डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नामविस्तार झाला; आता ज्ञानविस्तार हवा

निजामी जुलमाविरुद्ध मराठवाड्याने जो लढा दिला आणि तो लढवताना जी वीरवृत्ती आणि त्यागाचा बाणा प्रकट केला त्यांच्या स्मरणार्थ विद्यापीठाला मराठवाडा हे नाव देण्यात आले आहे, ते कदापि बदलू नये असे या लोकांचे म्हणणे होते. या उलट नवजागृत आणि नवशिक्षित दलित समाजातील तरुणांच्या शिक्षणाची काळजी मुख्यतः मिलिंद महाविद्यालयाने आणि त्या केंद्राभोवती निर्माण होत गेलेल्या शिक्षणसंस्थांनी पाहिलेली असल्यामुळे डॉ. आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला दिलेच पाहिजे असा दलितांचा आग्रह होता.

मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मुख्यतः दलितांची आणि त्यांच्या आकांक्षांविषयी सहानुभूती असणाऱ्या पाठिराख्यांची मागणी होती. दलितांच्या या मागणीला पुलोद सरकार असताना विधानसभेने एकमुखी पाठिंबा दिला आणि नामांतर झाले पाहिजे या ठरावाला लोकप्रतिनिधींचा एकमताचा अनुकूल कौल मिळाला. परंतु नामांतर होणार असे दिसू लागताच मराठवाड्यात ठिकठिकाणी दंगली झाल्या. दलितांवर हल्ले झाले. त्यांच्या वाड्या-वस्त्यांना आगी लावण्यात आल्या आणि त्याची नाकेबंदी करण्याचेही प्रयत्न झाले. दुर्दैवाने या दंगलींना  स्वरूप आले ते दलित विरुद्ध सवर्ण यांच्यामधील लढ्याचे हे वर्णन बहुतांशी बरोबर म्हणता येईल. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दलितांचे सर्वच प्रतिपक्षी जात्यंधतेमुळे आणि दलितद्वेषामुळे नामांतराला विरोध करीत नव्हते मराठवाडा विद्यापीठ हे नाव विद्यापीठाला देण्यामागे मराठवाड्याची अलीकडील काळात जागृत झालेली अस्मिता प्रतीकात्मक रीतीने प्रकट होते. निजामी जुलमाविरुद्ध मराठवाड्याने जो लढा दिला आणि तो लढवताना जी वीरवृत्ती आणि त्यागाचा बाणा प्रकट केला त्यांच्या स्मरणार्थ विद्यापीठाला मराठवाडा हे नाव देण्यात आले आहे, ते कदापि बदलू नये असे या लोकांचे म्हणणे होते. या उलट नवजागृत आणि नवशिक्षित दलित समाजातील तरुणांच्या शिक्षणाची काळजी मुख्यतः मिलिंद महाविद्यालयाने आणि त्या केंद्राभोवती निर्माण होत गेलेल्या शिक्षणसंस्थांनी पाहिलेली असल्यामुळे डॉ. आंबेडकरांचे नाव विद्यापीठाला दिलेच पाहिजे असा दलितांचा आग्रह होता. शिवाय दलितांची मोठी संख्या, त्यांची अनेकानेक कार्यक्षेत्रे मराठवाड्यात असल्यामुळे या मागणीमागे फार मोठी शक्ती उभी राहिली होती यात संशय नाही. दलितांच्या या मागणीचा पाठपुरावा सर्व डावे पक्ष आणि सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करणाऱ्या संघटना व संस्था यांनी पहिल्यापासून केला. आणि पुलोद सरकारने ही गोष्ट लक्षात घेऊनच नामांतर करावयाचा निर्णय घेतला होता. दलितांवर हल्ले करावयास उद्युक्त झालेल्या दलितेतरांची समजूत घालण्यासाठी अनेक महनीय व्यक्तींनी शर्थीचे प्रयत्न केले. असे प्रयत्न करीत असता पूज्य एस. एम. जोशी यांच्या गळ्यात जोडयांची माळ घालण्यापर्यंत  माथेफिरुपणाचा अतिरेक झाला. तेवढ्यात पुलोद सरकारही बरखास्त झाले आणि नामांतराचा ठराव विधिमंडळाच्या बासनात तसाच पडून राहिला राज्यकर्त्या काँग्रेससकट सर्व राजकीय पक्ष वास्तविक नामांतराचा पाठिंबा देत असताना या ठरावाचे घोंगडे भिजत पडावे हे अक्षरशः अक्षम्य होते, पण लोकक्षोभाच्या भयाने राजकीय शहाणपणाचा मार्ग म्हणून पुन्हा एकवार वाटाघाटींचे गुऱ्हाळ सुरू करण्यात आले. अंती श्री. शरद पवार यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यानी संक्रांतीच्या दिवशी जिवाचा धडा करून, नामांतर नाही तरी नामविस्ताराचा पर्याय प्रत्यक्षात आणला. या पर्यायाला शिवसेना वगळता सर्वांचा पाठींबा मिळाला आहे. ही समाधानाची गोष्ट आहे. या पर्यायानुसार आता हे विद्यापीठ 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' हे नाव धारण करीत आहे.

आमच्या दृष्टीने हा प्रश्न केवळ भावनात्मक होता. त्याची सोडवणूक झाल्यामुळे झालेले समाधान हेही भावनात्मक आहे. गोविंदभाई श्रॉफ आणि के. अनंत भालेराव यांच्यासारख्या सत्प्रवृत्त आणि सद्भावशील नेत्यांना आम्ही संकुचित वृत्तीचे कधीच मानले नाही, मानत नाही. मराठवाड्याच्या अस्मितेविषयी त्यांच्या मनातील तीव्र भावना आम्ही समजू शकतो. ही भावना प्रामाणिक आहे असेही आम्ही मान्य करतो. उलट विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिलेच पाहिजे हा आग्रहही भावनात्मकच होता आणि आहे: असा आग्रह धरणाऱ्यांच्या विषयी कसलेही हेत्वारोप करणे गैर आहे हे देखील आम्ही मान्य करतो. याचा सारांश असा की प्रदेशाचा अभिमान आणि राष्ट्रपुरुषाविषयी आत्यंतिक प्रेम या दोन भावनात हा संघर्ष झाला. 
हा मिटवण्यासाठी नामविस्ताराचा पर्याय काढून समाधान काय किंवा समाधान काय, दोहोंची समान वाटणी करून मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न सोडवला आहे हे उघड आहे.

आपल्या देशात नगण्य महत्त्वाच्या प्रश्नावर प्रचंड रण माजवण्यात अनेकांना आयुष्याची इतिकर्तव्यता वाटते. आबेडकरांचे नाव  दिल्याने जर दलित समाजाला साभिमान आनंद होणार असेल तर मराठवाड्याची अस्मिता आपल्या मनाच्या देव्हाऱ्यातच ठेवून, असे नाव देण्याला कै. भालेराव काय किंवा आता गोविंदभाई काय, यांनी संमती द्यायला काहीच हरकत नव्हती. धाकट्या भावंडांना झुकते माप द्यावे हा न्याय त्यांच्यासारख्या उदात चारित्र्याच्या  आणि उदार स्वभावाच्या थोर पुरुषांना निश्चितच माहीत होते. तसे झुकते माप दिल्यामुळे त्यांची आणि मराठवाड्याची थोरवी साऱ्या देशाच्या जनमानसावर ठसली असती.

नामांतरावरुन निर्माण झालेल्या या संघर्षात पुष्कळ ठिकाणी व्यक्तिगत हेवेदावे ध्यानात ठेवून 'काटा काढण्याचे प्रकार अनेक गावांतून झाले. काही ठिकाणी परंपरेने चालत आलेल्या खालच्या घरातील लोकांविषयीच्या आकसाने होळ्या पेटवण्यात गावगुंडांनी मतलब साधून घेतला. मुख्य प्रश्न बाजूला राहून गरिबांची ससेहोलपट करण्यात काही गुंडांना कसली धन्यता वाटली कोण जाणे! असो. आता तेही सारे विसरायला हवे.

नामविस्तार होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाच्या नावात अंतर्भूत झाल्याचा आनंद ज्यांना झाला असेल त्यांनी तो आनंद अवश्य अनुभवावा आणि उल्हासाने साजराही करावा. पण उल्हासाचा, उत्सवाचा काळ औट घटकेचा असतो. आता शांत चित्ताने पुढचा विचार करायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर ज्ञानोपासक होते आणि स्वाभिमानी जीवनाची दीक्षा देणारे होते. त्यांचे नाव लाभणाऱ्या विद्यापीठातल्या शिक्षणाची योजना क्रांतिकारक पायावरच उभी असावयास हवी. आपल्या शिक्षणात यापुढे कोणत्या सुधारणा करणे निकडीचे आहे? कुचकामी आणि केवळ चाकरमाने बनवणाऱ्या फुसक्या डिग्र्या कशाबशा गळ्यात बांधणाऱ्या विद्यार्जनाऐवजी आपल्या जीवनाची श्रीमंती खाऱ्या अर्थाने वाढवणारे शिक्षण कसे असावे आणि आपणास ते कसे मिळेल? केवळ धनिक वणिक बाळे आणि शेतात सोन्याचा हंडा गवसल्यागत बळ पैका देणारी पिके काढणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्यांची ऐतखाऊ मुले यांनाच उच्च शिक्षण संस्थांची दारे मापटयाने पैसे ओतताच आज उघडतात, त्याऐवजी योग्य संधीच्या अभावी किडून, कोळपून जाणाऱ्या, लायक असूनही निर्धनतेमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या उगवत्या पिढ्यांना विद्येच्या मंदिरात प्रवेश कसा मिळेल? विद्यापीठाला नाव कोणते मिळाले यावर जगामध्ये त्या विद्यापीठाचे नाव होत नसते, तर 'चित्त जिथे  भीतिशून्य, उंच जिथे  माथा' अशा वातावरणात ज्ञानविज्ञानाचे  झरे जिथे कुंठित होत नाहीत अशा जमिनीत उभे असणारे विद्यापीठ जगात नामजाद होते.

बाबासाहेबांचे नाव घेणे सोपे आहे. पेलणे कठीण रे बाबा !

प्रा. सदानंद वर्टी 

प्रा. सदानंद वर्टी यांच्या अपघाती निधनाची वार्ता गेल्या शुक्रवारी समजली, त्या वेळी मन सुन्न होऊन गेले. गेल्या अर्धशतकात सर्व चळवळीमध्ये आणि विधायक कामांतही आघाडीवर राहिलेले वर्टी सर यापुढे वसईत दिसणार नाहीत ही जाणीव अत्यंत क्लेशकारक वाटली.

सदानंद वर्टी हे मूळचे कारवारचे. ते वसईत आले आणि वसईकरच बनून गेले. 1942 च्या स्वातंत्र्य संग्रामात वसाईच्या तरुणांचा जो गट धडाडीने सामील झाला त्यामध्ये वर्टी हे होते. कारावास भोगून सुटल्यावर वर्टी आणि त्यांचे सहकारी यांनी वसईत हायस्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. वर्टी सर आयुष्यभर या त्यांच्या आवडत्या शाळेच्या मागेच राहिले. त्यांच्या असंख्य मित्रांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अन्त्यदर्शन घेतले ते शाळेच्या ग्राऊंडला लागून असलेल्या व्यासपीठावरच. वर्टी सरांनी काही वर्षे या शाळेत शिकविले. ते त्याच वेळी एम्.ए. झाले आणि नंतर मुंबईच्या पोदार कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम करण्यास त्यांनी सुरवात केली. 1952 च्या निवडणुकीत वर्टीना वसईतून समाजवादी पक्षाने उभे केले. वसईतील ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे लोकप्रिय पुढारी आणि 1937 साली खेर मंत्रिमंडळात स्थानिक स्वराज्य मंत्री असलेले गोविंदराव वर्तक यांच्या विरुद्ध वर्टी सर निवडणूक हरले आणि त्यांनी ती निवडणूक जिंकली.

प्रा. वर्टी यांनी अल्प काळातच संसदीय कार्यपद्धती आत्मसात करून विरोधी पक्षाचे आमदार म्हणून प्रभावीपणे काम केले. अभ्यास आणि भाषेवरील प्रभुत्व यांमुळे त्यांची सभागृहावर चांगलीच छाप पडली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते आघाडीवर होतेच. 1957 साडी वर्टी सर विधानसभेत पुन्हा निवडून आले. त्या वेळी वर्टी, दत्ता ताह्मणे आणि नवनीत शहा ही ठाणे जिल्ह्यातील आमदार त्रयी अभ्यासू भाषणे आणि विधानसभेच्या नियमांचे सूक्ष्म ज्ञान या वैशिष्ट्यांमुळे चमकली.

वर्टी सर वसई भागातील प्रत्येक महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यात धडाडीने भाग घेत, अन्यायाविरुद्ध सडेतोड बोलणारे, विधायक चळवळीना, राष्ट्र सेवा दलाला सतत साहाय्य करणारे, सार्वजनिक हिताच्या कामात पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांना एकत्र आणणारे निष्कलंक चारित्र्याचे वर्टी सर हा ठाणे जिल्ह्यातील समाजवादी चळवळीचा भक्कम आधार होता. कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करून मार्गदर्शन करणे हे वर्टी सरांचे  खास वैशिष्टय. ते आपल्या तरुण सहकाऱ्याना सतत साहाय्य करीत, त्यांच्या पाठीवर प्रेमाची थाप टाकत आणि कार्यकर्ते चुकल्यास स्पष्टपणे चार शब्द सुनावीत. वर्टी सरांना कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्यामुळे त्यांच्या शब्दाला नैतिक वजन असे. पंढरी चौधरी आणि डॉमनिक गॉनसाल्विस हे  आमदार, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वासुदेव वर्तक आणि अन्य अनेक तरुण कार्यकर्ते या सर्वांच्या मागे वर्टी खंबीरपणे उभे राहत. त्यामुळेच सरांच्या मृत्यूनंतर शोकसभेत बोलताना एक कार्यकर्ता 'आम्ही आज पोरके झालो', असे भावावेगाने म्हणाला.

वर्टी सरांना साहित्य आणि विचारप्रधान ग्रंथ यांची फार आवड होती. ते एक कुशल अध्यापक होते. सामान्य विद्यार्थ्याला इंग्रजी साहित्य आणि भाषा, सुगम शैलीने शिकविण्यात त्यांचा हातखंडा होता.

वर्टी सरांच्या पत्नी त्यांच्या समवेत सर्व कामांमध्ये भाग घेत, वर्टीचे कौटुंबिक जीवन सुखी-समाधानी होते. दोन वर्षांपूर्वी बहिणींचे निधन झाले. मुली लग्न होऊन आपापल्या घरी गेलेल्या. त्यामुळे वर्टी सरांना एकाकी वाटे. परंतु ते सतत आपल्या भोवतालच्या मित्रांच्या कामात रस घेत असत. वर्टी सरांचे 'साधने वर फार प्रेम होते आणि आम्हांला ते सतत मदत करीत, वर्टी सरांनी एस्.टी. बोर्डचे सदस्य म्हणून बरीच वर्षे उत्तम काम केले.
दैवदुर्विलास म्हणजे पाठीमागे येणाऱ्या एस्. टी. बसचा धक्का लागल्यामुळेच त्यांचे निधन झाले.

विशाल अंतःकरणाचे, मनमोकळ्या स्वभावाचे. स्पष्ट विचारांचे स्पष्टवक्ते असलेल्या वर्टी सरांची साथ दीर्घकाळ लाभली आणि आता त्यांच्या मृत्यूमुळे ती कायमची सुटली याचे फार दुःख होते. आमच्या या ज्येष्ठ सहकाऱ्यास विनम्र अभिवादन,

Tags: नामविस्तार नामांतर औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ दलित नामांतर चळवळ Dalit Namantar Babasaheb Ambedkar BAMU Marathwada Name Change Aurangabad Univercity #Weekly Sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके