डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

विद्यार्थ्यांची समाजसेवा (नाती शिवली- सुई-दोऱ्यानी)

शाळा, झोपडपट्टी आणि वाड्यांनी वेढलेली. वस्ती जास्तीतजास्त श्रमिकांची, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांची. काहीतरी नवे करण्याची आमच्या सहकाऱ्यांची इच्छा होतीच. चर्चा मनात सुरू असतानाच मी वर्गात गेलो. वर्गातल्या काही मुलांच्या शर्टला बटने नव्हती. काहींनी बटनांच्या जागी पिना लावल्या होत्या, मनात विचार आला, यांची बटने लावली तर? 

‘‘आम्ही स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेल्या व्यक्तींनी आग्रह करून व प्रयत्न करून समाजसेवा हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावयास लावला आहे. 'सूत-कताई चे सुतक-ताई झाले, असे होऊ नये अशी आमची इच्छा आहे. प्रत्येक शाळेचा परिसर व पार्श्वभूमी भिन्न. तेव्हा तुम्ही काही कपक्रम घ्या. मुलींसाठी वेगळा उपक्रम घेता येईल का? शाळेच्या तासातच ते पूर्ण करता येतील का? याचा विचार करा. कोल्हापूर जिल्ह्याने पुढाकार घ्यावा असे मला वाटते. तुम्ही प्रयत्न करा आणि लिहाही.’’ असे मा. यदुनाथ थत्ते शिक्षकांच्या बैठकीत समारोप करताना म्हणाले आणि बैठक संपली.बैठकीतले विचार मनात घोळत होते. सुदैवाने मी कोरगावकर हायस्कूल या समाजसेवा विषय असणाऱ्या शाळेतच बदलून आलो होतो. शाळा, झोपडपट्टी आणि वाड्यांनी वेढलेली. वस्ती जास्तीतजास्त श्रमिकांची, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांची. काहीतरी नवे करण्याची आमच्या सहकाऱ्यांची इच्छा होतीच. चर्चा मनात सुरू असतानाच मी वर्गात गेलो. वर्गातल्या काही मुलांच्या शर्टला बटने नव्हती.

काहींनी बटनांच्या जागी पिना लावल्या होत्या, मनात विचार आला, यांची बटने लावली तर? समाजसेवा विषयाच्या शिक्षकांशी मी बोललो. कार्यवाहीसाठी 35 सुया, दोन ग्रोस शर्टाची व एक ग्रोस पँटची बटने, दोरा बंडल खरेदी करण्याची व्यवस्था झाली. मुलींशीही चर्चा झाली.चर्चेप्रमाणे शुक्रवारी मध्यंतरानंतरच्या समाजसेवेच्या तासाच्या वेळी काही मुले वेली लावण्यात, काही अंतर्गत जागेच्या सफाईत व काही जण कच्च्या मुलांचा शोध घेण्यात गुंतली. मुलींना एका खोलीत गोळा केले. सुई, दोरा, बटने वाटप व नियंत्रयाची व्यवस्था झाली. प्रथम बटन तुटलेली मुले एका वर्गात व बटने लावणाऱ्या मुली दुसऱ्या वर्गात- अशी स्थिती होती. त्यावेळी ने-आण करणारा गटही तयार ठेवावा लागला. पण नंतर पाचवी-सहावीची मुले लहान असल्याने तशीच मुलींच्या समोर उभी केली. पुढे सातवी-आठवीची मुलेही भीड मोडून समोर उभी राहिली.आत खोली भरली. बाहेर ओळ लावण्यात आली. आमच्या माध्यमिक शाळेच्या मुलांची बटने लावल्यानंतर आमच्याच इमारतीतील प्राथमिक शाळेच्या मुलांना बोलावण्यात आले आणि पुन्हा ओळी सुरू झाल्या. बटने लावण्याचे काम संपत असतानाच एका मुलाने प्रश्न केला, ‘‘फाटलेला शर्ट शिवून मिळेल का?’’ ‘‘हो अवश्य’’ उत्तर देण्यात आले. मग फाटलेले कपडे असणाऱ्या मुली व मुले बोलावण्यात आली. पुन्हा सर्व जण कामात गुंतले. उरलेले काम आटोपून विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका परतल्या. मी विचारले, ‘‘काय अनुभव आला? 

‘‘126 शर्टची बटने लावली गेली; 20 पँटची बटने लावली;15 मुलांचे फाटलेले शर्ट शिवले; 10 मुलींचे फाटलेले फॉल्स शिवले.’’ एका मुलाने एकावर एक असे तीन शर्ट घालून घेऊन बटने लावून घेतली.शेजारच्या प्राथमिक शाळेचे शिक्षक म्हणाले, ‘‘सर, ह्या आमच्या झोपडपट्टीतल्या कपडे फाटलेल्या व बटने तुटलेल्या मुलांचा प्रश्न आम्हांला जाणवत होता. पण मार्ग सुचत नव्हता. तुम्ही मात्र चांगला मार्ग काढला.’’ शेजारच्या बालवाडीतल्या शिक्षिका म्हणाल्या, ‘‘आमच्या मुलांमुलीसाठी हा कार्यक्रम घ्या. आमचे मोठे काम होईल. आमची शाळा लवकर सुटली. त्यामुळे तुमच्या योजनेचा फायदा घेता आला नाही.’’ ‘‘सर, माझं बऱ्याच दिवसांपूर्वी तुटलेलं बटन आज लावून मिळालं;  सर, शाळेला येताना माझ्या शर्टाचं बटन तुटलं होतं ते मला लावून मिळालं; गबाळपणाकडून व्यवस्थितपणाकडे नेण्याचा हा मार्ग आहे; आम्हां मुलींना आवडीचं मस्त काम मिळालं.’’
‘‘घरात आईच फाटलेले कपडे शिवते व सुटलेली बटने लावते. हे मला जमेल असं वाटत नव्हतं. आता मात्र विश्वास वाढला.’’ असे काही अभिप्राय. बटने लावल्यावर व फाटलेले कपडे शिवल्यावर मुले ऐटीत मिरवत गेली.

उपक्रमात सहभागी झालेल्या मुलामुलींना, शिक्षक-शिक्षिकांना या उपक्रमाने प्रभावित केले. पण या उपक्रमात रस न वाटलेल्या व मनात शंका असलेल्या दोघांनी अभिप्राय व्यक्त केला. ‘‘यामुळे आपण मुलामुलीना परावलंबी बनवू. फुकट घेण्याच्या सवयी लावू; ही समाजसेवा नव्हे.’’ इ. उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षक-शिक्षिकांनी या उपक्रमाविषयी चर्चा करताच अनेकांनी त्याचे कौतुक केले. काहींनी झोपडपट्टीतील मुलामुलींना कपडे जमवून देण्याचेही कबूल केले. उपक्रमाच्या दुसऱ्या दिवसापासून प्राथमिक शाळेतील मुले आपल्या बालवाडीतील भावा-बहिणींना घेऊन येऊ लागले आणि बटने लावून कपडे शिवून घेऊ लागले. सहकारी शिक्षक-शिक्षिकाही घरच्या लहान मुलांप्रमाणे त्यांची तुटलेली बटने लावण्यास व फाटलेले कपडे शिवण्यास पुढे येऊन कामात गुंतत होत्या. त्यानंतर काही दिवसांनी चाचणी परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षक म्हणून वर्गात फिरताना एका मुलाच्या जुन्या शर्टला एक पिनच दिसली. मी त्याच्या बटनाच्या जागी हात फिरवला. फक्त एकच बटन दिसले. पण त्यासाठी काज नव्हते. मी काजांची चाचणी केली. पण काज नव्हतेच. फक्तत काजाच्या पट्टीवर एकच भोक होते. पण त्यासाठी बटन नव्हते. मी त्याच्या जवळ बसून विचारले, कोणत्या वर्गात आहेस?

‘‘नववीत.’’                                                                                                                                                                                                             ‘‘शर्टाला बटने नाहीत. पिन दिसते. काजही नाहीत.’’ तो गप्पच होता.मीच विचारले, ‘‘बटन लावून का घेतले नाहीस?’’
‘‘घेतलं नाही.’’ ‘‘कारण?’’ उत्तर मिळाले नाही. ‘‘मुलींच्याकडून बटनं लावून घेण्यात छान वाटली!’’ 
‘‘होय, सर.’’
‘‘तुझं बटन का राहिलं ते मी सांगतो. गणवेश पाहिजे म्हणून शाळेत आग्रह धरला. कापड घेऊन शर्ट शिवायला टाकला. लवकर घालायला पाहिजे म्हणून काज करण्यापूर्वी आणि बटने लावण्यापूर्वीच शर्ट उचलून आणला.’’त्याने मान डोलवूनच कबुली दिली. ‘‘गेले वर्षभर तुझ्या आईवडिलांना हे माहीत आहे. पण काज करून व बटने लावून मिळत नाहीत.’’ त्याने मान खाली घातली. मी म्हणालो, ‘‘दे ते, तू तुझे काम सुरू कर.’’सहकारी शिक्षक-शिक्षिकांना हे सांगण्यासाठी आलो तर एक शिक्षक एका मुलाचे बटन लावण्यातच गुंतलेले होते.आम्ही उपक्रम हाती घेतला त्या शुक्रवारी बटने लावणारे व लावून घेणारे, फाटलेले कपडे शिवणारे व शिवून घेणारे, त्याचप्रमाणे मदतीस असणारे यांनी खोली भरून गेलेली होतो. बाहेरही रंग होती. सारी घरच्याच वातावरणात वावरत होती. त्यात भीडभाड नव्हती. आस्था आणि जिव्हाळाही होता.आम्ही सारेच कामात गुंग होतो. या सगळ्या धामधुमीत शेजारच्या प्राथमिक शाळेत शिकणारा माझा मुलगा मनोज तुटलेले बटन तोडून टाकून नवे बटन लावून घेऊन केव्हा गेला याचा मलाच पत्ता लागला नाही.

Tags: मुलांची समाजसेवा छोट्यांचे पान kid's social service kid's page weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके