डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

हा ढासळता इमला अजून तरी सावरा!

  • मातीतून माणसे की माणसांची माती?
  • नवीन नाही, पण अर्थपूर्ण
  • पणती कशाला, एकीची मशाल पेटवू या!
  • ती मशाल महाराष्ट्रात पेटवा

मातीतून माणसे की माणसांची माती? 

'महात्मा गांधींनी मातीतून माणसे उभी केली. आज देशामध्ये अनेक ठिकाणी माणसांना मातीमोल करण्यात येत आहे' असे उद्गार दुसऱ्यातिसऱ्या कोणी काढले नसून भूतपूर्व राष्ट्रपती श्री.संजीव रेड्डी यांनी मुंबईमध्ये लोकस्वातंत्र्य समिती (पी.यु.सी.एल्) तर्फे झालेल्या एका समारंभाच्या प्रसंगी काढले. 'मी इतके दिवस बुद्धिपुरस्सर मौन बाळगले; परंतु आता मला बोलण्यावाचून गत्यंतर उरले नाही,' असे म्हणून श्री.संजीव रेड्डी यांनी जे भाषण केले, त्यातील ही वाक्ये आहेत. जनता पक्षाचे सरकार उधळून लावण्यात त्याच पक्षातील काही श्रेष्ठ व्यक्तींनी जसा पुढाकार घेतला, त्याचप्रमाणे प्रथम श्री.चरणसिंगांचे आणि त्यांच्यापाठोपाठ इंदिराजींचे शासन आणण्याला एका परीने संजीव रेड्डी हेदेखील कारणीभूत झाले होते, हे येथे मुद्दाम लक्षात ठेवले पाहिजे. प्रारंभी इंदिराजींच्या शासनाबद्दल श्री संजीव रेड्डींच्या मनात कोणत्या आशा होत्या हे सांगणे कठीण आहे. परंतु आज राष्ट्राध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर आतापर्यंत बुद्धिपुरःसर त्यांनी जे मौन राखले होते, ते त्यांना सोडून द्यावेसे वाटले आणि त्यांनी आपली प्रतिक्रिया अत्यंत परखड शब्दांत व्यक्त केली, हे खरे. बंदुकीच्या जोरावर देशाचे ऐक्य टिकविता येणार नाही, असा इशारा त्यांनी आपल्या भाषणातून दिला. त्यांनी असेही सूचित केले की, आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो, असा जो दावा केला जातो तो खरा नाही. कारण आपल्या देशातील निम्मी प्रजा अशा स्थितीत दिवस कंठते आहे की तिला एका वेळेचे जेवणही घेता येत नाही. शेवटी त्यांनी देशातील विरोधी पक्षांना उद्देशून सांगितले की, भारतातील लोकशाही जिवंत राहावी असे वाटत असेल, तर त्यांनी एकजूट केली पाहिजे.

नवीन नाही, पण अर्थपूर्ण 

भूतपूर्व राष्ट्रपती श्री.संजीव रेड्डी यांनी आपल्या भाषणात हे जे मुद्दे मांडले, ते 'साधना' वाचकांना जरी नवे नसले, तरी त्यामुळे ते अर्थशून्य ठरत नाहीत. आयुष्यभर ज्याने राजकारणाचे अनेक रंगढंग आणि चढउतार पाहिलेले आहेत आणि त्यात स्वतः पुढाकाराने भाग घेतलेला आहे, अशा पुरुषाला अगदी कळवळून वरीलप्रमाणे उद्गार काढावे लागतात, या गोष्टीला काहीच अर्थ नाही असे म्हणणे अथवा ते इंदिरा शासनाचे आता विरोधक बनले या मुद्यावर फेटाळून लावणे योग्य ठरणार नाही. कोणत्याही बाजूने पाहू लागले तरी आज देशातील समाजस्थिती इतक्या झपाट्याने खालावत चालली आहे, भ्रष्टाचाराला इतका ऊत आलेला आहे आणि सर्व ठिकाणची शासकीय व्यवस्था इतकी दुर्बळ बनत चालली आहे की, हे ताण भारतासारखा देश किती काळ सहन करू शकेल, याची चिंता अनेकांना वाटत असल्याचे प्रत्ययास येते. काही राज्यांत तर ही चिंता इतकी दाट बनलेली दिसते की तिला निराशेचे व वैफल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक लोक उघडपणे देववादी बनलेले असून भारताच्या एकात्मतेबद्दल त्यांना कोणत्याही प्रकारची शाश्वती वाटत नाही. सगळीकडे असे वातावरण झपाट्याने पसरत असताना भूतपूर्व राष्ट्रपतींनी त्याला वाचा फोडली ही एक चांगलीच गोष्ट झाली असे म्हणावयास हवे. आज कोणत्याही विशिष्ट पक्षात नसल्याने तर त्यांच्या बोलण्याला अधिक वजन आहे. देशात काहीही बिघडलेले नाही, देश प्रगतीकडे वाटचाल करीत आहे असा आभास निर्माण करून जनतेच्या सर्व दुःखांवर व तक्रारींवर पांघरूण घालण्याचा जो प्रयत्न इंदिरा शासनाकडून सतत चालू आहे, तो फोल ठरवून परिस्थितीचे सत्य चित्र काय आहे, ते जनतेला उघड करून दाखविण्यास जितके अधिक लोक पुढे येतील, तितके हवेच आहेत. आपणाला आपली दुःखे वेशीवर टांगण्याचा लोकशाहीत हक्क असतो, हे भारतातील लोक जसे काही विसरूनच गेले आहेत. ते रागावेनासे झाले आहेत. उपासमार, बेकारी, काळा पैसा, अपमान, गोळीबार, बलात्कार हे खरे पाहिले तर समाज झपाट्याने अधोगतीला जात असल्याची चिन्हे आहेत. परंतु जनतेतून यावी तशी प्रतिक्रिया येत नसल्याने या सर्व अनिष्ट गोष्टी जनतेच्या पचनी पडू लागल्या आहेत की काय, अशी धास्ती वाटू लागलेली आहे. क्षणोक्षणी अंधार असा दाटत चालला असताना प्रकाशाचा एखादा क्षीण किरण जरी कोठे चमकला, एखादी पणती जरी कोठे लुकलुकली तरी आपण तिचे स्वागतच करायला हवे.  

पणती कशाला, एकीची मशाल पेटवू या! 

मुंबईतील सभेमध्ये श्री.संजीव रेड्डींनी जे विचार मांडले, ते कितीही महत्वाचे असले, तरी ते त्यांचे वैयक्तिक मनोगत होय. असे व्यक्तिगत विचार कितीही स्वागतार्ह असले तरी त्यांच्यामागे कोणतेही सामूहिक अथवा संघटित बळ नसल्याने परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये नसते. व्यक्तिगत विचार हे जनमताचा वारा कोणत्या दिशेने वाहत आहे, याचे केवळ सूचन करू शकतात, परंतु या मनोमन तळमळीचा परिणाम शासनावर होण्याचा संभव फारच थोडा. आजची इंदिराजींची राजवट जनतेमध्ये अप्रिय होत चालली आहे, हे ज्या कोणी डोळे मिटून घेतलेले नाहीत त्याच्या सहज लक्षात येण्यासारखे आहे. पण इंदिरा शासनास बाजूला सारून नवी राजवट सुरू करू शकेल असा पर्यायच जनतेपुढे नसल्याने हताश होऊन गप्प बसण्याखेरीज अथवा व्यक्तिगत पातळीवरून विरोधी आवाज उठवण्याखेरीज जनतेला पर्यायच उरत नाही. 

जेथे पर्याय निर्माण होण्याची जनतेला आशा दिसते, तेथील जनता इंदिराशासनाला संधी मिळताक्षणी दूर सारते याचा प्रत्यय आंध्र व कर्नाटकात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत आलेला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री.रामकृष्ण हेगडे यांनी पुढाकार घेऊन दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांची जी बैठक बेंगलोरला गेल्या आठवड्यात घेतली तिच्याकडे सर्व देशातील जनता व वृत्तपत्रे मोठ्या आशेने पाहत आहेत असे जे दृश्य आपणास बघायला मिळाले त्याचे एक कारण असे सांगता येईल की त्यातून इंदिराशासनाला समर्थपणे शह देणारी शक्ती उभी राहू शकेल असे जनतेला वाटते आहे. जनता पक्षाचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर यांच्या उदार धोरणानेसुद्धा या पर्यायनिर्मितीच्या प्रक्रियेला हातभार लागलेला आहे. कर्पूरी ठाकुरांचे लोकदल, श्री.बनारसी दास व राजनारायण यांची डेमॉक्रॅटिक सोशलिस्ट पार्टी, महाराष्ट्रातील श्रीमती मृणाल गोरे यांचा समाजवादी मंच, कर्नाटकातील कांतिरंगा पक्ष आणि गुजरात व ओरिसातील शरद पवार काँग्रेसच्या शाखा इत्यादींनी जनता पक्षात समाविष्ट होण्याचे ठरविल्यानेदेखील या एकजुटीच्या प्रक्रियेला गतिमानता प्राप्त झाली आहे आणि म्हणूनच आम्ही वर असे म्हटले की, श्री.संजीव रेड्डींसारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी जे मतप्रदर्शन केले, ते पणतीच्या उजेडासारखे जरी स्वागतार्ह असले तरी ते पर्याप्त नाही. त्याऐवजी एकीची भली मोठी मशाल पाजळायला हवी.

ती मशाल महाराष्ट्रात पेटवा 

जी गोष्ट कर्नाटक व आंध्रप्रदेशात घडली किंवा जे उत्तरप्रदेश, गुजरात, ओरिसा इत्यादी राज्यांत घडू लागले आहे, ते महाराष्ट्रात का घडू नये, असा प्रश्न आम्हाला विचारावासा वाटतो. 1980 साली पुलोदचे सरकार संपून इंदिरा शासन सुरु झाले. तेव्हापासून आतापर्यंतच्या गेल्या तीन वर्षांत या एकेकाळी नावाजलेल्या महाराष्ट्र राज्यात भ्रष्टाचार, इंदिरा काँग्रेस पक्षातील गुप्त कारस्थाने आणि उघडउघड मारामाऱ्या, स्वतःला शास्ते म्हणवणारांची इंदिराजींपुढे लज्जास्पद लाचारी, याशिवाय जनतेला काय पहावयास मिळाले? ठिकठिकाणी चालू असलेले संप, मोर्चे आणि दुकानांपुढील रांगा, ही दृश्ये काय दर्शवितात? मग महाराष्ट्रातील जनता शासनात खांदेपालट व्हावा यासाठी उत्सुक नाही असे कोणीतरी म्हणू शकेल का? विद्यमान शासनाला ती विटलेली नाही काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे काय आहेत ते आपणाला ठाऊक आहेच आणि त्यातून काय निष्कर्ष निघू शकतो तेही आपण जाणून आहोत. म्हणून महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा जाणून घेणे मुळीच अवघड उरलेले नाही. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत ज्या पक्षांचा जनतेशी सतत जवळचा संबंध आलेला आहे, असे पक्ष इंदिरा काँग्रेस सोडल्यास दोनच हेत. जनता पक्ष, काँग्रेस (एस) आणि शेतकरी कामकरी पक्ष. म्हणून आम्ही आग्रहाने असे सुचवू इच्छितो की, आजची पसरलेली परिस्थिती लक्षात घेऊन आणि त्याचबरोबर पर्यायी पक्षाची जनतेला वाटत असलेली गरज लक्षात घेऊन, या तीनही पक्षांच्या नेत्यांनी एकजूट करण्याचा आणि त्याहूनही इष्ट म्हणजे एक पक्ष बांधण्याचा उद्योग विनाविलंब सुरू करावा. त्यांच्या वैचारिक भूमिकेमध्ये जिच्यामुळे एकीकरणाच्या मार्गात अनुल्लंघ्य असा अडथळा निर्माण होईल, अशी तफावतही आम्हाला आढळत नाही. हे तीन पक्ष काही प्रश्नांवर एकत्र येऊन काम करतात, नाही असे नाही. परंतु तेवढ्याने खंबीरपणे शासन चालवू शकणारा पर्याय, अशी त्याची प्रतिमा जनमानसात तयार होत नाही. जनतेला साहाजिकच असे वाटते की, आताच जर हे पक्ष इतके हात राखून एकत्र येतात किंवा एका प्रश्नावर आपले निरनिराळे मोर्चे काढतात आणि निरनिराळी व्यासपीठे उभारतात तर हे सत्तेवर आल्यावर एकठाय राहतील, याची हमी कोणी द्यावी? जनमानसातला हा गैरविश्वास दूर करण्यासाठी हिंमतीने पुढे पाऊल टाकण्याची गरज आम्हास पटते. सुदैवाने या तीनही पक्षांचे नेतृत्व तरुण आहे, उत्साही आहे आणि कार्यक्षमही आहे. दुर्दैवाची गोष्ट एवढीच आहे की महाराष्ट्रात दलितांचे नेतृत्व करू शकेल अशी कोणतीही समर्थ व्यक्ती किंवा संघटना आज नाही. तशी ती असती तर दुधात साखर पडली असती. पण त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. कारण महाराष्ट्रात एकीकरणाच्या प्रक्रियेला वेग येतो आहे असे दृश्य जर दिसू लागले तर दलितांवरही त्याचा परिणाम घडून आल्यावाचून राहणार नाही. पण ही वेळ चालढकल करण्याची नाही की रेंगाळत राहण्याची नाही. धाडसाने पाऊल पुढे टाकण्याची ही वेळ आहे. आमची तर अशी खात्री आहे की यात अपयश संभवतच नाही. मात्र राजारामबापू पाटील, शरद पवार आणि श्री.दि.बा.पाटील यांनी कृतनिश्चय होऊन एकीचे पाऊल उचलले पाहिजे.

Tags: दि.बा.पाटील राजारामबापू पाटील कर्पूरी ठाकूर उपासमार काळा पैसा इंदिरा शासन भ्रष्टाचार संजीव रेड्डी D.B.Patil. #संपादकीय Rajarambapu Patil Karpuri Thakur Hunger Black Money Indira government Corruption Sanjeev Reddy #Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके