेश व्यापार, तपशीलवार नियोजन व व्यवस्थापन/अंमलबजावणी यांचा विचार करीत आणि अडचणींतून मार्ग काढीत कामकाज चाले. शासकीय नियंत्रण जाऊ न देता परदेश व्यापार व आयातीचा खर्च कसा भागवायचा, त्यासाठी पेट्रोलियम-कोळसा कसा निर्यात करायचा, इत्यादी अनेक विषयांवर चर्चा होत असे.

1978 हे वर्ष डेंग यांच्या ध्येयधोरणांचा पाया घालणारे ठरले. या वर्षात चिनी शिष्टमंडळांनी परदेशी भेटी देऊन भविष्यकाळातील आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची मानसिक तयारी केली. डेंग यांनी विज्ञान-तंत्रज्ञान यातील संशोधनकामाला चालना देणारी पावले उचलली. उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविणारे धोरण आखून आधुनिक व बलाढ्य चीनचा पाया रचला आणि उद्योग व सैन्यदलाच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने निवडक राज्य सरकारे व सैन्यदल यांना प्रोत्साहन दिले.

क्रांती व बदल याबाबत माओ यांचे एक ऐतिहासिक महत्त्वाचे भाषण आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की, ‘प्रेअरी वा गवताळ प्रदेशात वणवा पेटण्यासाठी जशी केवळ एक ठिणगी पुरेशी असते, तव्दतच बदल होण्यासाठीही क्रांतीची एक ठिणगी पुरेशी ठरते.’ या भाषणाचा संदर्भ देऊन डेंग यांनी आर्थिक व इतर सुधारणांची ठिणगी 1977 व 1978 मध्ये कशी पाडली याचे वर्णन त्यांचे सुधारणावादी सहकारी हु याओबांग यांनी केले आहे. डेंग जिथे-जिथे जात तिथे ते पक्षाच्या स्थानिक नेत्यांना, अधिकाऱ्यांना पक्षाच्या जुन्या विचारांच्या चौकटीतून बाहेर पडून आर्थिक प्रश्नांना अधिक खुलेपणाने सामोरे जाण्यास उद्युक्त करीत. भाषणात समाजवाद हे दारिद्य्र जोपासणारे तत्त्वज्ञान नाही, तसेच समाजवादी विचारसरणीतही भांडवलशाहीची अनेक तंत्रे व मंत्र वापरून राहणीमान सुधारता येते, असे ठासून सांगत. माओंच्या विचारांच्या चौकटीत भांडवलशाहीचे तत्त्वज्ञान बसवून ते येणाऱ्या बदलाचे स्वरूप तेथील नेते व अधिकारी यांना समजावून सांगत. तीन बदके असणारा शेतकरी समाजवादी व पाच बदके असणारा शेतकरी भांडवलशाहीवादी- हे म्हणणे योग्य नाही, असेही ते म्हणत! तरुणपणी रशियात असताना त्यांनी ‘न्यू इकॉनॉमिक पॉलिसी’अंतर्गत छोटे उद्योगधंदे, कारखाने व काही औद्योगिक संस्था यांना मर्यादित प्रमाणात दिलेले स्वातंत्र्य आणि त्यासाठी असणारी मर्यादित बाजारपेठ हे सारे पाहिले होते. भांडवलशाहीतील काही तंत्र व मंत्र वापरून समाजवादी व्यवस्थेतही उत्पादकता वाढविता येते, हेही पाहिले होते. त्याचा उपयोग करून लोकांचे राहणीमान उंचावता येईल, असा त्यांचा विश्वास होता.

ही सर्व भाषणे व विचार अर्थातच माओ आणि हुआ गुओफेंग यांच्या विचारांच्या विरोधात असल्याने त्याचे प्रतिध्वनी बीजिंगमध्ये सारखे उमटत असत. डेंग यांची हुआ गुओफेंग व माओ यांच्यावर टीका करण्याची पध्दत अत्यंत संयमित, विचारपूर्वक व तपशीलवार असे. मार्क्सिझम-लेनिनिझम (Marxism-Leninism) हे एक ढोबळ फ्रेमवर्क आहे. त्यात माओ यांनी चीनमधील परिस्थितीनुसार थोडा बदल केला. हा बदल परिस्थितीसापेक्ष होता. उदा.- Marxism-Leninism मध्ये शहरांना ग्रामीण भागातून वेढले जाणे अथवा प्रथम ग्रामीण भाग व नंतर शहरी/नागरी भाग असा क्रम अपेक्षित नाही. परंतु चीनमधील तत्कालीन परिस्थितीनुसार (फार मोठा ग्रामीण भाग आणि तुलनेने कमी नागरी केंद्रे व शहरे) माओ यांनी ती स्ट्रॅटेजी वापरली. चीनशी व्यापार करण्यास वा पुरवठा करण्यास कोणी तयार नव्हते, म्हणून परदेश व्यापाराविरूध्द माओ उभे राहिले. मात्र आता तशी परिस्थिती नाही, असे डेंग सांगत.

नोव्हेंबर 1977 मध्ये डेंग यांनी ग्वानडाँग (र्ॠीरपवेपस) प्रांताचा दौरा केला व त्यादरम्यान आढावा घेऊन ग्वांगझौजवळील प्रदेशाचा आर्थिक विकास कसा करता येईल त्यावर खुली चर्चा केली; त्यानंतरच तेथील स्पेशल इकॉनॉमिक झोन (डएन) प्रकल्पास चालना मिळाली. फेब्रुवारी 1978 मध्ये सिचुआन येथे त्यांनी झाओ झियांग (नहरे नहळूरपस) यांच्याशी ग्रामीण व नागरी भागात काय सुधारणा करता येतील, त्यासंबंधीच्या सूचना स्थानिक पक्षाला व सरकारला दिल्या. त्यादरम्यान त्यानंतर ईशान्य चीनच्या दौऱ्याबाबतही त्यांनी अशाच पध्दतीने पुढे येणाऱ्या खुल्या अर्थव्यवस्थेचे सूतोवाच केले.

चीनमधील विविध भागांत व प्रांतांमध्ये अर्थव्यवस्था खुली करण्याबाबत पक्षातील व सरकारमधील नेत्यांची व अधिकाऱ्यांची मानसिक तयारी (1978 या वर्षात) करीत असताना, त्यांचा हुआ गुओफेंग यांच्याशी सत्तासंघर्ष हा बंद दराआड पक्षाच्या विविध बैठकांमध्ये निर्णायकी अवस्थेत पोहोचला होता. ‘सेंट्रल पार्टी वर्क कॉन्फरन्स’मध्ये धोरणे, कार्यक्रम व नियोजन याबद्दल तपशीलवार चर्चा होते; ती कॉन्फरन्स नोव्हेंबरमध्ये झाली. वास्तविक पाहता, ही चर्चा ‘फोर मॉडर्नायझेशन’ कार्यक्रमांतर्गतच्या शेती विभागाच्या नियोजनाची व अंमलबजावणी प्रकल्पाची होती. मात्र झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय वातावरणामुळे ही चर्चा अधिक व्यापक व राजकीय स्वरूपाची होईल, असे दिसत होते.

माओंच्या हयातीत तर अशी चर्चा करण्याचे स्वातंत्र्यच नव्हते. त्यामुळे सर्वत्र मोठा उत्साह संचारला होता. ही बैठक दोन कार्यक्रमांसाठी असली, तरी ऐन मोक्याच्या वेळी बैठकीला कलाटणी मिळाली व कामकाज वेगळ्याच दिशेने सुरू झाले. हुआ गुओफेंग यांचे प्रमुख सल्लागार मार्शल ये यांना या बदलाची चाहूल लागली होती. दि.11 व 25 नोव्हेंबरदरम्यानच्या या परिषदेतील तांत्रिक व आर्थिक स्वरूपाच्या बाबी बाजूला राहिल्या व परिषदेचा झोत राजकीय बाबींवर आला. पक्षातील, सैन्यदलातील, प्रादेशिक सरकारे व प्रादेशिक पक्ष संघटनांतील मिळून 210 प्रतिनिधी या परिषदेत उपस्थित होते. माओंच्या मृत्यूनंतर माओ व त्याच्या विचारांविरुध्द आणि त्याच्या जवळच्या, साथ देणाऱ्या नेत्यांविरुध्द वातावरण तापलेले होतेच. Two

Whatevers या लेखांवरही लोक नाराज होते.

सांस्कृतिक क्रांती व त्यापूर्वी चीनची व्यवस्था बिघडली होती, याची जबाबदारी माओ यांच्यावर टाकावी, असे म्हणणाराही एक वर्ग होता. पण माओंचे चीनच्या व्यवस्थेतील महत्त्वाचे स्थान लक्षात घेता, असे करणे कोणालाही शक्य नव्हते. माओंच्या वारसावर हा राग व्यक्त होणे वा हुआ गुओफेंग यांना टार्गेट करणे, मात्र सुरू झाले. त्यामुळे गुओफेंग व वँग डाँगझिंग (Wang Dongxing) यांच्यावरील हल्ले अधिक तीव्र होत चालले.

परिषदेतील आर्थिक व तांत्रिकविषयक चर्चेला जसजसा राजकीय रंग चढू लागला, तसतसा जुन्या बाबी व अन्याय्य प्रकरणांचा व माओंच्या जवळच्या व्यक्तींचा उल्लेख होऊ लागला; त्यात त्यांची जबाबदारी निश्चित करण्याबाबत मागणी होऊ लागली. डेंग यांचे जवळचे सहकारी हु याओबांग व वँग ली यांनी माओकालीन कम्युन्सच्या रचनेवर व त्यातील वैगुण्यावर बोट ठेवीत टीकास्त्र सोडून वातावरण तापवून टाकले. माओ यांचे सुरक्षा सल्लागार कांग शेंग यांनी माओंच्या सांगण्यावरून अनेक नेत्यांना व व्यक्तींना यमसदनास पाठविले होते. त्या प्रकरणांची मरणोत्तर चौकशी करून त्यांची निर्भर्त्सना करावी, अशीही एक मागणी होती. त्यातच अत्यंत प्रभावशाली अशा बीजिंग पार्टी समितीने 5 एप्रिलची निदर्शने मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट-माओवादी क्रांतिविचारांशी पूर्णपणे सुसंगत होती व त्याचाच एक भाग होता, असे घोषित करण्याचा ठराव दाखल केला.

हुआ गुओफेंग यांनी सपशेल माघार घेत सर्व बाबींना तत्काळ मान्यता दिली आणि पूर्वीच्या अनेक निर्णयांशी असहमती दर्शवीत असे निर्णय रद्दबातल ठरविले. कहर म्हणजे, यासंबंधीचा ठराव मंजूर झाल्याची बातमी प्रत्यक्ष ठराव मांडण्यापूर्वीच वर्तमानपत्रातून आली. झपाट्याने विरुद्ध वाहणाऱ्या राजकीय वाऱ्यांबरोबर पाठ वळवून विरोधकांशी जमवून घेण्याचा हुआ यांचा हा प्रयत्न केविलवाणा होता. बदलणाऱ्या काळाची पावले समजण्यातच ते कमी पडले. मात्र हुआ हे माओंच्या विचाराचे प्रतिनिधी व वारस आहेत, ही बाब आता स्पष्ट झाली. वँग डाँगझिंग यांनी तर स्वत:हून लेखी आत्मनिर्भर्त्सना करून घेतली. तिसऱ्या प्लेनमच्या शेवटी हुआ व वँग डाँगझिंग यांना पॉलिट ब्युरोमध्ये तात्पुरते ठेवण्यात आले. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांना पॉलिट ब्युरो व पक्षातील महत्त्वाच्या पदांवरून हटविण्यात आले.

पॉलिट ब्युरोमधील डेंग यांच्या समर्थकांत वाढ झाली. डेंग यांचे सहकारी अर्थतज्ज्ञ चेन युन आणि सुधारणावादी वँग झेन पॉलिट ब्युरोमध्ये आले. त्यामुळे डेंग यांचा सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा आला. एकंदरीतच गुओफेंग हे नामधारी अध्यक्ष राहिले. खऱ्या अर्थाने डेंग यांना सत्तेत सहभागी करून घेण्यात आले आणि ते सर्वेसर्वा झाले. शिवाय मार्शल ये यांनी सर्व सत्ता एकहाती एकवटू नये, याची काळजी घेतली. अर्थविषयक सुधारणा करणारे चेन युन यांचा दर्जा डेंग यांच्याइतकाच ठेवला होता. ही सामूहिक नेतृत्वाची पध्दत पुढे बरीच स्थिरावली.

बीजिंगमध्ये मध्यवर्ती सरकारची महत्त्वाची कार्यालये असलेल्या झौंगनहायमध्ये (Zhonganhay) तिसऱ्या महाअधिवेशनाची अशी नाट्यमय रीत्या सांगता होत असताना तिथून 500 मीटर अंतरावर असलेली लोकशाही भिंत (झिदान) अधिकाधिक सक्रिय होऊन राजकीय स्वातंत्र्याची मागणी करीत होती. चीनमध्ये परंपरेने गावागावांतून सरकार व जनता यांच्यात संपर्क ठेवण्यासाठी सार्वजनिक जागांचा वापर करण्यात येत असे. लोकांना द्यावयाच्या सूचना, मार्गदर्शन तत्त्वे इत्यादी सर्व सार्वजनिक जागेत नोटीसबोर्डावरून कळवीत असत. लोकांच्या तक्रारी व सूचनाही अशाच जागांमधून सरकारकडे जात. तिआनमेन चौकाला लागून असणारी हजारो फूट लांबीची व 12 फूट उंचीची भिंत ही पारंपरिक चिनी राज्यव्यवस्थेतील लोकांना समजून घेण्याची व समजावून देण्याची एक महत्त्वाची संस्था आहे. तिला झिदान किंवा Democracy Wall  (लोकशाहीची भिंत) असे म्हणत.

झौंगनहाय (Zhonganhay) येथे नोव्हेंबर-डिसेंबर 1978 मध्ये पार्टी वर्क कॉन्फरन्स व तिसऱ्या अधिवेशनात चिनी कम्युनिस्ट पक्ष गुंतलेला असतानाच सामान्य लोकांमध्ये वेगळीच जागृती होत होती. माओंच्या मृत्यूनंतर हुआ गुओफेंग व डेंग यांच्यात बंद दरवाजाआड सत्तेची रस्सीखेच सुरू असताना ही लोकशाहीची भिंत मात्र राजकीय स्वातंत्र्य, मानवी हक्क, लोकांच्या वाढत्या आकांक्षा- अशा अनेक मागण्यांनी व रंगांनी अक्षरशः फुलून येत होती. सांस्कृतिक क्रांती संपल्यानंतर व माओंच्या मृत्यूनंतर लोकांच्या कथनांना एक वेगळा बहर येत होता. वैयक्तिक अडचणी, त्या काळात झालेली ससेहोलपट, उद्‌ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या कहाण्या, राजकीय नेत्यांना जबाबदार धरणारी आरोपपत्रे, अधिक स्वातंत्र्याची व लोकशाहीची मागणी करणारी निवेदने- अशी अनेक प्रकारची कथने आणि मागण्या या लोकशाही भिंतीवर दिसू लागल्या.

माओंच्या ग्रेट लीप फॉरवर्ड, सांस्कृतिक क्रांती इत्यादी जीवघेण्या कार्यक्रमांतून व जुलमी राजवटीतून बाहेर पडून चिनी समाज सजग, संवेदनशील व अभिव्यक्त होऊ लागल्याचे हे लक्षण होते. अभिव्यक्तीच्या या बहरामध्ये माओंबद्दलची नकारार्थी भावना आणि डेंग व सुधारणावादी यांच्याबद्दल चांगली भावना व्यक्त होत होती. विचारवंत, बुद्धिमंत व मध्यमवर्गीयांना अधिकाधिक स्वातंत्र्य व पाश्चात्त्य पध्दतीची राजकीय लोकशाही हवी होती.

सुरुवातीला तरी लोकशाही व लोकांना अधिक स्वातंत्र्य देण्याबद्दल डेंग खुलेपणाने विचार करीत होते. त्यांच्या 1979 मधील अमेरिका दौऱ्यानंतर मात्र लोकशाही व अधिक खुलेपणा याबद्दलची सर्वसामान्य जनतेची मागणी अधिक तीव्र झाली होती. या परिस्थितीत अधिक स्वातंत्र्याची मागणी मान्य केल्यास कदाचित गोंधळ होऊन त्यातून अराजकता येऊ शकते, असे डेंग यांना वाटू लागले. सप्टेंबर 1978 पासून चीनमध्ये स्वातंत्र्याची मागणी लोकांमध्ये जोर धरू लागली होती. सप्टेंबरमध्ये युथ लीग या संस्थेच्या जर्नल/नियतकालिकांतील अनेक लेख लोकशाही भिंतीवर दिसू लागले. ही संस्था पक्षाशी संबंधित होती. पक्षातील तरुण व उदयोन्मुख नेतृत्वाचे प्रशिक्षण या संस्थेत होत असे.

सांस्कृतिक क्रांतीदरम्यान बंद पडलेल्या या मासिकातील लेख आता इतके टोकाचे होते की, ‘अधिक राजकीय स्वातंत्र्य हवे,’ या मागणीबरोबर सांस्कृतिक क्रांती व माओंचे विचार यांच्यावर टीका करणारे लेखही यायला लागले. सांस्कृतिक क्रांतीत ग्रेट लीप फॉरवर्ड इत्यादी चळवळींमध्ये चिनी जनतेवर जे अन्याय झाले, जी संकटे आली; त्यास माओंना जबाबदार का धरू नये, अशा आशयाचे लेखही ‘लोकशाही भिंती’वर दिसू लागले. लोकशाही भिंतीवर (Xidan Wall) ज्याप्रमाणे सामान्य लोकांची गर्दी असे, त्याचप्रमाणे परदेशी पत्रकार व टुरिस्टही असत. त्यांच्यामार्फत या बातम्या हाँगकाँग व इतर देशांतही जाऊ लागल्या.

अमेरिकेन पत्रकार रॉबर्ट नोव्हाक व कॅनेडियन पत्रकार जॉन फ्रेझर यांच्यामार्फत बातम्या नुसत्या बाहेरच जात नसत, तर त्या भिंतीजवळ पाश्चिमात्त्य देशात लोकशाही कसे काम करते व तेथे सर्वसामान्य माणसाच्या मानवी हक्कांचे रक्षण कसे होते, याबद्दलची माहितीही लोकांना कळत असे. पुढे-पुढे तर ‘चायना ह्युमन राईट्‌स असोशिएशन’ नावाच्या संस्थेने पुढे जाऊन लोकशाही भिंतीवर लोकशाही, स्वातंत्र्य व मानवी हक्क यांचा 19 कलमी जाहीरनामाच प्रसिध्द करून टाकला. तिआनमेन चौकातून संतप्त विद्यार्थ्यांचा एक मोठा मोर्चा झाँगनहाय येथील कार्यालयावर व त्या परिसरात राहणाऱ्या वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या निवासस्थानांवर चाल करून गेला.

त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. वे जिंगशॉ ह्या प्राणी संग्रहालयात काम करणाऱ्या तरुण नेत्याने तर चीन सरकारने त्यांच्या फोर मॉडर्नायझेशन प्रकल्पात लोकशाहीचाही अंतर्भाव करावा, अशी संकल्पना हुशारीने मांडली. याला जागतिक मीडियाने बरेच कव्हरेज देऊन चीन सरकारची पंचाईत केली. स्वातंत्र्याची मागणी इतकी तीव्र झाली की, डेंग यांना काही तरी ठोस पावले उचलणे भाग होते. या काळात बुद्धिमंतांच्या विरोधात जाणे, हे डेंग यांना परवडले नसते. तरीही त्यांनी माओ, माओंचे विचार, क्रांती, पक्ष या साऱ्यांविरुद्ध बोलण्यास बंदी घातली.

दरम्यानच्या काळात, डिसेंबर 1978 मध्ये तिसऱ्या खुल्या अधिवेशनापूर्वी स्वातंत्र्य किती असावे, प्रचार विभागाचे कार्य माओंनंतरच्या काळात कसे चालावे- विशेषत: अधिक स्वातंत्र्य व अधिक खुलपेणा असावा, या मागणीच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी एक तात्त्विक परिषद (Conference on Theoretical

principles) बोलविण्यात यावी, असे हुआ गुओंफेंग व मार्शल ये यांना वाटले. आर्थिक बाबतीतही पक्षात बऱ्यापैकी सहमती जमून येत असल्याने राजकीय स्वातंत्र्य, खुलेपणा, इत्यादी बाबतींतही काही मते अजमावून पाहावीत, असे मार्शल ये यांना वाटत होते. म्हणूनच 18 जानेवारी ते 15 मे 1979 दरम्यान पक्षाचा प्रचार विभाग व Chinese Academy of Social Sciences यांनी संयुक्तपणे ही परिषद आयोजित केली. प्रचार विभागाचे प्रमुख हु याओबांग होते.

पक्षाच्या प्रचार विभागाला 30 वर्षे पूर्ण झाली, हा योग साधून आणि यापुढे चारकलमी आधुनिकीकरणासंदर्भात प्रचार विभागाचे पुढील धोरण व दिशा काय असावी, हेही प्रयोजन होते. या परिषदेला एकूण 160 प्रतिनिधी उपस्थित होते. अनेक वरिष्ठ नेते व सैद्धांतिक तत्त्वज्ञ या परिषदेत हजर होते. Xidan भोवती हजेरी लावणारे निदर्शक व परिषदेचे सदस्य या साऱ्यांनाच अधिक स्वातंत्र्य हवे होते. या परिषदेत सुधारणावादी/उदारमतवाद्यांची सरशी होत होती; परंतु विरोधाभास असा होता की, उदारमतवाद्यांची सरशी होते म्हणावे, तर त्यांची विरोधकांवर मात करण्याची पद्धत काही विशेष उदारमतवादी नव्हती.

Two Whatevers लिहिणारा पीपल्स डेलीचा तत्कालीन संपादक वू लेंगक्सी (Wu Lengxi) याला आत्म-निर्भत्सना (self-criticism) करण्यास सांगण्यात आले व त्यांनीही त्याचे कारण देऊन आत्म-निर्भर्त्सना (self-criticism) करून घेतली. उपसंपादक वॅन रुओशुई (थरप र्ठीेीर्हीळ) याने माओंवर टीका करीत त्यांच्या पूर्ण कालखंडावर प्रश्नचिन्ह उभे केले. या परिषदेतील भाषणांची इतिवृत्ते वरिष्ठ नेत्यांनी पाहिली, तेव्हा लोकांना-तरुणांना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य हे पुढे सर्व शासनव्यवस्था, समाज व देश यांना कमकुवत करेल, त्यामुळे देशाची प्रगती होणार नाही, असे त्यांना वाटले.

चेन युन व ली झियानिन यांनाही प्रकरण हाताबाहेर जाते आहे असे वाटले. कडवे व काँझर्व्हेटिव्ह माओवादीही सावध झाले आणि डेंग व हु याओबांग यांच्यावरील टीका वाढू लागली. अमेरिकेची भेट आटोपल्यानंतर व व्हिएतनाम युद्धानंतर उसंत मिळाल्यावर 16 मार्चला डेंग यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले. हु किओमो आणि हु याओबांग यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी 30 मार्च 1979 रोजी या विषयावर भाषण दिले. त्यात त्यांनी महत्त्वाच्या चार तत्त्वांचा उल्लेख केला. समाजवादाचे तत्त्वज्ञान आणि कामगारवर्गाच्या हुकूमशाहीबाबत (dictatorship of proletariat) तडजोड नाही. कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व अबाधित राहिलेच पाहिजे आणि चौथे म्हणजे मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट तत्त्वज्ञान व माओ यांचे विचार पक्षाच्या केंद्रभागी असतील. 


या चतु:सूत्रीनुसारच सरकार व पक्षाची पुढील वाटचाल होईल, हे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय स्वातंत्र्य आणि पक्षाचे व सरकारचे नियंत्रण यामध्ये समतोल ठेवला पाहिजे; तो ठेवला नाही, तर चीनमध्ये अराजक माजेल. बुद्धिमंतांना फारसे न दुखावता डेंग यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. डेंग यांच्या दृष्टीने राजकीय स्वातंत्र्य व सुधारणा यापेक्षाही आर्थिक सुधारणा महत्त्वाच्या होत्या. स्वातंत्र्य व सरकारी नियंत्रण यातील रस्सीखेच 1989 पर्यंत सुरूच राहिली. तिआनमेन चौकातील विद्यार्थ्यांची चळवळ 1989 मध्ये दडपून टाकली, तेव्हा हा समतोल बऱ्यापैकी बिघडला.

डेंग यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना आर्थिक प्रगती हवी होती, लोकांचे राहणीमान उंचावायला हवे होते आणि त्यासाठी अर्थव्यवस्था खुली करण्याची त्यांची तयारी होती. आर्थिक प्रगतीसाठी व भांडवलशाहीचे काही तंत्र-मंत्र वापरण्यास आणि त्यासाठी काही कामचलाऊ स्वातंत्र्य देण्यास ते तयार होते. मात्र राजकीय विचारांत कम्युनिस्ट तत्त्वज्ञान व कम्युनिस्ट पक्ष यांचे वर्चस्व केंद्रभागी राहणार होते. राजकीय स्वातंत्र्य, लोकशाही याबद्दल डेंग अजिबात विचार करणार नव्हते. डेंग यांचा हा पर्याय ही एक तडजोड होती. बुद्धिमंत खूश नव्हते, मात्र त्यांना माओंपेक्षा डेंग खूपच मवाळ व स्वीकारार्ह वाटले. बुद्धिमंत मध्यमवर्गाने त्यांच्या सुधारणावादी धोरणांना पाठिंबा दिला. मात्र खासगीत ते सरकारच्या एकाधिकारशाहीचा निषेध करीत. किंबहुना या बाबतीत डेंग यांनी देशातील बुद्धिमंतांची निराशाच केली.

डेंग यांना त्याची जाणीव होती. 1978 ते 1989 पर्यंत डेंग यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारने आणि पक्षाने अनेक आर्थिक सुधारणा राबविल्या, अर्थव्यवस्था खुली करून आर्थिक विकास घडवून आणला आणि लोकांचे राहणीमान वाढू लागले. काही समूहांवर त्याचे काही विपरित परिणामही दिसू लागले. त्याबाबत मते व्यक्त करण्याचे वा निषेध करण्याचे स्वातंत्र्य मात्र नव्हते. 1989 पर्यंत चीनमध्ये स्वातंत्र्य आणि नियंत्रण यांच्या सीमारेषेवरील रस्सीखेच व तेथील तणाव जाणवत राहिला. 1989 मध्ये या तणावाने स्फोटक स्वरूप धारण केले.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके