डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

बालकुमार दिवाळी अंकाच्या आत्तापर्यंत नऊ वर्षांत मिळून 25 लाख 60 हजार प्रती वितरित झाल्या आहेत. त्यामुळे पुढील म्हणजे दहाव्या वर्षी बालकुमारच्या पाच लाख प्रती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोचविण्याचे उद्दिष्ट गाठले जाऊ शकते, असा विश्वास आता सर्वांनाच वाटू लागला आहे. आणि म्हणून पुढच्या वर्षी बालकुमारची दशकपूर्ती व साधना साप्ताहिकाची सत्तरी ही दोन निमित्ते साधून ‘निवडक बालकुमार साधना’ हे दीडशे पानांचे पुस्तक प्रसिद्ध करणार आहोत, त्यात दहा वर्षांतील प्रत्येकी दोन/तीन अशा तीस गोष्टी/लेख यांचा समावेश असेल. ते पुस्तक साने गुरुजींच्या जन्मदिनी म्हणजे 24 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध होईल.

साधनाचा दिवाळी अंक, असे शब्द उच्चारले तर ‘कोणता?’ असा प्रश्न आता, बऱ्यापैकी वाचक असलेल्या लोकांकडून विचारला जातो. कारण मागील नऊ वर्षांपासून ‘बालकुमार’ आणि गेल्या तीन वर्षांपासून ‘युवा’ हे दोन स्वतंत्र दिवाळी अंक, ‘मुख्य’ दिवाळी अंकासोबत प्रसिद्ध केले जातात. साधनाच्या वर्गणीदार वाचकांना हे तिन्ही दिवाळी अंक सलग तीन आठवड्यांचे तीन अंक म्हणून पाठवले जातात. त्याप्रमाणे यावर्षीचे बालकुमार व युवा हे दोन्ही अंक वर्गणीदार वाचकांच्या हातात यापूर्वीच पडले आहेत आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. हा अंक छापायला जात असताना बालकुमार अंकाच्या 2 लाख 85 हजार प्रती, तर युवा अंकाच्या 45 हजार प्रती वितरित झाल्या आहेत. पुढील दहा-बारा दिवसांत (प्रतिसाद लक्षात घेता) ते दोन्ही अंक अनुक्रमे तीन लाख आणि पन्नास हजार प्रती यादरम्यान वितरीत झालेले असतील.

गुणात्मक वाढीबरोबरच संख्यात्मक वाढत होत असेल तरच ‘विकास’ ही संज्ञा वापरता येते, या पार्श्वभूमीवर हे यश महत्त्वाचे आहे. हे दोन्ही दिवाळी अंक इतक्या मोठ्या प्रमाणात वितरित होऊ शकतात, याचे कारण महाराष्ट्रातील अनेक शिक्षणसंस्थांचे चालक व पदाधिकारी, शिक्षक व प्राचार्य आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले साधनाचे हितचिंतक यांचा सक्रिय सहभाग या मोहिमेला मिळतो. अर्थातच ही कार्यवाही घडवून आणण्याचे सर्वाधिक श्रेय आमचे प्रकल्प व्यवस्थापक गोपाळ नेवे आणि त्यांच्या ‘टीम’कडे जाते. (अशाच प्रकारे दिवाळी अंकाला जाहिराती मिळविण्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे व तितकेच कठीण काम आमचे सल्लागार दत्ता वान्द्रे व सहकारी मनोहर पाटील यांनी केले आहे.)

बालकुमार दिवाळी अंकाच्या आत्तापर्यंत नऊ वर्षांत मिळून 25 लाख 60 हजार प्रती वितरित झाल्या आहेत. त्यामुळे पुढील म्हणजे दहाव्या वर्षी बालकुमारच्या पाच लाख प्रती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोचविण्याचे उद्दिष्ट गाठले जाऊ शकते, असा विश्वास आता सर्वांनाच वाटू लागला आहे. आणि म्हणून पुढच्या वर्षी बालकुमारची दशकपूर्ती व साधना साप्ताहिकाची सत्तरी ही दोन निमित्ते साधून ‘निवडक बालकुमार साधना’ हे दीडशे पानांचे पुस्तक प्रसिद्ध करणार आहोत, त्यात दहा वर्षांतील प्रत्येकी दोन/तीन अशा तीस गोष्टी/लेख यांचा समावेश असेल. ते पुस्तक साने गुरुजींच्या जन्मदिनी म्हणजे 24 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध होईल. आणि त्याचवेळी कुमारांचे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा विचार आहे.

त्यानंतरच्या वर्षी युवा दिवाळी अंकाला पाच वर्षे पूर्ण होतील, तेव्हा (24 डिसेंबर 2018) युवकांचे साहित्य संमेलन आयोजित करण्याचा विचार आहे. म्हणजे साधनाच्या सत्तराव्या वर्षाच्या सुरुवातीला व अखेरीस, कुमार व युवा ही दोन साहित्य संमेलने आयोजित करून साने गुरुजींना आगळेवेगळे अभिवादन करता येईल.

या क्षणी आम्हाला डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची आठवण तीव्रतेने होणे साहजिक आहे. कारण साधनाचे हीरकमहोत्सवी (60 वे) वर्ष त्यांनी एक वर्ष आधीच सुरू केले होते आणि त्या दोन वर्षांत अनेक कार्यक्रमांची रेलचेल निर्माण करून, काही उपक्रम दीर्घकालीन हेतू समोर ठेवून सुरू केले होते. आणि त्यामुळेच साधनाच्या अमृतमहोत्सवी (75 वर्ष) वाटचालीची पायाभरणी होऊ शकली. त्यानंतरच्या दहा वर्षांचा प्रवास, जणू काल-परवा घडला इतका आमच्या मनात ताजा आहे. आणि ती पायाभरणी इतकी भक्कम आहे की, साधना चालवता येणे हे आम्हाला अवघड वाटत नाही, मात्र साधना वाढवता येण्यासाठी खूप जास्त संधी असूनही अपेक्षित गतीने प्रवास करता येत नाही, याची खंत निश्चित आहे.

अपेक्षित गतीने प्रवास करता येण्यासाठी व्यावसायिक नीतीमूल्यांचा अंगिकार करून ध्येयवाद जोपासता येणे आणि तो ध्येयवाद परिणामकारक असणे आवश्यक असते. आणि म्हणूनच कदाचित, या वर्षीच्या तिन्ही दिवाळी अंकांत आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्य (Perspective) असणाऱ्या लेखनाचे प्रमाण जास्त झाले आहे.  साधनाच्या बालकुमार दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर केंनियामधील रिचर्ड तुरेरे या 13 वर्षाच्या पराक्रमी मुलाचे छायाचित्र आहे. तर युवा दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू की यांच्यावरील ‘द लेडी’ या सिनेमातील छायाचित्र आहे. ते सूत्र पुढे घेऊन मुख्य दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर आईसोबत छोटा बराक ओबामा असे छायाचित्र घेतले आहे. (हे मुखपृष्ठ तयार केले तेव्हा हेरंब कुलकर्णी यांच्या एका मेलमुळे लक्षात आले, साने गुरुजींच्या आईचे स्मृतिशताब्दी वर्ष येत्या 2 नोव्हेंबरला सुरू होत आहे.) ही तीनही छायाचित्रे आणि त्यामागील आशय मानवी जीवनाच्या कक्षा रुंदावण्याची विशेष आवश्यकता असल्याचे सूचित करणारी आहेत.

या मुख्य दिवाळी अंकात आठ लेख आहेत. ते चार गटांत विभागता येतील. हमीद दलवाई व रावसाहेब कसबे यांच्या मुलाखती अनुक्रमे हिंदु-मुस्लिम ताण आणि मराठा-मराठेतर तणाव यांच्या संदर्भात सम्यक आकलन करून घेण्यासाठी उपयुक्त आहेत. विनय हर्डीकर व राहुल कुलकर्णी यांचे दीर्घ लेख अनुक्रमे शेती/शेतकरी आणि दुष्काळ यांच्या पार्श्वभूमीवर आपल्या मनात खळबळ निर्माण करणारे आहेत. अतुल देऊळगावकर व गोविंद तळवलकर यांनी अनुक्रमे तळागाळातील भारतीयांसाठीचा बेकर आणि रशियनांच्या मनात रूजलेला शेक्सपिअर वाचकांसमोर उभा केला आहे. तर बराक ओबामा व थेरेसा मे या अनुक्रमे अमेरिका व ब्रिटन या देशांच्या प्रमुखांना समजून घेणे म्हणजे आपणच आपल्या देशाला समजून घेण्यासारखे आहे. उदात्त ध्येयवाद आणि उदारमतवादी मानवी मूल्ये यांचे एक प्रतिक झालेल्या ओबामा यांना संजय आवटे यांनी मागील आठ वर्षांत ज्या पद्धतीने मराठी वाचकांसमोर आणले आहे, तसे काम अन्य कोणी केलेले नाही.

संकल्प गुर्जर या तरुणाने या वर्षीच्या तिन्ही दिवाळी अंकांत मिळून पाच महत्त्वपूर्ण अनुवाद (मिशेल ओबामा, हिलरी क्लिंटन, रघुराम राजन, आँग सान सू की, थेरेसा मे) केले आहेत, संपादकीय कामासाठीही त्याची मदत आम्हाला झालेली आहे. हा संपूर्ण अंक वाचला तर भारत आणि जग या दोन्ही स्तरांवर विचार करण्याची आवश्यकता आताच्या काळात जास्त आहे, असाच ठसा वाचकांच्या मनात उमटेल असा आम्हाला विश्वास आहे. आणि मग आपल्या आजच्या व उद्याच्या बदलांसाठी अधिक कालसुसंगत विचार करण्याची गरज त्यातून अधोरेखित होईल.

दिवस उगवणे आणि मावळणे हे आपण रोज अनुभवत असतो. त्याप्रमाणेच सत्‌ आणि असत्‌ प्रवृत्ती आपल्या सभोवताली सर्वत्र असतात. इष्ट आणि अनिष्टही बदल सतत घडतच असतात. काही बाबतीत प्रगती आणि काही बाबतीत अधोगती असे प्रकारही समाजाच्या वाटचालीत गृहीतच असतात. या सर्व प्रक्रियेत प्रत्येक समाजाचा, राष्ट्राचा आणि जगाचाही प्रवास लंबकाप्रमाणे हेलकावत पण पुढेपुढेच जात असतो. लंबक कोणत्याही एका टोकाला जातो तेव्हा अस्वस्थता/घबराट निर्माण होते. मात्र त्यावेळी अधिक धैर्याने काम करत राहणे आवश्यक असते. तसे धैर्य साधना वाचकांना मिळत राहो, यासाठी आमच्या मन:पूर्वक शुभेच्छा!                          

Tags: दिवाळी अंक विनोद शिरसाठ संपादकीय साधना दिवाळी अंक vinod shirsat editorial sampadakiy diwali ank weekly sadhana 5 january 2016 sadhana saptahik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके