डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

श्री. भाऊ फाटक - एक समर्पित जीवन

संकटे आली तरी त्यांनी आपल्या मनाचा तोल ढळू दिला नाही. सर्वांशी मिळून मिसळून वागतात, त्यांचा चाहता वर्ग असंख्य आहे. तरुणपणी ते फार रागीट होते. याचा अनुभव घरातील कोकांना व त्यांच्या सहकाऱ्यांनाही आला आहे. ते आता मवाळ झाले आहेत. ‘वज्रादपि कठोरानि मृदुनी कुसुमापरी' अशी त्यांच्या मनाची ठेवण आहे. काम वेळेवर होण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. संघटनेसाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक, मालकीच्या जागा-ऑफिसे व अभ्यासू कार्यकर्ते यांचा संच हा भाचा छंद.कामगार हेच कुटुंब. त्याचे सुखदुःख हेच आपले सुखदुःख मानून त्यांच्या कुटुंबांची शिक्षण-पालन यांची जातीने चौकशी करणे ही नित्याची सवय!

कामगारांच्या सुखासाठी  चंदनाप्रमाणे अहोरात्र झटणारे, श्री. भाऊ काटक यांच्या वयाला 18 फेब्रु. 1982 रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यचळवळीतील एक झुंजार सैनिक, कामगारांच्या संघटना उभारणारे कुशल संयोजक आणि समाजवादी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, अशी भाऊंच्या व्यक्तित्वाची विविध रूपे महाराष्ट्राला परिचित आहेत.
भाऊंचे संपूर्ण नाव श्री. मा. पां. ताटके. 1942 च्या स्वातंत्र्य संग्रामात भूमिगत राहून कार्य करताना त्यांनी आपले नाव बदलले व 'भाऊ फाटक' हे नाव स्वीकारले. आता याच नावाने ते कामगारांच्या जीवनात 'चिरंजीव' झाले आहेत. सुमारे 25 वर्षांपूर्वी भाऊंनी एस. टी. कामगार सभा या संघटनेत प्रवेश केला व आपल्या कुशल नेतृत्वाने ती संघटना उभ्या महाराष्ट्रात आदर्श बनली आहे. त्यांच्या ‘साठी’ समारंभासाठी महाराष्ट्रातील सर्व एस. टी. कामगार निधी जमवण्याचे कार्य करीत आहेत. अंदाजे 1 लाख 61 हजार रु. जमवण्याचा संकल्प आहे.श्री. भाऊ फाटक उर्फ श्री. मा. पां. ताटके यांचा जन्म सातारा जिल्हपातील वाई या तीर्यक्षेत्री ता. 18।2।1922 रोजी एका ब्राह्मण कुटुंबात झाला.

बालपणीचे संस्कार
श्री. फाटक यांचे आजोबा दशग्रंथी ब्राह्मण होते आणि त्यांचे वडील वाई नगरपालिकेत नोकरीस होते. गरीब लोकांबद्दल त्यांना प्रेम होते. मोळ्या विकून पोट भरणाऱ्या गरीब लोकांना ते कर न घेताच गावात मोळी विकण्यास परवानगी देत असत. या प्रकाराबद्दल त्यांना दंड होत असे व तो दंड ते आनंदाने स्वतःच्या पगारातून भरीत असत. त्या काळात त्यांना केवळ 6 रु. पगार होता. लहानपणीच त्यांचे वडील निवर्तले. पण आईने धीर सोडला नाही. तिनं मोलमजुरी करण्याचे ठरवले. त्यांची आई दुसऱ्याचे शिवणकाम करून देई, स्वयंपाक करून देई, आईच्या या कष्टात श्री. भाऊ जातीने मदत करीत असत. दुसऱ्यांच्या देवांची पूजा ते करीत असत. त्यामुळे चार पैसे मिळत असत.

स्वावलंबी शिक्षण
हुशार असल्यामुळे श्री. भाऊ अभ्यासात नेहमी वरचा वर्ग मिळवीत असत. मराठी सातवीची परीक्षा पास झाल्यावर त्यांना इंग्रजी शाळेत जावयाचे होते, परंतु हायस्कूलची फी व पुस्तकांचा खर्च भागवण्याची कुटुंबाची ताकद नव्हती. त्यांचा शाळेशी प्रथम संबंध आला तो शाळेतील बाक साफ करण्यासाठी. त्यामुळे त्यांची शाळेची फी माफ झाली व पुस्तकांच्या खर्चासाठी पैसे मिळाले. शेवटी मॅट्रिकची परीक्षा ते पास झाले. आईच्या व कुटुंबातील लोकांच्या आनंदाला उधाण आले.

क्रांतिकारकाचा पिंड
ते आपल्या आईला नेहमी जाणीव देत असत की 'मी नोकरी करून चार पैसे आणीन असे मनात धरू नका. राष्ट्र पारतंत्र्यात असताना मी चाकरी करून चार पैसे मिळवणे बरे नव्हे. तेव्हा मी राष्ट्राच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रत्यक्ष उडी घेणार आहे.' त्यांचा पिंड क्रांतिकारकाचा आहे हे आई ओळखून होती. तिने विरोध केला नाही. फक्त म्हणत असे की, कोठेही जा, सुखरूप राहा, आईला विसरू नकोस. आई अंबाबाई तुझे रक्षण करो! त्यांनी 1942 च्या स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.

स्वातंत्र्य संग्राम 1942
‘भारत छोडो’च्या गर्जनेने भारतात नवचैतन्य निर्माण झाले होते. परदेशी कपड्यांच्या होळीतून देशभर स्वातंत्र्यतेज झळकत होते. पुणे येथे साहेबी टोप्यांची होळी झाली. त्यात भाऊंनी आपली हॅट जाळून टाकली. ही त्यांची पहिली प्रत्यक्ष कृती. उघडपणे ब्रिटिशांशी दोन हात करणे धोक्याचे होते. तेव्हा ते भूमिगत चळवळीत सामील झाले. रानावनांत व डोंगर-कपारींत राहून वेळ प्रसंगी उपाशीपोटी व पाण्यावाचून राहून ब्रिटिशांच्या विरुद्ध गनिमी काव्याचे युद्ध केले. तेव्हा त्यांचेवर पकड वारंट काढले होते, परंतु ते त्यांच्या हाती लागले नाहीत. आईचा त्यांना पाठिंबा होता. फक्त एकच अट होती. त्यांनी प्रत्येक 15 दिवसांनी खुशालीचे पत्र पाठवावे. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांनी प्रत्येक 15 दिवसांनी हस्ते-परहस्ते पत्र पाठवले. त्यात ते आपल्या विचारांची देवाणघेवाण करीत असत. पत्र वा चिठ्ठी वाचून झाल्यावर नष्ट करावी, अशी सूचना ते देत असत.

संस्मरणीय प्रसंग
भूमिगत असताना ते आपल्या आईला भेटण्यासाठी वाईस आले होते. पोलिसांना सुगावा लागला. ते घरी चौकशीस आले. त्यांनी एम. पी. ताटके हवेत म्हणून सांगितले. श्री. भाऊ घरात होते. त्यांच्या धाकट्या भावाचे इनिशिअलही एम. पी. ताटके होते. श्री. भाऊंनी त्यांच्या लहान भावास पोलिसांच्या समोर पाठवले व सांगण्यास सांगितले की मीच एम. पी. ताटके आहे. त्याप्रमाणे त्यांच्या लहान भावाने पोलिसांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘आम्हांस तुम्ही नकोत दुसरे हवेत.’’ ती व्यक्ती येथे नाही असे गृहीत धरून पोलीस निघून गेले. जीव भांड्यात पडला. त्याच रात्री ते पुण्यास निघून गेले.

स्वातंत्र्याचा सूर्योदय!
15 ऑगस्ट 1947 रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाले. श्री. भाऊ यांनी आपले कार्यक्षेत्र बाशीहून सोलापूर येथे हलवले. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पार्टीमध्ये फूट पडली. त्या पार्टीतील समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी लोकनायक स्वर्गीय श्री. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला रामराम ठोकला व त्यांनी स्थापन केलेल्या समाजवादी पक्षात सामील झाले. सोलापूरला समाजवादी पक्षाचे कार्य ते नेकीने करत असत. राष्ट्र सेवा दलावर त्यांना प्रेम व आपुलकी होती व आहे. त्यांची समरगीते सगळ्यांना तोंडपाठ आहेत. पक्षाचे कार्य करीत असता त्यांचे राष्ट्र सेवा दलातील एक नेकीच्या कार्यर्त्या कु. ताराबाई बेलसरे यांच्यावर प्रेम जडले. प्रेमाचे शेवटी लग्नात रूपांतर झाले. त्यांचे नाव फक्त आडनावाने बदलले व ते म्हणजे सौ. तारा फाटक. त्या एका धनवान कुटुंबातील होत्या. लग्नास घरच्या लोकांचा विरोध होता. पण त्याला न जुमानता त्यांचा श्री. भाऊ यांचेशी विवाह झाला. त्यांच्या लग्नाची पत्रिका श्री. नानासाहेब गोरे यांच्या सहीने काढली होती.

कामगारांची प्रेरक शक्ती                                                                                                                                                                                  सोलापुरातील प्रसिद्ध गिरणी ‘जुनी गिरणी' तोट्यात आली म्हणून बंद झाली. हजारो कामगार बेकार झाले. ती गिरणी परत चालू करावी म्हणून 'ताला तोडो' मोहीम समाजवादी पक्षाने काढली. त्या मोहिमेचे नेतृत्व भाऊ यांनी केले. त्यांना अटक झाली व शिक्षा झाली. याप्रमाणे ते हळूहळू कामगार चळवळीकडे झुकले जाऊ लागले. कामगारांवर होणारे अन्याय व अत्याचार त्यांना मानवले नाहीत. कामगार चळवळीवरील सर्व पुस्तके त्यांनी वाचली. कुठल्याही क्षेत्रात काम करावयाचे तर त्याची पूर्ण माहिती असावी लागते. कापड गिरणीची त्यांना खडान्‌खडा माहिती आहे. रशियन क्रांती त्यांनी वाचली. त्याचा पगडा त्यांच्यावर होताच. त्यांनी हॉटेल मजदुरांची युनियन सोलापुरात स्थापिली. मग रेल कामगार युनियनचे काम ते पाहू लागले. रेल्वेच्या सर्व कामकाजाची माहिती त्यांना आहे. रेल्वेचे काम करण्यासाठी त्यांचे ऑफिस दौंड येथे होते. रेल्वेच्या कामगारांची त्यांनी सेवा केली व करीतही आहेत. दौंड विभाग दक्षिण भागात घातला तेव्हा त्याविरुद्ध त्यांनी लढा दिला व त्यात ते यशस्वी झाले. तसे झाले नसते तर कामगारांचे अतोनात हाल झाले असते. त्यांनी महाराष्ट्रातील साखर कारखान्यातील कामगारांची युनियन स्थापन केली.  किशोर पवार,  मधु भिसे व  गंगाधर ओगले हेही त्यात सहभागी होते. सर्व साखर कामगारांना एकत्र आणून त्यांनी त्यांचे वेतन व जीवनमान वाढविले.

मनाचा मोठेपणा
एकदा सोलापूरला जेवणाचा डबा आणण्यासाठी सायकलवरून जात असता एका ट्रकने त्यांना ठोकर दिली. फुटबॉलच्या चेंडूसारखे उडून ते लांब पडले. जिवावरचा प्रसंग पायावर निभावला. पाय खुळ्यात मोडला. सहा महिने प्लास्टरमध्ये काढावे लागले. काहीच काम करता न आल्यामुळे त्यांचे मन बेचैन झाले. या आजारपणात त्यांची सेवा आईने व स्वर्गीय तारा फाटक यांनी केली, तेसुद्धा लग्नाच्या आधी. पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला पकडले. त्याच्या कुटंबातील लोकांना उपासमार सहन करावी लागेल या जाणिवेने त्यांनी पोलिसांना सांगितले को 'चूक माझी आहे. ड्रायव्हरची नाही. त्याला सोडून द्या.’’ केवढा हा मनाचा मोठेपणा! केवढी गरिबांच्याबद्दल कळकळ!
सोलापूरहून मग ते पुणे येथे स्थायिक झाले. एरंडवण्यात दीड खोलीत त्यांची पत्नी, दोन मुले व आई अशी सर्व राहत होती.

पुण्यास आल्यावर त्यांनी एस. टी. महामंडळाच्या कामगारांची युनियन थापन केली. युनियनचे नाव ‘एस. टी. कामगार सभा.' या सभेचे काम पुण्यापुरतेच मर्यादित होते. परंतु धीराने व नेकीने त्यांनी व श्री. मोहन धारिया यांनी सभेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्रात वाढविले. महाराष्ट्र परिवहन उद्योगक्षेत्रात पूर्वी तीन-चार युनियन्स होत्या. इंटकची युनियन महाराष्ट्रात आहे. श्री. फर्नांडिस यांची युनियन मुंबई-ठाणे येथे होती, त्यामुळे एस. टी. कामगारांचे प्रश्न सोडविण्यात अडचणी येत. तेव्हा कालांतराने फर्नांडिस यांची युनियन व भाऊ फाटक यांची युनियन व आणखी लहानसहान युनियन एकत्रित आल्या व एक नवीन युनियन स्थापन झाली. 'महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटना’. आता या क्षेत्रात दोनच युनियन्स आहेत. वास्तविक एकच हवी. परंतु सरकारच्या पाठिंब्याने इंटकची युनियन आहे. तरी पण त्यांनी एस. टी. कामगारांचे वेतन व जीवनमान वाढवले आहे. सर्व सवलती मिळणे शक्य नाही, परंतु जास्तीतजास्त मिळवून देण्याचा प्रयत्न सतत चालतच असतो. कामगारांशी ते प्रामाणिक आहेत. मोटर उद्योगाची त्यांना संपूर्ण माहिती आहे.
भाऊ सर्व भारतात फिरले आहेत. त्यामुळे ते बहुश्रुत आहेत. एकदा पूर्व जर्मनीलाही त्यांनी भेट दिली होती व तेथील कारखान्यातील कामकाजाची माहिती करून घेतली.

आणीबाणीतील तुरुंगवास!
राजकीय स्वार्थासाठी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशात 6 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर केली. सर्व प्रमुख विरोधी राजकीय पुढाऱ्यांना तुरुंगात डांबले. लोकनायक स्व. जयप्रकाश नारायण,  मोरारजीभाई देसाई,  मोहन धारिया,  फर्नाडिस, वाजपेयी आणि इतर तुरुंगात गेले. फर्नांडिस यांनी भूमिगत राहून सरकारविरुद्ध कारवाया केल्या, तशाच भाऊ यांनीही केल्या. दापोड़ी वर्कशॉपच्या गेटपुढे कामगारां सभा घेऊन त्यांनी ते बंद पाडले. तसेच पुणे शहरातही मोर्चा वगैरे निदर्शने झाली. पोलीस त्यांच्या मागावर होतेच, ते भूमिगत झाले. ठाणे-मुंबई-नाशिक येथे ते हिंडत होते. पुण्याच्या घरी पोलिसांचा डोळा होताच. नाशिक येथे त्यांनी सभा घेतली व पहाटे तीन वाजता त्यांना त्यांच्या मित्राच्या घरी अटक करण्यात आली.

सहचारिणीचा वियोग
8 महिन्यांचा तुरुंगवास त्यांना फार नडला. ते स्वतः डगमगले नहीत. परंतु श्रीमती इंदिरा गांधी यांची व इतर काँग्रेस पुढाऱ्यांच्या वक्तव्याने मात्र त्यांची कुटुंबीय मंडळी हवालदिल झाली. ‘जन्मभर या मंडळीना तुरुंगातच ठेवावे’, अशी ती वक्तव्ये होती. त्यांच्या पत्नीला स्वर्गीय तारा फाटक यांना हृदयरोग होता. त्यांच्या हार्टचे ऑपरेशनही झाले होते. त्यांचा विकार बळावला. फारच आजारी झाल्या. भाऊंना पॅरोलवर मुक्त करावे, यासाठी अर्ज केला; पण दाद लवकर घेतली गेली नाही. त्या ठाणे येथे त्यांच्या दिराकडे होत्या. शेवटी नानासाहेब गोरे यांनी त्यांना आपल्याबरोबर पुण्यास मोटारीने नेले. ससूनमध्ये दाखल केले. दिवसेंदिवस प्रकृती ढासळत चालली होती. श्री.भाऊ यांची आठ दिवसांसाठी पॅरोलवर मुक्तता झाली. डॉक्टरी उपाय सातत्याने झाले. परंतु उपयोग झाला नाही. 26 जानेवारी 1977 रोजी सर्व राजबंद्यांची मुक्तता झाली. वातावरण आनंदाचे होते. श्री भाऊंचीही मुक्तता झाली. सौ.ताराबाईना आनंद झाला; परंतु तो क्षणिक ठरला. 29 जानेवारी 1977 रोजी सकाळी 10 वाजता त्यांचे निधन झाले. सर्व लोक हळहळले आणि आणीबाणीच्या त्या बळी ठरल्या!

हुतात्मा झाल्या! जिवात जीव असेपर्यंत त्यांनी श्री. भाऊंची सेवा केली. अनेक हालअपेष्टा त्यांनी भाऊंच्याबरोबर आनंदाने सोसल्या. चंदनाप्रमाणे त्यांनी देह झिजवला सहचारिणीच्या वियोगाने भाऊंवर वज्राघात झाला तरीही हे दुःख सहन करून त्यांनी आपल्या कार्यास प्रारंभ केला.
पण देवाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. त्यांचे सुपुत्र  अजीत पुढील सहा महिन्यांत ता. 8-7-1977 रोजी मोटर अपघातात निधन पावले.हे दुःखही त्यांनी धीरोदात्तपणे सहन केले. या दुःखातून बाहेर पडतात न पडतात तोच श्री. भाऊंच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांचे वय 82 वर्षांचे होते. त्यांना अतीव दुःख झाले. सारा संसार अंधारमय झाला. या मातेनेच त्यांना खरे बोलण्यास, प्रामाणिकपणे वागण्यास, लाचारी न करण्यास व गरिबांची सेवा करण्यास शिकवले. आई ही त्यांच्या यशाचे स्फूर्तिस्थान होते. जातपातीवर भाऊंचा विश्वास नाही व प्रत्यक्ष जीवनातसुद्धा ते जातपातीला थारा देत नाहीत. परमेश्वरावर त्यांचा विश्वास नाही, ते मूर्तिपूजा मानीत नाहीत. माणसाच्या कर्तबगारीवर त्यांचा विश्वास आहे. जुन्या कविता, जात्यावरील गाणी-ओव्या त्यांना तोंडपाठ आहेत. त्यांना रागदारी संगीताची व तंतुवाद्यांची आवड आहे. फावल्या वेळात टेपरेकॉर्डवर ते संगीत ऐकत असतात.

शिस्तीचे भोक्ते
एवढी संकटे आली तरी त्यांनी आपल्या मनाचा तोल ढळू दिला नाही. सर्वांशी मिळून मिसळून वागतात, त्यांचा चाहता वर्ग असंख्य आहे. तरुणपणी ते फार रागीट होते. याचा अनुभव घरातील कोकांना व त्यांच्या सहकाऱ्यांनाही आला आहे. ते आता मवाळ झाले आहेत. ‘वज्रादपि कठोरानि मृदुनी कुसुमापरी' अशी त्यांच्या मनाची ठेवण आहे. काम वेळेवर होण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. संघटनेसाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक, मालकीच्या जागा-ऑफिसे व अभ्यासू कार्यकर्ते यांचा संच हा भाचा छंद.कामगार हेच कुटुंब. त्याचे सुखदुःख हेच आपले सुखदुःख मानून त्यांच्या कुटुंबांची शिक्षण-पालन यांची जातीने चौकशी करणे ही नित्याची सवय!विशाल समाजवादी ध्येयासाठी प्रथम राष्ट्र, राष्ट्रासाठी राष्ट्रीयीकरण व त्यासाठी अखंड परिश्रम. एकाच धंदात एकच युनियन हे त्यांचे ब्रीद. या सर्वांमागे एकच उदात्त हेतू. कामगारांचे-कष्टकऱ्यांचे राज्य हे त्यांचे आवडते स्वप्न आहे.ते स्वप्न साकार होण्यासाठी भाऊ फाटक अमर रहे!

Tags: समाजसेवक समाजवादी कार्यकर्ते नाबाद ‘साठी’ भाऊ फाटक social worker socialist not out 60 bhau phatak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके