डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

या भाटांना न देशाभिमान न स्वाभिमान!

कारटीं करंटीं इथें। निपजली भुतें

मातृशोणितें। स्वतांला लाली। आणाया धावलीं

आपल्या हतभागी मातृभूमीचे हृदयद्रावक चित्र काढताना तिच्या कुपुत्रांचे असे जळजळीत वर्णन कवि विनायकांनी केले आहे. जिची संताने स्वाभिमानशून्य निपजतील ती आई 'तळहातीं टेकुनीया स्वशिरातें बैसली' अशा दीनवाण्या अवस्थेतच जगाला दिसावी हे स्वाभाविकच आहे. स्वार्थाच्या बाजारात हावरेपणाने आपली तुंबडी भरणे एवढेच राजकारण ज्यांना समजते त्यांचा अधःपात किती होऊ शकतो याचे दर्शन आज भारतीय रंगमंचावर चाललेल्या सोनिया गांधींच्या हांजी हांजी मध्ये अवघ्या दुनियेला घडते आहे. 

सोनिया. राजीव गांधींची इटालियन पत्नी. इंदिरा गांधींची सून. भारताचे तारणहार ठरलेल्या पंडित जवाहरलालांच्या घराण्याशी जवळच्या नात्याने जोडलेली आणि म्हणून भारतीयांच्या प्रेमाचा आणि कौतुकाचा विषय झालेली एक महनीय महिला. बस्स. इतके आणि इतकेच मानाचे स्थान तिला मिळाले तर कोणालाही त्याबद्दल तक्रार करण्याचे किंवा ब्रही काढण्याचे कारण नाही. आजचे जग एका अर्थाने विशाल आहे आणि विशालतेमुळेच जगातली माणसे परस्परांच्या जवळ आलेली असली तर त्यात काही चूक नाही. 'भारतात सुंदर मुलींना तोटा होता काय? राजीव गांधींना विदेशी मडमेशी संसार थाटायची काय गरज होती?' असले गावंढळ प्रश्न कोणी विचारू नयेत. वर्धमान मानवी संस्कृतीत देश, वंश इत्यादींच्या सीमा पुसट होणारच. तेव्हा राजीव गांधींनी आयुष्याची सहचरी म्हणून एका इटालियन वधूचे पाणिग्रहण केले, यात अयोग्य काहीही नाही. राजीवजींच्या अत्यंत दुर्दैवी घातपाती निधनानंतर दुःखाचा आगडोंब साऱ्या देशात उसळला. 

अवघा भारतीय समाज शोकाकुल झाला. त्याच्या शोकाचे एक अधिष्ठान निरपराध सोनिया आणि तिची अपत्ये यांच्यावर कोसळलेली भयानक आपत्ती हे होते. कोणाही सहृदय माणसाची सहानुभूती सोनिया आणि राजीवजींची मुले यांच्याकडे नैसर्गिकपणेच वाहत गेली असली तर ते माणुसकीला धरूनच झाले, असे म्हटले पाहिजे. राजीवजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला - मग ती भारतीय असो की इटालियन असो - ती भारतीय नागरिक असल्यास, या देशात राहण्याचा, या देशातील सामाजिक, राजकीय, जीवनात सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांची मुले राहुल आणि प्रियांका यांचा तर तो जन्मसिद्ध हक्क आहे. 

या सर्व गोष्टी आम्ही मान्य करतो. त्या अमान्य करणे हा घोर अन्याय होईल असे आम्ही मानतो. राजीवजींच्या कुटुंबीयांना भारतात सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगता यावे असेच आमचे मत आहे. त्यांच्याबद्दल कुणाला खास प्रेम किंवा आदर वाटला तरी त्याबद्दल आक्षेप घेण्याचे आम्हांला काही कारण नाही. पण ही प्रेमादराची भावना महापूर आलेल्या नदीच्या रोंरावणाऱ्या गढूळ लोंढ्याप्रमाणे किनाऱ्यांची मर्यादा भंगून तीरावरच्या वाड्यावस्त्या गिळंकृत करू लागली तर त्या पिसाट पुराचा बंदोबस्त करणारी बांधबंदिस्ती करावीच लागेल. 

आज काल सोनियादेवीला कौल लावण्यासाठी दुभंगलेल्या काँग्रेसमधील स्वार्थी आणि मदांध तथाकथित नेत्यांची जी अहमहमिका चालली आहे ती कोणाही स्वाभिमानी भारतीयाच्या मनात तीव्र तिरस्कारच निर्माण करील. काँग्रेसचे ऐक्य फक्त सोनियाजीच घडवू शकतील म्हणे! मग असली काँग्रेस पाताळात बुडालेलीच बरी. 

नरसिंह रावांऐवजी देशाचे तारु सोनियाजी, तुम्ही हाती घ्या, सांभाळा आणि यशस्वीपणे हाकारा! अरे हुड्त्! सोनिया गांधी अशा कोण लागून गेल्या आहेत की त्यांच्या कर्णधारपदावर तुम्ही निःशंकपणे विसंबून राहावे! जे पंतप्रधान आता या जगात नाहीत, त्यांच्याबद्दल असे प्रश्न विचारण्यात स्वारस्य नाही; पण ज्या इटालियन स्त्रीच्या हातात तुम्ही एका खंडप्राय संघराज्याची सूत्रे सुपूर्द करायला निघाला आहात, तिची गुणवत्ता काय? तिचा अनुभव किती आणि कोणता? या राष्ट्राच्या परंपरा आणि इतिहास तसेच या राष्ट्राचे भाग्य आणि भवितव्य यांच्याशी सोनियाची बांधिलकी काय आहे ते तुम्ही सांगू शकाल काय? आम्ही जाणतो की हे प्रश्न ज्यांना विचारावे ते सारे ठार बहिरे झालेले आहेत. ते विवेकभ्रष्ट आहेत. त्यांचा सतत अधःपातच होत चालला आहे.

"विवेकभ्रष्टानां भवति विनिपातः शतमुखैः"

या वचनाप्रमाणे त्यांचा प्रवास झपाट्याने अधःपाताच्या गर्तेकडे होत आहे. एखाद्या अज्ञानी माणसाला ज्ञान देता येईल, असमंजस नेणत्याला शहाणपण शिकवून जाणता करता येईल पण ज्यांची बुद्धी पुन्हा कधीही ताळ्यावर न येण्याइतकी चळलेली आहे त्यांना कोणी आणि कसा धडा शिकवायचा? सोनिया आपल्याला तारील या भ्रमात असणारे कापुरुष आपल्याला पांडव म्हणवून घेत आहेत! त्यांतला वडील पांडव अधर्मराज आहे, भीम चारी मुंड्या चीत झालेला आहे आणि अर्जुन शुद्ध बृहन्नड रूपात उभा आहे. लाळघोटे, लाचार, लाजिरवाणे अशी कितीही शेलकी विशेषणे वापरली तरी सोनियाला 'भारत भाग्यविधात्री' करायला निघालेल्या या पांडवांचे पुरेसे वर्णन होत नाही. 

आश्चर्य असे, सोनियाचा आणि काँग्रेसच्या जडणघडणीचा संबंधच काय, असे विचारणारा एकही धैर्यधर सध्या सत्तेवर असलेल्या फळीतही उरलेला नाही. जो तो चढेल आहे. चढेल असून दबेल आहे, कारण कोणालाच स्वतःच्या शौर्यधैर्याविषयी आत्मविश्वास नाही. स्वतः सोनिया गांधी अत्यंत संयमाने आणि कोणाचीही कड न घेण्याच्या पवित्र्यात शांत निवांत मनाने घरी बसलेल्या असाव्या हे कौतुकास्पद आहे. पण या उलट, पाउणशे खासदार त्यांच्या दारात ठाण मांडून आळवणी करण्यासाठी धरणे धरतात या लाचारीला जगाच्या इतिहासात वा वर्तमानस्थितीत कुठे तोड आहे काय? 

या निलाजऱ्या तोंडपुजेपणाच्या दर्शनाने आमच्या माना खाली जातात. या परिस्थितीत आता भारतीय जनतेच्या सत्त्वाची, तेजस्वितेची, राष्ट्रीय अस्मितेची खरी कसोटी आहे. आमचे काय वाटेल ते होवो, आम्ही सुखाच्या अत्युच्च स्वर्गात जाऊन पोहोचू किंवा विनाशाच्या खाईत जाऊन पडू. पण आमच्या उद्धाराचा मंत्र आभाळातून उतरलेल्या एका इटालियन स्त्रीरत्नाकडे काय तो आहे अशा विश्वासाने आम्ही आमचा भारत दुनियेच्या बाजारात विकायला काढणार नाही. या राष्ट्राला काही स्वाभिमान आहे की नाही? 

Tags: काँग्रेस. इटली पंडित नेहरू राजीव गांधी सोनिया गांधी Congress. संपादकीय Italy Pandit Nehru Rajiv Gandhi Sonia Gandhi Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके