डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नव्या पर्वाच्या दिशेने…

भाजपाईंच्या पराभवाने देशात पुन्हा धर्मनिरपेक्ष शक्तींची एकजूट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. देशातल्या धर्मनिरपेक्ष शक्तींनी एक व्हावे असा निकाल या चार राज्यांतल्या जनतेने दिला. त्याबद्दल या चारही राज्यांच्या मतदारांचे आभार मानले पाहिजेत. देशातल्या धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात हे निकाल म्हणजे नवे पर्व ठरेल काय?

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तरांचल आणि मणिपूर या चार राज्यांच्या विधानसभांचे निकाल जाहीर झाले आहेत. या चारही राज्यांतील निकाल केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरुद्ध गेले आहेत असे दिसून येते. या चार राज्यांच्या निवडणुका एका वेगळ्या वातावरणात झाल्या आहेत. 11 सप्टेंबर (अमेरिकेवर हल्ला) व 13 डिसेंबर (संसदेवर हल्ला) या घटनांमुळे जगभर व देशभर दहशतवादविरोधी वातावरण तयार झाले होते. भारतीय जनता पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात जागतिक (मुस्लिम) दहशतवादाचा कळीचा मुद्दा केला होता आणि त्या दहशतवादाला यशस्वीपणे आपणच तोंड देऊ शकतो अशी शेखीही प्रचारसभांतून मिरवली होती. पंजाब हे सीमेवरचे आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा अनुभव घेतलेले, लढाऊ लोकांचे राज्य, त्यांच्यापुढे हा दहशतवादाचा मुद्दा फुसका ठरला, उत्तरप्रदेशमधील गरीब जनता कोणत्या ना कोणत्या दहशतवादाचा दररोजच अनुभव घेत असलेली. सर्व जीवनच दहशतवादाच्या सावटाखाली असलेले. तिला या बाह्य दहशतवादाची आणखी भीती काय असणार? भाजपने उभा केलेला दहशतवादाचा बागुलबुवा त्यामुळे वाऱ्यावर विरून गेला आणि भाजपने दहशतवादाच्या नावाने उभी केलेली ही खोटी खेळी मतदारांनी वेळीच ओळखली. भारतात या दहशतवादविरोधी वातावरणाचे रूपांतर भाजपाईंनी मुसलमानविरोधी वातावरणात केले होते. मुसलमानविरोधी बोलत बोलत 'हिंदू' वोट बैंक संघटित करण्याचे त्यांचे प्रयत्नही फसले. उत्तरप्रदेशातल्या वाराणसीत पंतप्रधान वाजपेयी यांनी मुस्लिमांशिवाय आम्ही केंद्रात सत्तेत आहोत; आणि उत्तरप्रदेशातही सत्ता मिळवू, अशी वल्गना केली होती. 'मुसलमानांना आम्ही कोलतो' अशी उर्मट भाषा सर्वच भाजपाई वापरताना दिसत होते. त्यात पाकिस्तानविरोधी युद्धाच्या वातावरणाने भर घातली होती. त्यामुळे चारही राज्यांत दहशतवादविरोधाचे शिरोमणी, पाकला नष्ट करू शकणारे अशी भाजपाईंनी स्वतःची शेखी लोकांपुढे मिरवण्याचे जरी प्रयत्न केले, तरी निवडणूक निकालांवरून असे दिसते की त्यांचे गर्वाचे घर खाली झाले आहे.

पंजाबात शिरोमणी अकाली दलाबरोबर भाजप सत्तेत होते, तेथे लोकांनी अकाली-भाजप युतीला धूळ चारली. उत्तरांचल हे नवे राज्य झाल्यानंतर पहिल्यांदा तेथे निवडणुका झाल्या. उत्तरांचल हा आमचा 'गड' असे भाजपाई गर्वाने सांगत होते. उत्तरांचल आम्ही बनवले म्हणून आम्हाला मते द्या असे त्यांचे लोकांना आवाहन होते. उत्तरांचलच्या जनतेने तिथल्या अकार्यक्षम भाजप सरकारला पायउतार होण्यास भाग पाडले आहे. तेथे काँग्रेस पक्षाचे सरकार येणार असे चित्र आहे. मणिपूर राज्यातही भाजपला अपयश आले. तेथेही काँग्रेस हाच मोठा पक्ष ठरू पाहतो आहे. चार राज्यांच्या निवडणूक निकालांनी काही महत्त्वाच्या गोष्टी चर्चेत येतील असे दिसते. एक तर या निवडणुकांमुळे केंद्रातल्या अकार्यक्षम भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला काही धोक्याचे इशारे मिळणार आहेत. ज्या राज्याच्या जीवावर भाजपाईंना केंद्राच्या सत्तेत खुर्ची मिळाली ते राज्य समाजवादी पक्षाने त्यांच्याकडून हिसकावून घेतले आहे. खुद्द स्वतःच्याच घरात या मंडळींना चपराक मिळाली असे दिसते. केंद्र सरकारने आजपर्यंत सतत जनताविरोधी निर्णय घेतले आहेत. त्या निर्णयांमुळेही लोकांनी चार राज्यांत केंद्र सरकारवर रोष व्यक्त केला असे म्हणता येईल. इतिहासाचे विकृतीकरण करणे, अभ्यासक्रमात मध्ययुगीन विषय आणणे, कामगारांच्या जीवावर बेतणारे निर्णय घेणे, अल्पसंख्याकांना डिवचण्याचे धोरण चालू ठेवणे या गोष्टींनी भाजपाईंच्या विरोधात जनमत जाणे स्वाभाविकच होते.

या निवडणुकांनी एका अर्थाने 'नव्या पर्वा’लाच सुरुवात होणार असे दिसते. ते पर्व म्हणजे भाजपाईंच्या विरोधी देशभर जनतेने कौल देणे. यामुळे केंद्रातील त्यांचे दोस्तही हळूहळू मैत्री तोडण्याचा विचार करतील. त्याची एक झलक केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या इशाऱ्यातून दिसून येते आहे. ही संगत नजीकच्या काळात आपल्याला नडेल. असे जर भाजपाई दोस्तांना लक्षात आले तर ते हळुहळू एकेक जण पळ काढतील. यामुळे देशात भाजपाई विरोधी गट पुन्हा मजबूत होऊ शकेल. उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलातील पराभव हा त्यांच्या वर्मावरच घाव ठरावा इतका त्यांना अस्वस्थ करणारा आहे. निवडणूक निकालांचे विश्लेषण सुरू असताना भाजप नेत्यांचे चेहरे अक्षरशः काळे ठिक्कर पडले होते ते त्यामुळेच. भाजपाईंच्या पराभवाने देशात पुन्हा धर्मनिरपेक्ष शक्तींची एकजूट होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. देशातल्या धर्मनिरपेक्ष शक्तींनी एक व्हावे असा निकाल या चार राज्यांतल्या जनतेने दिला. त्याबद्दल या चारही राज्यांच्या मतदारांचे आभार मानले पाहिजेत. देशातल्या धर्मनिरपेक्षतेच्या संदर्भात हे निकाल म्हणजे नवे पर्व ठरेल काय?

Tags: रामविलास पासवान 13 डिसेंबर संसदेवरील हल्ला 11 सप्टेंबर अमेरिकेवरील हल्ला उत्तरांचल आणि मणिपूर विधानसभा निवडणूक 2002 पंजाब उत्तर प्रदेश Sadhana Editorial 2002 Ram Vilas Paswan 13 September- attack on parliament 11th September- attack on America Uttaranchal and Manipur assembly election 2002 Punjab Uttar Pradesh साधना अग्रलेख- 2002 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके