डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनातील भाषण

‘ग्लोबल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च ट्रस्ट’च्या वतीने गेल्या वर्षी, पहिले स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन पुणे येथे झाले. दुसरे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन 8 व 9 जानेवारी 2011 रोजी औरंगाबाद येथे झाले. या संमेलनात मालदीवचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांनी अध्यक्षीय भाषण केले. दरवर्षी, देशभरातून लाखो विद्यार्थी राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देतात, त्या विद्यार्थ्यांसमोर मूलभूत प्रश्न उपस्थित करून जीवनातील यशापयश आणि एकूणच प्रशासनावर टोकदार भाष्य करणारे ते संपूर्ण भाषण प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक  

स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन  हे चार शब्द जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा पुन्हा एकदा स्वत:शीच उच्चारले : ‘स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन!’ लक्षात आलं की, या चार शब्दांमध्ये परस्पर संबंधच नाही किंवा असला तरी तो मला कळत नाही. मला या संमेलनाच्या आयोजकांचं कौतुक वाटलं की, ज्या माणसाला या शब्दांचा अर्थच कळत नाही त्याला ते सातासमुद्रापलीकडून संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी बोलवत आहेत. मागच्या वर्षी मी येऊ शकलो नव्हतो म्हणून अपराधी भावनेच्या ओझ्याने ‘हो’ म्हटले, पण पुढे काय? अध्यक्षांनी शहाणपणाचे चार शब्द सांगणे गरजेचे असते आणि मी तर या चार शब्दांनीच गारठलो होतो.

श्रोत्यांना कसा चकवा देता येईल याचा विचार करीत होतो. दोन-तीन महिन्यांपूर्वीचा एक दिवस. मनात संमेलनाचा विचार सुरूच होता. एक ईमेल उघडली, वाचू लागलो...

‘‘नमस्ते सर! माती, पंख, आकाश... डोळ्यासमोर अंधार दिसू लागला की मला लगेच हे पुस्तक आठवते. निराशा दूर पळून जाते. एक दिवस मीसुद्धा आयएएस होणारच असा विश्वास वाटू लागतो आणि पुन्हा अभ्यासाला लागते. साताऱ्याजवळच्या छोट्याशा गावातून आयएएसचे स्वप्न साकारण्यासाठी दहावीनंतर पुणे येथे आले. सकाळी कॉलेजला जाताना आई-बाबा यांच्यासोबत तुमचीही सहज आठवण होते आणि मग आयएएसचे स्वप्न चैन पडू देत नाही. पुस्तकाच्या माध्यमातून माझी प्रेरणा बनलात आपण, यासाठी मी आपली ऋणी राहीन. तुमचे आशीर्वाद असू द्यात, माझ्यासाठी खरंच मोलाचे आहेत.’’

स्नेहा कुलकर्णी या विद्यार्थिनीच्या त्या ईमेल सारख्या ईमेल्स मला जवळजवळ रोज येतात. पत्रेही नियमित येतात. स्नेहाच्या मनात आयएएसचे स्वप्न त्या पुस्तकाने जागे केले. पण त्या पुस्तकाने अनेकांना जगण्याचीच प्रेरणा दिली असे सगळ्या वयोगटांतले लोक मला सांगतात. स्नेहाच्या ईमेलमुळे एकदम माझ्या मनात ‘युरेका युरेका’ हे शब्द प्रगटले. मी मनाशी म्हटलं, अरे कळतनकळत ‘माती पंख आणि आकाश’ हे पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या साहित्यातले मराठीत पहिले पायोनिअरिंग किंवा पायाभूत पुस्तक आहे. व्यक्तीला स्पर्धा परीक्षांसाठी जागृत करणारं, त्याला प्रेरित करणारं आणि त्याच्या आशा तेवत ठेवणारं हे पहिलं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारत नाही, सामान्यज्ञान विचारत नाही, व्यक्तिमत्त्वाची परीक्षा घेत नाही, पण तुम्ही आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर असाल तरी तुमच्या मनाची मशागत हे पुस्तक थांबवत नाही. या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा या संमेलनात व्हावा हा दुग्धशर्करा योग आहे, मी स्वत:ला भाग्यवान समजतो.

औरंगाबाद शहरात हे संमेलन  संपन्न होत आहे ही गोष्ट मला विशेष आनंदाची वाटते. मी मुंबईत नागरी सेवा स्पर्धा परीक्षेसाठीचे आवेदन पत्र भरले, पण तिथल्या मित्रांची झुंबड (मी सुरुवातीपासूनच जगमित्र आहे) टाळण्यासाठी मी प्राथमिक परीक्षांसाठी औरंगाबाद केंद्र निवडले. इथे वेगळाच प्रश्न होता. कुणीच खास ओळखीचे नव्हते. मी त्या वेळेस इथल्या विद्यापीठात वृत्तपत्र विभागाचे प्रमुख म्हणून काम करणाऱ्या के.सुधाकर पवार यांना ओळखत होतो, पण थोडा थोडा. मुंबईत बॅरिस्टर पी.जी.पाटील सरांकडून पवार सरांसाठी एक पत्र घेतले आणि एक दिवस छोटी बॅग घेऊन पुस्तकांसह मी पवारसरांच्या क्वार्टरवर हजर झालो. त्यांच्या संपूर्ण परिवारानेच सहजपणे मला स्वीकारले आणि गंमत म्हणजे तिथूनच मी प्रिलीयमची पायरी यशस्वीरीत्या ओलांडली. सो, थँक्यू सुधाकर पवार सर! थँक्यू औरंगाबाद!!

 या संमेलनाच्या संयोजक सौ.वैशाली पाटील यांना मी एक प्रश्न विचारला होता की, श्रोत्यांना माझ्या भाषणातून काय अपेक्षा असणार? तिने तुच्या वतीने ताबडतोब एसएमएस केला. ‘मार्गदर्शन आणि तुमचे स्वतंत्र विचार’ तीन शब्द पुन्हा गोंधळात टाकणारे. कारण यांचा संबंध स्पर्धापरीक्षा साहित्य संमेलनाशी कसा जोडायचा? मी विचार केला आणि ठरवलं की संयोजकांचं पन्नास टक्केच ऐकायचं. मार्गदर्शन नाही, पण विचार ऐकवायचे. नाहीतरी, एकाच सभामंडपात इतके बुद्धिमान युवक-युवती कधी भेटणार?

येथे मी स्पर्धापरीक्षा प्रक्रियेविषयी बोलणार नाही, कोणती पुस्तकं वाचावीत हेही सांगणार नाही, मौखिक किंवा व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी कोणती तयारी करावी हेही सांगणार नाही. पण या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन मांडणार आहे. मी स्पर्धापरीक्षेच्या शरीर रचनेकडे न जाता त्या मागच्या अध्यात्माकडे जाणार आहे आणि हे करत असताना काही परखड प्रश्न उपस्थित करणार आहे. स्पर्धापरीक्षांचा अट्टाहास कशासाठी? आपण स्पर्धापरीक्षा का देतो? एकदा स्पर्धापरीक्षा द्यायची ठरवल्यानंतर यशस्वी होण्यासाठी काय करतो? यशस्वी नाही झालो तर काय करतो? यशस्वी झाल्यावर काय करतो किंवा करावं? आणि सगळ्यात शेवटी या सर्व गोष्टींचा संबंध आपल्या जीवनाशी किंवा बदलत्या विश्वाशी कसा लावायचा? या प्रश्नांची गुरुकिल्ली माझ्याकडे नाही, पण आज आणि उद्या आपण ती शोधण्याचा प्रयत्न  करु या.

दर वर्षी भारतभर लाखो उमेदवार रात्रीचा दिवस करतात. पुस्तकं वाचतात, टिप्पणं काढतात, चर्चा करतात. व्यक्तिमत्त्व विकासाचा विचार करतात. गाव सोडतात, राज्य सोडतात, चार-पाच वर्षं शिकवणी लावतात. क्लासेस जॉईन करतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक हालअपेष्टा सहन करतात. अकल्पित अशा मनोवस्थेतून जातात. चक्रव्यूह भेदू पाहणाऱ्या अभिमन्यूसारखे लढतात. एकेक फळी जोडत पुढे जातात. ताकद, क्षमता, बुद्धिबळ सगळं असूनही यापैकी बहुसंख्य विद्यार्थी धारातीर्थी पडतात. यशस्वी झालेले, चक्रव्यूह कसा तोडला याची रसभरित वर्णने करिअर डायजेस्ट, सीएसआर आणि तत्सम बहुभाषी भावंडांना देतात. यशाच्या प्रत्येक दंतकथेमागे अपयशाचे कोट्यवधी हुंदके दबून राहतात. हे सगळं कशासाठी आणि खरोखरच याचा काही उपयोग आहे का?

नागरी सेवा स्पर्धा परीक्षा (मग ती संघलोकसेवा आयोगाची असो वा राज्यांची असो) देण्याआधी प्रत्येक उमेदवाराने हे सगळे मी का करतोय? हे माझ्यासाठी आहे का? आणि मी यासाठी आहे का? हे तीन प्रश्न स्वत:ला विचारले पाहिजेत. आयएएस, आयएफएस किंवा आयपीएस या ग्लॅमरस शब्दांचा फुगा फोडणे आवश्यक आहे. या सर्वार्थाने नोकऱ्या आहेत, हे विसरू नये. फक्त ग्लॅमरच्या दिशेने जायला लागले की दिव्यावर जाळून घेणाऱ्या पतंगासारखी आपली अवस्था होते. ‘मै माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ ही विचारपद्धती तारक नसून मारक आहे ‘मैं मैं बनना चाहता हूँ’ हा निर्धार असणं आवश्यक आहे. मी स्वत: अविचारी अनुकरण संस्कृतीच्या विरुद्ध आहे.

नागरी सेवा स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना ‘तुम्हाला सेवेत कशासाठी यावंसं वाटतं?’ असा प्रश्न गेली पाच-सहा दशकं विचारला जातो. याचं उत्तर ‘समाजसेवेसाठी, देशसेवेसाठी’ असंच बहुसंख्य उमेदवार देतात. खरं उत्तर ‘नोकरी मिळावी, अधिकार, सत्ता, मानसन्मान, पैसा मिळावा यासाठी’ असं असायला हवं. कारण ‘समाजसेवेसाठी’ आजकाल लोक स्वयंसेवी संस्थाही काढताना दिसत नाहीत. नोकरीच्या उंबरठ्यावर केवळ ध्येयवादापोटी अनेकजण अशी उत्तरं देत असतील! पण ही नोकरी हाच देशसेवेचा पर्याय नव्हे.

मला वाटतं नागरी सेवांना अर्ज करताना आपलं मन व मत स्वच्छ असायला हवं. प्रत्येकजण आयएएस मिळवू शकत नाही, लोक देशसेवेसाठी नागरी सेवेत रुजू होत नाहीत आणि देशसेवेचे अनेक पर्याय आहेत या गोष्टी समजून घेऊन परीक्षेच्या तयारीस लागणारा प्रचंड वेळ आणि प्रचंड उर्जा, अंतिम निर्णयाची खात्री न ठेवता घालवायची तयारी ठेवा. परीक्षेला बसणाऱ्यांच्या प्रमाणात  उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असते, हे लक्षात घेऊन आपल्या कुवतीप्रमाणे ध्येयनिश्चिती करावी हे चांगले.

एकदा परीक्षा द्यायची ठरवली (मग ती संघ लोकसेवा असो वा महाराष्ट्र लोकसेवा असो) की रणनीती ठरवली पाहिजे. या ठिकाणी तुमच्या निवडीची कसोटी लागते. हा टप्पा सर्वांत महत्त्वाचा आहे. तुम्ही कोण आहात आणि कोण होऊ पाहता यांना जोडणारा हा पूल आहे. तुम्हाला अनेक गोष्टींचे निर्णय घ्यावे लागतील. कोणते विषय? कोणती पुस्तके, कोणते प्रशिक्षण केंद्र, कोणते ग्रंथालय, कोणते मार्गदर्शक, कोणते शहर? आणि कोणते मित्र? या ठिकाणी ध्येयवादापेक्षा व्यावहारिक विचार महत्त्वाचा आहे.

मला जेव्हा नागरी परीक्षांचे डोहाळे लागले तेव्हा ती बऱ्यापैकी अनियोजित आणि थोडीफार बेजबाबदार गर्भधारणा होती. अभ्यासाचे वातावरण नाही, पुस्तकं नाहीत, मार्गदर्शक नाहीत, अशी स्थिती. मी वेड्यासारखं पुस्तकांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांना लिहिलं. आता सुदैवाने वातावरण आमूलाग्र बदललं आहे, पण स्पर्धापरीक्षा अधिक उग्र झाली आहे. बऱ्याच संस्था मार्गदर्शनासाठी आहेत, पण मार्गदर्शन महागडे झाले आहे. माझ्या वेळेस माझ्या आजूबाजूच्या अनेकांनी मला वेड्यात काढले होते. आता मात्र संधीच्या आणि माहितीच्या उपलब्धतेमुळे उमेदवारांची झुंबड उडताना दिसते आहे. ही एकीकडे स्वागतार्ह तर दुसरीकडे चिंतेची बाब आहे.

लेखी परीक्षा, मौखिक परीक्षा इत्यादींच्या पारंपरिक तयारीच्या पद्धतींबरोबरच मला काही नवीन गोष्टी सुचवायच्या आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे तर तयारी कॉलेजच्या सुरुवातीपासूनच करा, शेवटापासून नव्हे. ‘तयारीपूर्व तयारी’ अशा या सर्वांत महत्त्वाच्या टप्प्यात व्यक्तिमत्त्वाचा परीघ आणि खोली वाढवण्यावर जोर द्या. या ‘परीघ’ आणि ‘खोली विस्तार’ टप्प्यात आणि नंतरच्या तयारीच्या टप्प्यात यशस्वी होण्यासाठी माझा पाचकलमी कार्यक्रम (किंवा पंचसूत्री) असा आहे.

1. खूप आवांतर वाचन करा,

2. खूप प्रवास करा,

3. खूप लोकांच्या भेटी घ्या,

4. खूप चर्चा करा व

5. खूप चिंतन करा.

बंधुभगिनींनो, आयुष्यात यशस्वी होण्याची पंचसूत्री हीच आहे. एकदा तुम्ही ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ हे रामचंद्र गुहांचं पुस्तक वाचलं तर ते अर्वाचीन भारताचा इतिहास सिलॅबसप्रमाणे वाचण्यापेक्षा अधिक संस्मरणीय ठरेल.

एकदा जर चारपाच दिवस तुम्ही तमिळनाडूचा प्रवास कराल तर तिथली पिकं, लोकसंस्कृती, जनजीवन व विकास यांचे तपशील योजना आयोगाच्या रटाळ अहवालात वाचण्याची आवश्यकता नाही. अभय बंगसारख्या एखाद्या वेगळ्या माणसाची भेट घेऊन त्याच्या कामाची पाहणी व निरीक्षण केले तर समाजशास्त्रापर्यंतचे सगळे धडे आत्मसात होतील. भालचंद्र मुणगेकरांसारख्या माणसाबरोबर असो किंवा गावच्या कट्‌ट्यावर बसलेल्या पटकेवाल्याशी असो, चर्चा करायला लागलात की शेतीपासून अर्थशास्त्रापर्यंत अनेक विषय तुमचे होतील. वेळोवेळी चिंतनाची सवय लावलीत, आपण काय करतो आहोत, कुठे चाललो आहोत, आपल्याला नेमकं काय हवं आहे असा विचार झोपण्यापूर्वी किंवा निवांतपणे करायला शिकलात तर तुम्ही आयुष्यात फार कमी ठेचा खाल आणि कुणी सांगावं, तुमच्या आतला प्रतिभावंत जीनियस जगाला कळेल. मला हे सगळं कुणीतरी शालेय जीवनात किंवा कॉलेजमध्ये सांगितलं असतं तर कुणास ठाऊक, मी आजच्यापेक्षा शंभर पटीने यशस्वी झालो असतो.

पण इथेच एक धोक्याची सूचना! जीवनाचं यशापयश संघ लोकसेवा किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या हातात किंवा निर्णयात नाही. तुच्या हातात आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन चांगली सेवा मिळूनही दु:खी व म्हणून अयशस्वी, असे अगणित अधिकारी मी पाहिले आहेत. याउलट, स्पर्धा परीक्षेत अपयश घेऊन किंवा त्या परीक्षा न देता अत्यंत आरभाट जीवन जगणारी अनंत माणसं मला भेटलेली आहेत. मालदीवच्या उत्तरेस असलेल्या मिनिकॉय या भारतीय बेटावरच्या अली मानिकफान नावाच्या अल्पशिक्षित माणसाने माशांच्या एका नव्या प्रजातीचा शोध लावला, त्या माशाला Abudefduf Mankfani असे त्याचे नाव देण्यात आले आहे. याउलट, अनेक उच्चशिक्षित शास्त्रज्ञ सरकारी संशोधन संस्थांच्या नोकरशाही संस्कृतीत आपल्या स्वातंत्र्याची व प्रतिभेची आहुती देतानाही आपल्याला दिसतात.

स्पर्धा परीक्षांत जे अयशस्वी होतात त्यांना माझा सल्ला आहे, स्पर्धा परीक्षा म्हणजे जगाचा अंत नाही आणि नव्या जगाची सुरुवातही नाही, नव्या जगाची सुरुवात स्वत:पासून होते. आणि मित्र हो, स्पर्धा परीक्षेचे दरवाजे तुम्हाला बंद होतील, त्याक्षणी नव्या संधीचे लक्षावधी दरवाजे आपोआप उघडतात हे लक्षात घ्या. पूर्वी रोजगार पुरवणारी सरकार हीच मुख्य यंत्रणा होती आणि सामान्य माणसाचे जीवन सर्वस्वी शासनावर अवलंबून होते, सरकारी नोकरीचा तो थाट व ते महत्त्व आता राहिलेले नाही. माहिती तंत्रज्ञानापासून आर्थिक सेवांपर्यंत आणि जैवअभियांत्रिकीपासून दूरसंपर्क माध्यमापर्यंत, ज्ञानाच्या अमर्याद शाखा तुमच्या प्रतीक्षेत आहेत. स्पर्धा परीक्षेत यश आले नाही म्हणून, जीवनभर हताश झालेले काही मित्र मी पाहिले आहेत. सतत ईमेलवरून आणि कधी कधी फोनवरून संपर्कात असणारा माझा एक तरुण मित्र मागच्या वर्षी स्पर्धा परीक्षेत अयशस्वी झाल्याने आत्महत्या करून गेला. त्याला माझी श्रद्धांजली.

आज मला वाटतं, त्याच्या ऐन उत्साहाच्या काळात मी त्याला ‘स्पर्धा परीक्षेत अयशस्वी झालास तरी जग जिंकण्याची ताकद तुझ्यात आहे, हे विसरू नकोस’ असं सांगायला हवं होतं.

 जे यशस्वी होतील त्यांच्यासाठी मला काही सांगायचंय! तुमची स्वप्नं मरू देऊ नका. तुमचा ध्येयवाद सोडू नका. तुम्हांला देशसेवा करायचीय, समाजसेवा करायचीय ना, तर मग देशाशी आणि समाजाशी असणारा संपर्क तोडू नका. तुमच्या कामात तुम्हांला तुमच्या स्वप्नांचं आणि ध्येयवादाचं दर्शन घडू दे! माय विसरू नका, माती विसरू नका, मातृभाषा विसरू नका. अधिकाराचा, खुर्चीचा आनंद घेताना तुमच्या कृतीचा सामान्य माणसावर काय परिणाम होईल याचा विचार सोडू नका.

राष्ट्रकुल घोटाळा असो, टू-जी स्पेक्ट्र असो वा आदर्श घोटाळा असो, भ्रष्टाचार कुणी केला यापेक्षा बुद्धिमान, कर्तृत्ववान, कार्यक्षम आणि देशातील सर्वांत कठीण अशा स्पर्धा परीक्षेत तावूनसुलाखून निघालेल्या नोकरशाहीच्या साक्षीने हे सगळे घोटाळे झाले आहेत, याचा जबाब आम्ही कुणाला देणार  आहोत? ज्या नोकरशाहीचा मी सदस्य आहे तिच्यावर ताशेरे मारण्यासाठी मी हे सांगत नाही, पण आपल्या या जगातल्या सगळ्यांत विशाल लोकशाहीत काहीतरी भयंकर वास मारतंय आणि त्यात नोकरशाही आपली जबाबदारी टाळू शकत नाही. हे सगळे घोटाळे पाहताना, वाचताना तुम्हांला नेमके काय वाटतं कुणास ठाऊक, पण तुम्हाला चीड वाटली, संताप आला तर तो साहजिक आहे. पण उद्या तुमची निवड झाली तर ‘नव्हाळीतले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे विझुनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे’ असं म्हणून उसासे सोडू नका. संविधानाच्या प्रारंभाचं स्मरण करा. फुले, आंबेडकर, गांधी यांचं स्मरण करा. सत्याला भिडा, सच का सामना करताना घाबरू नका. जोपर्यंत या देशातील तीस कोटी जनतेला दारिद्रयरेषेच्या खाली राहावं लागेल तोपर्यंत तुम्हाला झोप येता कामा नये, भले तुमचं सगळं जीवन निद्रानाशाने ग्रासलं तरी चालेल.

जे स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतील त्यांची स्पर्धा संपणार नाही. नागरी सेवा म्हणजे शेवटपर्यंत स्पर्धा आहे. चांगलं पोस्टिंग, बढती, आवडीच्या ठिकाणी पोस्टिंग या सगळ्यांमध्ये स्पर्धा चालूच राहणार. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे स्वत:बरोबरची स्पर्धा. ती कधीच संपू नये. उत्कृष्टतेसाठी जी स्पर्धा असते ती कधीच संपू नये. मुख्य म्हणजे जीवन सदैव पुढे जात असतं, याची जाणीव संपू नये.

जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जाल, पण स्पर्धा तुमचा पाठलाग सोडणार नाही. त्यासाठी याआधी सांगितलेली पंचसूत्री मदतीला येईल. पण त्याशिवाय सतत अग्रेसर राहण्यासाठी काही गोष्टींवर जोर देणं आवश्यक आहे. सगळ्यांत पहिली गोष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं वाढतं महत्त्व. विज्ञाननिष्ठ राहून, स्वत:च्या आणि समाजाच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करा. शासन आणि शासनव्यवहार तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय कुचकामी ठरणार आहे. प्रत्येक छोट्या कामासाठी सामान्य माणसाला मुंबईला आणि दिल्लीला पळायला लावणारी व्यवस्था बदलणं आवश्यक आहे. जनतेबरोबरच्या शासनकर्त्यांच्या व्यवहारातील अनेक पद्धती आता कालबाह्य झाल्या आहेत, त्या बदलण्यासाठी विज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, पर्यावरण आणि मानवी भविष्याचा संदर्भ यांचा विचार उद्यावर ढकलू नका. आज संपूर्ण पृथ्वीलाच धोका निर्माण झाला आहे. ज्या मालदीवमध्ये मी राहतो तो 1192 बेटांचा देश, जगाचं तापमान जर दोन अंशानी वाढलं तर संपूर्ण जग बुडून जाणार आहे. भारताच्या किनारपट्टीवरील लोकांचं भविष्यही हेच असेल. पर्यावरणाच्या अभ्यासावर आधारित विकासाची नवी परिमाणं तयार करा. त्यासाठी विनाशकारी अशा विकासाच्या पाश्चात्त्य संकल्पनेचे अंधानुकरण करू नका.

क्वचितप्रसंगी मी फेसबुकवर असतो तेव्हा अनेक परिचित मला हाक देतात, ‘कसं काय? काय चाललंय? नवीन काय?’ या पलीकडे त्यांची उडी जात नाही. मी जेव्हा प्रत्युत्तर म्हणून अलीकडे ‘कोणते पुस्तक वाचलंत?’ किंवा ‘पृथ्वीराज चव्हाणांविषयी जनमत काय आहे?’ असं विचारतो तेव्हा ते स्क्रीनवरून गायब होतात. संवादाची कला आत्मसात करा आणि सतत शिका.

खूप दीर्घ झालेल्या या भाषणात मला शेवटचं सांगावंसं वाटतं ते हे की, ज्या सामान्य माणसाच्या सेवेचं नाव घेऊन आपण सेवेत प्रवेश करतो त्याला विसरू नका. फुले-आगरकरांपासून बाबा आमटेंपर्यंत महाराष्ट्राला लाभलेली सुधारकांची परंपरा आणि त्यांचा विचार विसरू नका. सामाजिक विषमता नष्ट करण्याचं फुल्यांचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. मागासवर्गीयांना आणि अल्पसंख्याकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचं आंबेडकरांचं आणि हमीद दलवार्इंचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही. प्रत्येकाला शिक्षण मिळावं हे भाऊराव पाटलांचं स्वप्न साकार झालेलं नाही. स्त्री-पुरुष समानता जीवनाच्या सर्व अंगांत आली पाहिजे हे ताराबाई शिंदेचं स्वप्न अजून अपूर्ण आहे. ही कोडी आपल्याला यशस्वीपणे सोडवता आली नाहीत तर एका बाजूला चांद्रयान आणि दुसरीकडे भूकबळी, एकीकडे सुरक्षा परिषदेचे सदस्य तर दुसरीकडे राजधानीतील सामूहिक बलात्कार ही परिस्थिती बदलणार नाही. नागरी स्पर्धा परीक्षांसारखी कठीण अडथळा शर्यत पार पाडत 60 वर्षं प्रशासनात येणारी पिढी दर पिढी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर, संपूर्ण समाजपरिवर्तनासाठी करणार नसेल तर या परीक्षेतील यशाला ‘फार मर्यादित यश’ असंच स्वरूप राहील.

माझ्या बाबतीत म्हणाल तर, मी या दिशेने काय केलं ते थोडक्यात सांगतो. संपूर्ण मानव विकासाचा आराखडा मनात घेऊन जगण्याचा मी प्रयत्न करतो. माझी नोकरी देशात असो वा विदेशात, मूलभूत तत्त्वज्ञान बदलत नाही. जगभर कुठेही असलो तरी सामाजिक कार्य सोडलं नाही. छोट्या-मोठ्या कामात गुंतवून घेतल्यानंतर दोन-तीन वर्षांपूर्वी निवडक गावकऱ्यांच्या मदतीने संपूर्ण ग्रामपरिवर्तनाची संकल्पना मी माझ्या गावात आणि परिसरात राबवत आहे. त्यात शिक्षणापासून पर्यावरणापर्यंत आणि पाणीप्रश्नापासून आरोग्यापर्यंत सर्व बाबींचा समावेश आहे. निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. जरूर आमच्या या कार्यक्रमाला भेट द्या. याशिवाय बौद्धिक पातळीवर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं वैचारिक नेतृत्व तयार करण्यासाठी एक संस्था स्थापन केली आहे. आपल्या या प्रिय पृथ्वीच्या आणि तिच्यावर निवास करणाऱ्या प्रत्येक प्राणिमात्राच्या संवर्धन- संगोपनासाठी विज्ञाननिष्ठ व प्रबुद्ध असं सामाजिक व राजकीय नेतृत्व तयार करणं हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे.

हे सगळं मी का करतोय? कारण? नागरी सेवा हे एक ‘अवघड व्रत’ आहे हे विसरू नका. त्यातला ‘सेवा’ हा शब्द नोकरीपेक्षा महत्त्वाचा आहे. सावरकरांच्या शब्दांत सांगायचं झालं तर...

की घेतले व्रत हे न अम्ही अंधतेने

लब्धप्रकाश इतिहास निसर्गाने

जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे

बुद्‌ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे

चला एका नव्या समाजाची निर्मिती, एका नव्या जगाची सुरुवात स्वत:पासून करू या!

धन्यवाद.

Tags: ज्ञानेश्वर मुळे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन प्रशासन स्पर्धा परीक्षा अभ्यास speech Dnyaneshwar mule spardha pariksha sahitya sammelan administration study competitive exam weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

 1. Sangeeta bapat- 05 Jul 2021

  खूप दिवसांनी छान लेख पुन्हा वाचला. छान वाटलं

  save

 1. Ram chatte- 05 Jul 2021

  जीवनाचे ध्येय काय असावे? आणि स्पर्धा परीक्षेकडे कसे पाहावे या विषयीचा एक वेगळा दृष्टीकोण देणारा लेख..स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्वांनी सरांचे ‘ माती, पंख आणि आकाश.,हे पुस्तक आर्वजून वाचावे असे या निमित्ताने सांगावेसे वाटते..,

  save

 1. Shriram Gadkar- 06 Jul 2021

  अंतर्मुख करणारा लेख ..

  save

 1. M N Damle- 21 Jul 2021

  स्पर्धा परीक्षा असो ,नसो समाजाच्या प्रबोधनासाठी प्रामाणिक पणे प्रयत्न करणे कसे जरुरीचे आहे हे स्वतः तसे वागून दाखवून आदर्श म्हणून कसे जगावे हे संबोधित करणारे भाषण चिंतनीय असेच आहे .

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके