डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वातंत्र्यदिन - समारंभ नव्हे, व्रत पालन

गेल्या 46 वर्षात आपला देश अनेक आपत्तीतून गेला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रसंगांत देशातील पराक्रम आणि त्याग भव्य स्वरूपात प्रगट झाला आहे. गोवा मुक्ती संग्रामात सत्याग्रहींनी जो अतुलनीय त्याग केला त्याच्या स्मरणाने आजही प्रेरणा मिळते. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

साधनेचा पहिला अंक 1948 साली 15 ऑगस्टला प्रसिद्ध झाला त्या वेळी देशाच्या फाळणीचे आणि महात्मा गांधींच्या हत्येचे सावट मनावर पडले होते, आणि त्याच वेळी सर्व संकटावर मात करून राष्ट्र बांधणीच्या आणि नवसमाज निर्मितीच्या कार्यासाठी निर्धाराने कामाला लागले पाहिजे अशी कर्तव्याची जाणीव मनाला उभारी देत होती. साने गुरुजींची चैतन्यदायी लेखणी 'साधनेतून तरुणांच्या मनात ध्येयवादाची ज्योत प्रज्वलित करील असा विश्वासही वाटत होता. पू. साने गुरुजींच्या निधनानंतर आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन, नानासाहेब गोरे, यदुनाथ थत्ते आदींनी साधनेची जबाबदारी सांभाळीत एस एम.जोशी, अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या सहकार्याने समाजाच्या प्रबोधनाचे कार्य अव्याहत केले.

गेल्या 46 वर्षात आपला देश अनेक आपत्तीतून गेला आहे. त्याचप्रमाणे अनेक प्रसंगांत देशातील पराक्रम आणि त्याग भव्य स्वरूपात प्रगट झाला आहे. गोवा मुक्ती संग्रामात सत्याग्रहींनी जो अतुलनीय त्याग केला त्याच्या स्मरणाने आजही प्रेरणा मिळते. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ममतेतून समतेकडे जाण्याच्या विनोबाजींच्या उदात्त प्रयत्नांमुळे जयप्रकाशजींच्यासारखे मान्यवर नेते आणि असंख्य तरुण कार्यकर्ते प्रभावित झाले. वा कार्यक्यांपैकी अनेक जण आजही निष्ठापूर्वक सर्वोदयाचे काम करीत आहेत. 1962 साली चीनने केलेल्या आक्रमणाच्या वेळी, सुरुवतीस नामुष्की झाली तरी, राष्ट्रीय भावनेने सबंध देश पेटून उठला. 1965 साली झालेल्या भारत- पाक युद्धातील जवानांचा पराक्रम, सरहद्दीवरील जनतेने सेन्याला दिलेली साथ, दाखविलेले धैर्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी दाखविलेली त्यागाची तयारी हा भारताच्या अस्मितेचा अद्भुत अविष्कार होता. 1971 साली बांगलादेशाची पाकिस्तानच्या जोखडापासून मुक्तता करताना जवानांच्या पराक्रमाचा पुनश्च एकदा प्रत्यय आला.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. नेहरूंनी भारतात नवे औद्योगिक युग व्हावे, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या साहायाने आधुनिक युगाची निर्मिती व्हावी यासाठी तडफेने प्रयत्न केले. या कालखंडात चुका झाल्या परंतु संरक्षणासाठी आवश्यक असलेला भकम औद्योगिक पाया रचला गेला, आणि नवी कर्तबगार पिढी विज्ञाननिष्ठेने काम करू लागली. लालबहादुर शास्त्री यांनी 'जय जवान च्या इतकेच 'जय किसान' या घोषणेस महत्त्व दिले आणि भारतातील ग्रामीण भागातील शेतकरी, कारागीर शेतमजूर यांनाही देशाच्या उभारणीत महत्त्वाचे स्थान आहे हे स्पष्ट केले, जनसामान्यांचा आत्मविश्वास जागृत केला. 1975 साली देशावर अकारण आणीबाणी लावून इंदिरा गांधींनी लोकशाहीच्या मुळावरच आघात केला. परंतु जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालील नवनिर्माण आंदोलनामुळे सर्व लोकशाहीवादी पक्ष आणि लोकशाहीप्रेमी नागरिक यांची एकजूट होऊन लोकशाहीची पुनःस्थापना झाली.

राजकारणात इतरही अनेक उलथापालथी झाल्या. जागतिक राजकारणात अमेरिकेशी तुल्यबळ असलेल्या रशियातील कम्युनिस्ट राजवट गेल्या काही वर्षांत कोलमडली आणि घटक राष्ट्रे फुटून रशियाच्या चिरफळ्या उडाल्या. त्यामुळे जगात सध्या तरी अमेरिकेस आव्हान देणारी शक्तीच उरलेली नाही आणि जागतिक राजकारणाचा तोल ढळला आहे.

गेल्या चार दशकांत विज्ञानाच्या क्षेत्रात झालेली प्रगती विलक्षण नेत्रदीपक आहे. मानव ज्याप्रमाणे चंद्रावर गेला त्याचप्रमाणे जैवतंत्रज्ञानामुळे (बायोटेक्नॉलॉजी) अन्नधान्य उत्पादनात क्रांती घडून आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातही झपाट्याने प्रगती झाली आहे. मात्र तंत्रविज्ञानाची घोडदौड चालू असताना वनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला, आणि प्रदूषणामुळे पर्यावरण धोक्यात आले . आधुनिकता, संपन्नता यांच्यामागे तंत्रविज्ञानाच्या साहाय्याने धावताना ज्या ठेचा लागल्या त्यामुळे पर्यायी विकासनीतीचा विचार आपल्या देशात सुरू झाला आहे. एका बाजूस केंद्र शासनाने नवे आर्थिक धोरण स्वीकारले असून अर्थव्यवस्थेचे वैश्विकीकरण (ग्लोबलायझेशन) अपरिहार्य आहे असे अर्थमंत्री मनमोहनसिंग सांगत आहेत. त्याचबरोवर या देशातील सर्वांच्या हात्तांना काम मिळाले पाहिजे, विकासाच्या नावाखाली येथील भूमिपुत्रांचे जीवन उद्ध्वस्त होऊन चालणार नाही असा निकराचा प्रयत्न समतेसाठी झटणाच्या संघटना, तसेच मेधा पाटकर आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.

गेल्या काही वर्षात जग झपाट्याने जवळ आले आहे. [क्रीडा क्षेत्रामध्ये नवनवीन विक्रम होत आहेत. दक्षिण ध्रुवावर आणि जगातील अत्युच्च गिरिशिखरावर पराक्रमी तरुण आणि धाडसी वैज्ञानिक पोहोचले आहेत आणि साहसासाठी नवी क्षितिजे धुंडाळत आहेत.

भारतात गेल्या 48 वर्षांमध्ये ज्ञानाची क्षेत्रे अनेकांना नव्याने खुली झाली. सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकणार नाही हे तत्त्वतः मान्य झाले. परंतु प्रत्यक्ष कृती करण्यात आपण फार अपुरे पडलो आहोत. उपेक्षित आणि दलित यांच्या आकांक्षा जागृत झाल्या तरी त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. मूठभर स्त्रियांना कर्तृत्वाची नवी क्षेत्रे उपलब्ध झाली असली तरी भारतीय समाजात स्त्रियांचा छळ शोषण आणि त्यांच्यावरील अत्याचार यांचे प्रमाण कमी झालेले नाही. दूरदर्शनसारख्या माध्यमामुळे आपल्या समाजातील एका थरात जो चंगळवाद बोकाळलेला आहे. त्यामुळे स्त्री ही केवळ पुरुषाच्या उपभोगाची वस्तू आहे अशी वृत्ती थैमान घालत आहे. अलीकडेच महाराष्ट्रात वासनाकांडाचे जे भीषण स्वरूप ठिकठिकाणी उघडकीस आले त्यामुळे आपल्या समाजात धनदांडग्यांच्या विकृत कामवासनेस तरुण स्त्रिया कशा बळी पडल्या ते आपल्याला समजून आले. गेल्या काही दिवसांत भ्रष्टाचाराने राक्षसी स्वरूप धारण करून समाजजीवन उद्ध्वस्त करून टाकले आहे. राजकारणातील गुन्हेगारीमुळे सामान्य माणूस हतबल होत आहे.

स्वातंत्र्य दिनाला आपण राष्ट्राची प्रगती भविष्यकालात कशी होईल याचा विचार करतो. राष्ट्राच्या प्रगतीचा मुख्य आचार आपले राष्ट्रीय शील आहे, ही शिकवण साने गुरुजींनी आम्हाला दिली. आपल्या देशात भौतिक प्रगती कितीही झाली आणि लोकांतील माणुसकी लोप पावली तर देश टिकू शकणार नाही. आज वस्तुस्थिती अशी आहे की जी थोडीफार भौतिक प्रगती आणि केली आहे तिचे फायदेही मूठभरांनीच लाटले आहेत. सत्ता आणि संपत्ती यांची अनिष्ट युती झाली असून या युतीचा प्रतिकार करणारी शक्ती आज आपल्या समाजात उभी राहिलेली नाही. आपल्या देशात सामाजिक न्याय आणि समता यांच्या प्रस्थापनेसाठी जर देशव्यापी आंदोलन झाले तरच राष्ट्राच्या शीलाचे संवर्धन होऊ शकेल. देशात ठिकठिकाणी विधायक, रचनात्मक काम करणारे आणि त्याबरोबर ग्रामीण श्रमिकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणारे कार्यकर्त्यांचे गट आहेत याची आम्हाला माहिती आहे. रचनात्मक संघर्ष करून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी झटणारे त्यागी कार्यकर्ते हेच भारताचे आशास्थान आहे. परंतु आज या कार्यकर्त्यांची शक्ती विखुरलेली आहे. त्यांना राजकीय आधार वाटेल अशी लोकशाहीनिष्ठ समतावादी पक्षांची देशव्यापी आघाडी अस्तित्वात नाही. मूलतत्त्वादी आणि संकुचित जातीयवादी शक्तींच्यामुळे मुख्य उद्दिष्टांकडून देशाचे सतत विचलित होत आहे. पंजाबमधील प्रक्षोभ कमी झाला असला तरी काश्मीर, ईशान्येकडील राज्ये येथील अशांतता काबूत आणण्यासाठी आपल्या देशाची फार मोठी शक्ती खर्च होत आहे. पाकिस्तानने भारताशी अघोषित युद्ध चालविले आहे आणि अमेरिका आपली अनेक बाजूंनी नाकेबंदी करीत आहे. आजचे राजकीय नेतृत्व सर्वसंमतीचे (कॉन्सेन्सस) राजकारण करण्याची भाषा बोलत कृती मात्र त्याच्या उलट करीत आहे, या सर्व परिस्थितीमुळे आम्हाला विषण्णता वाटत असली तरी जनसामान्यांच्या सदसद्विवेक बुद्धीवर, त्यांच्या देशनिष्ठेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांची शक्ती जागृत करून त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा आपण देऊ शकलो तरच आजच्या सर्व समस्यांना आपण सामोरे जाऊ शकू, सर्व अरिष्टांवर मात करू शकू. आमच्या या प्रयत्नांना सुस्पष्ट वैचारिक अधिष्ठान असले पाहिजे. रशिया आणि पूर्व युरोपातील राष्ट्रांमध्ये हुकूमशाही राजवटीमुळे समाजवादाला विकृत वळण लागले. समाजवाद म्हणजे केवळ राष्ट्रीयीकरण नाही, तसेच केवळ संघटित कामगारांच्या हक्कांसाठी झगडणे नाही, हा धडा आपण भारतात शिकलो आहोत. परंतु समाज शोषणमुक्त असला पाहिजे, आणि सर्वांना विकासाची संधी देताना ज्यांना आपण मागासवर्गीय बनविले त्यांना जादा संधी दिली पाहिजे. हा समाजवादाचा आशय हाच आपला धृवतारा आहे. भारताच्या प्रगतीसाठी लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या तत्त्वांच्या आधारेच आपण भारताचे भविष्य घडविले पाहिजे.

आजच्या परिस्थितीत स्वातंत्र्यादिनाचा सोहळा साजरा करावा असे आम्हांला वाटत नाही. 15 ऑगस्ट 1947 ला दिल्लीत आणि देशाच्या अन्य भागांत जल्लोष चालू असताना कलकत्त्यातील झोपडपट्टीत राहून माणसांच्या मनात माणुसकी जागृत करण्यासाठी महात्मा गांधी प्रयत्न करीत होते. उपोषण करून आणि कर्तव्यपालन करून त्यांनी पहिला स्वातंत्र्यदिन पाळला. आजही स्वातंत्र्यदिन साजरा करण्याऐवजी राष्ट्रनिष्ठ व्यक्ती आणि संघटना यांनी माणुसकी जागविणारी, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी कृती करून स्वातंत्र्यदिन पाळावा असे आम्हाला वाटते. साने गुरुजींची 'साधना' अशा प्रयत्नात विनम्र भावनेने सहभागी होत आहे.

Tags: नागरी समस्या गरिबी संरक्षण पाकिस्तान शिक्षण ग्रामविकास विकास महात्मा गांधी भारतीय स्वातंत्र्यदिन Freedom Struggle Mahatma Gandhi Defence Pakistan Education Development India #Independence Day weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके