डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'बळीवंश'च्या निमित्ताने डॉ. आ. ह. साळुंखे यांची मुलाखत...

महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यांचे 'बळीवंश' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. यापूर्वी त्यांची 'हिंदू संस्कृती आणि स्त्री', 'धर्म की धर्मापलीकडे?', 'आस्तिकशिरोमणी चार्वाक', 'विद्रोही तुकाराम', ‘आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल', 'तुझ्यासह आणि तुझ्याविना' अशी पुस्तके गाजली आहेत. डॉ. साळुंखे यांची नव्या पुस्तकामागची भूमिका जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक डॉ. सुभाष के. देसाई यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत.

डॉ. देसाई:- नमस्कार. धर्म आणि संस्कृती यांची चिकित्सा करून विधायक मूल्यांचा पुरस्कार करणारे अभ्यासक म्हणून आपण महाराष्ट्राला सुपरिचित आहात. यापूर्वी आपली 25 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपला एक खास वाचकवर्ग आहे. हा वाचकवर्ग आपल्या 'बळीवंश' या पुस्तकाची उत्कंठेने वाट पहात होता. आता त्याची प्रतीक्षा संपली आहे. आपल्या या पुस्तकाच्या लेखनामागचे उद्दिष्ट काय आहे?

डॉ. साळुंखे:- बहुजन समाजाची सांस्कृतिक मुळे शोधणे, त्यांचे अस्सल स्वरूप जाणून घेणे, हे या लेखनामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्राचीन भारतातील बहुजन समाजाने आचरणात आणलेल्या उदात्त मानवी मूल्यांना साधार उजाळा देण्याचा एक प्रयत्न, या दृष्टीने माझ्या या लेखनाकडे पाहता येईल. ज्यांच्या अस्तित्वाचे घटक स्वतःमध्ये घेऊन आपण जगत आहोत. त्यांच्या हृदयांची थोडी तरी स्पंदने स्वतः अनुभवली पाहिजेत, ही माझी भावना आहे.

डॉ. देसाई:- 'बळीवंश' या नावातून आपण काय सुचवू इच्छिता? 

डॉ. साळुंखे:- ‘बळी’ हा प्राचीन भारतातील एक अत्यंत सद्गुणी सम्राट होता. तो अत्यंत प्रजावत्सल होता. म्हणूनच, “सात काळजांच्या आत जपून ठेवावा, असा जिवलग”, या शब्दांत मी त्याचे वर्णन केले आहे. त्या बळीचा वंश तो 'बळीवंश' होय. मी प्रस्तुत पुस्तकात त्याचा 'शरीरवंश' आणि 'विचारवंश' अशा दोन दृष्टींनी विचार केला आहे. शरीरवंशामध्ये प्रामुख्याने हिरण्याक्ष. हिरण्यकशिपू, प्रल्हाद, विरोचन, कपिल या त्याच्या पूर्वजांचा आणि जालंधर व बाण या वंशजांचा विचार केला आहे. विचारवंशामध्ये वेदान्त तत्त्वज्ञान, वेनराजाचा धार्मिक दृष्टिकोन आणि सम्राट जनकाची अग्निहोत्राविषयीची भूमिका यांचे विवेचन केले आहे.

डॉ. देसाई:- आपण ज्या बळीच्या नावाने या वंशाचा निर्देश केला आहे, त्याच्या आचारविचारांची काही वैशिष्ट्ये सांगाल का?

डॉ. साळुंखे:- मी रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथांच्या आधारे त्याची ठळक वैशिष्टये पुढील शब्दांत नोंदविली आहेत. आणि “आमचा लाडका बळीराजा?, तो तर तत्त्वदर्शिनी बुद्धी असलेला बुद्ध. प्रजेतील प्रत्येकाला त्याच्या श्रमाचा योग्य हिस्सा विभागून देणारा संविभागी. स्वतः सर्वांशी समतेने वागणारा आणि प्रजेतील सर्वांना परस्परांशी समतेने वागण्याची प्रेरणा देणारा समतावादी. यज्ञयागांच्या भ्रामक कर्मकांडाऐवजी निर्मितीगर्भ कृषीला जपणारा 'बळीराजा'. वैदिकांची शोषक व्यवस्था नाकारताना एक भावात्मक, सकारात्मक, क्रियाशील समाजरचना घडवून आणणारा समाजशिल्पकार. कारस्थानांना आणि कपटांना निर्मळ, निरागस मनाने सामोरा जाणारा उन्नत महामानव. काही व्यक्ती व समूह यांचा अपवाद वगळता इतरांनी आपल्या हृदयासनावर प्रेममंत्राने अभिषिक्त केलेला आणि सम्यक् राज्यकर्ता असलेला सम्राट, पराभवातही पराभूत न होणारा शांतचित्त तत्त्ववेत्ता, हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे. असा जिवलग!" 

डॉ. देसाई:- बहुजनांच्या परंपरेत बळीराजाचे आणखी काही महत्त्वाचे निर्देश आढळतात का?

डॉ. साळुंखे:- संत कबीरांनी केलेला एक निर्देश महत्त्वाचा आहे. बळीला ईश्वराने फसविलेले नाही. असे स्पष्टपणे नोंदवून ईश्वर आणि वामन यांचे वेगळेपण त्यांनी दाखवून दिले आहे. वामन हा ईश्वराचा अवतार आहे, या रूढ धारणेमुळे संत तुकारामांनी मात्र हा मुद्दा वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे. त्यांच्या मनात ईश्वराविषयी नितांत आदर असूनही सद्गुणी बळीला जुलूम करून पाताळात ढकलल्याबद्दल त्यांनी त्याला निष्ठुर, निर्गुण, दयामाया नसलेला, कोणीही केलेले नाही असे कठोर कर्म करणारा, इत्यादी विशेषणे वापरून दोष दिला आहे. महात्मा फुले यांनी बळीला कुळस्वामी म्हटले असून, त्याच्याविषयी पोवाड्यासारखा एक अखंड लिहिला आहे. भारतभूमीला त्यांनी वारंवार 'बळीस्थान' असे म्हटले आहे.

डॉ. देसाई:- बळी आणि वामन यांच्या संदर्भात वामनाच्या तीन पावलांची कथा खूप प्रसिद्ध आहे. आपण या कथेकडे कोणत्या दृष्टीने पाहिले आहे?

डॉ. साळुंखे:- या कथेचा वाच्यार्थ हे फक्त एक फसवे आवरण आहे. खरे, तर तिचा प्रतीकात्मक अर्थ वैदिक ग्रंथांनीच स्पष्ट केला आहे. वामन हा विष्णूचा अवतार मानला जातो आणि विष्णू म्हणजे यज्ञ हे पुन्हा पुन्हा सांगण्यात आले आहे. स्वाभाविकच, यज्ञाच्या कर्मकांडाद्वारे लोकांची मनोभूमी व्यापणे, हे वामनाचे पहिले पाऊल आहे. वेद हे त्याचे दुसरे पाऊल होय. वेद म्हणजे केवळ चार पुस्तके नव्हेत. ज्ञान, सत्ता, संपत्ती प्रतिष्ठा इत्यादींच्या प्राप्तीचे द्वार हे वेदांचे स्वरूप होते. वेदांची चिकित्सा करायची नाही, या सिद्धांतामुळे स्वतंत्रपणे विचार करण्याचा मार्ग बंद झाला. वाणी हे त्याचे तिसरे पाऊल होय. वाणीच्या द्वारे वैदिकांनी बहुजनांना कसे गुलाम बनविले, हे स्पष्ट व्हावे. म्हणून या मुद्द्याची सविस्तर चर्चा प्रस्तुत पुस्तकात करण्यात आली आहे.

डॉ. देसाई:- आपण भूतकाळात, इतिहासात इतके का रमता? आधुनिक काळाला साजेसा माणूस निर्माण करणे अधिक महत्त्वाचे नाही का?

डॉ. साळुखे:- खरे तर, माझे भूतकाळाविषयीचे सर्व लेखन नवा माणूस निर्माण करण्याच्या उद्देशानेच केलेले आहे. भूतकाळाचे हे अध्ययन भूतकाळाचे ओझे वाहण्यासाठी नसून त्यातील अनिष्ट घटक दूर करून भारतीय समाजाचा वर्तमान व भविष्यकाळ उज्वल करण्यासाठी आहे. उदा. यज्ञाच्या कर्मकांडात अडकून, ग्रंथप्रामाण्याला जपत राहण्याऐवजी कर्मकांडाच्या जंजाळातून बाहेर पडून चिकित्सकवृत्तीने नवा, स्वतंत्र, प्रतिभाशाली समाज घडविण्याचे स्वप्न हितकारक नाही काय?

डॉ. देसाई:- इतिहासाची मांडणी करताना आपण काही काळजी घेता का?

डॉ. साळुंखे:- खरे तर, या प्रश्नाचे उत्तर माझ्या वाचकांनी देणे योग्य ठरेल. माझ्या मांडणीचे मूल्यमापन त्यांनीच तर करायचे आहे. आता, आपण विचारलेच आहे म्हणून काही गोष्टी स्पष्ट करतो. “मी केलेले आत्मसमर्थन” या दृष्टीने आपण त्यांच्याकडे पाहणार नाही, असा माझा विश्वास आहे. माझे लेखन जितके साधार करता येईल. तितके करण्याचा माझा प्रयत्न असतो. माझी मांडणी अनेकदा प्रस्थापित मतांना धक्का देणारी वाटली, तरी ती शक्य तितक्या नम्रतेने आणि ऋजुतेने करण्याचा माझा प्रयत्न असतो. परंतु प्रचलित समजुतीपेक्षा काही वेगळे मत ठामपणे मांडणे हाच अनेकांना कठोरपणा वा पाखंडीपणा वाटतो, याला मात्र माझा काही इलाज नसतो.

डॉ. देसाई:- प्रस्तुत पुस्तकात आलेले अशा प्रकारचे एखादे धक्कादायक मत सांगाल का?

डॉ. साळुंखे:- प्रल्हादाची कथा आपल्यापुढे कशी आली आहे, ते आपण जाणताच, प्रल्हाद हा बळीचा आजोबा. तो आपल्या वडिलांच्या विरोधात विष्णूचा भक्त झाल्याचे आपल्या मनावर ठसविण्यात आले आहे. प्रत्यक्षात विष्णूने त्याची हत्या केलेली होती, हे मी पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणायचाच असला, तर तो वस्तुनिष्ठ स्वरूपात जाणावा, अन्यथा त्या वाटेलाच जाऊ नये, असे मला वाटते, ते अशा घटनांमुळेच होय.

डॉ. देसाई:- आपल्या लिखाणामुळे समाजात सांस्कृतिक संघर्ष वाढेल, असे वाटत नाही का?

डॉ. साळुंखे:- वैचारिक पातळीवर विधायक संघर्ष होऊन तो समताधिष्ठित समाजनिर्मितीला कणभर का होईना पोषक ठरला, तर मला आनंदच होईल. भारतीय समाजातील शंभर टक्के लोकांची शंभर टक्के प्रतिभा फुलावी, असे मला उत्कटत्वाने वाटते. त्यासाठी काही मोल द्यावेच लागेल. पण या प्रक्रियेत विध्वंसक, हिंसक संघर्षाला वाव नाही. मी अशा संघर्षाला कधी पाठिंबा दिलेला नाही आणि पुढेही कधी देणार नाही.

विधायक संघर्षही होऊ नये, असे कोणी मानत असेल, तर ते मात्र मान्य करता येणार नाही. समाजातील अज्ञान, गुलामगिरी, विषमता, दारिद्र्य इत्यादी अनिष्ट गोष्टी दूर करण्यासाठी विधायक चिकित्साही नको, असे आपण म्हणत असाल, तर माझा एक प्रतिप्रश्न आहे. अशा चिकित्सेमुळे प्रस्थापितांना काही खरचटेल, याची काळजी जरूर करा. परंतु ज्यांनी हजारो वर्षे आणि पिढ्यान् पिढया आपल्या काळजांवर जखमा अनुभवल्या आहेत, त्यांच्या वेदनांचाही थोडा विचार करणार आहात की नाही? जे कोणी असा विचार करतील, ते सांस्कृतिक संघर्षाचा बागुलबुवा उभा करणार नाहीत, असा माझा विश्वास आहे. तरीही मी एक गोष्ट आग्रहपूर्वक नोंदवू इच्छितो. मी संघर्षाला प्रोत्साहन देण्यासाठी लिहीत नाही, तर विवेकाला आवाहन करण्यासाठी लिहीत आहे.

डॉ. देसाई:- आपल्या या लेखनात अनेक मिथकांचे विवेचन आढळते. पण तत्त्वचिंतनाचा काही भाग आहे, असे दिसत नाही. असे का?

डॉ. साळुंखे:- खरे तर, आपण म्हणता त्याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. बळीवंशाने केलेल्या तत्त्वचिंतनाचे विस्तृत विवेचन प्रस्तुत पुस्तकात आहे. प्रल्हादाच्या काळातच चार्वाक, सांख्य, जैन, बौद्ध इत्यादी दर्शनांचे बीज रुजू लागले होते. प्रल्हादाचा पुत्र विरोचन जीवनवादी, इहवादी असा महान तत्त्ववेत्ता होता. प्रल्हादाचा दुसरा पुत्र कपिल हा सांख्य दर्शनाचा प्रवर्तक होता. 

डॉ. देसाई:- बहुजनांच्या ऱ्हासाची काही कारणमीमांसा आपण केली आहे काय?

डॉ. साळुंखे:- होय. एक तर संपूर्ण पुस्तकात जागोजागी अशी मीमांसा आली आहेच. शिवाय, या विषयावर पुस्तकात एक स्वतंत्र प्रकरणही आहे. एका बाजूने वैदिकांनी केलेले अन्याय आणि दुसऱ्या बाजूने बहुजनांतील फाटाफूट, फितुरी, स्त्रीमोह इत्यादी कारणांचे विवेचन करण्यात आले आहे.

डॉ. देसाई:- बहुजनांच्या ऱ्हासाचे एखादे उदाहरण सांगाल का? 

डॉ. साळुंखे:- आपण बहुजनांच्या भाषेचेचं उदाहरण घेऊ या. दास, दस्यू, असुर, राक्षस, कद्रू, बुद्ध या शब्दांकडे पाहिले, तर बहुजनांचा विविध प्रकारचा ऱ्हास त्यांच्या भाषेतही प्रतिबिंबित झाल्याचे दिसेल. दास आणि दस्यू हे शंभर शंभर किल्ल्यांचे स्वामी असलेले भूमिपुत्र सम्राट. आज त्या शब्दांचा अर्थ गुलाम आणि दरोडेखोर असा झाला आहे. ‘असुर’ या शब्दाचा मूळचा अर्थ ‘सामर्थ्यशाली' आणि ‘राक्षस’ या शब्दाचा अर्थ 'रक्षक' असा होता. कद्रू ही नागांची सद्गुणी आद्यमाता होती. आज या शब्दाचा अर्थ 'हलक्या मनाचा' असा झाला आहे. ‘बुद्ध’ या शब्दाचा ‘बुद्दु’ हा जो अपभ्रंश आहे, त्याविषयी तर अधिक काही लिहिण्याची आवश्यकता नाही. 

डॉ. देसाई:- भावी लेखनाच्या योजना काय आहेत?

डॉ. देसाई:- सध्या 'सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध' या पुस्तकाचे लेखन चालू आहे. येत्या वर्ष, दीड वर्षांत ते लिहून पूर्ण व्हावे, असा प्रयत्न आहे. त्यानंतर 'असुरायण’ असा एक विषय डोक्यात आहे. 'बळीवंश' या पुस्तकात विस्तारभयास्तव जे मांडता आले नाही, ते त्या पुस्तकात मांडेन. अर्थात, ती दूरची गोष्ट झाली. 

डॉ. देसाई:- आपल्या या लेखनास अंतःकरणपूर्वक सदिच्छा.

डॉ. साळुंखे:- धन्यवाद.

मुलाखतकार : डॉ. सुभाष के. देसाई

प्रकाशक : लोकायत प्रकाशन, सातारा,

पृष्ठ : 440, मूल्य : 280/- रुपये 

******

सत्यशोधकी साहित्यिकांनी आशय आणि अभिव्यक्तीशी तडजोड करू नये.

- डॉ. आ. ह. साळुंखे

सत्यशोधकी साहित्यिकांनी आशय आणि अभिव्यक्तीशी तडजोड करू नये. सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाकडे पहावे आणि ब्राह्मणी समाजव्यवस्था बदलण्यासाठी आपल्या लेखणीचा उपयोग करावा. त्यासाठी खूप वाचन, मनन, चिंतनाची आवश्यकता असते. याकडे सत्यशोधकी लेखकाने लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्हा पातळीवर सत्यशोधकी साहित्य, संस्कृती व संशोधन परिषदेची स्थापना करून सत्यशोधकी पद्धतीने लिहिलेल्या पुस्तकांची समीक्षा करावी. साहित्यिकांच्या संवाद बैठका व्हाव्यात, त्यामध्ये वारंवार चर्चा व्हाव्यात. तेव्हाच बहुजन समाजातील साहित्यिकांमध्ये आत्मभान निर्माण होईल. नकारासोबत निर्मितीची प्रक्रिया सुरू राहिल्यास सत्यशोधक चळवळ गतिमान होईल. त्यामधूनच परिवर्तनाच्या चळवळीचा जोर वाढेल, असे विचार राष्ट्रभाषा प्रचारसमिती येथे झालेल्या विदर्भस्तरीय सत्यशोधकी लेखक चिंतन शिबिरात आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रमुख मार्गदर्शक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी सतत संघर्षाची भूमिका न घेता संवादाचा मार्ग हाताळावा. सोवळेपणा करू नये. तेव्हाच चळवळीत विचारांची माणसं वाढत जातील असेही ते म्हणाले.

******

Tags: डॉ. सुभाष के. देसाई आ. ह. साळुंखे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके