डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लखपती होण्याची वासना धरणारे प्राचार्य!

जतच्या राजे रामराव महाविद्यालयाच्या जमिनीवर जो हिरवा टवटवीतपणा घामातून फुलला होता तो तिथल्या सर्वांच्या चेहऱ्यावरही प्रतिबिंबित झाल्यासारखा वाटत होता. लखपती बनण्याचे स्वप्न पाहणारे प्राचार्य श्यामराव चव्हाण आणखी निपजले तर महाविद्यालयांच्या परिसराचीच केवळ नव्हे, तर शिक्षणाचीदेखील कळा पालटून जाईल. 

नुकताच सांगली जिल्ह्यात जतला जाऊन आलो. जत हे जुने छोटेसे संस्थान, उजाड माळरानांचा हा भाग. सांगलीच्या परिसरातील कृषी-उद्योगांची समृद्धी व त्या अनुषंगाने सांगलीची झालेली भरभराट पाहिली की जत फारच दीनवाणे वाटते!वाहतुकीच्या दृष्टीनेही जत जरा एका बाजूलाच पडते. कानडी-मराठी या भागात सरमिसळ झालेलीआहे. शिकणाऱ्या मुलांपुढेही कित्येक पेच त्यामुळे असतात. घरात कानडीचा वापर करायचा आणि शाळेत आणि घराबाहेर मराठीचा वापर करायचा.  त्यामुळे मुलांची थोडी कुचंबणा होते.सीमाप्रदेशातली ही एक फार मोठी शैक्षणिक अडचण आहे. मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असावे, असा आग्रह पुष्कळदा असतो. खरे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी अभिप्रेत प्रदेश-भाषाच असते. आचार्य दादा धर्माधिकारी तर असे म्हणतात की, मातृभाषा अशी काही नसतेच. मूल ज्या परिसरात वागते-वाढते, त्यामधून ते भाषा शिकत असते आणि घरातल्या स्थितीवर त्याची भाषाक्षमता जोपासली जाते. जुन्या कीर्तनकारांचा एक ठरावीक दृष्टान्त असायचा.

‘कानडीने केला मराठी भ्रतार, एकाचे उत्तर एका न ये' असे म्हणून आपण काहीतरी मोठा विनोद केला असे समजून त्यानंतर विठ्ठलनामाचा गजर व्हायचा! जतमध्ये अशी अनेक कुटुंबे सापडतील की जेथे नवरा-बायकोची म्हणजेच आईवडलांची भाषा वेगवेगळी आहे आणि अशा कुटुंबांतली मुले पितृभाषा आणि मातृभाषा यांच्या कचाट्यात सापडतात. शेवटी प्रदेशातल्या प्रचलित भाषेत व्यवहार करू लागतात.अशा या गावात विवेकानंद शिक्षण संस्थेने महाविद्यालय सुरू करण्याचे साहस केले. महाविद्यालयासाठी ज्या किमान गोष्टी लागतात त्या चिमणीच्या उद्योगीपणाने जमवल्या. मुलांचे सर्वत्र वैपुल्य आपल्या देशात आहेच, पण त्यातही दरिद्र्याला संततीचे वरदान असायचे! त्यामुळे शाळा-कॉलेजांना संख्येची चिंता फारशी पडत नाही!दरिद्री मुलखात,  ‘बुडत्याला काडीचा आधार’ असावा त्याप्रमाणे, शिक्षण हाच आधार वाटतो आणि संपन्न भागातल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक मन लावून इथली मुले शिकतात. जतला गेल्यावर तिथल्या राजे रामराव महाविद्यालयात जाण्याचा प्रसंग आला. मोठ्या शहरांतल्या महाविद्यालयांत पाऊल टाकताच जो नकली झुळझुळीतपणा दिसतो तो इथे आढळला नाही. सगळा मामला रांगडा, रोखठोक. चेहऱ्यावर उगा फुलवलेले हसू नाही, की स्वागतातला औपचारिकपणा नाही. महाविद्यालयाचे एक तप पूर्ण झाले आहे.

1976 पासून प्राचार्यपद श्री. श्यामराव चव्हाण या विद्यासंपन्न गृहस्थांकडे आहे. परदेशवारी केलेले हे गृहस्थ. त्यांच्या वागण्याबोलण्यात एक सैनिकी अदब दिसली. प्रा. श्यामराव चव्हाण महाविद्यालयाच्या मागल्या बाजूला घेऊन गेले. बोलता बोलता श्यामराव म्हणाले, ‘‘लखपती व्हायचं माझं स्वप्न आहे!’’ वाक्य ऐकून मला थोडासा अचंबा वाटला थोडासाच. कारण हल्ली शिक्षणक्षेत्रातील मंडळींनाही बऱ्यापैकी उत्पन्न असते आणि इतर अनेक दोन कवडीची माणसे लखपती बनलेली दिसतात तेव्हा एखाद्या प्राचार्याला तशी वासना झाली तर त्यात अचंबा वाटण्यासारखे तसे काही नाही! पण लखपती बनण्याची वासना असणारा तसे उघडपणे नवपरिचितापाशी कशाला बोलून दाखवील? मग मी कुतूहलाने म्हणालो, ‘‘त्यात आपल्याला अशक्य काय आहे? लखपती बनण्यासाठी कित्येक लोक सरकारी किंवा खाजगी मटक्याच्या नादी लागलेली असतात, काही जण रेसच्याही नादी लागतात आणि त्यात समाजातली भली समजली जाणारी मंडळीही असतात. लग्नात वावराना अहेर म्हणून लॉटरीची तिकिटे देणारे काही कल्पक लोकही असतात.

एक जण म्हणाला, ‘‘ही कल्पना मात्र चांगली आहे. लॉटरी लागली तर तिकीट देणारा कल्पक, न लागली तर वधू-वरांचे नशीब फुटके! खरे तर लॉटरीचे तिकीट देऊन सरकारलाच लग्नानिमित्त अहेर केलेला असतो! मग मी विचारले, ‘‘लखपती बनायला आता कितीची भर घालावी लागणार आहे?" प्राचार्य म्हणाले, ‘‘अजून माझी मोकरीची सात-आठ वर्षे आहेत. तेवढ्यात लखपती सहज होऊन जाईन!’’माझ्या मनात आले, भविष्यनिर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटी मिळण्याचीच बहुधा ते वाट पाहत असावेत. कदाचित अठ्ठावन वय होण्यापूर्वी निवृत्त झाले तर आधीही लखपती होता येईल! तेवढ्यात एक मित्र म्हणाले, ‘‘आतापर्यंत चाळीस-पन्नास हजारांची मजल गाठून झाली आहे!’’
मला वाटले, या मित्राला ही उठाठेव कोणी सांगितली? अशा गोष्टी माहीत असल्या तरी सभ्य माणूस बोलून दाखवत नाही. सलगीचा असा गैरफायदा घेणे योग्य नाही. एव्हाना आम्ही कॉलेजच्या मागल्या बाजूला येऊन पोचलो होतो. अडीच हजार झाडांची वनराई आकारास येत होती. त्यात पाचशे झाडे नारळाची होती. तरारून उठत होती. लाग सुरू झाली नव्हती. पण वर्षा-दोन वर्षांत नारळ लागू लागतील, अशी लक्षणे दिसत होती.

एका महाविद्यालयाच्या मालकीची पाचशे माडांची बाग! सरकारी अनुदानापेक्षा जास्ती भरवशाचे अनुदान देणारी पाचशे माडांची बाग! प्रत्येक झाडाला पाच माड सरासरी लागले तरी आजच्या बाजारभावाने चार-पाच लाख रुपये झाले! आणि हे सर्व कोणाच्यातरी पुढे लाचारीने झोळी पसरून मिळवलेले नव्हे.श्यामराव चव्हाण आत्मविश्वासाने सांगत होते, ‘‘पाटणला अशीच वनराई मी उभी केली... संस्थेला कायम उत्पन्नाचे साधन झाले. इथेही विद्यार्थी आणि सेवकांनी नियमितपणे घाम गाळून संस्थेसाठी ही कोकणी कामधेनू आणली आहे! प्रत्येक शिक्षणसंस्थेने ठरवले आणि त्याप्रमाणे झटून काम केले, विज्ञानाचा वापर केला तर इथली विद्याही मुक्त होऊ शकेल! इथला विद्यार्थी जीवनात उतरेल त्या वेळी नुसती विद्यापीठाची प्रमाणपत्रे देऊन उतरणार नाही, तर तो आत्मविश्वास घेऊनच उतरेल! प्रा. श्यामराव चव्हाणांच्या लखपती बनण्याच्या वासनेचा एकदम उलगडा झाला. स्थानिक शाळेचे एक मुख्याध्यापक म्हणाले,  ‘‘सरांना हे एकच वेड आहे. त्यांच्यामुळे आमच्या शाळेच्या आवारातही आमची अशी धडपड सुरू झाली आहे. उघडी-बोडखी भूमी दिसली की ते बेचैन होतात. शक्यता अजमावून मग ते त्या माणसाच्या मागे ससेमिराच लावतात.

राष्ट्रगीत, 'वंदे मातरम्' म्हणण्याचा नव्हे तर जगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे! ‘सस्य श्यामला’ असे तोंडाने नुसते म्हणत न बसता हातानी ‘सस्य श्यामला’ सर्वांनी म्हणावे, अशी त्यांना तळमळ आहे!" मरण्यापूर्वी एक लाख झाडे लावून, वाढवून लखपती व्हायचे असा प्रा. श्यामराव चव्हाण यांना ध्यास आहे आणि तो ते करून दाखवतील या बाबत कोणाच्याच मनात शंका नाही. जतच्या महाविद्यालयावर एक वेगळी क्रांती यामुळे घडली आहे.थोडेसे पुढे गेल्यावर त्यांनी महाविद्यालयाचे तयार झालेले क्रीडांगण दाखवले. जुळी धावपट्टी असणारे. क्रीडांगण. खुद्द शिवाजी विद्यापीठाजवळही एकेरी धावपट्टी आहे आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही दुसऱ्या महाविद्यालयाजवळ अशी धावपट्टी नाही! महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर सेवकांनाही ( मुख्यतः प्राध्यापकेतर) श्यामरावांनी खेळाच्या मैदानात उतरवले असून अनेक सुवर्णपदके त्यांनी पटकावली आाहेत. एक विद्यार्थी अभिमानाने म्हणाला, ‘‘ऑलिंपिकच्या मैदानात इथला खेळाडू उतरल्याचे एक दिवस दिसेल.’’प्राचार्य श्यामराव चव्हाण सांगत होते, "आमच्या महाविद्यालयाच्या गड्यांनाही मी सांगितले की तुम्हांला पूर्ण वेळची आणि कायमची नोकरी हवी असेल तर तुम्हांला काह तरी कर्तबगारी दाखवली पाहिजे. आणि मग ते सेवक इरेला पेटले आणि काहींनी राज्यपातळीवर पदके मिळवली!’’

या महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्ती मिळवलेली आहे. अनेक महाविद्यालयांत आंबलेले वातावरण दिसून येते. प्राध्यापक सिनिक झालेले. या देशात काहीही घडणे शक्य नाही, अशी नास्तिकता त्यांना विळखा घालून बसलेली आणि बहुधा काहीही न करता विळखा घालून बसलेली! विद्यार्थ्यांना ते आणि त्यांना विद्यार्थी बहुधा कंटाळलेले. बळजबरीने सर्कशीच्या पिंजऱ्यात वेगवेगळया प्राध्यापकांना एकत्र करावे तसे तर हे सर्व एकत्र जमले नाहीत ना, असे वाटावे अशी स्थिती. पण जतच्या राजे रामराव महाविद्यालयाच्या जमिनीवर जो हिरवा टवटवीतपणा घामातून फुलला होता तो तिथल्या सर्वांच्या चेहऱ्यावरही प्रतिबिंबित झाल्यासारखा वाटत होता. लखपती बनण्याचे स्वप्न पाहणारे प्राचार्य श्यामराव चव्हाण आणखी निपजले तर महाविद्यालयांच्या परिसराचीच केवळ नव्हे, तर शिक्षणाचीदेखील कळा पालटून जाईल.

Tags: प्रा. श्यामराव चव्हाण राजे रामराव महाविद्यालय जत स्तुत्य उपक्रम झाडे जगवा! झाडे लावा prin. shyamrao Chavan raje ramrao college jat commendable activity plant trees - grow trees weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

यदुनाथ थत्ते

(ऑक्टोबर 1922 -  मे 1998)  भारतीय स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार,  लेखक. यदुनाथजी 1956 ते 1982 या काळात साधना साप्ताहिकाचे संपादक होते .  


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके