डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

जियांग झेमिन यांच्या नेतृत्वाखाली चीनने 1992 ते 2003 या काळात अनेक आर्थिक सुधारणा आणि नवे उपक्रम राबविले. शांघाय येथे नवे स्टॉक एक्स्चेंज उघडण्यात आले. सरकारी उद्योगांतील सुधारणा, त्यांचे स्टॉक एक्स्चेंजवर व काही परदेशी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग करणे, त्यांच्या भागभांडवलांची व अंतर्गत तसेच सरकारी नियंत्रणाची पद्धत घालून देणे अशा अनेक सुधारणा झाल्या. बँकिंग क्षेत्रातही अनेक सुधारणा करण्यात आल्या. जियांग झेमिन यांचे शांघायच्या पक्षातील टीकाकार त्यांच्या पाठीमागे त्यांना फ्लॉवर पॉट (शोभेची वस्तू) असे म्हणत. सुरुवातीला गोंधळात कार्य सुरुवात केलेले जियांग झेमिन यांनी पुढे स्वतःचा उत्तम जम बसवीत आर्थिक विकास, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, आर्थिक सुधारणा, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, सरकारी उद्योगांची पुनर्रचना, अर्थव्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या नियामक संस्थांची निर्मिती यांवर लक्ष केंद्रित केले.

डेंग यांनी 1992 मध्ये केलेल्या दक्षिण दौऱ्यानंतर शांघाय व दक्षिण चीनमधील प्रांतांमध्ये आर्थिक गुंतवणूक व आर्थिक विकासाचे उत्साही वातावरण तयार झाले आणि चीनमध्ये आर्थिक सुधारणांचे दुसरे पर्व सुरू झाले. पुढच्या 10-12 वर्षांत चीन एक मोठी जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास आला. या महत्त्वाच्या कालावधीच्या सुरुवातीसच चीनच्या नेतृत्वाची सारी सूत्रे डेंग यांच्याकडून जियांग झेमिन यांच्याकडे आली होती. सुरुवातीला राजकीय दृष्ट्या लाईटवेट वाटणारे आणि सहमतीने निर्णय घेणारे जियांग प्रत्यक्षात अतिशय प्रभावशाली नेते होते.

दि.17 ऑगस्ट 1926 रोजी जिआंग्सू प्रांतात यांग्झौ येथे जन्मलेले जियांग यांचे आजोळ त्या प्रांतातील वुयान जिल्ह्यातील. चीनमधील अनेक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ व बुद्धिमंत यांचे ते माहेरघर! नानजिंगमधील नॅशनल सेन्ट्रल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरू केल्यानंतर त्यांनी 1947 मध्ये शांघायमधील नॅशनल चिआओ तुंग युनिव्हर्सिटी येथून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर मॉस्कोमधील स्टालिन ऑटोमोबाईल फॅक्टरीमध्ये प्रशिक्षण व उमेदवारी. शांघायमध्ये खास शिक्षण घेतल्यानंतर सरकारी नोकरी. इंजिनिअरिंग कॉलेजपासूनच त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची उमेदवारी घेतली.

पुढे ते सेन्ट्रल कमिटीचे मेंबर म्हणून निवडून गेले आणि 1983 मध्ये इलेक्ट्रॉनिक विभागाचे मंत्रीही झाले. ते शांघायला 1985 मध्ये परतले, शांघायचे मेयर झाले आणि त्यानंतर शांघायचे पक्ष सचिवही! शांघायचे पक्ष सचिव हे अतिशय प्रतिष्ठेचे पद समजले जाते. जियांग झेमिन हुशार व बुद्धिमान आहेत. इंग्रजीसह अनेक भाषांचे त्यांना कामचलाऊ ज्ञान आहे. काव्य व साहित्य यांवर बोलणे त्यांना फारच प्रिय. बिथोवनच्या संगीतरचना त्यांना प्रिय होत्या, तसेच एल्विस प्रिस्लेची गाणीही. तत्त्वज्ञानाचा-ज्ञानाचा फारसा बाऊ न करता ते समोरच्या व्यक्तीशी हसून, गप्पा-गोष्टी करीत संवाद साधत आणि वेगळीच छाप पाडीत. हा अनौपचारिकपणा कधी कधी फारच होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण होत असे. काही वेळा अवघडलेल्या परिस्थितीतून सुटका करून घेताना परदेशी पाहुणे समोर असतानाही गाण्याची एखादी सुरेल लकेरही ते घेत. फिलिपाइन्समध्ये 1996 मध्ये आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक समिटच्या एका संध्याकाळी त्यांनी एल्विस प्रिस्लेचे ‘लव्ह मी टेंडर’ हे गाणे गाऊन दाखविले. शांघायचे 1987 मध्ये मेयर असताना आपल्या व्हीआयपी जागेतून उठून स्टेजवर जाऊन थोडा वेळ ऑर्केस्ट्राला त्यांनी मार्गदर्शनही केले होते. सर्वसामान्यतः परदेशी पाहुण्यांशी बोलताना चिनी परंपरेनुसार वरिष्ठांनी बोलायचे असते. जियांग मात्र सुरुवातीला चर्चेचा सूर आळवीत आणि आपल्या चमूतील इतरांनाही त्या विषयावर मतप्रदर्शन करू देत, शेवटी मार्मिक रीत्या उपसंहार करून ते चीनची बाजू अंतिमरीत्या मांडीत. चीनच्या पारंपरिक पद्धतीने आपलाच मुद्दा रेटून न नेता इतरांच्या मुद्यांचाही ते मान ठेवीत. या वैशिष्ट्यामुळे उच्चशिक्षित जियांग झेमिन इतर चिनी नेत्यांपेक्षा जास्त उठून दिसले. 

जियांग झेमिन 1949 मध्ये उच्चशिक्षित वँग येपिंग यांच्याशी विवाहबद्ध झाले. वँग यांनी शांघाय फॉरिन लँग्वेज इन्स्टिट्यूटमधून परदेशी भाषांच्या अभ्यासात विशेष प्रावीण्य प्राप्त केले होते. शांघायमध्ये 1987 मध्ये विद्यार्थ्यांची निदर्शने झाली, ती जियांग झेमिन यांनी व्यवस्थित हाताळून मोडूनही काढली. या दरम्यानच्या भाषणात त्यांनी कम्युनिस्ट नेतृत्वाने क्रांतीदरम्यान केलेल्या त्यागाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अमेरिकन अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी 1883 मध्ये अमेरिकन यादवी युद्धादरम्यान गेटिसबर्ग येथे केलेल्या प्रसिद्ध ऐतिहासिक भाषणातील महत्त्वाचा उतारा जियांगनी त्या वेळी इंग्रजीमध्ये म्हणून दाखविला. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक हेराल्ड’ नावाचे प्रभावशाली अर्थविषयक वर्तमानपत्र शांघायमधून 1980 मध्ये प्रसिद्ध होऊ लागले. पुढे हे उदारमतवादी वर्तमानपत्र राजकीय स्वातंत्र्याचा फारच पुरस्कार करू लागले. तिआनमेन प्रकरणात जियांग झेमिन यांनी हे वर्तमानपत्रच बंद करून टाकले. शांघायमध्येही विद्यार्थ्यांनी 1989 मध्ये निदर्शने केली होती. जियांग झेमिंग यांनी ही निदर्शने हुशारीने मोडून काढली.

मे 1989 मध्ये तिआनमेनमधील विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान डेंग यांनी मवाळ व उदारमतवादाकडे झुकणारे झाओ झियांग यांना बडतर्फ करून त्यांच्या जागी जियांग झेमिन यांना नेमले. या प्रक्रियेत ली रुइहान, तेव्हाचे पंतप्रधान ली पेंग, तसेच दोन वरिष्ठ नेते ली झियानिआन आणि चेन युन या साऱ्या वरिष्ठ नेत्यांना बाजूला सारून जियांग झेमिन अत्युच्च स्थानी गेले, हे विशेष! ली रुइहान हे सुधारणावादी व थोड्या उदारमतवादी गटाचे नेतृत्व करीत असत. दुसऱ्या टोकाला परंपरावादी व डावे नेतृत्व पंतप्रधान ली पेंग यांचे होते. डेंग यांनी या दोन्ही टोकांच्या नेतृत्वापेक्षाही सुधारणावादी आणि मध्यममार्गी जियांग झेमिन यांना निवडले. जियांग यांचा स्वतःचा असा प्रभावी राजकीय गट नव्हता. त्यामुळे पॉलिट ब्युरोत सर्वच बाबतींत ते सहमतीने निर्णय घेत असत. बुद्धिमान व हुषार असल्याने सहमतीने निर्णय घेण्याच्या कलेत ते चांगलेच पारंगत होते. परदेश धोरणासंबंधात तर 1997 पर्यंत त्यांचा विशेष प्रभावही नव्हता. मात्र 1997 नंतर त्यांनी चीनचे परराष्ट्र धोरणही प्रभावीपणे मांडणे सुरू केले. डेंग व इतर वरिष्ठांनी 1992 मध्ये जियांग झेमिंग यांचा वारस नेताही निवडला होता. तरुण, तडफदार व उच्चशिक्षित हु जिंताव हे जियांग झेमिन यांच्यानंतर 2001 पासून चीनचे सर्वोच्च नेते होणार होते. त्यांनी या संपूर्ण काळात जियांग झेमिन यांना उत्कृष्ट साथ दिली.

खुल्या अर्थव्यवस्थेचे टीकाकार व अर्थमंत्री चेन युन आणि त्यांचे सहकारी ली झियानिन हे दोघे शांघायचे असल्याने जियांग झेमिन सुरुवातीला या दोघांच्या बरेच जवळ होते. जून 1989 नंतर डेंग यांच्या सुधारणांना बराच विरोध सुरू झाला होता, त्यामुळे जियांग झेमिन त्यांच्या फारसे जवळ नव्हते. जियांग झेमिन हे 1989 पासून 1992 पर्यंत तात्पुरते संक्रमण व काळातील नेतृत्व आहे, असे मानले जाई. अध्यक्ष यांग शांगकुन आणि त्यांचे भाऊ यांग बाइबिंग हे तर जियांग यांना हटविण्याच्या तयारीत होते. शांघाय व दक्षिणेतील राज्यांचा दौरा 1992 मध्ये करून डेंग यांनी आर्थिक विकासासाठी उत्साही वातावरण तयार केले, ते पाहून जियांग झेमिनही आर्थिक सुधारणांच्या मागे लागले. जियांग हेच यापुढे आर्थिक सुधारणा व खुल्या अर्थव्यवस्थेचा अजेंडा पुढे नेतील, ही खात्री पटल्याने डेंग यांनी यांग बंधूंनाच शिताफीने बाजूला करून जियांग झेमिन यांचे स्थान बळकट केले. कम्युनिस्ट पक्षाची सत्ता व पक्षाचे स्थान टिकवायचे असेल, तर चीनचे आधुनिकीकरण व औद्योगिकीकरण झाले पाहिजे आणि अर्थव्यवस्था उच्च दराने सातत्याने वाढली पाहिजे, ही डेंग यांची भूमिका अखेर जियांग झेमिन यांनाही पटली.

जियांग झेमिन यांच्या नेतृत्वाखाली चीनने 1992 ते 2003 या काळात अनेक आर्थिक सुधारणा आणि नवे उपक्रम राबविले. शांघाय येथे नवे स्टॉक एक्स्चेंज उघडण्यात आले. सरकारी उद्योगांतील सुधारणा, त्यांचे स्टॉक एक्स्चेंजवर व काही परदेशी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग करणे, त्यांच्या भागभांडवलांची व अंतर्गत तसेच  सरकारी नियंत्रणाची पद्धत घालून देणे अशा अनेक सुधारणा झाल्या. बँकिंग क्षेत्रातही अनेक सुधारणा करण्यात आल्या. बँकांच्या व्यवहारात व प्रशासनातही स्थानिक राजकारणी व पक्ष सदस्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हस्तक्षेप असे. तो बंद करून बँका केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आणल्या गेल्या. चीनमध्ये परदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) ओघ सातत्याने सुरू असल्याने कारखानदारी वाढली आणि त्याचबरोबर निर्यातही वाढली. नागरी भागातील सध्याची घरे नागरिकांच्या नावे करून ती खासगीरीत्या विकण्याची पद्धत 1998 च्या सुमारास रूढ करून, एक प्रचंड मोठे हाउसिंग मार्केट निर्माण करण्यात आले. यात पूर्वी सरकारने बांधून दिलेली व लोकांना भाड्याने राहण्यासाठी दिलेली घरे लोकांना विकायची परवानगी दिली. ज्यांच्याकडे घरे होती त्यांनी बराच पैसा कमावला, हे खरे. मात्र त्यामुळे नव्याने निर्माण होत असलेल्या मध्यमवर्गांची- विशेषतः ज्यांच्याकडे पैसा होता, त्यांची- सोय तर झाली. हाउसिंग मार्केट तयार झाले व अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर निधी आला. या काळात एकूण 4.5 ट्रिलियन युआन अथवा 540 बिलियन डॉलर्सहून अधिक निधी बाजारात येऊन तो मार्केट उलाढालीसाठी उपलब्ध झाला. ज्यांनी घरे विकली, त्यांचाच हा निधी असल्याने घरगुती बचतीला व त्यातून होणाऱ्या भांडवलनिर्मितीला मोठी चालना मिळाली. त्यातूनच पुढे पायाभूत सुविधा, विविध प्रकारच्या नागरी सुविधा व सार्वजनिक वाहतूकव्यवस्था यांना चालना मिळाली. यामुळे चीनमध्ये जलद नागरीकरण व शहरीकरण यांचे युग अवतरले. नागरीकरण व शहरीकरण यांच्यात आर्थिक विकासाच्या संधी असतात. त्याचा फायदा चीनला झाला. शिवाय खासगी घरांमुळे आणि अर्थव्यवस्थेत होत असणाऱ्या खासगी गुंतवणुकीमुळे चीनमध्ये मालमत्ताविषयक हक्कासंबंधी विचार सुरू झाला.

सन 1989 मधील राजकीय उठाव नागरी भागातील मध्यमवर्गीयांचा उठाव होता. त्यात विद्यार्थी निदर्शक अग्रभागी होते, त्यांना पाठिंबा बुद्धिमंतांचा व विचारवंतांचा होता. यामुळे 1989 नंतर जियांग झेमिन यांनी नागरी भागातील नागरिकांच्या सोर्इंकडे अधिक लक्ष देणे सुरू केले. नागरी भागात हाउसिंग मार्केट निर्माण होत असताना ग्रामीण भागात मात्र शेतकऱ्यांना जमिनी विकायला व हस्तांतरित करायला बंदी होती. त्यामुळे नागरी व ग्रामीण भागातील आर्थिक विषमता वाढली. स्थानिक सरकारे त्यांच्याकडील मोकळ्या जागांचा विकसकांमार्फत विविध प्रकारे वापर करून निधी उभारू लागली. त्यामुळे नागरीकरणाला गती मिळाली व नागरी सोई-सुविधा निर्माण करण्याच्या प्रक्रियेलाही गती मिळाली.

WTO (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) मध्ये 2002 मध्ये शिरकाव झाल्याने सर्व देशांशी चीनचा निर्यात व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढला. WTO मध्ये प्रवेश करताना घातलेल्या अटींनुसार चीनला अनेक आर्थिक व प्रशासकीय सुधारणा करणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे WTO मधील प्रवेशामुळे चीनमध्ये पुढील सुधारणांचा कार्यक्रम तयार झाला. या साऱ्या आर्थिक सुधारणा सुरू असताना कम्युनिस्ट पक्षाची मक्तेदारी, पक्षाचे वर्चस्व व पक्षाची एकाधिकारशाही यात वाढ होत होती. या काळात परंपरावादी व कॉन्झर्व्हेटिव्ह यांचे प्राबल्य इतके होते की, त्यांना सत्तेत मोठा वाटा द्यावा लागला. त्याशिवाय पक्षातील कडव्या गटाची मागणी अशी होती की- पक्षाचे वर्चस्व टिकविण्यासाठी चीनमधील सर्व सरकारी मालमत्ता ही पक्षाच्याच मालकीची आहे, असे घोषित करावे. म्हणजेच पक्ष व सरकार यांच्यातील अंतर आणखी कमी करावे, अशी मागणी होती. चीनला हे उघडपणे करणे शक्य नव्हते. प्रत्यक्षात चीनमधील सर्व महत्त्वाच्या सरकारी/निमसरकारी संस्था, सरकारी क्षेत्रातील उपक्रम वा कंपन्या, नियामक संस्था या साऱ्यांचे प्रमुख पक्षाचे पदाधिकारी असत. अशा रीतीने जियांग झेमिन यांच्या काळात पक्षाने सरकारमधील सर्व महत्त्वाच्या संस्थांचा अतिशय हुशारीने ताबा घेतला. डेंग यांच्या काळात आणि जियांग झेमिन व त्यांच्यानंतरच्या काळात हा महत्त्वाचा फरक होता. आर्थिक संस्था व प्रशासनावरील पक्षाची पकड वाढली आणि त्या प्रमाणात भ्रष्टाचारही!

जियांग झेमिन 1989 नंतर सत्तेवर आले, तेव्हा चीनची भांडवलशाही दिशेने मार्गक्रमणा नुकतीच सुरू झाली होती. काही भाग अगदी गरीब, तर काही भाग श्रीमंत. किनारपट्टी व दक्षिणेकडे सुबत्ता, तर पूर्वेकडे व अंतर्गत भागात मागासलेपण. शेतीकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले होते. परत सामूहिक शेतीकडे जाण्याच्या धोरणांची चर्चा सुरू होती. फारच विकेंद्रीकरण झाल्याने केंद्रीय सत्ता थोडी कमकुवत झाली होती. राज्य/प्रांतिक सरकारे प्रबळ होत होती. कर व उत्पन्नाच्या बाबतीतही केंद्र सरकारचे उत्पन्न भरपूर घटले होते. हाँगकाँगचे हस्तांतरण व्हायचे होते. भ्रष्टाचार, पक्षातील स्थानिक नेत्यांची दंडेली, गुंडगिरी यामुळे सरकारचे नियंत्रण करणेही अवघड झाले होते. याच काळात पक्षाने सरकार व सरकारच्या सर्व संस्थांवर नियंत्रण मिळविले. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणुका व खासगी व्यापारी यांचे आगमन होत होते. अशा खासगी उद्योजकांना व महत्त्वाच्या गुंतवणूकदारांना पक्षाचे सदस्य करून घेतले गेले. यामुळे संपत्तीला प्रतिष्ठा मिळालीच, शिवाय पक्षाचे सदस्यत्व म्हणजे पैसा मिळविण्याचे महत्त्वाचे साधन झाले आणि त्यातून प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला. अनेक देशांमध्ये जिथे आर्थिक सुधारणा झाल्या, तिथे सरकारी उपक्रमांचे अंशत: वा पूर्णत: खासगीकरण करण्यात आले. चीनमध्ये मात्र अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक उपक्रमांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न झाला नाही. याचे कारण- पक्षाचे सरकारवरील आणि सरकारच्या संस्थांवरील व कंपन्यांवरील असलेले नियंत्रण. सरकारी उपक्रमांचे अस्तित्व पक्षासाठी व पक्षाच्या सैद्धांतिक भूमिकेसाठी महत्त्वाचे होते.

या ऊर्जा, वीज, सार्वजनिक वाहतूक, स्टील, खनिजे पायाभूत क्षेत्रातील व इतर राष्ट्रीय महत्त्वाच्या कंपन्यांचे, सरकारी कंपन्यांचे, उपक्रमांचे तसेच सरकारचे विभाग म्हणून ज्या संस्था आर्थिक उत्पादन करीत होत्या त्यांचे कॉर्पोरेटायझेशन करण्यात आले. म्हणजे, त्या विभागाचे कंपनीत वा कॉर्पोरेशनसारख्या स्वायत्त संस्थेत रूपांतर करण्यात आले. त्यांना उत्पादकता वाढविण्यासाठी नवे तंत्रज्ञान व व्यवस्थापनशास्त्रातील तंत्रे अंगीकारण्यास प्रवृत्त करण्यात आले, आवश्यक स्वायत्तता व मर्यादित स्वातंत्र्य देण्यात आले. संस्थांची व उद्योगांची पुनर्रचना करून अनावश्यक कर्मचाऱ्यांना चक्क नारळ देण्यात आला. अशा रीतीने उत्पादनाच्या किमती कमी करण्यात आल्या, व नव्या तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्पादकता वाढविण्यात आली आणि कार्यक्षमताही वाढविण्यात आली. याही पुढे जाऊन या कंपन्या व संस्था जगभराच्या स्टॉक एक्स्चेंजवर नोंदविण्याचा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रमही चीनने राबविला. वास्तविक पाहता चीनमधील सरकारी विभाग चालविले जातात त्या पद्धतीने सरकारी उद्योग चालविले जात असत. भांडवलशाहीमध्ये संस्थेचे/कॉर्पोरेशनचे/ कंपनीचे स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र भागभांडवल, आर्थिक व प्रशासकीय स्वायत्तता, नियमनासाठी भागभांडवलाचे स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग- ही जी पद्धत अंगीकारली जाते, ती चीनमध्ये नव्हतीच. 1949 मध्ये स्थापन झालेल्या साम्यवादाच्या नव्या राजवटीने खासगी मालमत्ता ही संकल्पनाच जवळजवळ काढून टाकली होती.

 मात्र 1978 ते 1989 च्या दरम्यान परदेशी भांडवल चीनमध्ये आले, त्याचबरोबर पाश्चिमात्य भांडवलशाहीच्या संलग्न संस्थांचे महत्त्वही चीनला कळून चुकले होते. जागतिक बँकेकडून साह्य घेताना आर्थिक साह्यापेक्षा अर्थव्यवस्थेची भांडवलशाही पद्धतीने संस्थात्मक पुनर्बांधणी करणे आवश्यक आहे, हेही सरकारला कळले होते. सरकारी उद्योगांचे सरकारी कंपनीत रूपांतर करणे, उद्योगांचे मूल्यमापन करणे, भागभांडवलाची निश्चिती करणे, कंपनी भागभांडवलाचा पॅटर्न ठरविणे आणि मोठ्या सरकारी उद्योगांचे जगातील महत्त्वाच्या विविध स्टॉक एक्सेंजमध्ये लिस्टिंग करणे- या साऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या बाबी असल्याने 1992 नंतर यासाठी मेरिल लिंच, मॉर्गन स्टॅन्ले यांसारख्या अमेरिकन तज्ज्ञ आणि आर्थिक व व्यवस्थापन सल्लागार संस्थांची मदत घेण्यात आली. वर-वर हे उद्योग सरकारी नियंत्रणाखाली असले, तरी त्यांच्यावर प्रत्यक्ष नियंत्रण पक्षाचे व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे होते. ही महत्त्वाची बाब चक्क दडवून ठेवण्यात आली!

शांघाय पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन या 40,000 वर कर्मचारी असलेल्या मोठ्या कंपनीचे कॉर्पोरेटायझेशन व स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग करण्याचे काम मेरिल लिंचने सुरुवातीच्या काळात केले. या कंपनीवर सरकारचे नियंत्रण आहे, एवढेच कंपनीच्या प्रॉस्पेक्टसमध्ये नमूद केले गेले. पक्षाचे थेट नियंत्रण चीनमधील कंपन्यांवर असते, ही बाब त्या वेळी व नंतरही कधी उघड झाली नाही. अशाच पद्धतीने इतर अनेक मोठ्या सरकारी उपक्रमांची पुनर्रचना करून त्यांचे स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग करण्यात आले. याचा फायदा असा झाला की- जगाच्या आर्थिक, औद्योगिक व वित्तीय पटलावर आकाराने अवाढव्य असणाऱ्या चिनी सरकारी कंपन्यांचे आगमन झाले. मोठ्या चिनी कंपन्यांना जगभराच्या व्यापारात सहभागी होता आले. अर्थात, सरकारने ही काळजी घेतली की, जगभरातील स्टॉक एक्स्जेंचमध्ये फक्त 15-20 टक्क्यांपर्यंतच शेअर्स विक्रीसाठी ठेवले जातील. बाकीचे सारे शेअर्स सरकारकडे ठेवून त्याची मालकी सरकारकडेच राहील याची काळजी घेण्यात आली. लिस्टिंग झाल्यावर सरकारी कंपन्यांनी 15/20 टक्के शेअर विकून जगभरातून चांगला पैसा गोळा केला. उपक्रमांचे लिस्टिंग झाल्यावर दक्षिण चीनमधील अनेक कंपन्या मालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू लागल्या व वॉलमार्टंसारख्या परदेशी कंपन्यांना माल पुरवू लागल्या. पुढे वित्तीय परिस्थिती सुधारल्यावर चिनी कंपन्यांनी परदेशामध्ये चांगल्या कंपन्या ताब्यात घेणेही सुरू केले.

नोकरकपात, कार्यक्षमता वाढविणे, नवे तंत्रज्ञान वापरणे अशा पुनर्रचनेमुळे औद्योगिक कामगारांचे रोजगार गेले. 1992-93 ते 2002-03 या दहा वर्षांत अशा पुनर्रचनेमुळे 5 कोटींहून अधिक कामगारांना आपली नोकरी गमवावी लागली. नेहमी मिळणाऱ्या सोई-सवलतींपासून 18 कोटी कामगार वंचित झाले. कम्युनिस्ट चीनमध्ये कामगाराला आयुष्यभर नोकरी व सेवानिवृत्तीनंतरचेही पेन्शन या सवलतींची सवय झाली होती. ते सारे आता गेले आणि काम, मोबदला व सवलती यांची सांगड घालण्यात आली. 1978 ते 1989 व 1992 नंतरही सरकारी उद्योगांच्या पुनर्रचनेमध्ये मोठ्या प्रमाणावर डाऊनसाइझिंग करून आणि उच्च तंत्रज्ञान, उत्तम कार्यपद्धती, व्यवस्थापनाच्या पद्धती वापरून उत्पादकता व कार्यक्षमता वाढविण्यात आली. सैन्यदलाचे 1978 ते 1989 च्या दरम्यान आधुनिकीकरण करतानाही सैन्यातील तांत्रिक क्षमता, शस्त्रास्त्रे यांत चांगले तंत्रज्ञान वापरून सुधारणा केल्या आणि सैन्यदलाची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी केली. 1992 नंतरच्या आर्थिक सुधारणांमुळे अर्थव्यवस्था आकाराने मोठी झाली. आकाराने इतक्या मोठ्या असलेल्या अर्थव्यवस्थेला साजेशी बँकिंग व्यवस्था व आर्थिक सेवाक्षेत्रेही उदयास आली. मुख्य म्हणजे, 2003 पर्यंत चीनमध्ये बँकिंग क्षेत्राचे नियमन करणारी स्वतंत्र संस्था नव्हती. ती संस्था 2003 मध्ये अस्तित्वात आली. झु रोंगजी यांनी 1990 च्या दशकातअर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा केल्या, त्यापैकी बँकिंगमधील सुधारणा महत्त्वाच्या होत्या.

डेंग यांनी जानेवारी 1992 मध्ये दक्षिण चीनचा महत्त्वपूर्ण दौरा केला, त्यात त्यांना भविष्यकाळातील आर्थिक बदलाची ब्लू प्रिंट तयार करण्यात झू रोंगजी यांची खूप मदत झाली होती. झू हे शांघायचे. डेंग यांनी झू यांना शांघायहून बीजिंगला 1992 मध्ये धाडले व आर्थिक विकास मंडळाचे (Economic Development Council) प्रमुख केले. त्यांच्यामार्फत जियांग झेमिन यांनी अनेक गुंतागुंतीच्या आर्थिक सुधारणा करवून घेतल्या. पुढे 1997 मध्ये झू रोंगजी हे चीनचे पंतप्रधानच झाले. 1992 नंतरच्या दुसऱ्या पर्वातील सर्व संस्थात्मक सुधारणा करण्यात झू रोंगजी यांचा सिंहाचा वाटा होता. पाश्चिमात्य वर्तमानपत्रे झू यांचा उल्लेख चीनचे आर्थिक सर्वेसर्वा वा ‘चायनाज इकॉनॉमिक झार’ असा करीत. त्या सर्व काळात रशियाचे गोर्बाचेव्ह हे पाश्चात्त्य देशात मोठे सुधारक समजले जात. मात्र गोर्बाचेव्ह यांनी रशियाला व कम्युनिस्ट पक्षाला कमकुवत केले, असेच चीनमध्ये समजले जाई; त्यांचे नाव कौतुकाने घेतले जात नसे. झू रोंगजी हे अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करीत असल्याने त्यांना पाश्चात्त्य माध्यमांमध्ये चीनचे गोर्बाचेव्ह असे संबोधिले जाई. काकुळतीला येऊन ‘मी चीनमधील झु रोंगजी आहे, रशियातील गोर्बाचेव्ह नाही’ असे त्यांना अनेकदा म्हणावे लागे.

आर्थिक सत्तेचे 1997 पूर्वीच्या दोन दशकांत बऱ्यापैकी विकेंद्रीकरण झाले होते. यात चीनमधील बँका व वित्तीय संस्था यांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होता. इतर उद्योग व संस्था यांच्याप्रमाणेच बँका व इतर आर्थिक संस्थाही स्थानिक कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावाखाली आल्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्जे दिली गेली. या साऱ्या सरकारी बँका असल्याने त्यांची तूट अर्थातच सरकारची तूट होती. अशा रीतीने बँकिंग व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर निधी गुंतून पडला होता. जियांग झेमिन आणि झू रोंगजी यांनी बँकांवरील नियंत्रण कडक करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला व बँकांचे केंद्रीकरण सुरू केले. 1997 मधील आशियाई आर्थिक पेचप्रसंगात दक्षिण-पूर्व आशियातील अर्थव्यवस्थेत गुंतविलेला पैसा पाश्चिमात्य संस्थांनी काढून घेतला. त्यामुळे पूर्व आशियाई देशांत मोठा आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला. याचा चीनच्या बँकिंग व्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला.

 पूर्व आशियाई देशांतील अनेक गुंतवणूकदारांनी/उद्योगांनी चीनमध्ये गुंतवणूक केली होती. ते स्वत:च अडचणीत आल्याने त्यांना कर्जे दिलेल्या चीनमधील बँकाही अडचणीत आल्या. चीनमधील सर्वांत मोठी बँक म्हणजे इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना (ICBC). या बँकेने 1998 मध्ये दिलेली 57 टक्के कर्जे बुडित खाती जमा झाली, इतकी परिस्थिती गंभीर झाली. सर्व बँकांनी मिळून 2000 पूर्वी दिलेल्या कर्जापैकी 45 टक्के कर्जे बुडित खाती गेली. सन 2000 पर्यंत चीनमधील बँकिंग व्यवस्था भ्रष्टाचाराने किती पोखरली गेली होती, हे यावरून स्पष्ट होते. बँकांच्या स्थानिक शाखांचे अधिकार मर्यादित करणे, दिलेल्या कर्जासाठी त्यांना जबाबदार धरणे, अधिकारांचे केंद्रीकरण करणे यासाठी झू रोंगजी यांनी पॉलिट ब्युरोच्या सदस्यांच्या दोन समित्या करून त्यांच्या नियंत्रणाखालील देशातील साऱ्या बँका आणल्या.

अशा रीतीने महत्त्वाचे सर्व अधिकार बीजिंगमध्ये राहतील याची त्यांनी काळजी घेतली. बँकांसंबंधीचे स्थानिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिलेले सारे अधिकार काढून घेतले. ज्या स्थानिक बँकांनी या केंद्रीय अधिकाराला आव्हान दिले, त्या बँका बंद करण्याची धमकी दिली गेली. बँकप्रमुख व अधिकारी यांच्यावर पॉलिट ब्युरोचे नियंत्रण आणले गेले. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी पक्षातील सदस्यांच्या समित्या नेमण्यात आल्या. या दोन्ही समित्यांना कायदेशीर स्थान नव्हते, हे विशेष! गंमत म्हणजे, या सर्वांमध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला बाहेरच ठेवले होते. ही तफावत मागाहून दूर करण्यात आली. पक्षाची व पदाधिकाऱ्यांची सरकारी यंत्रणांवर आणि अर्थव्यवस्थेवर किती घट्ट पकड होती, हे यावरून लक्षात येईल. पॉलिट ब्युरोचे सदस्य व पक्षाशी संबंधित सेन्ट्रल कमिटीचे पक्षाचे महत्त्वाचे 300 पदाधिकारी हेच चीनच्या आर्थिक सत्तेचे खरे सूत्रधार होते. मोठ्या सरकारी कंपन्या, बँका यांच्या मुख्याधिकारीपदी पक्षाचे नेते व ज्यांना बँकिंग वा व्यवस्थापनाचा थोडा अनुभव आहे, त्यांना नेमण्यात येत असे. एकंदरीतच या सर्व सुधारणांमध्ये पक्षातील नेते व पदाधिकारी या साऱ्यांचा सरळ संबंध होता.

जियांग झेमिन यांचे शांघायच्या पक्षातील टीकाकार त्यांच्या पाठीमागे त्यांना फ्लॉवर पॉट (शोभेची वस्तू) असे म्हणत. सुरुवातीला गोंधळात कार्य सुरुवात केलेले जियांग झेमिन यांनी पुढे स्वतःचा उत्तम जम बसवीत आर्थिक विकास, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, आर्थिक सुधारणा, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, सरकारी उद्योगांची पुनर्रचना, अर्थव्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या नियामक संस्थांची निर्मिती यांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे त्यांच्या काळात मोठा आर्थिक विकास झाला. भ्रष्टाचार व इतर अनेक सामजिक प्रश्न त्यांच्या काळात निर्माण झाले खरे; मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची मोठी कोंडी झालेली असतानाही त्यांनी थंड डोक्याने काम करून व स्थिर नेतृत्व देऊन चीनला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, हे मान्य केले पाहिजे.

(क्रमश:)

Tags: साधना सदर चीन सतीश बागल sadar sadhana series super power china dr satish bagal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. सतीश बागल,  नाशिक
bagals89@gmail.com

लेखक माजी सनदी अधिकारी आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके