डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सामान्य माणूस मात्र या राजकीय गोंधळामुळे भांबावून गेला आहे. सत्ता संपादनासाठी राजकीय पक्षांमध्ये नवे प्रेमसंबंध जुळून येत असताना, कांद्याचा भाव पंचवीस-तीस रुपये किलो झाला आहे आणि रुपयाची किंमत एकसारखी घटत आहे, यांकडे मात्र लक्ष द्यायला अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी, देवेगौडा आदींना अजिबात फुरसत नाही. अशा वेळी मतदारांना जागृत करणे हे काम फार महत्त्वाचे आहे.

निवडणुका जाहीर झाल्यापासून आपल्या देशातील सर्व राजकीय पक्षांनी नवनवीन मित्र शोधण्यास सुरुवात केली आहे. राजकारणात कोणीच कायमचे मित्र नसतात आणि कोणीच कायमचे शत्रूही नसतात, फक्त राजकीय पक्षांचे हितसंबंध मात्र कायम असतात. त्यामुळे प्रत्येक पक्षातील नेते सध्याच्या त्यांच्या अवस्थेत कोणाशी मैत्री केल्यामुळे आपले हित साधता येईल याची नव्याने गणिते मांडत आहेत. यामुळेच भारतीय राजकारणात नवनवीन समीकरणे निर्माण होत आहेत. 

महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने समाजवादी पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष यांच्याशी युती करावयाचे ठरविले आहे. याच वेळी रिपब्लिकन पक्षातील प्रकाश आंबेडकरांचा गट बहुजनसमाज पक्षाबरोबर दोस्ती करू पाहत आहे. उत्तर प्रदेशात मात्र काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. भारतीय जनता पक्षाने तमिळनाडूमध्ये जयललितांच्या पक्षाबरोबर, आंध्रमध्ये तेलगू देसमच्या पार्वती गटाबरोबर आणि कर्नाटकमध्ये रामकृष्ण हेगडे यांच्या लोकशक्तीबरोबर सोयरीक केली आहे.

ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसबरोबर भाजपच्या वाटाघाटी आणि धुसफूस अद्याप चालू आहे. भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र आले पाहिजे असे म्हणत डावे आणि उजवे कम्युनिस्ट, जनता दल, तेलगू देसम पार्टी, डी. एम.के., तमिळ मनिला काँग्रेस आदी तेरा पक्षांची एक आघाडी आहे. तर याच उद्देशाने निवडणुकीच्या आखाड्यात उतरणारे राष्ट्रीय जनता पक्षाचे लालूप्रसाद यादव, बहुजनसमाज पक्षाचे कांशीराम यांनी जनतंत्र मोर्चा उभा करून सेक्युलर म्हणविणाऱ्यांची मते विभागण्याची अचूक व्यवस्था केली आहे. 

मुलायमसिंग संयुक्त आघाडीत असले तरी ते जनता दलाला सतत सुनवीत आहेत. जॉर्ज फर्नाडीस यांच्या समता पक्षाने भाजपशी आपले मूलभूत मतभेद आहेत हे जाहीर करीत भाजपच्या आघाडीत त्यांचे सोवळे-भांडे टाकले आहे. शिवसेनेची महाराष्ट्रात भाजपबरोबर युती आहे, परंतु अन्य राज्यांत मात्र शिवसेना भाजपच्या आघाडीत नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने भाजपविरुद्ध काँग्रेसबरोबर काही ठिकाणी सहकार्य करावयाचे ठरविले आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचाही पूर्वीचा कडवा काँग्रेसविरोध अगदी क्षीण झाला आहे. अर्थात यांपैकी काही समीकरणे येत्या पंधरवड्यात बदलण्याची फार मोठी शक्यता आहे. वृत्तपत्रांना रोज नवनवीन विषय मिळत आहेत. 

सामान्य माणूस मात्र या राजकीय गोंधळामुळे भांबावून गेला आहे. सत्ता संपादनासाठी राजकीय पक्षांमध्ये नवे प्रेमसंबंध जुळून येत असताना, कांद्याचा भाव पंचवीस-तीस रुपये किलो झाला आहे आणि रुपयाची किंमत एकसारखी घटत आहे, यांकडे मात्र लक्ष द्यायला अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी, देवेगौडा आदींना अजिबात फुरसत नाही. अशा वेळी मतदारांना जागृत करणे हे काम फार महत्त्वाचे आहे. एकूण लोकांपैकी फार तर दहा टक्के लोक कोणत्या तरी पक्षामध्ये असतात. सत्तर पंचाहत्तर टक्के लोक जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीतच गुंतलेले असतात. 15 टके लोक निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षांत जातात. हे लक्षात घेऊन मतदारांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. 

प्रत्येक मतदार संघामध्ये देशापुढील समस्यांची ज्यांना समज आहे आणि गरीब माणसांबददल ज्यांना आस्था आहे अशा व्यक्तींनी आपापल्या ठिकाणी एक नागरिक मंच निर्माण केला पाहिजे. या मंचाने सर्व उमेदवारांना त्यांची सध्याची स्थावर जंगम मिळकत जाहीर करावयास लावली पाहिजे. त्याचप्रमाणे देशातील प्रमुख विचारवंतांनी सर्व राजकीय पक्षांकडून पुढील दोन अभिवचने घेतली पाहिजेत एक अभिवचन असे की, कोणीही सत्तेवर आले तरी स्त्रियांना ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, विधिमंडळे आणि संसद या सर्व ठिकाणी चाळीस टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा येत्या सहा महिन्यांत होईल. 

दुसरे अभिवचन हे की, देशातील भीषण बेकारी कमी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यास नव्या शासनास भाग पाडले जाईल. आगामी निवडणुकीत गुन्हेगारांना खड्यासारखे वगळणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चासाठी जे पक्ष दमदाटी करून खंडणी गोळा करतील त्यांच्या विरुद्ध सर्व मतदारांनी एकत्रितपणे आवाज उठविला पाहिजे. मतदारांना त्यांच्या हक्कांची जाणीव देणे फार जरुरीचे आहे. 

निवडणूक ही राजकीय शिक्षणाची एक संधी असते. या दृष्टीने आम्ही येथे फक्त काही योजनांचा उल्लेख केला आहे. आज देशातील राजकारणात वैचारिक भूमिका लुप्त झाली असून एकाच पक्षाचे नेते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. अशा वेळी राजकीय धुळवडीत देशापुढचे खरे महत्त्वाचे प्रश्न कोणते याकडे कोणाचेच लक्ष राहिले नाही. म्हणूनच मतदाराने जागृत होऊन राजकीय पक्षांना ताळ्यावर आणणे आवश्यक आहे.

Tags: political parties election politics voting right voter weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके