डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आकाशवाणी, दूरदर्शन आदींकरून शासकीय माध्यमांची विश्वासार्हता किती? ते पुढे दिलेल्या नभोवाणी मंत्री श्री. साठे आणि पूज्य विनोबा भावे यांच्यामध्ये झालेल्या संवादाचे जे यथातथ्य वर्णन श्री. ठाकूरदास बंग यांनी गोपुरीहून पाठवले आहे. त्यावरून लक्षात येईल.

केंद्रातील सूचना आणि प्रसारणमंत्री श्री. वसंतराव साठे पू. विनोबांना भेटण्यासाठी 28 जाने. 1982 रोजी सकाळी पवनार आश्रमात आले. ते याच क्षेत्रातून लोकसभेवर निवडले गेले आहेत. त्यामुळे महिन्या दोन महिन्यांनी त्यांची विनोबांशी गाठभेट होते. या खेपेला गोहत्या बंदीबाबत त्यांच्यात व विनोबांत जो गंभीर संवाद घडला तो येणेप्रमाणे होता : 
विनोबा : गोहत्या बंदीबाबत तुमचे काय म्हणणे आहे?
श्री. साठे : बाबा, या वेळी मी तुमच्यासाठी खूशखबर आणली आहे. मी कालच इंदिराजींना भेटून आलो. त्यांनी आमच्या पक्षाच्या राज्यशासनाला सूचना केली आहे की, सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या मर्यादा सांभाळून गोहत्या बंदीचे पालन कशा प्रकारे व्हावे. आपल्या राज्यामधून बाहेर पाठवण्यात येणाऱ्या गाईंवर बंदी घालावी.
विनोबा : तुम्हांला वेतन किती मिळते? 
श्री. साठे : मासिक दोन हजार रुपये.
विनोबा : तुम्हांला शासनाकडून दोन हजार रुपये मिळतात ना? गोहत्या बंद करायची असेल तर तुम्ही इंदिराला आणि इंदिरा काँग्रेसला सोडा. तरच गोहत्या बंद होईल.
वार्तालापाच्या वेळी अनेक पत्रकार, लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी इत्यादी मंडळी उपस्थित होती. ‘इंदिराला सोडा’ असे बाबांनी म्हटल्यामुळे वातावरण एकदम गंभीर बनले.
श्री. साठे : इंदिराजींना किंवा बाबांना, कोणालाच सोडण्याची आवश्यकता नाही.
बाबा : इंदिरा गांधी एक इंदिरा गांधी नाही. इंदिरा गांधी, इंदिरा गांधी, इंदिरा गांधी, समजले ? इंदिरा गांधींचा मुलगा, जगजीवनरामचा मुलगा- हे काय चालले आहे? माझ्या इथे येण्याला इंदिरा गांधींना भीती वाटत आहे. तिला असे वाटते की, बाबांकडे गेले की ते सांगतील, 'अशोकाप्रमाणे राज्यकारभार सोड!’ 
विनोबाजींनी श्री. साठे यांच्या कोटाकडे पाहून विचारले,  ‘‘ हा खादीचाआहे का?’’
श्री. साठे : नाही. हा खादीचा नाही, पण स्वदेशी आहे. 
हे ऐकून बाबा खूप हसले आणि म्हणाले, ‘‘जेचे खादी नाही तेथे गांधी नाही, तुम्ही लोकांनी गांधींना खाऊन टाकले. आणि श्री. शिवशंकर पेन्टे यांच्याकडे पाहून म्हणाले, ‘‘पेन्टे! यांना चांगल्या तऱ्हेने रंगवा.’’
श्री. पेन्टे श्री. साठे यांना म्हणाले, ‘‘या देशात दर वर्षी एक करोड गाय-बैल यांची हत्या होत आहे. असेच जर यापुढे चालले तर या से शेतीप्रधान भारताचे काय होणार? गोहत्या बंदीचा प्रश्न आपण कायदेमंडळाच्या प्रस्तावात (कन्करन्ट लिस्ट) घ्यावा. प. बंगाल आणि केरळसाठी कायदा करावा. म्हणज हा प्रश्न सहजगत्या सुटेल.’’
हे ऐकून श्री. साठे म्हणाले, ‘‘पेन्टेजी! संपूर्ण गोवंशाच्या हत्याबंदीची बाबांची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णधाबाहेरची ही मागणी आहे. यामुळे देशात अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतील. घटनेमध्ये सुधारणा करावी लागेल.’’
श्री. साठे यांचे म्हणणे ऐकून बाबा म्हणाले, ‘‘होय, संपूर्ण गोवंशहत्या बंदीची माझी मागणी आहे. त्याशिवाय गोहत्या बंद होणार नाही. यातूनच जर गंभीर प्रश्न निर्माण झाले तर ते सोडवले पाहिजेत.’’ 
पुनः हसून बाबांनी श्री. साठे यांना विचारले, ‘‘सरकारपुढे दुसरे मोठे प्रश्न आहेत ना? गोहत्या बंदीची मागणी आपल्याला छोटी वाटत आहे ना?’’ (हाताच्या अंगठ्याचा छोटा भाग त्यांनी दाखवला.)
श्री. साठे : बाबा ! गोहत्या बंदीचा प्रश्न हाती घेऊन काही दुष्ट लोक त्याला राजकीय स्वरूप देत आहेत. आपल्याला चुकीची माहिती देऊन आपण व श्रीमती इंदिरा गांधी यांमध्ये फूट पाडत आहेत. 
हे ऐकून बाबा खूप जोराने हसले आणि म्हणाले, ‘‘मला जर चुकीची माहिती मिळत आहे. तर तुम्ही खरी माहिती द्या ना!" श्री. साठे पुढे म्हणाले, ‘‘देशापुढे अनेक समस्या असतानाही श्रीनती इंदिराजी या प्रश्नाकडे पूर्ण लक्ष देत आहेत. गोहत्या बंदी कायद्याने होणार नाही, यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे." यावर विनोबाजी पुनः हसले आणि म्हणाले, ‘‘करोडो गायींचे मांस परदेशांत निर्यात होत आहे. लाखो गायींची कत्तल होत आहे. हे सारे जनतेच्या सहकार्याने होत आहे ?"

वरील चर्चा झाल्यावर श्री. साठे यांनी बाबांची एकान्तात भेट घेतली आणि 30 जानेवारीला एक वेळचे जेवण न सोडण्याची विनंती केली. बाबांनी त्याचे उत्तर दिले नाही आणि 30 जानेवारीला एक वेळचे जेवण सोडून देशव्यापी गोरक्षा सौम्य सत्याग्रहाचा शुभारंभ केला.

Tags: सरकारचे धोरण वसंत साठे विनोबा भावे गोहत्या बंदी govt. policy vasant sathe vinoba bhave ban on cow slaughter weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके