डिजिटल अर्काईव्ह

समाजाचे कणभर भले करण्यासाठी मणभर रक्त आटवण्याचा भाऊंचा शिरस्ता आहे. आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या चुकीत त्यांना हिमालय दिसतो आणि आपण ज्या कामाला क्षुद्र म्हणू त्यात त्यांना ब्रह्मांड दिसते. हा सारा आटापीय भाऊ कशासाठी व कोणासाठी करतात या प्रश्नाला उत्तर नाही. त्यांचा आरडाओरडा, तडफडाट धावपळ, आक्रस्ताळेपणा कधी रौद्र तर कधी केविलवाणा वाटतो.

आज भाऊसाहेब रानडे यांना साठ वर्षे पुरी झाली कोणाला पटो न पटो. 1893 साली ते जन्मले त्याला कोण काय करणार! आज त्यांच्या व आपल्याही इच्छेविरुद्ध त्यांची साठी उलटली आहे. बुद्धी मात्र नाठी झालेली नाही. दुसरे बालपण सुरू होण्याचा प्रश्नच नाही कारण त्याआधी पहिले संपावे लागते! अजून भाऊ खेळतात, धावतात, चिडतात, ओरडतात, हसतात थेट लहान मुलासारखे. पण अनुभवांचे दळदार गरे येथे पिकले आहेत असे पिकलेल्या भुंग्या जाहीर करीत आहेत. देहयष्टी तापून तापून सुकली असली तरी, कुठून तरी अदृश्य निगूढ़ अशा झऱ्याचे पाणी तिला मिळत आहे आणि तिच्यावर नवीनवी पालवी तिकतिक करीत आहे.

चुकूनमाकून भाऊंच्या नावाचा, त्यांच्या जायदादीची मोजदाद करणारा एखादा सरकारी कागद करण्याची जरूर भासलीच तर तो बहुधा असा लिहावा लागेल: राजमान्य (1) राजश्री (?) सीताराम गोविंद रानडे उर्फ भाऊ रानडे; पूर्वी मुक्काम विटे, जिल्हा सातारा, हल्ली मुक्काम वाऱ्यावर... त्यांच्या स्थावर-जंगम मिळकतीचा तपशील पुढीलप्रमाणे: अस्तित्वापुरती जगातील जागा वापरतात, सबब स्थावर मिळकत शून्य. जंगम इस्टेट पाठीवर असते तिचा तपशील : चार जरुरीपुरते कपडे, पंचा, पिशवी, डायरी, पेन [कोणीतरी भेट म्हणून दिलेले] इत्यादी एकूण किंमत तेरा रुपये चौदा आणे जेमतेम!

बाकी या लिहिलेल्या तपशिलातही चुका पुष्कळच होणार! मुळात भाऊंचे नाव काही सीताराम नव्हते. जन्मले शनिवारी म्हणून नाव ठेवले मारुती. पुढे आईने नाव बदलून सीताराम असे केले. पण पहिलेच नाव चुकून बरोबर ठेवले गेले होते असे वाटते. आजन्म नैष्ठिक ब्रह्मचर्य पाळणाऱ्या, तालमीत ताकद कमावणाऱ्या, रामीरामदासांचे मनोमन शिष्यत्व पत्करणाऱ्या, गावभर सेवा दलाचे आखाडे स्थापणाऱ्या, सर्वसंचारी भाऊचे सीतारामापेक्षा त्याच्या दासाशीच अधिक नाते नाही का? भाऊंच्या वडिलांची विट्याला शेती होती. ती अगदीच जुजबी होती असे त्यांच्या पुतण्याकडून कळले. बाकी ते स्पष्टच आहे. नाही तर कोल्हापुरास आपले मामा श्री गोडबोले यांचेकडे शिक्षणासाठी जायचे भाऊंना प्रयोजनच कशाला पडते? मामांच्या व थोरल्या बंधूंच्या मदतीने स्वारी कॉलेजात गेली. राजाराम कॉलेजमध्ये इंटरपर्यंत शिकल्यावर डेक्कन कॉलेजमधून बी.ए. पण उत्तीर्ण झाले. पहिल्या महायुद्धाचा काळ होता. बाजार कडाडले असले तरी लग्नाचा सौदा सहज जमला असता. बाकी गोष्टी महाग झाल्या असल्या तरी नोकऱ्या पैशाला पासरी मिळत. पण भाऊंना शाळेत सद्गुरु लाभले होते. कै. वामन मल्हार जोशी, अण्णा विजापूरकर यांच्या समर्थ विद्यालयाचे संस्कार कोल्हापुरातच त्यांच्यावर झालेले होते. शरीर कसलेले, मन बंडखोर. भाऊंनी टिळकांच्या आदेशानुसार सैन्यात जाण्याचा निश्चय केला. पण संधी हुकली. याचवेळी लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी घेऊन टाकला. त्या मागील तर्कशास्त्र मोठे अजब आहे! भाऊ मनाशी म्हणाले, समजा सैन्यात गेलो असतो, - तर कदाचित् लढाईवरही जावे लागले असते. तिथे मरण आलंच नसते असे छातीवर हात ठेवून कोण सांगू शकेल? अशा स्थितीत बायको असती तर तिची केविलवाणी अवस्था नसती का झाली? आता लढाई संपली... पण स्वातंत्र्याच्या लढ्यात पडावे लागेल. लढा काय अन् लढाई काय! लढाईतच पडलो आहे, असे मानून ब्रहाचारी राहावे हेच उचित! येथून पुढे त्यांनी काडीमाडीचा संसार करण्याची चुकूनही वांछा धरली नाही. समाजाचा संसार तो आपला संसार मानला.

याच्यापुढील अडीच तपाचा भाऊंचा जीवनेतिहास एकाच वाक्यात सांगता येईल : समाजासाठी स्वतः अहर्निश राबण्यात आणि आपुणासारखे इतरांना घडविण्यात भाऊंच्या आयुष्याची तीन तपे कारणी लागली. भाऊंच्या तुरुंगवासाचा ताळेबंद देण्यात हाशील नाही. त्यांच्या काँग्रेससेवेचा किंवा तत्सदृश देशभक्तीचा तोंड भरून गौरव करण्याचे प्रयोजन नाही. त्यांच्यापेक्षा अधिक कारावास भोगलेले देशभक्त कितीतरी असतील. पण भाऊंची थोरवी आहे ती ही की केवळ महान् तत्त्वांचा उद्घोष करून ते थांबले नाहीत; तर लहान-सहान गोष्टीत सावधानता, इमान व कौशल्य बाणवल्याशिवाय महान् तत्त्वे प्रत्यक्षात तर नाहीच पण आवाक्यांतही येणार नाहीत, या जाणिवेने ते रात्रदिवस जळले, जळत आहेत. त्यांच्या बरोबरीच्या मंडळीपैकी कोणी दमली, कोणी आळली, कोणी कद्रू झाली, कोणी मठ सांभाळले, कोणी हवेल्या बांधल्या, कोणी सत्ता साधली, निदानपक्ष बुद्धिमांद्य आल्याने मख्खपणे कोणी बसून राहिले. पण भाऊंनी आपली नित्यनूनता घालविली नाही. हा त्यांचा दुसरा मोठेरणा. जणू ययातीसारखेच चिरतारुण्यांचे वरदान त्यांना मिळाले आहे! भोगाऐवजी त्यागासाठी एवढेच काय ते!

1916 सालच्या भाऊंच्या मनाचे चित्र त्यांना आज दाखवले तर त्यांना स्वतःलाच स्वतःची ओळख पटणार नाही. जानवे न घातल्याबद्दल विद्यार्थ्यांना मारणारे, पहाटे चार वाजता स्नान आटोपून मारुतीला पाणी घालणारे, स्त्री सर्व संकटांची जननी अशी कर्मठ दृष्टी साभिमान बाळगणारे आणि सामाजिक सुधारकांची अर्वाच्य निंदा करण्यातही फारशी चूक न मानणारे भाऊ आणि स्त्रीचा आत्मा स्वतंत्र करू पाहणारे, समाजात नृत्यकलेचा आदर झाला पाहिजे असा प्रचार करणारे, सामाजिक परिषदेत जीव तोडून काम करणारे आणि आगरकरांचा आदर्श तरुणांपुढे ठेवणारे भाऊ, एकमेकांपासून किती भिन्न आहेत! भाऊंच्या जीवनातील बदल म्हणजे साधसाधुपणा नव्हे, कारण संधी तरी साधणार कशाची? भाऊंची टोपी कायम आहे. फरक झाला आहे तो बुद्धीत आणि भावनेत.

आपल्या समाजात अशा निरलस सेवेच चीज नाही. बुद्रुक गावातील उकिरडे साफ करण्यापासून सांस्कृतिक परिषदेतील विचार मित्रास समजावून सांगण्यापर्यंत अक्षरशः शेकडो कामे भाऊंच्या दैनंदिन कार्यक्रमात असतात.

समाजाचे कणभर भले करण्यासाठी मणभर रक्त आटवण्याचा भाऊंचा शिरस्ता आहे. आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या चुकीत त्यांना हिमालय दिसतो आणि आपण ज्या कामाला क्षुद्र म्हणू त्यात त्यांना ब्रह्मांड दिसते. हा सारा आटापीय भाऊ कशासाठी व कोणासाठी करतात या प्रश्नाला उत्तर नाही. त्यांचा आरडाओरडा, तडफडाट धावपळ, आक्रस्ताळेपणा कधी रौद्र तर कधी केविलवाणा वाटतो.

तीन तपाच्या तपस्येचे फळ काय हा प्रश्न भाऊ स्वतःला कधी विचारीत नाहीत. दुसऱ्यानाही तो विचारू नये. हाच अनासक्त कर्मयोग काय? की ही सत्कर्माची आसक्ती? की केवळ राबवून घेण्याची लागलेली सवय? या प्रश्नांची नेमकी उत्तरे देणे कठिण आहे. भाऊही त्यांचा अधिक विचार न करता सहजपणे, अविरतपण सुचेल ते करीत आहेत. त्यांची प्रत्येक हालचाल, प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार समाजकल्याणाच्या दिशेने वाटचाल करताना आढळेल. पुष्कळ वेळा त्यांचा अपमान होतो. निदानपक्षी थट्टा तर होतेच होते. अपमान भाऊंना समजतो. त्यांचे डोळे लाल होतात. वाचा अधिकच अर्थापुढे धावू लागते! पण भाऊ राग गिळतात, दुःख गिळतात, थट्टा हसण्यावारी घालवतात आणि पुन्हा वाऱ्यासारखे आपल्या कामासाठी धावत सुटतात. आत्मक्लेश करून घेतात. शरीराची कधी काळजी करीत नाहीत. प्रसंगी पोटालाही चिमटा घेतात. पण भाऊजवळ लाचारी नाही. आपण समाजाचे काम करतो म्हणून समाजावर आपला हक्क आहे, असे ते मानतात. प्रसंग हा हक्क जरा अधिकच बजावतात. आपला हट्ट पुढे रेटू पाहतात. पण थांबणे त्यांना ठाऊक नाही. दमणे त्यांच्या हिशबी नाही. भाऊंच्यासारखे पुरुषोत्तम आपल्या देशात पाच तरी असतील काय? साठ वर्ष पुष्कळाची पुरी होतात, एकसष्ट्याही छप्पन्नाच्या होतात. पण भाऊंच्या सारख्या समाजसेवकाना दीर्घायुष्य लाभले तर ते सार्थकी लागते. भाऊ, तुम्ही शतायु व्हा.

Tags: Senapati Bapat Bhausaheb Ranade S. M. Joshi सेनापती बापट भाऊसाहेब रानडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी