डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

हुआ गुओफेंग यांनी पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीची खास बैठक बोलाविण्याच्या निमित्ताने जियांग शिंग आणि तिच्या चौकडीला शिताफीने अटक करून या चौकडीचा डाव उधळून टाकला खरा; मात्र हुआ हे दीर्घकालीन नेतृत्व करू शकतील, असा विश्वास इतरांना सोडाच, पण स्वत: हुआ यांनाही वाटत नव्हता. हुआ हुशार होते, तरी त्याच्याकडे नेतृत्वासाठी आवश्यक असलेला करिष्मा नव्हता आणि ते प्रत्येक बाबतीत अतिसावध असत. ते सुधारणावादी होते आणि त्यांची बरीचशी मते व धोरणे डेंग झिओपेंग यांच्यासारखी होती. मात्र त्यांना कम्युनिस्ट क्रांतिकाळाचा, परराष्ट्रधोरणाचा व उच्च स्थानावर काम करण्याचा अनुभव नव्हता. त्यांच्याभोवती क्रांतीचे वलय नव्हते. अशा परिस्थितीत आपल्या हातून चुका होतील का, याचे दडपण त्यांना सातत्याने जाणवे. आपली निवड ही माओंनी त्यांचा वारसा जपला जावा या हेतूने केली होती याची जाणीव त्यांना होती.

डेंग व त्यांच्या सहकाऱ्यांवरील हल्ले तीव्र होत असताना झाऊ एन लाय यांचा कर्करोग दिवसागणिक वाढत होता. नोव्हेंबर/डिसेंबर 1975 मध्ये पॉलिट ब्युरोच्या बैठकांना झाऊ हे उपचार म्हणून हजर राहात असत. ते सरळ हॉस्पिटलमधून ॲम्ब्युलन्समध्ये बैठकीला येत असत. 140 पौंड वजन असणाऱ्या झाऊ यांचे वजन शेवटी-शेवटी 88 पौंड इतके होते. आजारपणाच्या काळात डेंग अनेकदा झाऊ यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला जात. मात्र माओ झाऊ यांना कधीही भेटायला गेले नाहीत. अखेर 8 जानेवारी 1976 रोजी झाऊ यांचे निधन झाले. झाऊ यांच्याकडे विदेश मंत्रालय असल्याने त्यांचे अनेक जागतिक पुढाऱ्यांबरोबर घनिष्ठ संबंध होते. त्यापैकी अनेकांना झाऊंच्या अंत्ययात्रेला यायचे होते. माओ यांनी चीनमधील परदेशी राजदूतांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची व अंत्ययात्रेला येण्याची परवानगी दिली; मात्र चीनबाहेरील कोणीही येऊ नये, असेही फर्मान काढले.

झाऊ यांच्या मृत्यूने चीनमधील अनेक लोक हेलावले. विशेषत: बुध्दिमंत वर्ग तर खूपच! माओंनी त्यांना सांस्कृतिक क्रांतीदरम्यान वाईट वागवावयास नको होते, असे सर्वांचे म्हणणे होते. झाऊ यांनी अनेकांना सांस्कृतिक क्रांतीच्या भीषण सावटातून बाहेर काढले होते. माओंच्या वेडसरपणातून अनेकांना वाचविणारा माणूस, अशी त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांची भावना होती. दि.11 जानेवारी रोजी बीजिंगमधील तिआनमेन चौकात नागरिक, तरुण, विद्यार्थी इत्यादी झाओ यांच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. तिथून ती अंत्ययात्रा बड्या क्रांतिकारकांसाठी राखीव असणाऱ्या बाओशान या स्मशानभूमीत जाणार होती. कडाक्याच्या गोठविणाऱ्या थंडीतही जवळजवळ 20 लाख लोक तिआनमेन चौकात जमले होते. राष्ट्रध्वजात झाओ यांचे गुंडाळलेले शव पाहून अनेकांना शोक आवरेना. हजारो लोकांनी बिजिंगमधील इम्पेरिअल सिटीमधील हॉल ऑफ ॲनसेस्टरमध्ये 12 जानेवारी रोजीही जाऊन श्रध्दांजली वाहिली. पॉलिट ब्युरोतर्फे व पार्टीतर्फे डेंग यांनी श्रध्दांजली वाहिली. भाषण करताना डेंग यांचा कंठ दाटून आला. त्यात झाऊ यांनी पक्ष, देश, क्रांती व चीनच्या लोकांसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.

दरम्यान, डेंग यांनी स्वत:हून दोन वेळा आत्मनिभर्त्सना करूनही माओ व पक्षनेत्यांचे समाधान झाले नाही. डेंग यांची माओंना प्रत्यक्ष भेटू देण्याची विनंतीही मान्य करण्यात आली नाही. शेवटी डेंग यांनी माओंना एक राजीनामा देऊ करणारे पत्र पाठविले. ‘गेले दोन महिने मी अनेक प्रकारच्या टीकेला सामोरे जात आहे; अशा परिस्थितीत माझ्या हातून चुका होऊ शकतील, तेव्हा मला या पदांच्या जबाबदारीतून मुक्त करावे’ अशा आशयाचे हे पत्र होते. डेंग यांच्याबरोबर छायेसारखे असणाऱ्या जनरल झंग एडपिंग, हु याओबँग, वान ली आणि झोऊ रोंग्झिन या चार सहकाऱ्यांचाही छळ सुरू झाला. त्यापैकी रोंग्झिन यांच्याविरोधात पक्षशिस्तीची कारवाई सुरू झाल्यावर दोन महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला. अखेरीस डेंग यांचा राजीनामा स्वीकृत करून त्यांना सर्व पदांवरून हटविण्यात आले. त्यानंतरच डेंग यांच्याविरोधातील हल्ल्यांची तीव्रता कमी झाली.

झाऊ एन लाय यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधानाचे पद रिकामे होते. त्या जागेवर माओ यांनी हुआ गुओंफेंग यांची नेमणूक केली. ते तरुण होते. तत्पूर्वी ते हुनान प्रांताचे पक्ष सचिव होते. त्यांनी माओंबरोबर शेतीच्या समूहकरणाचे काम उत्तम रीतीने केले होते, यामुळे माओंचे त्यांच्याबद्दल चांगले मत होते. याशिवाय पक्षात 1959 मध्ये पेंग देहुआई (झशपस ऊशर्हीरळ) व नंतर 1970 मध्ये लिन बिआओ प्रकरणात ते माओंच्या मागे खंबीरपणे उभे होते. वँग हाँगवेन स्वभावाने तापट होते; त्यामानाने हुआ यांचे पक्षातील अनेकांशी व अनेक समूहांशी- अगदी डेंग यांच्याबरोबरही चांगले संबंध होते. डेंग यांच्यावरील टीका प्रखर होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, त्याच वेळेला हुआ यांच्याकडे नव्या पदाची जबाबदारी येत होती. त्या पदावर त्यांना स्थिर होऊ देण्यासाठी डेंग यांना सार्वजनिक जीवनातून हलविणे आवश्यक होते. वास्तविक पाहता, हुआ हे प्रशासनात सुधारणावादी व माओंपेक्षा थोडे मवाळच असल्याने डेंग यांचे त्यांच्याशी जमण्यासारखेही होते. डेंग यांच्या राजीनाम्याने माओंकडून हुआ यांच्याकडे सत्तासंक्रमण होण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र या राजीनाम्यानंतरही माओंना असे कुठे तरी वाटत होते की डेंग हे सांस्कृतिक क्रांतीबद्दल आपले जाहीर मत बदलतील व त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा होईल. म्हणूनच राजीनाम्यानंतर डेंग यांच्यावरील टीकेचा रोख बराच कमी झाला. आपल्या मृत्यूनंतरही आपल्या विचाराप्रमाणे चालणाऱ्या नेत्याकडे माओंना कारभार द्यायचा होता. डेंग ऐकत नाहीत हे पाहिल्यावर हुआ यांच्याकडे माओंनी कारभार सोपवला.

डेंग यांना सत्तेवरून घालविणे, हुआ गुओफेंग यांची महत्त्वाच्या पदी नेमणूक करून त्यांना माओंचा वारसदार नेमणे या घडामोडी चालू असतानाच झाऊ यांच्या मृत्यूनंतर सर्वसामान्य लोकांमध्ये झाऊ यांच्याबद्दल सहानुभूतीची मोठी लाट निर्माण झाली आणि पाहता-पाहता तिचे स्वरूप राजकीय झाले. चीनमध्ये त्यांच्या पारंपरिक सौर दिनदर्शिकेनुसार दर वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंगमिंग हा पूर्वजांना श्रध्दांजली वाहण्याची प्रथा असणारा एक महत्त्वाचा सण असतो. हा दिवस 5 एप्रिल 1976 रोजी होता. त्याच्या एक आठवड्यापूर्वी शांघायमध्ये वेनहुई बाओ (Wenhui Bao) या वर्तमानपत्रात डेंग व झाऊ यांच्याबद्दल जियांग शिंग व तिच्या गँगकडून बरीच टीका आली. झाऊ यांच्याबद्दल अशी टीका झाल्याने पूर्वाश्रमीचे अनेक रेड गाडर्‌सही खवळून उठले. शांघायमध्ये या वर्तमानपत्राच्या विरोधात जोरदार निदर्शने झालीच, परंतु त्याचबरोबर नानजिंग विद्यापीठात व नानजिंग शहरातही जियांग शिंग व तिच्या चौकडीविरोधात निदर्शने सुरू झाली.

दि.5 एप्रिल रोजीच्या किंगमिंग या स्मरण दिवशी काय होणार याची चाहूल लागत होती. बीजिंगमध्ये दि.30 मार्चपासूनच तिआनमेन चौकात झाऊ एन लाय यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फुले व पुष्पचक्रे यांचा ओघ सुरू झाला, तसेच त्यांच्या गौरवार्थ आणि जियांग शिंगच्या विरोधात भाषणेही सुरू झाली. तिथे लावलेल्या पोस्टर्सवर तर डेंग झिओपिंग यांच्याबद्दलच्या घोषणाही होत्या. पाहता-पाहता निदर्शकांचा जोर खूप वाढला व पक्षनेत्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले. परदेशी राजनैतिक अधिकारी व निरीक्षकांना हे कळायला लागले की, झाऊ व डेंग यांच्या बाजूने असलेल्या या निदर्शनांचा रोख माओ व त्यांच्या जहाल नेत्यांविरोधात होता. माओंच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक होती. पाच एप्रिलला पहाटेच सकाळी सरकारी गाड्यांचा वापर करून तिआनमेन चौकात वाहिली गेलेली फुले व पुष्पचक्रे काढून टाकण्यात आली. त्यामुळे परिस्थिती बिघडली व निदर्शकांचा जोर वाढला. बळाचा वापर करून निदर्शने मोडून काढण्याचा विचार झाला, परंतु निदर्शकांची संख्या व त्यांच्या अनावर झालेल्या भावना पाहता बळाचा वापर करण्याचा विचार सोडून देण्यात आला. दोन दिवसांत निदर्शकांची संख्या जशी कमी झाली तसा बळाचा वापर सुरू झाला आणि शंभरावर निदर्शकांवर लाठीहल्ला करून त्यांना अटक करण्यात आली.

पॉलिट ब्युरोच्या सदस्यांनी या निदर्शनांची गंभीर दखल घेतली. हा पूर्वनियोजित कट असून माओ व त्याच्या सहकाऱ्यांना सत्ताभ्रष्ट करण्यासाठीची ‘क्रांतीविरोधातील विद्रोही निदर्शने’ असे याचे वर्णन करण्यात आले. आतापर्यंत माओंना अंधुक अशा होती की, डेंग हे हुआ यांच्याबरोबर काम करतील. मात्र 5 एप्रिलची गंभीर निदर्शने बघितल्यावर माओंनी डेंग यांना सर्वच अधिकारपदांच्या जबाबदारीतून तत्काळ मुक्त केले आणि हुआ गुओफेंग यांना पंतप्रधान व पक्षाचे पहिले उपाध्यक्ष करून सत्तांतराचा मार्ग मोकळा केला. मात्र जहाल नेते- विशेषतः जियांग शिंग व तिची गँग- डेंग यांच्या जीवावर उठलेले आहेत, हे माओ जाणून होते. म्हणून त्यांचे रक्षण करण्यासाठी डेंग यांना बीजिंगमध्ये अज्ञात ठिकाणी हलविण्यात आले. डेंग यांच्या विनंतीवरून त्यांच्या पत्नीच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक ती मदतही करण्यात आली. एप्रिलमध्येच बीजिंगच्या आजूबाजूच्या परिसरात अतिशय तीव्र व उंच क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला आणि त्यात दोन लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. बीजिंगमधील अनेक इमारतींचे मोठे नुकसान झाले. डेंग यांनाही राहत्या घरातून बाहेर पडून बाजूच्या बागेत मुक्काम करावा लागला. अनेकांनी या भूकंपाचा संबंध ‘चीनमधील पुढे येणाऱ्या मोठ्या बदलाची निसर्गाने घेतलेली दखल’ असाही जोडला.

एका महिन्यानंतर मे 1976 मध्ये माओ यांना हृदयविकाराचा मोठा झटका आला. त्यातून वाचले; मात्र पूर्णपणे विकलांग झाले होते. कामकाज पाहणे त्यांना शक्य नव्हते. जूनमध्ये दुसरा झटका आला आणि सप्टेंबर 9 रोजी त्यांचे निधन झाले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव तिआनमेन चौकातील एका हॉलमध्ये ठेवण्यात आले. डेंग व त्यांच्या सहकाऱ्यांना मात्र अंत्ययात्रेतून वगळण्यात आले होते. माओंच्या मृत्यूनंतर हुआ गुओफेंग यांच्याकडे सत्ता आली खरी; परंतु तरीही जियांग शिंग आणि तिचे सहकारी जहाल विचारप्रणालीचे, जहाल राजकारणाचे केंद्रस्थान व प्रेरणा होते. माओंच्या मृत्यूनंतर तिने त्यांच्या कागदपत्रांचा ताबा घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र असे असले तरी उच्च राजकीय पदासाठी ती लायक आहे, असे माओंनाही कधी वाटले नाही. हुआ गुओफेंग यांच्याविरोधात बंड करण्याचीही तिची तयारी होती व तशी तिची पावलेही पडत होती. त्यामुळे हुआ गुओफेंग, मार्शल ये आणि पक्षप्रमुख वँग डॉनझिंग काळजीत होते. दि.6

ऑक्टोबरला माओंच्या विचारांच्या पाचव्या खंडाच्या प्रकाशनाच्या संबंधात पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीची बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीस जियांग शिंग व तिच्या सहकाऱ्यांनाही बोलाविले होते. पुढील अर्ध्या तासातील एखाद्या चित्तथरारक गुप्तहेर चित्रपटात शोभाव्यात अशा नाट्यपूर्ण हालचालीनंतर वँग हाँगवेन, झँग चुनकिओ आणि याओ वेन युन या जियांग शिंगच्या सहकाऱ्यांना तत्काळ अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच रात्री जियांगलाही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. शांघायमध्ये तिचा मोठा प्रभाव होता. मात्र तिला व तिच्या चौकडीलाच अटक झाल्याने शांघायमधील जहालपंथीयही गजाआड झाले. बीजिंगमधील माओंचे सहायक माओ युनक्सिन व त्यांच्या सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आली. अशा रीतीने मार्शल ये आणि हुआ गुओफेंग यांनी एकही गोळी न झाडता कडव्या व जहाल राजकारणाचा कायमचा बंदोबस्त केला आणि सर्वसामान्य लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पुढच्या पॉलिट ब्युरो मीटिंगमध्ये हुआ गुओफेंग यांना पक्षाचे व सेन्ट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष करण्यात आले आणि माओंच्या विचारांच्या पाचव्या खंडाच्या प्रकाशनाचे काम हुआ यांच्या मार्गदर्शनाखाली होईल, असा निर्णय झाला. जहालांचा बंदोबस्त झाल्यावर हुआ यांच्यावरचा विश्वासही वाढला. मार्शल ये आणि ली झियानीन या जुन्या वरिष्ठ नेत्यांनी अशा रीतीने हुआ गुओफेंग यांना अधिक प्रबळ केले. माओंचाच वारसा चालवीत असल्याने हुआ यांनी डेंग यांच्यावरील शिस्तभंग कारवाई व टीका सुरूच ठेवली. हुआ यांच्यापेक्षा डेंग झिओपेंग अनेक बाबतीत वरिष्ठ आणि अनुभवी होते. शिवाय क्रांतीतील सहभागामुळे त्यांच्याभोवती एक वेगळे वलय होते. त्यामुळेच हुआ त्यांना सत्तेपासून, सरकारपासून दोन हात लांब ठेवू पाहत होते. जियांग शिंग आणि तिच्या चौकडीच्या अटकेचे वृत्त समजताच डेंग यांनी हुआ यांचे अभिनंदन केले. डेंग यांच्याविरोधातील कारवाई औपचारिक रीत्या सुरू राहिली, मात्र तरीही डेंग यांचे पक्षातील स्थान पुन्हा एकदा बळकट होऊ लागले. हुआ व डेंग परस्परांच्या संपर्कातही होते. अनेकांना असे वाटत होते की, डेंग लवकरच पक्षात व सरकारमधे परततील आणि त्यांना हुआ यांच्या हाताखालील महत्त्वाचे पद देण्यात येईल. तसे पुढे झालेही; मात्र अनेक राजकीय हालचाली, शह-काटशहाचे राजकारण झाल्यावर!

आता चीनमधील वातावरण बऱ्यापैकी निवळत होते. माओ यांचा जहालवाद संपुष्टात आला होता. त्याची सुरुवात माओंच्या हयातीतच झाली होती. माओंनी स्वत:च सांस्कृतिक क्रांतीच्या हिंसाचाराला व गोंधळाला कंटाळून राजवटीच्या स्थैर्याला प्राधान्य दिले होते. डेंग यांच्या महत्त्वाच्या सुधारणाही 1975 मध्ये सुरू झाल्या होत्या. माओंच्या शेवटच्या काळात त्यांच्या आजारपणामुळे जहाल नेतृत्व मागे पडले होते. जियांग शिंगच्या अटकेनंतर तर जहाल माओवाद भलताच पिछाडीला गेला आणि आधुनिक चीनच्या इतिहासातील एक अत्यंत हिंसक व गोंधळाचे पर्व संपुष्टात आले.

हुआ गुओफेंग यांनी पॉलिट ब्युरोच्या स्थायी समितीची खास बैठक बोलाविण्याच्या निमित्ताने जियांग शिंग आणि तिच्या चौकडीला शिताफीने अटक करून या चौकडीचा डाव उधळून टाकला खरा; मात्र हुआ हे दीर्घकालीन नेतृत्व करू शकतील, असा विश्वास इतरांना सोडाच, पण स्वत: हुआ यांनाही वाटत नव्हता. हुआ हुशार होते, तरी त्याच्याकडे नेतृत्वासाठी आवश्यक असलेला करिष्मा नव्हता आणि ते प्रत्येक बाबतीत अतिसावध असत. ते सुधारणावादी होते आणि त्यांची बरीचशी मते व धोरणे डेंग झिओपेंग यांच्यासारखी होती. मात्र त्यांना कम्युनिस्ट क्रांतिकाळाचा, परराष्ट्रधोरणाचा व उच्च स्थानावर काम करण्याचा अनुभव नव्हता. त्यांच्याभोवती क्रांतीचे वलय नव्हते. अशा परिस्थितीत आपल्या हातून चुका होतील का, याचे दडपण त्यांना सातत्याने जाणवे. आपली निवड ही माओंनी त्यांचा वारसा जपला जावा या हेतूने केली होती याची जाणीव त्यांना होती. शिवाय पक्षातही ते बरेच कनिष्ठ असल्याने इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल आदर वाटणे अशक्य होते.

वरिष्ठांचा त्यांना उघड विरोध होता. त्यामुळे ते संक्रमणकाळातील नेतृत्व होते, असे अनेकांना वाटत असे. हुआ हे (डिसेंबर 1978 पर्यंत) जवळजवळ दोन वर्षे सत्तेवर होते. अर्थव्यवस्था खुली करण्याच्या दृष्टीने चिनी उच्च राजकीय नेत्यांची शिष्टमंडळे परदेशी पाठविणे, परदेशी गुंतवणुकांना प्रोत्साहन देणे, पहिला स्पेशल इकॉनॉमिक झोन प्रकल्प सुरू करणे इत्यादी विषयींची धोरणे व निर्णय हुआ यांचे होते. मात्र त्यांचे

नेतृत्व प्रभावहीन होते. दीड वर्षातील अनेक घटनाक्रमांतून जात त्यांना अखेर डेंग यांच्याकडे सत्ता सुपूर्द करावी लागली.

हुआ एकाच वेळी पक्षाध्यक्ष, पंतप्रधान व सेंट्रल मिलिटरी कमिशनचे अध्यक्ष अशी तीन सर्वोच्च पदे धारण करीत होते; तरीही त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह होते. हुआ यांचा अधिकार बराचसा औपचारिक स्वरूपाचा होता. प्रचंड संस्थात्मक पडझड झालेल्या चीनपुढील राष्ट्रबांधणीची व पुनर्रचनेची समस्या इतकी विशाल व गुंतागुंतीची होती की, त्यासाठी विश्वास निर्माण करणारे व दीर्घ अनुभव असलेले नेतृत्व आवश्यक होते. माओंच्या मृत्यूनंतर हुआ यांना महत्त्वाची तारेवरची कसरत करणे भाग होते. सांस्कृतिक क्रांतीदरम्यान ज्या नेत्यांची परवड झाली, जे देशोधडीला लागले होते; त्यांचे पुनर्वसन करून त्यांना दिलासा देण्याची गरज होती. तसेच कडवी धोरणे-विशेषत: आर्थिक धोरणे- शिथिल करणे, अर्थव्यवस्था थोडी खुली करणे आणि थोडे स्वातंत्र्य देणेही आवश्यक होते. मात्र सांस्कृतिक क्रांतीपूर्वी आणि दरम्यान सत्ता उपभोगणारी व माओंचे समर्थन करणारी मंडळीही मोठ्या प्रमाणावर होती. त्यांना हुआ यांचे माओंच्या मृत्यूनंतरचे हे घूमजाव आवडले नसते. जियांग शिंग व तिच्या सहकाऱ्यांना अटक केल्याने आणि त्यांचा डाव उधळून लावल्याने पक्षातील सुधारणावादी खूष असले तरी कडवे माओवादी चांगलेच बिथरले होते. म्हणून माओंच्या विचारांची चौकट भेदून पुढे जाणे हुआ यांना परवडणारे नव्हते.

हुआ यांच्यावर पक्षाकडून- विशेषत: जहालांकडून सातत्याने टीका होत असे. जहाल गटाला राजी ठेवण्यासाठी त्यांनी 7 फेब्रुवारी 1977 रोजी ‘पीपल्स डेली’, ‘रेड फ्लॅग’ या पक्षाच्या व जी फाँग्जुन बाओ (गळश ऋरपसर्क्षीप इरे) या सैन्यदलाच्या वर्तमानपत्रातून सैद्धांतिक लेख प्रसिद्ध करून माओंनी जी काही धोरणे अंगीकारली व ज्या काही सूचना दिल्या, त्याप्रमाणेच चालले पाहिजे- अशी भूमिका घेतली. हा सैद्धांतिक लेख पुढे घडणाऱ्या सत्ता राजकारणाच्या केंद्रभागी राहिला. त्यामुळे हुआ हे वैचारिक दृष्ट्या माओंचे वारसदार व समर्थक आहेत, असा राजकीय अर्थ होत होता. पाश्चात्त्य देशांमध्ये हा लेख व ही भूमिका टू व्हॉटेव्हर्स (Two Whatevers')  या नावाने प्रसिध्द आहे. काहीही झाले तरी माओंची धोरणे व त्यांनी इतरत्र दिलेल्या सूचना यांचे पालन झालेच पाहिजे; माओंचे विचार हे राज्यव्यवस्था व व राज्यव्यवस्थेच्या तत्त्वज्ञानाच्या केंद्रभागी असतील. असा विचार या लेखात मांडला होता. माओंनंतर हुआंकडे आलेल्या वारसा अधिकाराला वैधता देऊन पक्षाची सहमती घेणे आवश्यक होते.

आपल्या अधिकारावर शिक्कामोर्तब करून घेण्यासाठी हुआ यांनी 12 ते 18 ऑगस्टदरम्यान अकरावी पार्टी काँग्रेस आमंत्रित करून नव्या युगाची, नव्या पर्वाची सुरुवात केली. तसेच मार्च 1978 मध्ये नॅशनल पीपल्स काँग्रेसचे पाचवे अधिवेशनही भरविले गेले. या अधिवेशनात राष्ट्रबांधणी व आर्थिक प्रगतीचा आराखडा सादर करण्यात आला. परराष्ट्रीय धोरण व आंतरराष्ट्रीय राजकारण याचा त्यांना फारसा अनुभव नव्हता व विशेष गतीही नव्हती. मात्र देशांच्या सार्वभौमत्वाची किंमत न देताही प्रगत तंत्रज्ञान व परदेशी भांडवल आयात करता येते, हे त्यांनी पाहिले होते. पूर्व युरोपमधील कारखाने व उद्योग चीनमधील उद्योगांपेक्षा आधुनिक व अधिक कार्यक्षम होते. बाह्य जगाशी खुले संबंध ठेवायचे धोरण पुढे 1978 मध्ये डेंग यांनी मंजूर करून घेतले, मात्र त्याची नांदी हुआ यांनी केली होती. माओंच्या पश्चात डेंग व हुआ यांच्यात सत्तेसाठी रस्सीखेच सुरू होईल, असे पाश्चात्त्य देशातील नेत्यांना व प्रसारमाध्यमांना वाटत असे. झाऊ यांनी ज्याप्रमाणे सर्व हयात माओंच्या नेतृत्वाखाली काम केले, तसेच डेंग हे हुआ यांच्या नेतृत्वाखाली काम करू शकतील का, यावर चर्चा होत असे. जुन्या नेतृत्वापैकी मार्शल ये आणि ली झियानिन हे वरिष्ठ नेते हुआ यांचे मार्गदर्शक होते.

हे तिघेही माओंच्या राजवटीत मध्यममार्गी व जुळवून घेणारे नेते होते. सांस्कृतिक क्रांतीपूर्वी राजवटीशी जुळवून घेणारे, सांस्कृतिक क्रांतीदरम्यान पोळले न गेलेले व माओंच्या मृत्यूनंतर विरोधकांना संक्रमणकाळात का होईना पण स्वीकारार्ह असे हे नेते होते. मार्शल ये व ली झियानिन यांना डेंग यांचे पुनर्वसन करून त्यांना सरकारमध्ये महत्त्वाची पदे द्यावीत, असे वाटत होते. माओंच्या एकछत्री कारभाराच्या आठवणी ताज्या असल्याने एकाच्या हाती सत्ता केंद्रित करण्याऐवजी सर्वांनाच सामावून घेणारे सामूहिक नेतृत्व हवे, असेही त्यांना वाटे. एप्रिल 1976 मध्ये किंगमिंगच्या निमित्ताने तिआनमेन चौकात झालेल्या निदर्शनांचा ठपका माओंनी डेंग यांच्यावर ठेवला होता. ही निदर्शने साधी नसून त्यांचे स्वरूप क्रांतीविरोधी, पक्षविरोधी व म्हणून देशविरोधी होते, असा निर्णय घेऊन डेंग यांना पदच्युत करण्यात आले होते.

आता पक्षात व सरकारात प्रथम डेंग यांना या आरोपातून मुक्त करावे, असा विचार सुरू होता. जियांग शिंग व तिच्या ‘शांघाय गँग’ला अटक केल्यानंतर एक गोष्ट उघडकीस आली, ती अशी की- या निदर्शनांमागे डेंग आहेत हे दर्शविणारा खोटा पुरावा या चौकडीनेच तयार केला होता. त्यामुळेच डेंग यांच्यावरील आरोप मागे घेण्याचा व त्यांना काही जबाबदाऱ्या देण्याचा विचार सुरू झाला. तरीही डेंग यांना सन्मानाने परत येता येईल, अशी परिस्थिती नव्हती. कारण ‘पीपल्स डेली’मधील माओंच्या तत्त्वज्ञानाला शासन व राज्यव्यवस्थेच्या केंद्रभागी ठेवणारा ‘टू व्हॉटेव्हर्स’ हा सैध्दांतिक लेख हुआ यांच्या सत्तेचा व त्यांच्या वैधतेचा (लेजीटमसी) पाया होता. हा सैध्दांतिक लेख काळजीपूर्वक पाहिल्यास तो प्रामुख्याने डेंग यांच्या भूमिकेच्या विरोधात होता, असे दिसेल. तरीही वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे हुआ यांनी डेंग यांच्या विरोधात सुरू केलेली ‘निभर्त्सना मोहीम’ वर्ग केली.

11 व्या काँग्रेसनंतर मार्च 1977 मध्ये धोरणदिशा ठरविण्यासाठी ‘सेंट्रल पार्टी वर्क कॉन्फरन्स’ आयोजित केली होती. या कॉन्फरन्समध्ये वरिष्ठ नेतृत्वाचे सदस्य मोठ्या प्रमाणावर होते. डेंग यांनी माओंच्या हाताखालीच सुधारणांचे काम केले, शांघाय चौकडीविरोधात कडवी झुंज दिली, परदेशातही चीनची बाजू उत्तमरीत्या लावून धरली, शिवाय एप्रिल 1976 च्या निदर्शनांत डेंग यांना शांघाय चौकडीने विनाकारण गोवले, हेही आता सिध्द झाले आहे; अशा परिस्थितीत त्यांच्या परतीचा मार्ग हुआ यांनीच मोकळा करावा, अशा शब्दांत अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांची बाजू मांडली. याचा परिणाम असा झाला की, हुआ यांनी डेंग विरोधातील निभर्त्सना मोहीम थांबवायचा आदेश दिला. शिवाय 5 एप्रिलची निदर्शने ही क्रांतीविरोधी नव्हती, अशीही भूमिका घेऊन ते सर्व प्रकरणच बंद करावे, अशी भूमिका घेतली.

डेंग यांच्या राजकीय जीवनातील अंधकार नष्ट होऊ लागला होता.

Tags: पंतप्रधान काँग्रेस युरोप तिआनमेन बीजिंग झाऊ डेंग ॲम्ब्युलन्स हॉस्पिटल pantpradhans congress yurop tianmen bijing zau deng ambulance hospital weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके