डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'शिबिर' या संकल्पनेचाच पुनर्विचार - सांगली शिबिराचे फलित (16 व 17 जानेवारीला झालेल्या शिबिरावरून )

'समविचारी व्यक्तींनी समान पातळीवर परस्परांशी संवाद साधून, परस्परांच्या समस्या समजून घेण्याचा-सोडवण्याचा एकत्रितपणे केलेला प्रयत्न म्हणजे शिबिर', असे म्हणता येईल; पण मग ते सांगली येथील शिबिराबाबतीत कितपत प्रत्ययास आले? समविचारी (!) असूनही शिबिरार्थींमध्ये परस्परांत संवाद का निर्माण झाला नाही? 

'खेडे व शहर विभागांतील सुशिक्षित व अशिक्षित तरुणांसमोर आज अनेक अडचणी उभ्या आहेत... या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रयत्नांचे स्वरूप काय असावे, त्यासाठी तरुणांचे स्वतंत्र व्यासपीठ असावे काय, वगैरे मुद्यांबाबत प्रामुख्याने तरुणांनीच विचार करायचा आहे.’ शिबिर संयोजकांची पत्रकातूनच अभी भूमिका जेव्हा स्पष्ट झाली तेव्हा त्या शिबिराला जायलाच हवे, असे मनाला वाटले. कारण केवळ वाचनातून निर्माण झालेली 'पुस्तकी' सामाजिक जाणीव, जमेस असलेला सामाजिक कामाचा किरकोळ बनुभव, सतत शहरातच राहिल्यामुळे खेड्याकडे-खेड्यांतील समस्यांकडे बऱ्यचशा कुतूहलाने आणि काहीशा उपरेपणाने पाहणारे मन- या साऱ्यांतून बाहेर पडून खेड्यांतील सामाजिक कामांद्वारे (आणि अर्थातच ग्रामीण कार्यकर्त्यांद्वारे) 'त्या' समस्यांचे संपूर्ण रूप दिसावे, त्यासाठी ग्रामीण कार्यकर्त्यांनी कोणत्या दिशेने प्रयत्न केला, त्यात ते कितपत यशस्वी झाले, हे सारे जाणून घेण्याची अपेक्षा होतीच. शिवाय 'वेरळा विकास प्रकल्प' या (सांगली येथील) संस्थेने आयोजित केलेल्या या शिबिरातच ग्रामीण आणि शहरी कार्यकर्त्यांना परस्परांची समस्या, कामे समजतीलच; परंतु त्या दोघांच्या कामामध्ये सांधेजोडसुद्धा होऊ शकेल, अशीही अपेक्षा होती. पण प्रत्यक्ष शिबिर संपले तेव्हा त्या शिबिरातून फारच थोडे हातात पडले, याची खंत मनाला वाटत राहिली.

संयोजकांची शिबिरामागची भूमिका स्पष्ट नसतानाही 'असेच झाले?' हा प्रश्न मनाला अस्वस्थ करत असतानाच हा लेख लिहायला घेतला. त्यामुळेच हा लेख म्हणजे सांगली येथे 16, 17 आनेवारीला आयोजित केलेल्या शिबिराचा वृत्तान्त (रिपोर्ट) नव्हे हे उघड आहे. शिबिराच्या रिवाजाप्रमाणे सांगलीतील 'त्या शिबिराची सुरुवातही शिबिरार्थींच्या ओळखीने झाली. शिबिराला आकार हा जसा संयोजकाच्या शिबिर भरवण्यामागच्या हेतूने प्राप्त होतो तेवढाच- किंबहुना त्याहूनही अधिक शिबिरार्थींच्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि सहभागामुळे होतो. शिबिराचे यशापयश इतक्या प्रभावीपणे ठरवण्याचे सामर्थ्य शिबिरार्थींच्या सहभागात, व्यक्तिमत्त्वात असण्याची कारणे उघड आहेत. एकतर असे शिबिर है ‘विचार स्वातंत्र्या'चे खरेखुरे पुरस्कार करणारे असते आणि ‘वेरळा विकास प्रकल्या'च्या या शिबिरात तर शिबिराचा कार्यक्रम (शिबिरार्थ्यांनी एकत्रितपणे) तयार करायचे आधीपासून ठरलेले होते.

त्यामुळेच शिबिरार्थींची ओळख होत असताना त्या शिबिरातील वर्गवारी 4 पद्धतीने होत असल्याचे जाणकले, ती वर्गवारी पुढीलप्रमाणे.

(1) पहिला गट 'नवशिक्यां'चा. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ‘राष्ट्रीय सेवा योजना'सारख्या योजनांमधून थोडीफार केलेली सामाजिक कामे ही या गटाची जमेची बाजू. या कामांमुळे व खेड्यांतून आल्यामुळे खेड्यांतील समस्या आपल्याला माहीत असल्याचा दावा करणाऱ्या या शिबिरार्थींच्या गटाला फक्त कार्यक्रम (ज्याला ते ‘मार्गदर्शन' असे संबोधन होते.) हवा होता.
(2) दुसरा वर्ग वरील वर्गाहून संपूर्ण भिन्न स्वरूपाचा सामाजिक कामातून वाढलेल्या जाणिवा. खेड्यांतील समस्यांबाबत डोळसपणा येऊनही कुठल्याही प्रकारचा दावा न करणारा हा वर्ग. आपल्या नेहमीच्या भाषेत बोलायचे तर ‘पहुँचे हुए' असे हे लोक. आणि तरीही त्यांचा सामाजिक जाणिवा आणि समस्यांबाबत शोध चालूच. सांगलीचे लाड सर, नांदेडचे दत्ता तुमवाड, सांगली परिसरात कवठे महांकाळ इथे काम करणारे सत्यवान कुंभारकर, दिल्लीतील संशोधन संस्थेत काम करणारे दता उर्फ भाऊ सावळ, ‘वेरळा विकास प्रकल्या'तील काही या गटातील कार्यकर्ते.
(3) तिसरा वर्ग - सामाजिक जाणिवा असूनही सामाजिक कामांबाबत फारसा अनुभव नसलेल्या, पुस्तकांचा बळकट पण काहीसा एकांगी आधार, वास्तव आणि आदर्श यांचा मेळ घालू पाहूणारे प्रयत्नील मन हे या वर्गाचे विशेष. मी यात कुठेतरी बसते, असे वाटत होते. पण त्याच वेळी सांगलीतील राष्ट्र सेवा दलाचा शाखानायक आणि हमाल कामगारांना संघटित करणारे मोहन वाडकर, युवक कांती दलातर्फे काम करणारा अरुण जाधव, 'समडोळी'सारख्या गावात मागासवर्गीय स्त्रियांचा प्रौढ शिक्षणाचा वर्ग घेणारे भीमराव कांबळे, 'वेरळा विकास प्रकल्पा’द्वारे प्रौढ साक्षरता प्रसाराचे काम करणाऱ्या रेखा कांबळे, राजक्का जगदाळे, शिंदेबाई, कुळकर्णीबाई यांची या वर्गात गणना करूनही त्यांनी आपल्यापेक्षा पुढची पायरी (अनुभवामुळे) गाठली आहे, याची जाणीव झाली.
(4) चौधा वर्ग - संपूर्ण शिबिरात निरनिराळ्या क्षेत्रांतील नैपुण्यामुळे अधिकारी असलेल्या व्यक्तींचा सहभाग लक्षणीय मानायला हवा. कोल्हापूर ‘सकाळ’चे स्थानिक संपादक श्री. दशरथ पारेकर, शेती प्रयोगात आपल्या अनन्यसाधारण प्रयोगशीलतेने उठून दिसणारे श्री. श्री. श्री. अ. दाभोळकर, प्रसिद्ध समीक्षक प्रा. म. द. हातकणंगलेकर, ‘जीवनाला आणि सामाजिक जाणिवेला (पर्यायाने कामालाही) कलेची झालर असली तर ती जास्त लोकांपर्यंत पोहोचेल' असे आवर्जून सांगणारे 'आय. एन. टी.'चे लोककला विभागाचे संचालक अशोकजी परांजपे, शेतकी विषयाचे सल्लागार श्री. प्र. शं. ठाकूर, अतिशय थोडा वेळ येऊन आपल्या महाराष्ट्राबाहेरच्या (आंतर भारतीच्या झालेल्या दौऱ्यातील) हेलावून टाकणारे अनुभव सांगणारे बा. य. परीट, सांगलीतील एक प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कामाबाबत आस्था असणारे श्री. भास्करराव जोगळेकर ह्या चौथ्या वर्गातले.

शिबिराच्या कामकाजाच्या वेळचे संयोजन श्री. वसंत पळशीकर यांनी केले होते. स्वत:च्या विचारांबाबत संपूर्ण स्पष्टता, दुसऱ्यांचे संदिग्ध विचार ऐकूनही त्यातील नेमका आशय जाणून तो पुन्हा मांडण्याची ताकद आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक शिबिरार्थीच्या विचाराकडे (बऱ्याच वेळा त्याच्या विषयांतराकडेही ) आस्थेने लक्ष देण्याची वृत्ती- ही सारी वैशिष्ट्ये- त्यांच्या प्रत्येक शब्दातून आणि नजरेतूनही अभिव्यक्त होत होती. चुकलेल्या मेंढराला हाकून जागेवर आणावं तसं काही शिबिरार्थींना ते सतत मूळ विषयावर आणि नेमक्या मुद्यावर आणत होते. श्री. वसंत पळशीकरांच्या या कामकाजाला त्या शिबिराच्या आयोजनाचे संयोजक आणि वेरळा विकास प्रकल्पाचे मानद सचिव श्री. अरुण चव्हाण यांचाही हातभार लागत होता. मग अशा वेळी प्रश्न असा पडतो की, इतक्या साऱ्या गोष्टी जुळून येऊनही ‘'शिबिर' अयशस्वी का व्हावे? एवढेच नव्हे तर 'शिबिर’ या संकल्पनेचाच पुनर्विचार आवश्यक करावा असे का वाटावे?  याचे अत्यंत महत्त्वाचे कारण असे की, शिबिरार्थींची अयोग्य पद्धतीने केलेली निवड. शिबिरार्थ्यांची निवड कोणत्या कसोटीवर केली गेली? हाच मनाला पडलेला प्रश्न. कारण 'समविचारी व्यक्तींनी समान पातळीवर परस्परांशी संवाद साधून, परस्परांच्या समस्या समजून घेण्याचा-सोडवण्याचा एकत्रितपणे केलेला प्रयत्न म्हणजे शिबिर', असे म्हणता येईल; पण मग ते सांगली येथील शिबिराबाबतीत कितपत प्रत्ययास आले? समविचारी (!) असूनही शिबिरार्थींमध्ये परस्परांत संवाद का निर्माण झाला नाही? 

याचे कारण, 'समविचारी व्यक्ती' आणि 'समान पातळी’ या संकल्पनांचाच फेरविचार करायला हवा. केवळ वरील सर्व शिबिरार्थींत सामाजिक जाणीव किंवा समाजसेवेची आवड ही ‘समान इच्छा' अगर हे 'समान वैशिष्ट्य’ होते. म्हणून त्यांना ‘समविचारी' म्हणायचे का? तसे असते तर 'केवळ आर्थिक समस्या सोडवल्यामुळे सामाजिक समस्या सुटत नाही', या मूलभूत मुद्याचा विचार चालला असताना मध्येच आम्हांला ग्रामीण लोकांचे प्रश्न माहीत आहेत ते सोडण्यासाठी आम्हांला मार्ग सुचवा आणि त्यानुसार कार्यक्रम घ्या, असा एकदम वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न विचारला गेला असता का? त्यामुळे झाले काय की, पहिल्या दिवशी ‘लग्नगडी'सारख्या आदिवासींच्या समस्येवर बोट ठेवणारे दत्ता साबळे, वैयक्तिक सुखदुःखाकडे फारसे लक्ष न देता नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात वंजारी समाजात काम करणारे दत्ता तुमवाड, आपल्या प्रायोगिकतेने कमी साधनांद्वारे (कधी कधी तर खतासारख्या अत्यंत महत्त्वाच्या साधनालाही नाकारणारे) आणि सोप्या- तरीही संपन्न शेतीतील नावीन्याचा विचार मांडणारे दाभोळकर पहिल्या गटाला महत्त्वपूर्ण वाटलेच नाहीत आणि शिबिराद्वारे सामाजिक जाणिवा प्रामुख्याने संपन्न करायच्या असतात आणि कार्यक्रमाबाबत मात्र ज्याची त्याची वाट ज्याने त्याने शोधायची, अशी भूमिका असलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्गाला कार्यक्रमांची मागणी मान्य झाली नाही आणि या साऱ्या दृष्टिकोनामुळेच की काय चौथ्या वर्गातील व्यक्तीची प्रतिक्रिया अशी झाली, की ते या शिबिरार्थींकडे काहीशा अलिप्तपणे पाहू लागले. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा शिबिरार्थींना व्हावा तितका उपयोग झाला नाही.

(अपवाद श्री. दाभोळकरांचा.) म्हणूनच ‘समविचारी व्यक्ती' असे एखाद्या गटाला संबोधताना त्यांची पातळीदेखील समान आहे की नाही, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी समविचारी व्यक्तींची शिबिरार्थी म्हणून निवड करतात.

(1) शिबिरार्थीचे वय, (2) त्याच्या सामाजिक जाणिवेची दिशा व कक्षा , (3) त्याचे अनुभवविश्व ('अनुभवविश्व' हा शब्द वापरताना-आपल्या सामाजिक कामातील अनुभवांची झोळी, व्यापकपणा, विविधता यांचाही विचार अभिप्रेत आहे.) हे सारे निकष लावून जेव्हा त्या समविचारी' व्यक्ती एका गटात बसतील तेव्हा त्या समान पातळीवर (विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने) येतील. तेव्हाच मग ते समविचारी व्यक्तींचे शिबिर होईल. 'ते' शिबिर एकजिनसी शिबिरच असल्याने एकत्र कुटुंब असूनही वेगवेगळ्या चुली मांडणाऱ्या सांसारिकाचे स्वरूप शिबिरार्थींना येणार नाही.

शिबिरार्थींच्या योग्य निवडीनंतर प्रश्न निर्माण होतो तो शिबिरविषयक अपेक्षेचा. बऱ्याच वेळेला शिबिराच्या उत्तरार्धात याही शिबिरार्थीना आपण शिबिराला येण्यामागचे प्रयोजन आणि शिबिराचे फलित यातील अंतर जाणवते आणि शिबिराबाबत अनास्था निर्माण व्हायला लागते. हे टाळण्यासाठी -
(1) शिबिराच्या संयोजकांनी : (अ) शिबिर भरवण्यामागची भूमिका : (ब) शिबिरातील चर्चेचे विषय, (क) व्याख्यात्यांची आणि त्यांच्या विषयांची नावे. ही माहिती (इतर तपशिलाबरोबर) शिबिरात प्रवेश देऊ इच्छिणाऱ्या कार्यकत्यांना देणे आवश्यक आहे. त्यामुळे शिबिरास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना शिबिरातील विषयाची केवळ ढोबळ माहिती न होता जास्तीतजास्त माहिती मिळेल आणि शिबिरास येण्यापूर्वीपासून त्या विषयाबाबत विचाराला चालना मिळेल.                                                      (2) प्रतिसाद ( Feed back) शिबिराच्या संयोजकांनी शिबिरविषयक सर्वांगीण माहिती शिबिरात प्रवेश घेऊ इच्छिणाच्या कार्यकर्त्याला दिली की, त्याच वेळी संबंधित ‘शिबिरविषयक माझ्या अपेक्षा' अशा आशयाचे टिपण त्याच्याकडून शिबिर संयोजकांनी मागवावे. आणि शिबिर भरवण्यामागची भूमिका, शिबिरविषयक अपेक्षा यांमध्ये संवाद साधला गेला तरच 'त्या' कार्यकर्त्याला निमंत्रित करावे आणि त्या कार्यकर्त्याने ते निमंत्रण स्वीकारावे. इथे कुठेही मानापमानाचा प्रश्न दोन्ही बाजूंनी निर्माण करू नये. अशा शिस्तबद्ध पद्धतीतून आकारात बालेले शिबिर प्रेरक ठरेल. नाही तर एरवीचे शिबिराचे स्वरूप तात्पुरते आणि उथळ वाटते. वरील विचार केवळ सांगली येथील शिबिरामुळेच मनात आले, असे नाही. आतापर्यंतच्या जवळजवळ प्रत्येक शिबिराबद्दल हाच अनुभव आहे.

असे शिबिर मग सर्वसामान्यांच्या चेष्टेचा विषय बनते आणि काही अपेक्षेने व संवेदनाशील मनाने शिबिराला जाणारा कार्यकर्ता मात्र अपेक्षाभंगाने, वेदनेने आक्रंदत असतो- इतरांच्या नकळत! म्हणून मग अशा कार्यकर्त्यांचे प्रातिनिधिक मन उगाने म्हणत राहते,
‘‘शिबिराचे 'हे' रूप बदलायला हवे.........! शिबिराचे 'हे' रूप बदलायला हवे.........’’
 

Tags: शिबिराचा हेतू निष्कर्ष सांगली शिबिर purpose of camp conclusions sangali camp weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके