डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मराठवाडा ही प्राचार्य कुरुंदकरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. ती तर त्यांच्या अनपेक्षित निधनाने पोरकी झालीच; पण उभा महाराष्ट्र जो त्यांना आता ओळखू लागलेला होता तोही पोरका झाला.

गेल्या वर्षा-दीड वर्षात मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये यमाचा विळा मोठ्या वेगाने फिरत राहिला असून त्याने अनेक टपोरी कणसे कापून टाकली आहेत. विठ्ठलराव घाटे गेले. गदिमा गेले, पु. बा. गेले आणि गेल्या आठवड्यात प्राचार्य नरहर कुरुंदकर गेले. हे जे अंतर्धान पावले त्या साहित्यिकांत डावे-उजवे करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण त्यांपैकी प्रत्येकाचे स्थान त्याच्या त्याच्या क्षेत्रात सर्वमान्य होते. उत्तुंग होते. असे असूनसुद्धा प्राचार्य कुरुंदकरांच्या निधनाचा घाव विशेष असह्य वाटतो खरा.त्याची कारणे अनेक आहेत. एक कारण असे की प्राचार्य कुरुंदकर ऐन तारुण्यात गेले असेच म्हटले पाहिजे. कारण पन्नाशीतला माणूस म्हणजे काही वृद्ध मनुष्य नव्हे. प्राचार्य कुरुदकरांची प्रकृतीही अशी की त्यांच्याकडे पाहणाऱ्या कोणालाही त्यांना काही व्याधी-पीडा आहे असा संशयदेखील आला नसता.

धडधाकट, उंच शरीरयष्टी, मार्मिक बोलणे, विविध विषयांचा अभ्यास, आणि विचारांची अभिव्यक्ती करण्याचे सामर्थ्य- अशा अनेक कायिक आणि मानसिक वैशिष्ट्यांनी नटलेले कुरुंदकरांचे व्यक्तित्व फुंकर मारताच दिवा मालवावा तसे मालवले, यावर कोणाचा काय म्हणून विश्वास बसावा? पण हे अघटित घडले खरे. औरंगाबादेला श्री. अनंतराव भालेरावांसारख्या अनेक मित्रांच्या समक्ष ते व्यासपीठावर कोसळले आणि कोसळले ते परत उठलेच नाहीत.प्राचार्य कुरुंदकरांचे साहित्य वाचणे, त्यांचे व्याख्यान ऐकणे आणि त्यांच्याशी खाजगीत संभाषण करणे म्हणजे एक अनोखी अनुभूती असे. त्यांच्या विशाल ज्ञानाचा तर त्यामधून प्रत्यय मिळेच परंतु त्याचबरोबर त्यांच्या लेखनातून, भाषणातून आणि बोलण्यातून जो एक प्रच्छन्न आव्हानाचा वन्ही असे तोही जाणवत असे. ते स्वतःचे मत मांडीत असताना आपलेही माप घेत आहेत असे ऐकणाराला आणि वाचकाला वाटत राही. कोणत्याही श्रेष्ठ अभिव्यक्तीची ही खूणच असते की ती आव्हानरूप असते. मग ती अभिव्यक्ती रंगाच्या माध्यमातून व्यक्त झालेली असो की, लेखणीच्या अथवा वाणीच्या माध्यमातून प्रकटलेली असो.

प्राचार्य कुरुंदकरांना लिहिण्याची, बोलण्याची आणि वादविवाद करण्याची हौसच असावी. स्वतःच्या बौद्धिक श्रेष्ठत्वाचा सूक्ष्म अहंकारही त्यांच्या ठिकाणी होता असे वाटत नाही. पण त्यांचे वाचन आणि मनन एवढे विस्तृत होते आणि त्यांची विचारमांडणी अशी शैलीदार होती की त्यांच्या ठिकाणचा अहंकार त्यांच्या पांडित्याला शोभूनच दिसणारा ठरे. एखाद्या युवतीची रूपगर्विता जर आपल्याला समजू शकते, तर प्रा. कुरुंदकरांसारख्या पंडिताची पांडित्य-गर्विता का समजू नये? तथापि हेही लक्षात येई, की जेथे निर्मलता आहे, तेथे श्रेष्ठधारिष्ट्य  आहे आणि जेथे निर्मळ त्याग आहे तेथे मान तुकवण्यास प्राचार्य कुरुंदकर कधी हयगय करीत नसत. स्वतःच्या अहंभावाला त्यांनी विनयावर कधी मात करू दिली नाही. आपल्या मनामधील हे भावनांचे पाझर त्यांनी जपले आणि त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिकच विलोभनीय बनले. वाईट वाचे वाटते की एवढ्या प्रगल्भ बुद्धीचा, इतके चौफेर वाचन व निरीक्षण असलेला, इतिहासाचे आणि वर्तमानाचे इतके साक्षेपी भान ठेवणारा हा पुरुष, ऐन बहरात असताना आणि उज्ज्वल भविष्याच्या ऐन उंबरठ्यावर उभा असताना असा एकाएकी  उन्मळून पडला. मराठवाडा ही प्राचार्य कुरुंदकरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. ती तर त्यांच्या अनपेक्षित निधनाने पोरकी झालीच; पण उभा महाराष्ट्र जो त्यांना आता ओळखू लागलेला होता तोही पोरका झाला.

राष्ट्र सेवा दल आणि साधना परिवार यांना तर प्राचार्य कुरुंदकर कुटुंबामधील वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे वाटत. सामाजिक क्रांतिकारकांच्या आणि राजकीय क्रांतिकारकाच्या कामाबद्दल त्यांना सहानुभूती आणि आदर वाटे. पण त्यांचा पिंड क्रांतिकारकाचा नव्हता. कै. माटे स्वतःचे वर्णन ‘सनातनी सुधारक’ अशा शब्दात करीत. प्राचार्य कुरुंदकराची गणना त्या गटात करता येईल. त्यांच्या विचारांची झेप आकाशगामी असे; परंतु त्यांचे पाय परंपरेच्या गुरुत्वाकर्षणाने धरित्रीशी बांधलेले राहत. परिणाम असा होई की, प्राचार्य कुरुंदकरांविषयी काही गैरसमज पसरत. पण त्याला त्यांचा इलाज नव्हता आणि लोकांचाही नव्हता.कसेही असो, हे मान्य केले पाहिजे की प्राचार्य कुरुंदकरांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एका मोठ्या सामर्थ्यवान विचारवंताचा अस्त झालेला आहे आणि येयील विद्वन्मणिमालेतील एक मोती गळाला आहे!
 

Tags: साहित्यिक नरहर कुरुंदकर श्रद्धांजली संपादकीय man of letters narhar kurundkar homage editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके