डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

उपद्रवी राजांना भवितव्य ते कसले?

हे खरे आहे की स्थळ, काळ व परिस्थिती यांच्यानुसार राजकीय पक्षांना लवचिकता दाखवावी लागते, भूमिका बदलाव्या लागतात,  आणि व्यवहारिक राजकारण करायचे ठरले तर मोठ्या तडजोडीही कराव्या लागतात. पण राज ठाकरे यांचे राजकारण पाहता ते सदैव गोंधळलेले राहिले, आवेश मात्र असा की, सारे काही स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या चार मोठ्या पक्षांनी व्यापलेला असल्याने राज यांचे असे होत असेल. कदाचित बौध्दिक सल्लागारांचे ऐकून ते असले अचाट प्रयोग करत असतील. शरद पवारांचाही सल्ला ते अधूनमधून घेतात, पण त्यामुळे त्यांचा गोंधळ अधिकच होत असावा.

2005 च्या नोव्हेंबरअखेर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि जानेवारी 2006 मध्ये त्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या पक्षाची स्थापना केली. दरम्यानच्या महिनाभरात त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि अनेक लहान-थोरांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या, अपेक्षा उंचावून ठेवल्या होत्या. त्या वेळी याच संपादकीय जागेवर आम्ही (युवा अतिथी संपादक या नात्याने) जे संपादकीय लिहिले होते, त्याचे शीर्षक होते- ‘राज ठाकरे यांच्याविषयी सहानुभूती हा भाबडेपणाच ठरेल!’ (साधना : 31 डिसेंबर 2005). त्या वेळी ते संपादकीय अनेक मध्यममार्गी,  उदारमतवादी व पुरोगामी माणसांनाही फारसे रुचले नव्हते. राज यांच्याकडे इतक्या संशयी नजरेने पाहू नये,  असे त्यांचे म्हणणे होते. राज नवी भाषा बोलताहेत व  नवी स्वप्ने दाखवताहेत तर त्यांना संधी दिली पाहिजे- असेही त्या लोकांना मनापासून वाटत होते. आणि त्या संपादकीय लेखाचा मध्यवर्ती सूर नेमका याच्या विरोधी होता. तो असा होता की, राज हे नवी भाषा बोलत नाहीत, नवी स्वप्ने दाखवत नाहीत, नवे विचार मांडत नाहीत आणि त्यांना नवे राजकारणही करता येणार नाही. वस्तुतः त्या संपादकीय लेखात अफलातून म्हणावे असे काही विश्लेषण नव्हते, सर्वांच्या हाता-तोंडाशी असलेली तथ्ये पुढे करून केलेले ते भाकीत होते. तब्बल चौदा वर्षे झाली त्या घटनेला, पण ते भाकीत खोटे ठरावे असे वर्तन राज यांच्याकडून अद्याप घडत नाही.

राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना आपले काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पत्र लिहिले होते. ‘तुम्ही माझ्यावर अन्याय केलात, तुम्ही पक्षपाती आहात, तुम्ही कमजोर झालात’- असे घणाघाती आरोप त्या पत्रातून केले होते. आणि ‘युअर टाईम स्टार्टस्‌ नाऊ’, असा इशाराही दिला होता. त्यानंतर महिनाभर ते महाराष्ट्रात फिरत होते आणि ‘माझे काकाच माझे दैवत आहेत’ असे सांगत होते. आणि ‘तुमच्या मनगटातील रग केव्हा व कुठे दाखवायची हे मी तुम्हाला वेळ आल्यावर सांगेन,’ असे ते आपल्या समर्थकांना सांगत होते. मुळातच ती एक विचित्र मांडणी होती. स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केल्यावर त्याचे नामकरण त्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ असे केले, तेही चुकीचे होते. कारण राज्याच्या नवनिर्माणासाठी त्यांच्याकडे तशी काही दृष्टी नव्हती. ‘माझ्याकडे नव्या महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आहे’, असे ते म्हणत होते. पण ते पोकळ शब्द होते. त्यावेळी त्यांनी आपल्या पक्षाच्या ध्वजात भगवा रंग घेतला नव्हता,  आता तो ध्वजच बदललाय. खरे तर त्यांनी आपल्या पक्षाचे नावच बदलायला हवे, कारण जे जमणार नाही ते करणार असल्याचा आव कशाला आणायचा?

राज यांनी शिवसेना सोडली तेव्हा ते केवळ 38 वर्षांचे होते,  त्यामुळे त्यांच्यापुढे मोठी संधी आहे असे अनेक लोकांना वाटणे साहजिक होते. पण त्यांची एकूण जडणघडण ज्या घरात व ज्या पर्यावरणात झाली आणि जी कार्यपध्दती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनली होती, ती पाहता, रचनात्मक काम त्यांना करताच येणार नव्हते. म्हणजे उपयुक्तता मूल्य असलेले काम त्यांना फारसे जमणार नव्हते, उपद्रवमूल्य हीच त्यांची खरी ताकद होती. आणि नंतरच्या 14 वर्षांत हे त्यांनी पुन्हा पुन्हा सिध्द केले आहे. इ.स. 2009 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 14 जागा मिळाल्या होत्या. पक्ष स्थापन झाल्यावर केवळ तीन वर्षांनी आलेल्या त्या निवडणुकीतील ते यश म्हणजे जनतेने आधीचे सारे विसरून उदार हस्ते दिलेले दान होते. पण राज यांच्या त्या 14 आमदारांनी नव्या विधानसभेत प्रवेश केल्यावर पाहिले काम कोणते केले, तर अबू आझमी या आमदाराला भर विधानसभेत मारहाण केली आणि स्वतःवर निलंबन ओढवून घेतले. तेवढे कमी म्हणून की काय, त्या कृत्याचा अभिमान मिरवत ते सर्वत्र फिरत राहिले. आणि ती कर्तबगारी आहे असे राज ठाकरे मानत राहिले. त्यानंतरची दहा वर्षे महाराष्ट्र विधानसभेत त्यांच्या पक्षाची पाटी जवळपास कोरी राहिली.

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व गुजरातचा विकास यांचे जोरदार कौतुक करण्याची आघाडी उघडली आणि ‘मी तसेच करू इच्छितो’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत स्वपक्षाचे उमेदवार उभे केले, अर्थातच भाजप उमेदवारांच्या विरुध्दही. मात्र ‘आमचे निवडून आलेले सदस्य नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा देतील’ असे जाहीर केले. ही अशी भूमिका निवडणुकीआधीच घेणे विचित्रच होते. तो एकूण प्रकार हास्यास्पद होता. कारण ‘तसे असेल तर आम्ही मोदींच्या भाजपचे उमेदवारच निवडून देतो ना’, असे सर्वसामान्य माणसेही म्हणत होती. बरे, यातून राज यांनी काही धडा घेतला आणि 2019 मध्ये काही वेगळे केले का, तर तसेही नाही. किंबहुना जास्तच उलट झाले. या लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वपक्षाचे उमेदवार उभे केले नाहीत, अन्य पक्षांना पाठिंबा जाहीर केला नाही, आणि तरीही मोठ्या प्रचारसभा घेतल्या. त्यातून मोदी व शहा यांच्याविरोधी धडाकेबाज भाषणे केली आणि काठावरच्या जनतेची वाहवा मिळवली. अर्थात, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशी त्यांनी संगनमत केले अशी चर्चा झाली; काँग्रेस व राष्ट्रवादी यांची बी टीम अशी मनसेची संभावनाही झाली. मधल्या काळात थेट दिल्लीला जाऊन सोनिया गांधींची भेट घेतली, पण काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी होऊ शकली नाही. आणि आता काय तर, नागरिकत्व कायद्याच्या समर्थनाचे निमित्त करून अडचणीत सापडलेल्या भाजपला मदत करीत आहेत. गेल्या महिन्यात देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यावर ते भाजपकडे जाणार असे संकेत मिळत आहेत. पण आगामी काळात सेना व भाजप एकत्र येणारच नाहीत असेही नाही. त्यामुळे भाजपने नारायण राणे यांना खेळवले तसे ते राज यांच्याबाबत करणारच नाहीत असेही नाही.

हे खरे आहे की स्थळ, काळ व परिस्थिती यांच्यानुसार राजकीय पक्षांना लवचिकता दाखवावी लागते, भूमिका बदलाव्या लागतात,  आणि व्यवहारिक राजकारण करायचे ठरले तर मोठ्या तडजोडीही कराव्या लागतात. पण राज ठाकरे यांचे राजकारण पाहता ते सदैव गोंधळलेले राहिले, आवेश मात्र असा की, सारे काही स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना या चार मोठ्या पक्षांनी व्यापलेला असल्याने राज यांचे असे होत असेल. कदाचित बौध्दिक सल्लागारांचे ऐकून ते असले अचाट प्रयोग करत असतील. शरद पवारांचाही सल्ला ते अधूनमधून घेतात, पण त्यामुळे त्यांचा गोंधळ अधिकच होत असावा. आताही असेच झाले असावे, पवारांनी त्यांना काहीएक डावपेच मागील निवडणुकीच्या वेळी दिले असावेत. पण विधानसभा निवडणूक निकालानंतर पवारांनीच स्वतःचा बचाव करण्यासाठी डावपेच बदलले आणि थेट शिवसेनेला सोबत घेतले. त्यामुळे राज यांची कोंडी झाली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी ते आता भाजपकडे झुकलेत हे उघड आहे. अर्थात, भाजपने मधल्या काळात त्यांच्या मागे ईडी चौकशी लावण्याचा प्रयत्न केला, त्यातून सुटका करून घेण्यासाठीही आताचा देखावा असणार. असो.

तर, राज यांचे राजकारण लंबकाप्रमाने हेलकावे खात राहणार यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. त्यामुळे त्यांच्याकडून भलत्याच अपेक्षा बाळगणारांच्या वाट्याला भ्रमनिरास येणार यात विशेष ते काय!

आपला देश मूलत: लहान-मोठ्या राजेमहाराजांच्या परंपरा चालवणारांचा आहे. ब्रिटिश काळातही लहान-मोठी अशी साडेपाचशे संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर त्या राजेमहाराजांचे स्वरूप थोडे बदलले, जनतेच्या मानसिकतेही थोडे बदल झाले. पण अद्याप नवे राजेमहाराजे व त्यांच्यामागे भक्तिभावाने फरफटत जाणारी जनता हे चित्र कायम आहे. त्यामुळे प्रत्येक राजघराण्यात कितीही फाटाफुटी झाल्या, तरी प्रत्येकाला भक्तगण मिळत असतो. तसेच राज ठाकरे यांच्याबाबतही होत राहणार, त्यांनी कितीही उलटसुलट भूमिका घेतल्या, त्यांचा कितीही गोंधळ उडाला तरी त्यांच्या भाषणांना गर्दी करून टाळ्या पिटणारी जनता मिळत राहणार. आणि ‘राज आता बदलताहेत’ असे म्हणणारे भाबडे लोकही प्रत्येक वेळी त्यांना मिळत राहणार. म्हणून यांची दखल अधूनमधून घ्यावी लागते. अन्यथा यांच्यावर लिहावे लागणे हा कंटाळवाणा प्रकार आहे.

Tags: राज ठाकरे विनोद शिरसाठ संपादकीय vinod shirsath sampadakiy raj thakre editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके