डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

साधनाचा 74 व्या वर्षात प्रवेश

डॉ. दाभोलकरांची हत्या झाली त्या घटनेला आता आठ वर्षे झाली आहेत. त्यांच्यासोबत अखेरची नऊ वर्षे आणि ते गेल्यानंतरची आठ वर्षे असा 17 वर्षांचा साधनाचा कालखंड आम्हाला अगदी स्पष्ट दिसतो आहे, आठवतो आहे, अनेक वेळा पाहिलेल्या एखाद्या चित्रपटाप्रमाणे! त्यामुळे या काळात काय चांगले घडले, काय राहून गेले याची चांगली जाणीव आहे. साधनाची बलस्थाने काय आणि मर्यादा काय याचीही स्पष्टता आहे. पुढे पाहिले तर अनेक वाटा-वळणे व डोंगर-दऱ्या दिसताहेत आणि मागे वळून पाहिले तर बरीच वाटा-वळणे व डोंगर-दऱ्या पार करून आलो आहोत असे दिसते. त्यामुळे उमेद कायम आहे, किंबहुना वाढती आहे. आव्हाने तर आहेतच, पण संधी जास्त दिसताहेत

भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापनदिनी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी साने गुरुजींनी सुरू केलेले साधना साप्ताहिक या अंकाबरोबरच 74 व्या वर्षात प्रवेश करीत आहे. मागील 73 वर्षे ते अखंड प्रकाशित होत आहे. साधना सुरू झाल्यावर केवळ 22 महिन्यांनी गुरुजींचे निधन झाले. त्यांनीच लिहून ठेवल्यानुसार, त्यांच्यानंतर आचार्य जावडेकर व रावसाहेब पटवर्धन हे साधनाचे संपादक झाले आणि पुढील सहा वर्षे राहिले. त्यानंतर पाव शतक यदुनाथ थत्ते संपादक राहिले. त्या पुढील अडीच वर्षे नानासाहेब गोरे आणि त्यानंतरची 14 वर्षे वसंत बापट व ग. प्र. प्रधान हे संपादक राहिले. त्या सर्वांच्या साथीला मंगेश पाडगांवकर, दुर्गा भागवत, सदानंद वर्दे, ना. य. डोळे यांच्यापासून अनिल अवचट यांच्यापर्यंत अनेक प्रतिभावंत कमी-अधिक काळ राहिले. एस.एम. जोशी यांच्यापासून आप्पासाहेब सा.रे.पाटील यांच्यापर्यंतचे अनेक दिग्गज विश्वस्त म्हणून लाभले. त्या सर्वांनी अनेक हितचिंतकांच्या साह्याने साधनाला पन्नासाव्या वर्षांपर्यंत आणले. त्या काळात साधनाची ओळख वैचारिक व परिवर्तनवादी नियतकालिक अशी अधिकाधिक ठळक होत गेली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील विश्लेषणात्मक व चिकित्सक लेखन साधनातून प्रामुख्याने प्रसिद्ध होत राहिले. मात्र अर्थकारण, शेती, आरोग्य, साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान यांचा अंतर्भावही कमी-अधिक प्रमाणात राहिला. बालकुमार वर्गासाठीचे लेखन सातत्याने येत राहिले आणि युवा वर्गासाठीचे लेखन व युवा अभिव्यक्तीचे लेखन कमी प्रमाणात का होईना, प्रसिद्ध होत राहिले. एकंदरीत विचार करता जीवनाचे एकही क्षेत्र साधनाने बाजूला सारले नाही, असेच मागे वळून पाहिल्यावर दिसते.

साधनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात डॉ. नरेंद्र दाभोलकर व जयदेव डोळे हे दोघे संपादक झाले. त्यानंतर सहा महिन्यांनी जयदेव बाहेर पडले आणि मग पुढील 15 वर्षे डॉ. दाभोलकर यांनी अनेक लहान-थोरांच्या साह्याने साधना चालवली. त्या काळात त्यांनी साधनाचा ध्येयवादी वारसा तर चालवलाच, पण साधनाचा विस्तार केला आणि पायाभूत सुविधा व आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी अधिक परिश्रम घेतले. त्यासाठी विविध कार्यक्रम व उपक्रम कल्पकतेने राबवले. ते संपादक झाल्यावर 10 वर्षांनी साधनाचा हीरकमहोत्सव आला, तेव्हा त्यांनी साधनाची अमृत महोत्सवापर्यंतची वाटचाल सहज व सुलभ व्हावी यासाठी भक्कम पायाभरणी केली. साधनाच्या 60 वर्षांच्या वाटचालीचे प्रतिबिंब पाहता येईल, असा ‘निवडक साधना’ हा आठ खंडांचा प्रकल्प, साधनाचे 60 वर्षांचे अंक स्कॅन करून जतन करणे व वेबसाईट सुरू करणे, साधना साहित्य संमेलने भरवणे, बालकुमार दिवाळी अंक वितरण मोहीम राज्यभर राबवणे, साधना प्रकाशनाला नवी उभारी देणे, साधना मीडिया सेंटर हे अद्ययावत पुस्तक विक्री दालन सुरू करणे, महाराष्ट्र फाउंडेशनच्या साहित्य व समाजकार्य पुरस्कारांची कार्यवाही, अनेक विषयांवर व्याख्याने- परिसंवाद- चर्चासत्रे घडवून आणणे हे आणि असे किती तरी सांगता येईल.

डॉ. दाभोलकरांची हत्या झाली त्या घटनेला आता आठ वर्षे झाली आहेत. त्यांच्यासोबत अखेरची नऊ वर्षे आणि ते गेल्यानंतरची आठ वर्षे असा 17 वर्षांचा साधनाचा कालखंड आम्हाला अगदी स्पष्ट दिसतो आहे, आठवतो आहे, अनेक वेळा पाहिलेल्या एखाद्या चित्रपटाप्रमाणे! त्यामुळे या काळात काय चांगले घडले, काय राहून गेले याची चांगली जाणीव आहे. साधनाची बलस्थाने काय आणि मर्यादा काय याचीही स्पष्टता आहे. पुढे पाहिले तर अनेक वाटा-वळणे व डोंगर-दऱ्या दिसताहेत आणि मागे वळून पाहिले तर बरीच वाटा-वळणे व डोंगर-दऱ्या पार करून आलो आहोत असे दिसते. त्यामुळे उमेद कायम आहे, किंबहुना वाढती आहे. आव्हाने तर आहेतच, पण संधी जास्त दिसताहेत. मात्र संधीचा लाभ उठवण्यासाठी पाया पक्का असावा लागतो, बाहू बळकट असावे लागतात, दृष्टी व्यापक व दूरची असावी लागते आणि अर्थातच लोक सोबतीला असावे लागतात. आर्थिक स्थैर्य आणि विश्वासार्हता हे दोन स्तंभ एका बाजूला आणि गुणात्मक वाढ व संख्यात्मक वाढ हे दोन स्तंभ दुसऱ्या बाजूला भक्कम राहत असतील तर, संस्था चांगल्या चालत राहतात, लोक साथीला येत राहतात. या प्रक्रियेचे भान ठेवून आम्ही वाटचाल करीत आहोत.

साधना ही संस्था आता अमृतमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर उभी आहे. पुढील दोन वर्षांत अनेक कार्यक्रम व उपक्रम केवळ विचाराधीन नाही तर नियोजनात आहेत. आणि त्यांची पायाभरणी मागील दोन वर्षांत विविध प्रकारे केलेली आहे. त्याविषयी इथे थोडक्यात नोंदवणे आवश्यक वाटते.

साधना साप्ताहकाचे वर्गणीदार मागील दोन वर्षांत म्हणजे कोरोनाकाळात किती कमी झाले, असा प्रश्न लोक अधूनमधून विचारतात आणि त्याचे उत्तर ‘काहीच कमी नाही झाले’ असे दिले जाते, तेव्हा लोकांना आश्चर्य वाटते. हे खरे आहे की, अंकाचा दर्जा आणि व्यवस्थापन व वितरण या दोन आघाड्या सांभाळल्याशिवाय ते घडले नसते. मात्र या काळात साधनाचे वर्गणीदार वाढायला हवे होते असे आम्हाला वाटते. आणि त्या दोन्ही आघाड्यांवर अधिक सातत्य व अचूकता दाखवता आली तर ते शक्य आहे, याची प्रचिती आम्हाला रोजच येत आहे.

तीन दिवाळी अंक सोडून दरवर्षी चार-पाच  विशेषांक असा प्रकार मागील दशकभर साधनाने चालू ठेवला आहे, गेल्या दोन वर्षांत त्यात घट झालेली नसून उलट वाढच झालेली आहे. बालकुमार व युवा दिवाळी अंक यांच्या विक्रीचे गेल्या वर्षीचे आकडे कोरोनामुळे अनुक्रमे 20 व 10 हजारावर आले, त्याआधी ते आकडे बालकुमार दोन ते चार लाख यादरम्यान होते आणि युवा अंक 25 ते 75 हजार असे होते. पण त्या दोन्ही अंकांच्या संदर्भात साधनाचा विस्तार इतका झाला आहे की, कोरोना संकट संपुष्टात आलेले असेल तेव्हा ते आकडे पूर्ववत करता येतील, असा विश्वास आम्हाला वाटतो आहे. शिवाय, कुमार वयोगतील मुलांसाठी ‘विद्यार्थी’ नावाचे मासिक सुरू करणे आणि युवा वर्गाला पुस्तके देण्यासाठी  साधना प्रकाशनाचा स्वतंत्र विभाग सुरू करणे एवढी तयारी झाली आहे.

साधना साप्ताहिकाचे डिजिटल आर्काइव्ह तयार करण्याचे काम अडीच वर्षांपूर्वी हाती घेतले आहे. 1991 ते 2021 या 30 वर्षांचे आर्काइव्ह आता साधनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. पुढील दीड वर्षांत 1948 ते 1990 या वर्षांचे आर्काइव्ह तयार झालेले असेल. स्कॅन केलेले अंक युनिकोडमध्ये कन्व्हर्ट करणे, नंतर ते वाचून त्यातील दुरुस्त्या करणे आणि मग ते अंक वेबसाईटवर अपलोड करणे असे त्रिस्तरीय काम चालू आहे. या सर्व प्रक्रियेसाठी पूर्ण वेळ काम करणारे साधनाचे पाच तरुण सहकारी आणि बाहेरून काम करून घेतले जाते (आऊटसोर्सिंग) असे जवळपास 25 तरुण कार्यरत आहेत. त्यामुळे साधनाला 75 वर्षे पूर्ण झालेली असतील तेव्हा साधनाचे सर्व 75 वर्षांचे अंक वेबसाईटवर (अंकाची तारीख,  लेखकाचे नाव, लेखाचे शीर्षक, लेखाचा विषय व उपविषय अशा वर्गवारीसह) उपलब्ध झालेले असतील. जगभरात ते कुठेही सुलभ व जलद पाहता येतील. महाविद्यालये, विद्यापीठे, अभ्यासक,  संशोधक  आणि अर्थातच अन्य वाचक यांची त्यामुळे किती सोय होणार आहे, याची कल्पना आज तरी खूपच कमी लोकांना आहे.

साधना साप्ताहिकातील काही लेखमाला व काही विशेषांक यांना पुस्तकरूप देणे हा प्रकार पूर्वीपासून होता, पण गेल्या दहा-बारा वर्षांत तो अधिक यशस्वी झाला आहे. त्याला अनेक कारणे आहेत, यापुढेही त्यासाठी वाव आहेच. शिवाय, इंग्रजीत प्रकाशित झालेली काही वेगळी व महत्त्वाची पुस्तके मराठीत प्रकाशित करण्यासाठी आता अनुकूलता प्राप्त झाली आहे. एवढेच नाही तर साधना प्रकाशनाची फार पूर्वी प्रकाशित झालेली व बरीच वर्षे आऊट ऑफ प्रिंट असलेली पुस्तके- मात्र आता थोडी का असेना उपलब्ध करून द्यायला हवीत अशी- नव्या आवृत्त्या स्वरूपात आणण्यासाठीही आता अनुकूलता जास्त आहे. हे झाले छापील पुस्तकांबाबत. पण साधनाची पुस्तके आता इ-बुक स्वरूपातही उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे. सध्या उपलब्ध असलेली सर्व सव्वाशे पुस्तके तर इ-बुक स्वरूपात आणली आहेतच, पण पूर्वीची पुस्तकेही क्रमाक्रमाने आणण्याचे काम चालू ठेवले आहे. त्यामुळे आणखी पाच वर्षांनी साधनाच्या कोणत्याच पुस्तकाबाबत ‘आऊट ऑफ प्रिंट’ असे म्हणता येणार नाही.

याशिवाय गेल्या पाच वर्षांत डिजिटल तंत्रज्ञानाचा झालेला प्रसार आणि पुढील पाच वर्षांत ते तंत्रज्ञान किती झपाट्याने विविध क्षेत्रे पादाक्रांत करणार आहे, याचा थोडाबहुत अंदाज आता सर्वांनाच येऊ लागला आहे. त्यामुळे ऑडिओ आणि व्हिडिओ या दोन्ही माध्यमांमध्ये साधनाची उपस्थिती लक्षणीय असली पाहिजे, यासाठी मोठे व व्यापक हेतू ठेवून काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील ऑडिओ बुक्स हा एक आहे. पहिला टप्पा म्हणून, साधना प्रकाशनाची शंभर पुस्तके ऑडिओ बुक स्वरूपात आणण्याचे काम हाती घेतले आहे. त्यातील दहा पुस्तके स्टोरीटेलवर याच आठवड्यात उपलब्ध करून दिली आहेत. यानंतर प्रत्येक महिन्यात चार-पाच पुस्तके ऑडिओ बुक रूपात येत राहतील. हा टप्पा दोन वर्षांत  पूर्ण झालेला असेल. त्यानंतर किंवा दरम्यानच्या काळातच स्वतंत्र असे ऑडिओ कॅपसुल्स तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यात सकस व श्रवणीय म्हणावेत असे ललित व वैचारिक लेख, कथा, व्यक्तिचित्रणे, बालसाहित्य यांचा समावेश असेल. या आघाडीवर काम करायला साधनाला मजकुराची मर्यादा नाही, कारण पंचाहत्तर वर्षांचा तयार ऐवज आणि पुढेही भर पडत राहणारा दमदार ललित वैचारिक ऐवज! आगामी काळात व्हिडिओ बुक्स नावाचा प्रकारही मराठीत अवतरेल, तेव्हा त्याचेही स्वागत करायला साधना तयार असेल!

दोन वर्षांपूर्वी कर्तव्य साधना हे डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. त्यावर आठवड्यातून पाच मराठी लेख, एक इंग्रजी लेख, एक ऑडिओ किंवा व्हिडिओ अशी रचना ठरवली होती. दोन्ही वर्षांत मराठी व इंग्रजी लेखांची सरासरी गाठली आहे, ऑडिओ व व्हिडिओबाबत मात्र ती सरासरी गाठता आली नाही, याचे कारण मागील दीड वर्ष तर कोरोना संकटाच्या छायेतच गेले आहे. मात्र हे निश्चित की, तिसऱ्या वर्षांत पदार्पण केलेले ‘कर्तव्य साधना’ पुढील दोन वर्षांत बरेच पुढे निघून गेलेले असेल. कारण काही मर्यादा असल्या तरी, त्या माध्यमाची ताकदही अफाट आहे.

हे सर्व करायचे म्हणजे, संपादकीय विभाग सक्षम असण्याबरोबरच, पायाभूत सुविधा वाढवत राहणे, नवनवे तंत्रज्ञान हस्तगत करीत राहाणे, असलेल्या मनुष्यबळाचे प्रशिक्षण करीत राहणे, अधिक चांगले मनुष्यबळ मिळवता येणे, व्यवस्थापनात काटेकोरपणा आणत राहणे, वितरणात सुलभता व जलदता आणता येणे इतक्या आघाड्यांवर काम करावे लागते. आणि त्यासाठी अर्थकारण जुळवता यावे लागते. कोणत्याही संस्थेसाठी ते अवघडच असते. पण ना नफा ना तोटा या पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या संस्थांसाठी ती कठीण कसरत असते. म्हणून वाचक, लेखक, जाहिरातदार, देणगीदार, विक्रेते व अन्य प्रकारची मदत करणारे हितचिंतक या सर्वांचे सहकार्य आवश्यक असते!

इतके सर्व करूनही मूळ प्रश्न उरतोच, तो म्हणजे या सर्व खटाटोच्या परिणामकारकतेचे काय? सर्वच माध्यमांसमोर हा प्रश्न आहे. तो मोठ्या व स्वतंत्र मांडणीचा विषय आहे. पण त्याकडे तुकड्या-तुकड्यांत पाहिले तर अस्वस्थता येते आणि  समग्रपणे पाहता आले तर आश्वस्तता येते, असा आमचा अभ्यास आहे, अनुभव आहे!

साधनाचे पुढील दोन अंक

28 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक
विषय : धर्माने मला काय दिले?

4 सप्टेंबर : प्रा. ग. प्र. प्रधान स्मृती विशेषांक
विषय : ग. प्र. प्रधान जन्मशताब्दी प्रारंभ

Tags: अमृत महोत्सव साधना 74 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके