डिजिटल अर्काईव्ह

वो है नये अंदाज क्यूँ हो पुराना?

न्या. चंद्रचूड यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या गणपतीच्या आरतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (एकट्यालाच) बोलावले. एवढेच नाही तर, चंद्रचूड पती-पत्नी सोबत केलेल्या आरतीचा व्हिडिओ आणि फोटो पंतप्रधानांनी स्वतः व्हायरल केला होता. त्यामुळे सरन्यायाधीशांवर प्रचंड टीका झाली होती. तेव्हा ते पेल्यातील वादळ ठरेल असे वाटले होते. पण झाले उलटेच. त्यानंतरच्या दोन महिन्यांत इतके काय काय घडले की, देशातील बुद्धिवादी वर्तुळातील चर्चेच्या केंद्रस्थानी न्या. चंद्रचूडच राहिले. इतके की, अशी टोकाची टीका ओढवून घेण्याच्या बाबतीत त्यांनी आपल्या पंतप्रधानांनाही मागे टाकले. अर्थात, 10 नोव्हेंबरला ते निवृत्त झाल्यानंतर आठवडाभराने वादळ शांत झाल्यासारखे दिसते आहे.

प्रिय वाचक,

2020 च्या दिवाळीपूर्वी दीडशे वर्षांचे केशवराव आम्हाला पहिल्यांदा भेटले. त्यानंतर अधूनमधून पण सातत्याने आम्ही त्यांच्या भेटीला जात राहिलो. झालेले संवाद या जागेवर मुलाखत स्वरूपात प्रसिद्ध करीत राहिलो. आतापर्यंत पंधरा मुलाखती झाल्या. गेल्या सप्टेंबरमध्ये आम्ही त्यांची जी मुलाखत घेतली, तिचा मध्यबिंदू होता भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड. त्या मुलाखतीला निमित्त म्हणजे, न्या. चंद्रचूड यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या गणपतीच्या आरतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (एकट्यालाच) बोलावले. एवढेच नाही तर, चंद्रचूड पती-पत्नी सोबत केलेल्या आरतीचा व्हिडिओ आणि फोटो पंतप्रधानांनी स्वतः व्हायरल केला होता. त्यामुळे सरन्यायाधीशांवर प्रचंड टीका झाली होती. तेव्हा ते पेल्यातील वादळ ठरेल असे वाटले होते. पण झाले उलटेच. त्यानंतरच्या दोन महिन्यांत इतके काय काय घडले की, देशातील बुद्धिवादी वर्तुळातील चर्चेच्या केंद्रस्थानी न्या. चंद्रचूडच राहिले. इतके की, अशी टोकाची टीका ओढवून घेण्याच्या बाबतीत त्यांनी आपल्या पंतप्रधानांनाही मागे टाकले. अर्थात, 10 नोव्हेंबरला ते निवृत्त झाल्यानंतर आठवडाभराने वादळ शांत झाल्यासारखे दिसते आहे. पण पुन्हा ते घोंघावत येण्याची शक्यता आहेच. त्यामुळे गेल्या आठवड्यात त्याच विषयावर केशवरावांची मुलाखत घेणे आम्हाला आवश्यक वाटले. मग गेलो आम्ही नेहमीप्रमाणेच डेक्कन कॉलेजच्या परिसरात. अर्थातच भल्या पहाटे. ते बसले होते नेहमीच्या बाकड्यावर, नेहमीप्रमाणेच क्षितिजाकडे नजर लावून. मात्र, या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर निर्विकारपणाऐवजी वेगळेच भाव दिसले. निश्चित सांगता येणार नाही, पण 'आणखी काय वाईट व्हायचे बाकी राहिलेय', असा काहीसा तो भाव असावा. पण त्याबाबत काही विचारण्यापेक्षा मनात साठलेल्या प्रश्नांची उधळण आम्ही सुरू केली. आणि मग झालेला संवाद असा - 

प्रश्न : केशवराव, तुमची मुलाखत घेताना मागच्या वेळी आम्ही 'गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री' ही सुरेश भटांची गझल आठवत असल्याचे सांगितले होते. तेव्हा तुम्ही आम्हाला प्रतिप्रश्न केले होते, 'अतिशयोक्ती करू नका' असे म्हणाला होतात.

- हो, तर मग ?

प्रश्न : त्यावर आम्ही विचार केला, शेरोशायरीच्या हव्यासाने आपल्याकडून अतिशयोक्ती झाली असावी, असे वाटून त्याचे दुःखही झाले. पण आता मागे वळून पाहताना वाटते, ती अतिशयोक्ती आणि वस्तुस्थिती यातील अंतर फार जास्त नाही.

- याचा अर्थ तुम्ही पुरते गर्भगळीत झालात.

प्रश्न : तसे म्हणायला आमची हरकत नाही. पण न्या. चंद्रचूड निवृत्त झाले असले तरी, त्यांची नवी इनिंग लवकरच सुरू होईल असे सर्वत्र बोलले जातेय. अनेक लहान-थोरांचे लक्ष लागले आहे तिकडे. कोणाला वाटते ते आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून जातील, कोणाला वाटते ते राज्यपाल होतील, कोणाला वाटते ते राज्यसभेवर जातील, तर काहींना वाटते ते थेट केंद्रीय मंत्रीमंडळात जातील. तुमचा काही अंदाज?

- आम्ही ज्योतिषी नाही, हे माहीत आहे ना तुम्हाला?

प्रश्न : हो, माहीत आहे. पण एके काळी न्यायाधीश होता तुम्ही. त्यानंतरची सव्वाशे वर्षे ब्रिटिश भारतातील आणि स्वतंत्र भारतातील न्यायसंस्थेची वाटचाल पाहत आलात तुम्ही, म्हणून विचारत आहोत.

- ती वाटचाल सुखद असती तर ऐन उमेदीत न्यायाधीशपद सोडले नसते आम्ही.

प्रश्न : ते खरे. तुमची ती खपली काढणार नाही आम्ही. पण बघा ना, मागच्या वेळी आपण भेटलो तेव्हा केवळ गणपतीची आरती हा वादाचा मुद्दा होता न्या. चंद्रचूड यांच्याबाबतीत. त्यानंतर त्यांनी मोठाच धमाका केला. राम मंदिराच्या खटल्यात त्यांनी साक्षात परमेश्वराकडून निकाल मागितल्याचे सांगितले. काय तर म्हणे, निकाल काय द्यावा हे कळत नव्हते, म्हणून ईश्वराला साकडे घातले, मार्गदर्शन मागितले आणि त्यांना ते मिळालेही...!

- हो, पण तुम्ही लोकांनी त्याचा खूपच बाऊ केला. 'ध'चा 'मा' करण्यासारखे होते ते. त्यांनी सांगितले ना, 'गावातील लोकांसमोर बोललो'. पूजापाठ करतात ते नियमितपणे, त्यामुळे ती परिभाषा वापरली त्यांनी. देवाने सद्बुद्धी दिली अशी त्यांची श्रद्धा असेल, तर तुम्ही लोक इतकी हरकत का घेत आहात?

प्रश्न : राम मंदिर खटल्याचा निकाल द्यायला आणखी चार न्यायमूर्ती होते. पण, आम्हाला एक गोष्ट कळली नाही अद्याप. त्या चौघांना न्या. चंद्रचूड यांनी देवाचा कौल काय आहे हे सांगितले की देवाने त्या चौघांनाही थेट सांगितले ? की त्या चौघांनीही देवाला साकडे घातले होते?

- हे आम्हाला तरी कसे माहीत असणार? मीडियातील लोकांनी नको तितके जास्त प्रश्न ज्याला त्याला विचारले. अनेक व्हिडिओंचा मारा केला चौफेर. पण त्या चौघांची प्रतिक्रिया का नाही घेतली?

प्रश्न : खरे आहे. त्या चौघांची प्रतिक्रिया कोणीच कशी घेतली नाही, हे आश्चर्यच आहे. पण न्या. चंद्रचूड प्रकरणात निराशा केली मुख्य प्रवाहातल्या बहुतांश माध्यमांनी. 'जर्नालिझम ऑफ करेज' असे ब्रीद असणाऱ्या 'एक्स्प्रेस ग्रुप'ने तर जास्तच निराशा केली. निवृत्त होण्याच्या दोन दिवस आधी न्या. चंद्रचूड यांच्या दोन टोलेजंग मुलाखती घेतल्या. पण न्या. चंद्रचूड यांना खेळता येईल असेच चेंडू टाकले. परिणामी, गोलमाल प्रश्न आणि गोलमाल उत्तरे असा प्रकार पाहायला मिळाला. अगदी सपक झाल्या त्या मुलाखती. उलट, न्या. चंद्रचूड यांच्यावर अनेक दिग्गज टीका करीत असताना, एक्सप्रेस ग्रुपने त्यांना का उचलून धरले, असा प्रश्न पडला अनेकांना. 

- 'एक्स्प्रेस ग्रुप'ने आता जे काही केले, त्यालाही करेज लागतेच की! हितसंबंध जपल्याचे आरोप होतील, ही जोखीम पत्करून त्यांनी त्या मुलाखती घडवल्या, यात 'जर्नालिझम ऑफ करेज' नाही?

प्रश्न : असेलही कदाचित. पण प्रिंट मीडियात खरे करेज दाखवले ते 'कॅरेवान' मासिकाने. सौरव दास या पंचवीस वर्षांच्या तरुण पत्रकाराने कॅरेवानमध्ये केलेली 45 पानांची कव्हर स्टोरी अफलातूनच. अर्थात, ती पुरेशी उचलून नाही धरली मुख्य प्रवाहातील माध्यमांनी...

- मग तुम्ही दाखवा थोडे करेज, किमान त्या कव्हर स्टोरीची ओळख करून देण्याचे.

प्रश्न : ते बघू. पण आम्हाला एक समाधान आहे. न्या. चंद्रचूड यांच्या या वादग्रस्त वर्तनावर अनेक नामवंत वकिलांनी आणि निवृत्त न्यायमूर्तीनी सडेतोड टीका केली. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष दुष्यंत दवे यांची 'द वायर' साठी करण थापर यांनी घेतलेली मुलाखत तर खूपच मर्मभेदी आहे.

- पण त्या मुलाखतीचा अनुवाद प्रसिद्ध करण्याचे धैर्य आहे का तुमच्यात ?

प्रश्न : त्याचाही विचार करू. पण त्यात थापर यांचे कौतुक करावे की दवे यांचे, असा प्रश्न पडला आम्हाला. 

- तुम्ही लोक फारच लवकर उत्तेजित होता. मागच्या वेळी तुम्ही कौतुक करत होता त्या कपिल सिबलांचे? ते सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी आता मोठी प्रशंसा केली न्या. चंद्रचूड यांची, हे का लपवता? 'ग्रेट जजेसपैकी एक' असे त्यांनी म्हटले आहे, शिवाय एक कविताही केली न्या. चंद्रचूड यांच्यावर.

प्रश्न : पण त्यांनी केलेल्या त्या प्रशंसेचा आणि त्यांनी रचलेल्या कवितेचा न्या. चंद्रचूड यांना शून्य फायदा झाला. उलट, कपिल सिबल यांच्याभोवतीच संशयाचे वलय निर्माण होऊ लागले आहे.

- अशा प्रकारचे भाबडे समज किती काळ बाळगणार आहात तुम्ही? न्या. चंद्रचूड यांनी निरोप समारंभाच्या भाषणात 'आडे हाथ' घेतले की त्यांच्या टीकाकारांना...!

प्रश्न : हो, ते धक्कादायकच वाटले आम्हाला. 'मला ट्रोल केले जातेय' असे ते म्हणाले, तेव्हा ट्रोल या शब्दाचा अर्थ तरी त्यांना नीट कळलाय की नाही, असा प्रश्न पडला अनेकांना. एवढ्यावर ते थांबले नाहीत. शेरोशायरीचा आधार घेऊन त्यांनी टीकाकारांना 'दुश्मन' म्हटले. आणि लाइटर व्हेनमध्ये का होईना, 'मी निवृत्त झाल्यावर हे टीकाकार बेरोजगार होतील' असे सवंग विधानही केले. त्यावर कडी केली ती, 'टीका सहन करायला माझे खांदे मजबूत आहेत' असे विधान करून. तेव्हा तर अनेकांना मोदींचीच भाषा व शैली आठवली.

- तिथे त्यांचा संयम सुटला आणि ते स्वैर झाले हे खरे. पण त्यावरून तरी कल्पना करा, किती संताप आवरावा लागला असेल त्यांना. अद्याप त्यांनी टीकाकारांना न्यायालयात खेचण्याची भाषा केलेली नाही, यावरून त्यांची क्षमाशीलता लक्षात घ्या आणि आभारही माना त्यांचे...

प्रश्न : हो, या प्रकरणात त्यांच्या संयमाची परीक्षा झाली. पण या गदारोळात कोणाचेच लक्ष गेले नाही, अशा एका सूचकतेने आम्ही हैराण झालो आहोत. त्या आरती प्रकरणानंतर चार दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या एका समारंभातील भाषणात त्यांनी जरा ओढूनताणून संदर्भ दिला, 'दिल चाहता है'मधील एका गाण्याचा. 'हम है नये अंदाज क्यूँ हो पुराना' ही ओळ त्यांनी उद्धृत केली, तेव्हा आम्ही मनोमन हादरलो.

- मग बरोबरच आहे की, ते नव्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. आजच्या तरुणाईमध्येही लोकप्रिय आहेत. याउलट, तुम्ही स्वतः नाही कदाचित, पण तुमची विचारमूल्ये कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत, हा धडा घ्या त्यातून. 

प्रश्न : ते गाणे आम्हालाही प्रिय होते. आम्ही युवा संपादक म्हणून जे शेवटचे संपादकीय लिहिले, त्याचे शीर्षक तेच दिले होते. पण न्या. चंद्रचूड यांनी ते गाणे उधृत केले, तेव्हा आमच्या पायाखालची वाळूच सरकली.

- म्हणजे ते लावतात तो अर्थ आणि तुम्ही लावत होता तो अर्थ, यात जमीन-अस्मानाचा फरक आढळून आला?

 प्रश्न : त्या गाण्यात पुढच्या ओळी आहेत: 'बिगडे दुनिया, बिगडने भी दो. झगडे दुनिया, झगडेने भी दो. दुनिया रुठे, रुठने दो.' या ओळींचा आम्ही लावत होतो तो अर्थ, न्या. चंद्रचूड यांनी लावलेल्या अर्थाशी मेळ खात नाही. त्यामुळे, यापुढे ते गाणे पूर्ण विस्मरणात जायला हवे, असे वाटू लागले आहे आम्हाला.

- तुम्हाला समजलेला अर्थ चुकीचा असणार. न्या. चंद्रचूड यांनी घेतला तोच अर्थ बरोबर असेल. तुमचा भ्रम दूर केला त्यांनी एवढेच.

प्रश्न : हो! यापुढे आयुष्यभर त्या गाण्याचे बोल ऐकायला आले की, आम्हाला न्या. चंद्रचूड आठवतील. 

- याला सिनिसिझम म्हणतात. इतरांसाठी तो ठीक आहे, संपादकाला नाही परवडत...

प्रश्न : ते असो. पण आम्हाला वाईट वाटते आहे ते वेगळ्या कारणामुळे. यापुढे न्या. चंद्रचूड हे केवळ त्यांच्या वर्तनामुळे किंवा विधानांमुळे टीकेचे लक्ष ठरणार नाहीत. त्यांनी दिलेल्या अनेक खटल्यांच्या निकालांची चिकित्सा सुरू झाली आहे. त्यांचे अनेक निकाल संशयाच्या भोवऱ्यात अडकवले जातील. त्यावर दोन-चार पुस्तकेही हमखास येतील. 

- येऊ द्या की. न्या. चंद्रचूड बुद्धिमान आहेत. तोडीस तोड युक्तिवाद असतील त्यांच्याकडे. तेही आत्मकथन लिहून टीकाकारांना उघडे पाडतील.

प्रश्न : होईलही कदाचित तसे. पण त्यांनी आधीच्या चाळीस वर्षांत जे काही कमावले ते शेवटच्या चार महिन्यांत गमावले, असे अनेकांना वाटते. त्यासंदर्भात काय निकाल देतील भावी इतिहासकार?

- तुमच्यासारख्या चिमूटभर लोकांना तसे वाटत असेल. 'अतिरिक्त अपेक्षा ठेवलेल्या लोकांचा अतिरिक्त अपेक्षाभंग झाला', असाच निकाल देतील भावी इतिहासकार...

प्रश्न : मान्य आहे. आम्ही अतिरिक्त अपेक्षा ठेवल्या होत्या. पण मागील चार महिन्यांत लहान-मोठे असे पाचपन्नास व्हिडिओ आम्ही पाहिले. जानेमाने व दिग्गज म्हणावेत अशा लोकांचे. सर्वांच्या विवेचनामधला कॉमन थ्रेड एकच होताः न्या. चंद्रचूड यांच्याकडून अपेक्षा प्रचंड होत्या, त्यामुळे भ्रमनिरास प्रचंड झाला.

- तुमचे दुःख कमी झाले म्हणायचे तर. आपण फसले गेलो हे तुमचे दुःख कमी झाले असणार, आणि अनेक रथीमहारथीही फसले गेले याचा आनंद आता घेत असाल तुम्ही ?

प्रश्न : नाही केशवराव, नाही. देशच फसला गेलाय असे वाटू लागलेय आम्हाला. मात्र, गेल्या काही दिवसांत अब्राहम लिंकनचे ते जगप्रसिद्ध कोट आठवते आहे पुन्हा पुन्हा. 'You can fool all the people some of the time, and some of the people all of the time, but you cannot fool all the people all the time.' तर या विधानातील तिसरे चरण न्या. चंद्रचूड यांच्याबाबतीतही खरे ठरले असे म्हणावे का?

चला, उशीर झालाय, निघतो मी....!

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके