डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आंतरभारती आणि विश्वभारती

‘आंतरभारती’ या संकल्पनेतील दुसरी बाजू अधिक कठीण व कष्टप्रद आहे. ती म्हणजे मराठीतील लेखन अन्य भाषांमध्ये घेऊन जाणे. त्यासाठी विविध भाषांमधील अनुवादक मिळवता येणे, त्यांच्याकडून झालेल्या कामाचा दर्जा तपासता येणे आणि ते लेखन अन्य भाषांमध्ये प्रकाशित होण्यासाठी प्रकाशक उपलब्ध होणे, या तिन्ही आघाड्यांंवर अनेक अडथळे आहेत. मात्र या कामासाठीही पूर्वीच्या तुलनेत आता अधिक अनुकूलता आहे ती केवळ तंत्रज्ञानामुळेच!

साधनाचे संस्थापक साने गुरुजी यांची ओळख अनेक प्रकारच्या कर्तबगारीसाठी आहे. त्यातील एक ओळख आहे- आंतरभारती या संकल्पनेचे पुरस्कर्ते. भारतातील विविध भाषक समूहांमध्ये आदान-प्रदान व्हावे, हा त्या कल्पनेचा गाभा. विविध भाषांमध्ये साठलेले ज्ञान परस्परांच्या सहयोगाने वृद्धिंगत होत राहावे, हा त्यामागचा हेतू. आणि भाषांच्या बरोबरीने येणाऱ्या विविध संस्कृतींचे अभिसरण होऊन, भारतीय संस्कृतीचा उत्कर्ष होत राहावा, हा अंतिम उद्देश! अर्थातच राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे हे त्याचे फलित. परंतु गुरुजींच्या विचारविश्वाला राष्ट्राच्या सीमा बांधून ठेवू शकत नव्हत्या, म्हणून तर जगभरातील विविध समाज आणि संस्कृती समजून घेणे आणि आपल्या देशबांधवांना समजावून देणे, ही तळमळ त्यांच्या मनात कायम होती. त्यासाठी भाषा हेच प्रमुख साधन आहे, अशी त्यांची धारणा होती. आणि म्हणून त्यांनी देश-विदेशांतील विविध भाषांमधून ज्ञानकण वेचले आणि मराठीत आणले. 

त्यांनी लहान-मोठी अशी सव्वाशेहून अधिक पुस्तके लिहिली, त्यातील अर्ध्यांहून अधिक पुस्तकांत विविध भाषांमधील ज्ञानभांडाराची झलक पहायला मिळते. त्यातील काही लेखन थेट अनुवाद/भावानुवाद आहे, तर काही लेखन रूपांतरित स्वरूपाचे आहे, म्हणजे त्याला भारतीयत्व बहाल केले आहे. त्यातही विशेष हे आहे की, गुरुजींचे बहुतांश स्वतंत्र लेखन कुमार व युवावर्गाला समोर ठेवून केलेले असले तरी, त्यांनी अन्य भाषांमधून जे ज्ञानकण वेचले त्यातील बहुतांश पुस्तके गंभीर, वैचारिक किंवा तत्त्वचिंतनात्मक स्वरूपाची आहेत. मग त्यात भारतातील बंगालीबाबू रवींद्रनाथ व तमिळ महाकवी तिरुवल्लूवर येतात आणि रशियन महालेखक लिओ टॉलस्टॉय व अमेरिकन तत्त्ववेत्ता विल ड्युरांट येतात. या दरम्यानची नामावली एकत्र करून सादर केली तर कोणीही चांगला वाचक अचंबित होईल.

अशा या साने गुरुजींच्या 121 व्या जयंतीचे (24 डिसेंबर) निमित्त साधून, पानांच्या संख्येत खूप छोटी पण आशय-विषयाच्या दृष्टीने बरीच मोठी अशी दोन पुस्तके साधना प्रकाशनाकडून येत आहेत. अर्थातच ही दोन्ही पुस्तके याआधी साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध झालेली आहेत. दोन्ही पुस्तके अनुवादित आहेत आणि मराठीतील नामवंत लेखक भारत सासणे यांनी ते अनुवाद केलेले आहेत. ‘ही पुस्तके सख्खी भावंडं आहेत की सावत्र?’ असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला तर उत्तर आले- ‘चुलत भावंडं.’

तर त्यातील एक आहे ‘दंतकथा’ ही लघुकादंबरी, अब्दुल बिस्मिल्लाह यांनी 1990 मध्ये ही कादंबरी लिहिली आणि ‘इंडिया टुडे’च्या हिंदी आवृत्तीत ती क्रमश: प्रसिद्ध झाली. नंतर ती राजकमल प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने आली. त्यानंतर दशकभराने ती कादंबरी भारत सासणे यांनी वाचली आणि तिचा मराठी अनुवाद केला. मग 2002 च्या साधना दिवाळी अंकात ती संपूर्ण कादंबरी प्रसिद्ध झाली. त्या वेळी संपादक असलेल्या डॉ.नरेंद्र दाभोलकरांना ती विशेष आवडली होती, हे नोंद घेण्यासारखे आहे. ‘दंतकथा’ ही बाह्यरूपाने पाहिली तर एका कोंबड्याची आत्मकथा आहे, पण अंतरंग पाहिल्यावर दिसतात एका पशूच्या नजरेतून माणूस नावाच्या प्राण्याचे जीवनव्यवहार व मनोव्यापार!

दुसरे पुस्तक आहे, ‘दरवाजे खोल दो’ या उर्दूमधील नाटकाचा अनुवाद. 1964 मध्ये हे पुस्तक कृष्ण चंदर यांनी लिहिले. त्या काळात ते नभोनाट्य स्वरूपात आले आणि नंतर रंगमंचावरही. मात्र ते भारत सासणे यांच्या वाचनात आले या वर्षी. त्याचा संपूर्ण अनुवाद प्रसिद्ध केला 13 जून 2020 च्या साधना साप्ताहिकात. नव्याने बांधली जात असलेल्या इमारतीचा मालक आणि त्या इमारतीत वास्तव्यासाठी येऊ इच्छिणारे भाडेकरू यांच्यातील संवाद असे त्या नाटकाचे बाह्यरूप. मात्र त्याच्या अंतरंगात दिसतात- नव्याने उभारणी होत असलेले भारत नावाचे राष्ट्र आणि त्यात वास्तव्य करणारे विविध भाषा बोलणारे व विविध जाती, धर्म, संस्कृतीचे लोक!

ही दोन्ही पुस्तके अनुवादासाठी भारत सासणे यांनी स्वत:हून निवडली आहेत. रूढ अर्थाने ते काही अनुवादक नाहीत. त्यांच्या स्वतंत्र लेखनाची दोन डझनांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात कथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, ललित लेखन इत्यादी प्रकारांचा समावेश आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे/कथांचे अनुवाद अन्य भारतीय भाषांमध्ये झालेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या दोन अनुवादित पुस्तकांचे महत्त्व लक्षात घेतले पाहिेजे. त्यातील ‘दंतकथा’बद्दल तर त्यांनी म्हटलेच आहे की, ‘ही कादंबरी अब्दुल बिस्मिल्लाह यांनी लिहिली नसती तर त्यांनी स्वत:च लिहिली असती’ इतका तो आशय त्यांना जवळचा वाटला. वयाच्या साठीनंतर भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर त्यांनी उर्दू भाषा शिकायला सुरुवात केली आणि त्या भाषेवर पुरेशी पकड आल्यावर केलेला अनुवाद म्हणजे ‘उघडा, दरवाजे उघडा!’ 

ही दोन्ही पुस्तके वाचताना आपण अनुवादित लेखन वाचत आहोत असे कुठेही वाटत नाही, इतके ते प्रवाही झाले आहे. एकेका बैठकीत वाचून होतील अशी ही प्रत्येकी पन्नास पानांची पुस्तके आहेत. साधना प्रकाशनाकडून मागील दोन-तीन वर्षांत प्रकाशित झालेली प्रत्येकी एवढ्याच पानांची दहा-बारा पुस्तके आहेत, ती कमालीची वाचनीय आहेत. या सर्व पुस्तकांना युवा वाचनमाला असे स्थान मिळत आहे. कारण वेगवेगळ्या काळातील आणि गंभीर व वैचारिक आशय-विषयांची अशी ही पुस्तके असली आणि सर्वच प्रकारच्या वाचकांकडून त्यांचे स्वागत झालेले असले तरी, आजच्या तरुणाईला ती विशेष जवळची वाटली आहेत, हे विशेष! आणि आता भारत सासणे यांनी अनुवाद केलेली ही दोन पुस्तकेही युवा वाचनमालेत घट्ट बसणारी आहेत. (ही दोन पुस्तके इ-बुक स्वरूपातही उपलब्ध झाली असून, लवकरच ऑडिओ बुक स्वरूपातही येतील.)

या दोन्ही पुस्तकांचे मूळ लेखक कोण आहेत आणि त्यांचे साहित्यिक कर्तृत्व काय आहे, याची तोंडओळख करून घेतली तर या पुस्तकांचे महत्त्व आणखी ठसते. कृष्ण चंदर (1914-77) यांनी हिंदी व उर्दू या दोन्ही भाषांमधून कथा, कादंबरी, नाटक या तिन्ही प्रकारांतील विपुल लेखन केले आहे. अब्दुल बिस्मिल्लाह (जन्म 1949) यांनीही हिंदीमध्ये कथा, कादंबरी, कविता या तिन्ही प्रकारांतील बरेच लेखन केले आहे. या दोन्ही लेखकांचे नाते प्रेमचंद यांच्याशी सांगितले जाते, एवढे लक्षात घेतले तर ‘त्यांचा दर्जा काय’ हा प्रश्न उपस्थित होत नाही. त्यामुळे ही दोन्ही पुस्तके त्या लेखकांच्या अन्य पुस्तकांकडे वाचकांना वळवतील असा आम्हाला विश्वास वाटतो. कदाचित या दोन्ही लेखकांच्या अन्य काही पुस्तकांचे अनुवाद पुढील काही वर्षांत साधना प्रकाशनाकडून येतील.

कदाचित ही दोन पुस्तके साधना प्रकाशनाकडे ‘आंतरभारती’ संकल्पनेचे दालन नव्याने उघडण्यासाठी कारणीभूत ठरतील. कारण भारतातील अन्य भाषांमधील ललित व वैचारिक या दोन्ही प्रकारांतील लेखन मराठीत आणण्यासाठी पूर्वीच्या तुलनेत आता अधिक अनुकूलता साधनाला आहे. साप्ताहिक, प्रकाशन आणि ‘कर्तव्य’ हे डिजिटल पोर्टल ही तीन माध्यमे साधनाच्या हाताशी आहेत. शिवाय, डिजिटल तंत्रज्ञानामुळे विविध भाषांमधील आदान-प्रदान आता अधिक सुलभ, जलद व कमी खर्चिक असे झाले आहे. मात्र दर्जेदार लेखन आणि अचूक व प्रवाही अनुवाद ही कामे तेवढी सुलभ व जलद झालेली नाहीत. कारण तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशीलतेला उपकारक ठरत असले तरी, पर्याय ठरू शकत नाही. म्हणजे भाषेच्या माध्यमातून करावयाचे आदान-प्रदान पूर्वीइतकेच कष्टप्रद राहणार आहे.

‘आंतरभारती’ या संकल्पनेतील दुसरी बाजू अधिक कठीण व कष्टप्रद आहे. ती म्हणजे मराठीतील लेखन अन्य भाषांमध्ये घेऊन जाणे. त्यासाठी विविध भाषांमधील अनुवादक मिळवता येणे, त्यांच्याकडून झालेल्या कामाचा दर्जा तपासता येणे आणि ते लेखन अन्य भाषांमध्ये प्रकाशित होण्यासाठी प्रकाशक उपलब्ध होणे, या तिन्ही आघाड्यांंवर अनेक अडथळे आहेत. मात्र या कामासाठीही पूर्वीच्या तुलनेत आता अधिक अनुकूलता आहे ती केवळ तंत्रज्ञानामुळेच! आणि म्हणूनच असाही एक विचार आहे की, पुढील दोन-तीन वर्षांत साधनाकडून असे एखादे डिजिटल पोर्टल सुरू करावे, ज्यावर विविध भाषांमधील लेखन असेल, म्हणजे एकच लेख विविध भाषांमध्ये तिथे वाचायला मिळेल. अर्थातच त्याला बरीच जुळवणी करावी लागेल, वेळ, ऊर्जा, श्रम, खर्च करावे लागतील. पण तसे झाले तर एका क्लिकवर विविध भाषांमधील दर्जेदार लेखन वाचण्याची सोय होईल. मग आंतरभारतीच नव्हे तर विश्वभारतीचे स्वप्नही प्रत्यक्षात अवतरू लागेल!

Tags: दंतकथा अब्दुल बिस्मिल्लाह कृष्ण चंदर आंतरभारती आणि विश्वभारती संपादकीय digital vishwabharati antar bharati sampadak editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके